माँ के आशिर्वाद की ताकद
✍️:डॉ.ज्युबेदा मन्सूर तांबोळी
फोटो:साभार गुगल
एकदा हजरत मुसा अलैस्सलाम यांनी अल्लाहना विचारले की, जन्नतमध्ये (स्वर्गामध्ये) माझ्या शेजारी कोण असेल. अल्लाहनी सांगितले, एक कसाई तुझा शेजारी असेल. हे ऐकून मुसा अलैस्सलाम नाराज झाले. त्यांना फार आश्चर्य वाटले ते पाहून अल्लाह म्हणाले, तू स्वतः त्या कसाई भाईला भेट. त्याला भेटल्यावर तुला समजेल. खात्री पटेल. हजरत मुसा अलैस्सलाम त्या कसाईच्या शोधात निघाले. शेवटी त्यांना कसाई भाईच्या दुकानाचा पत्ता सापडला. तो भाई मांस बारीक करून गिऱ्हाईकांना हसतमुखाने देत होता.
ह. मुसा अलैस्सलाम त्याच्याजवळ गेले वत्याला म्हणाले, मी एक प्रवासी आहे. मला आजच्या दिवशी तुझ्या घरी रहायला आसरा देशील का. भाई म्हणाला, का नाही देणार, खुशाल रहा माझ्या घरी तुम्हाला वाटेल तितके दिवस. भाईनी दुकानची वेळ संपल्यानंतर शटर बंद केले व त्यांना घेवून घरी गेले.
घरी गेल्यावर पाहुणे आल्याचे सांगितले. त्यांचे स्वागत केले. प्राथमिक पाहुणचार झाला. पाहुण्यासोबत राहण्याच्या मुलाला सुचना दिल्या. पाहुण्यांच्या स्वयंपाकाबद्दल पत्नीला सांगून भाई थेट आईजवळ गेले. आईचे हातपाय चोळत तिच्याशी छान गप्पा मारल्या. स्वयंपाक तयार झाल्यावर भाकरी बारीक कुस्करून आईला घास भरवले. तिच्या तोंडावरून पाण्याचा हात फिरवला. आई खूश झाली. आई भाईच्या तोंडावरून हात फिरवत काहीतरी बोलली. ह. मुसा अलैस्सलाम यांनी ते सर्व पाहिले, 'पण त्यांना आई काय बोलली ते नीटसे ऐकू आले नाही.
भाई ह. मुसा अलैस्सलाम यांच्याकडे आले व म्हणाले, चला आता आपण जेवण करू या. ह. मुसा अलैस्सलाम भाईना म्हणाले, तुझा हा नित्यक्रम आहे का. भाई म्हणाले, होय मी दररोज अशाप्रकारे आईची सेवा करतो. ह. मुसा अलैस्सलाम म्हणाले, मघाशी तुमची आई तुम्हाला काय म्हणाली. भाई हसून म्हणाला, वेडी आहे माझी आई, ती म्हणत होती अल्लाह माझ्या मुलाला जन्नतमध्ये हजरत मुसा अल्लैस्सलाम यांच्याशेजारी जागा दे. ते कसं शक्य आहे. मी आपला साधा माणूस, मला कशी काय एवढ्या महान व्यक्तीजवळ जागा मिळेल. यावर ह.मुसा अलैस्सलाम म्हणाले, का नाही मिळणार तुझ्या पाठीशी तुझ्या आईचा आशिर्वाद असताना. आणि हो मीच आहे हजरत मुसा अलैस्सलाम. असे असतो आईचा आशिर्वाद.