शुक्रवार, ७ मार्च, २०२५

कमाल सत्कृत्याची

               

                   कमाल सत्कृत्याची 

          
                ✍️:ज्युबेदा मन्सूर तांबोळी 

.                     फोटो:साभार गुगल

       पवित्र रमजान महिन्यात सत्कृत्ये करण्याची सुवर्णसंधी मिळते. या संदर्भात ५ ते ६ हजार वर्षापूर्वीची ही कथा.

       बनी इस्त्राईलमध्ये तीन प्रवासी प्रवासासाठी निघाले होते. एके दिवशी सोसाट्याचा वारा सुटला, पाऊस जोरात पडण्याची चिन्हे दिसू लागली. ते तिघेजण एका गुहेत आश्रयासाठी जावून बसले. काही वेळाने त्या गुहेच्या तोंडाशी एक मोठा दगड येऊन पडाला. तो तिघांनी ढकलण्यासारखा नव्हता. फोन करून क्रेन मागविण्याची त्यावेळी सोय नव्हती. दगड बाजूला झाल्याशिवाय त्यांना बाहेर येणे महाकठीण होते. त्या तिघांनी अल्लाहकडे प्रार्थना केली. व हे संकट दूर करण्यासाठी विनवले पण दगड कांही हटेना. त्या तिघांनी ठरले की आपण तिघांनी जीवनामध्ये कांही सत्कृत्य केले असेल तर ते सांगून अल्लाहची अगदी मनोभावे प्रार्थना करू या.

       पहिला म्हणाला, मी मातृभक्त आहे. मी व माझी पत्नी, मुलेबाळे माझी आई जेवल्याशिवाय जेवन करत नव्हतो. एका रात्री आईला झोप लागली. तिची झोपमोड करायची नाही व ती जेवल्याशिवाय आम्ही जेवणार नाही म्हणून आम्ही कुणीच जेवण घेतले नाही. आईला मध्येच जाग येईल, तिला भूक लागलेली असेल असा विचार करून मी रात्रभर जागलो. बायको मुले भूक लागलेली असतानाही उपाशी झोपलो. ही गोष्ट माझ्या अल्लाहला आवडली असेलच. त्याच बोलणे संपताच तो दगड थोडासा बाजूला गेला.

       दुसरा सांगू लागला, माझा एक मित्र दूरच्या प्रवासासाठी निघाला होता. त्याने थोडी रक्कम माझ्याजवळ आणून ठेवली मी त्या रकमेतून दोन बकऱ्या विकत घेतल्या. त्यांचा सांभाळ करू लागलो. दोनाच्या चार झाल्यानंतर कळप तयार झाला. मला खूप पैसे मिळू लागले. मी श्रीमंत झालो पण, मित्राचा काही ठावठिकाणा नव्हता. एके दिवशी अचानकपणे तो परत आला. तो हलाखीच्या परिस्थितीत आहे हे दिसतच होते. मी त्याला मिळवलेली सर्व संपत्ती देऊन टाकली व मी माझ्या पूर्वीच्या घरी गेलो. नव्याने कष्ट करून उदरनिर्वाह करु लागलो. माझा हा प्रामाणिकपणा अल्लाहना आवडला असेल असे म्हणताच दगड आणखीन बाजूला गेला.

        तिसरा म्हणाला, माझे एका सुंदर मुलीवर प्रेम होते. तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती, अचानकपणे त्या मुलीचे वडील वाराले व त्या कुटुंबाची दुर्दशा झाली. ती मुलगी माझ्याकडे आली मदत मागण्यासाठी. मी ठरवले की हीच वेळ आहे मागणी घालण्याची. मी तिला आत बोलवले. घरात व आजूबाजूला कुणीच नव्हते. ती खूप घाबरलेली होती. ती मला म्हणाली, बाबा रे अल्लाहसाठी तू असे काही गैरकृत्य करू नकोस. माझ्या असाहय्यतेचा गैरफायदा घेवू नकोस. तिच्या तोंडून अल्लाहचे नाव ऐकताच मी तिच्यापासून दूर झालो. तिची माफी मागितली व तिला मदतही केली. तिसऱ्याचे बोलणे संपताच दगड पूर्णपणे बाजूला झाला व त्या तिघांची सुटका झाली.

       बंधुभगिनीनो रमजानमध्ये आपण ही सत्कृत्ये करू या व अल्लाहच्या कृपेने आपल्यावर आलेल्या संकटाना दूर करू या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा