मराठी कथा, कविता, लेख, साहित्य यांचा सुरेख संगम जो जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकतो.
मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५
जग फुलांचं
शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०२५
आला श्रावण गाजत
आला श्रावण गाजत
आला श्रावण गाजत
सृष्टी डोलाया लागली
नव्या स्वप्नांची चाहूल
भूमी मातेला लागली ।।१।।
होती मृतिका आतूर
पान फुलांची भुकेली
झेप घेऊनी बियांनी
पिके डोलाया लागली।।२।।
ऋतूराजा हा लहरी
लपंडाव तो दाखवी
छाया इंद्रधनुष्याची
रंग मनास मोहवी ।।३।।
श्रावणाची ही किमया
हर्ष माईना मनात
बळीराजा सुखावला
कष्ट करूनी रानात।।४।।
सरीवर सरी येती
नदी दुथडी भरली
हर्षे चिमणी पाखरे
घरट्यात विसावली ।।५।।
रान होताच हिरवे
धनी हरखे मनात
पत्नी पाहते स्वप्नात
तोडे घालीन हातात ।।६।।
मनोहरी श्रावणात
सुख भोगते सासरी
आठवणी बरसता
मन ओढते माहेरी ।।७।।
गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५
हे वरदविनायका
हे वरदविनायका
हे वरदविनायका
तू सत्वर धावत ये
अंधार फार झालाय
त्यांना प्रकाश देण्या ये।
जनता वाईटाकडून
वाईटाकडे जातेय
विज्ञानाचा या अघोरी
उपयोग करतेय ।
बाँबस्फोट, भ्रष्टाचार
सर्वत्र बोकाळलाय
मारामाऱ्या, खून,चोऱ्या
धुमाकूळ चाललाय ।
मानवालाच तू मन
अन् विवेक दिलास
मानवाच्या मनातील
माया,ममता खलास ।
आईबाप वृद्धाश्रमी
बाळे पाळणाघरात
राहताहेत दुःखाने
अश्रू गिळून मनात ।
विद्यामंदिरातही या
गलिच्छ प्रकार घडे
साऱ्या नात्यांचे आदर्श
बेशुद्ध होऊन पडे ।
मोबाईल विळख्यात
गुरफटलीय जनता
आपुलकी व जिव्हाळा
नाही राहिली ममता ।
म्हणून ....
हे वरदविनायका
तू सत्वर धावत ये।
मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५
पावसाची सर
पावसाची सर
फोटो साभार:गुगल
आली सर पावसाची
बळीराजा सुखावला
ओल पाहुनी मृदेची
बीजबाळ सुखावला ।।
कोंब कोवळा अंकुरे
सारुनिया माती दूर
रंग पोपटी लेवून
त्यांचा आगळाच नूर ।।
सारे शिवार रंगले
वारा येई सोबतीला
बहराचे हितगूज
कानोकानी सांगायाला ।।
नदी दुथडी भरली
सारी सृष्टी आनंदली
स्वप्नचाहूल सोनेरी
झाडावेलींना लागली ।।
इंद्रधनूची कमान
दामिणीचे चकाकणे
डोळे भरुन पहावे
सृष्टीसौंदर्याचे लेणे ।।
सोमवार, १९ ऑगस्ट, २०२४
व्यथा पावसाची - मराठी कविता
व्यथा पावसाची - मराठी कविता
✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी
फोटो साभार:गूगल
पाऊस माझ्या स्वप्नी आला
व्यथा त्याची सांगतो म्हणाला।
तू तर आमचा जीवनदाता
ऐकेन आनंदे तुझी व्यथा।
नांवे मला सर्वजण ठेवतात
बरसलो जोरात विध्वंसक म्हणतात।
नाही आलो तर निर्दयी संबोधतात
आलो मध्येच अवकाळी बोलतात।
आलो हळूहळू पीरपीर म्हणतात
बनलाय लहरी सगळे चिडवतात।
तुम्हीच मजला लहरी केलं
बोलून घ्यायचं नशिबी आलं।
नद्या अडवल्या, जंगलतोड केली
सिमेंटची जंगले तुम्हीच बनवली।
डोंगर पोखरून सपाट केले
तलाव नाले बुजवून टाकले।
ओझोनचं आवरण झालं लीक
ग्लोबल वार्मिंगचं फोफावलं पीक।
समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली
भरपूर वाफ वर येऊ लागली।
नाईलाजाने मी बरसू लागतो
नद्यांना मग महापूर येतो।
सगळे ठेवतात मलाच नांवे
माझे दुःख मलाच ठावे ।
खरं आहे मी म्हणाले पावसाला
प्लीज तुझी व्यथा ठेव बाजूला।
आता थोडं थांबून वाचव आम्हाला ।
रविवार, ३० जुलै, २०२३
तो आणि पाऊस - मराठी कविता
तो आणि पाऊस - मराठी कविता
तो नि पाऊस दोघे समान
एक मोठा दुसरा थोडा लहान।
दोघेही धो धो बरसतात
प्रेमसरींनी चिंब भिजवतात।
कधी जोरजोरात गडगडतात
सुखद वर्षावाने तृप्त करतात।
एकाला चिंता साऱ्या जगाची
दुसऱ्याला काळजी कुटुंबाची।
एकाला म्हणावे घननीळा
दुसऱ्याला वदावे लेकुरवाळा।
त्यांच्यामुळे येई जीवना अर्थ
तुम्हाविना जीवन होई व्यर्थ।
करता तुम्ही सृष्टी हिरवीगार
आनंदे नाचे सारा परिवार।
कधी तुम्ही जाता फार दूरदूर
मनाला लावता फारच हुरहूर।
सर्वांना वाटतो तुमचा आधार
तुम्हाविना सारेच निराधार।
अचानक येता फारच दाटून
खेद मनी येई भरभरून ।
तुम्हा दोघांची छानच गट्टी
नका करू आमच्याशी कट्टी।
शनिवार, ३० एप्रिल, २०२२
श्रीमंत म्हणावे त्याला - मराठी कविता
श्रीमंत म्हणावे त्याला - मराठी कविता
✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी
जीवन ही संधी वाटे ज्याला
श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।
घरी खातो भाजी, पालेभाजी
फळेही खातो ताजी ताजी
दूध, दही, ताक रोज मिळे ज्याला।
श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।
ज्याच्या अंगणी झाडे डुलती
वेलीवरती नित्य फुले उमलती
ऑक्सिजन पुरेसा मिळे ज्याला ।
श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।
पाहुणे रावळे येती दारी
तृप्त होऊनी जाती माघारी
यामुळे आनंद मिळे ज्याला ।
श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।
ज्याची सकला होते आठवण
करी जो मायेची साठवण
परोपकारे मिळते सुख ज्याला ।
श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।
प्रातःकाळी जो लवकर उठतो
योगा नि प्राणायाम करतो
निरोगी जीवन लाभते ज्याला ।
श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।
घरी ज्याच्या लडिवाळ
तान्हत्याच्यासवे जगावे वाटे पुन्हा
त्याच्याशी खेळायला जमते ज्याला ।
श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।
स्वतः जो दिलखुलास हसतो
आणि दुसऱ्यालाही हसवतो
सदा समाधानी रहाणे जमते ज्याला।
श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।
गुरुवार, १४ जानेवारी, २०२१
ईश्वरा, अजब तुझी करणी - मराठी कविता
ईश्वरा, अजब तुझी करणी - मराठी कविता
सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२०
दिवाळीचा बाजार - मराठी कविता
दिवाळीचा बाजार
कवयित्री: डॉ. ज्युबेदा तांबोळी
चल चल कमला, पारू
दिवळीचा बाजार करू ।
प्रथम घेऊ गोडे तेल
राहिले पैसे तर पाहू सेल ।
डाळीचा तर भडकलाय भाव
नकोच काढू या लाडूचं नाव ।
घेऊ या आपण मैदा नि रवा
बंड्याला घेऊ सदरा नवा ।
अंगणात घालू सडा रांगोळी
आनंदाने करू पहाटे आंघोळी ।
करू या थोडी शेव चकली
सोनूला आणू पैंजण नकली ।
खाऊ फक्त चिवडा मस्त
वाटेल दिवाळी स्वस्तात स्वस्त ।
मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०
थांब पावसा! - मराठी कविता
थांब पावसा!
कवियत्री: डॉ. ज्युबेदा तांबोळी
पावसा, थांबव तुझा खेळ
घरी परतायची झाली वेळ।
संपले तुझे महिने चार
आला तुझा कंटाळा फार।
मुलांना नाही बागडता येत
घरीचं कोंडण्याचा आहे का बेत?
ढगाकडे लागले किसानांचे डोळे
पिके गेली वाहून उरले अश्रु मळे।
ओढे-नाले भरले येईल नदीला पूर
गरीबांचे सुख जाईल दूरदूर।
असा कसा तू झाला आहेस लहरी
खरं सांग, तुझी त्तबेत नाही का बरी?
जा तुझ्या घरी आलाय दसरा
सर्वांचा चेहरा होवू दे ना हसरा।
काय तुझ्या मनात, कानात माझ्या सांग
पण आत्ता मात्र लगेचच थांब।
शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०
काळ मोठा बिकट - मराठी कविता
कोरोना (कोविड १९) महामारीमुळे सर्वांवर उद्भवलेल्या परिस्थितीचे चित्रण करणारी कविता
काळ मोठा बिकट
काळ मोठा बिकट आला
मेला नाही तोच जगला ।
आधी बातम्या बाधितांच्या
आता येताहेत मृत्यूच्या ।
पहाटे फोन खणखणतो
स्नेही कुणीतरी दगावतो ।
उपचार सुरु खाजगीत श्रीमंताचे
बेड मिळेनात, हाल गरिबांचे ।
परस्पर जाळतात प्रेताला
श्वान सज्ज लचके तोडायला।
नंबर लागलेत दफनविधीला
रडूच न येई बघा कोणाला।
वणवा पेटलाय घराभोवती
केंव्हा आपल्याकडे? हीच भिती।
दर दिवशी आकडा वाढतो
घाबरून पेशंट घरीच बसतो।
जगला काय मेला काय
कोणाला आता पर्वा नाय।
ज्याचं जळतं त्यालाच कळतं
जगण्याचं महत्व, मेल्यावर कळतं।
गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०
सार्थक जीवन - मराठी कविता
सार्थक जीवन
कवयित्री: डॉ. ज्युबेदा तांबोळी
जीवन आहे जगण्याचं नावं
जीवन म्हणजे सुखदुःखाचा लपंडाव
जीवनात सुख हमखास येणार
सुखाच्या वस्त्राला दुःखाची झालर असणार
पण जीवन भरभरून जगावं
आनंदानं आणि उत्साहानं भरावं
सुख आलं तर जाऊ नये हुरळून
दुःख आलं तर जाऊ नये खचून
संकटाना घाबरून जो करी वाटचाल
त्याचे होतात जीवनी फार हाल
जो समजतो संधी संकटाना
त्याचं जीवन मार्ग दाखवी सर्वांना
जो करतो स्वागत संकटांचे
जीवन सार्थक होई त्याचे!
शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०
मलिका - मराठी कविता
६ सप्टेंबर १९८२ रोजी मलिका या कन्यारत्नाने माझ्या पोटी जन्म घेतला. तिला जन्मतःच पाठीवर जखम होती. मणक्याची वाढ पूर्ण झाली नव्हती. तिला बरे करण्यासाठी खूप औषधोपचार केले पण ती बरी झाली नाही. १४ जानेवारी १९८३ रोजी ती देवाघरी निघून गेली तिला मांडीवर घेऊन सुचलेल्या या काव्यपंक्ती......
' मलिका '
का पाहिलास माझा अंत
आजवरी पाहुनी परीक्षा
मन झाले नव्हते शांत?
द्यायचे नव्हते तुला सबळ मात्रुत्व
का व्यर्थ घालविलेस कर्तृत्व?
करायचे नव्हते मला सुखी
का सुख आणलेस मुखी?
निष्पाप निरागस माझ्या बाळा
तुझ्यासाठी स्वर्गात जाऊन
मागितली असती दाद
पण जन्म घेतलास कलियुगात
येथे कोण घेतो कुणाची दाद
हे ईश्वरा।
तुला तरी ऐकू येतो का रे माझा साद?
बुधवार, २ सप्टेंबर, २०२०
टीचर - मराठी कविता
एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकांबद्दल व्यक्त केलेल्या कृतज्ञतेच चित्रण करणारी कविता
टीचर
कवयित्री: डॉ. ज्युबेदा तांबोळी
फोटो साभार: lifestyletodaynews.com
मी लहान होतो तेव्हां
आईचा हात घट्ट धरून,
डोळ्यात दाटलेले अश्रू,
पुसत-पुसत, रडत-रडत,
मी शाळेत पाऊल टाकलं
टीचर, तुम्ही माझा हात
आईच्या हातातून मायेने
अलगद सोडवून घेतलात
आणि आईच्या मायेने
आम्हाला शिकवलत
दुःख अनावर झालं
तेव्हां वटवृक्षाची छाया
तुम्हीच दिली टीचर!
कसं वागावं, कसं जगावं
तुम्हीच शिकवलत आम्हां
याच शिदोरीवर,
जग जिंकण्याची हिंमत
तुम्हीच दिली टीचर
तुम्ही दिलेला वारसा संस्काराचा
आयुष्यभर जपत राहू
तुमचे व शाळेचे नांव
उज्ज्वल करण्यासाठी
सदैव झटत राहू
कृतज्ञतेची सुगंधी फुले
तुमच्या पायी,
सदैव वहात राहू
..*..*..*..
रविवार, ३० ऑगस्ट, २०२०
जीवन - मराठी कविता
जीवन
कवयित्री: डॉ. ज्युबेदा तांबोळी
जीवन म्हणजे जगणं
छे। सर्वस्वाचं हरणं
क्षणाक्षणानं प्रगती करणं
यालाच म्हणतात जगणं
कांंहीतरी शोधणं
कुठेतरी हरवणं
थोडंतरी मिळवणं
मागत मागत घेत जाणं
न मागता देत जाणं
जीवन म्हणजे धावणं
धावताना ठेचकाळणं
ठेचकाळून सावरणं
नि ताठ उभं रहाणं
जीवन म्हणजे डुंबून जाणं
डुंबण्यातला आनंद मिळवणं
पण नाही केंव्हाही कधीही बुडणं
गळ्यापर्यंत येण्याआधी किनारा गाठणं
शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०
सुंदर पहा - मराठी कविता
क्षितिज म्हणजे असतो फक्त आभास. आपल्या आणि क्षितिजामधले अंतर म्हणजे आयुष्य. म्हणून एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर गेली की कायमपणे उदास न होता आयुष्यातील व निसर्गातील सुंदर गोष्टी पहात विरहाचं दुःख विसरावं असा संदेश देणारी ही कविता.
सुंदर पहा!
मुक्तपणे हसायचं असतं
क्षितीजावर भेटल्याचा
केवळ भास असतो
तो सत्य कधीच नसतो
सत्य एवढचं की
आकाश दाटून आल्यावर
आपलं स्थान न सोडता
तृषार्त धरतीवर वर्षाव
करून सृष्टीला फुलवणं
व ही बहार तृप्तपणे पहाणं
छिन्न न होता, अविचल मनानं
आता यापुढील जगणं
म्हणजे प्रगतीचे पंख लावून
सृष्टीतील सुंदर गोष्टी पहाणं !
मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०
कोविड जाईल - मराठी कविता
'कोविड जाईल'
लस येईल, कोविड जाईल
भिती सरेल, सुख येईल
पाहुणे येतील, घर भरेल
हर्ष होईल, मन फुलेल
मित्र जमतील, गप्पा रंगतील
पार्ट्या होतील, सहली जातील
शाळा भरतील, मुले रमतील
धडे मिळतील, शिक्षण वाचेल
बाग उघडेल, झुले झुलतील
गर्दी होईल, भेळ संपेल
मंदीर उघडेल, देव पावेल
श्रद्धा जागेल, शांती नांदेल।
😄😄😄😄😄😄
शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील गणपती बाप्पांची आरती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील
गणपती बाप्पांची आरती
✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी
जयदेव जयदेव जय गणेश देवा
कोरोना आलाय सर्वांच्या गावा
कोविडला देवा दूरच पळवा
प्रसाराला त्याच्या, घाला हो आळा
जयदेव जयदेव ।
चुका मानवाच्या पदरात घाला
भक्तांना शिकवा जपा निसर्गाला
कोरोना रूग्णांची घडू दे सेवा
कृपेचा तुमच्या मिळू दे मेवा
जयदेव जयदेव ।
लाखो लोकांचे गेले हो बळी
बेकार होण्याची सर्वांना पाळी
घास भितीने उतरेना गळी
तुझ्या कृपेची मिळू दे गोळी
जयदेव जयदेव ।
शासनाच्या सूचनांचे पालन करा
कोरोना पळवायचा निश्चय करा
सर्व भक्तांना, उराशी धरा
कोरोनाला देवू नका हो थारा
जयदेव जयदेव ।
सदरची आरती सुखकर्ता दुःखहर्ता या चालीवर म्हणता येईल.
गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०
ती कळी - मराठी कविता
'ती कळी'
खळाळणारं, मध्येच रोखलेलं
दुसऱ्या बाजूनं उसळणारं
भरपूर पाणी होतं ।
पण ते पुलाखाली
रणरणतं ऊन झेलत
ती बिचारी केविलवाणी
एकटीच पडली होती
तिला उमलण्याआधीच
कुणीतरी खुडलं होतं
सोनेरी स्वप्ने उराशी बाळगून
तिनं जन्म घेतला खरा
पण उमलून ईश्वराच्या
माथ्यावर बसण्याचं भाग्य
नव्हतेच तिच्या नशिबी
कुणीतरी खुडलं होतं
कुठल्या कुठं टाकलं होतं
तिला आशा होती
कुणीतरी येईल
अलगद मजला उचलून घेईल
विनाश टळेल सार्थक होईल...
मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०
लावू भरपूर झाडे - मराठी कविता
वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. झाडे लावा झाडे जगवा चे नारे आपण ऐकतो पण प्रत्यक्षात झाडे लावून ती वाढवायला हवीत ही जाणीव विद्यार्थ्यांना लहानपणीच होणे आवश्यक आहे. अशी जाणीव निर्माण करण्यासाठी या कवितेत झाडांचे महत्व पटवून दिले आहे. वाचा ही हिरवीगार कविता....
'लावू भरपूर झाडे'
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
फोटो साभार: गूगल
दरवर्षी लावू आपण भरपूर झाडे
झाडे लावूनिया सोडवू पावसाचे कोडे ।
प्रदूषण अनारोग्य जाईल दूर
विज्ञानाच्या प्रगतीला येईल पूर ।
लहानसहान रोपांची ठेवा निगा रे
पाणी घाला भरपूर आळे करा रे ।
काळजी घ्या त्याची बालकासमान
शेते तुम्हा देतील भरपूर धान ।
बी एच् सी पावडरचा मारा फवारा
झाडे मग देतील सुखाचा निवारा ।
रोप वर येता त्याला द्यावा आकार
वस्त्रांचे स्वप्न मग होईल साकार ।
फळामुळे येईल तनूला मस्त उबारा
फुले देतील तुम्हा हर्षाचा किनारा ।
झाडासम सखा नाही कोणीही दुजा
शुद्ध हवा, गारवा मिळेल ताजा ।
आकाश पिता त्यांचा धरणी माऊली
वृक्षवल्ली देती तुम्हा मायेची सावली ।
मित्र आणि गोत स्वार्थी जग सारे
झाडे नाहीत त्यातील ते देवरूप न्यारे ।



















