सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

आठवणीतील विद्यार्थी - विशेष मराठी लेख


आठवणीतील विद्यार्थी

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: pixabay.com



       माझ्या दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या अस्मिता व पूनम या दोघींचे भांडण झाले होते. अस्मितानं पूनमला मारले होते. मधल्या सुट्टीमध्ये पूनम रडत घरी गेली होती आईला सांगायला. अस्मिता दुसऱ्या मैत्रिणीबरोबर खेळण्यात गुंग झाली होती. तिला माहित होते की पूनम घरी गेली आहे आईला बोलवायला, त्यामुळे अस्मिता पूनमवर जास्तच चिडली होती. जेंव्हा तिनं पाहिलं पूनम शाळेत येत आहे, तिने पूनमला आणखी एक तडाखा मारला. पूनमची आई कांही अंतरावर मागे होती. तिने अस्मिताने पूनमला पुन्हा मारलेलं पाहिलं. पूनमची आई त्या दोघींना घेऊन माझ्याकडे तक्रार घेऊन आली व म्हणाली, "मघाशी हिनं मारलं म्हणून पूनम मला सांगायला आली आणि आत्ता माझ्यासमोर तिनं पुन्हा मारलं बघा." मी अस्मिताला विचारलं, "का ग मारलस पूनमला?" ती म्हणाली, "मॅडम, मी तिच्या आईला पाहिलं नव्हतं म्हणून मारलं. मघाशी ती मला चिडवत होती म्हणून मारलं." किती निरागस, निष्पाप असतात ना ही मुलं. तिचं उत्तर ऐकून पूनमची आईसुद्धा हसू लागली. पुन्हा असं मारू नको असं सांगून ती घरी गेली.


       माझ्या पहिलीच्या वर्गात सुहास नावाचा एक छोटासा गोरागोमटा मुलगा होता. त्यावेळी म्हणजे तीस वर्षापूर्वी प्रत्येकाकडे आत्ता असतात तशा  वॉटर बॉटल्स नसायच्या. सुहास सुशिक्षित कुटुंबातील एकुलता एक लाडका मुलगा असल्याने त्याच्या एकट्या जवळच वॉटर बॅग होती. त्यांच्या शेजारी अशोक नावाचा वयाने त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा असलेला विद्यार्थी रहात होता. सुहासच्या पालकांनी अशोकला सुहासकडे लक्ष द्यायला, त्याची काळजी घ्यायला सांगितले होते. त्याप्रमाणे अशोक सुहासकडे लक्ष द्यायचा. इतर मुले सुहासकडे पाणी प्यायला मागायची. अशोक त्यांना म्हणायचा, "देत नाही जा. दिवसभर सुहासला पाणी पुरायला नको का." अशोकचे हे बोलणे ऐकून सुहासला फार वाईट वाटायचे व तो रडवेल्या स्वरात म्हणायचा, "दे की रे पाणी, त्याला दे की रे." मला फार कौतुक वाटायचं सुहासचं. एवढ्या लहान वयातील त्याच्या परोपकारी वृत्तीचं, त्याच्यावर झालेल्या संस्काराचं. अशोक चिडून पाणी द्यायचा मगच सुहास गप्प बसायचा.


       शेखर नावाचा पांचवीत शिकणार एक विद्यार्थी छोट्या सुट्टीत माझ्या जवळ कोणी नसताना आला व म्हणाला, "मॅडम, दारुपिणं चांगलं का वाईट?" मी म्हटलं, "वाईट आहे." तो म्हणाला, "मॅडम, पण मला वाटतं दारू पिणं चांगलं आहे." मी म्हणाले, "असं का वाटतं तुला?" तो म्हणाला, "कारण माझे वडील दारू पिऊन आल्यावर मला फार माया करतात, खाऊसाठी पैसे देतात, मला जवळ घेतात, आई ओरडली तरी गप्प बसतात, एरव्ही एवढी माया करत नाहीत. सदा रागवत असतात." मी त्याला समजावलं, "शेखर दारू पिणं वाईट आहे. त्यामुळे आपल खूप पैसे खर्च होतात. शरीराचंही नुकसान होतं, तब्येत बिघडते. ज्यावेळी ते घेऊन येतात व तुला माया करतात त्यावेळी तू त्यांना सांग पीत जाऊ नका तुमची तब्येत बिघडेल. तुम्ही पिला नाही तर आपले पैसे वाचतील." शेखरने असे बोलल्यामुळे त्याचे वडील सुधारल्याचे कळले.


     अशा या निरागस, निष्पाप मुलांच्या सहवासातील ते क्षण अजूनही विसरता येत नाहीत म्हणून हा लेखनप्रपंच।


रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

जीवन - मराठी कविता

 

जीवन

कवयित्री: डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: pixabay.com


जीवन म्हणजे जगणं
छे। सर्वस्वाचं हरणं
क्षणाक्षणानं प्रगती करणं
यालाच म्हणतात जगणं
कांंहीतरी शोधणं
कुठेतरी हरवणं
थोडंतरी मिळवणं
मागत मागत घेत जाणं
न मागता देत जाणं
जीवन म्हणजे धावणं
धावताना ठेचकाळणं
ठेचकाळून सावरणं
नि ताठ उभं रहाणं
जीवन म्हणजे डुंबून जाणं
डुंबण्यातला आनंद मिळवणं
पण नाही केंव्हाही कधीही बुडणं
गळ्यापर्यंत येण्याआधी किनारा गाठणं


शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

आजचे शिक्षण व आजच्या समस्या - विशेष मराठी लेख

 

आजचे शिक्षण व आजच्या समस्या

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: pixabay.com

     शिक्षण हे विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचे महत्वाचे साधन आहे. या संस्कारामुळेच राष्ट्र उभारणीसाठी आदर्श नागरिकांची जडण-घडण होऊ शकते. महात्मा गांधी शिक्षणाचा उल्लेख क्रांतीचे मूळ साधन असा करीत. शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन अनेक महान समाजसुधारकांनी घराच्या चुलीपर्यंत शिक्षण पोहचवलं ही अत्यंत चांगली गोष्ट. पण शिक्षणाने जगण्याचे धैर्य निर्माण होण्यापेक्षा जगणे दुभंगणे सुरू झाले आहे ही प्रक्रिया इतकी प्रखर आहे की पुढची पिढीच्या पिढीच दुभंगलेली, संस्कारहीन दिसत आहे. त्यामुळे जगण्यातील आनंदाला आपण पारखे झालो आहोत शिक्षणाविषयीनी अनास्था विकोपाला जात आहे. आज 

'थोडे शिकलेला काम सोडतो

अधिक शिकलेला गाव सोडतो

त्याहून अधिक शिकलेला देश सोडतो.'


हीच आजच्या शिक्षणाची समस्या नव्हे शोकांतिका आहे.


     विनाअनुदान संस्कृती गाजरगवता सारखी पसरत चाललीय. ५-१० लाखांची देणगी देऊन येथील लक्ष्मीपुत्र पदवीधर होऊन सुखाने नांदतात. या नव्या वाटेवर नवे-नवे शिक्षणसम्राट स्वार झाले आहेत. शिक्षणक्षेत्रात श्रीमंतीचा डोळे दिपवणारा झगमगाट दिसत आहे. गुंतवणूक करा आणि पीक घ्या हेच सूत्र शिक्षण संस्थात दिसत आहे. 


     भरतीसाठी ५० हजार मोजणारा फौजदार, लाखो रुपये देऊन पदवी घेतलेला डॉक्टर किंवा इंजिनिअर. अशा डॉक्टरचे पेशंट सुखाने चिरनिद्रा घेतात व अशा इंजिनिअरने बांधलेले पुल उद्घाटनाआधीच कोसळतात.


शाळा उदंड पण ज्ञान?

       पूर्वी शाळांना मंजुरी मिळविण्यासाठी खूप कष्ट करावे लागत असत. कारण मंजुरीनंतर शाळांना अनुदान देण्याची जबाबदारी शासनावर असे. आता आर्थिक जबाबदारीतून शासन मुक्त झाले आहे. शिक्षणाचा प्रसार वाढावा, शंभर टक्के साक्षर होऊन राज्याचा विकास व्हावा हे शासनाचे स्वप्न रास्त आहे. शाळांची संख्या वाढविणे चांगले असले तरी या शाळा कशा चालतील? त्यांचा दर्जा कसा असेल? तेथे ज्ञान कितपत मिळेल? याचा विचार करणेही क्रमप्राप्त आहे.


       शहरात दरवर्षी शाळा प्रवेशाचा प्रश्न गंभीर होतो आहे. देणग्यांचे गाठोडे डोक्यावर घेऊन फिरले तरी प्रवेश मिळत नाही. शाळा प्रवेशासाठी गर्दी होते हे वास्तव आहे पण कोणत्या शाळासाठी गर्दी होते? खासगी शाळामध्ये प्रवेशासाठी रांगा लागतात. तर विद्यार्थ्यांअभावी नगरपालिकांच्या चार दोन शाळा बंद पडतात. हे कशाचे द्योतक आहे? गेल्या कांही वर्षात शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात व्यावसायिकरण होऊ लागले आहे. नगदी पीक घ्यावे, एखादा ताजा पैसा देणारा उद्योगधंदा सुरू करावा त्याप्रमाणे शाळा सुरू करण्यास अनेकजण पुढे सरसावत आहेत. विनाअनुदान तत्वावरील शाळेतील कर्मचाऱ्यांची स्थिती मजुरापेक्षा, वेठबिगारीपेक्षा वाईट आहे. वेतनाची हमी नाही. सेवेची हमी नाही. तर शिक्षणाची गुणवत्ता वाढणार कशी?


शिक्षणाचा जीवनाशी, व्यवहाराशी संबंध हवा:

       २० व्या व २१व्या शतकात ज्ञानाचा विस्फोट झाला. विज्ञान-तंत्रज्ञानाने गरूडझेप घेतली. आपले स्वयंपाक घरसुद्धा आधुनिक झाले. मिक्सर, ग्राइंडर, फ्रीज या वस्तू आल्या. फार कशाला घरामध्ये २०-२५ प्रकारचे चमचे आले. पण जोड्या जुळवा व गाळलेले शब्द भरा या प्रश्नांचे स्वरुप बदलले नाही.


       'आई' कवितेचा अभ्यास करून विद्यार्थी ५ पैकी ५ मार्कस् मिळवितात. 'माझी आई' निबंध लिहून निबंधाचे मार्कस् मिळवितात. पण प्रत्यक्ष जीवनात आईवर प्रेम करतातच असे नाही. एका विद्यार्थ्याने (डी. एड.) च्या आपल्या मार्गदर्शकाना विचारले, 'सर ही कविता कोणत्या पद्धतीने शिकवू' सर म्हणाले, 'तू कोणत्याही पद्धतीने शिकव पण ही कविता शिकल्यावर तुमच्या विद्यार्थ्याने आईला शिव्या देता कामा नये.' या उत्तरात प्रत्यक्ष जीवन व शिक्षण यांचा संबंध दिसतो.


     परिक्षेत नापास झालेली व्यक्ती जीवनात आपल्या कार्याने अमर होते. विद्यार्थ्यांचे मार्कलिस्ट खिशात असते. पण शिक्षणाने विकसित झालेले त्याचे व्यक्तिमत्व जीवन यशस्वी करते.


       इतिहास हा विषय घेऊन पी. एच. डी. झालेल्या विद्यार्थ्यांना रात्रीच्या काळोखात घराबाहेर पडण्याची भीती वाटते. गणित विषय घेऊन बी. एस्सी. झालेला विद्यार्थी दुधाचे मासिक बिल कॅल्क्युलेटर शिवाय करू शकत नाही. कृषी महाविद्यालयातून पदवीधर एका शेतात जाऊन म्हणतो, मिरचीचे पीक चांगले आहे पण तुम्ही लाल मिरचीचे पीक घ्यायला हवे होते. मिरची पिकल्यावर लाल होते हे त्याला माहीत नसते. 'हीच आजच्या शिक्षणाची समस्या.'


जीवनमूल्यांचा ऱ्हास - एक शिक्षण समस्या:

       आजच्या विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य परीक्षा पद्धतीने बिघडले आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर परीक्षेचे ओझे लादले जाते. त्याच्या मानसिक, भावनिक गरजांचा विचार केला जात नाही. म्हणूनच १० वी १२ वी चा निकाल जाहीर झाल्यावर किंवा जाहीर होण्यापूर्वीच कित्येक विद्यार्थी आत्महत्या करतात. 

       

       खरे पाहता आठव्या वर्षी डोळ्यांची पूर्ण वाढ व विकास होतो. आपण त्याला ४ थ्या वर्षापासून अक्षरे गिरवायला लावतो आहोत. त्यामुळे चष्मा लावलेली, बालपणीच आंधळी झालेली पिढी तयार करण्याचे महान सत्कार्य आपण करत आहोत.


       गुणवत्ता यादीत आलेली मुले मोठ्या पगाराच्या मागे लागून परदेशात रममाण होतात. पण ३५ टक्के गुण मिळविणारे कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षणाची गंगोत्री गोरगरिबांच्यापर्यंत नेऊन सोडतात. चौथी पास असलेले वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होऊन महाराष्ट्राचा विकास करतात. ही उदाहरणे कशाची द्योतक आहेत?


      एक गाढवीन मरून पडल्यावर तिचे पिलू ४ दिवस आईभोवती अन्न-पाणी न घेता घोटाळत राहते. प्राण्याजवळ ममता आहे. पण उच्चशिक्षित माणसाला आईला अग्नी देण्यासही हजर राहता येत नाही. त्याची तार येते; कार्य उरकून घ्या मला रजा मिळाल्यावर येत आहे. आई-वडिलांना वृध्दाश्रमात पाठवण्यात धन्यता मानणारे आपण पहातो. तेंव्हा वाटते 'हेच फळ काय आजच्या शिक्षणाला? असे का होते?' सहा-सहा महिने मुलाला न भेटणारे बाप, स्वत:चे सौंदर्य कमी होते म्हणून मुलाला अंगावर न पाजणारी आई, मुलाकडून काय अपेक्षा ठेवणार?


इंग्रजी - एक आव्हान

     महाराष्ट्र शासनाने चालू वर्षी ६५० नव्या शाळांना परवानगी दिली असून त्यापैकी ३५० नव्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. ही स्थिती प्रादेशिक भाषा विकासाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. इंग्रजी हवी पण प्रादेशिक भाषेचा बळी देऊन नको.


    महाराष्ट्र शासनाने ६५,००० शाळांत पहिलीपासून इंग्रजी सुरू करून नवे धाडस केले आहे. इंग्रजीची ही घोडदौड व अनिवार्यता विचार करण्यासारखी आहे. सर्व भारतभर भाषाविषयक धोरण व प्रत्येक भाषेचे प्रांतशः महत्व यांचा विचार करून कांही निर्णय घेणे गरजेचे आहे. प्रत्येक भाषेचे भावविश्व भिन्न असते. कोणत्या भाषेच्या भावविश्वात उगवत्या पिढीला घडवावयाचे ते आता पालकांनी व चालकानी ठरविले पाहिजे. कारण मातृभाषा हेच माध्यम शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त असते. त्या भाषेतून मिळालेले शिक्षण, श्रवण, लेखन, वाचन व संभाषण तसेच आकलन व अविष्कार शक्ती वाढविण्यास नैसर्गिकरित्या उपयोगी ठरते.

'मातृभाषेण शिक्षितम्,

मातृहस्तेन् भोजनम्।'

       हेच तत्व खरे आहे. गेली १५० वर्षे आपल्या शिक्षणावर इंग्रजीचा प्रभाव आहे. तो ब्रिटीशांच्या मेकॉले शिक्षण पद्धतीमुळेच होय. ही अनिवार्यता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत राष्ट्रीय अस्मिता व भाषा विकास अशक्य आहे. १४ वर्षे इंग्रजीचा अभ्यास करूनही विद्यार्थी धड इंग्रजी वाचू शकत नाही की लिहू शकत नाही. संभाषण करणे दूरच.


पहिलीपासून इंग्रजी-प्रयोग व समस्या:

       आज पहिली ते चौथी इंग्रजी हा प्रयोग अंतीम टप्प्यात आला आहे. ६५,००० शाळांतील २ लाख शिक्षक प्रशिक्षित झाले आहेत. सर्वसामान्यपणे गरीब विद्यार्थ्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळा परवडत नाहीत म्हणून तो ओघ प्राथमिक शाळांकडे वळविण्याचा शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. परंतु त्यातील त्रुटी ३ वर्षात शिक्षक व पालक यांना जाणवू लागल्या आहेत. अपुरा व तज्ज्ञ शिक्षकवर्ग हे शाळांचे मुख्य दुखणे आहे. १२ वी नंतर डी. एड्. झालेला शिक्षक प्राथमिक शाळात इंग्रजी शिकवितो. २० ते २५ वर्षे १ ते ४ या इयत्तांवर इंग्रजी सोडून बाकीचे विषय शिकविणारा शिक्षक ६ दिवसांचे प्रशिक्षण घेऊन इंग्रजी अध्यापनास सक्षम होऊ शकेल का?


     याबाबतीत एक उदाहरण सांगावेसे वाटते. जुजबी इंग्रजी शिकून पहिलीच्या मुलाना इंग्रजी शिकविण्यास एक शिक्षक तयार झाला. त्याने मुलाला ऑर्डर दिली 'हँंडस् अप्' मुलांनी हात वर केले. नंतर ऑर्डर दिली 'स्टँड अप' मुले हात वर करूनच उभी राहिली. शिक्षकानी पुन्हा 'सीट डाऊन्' अशी ऑर्डर दिली. मुले हात वर करूनच खाली बसली व म्हणाली, 'गुरुजी हात खाली घ्यायला सांगा की.' इंग्रजीत गुरुजींना 'हँड डाऊन' ही ऑर्डर आठवली नाही. ते म्हणाले, 'घ्या रे हात खाली.'


     जोपर्यंत शाळेच्या भौतिक सुविधा, शाळेला पुरेशी इमारत, प्रसन्न इमारत, तज्ज्ञ शिक्षक पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत तोपर्यंत प्राथमिक मराठी शाळातील इंग्रजी सुधारणार नाही. सर्व शिक्षा अभियान, निरंतर साक्षरता योजना यावर प्रचंड खर्च होत आहे. पण शाळांच्या किमान भौतिक सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे.


सदोष शिक्षण पद्धती:

       आजची शिक्षण पद्धती सदोष आहे. कारण शाळा-कॉलेजमधून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षणातून कोणतीही प्रेरणा मिळत नाही. कोणत्याही प्रकारे वर्षाचा पोर्शन पूर्ण करणे हेच शिक्षकाचे ध्येय असते. मुलांमधील सर्जनशीलता जाणून घेण्याची, तिला प्रोत्साहन देण्याची त्यांची तयारीही नसते. किंबहुना ते करायला त्यांच्यापाशी तितका वेळही नसतो. सहाजिकच विद्यार्थ्यांना शिक्षणात रस वाटत नाही. त्यांच्यासाठी शिक्षण हा प्रकारच कंटाळवाणा बनतो. परीक्षा या प्रकाराने तर सर्वच विद्यार्थी गर्भगळीत होतात. परीक्षा जणू जीवनाची सत्वपरीक्षा आहे अशा थाटात विद्यार्थी व त्यांचे पालक परीक्षेचे दडपण घेऊन वागत असतात. परीक्षेतील गुण हीच सर्वांची चिंता असते. परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नाहीत तर आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. वर्षभर ग्रहण केलेले ज्ञान तीन तासामध्ये प्रगट करणे. पोपटपंची करून अधिक गुण मिळवावेत हेच शिक्षणाचे ध्येय झाले आहे.


     शिक्षणातून सुजाण व सुसंस्कारीत नागरीक निर्माण व्हावेत असे महात्मा गांधी यांंनी म्हटले आहे. पण आजची सामाजिक परिस्थिती पाहता शिक्षणातून काय निर्माण होत आहे? बाँब हल्ले, जातिय दंगे-धोपे, मारामाऱ्या, खून-दरोडे, भ्रष्टाचार आणि व्यसनाने ग्रासलेला नागरिक! हीच आजच्या शिक्षणाची महत्वपूर्ण समस्या आहे.


अती महत्वाकांक्षी पालक:

       बऱ्याचदा पालक स्वत:च्या अपेक्षा मुलांवर लादतात. अतिमहत्वाकांक्षी पालक ही आजच्या मुलांची खरी चिंता आहे. शाळांमध्ये मुक्तपणे वावरू न देणाऱ्या या पालकांचे दडपण मुलांवर सतत असते. आपल्या मुलाची बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता जाणून घेऊन त्याला त्यामध्ये मदत करा.


       सर्वांनी डॉक्टर व इंजिनिअर होऊन समाजाच्या गरजाही पूर्ण होणार नाहीत. आज नोकरी मागत फिरणाऱ्या पदवीधरांंपेक्षा नोकऱ्या निर्माण करणाऱ्या उद्योजकांची निर्मिती होणे ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने आजच्या विद्यार्थ्यांना नुसते डोक्याला चालना देणारे शिक्षण देऊन चालणार नाही तर त्या डोक्याबरोबर पोटाचाही विचार होणे आवश्यक आहे.


       याकरिता उदाहरण द्यायचे झाले तर आजचा बी. ई. मेकॅनिकल झालेला विद्यार्थी घरातील स्टोव्ह करू शकत नाही. इलेक्ट्रिक इंजिनिअर घरात लाईटची फ्युज गेली तर जोडू शकत नाही हा 'पुस्तकी शिक्षण' पद्धतीचा दोष आहे.


       विद्यार्थ्यांना क्रियाशील, सृजनशील बनविणारे शिक्षण आपल्याकडे दिले जात नाहीत. जपानमध्ये कार्यानुभवाच्या तासाला प्राथमिक शाळेतील मुले इलेक्ट्रॉनिक्स घड्याळे तयार करतात. आपल्या देशात आजही कागदापासून होड्या, आकाशदिवा व चटया तयार करण्यापलिकडे कार्यानुभव नसतो. शिक्षणाचा व कार्यानुभवाचा संबंध आला पाहिजे. केवळ पुस्तकी शिक्षण ही शिक्षणाची समस्या आहे.


महत्वाच्या समस्या - (शिक्षणातील):

दारिद्र्य : कितीतरी बुद्धिमान विद्यार्थ्यांना दारिद्र्यामुळे शिक्षण घेता येत नाही. भाकरीच्या शोधात भटकणारे पालक आपल्या मुलाला इच्छा असूनही शिक्षण देवू शकत नाहीत.


बेकारी : पदव्यांचे भेंडोळे घेवून नोकरीच्या शोधात फिरणारे सुशिक्षित बेकार पाहिल्यावर इतरांना वाटते शिकून तरी काय उपयोग? शिकून नोकरी नाही, व्यवसायाला भांडवल नाही, जीवनात अनुभूती नाही अशी स्थिती झाल्यामुळे शिक्षणापासून आजची पिढी दूर जात आहे. 


अज्ञान व अंधश्रद्धा : आजही आपला समाज अज्ञान व अंधश्रद्धेने ग्रासला आहे. परवाच संथाल जमातीतील एका मुलीचे कुत्र्याशी लग्न लावण्यात आले. एकीकडे प्रगतीच्या दिशेने जाणारा समाज तर दुसरीकडे कमालीचे अज्ञान व अंधश्रद्धा.


स्त्री पुरुष भेदभाव : कांही ठिकाणी अजूनही मुलींना शिक्षण देण्यास पालक नाखूष असतात. मुलगी म्हणजे परक्याचे धन असे समजून तिच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते.


पुस्तकी शिक्षण : आजच्या अभ्यासक्रमातून मुलांची फक्त बौद्धिक क्षमता, स्मरणशक्ती इ. ची परीक्षा होते. सर्वच क्षेत्रात टक्केवारीला महत्व दिले जात आहेत. कृतिशीलता, सृजनशीलता या गुणांचा विकास होण्यासाठी जे शिक्षण मिळते त्या शिक्षणाचा जीवनात उपयोग होतो. केवळ पुस्तकी शिक्षण, सदोष परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थी निराश, क्रीयाहीन होत आहे. बालवाडीला प्रवेश घेतानाच तो डोनेशन देतो. म्हणजे शिक्षणाचा पायाच वशिल्याने भरला जात आहे.


शिक्षकांना अशैक्षणिक कामे : आज जर आपण पाहिले तर शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे लावली जातात. त्यामुळे शिक्षकांचा बराच वेळ यामध्ये खर्च होतो. जनगणना, निवडणूक, सर्वेक्षण इ. कामांमुळे शिक्षकांना वर्गात शिकवण्यासाठी वेळच मिळत नाही.


समारोप : आजचे शिक्षण व समस्या या व्यापक विषयावर खूप लिहावे लागेल. कारण आज शिक्षण देणारा शिक्षक भाकरी आणि प्रतिष्ठा या दोन्ही प्रश्नात अडकतो आहे. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी खाजगी क्लासेस घेण्यापासून ते प्रश्नपत्रिका फोडण्यापर्यंत बरेच काही करू लागला आहे. भरमसाठ देणग्या देवून शिक्षकी पेशाचे शिक्षण घेणाऱ्या व नोकरी लागणाऱ्या शिक्षकांस नोकरी मिळाली आहे. नोकरीमुळे अशा शिक्षकांस चेहरा लागला आहे. पण त्याचा आत्मा हरवला आहे.


सारांश: जीवनाला कसलीच दिशा व गती न देणारे शिक्षण आता मिळत आहे. विद्यार्थी मार्कस् व टक्केवारीच्या मागे तर पालक मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनविण्याच्या चक्रात फिरत आहेत. शिक्षणाचे व्यापारीकरण झाले आहे.

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते

संस्थाचालक मोठे झाले

शिक्षणप्रेमी सुस्तावले

शिक्षणाच्या राज्यात

ज्ञान मात्र कंगाल झाले

शिक्षणानं पदवी मिळाली

पण संस्काराची कळी सुकून गेली.


साप्ताहिक शिक्षक समाचार मध्ये प्रकाशित लेख


सूज्ञ वाचकांच्या प्रतिक्रिया



सर्वोदय शिक्षक शैक्षणिक संस्था गगनबावडा जिल्हा कोल्हापूर आयोजित जिल्हास्तरीय शिक्षकांच्या निबंध स्पर्धेत सदर निबंधास प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे त्याची ट्रॉफी.


शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

सुंदर पहा - मराठी कविता

 

       क्षितिज म्हणजे असतो फक्त आभास. आपल्या आणि क्षितिजामधले अंतर म्हणजे आयुष्य. म्हणून एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर गेली की कायमपणे उदास न होता आयुष्यातील व निसर्गातील सुंदर गोष्टी पहात विरहाचं दुःख विसरावं असा संदेश देणारी ही कविता.


सुंदर पहा!

कवयित्री: डॉ. ज्युबेदा तांबोळी



 मुक्तपणे हसायचं असतं


क्षितीजावर भेटल्याचा


केवळ भास असतो


तो सत्य कधीच नसतो


सत्य एवढचं की


आकाश दाटून आल्यावर


आपलं स्थान न सोडता


तृषार्त धरतीवर वर्षाव


करून सृष्टीला फुलवणं


व ही बहार तृप्तपणे पहाणं


छिन्न न होता, अविचल मनानं


आता यापुढील जगणं


म्हणजे प्रगतीचे पंख लावून


सृष्टीतील सुंदर गोष्टी पहाणं !


बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०

समाज सुधारतोय - मराठी लेख

 

समाज सुधारतोय !




गणेशोत्सवातील साधेपणा:

       कोरोनाच्या संकटाने जगभर सर्वच गोष्टीना मर्यादा आल्या आहेत. जगाचे आतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. मंदीचे सावट सर्व क्षेत्रात दिसू लागले आहे. महागाईने डोके वर काढले आहे. बेकारी वाढली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर धार्मिक सणांंवरही मर्यादा आल्या आहेत. दरवर्षी धुमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सव यंदा साधेपणाने साजरा होत आहे. कोरोनाचं सावट प्रकर्षाने जाणवत असल्याने उत्सवाच्या निमित्ताने होणारी कोट्यावधींची उलाढाल लक्षणीयरीत्या घटली आहे. आकर्षक भव्य मूर्ती, सजावट, देखावे, प्रबोधनात्मक कार्यक्रम यांंसह विविधता जपणाऱ्या मंडळांंनी श्रींची प्रतिष्ठापनाचं केली नाही. शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी कटाक्षानं सुरु आहे. वर्षानुवर्षे धामधुमीची परंपरा जपणाऱ्या मंडळानी कोणताही गाजावाजा न करता लहान मंडपात किंवा छोट्याशा पोर्चमध्ये केवळ लहानशा मूर्तीची प्रतिष्ठापना करून उत्सवाची औपचारिकता पूर्ण केली आहे. यावर्षी वर्गणीसाठी मंडळाचे कार्यकर्ते कुणाच्याही दारात फिरकले नाहीत हे समाजसुधारणेचं शुभचिन्हचं मानावं लागेल.


कोल्हापूर जिल्ह्याची सध्य: स्थिती:

     कोल्हापूर जिल्ह्यातील एकतीस पोलिस ठाण्याच्या हद्दीत सन २०१९ मध्ये ७,३२६ नोंदणीकृत सार्वजनिक मंडळानी श्रींची प्रतिष्ठापना केली होती. त्यापैकी यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल ४० टक्के म्हणजेच ३,१८० मंडळांंनी श्रींची प्रतिष्ठापनाच केली नाही. दुःखात काही प्रमाणात सुख दडलेले असते असं म्हणतात हे यावर्षीच्या गणेशोत्सवातून दिसून येते.


हिंदू मुस्लिम ऐक्य जपण्याचा आदर्श:

       दुसरी आशादायी व आनंददायी घटना म्हणजे गणेशोत्सव व मोहरम एकत्र साजरा करण्याची परंपरा जपली जात आहे. कुरूंदवाड ता. शिरोळ जि. कोल्हापूर येथील नागरिकांनी धार्मिक एकात्मता जोपासत मशिदीत भक्तिमय वातावरणात गणपती व पीरपंजाची प्रतिष्ठापना केली आहे. यातून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश समाजाला मिळत आहे. यातून कुरूंदवाडची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याची वीण घट्ट होत आहे. मोहरममध्ये भेटीसाठी पीर धरण्याचा बहुतांश मान हिंदू समाजातील बांधवांना आहे. खत्तलरात्री अग्नीकुंडातून जाणाऱ्यामध्ये हिंदू बांधवांची संख्या मोठी आहे. कुरुंदवाड चा हा आदर्श आजूबाजूच्या गावातील लोक घेत आहेत.

       अशा प्रकारे गणेशोत्सव व मोहरम सामाजिक बांधिलकी जपत काटकसरीने व साध्या पद्धतीने साजरा होणारा गणेशोत्सव म्हणजे समाजसुधारणेची नांदी होय. तसेच हिंदू मुस्लिम ऐक्य हे प्रगतीचे पहिले पाऊल होय. गणरायांंवर पूर्ण श्रद्धा ठेवून उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याची ही पद्धत कायम ठेवली तर समाजाचे भले होईल व गणरायानांही ते फार आवडेल. होय ना सुजाण वाचकहो!


बातमी साभार: दैनिक युवकांचा नवा महाराष्ट्र कोल्हापूर दिनांक २६ ऑगस्ट २०२० पान क्रमांक ४


बातमी साभार: दैनिक युवकांचा नवा महाराष्ट्र कोल्हापूर दिनांक २४ ऑगस्ट २०२० पान क्रमांक ४


बाबूजमाल तालीम कोल्हापूर मोहरम व गणेशोत्सव २०२०


हे ही वाचा: 


मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

कोविड जाईल - मराठी कविता


'कोविड जाईल'

कवयित्री: डॉ. ज्युबेदा तांबोळी

फोटो साभार: pixabay.com

लस येईल, कोविड जाईल


भिती सरेल, सुख येईल


पाहुणे येतील, घर भरेल


हर्ष होईल, मन फुलेल


मित्र जमतील, गप्पा रंगतील


पार्ट्या होतील, सहली जातील


शाळा भरतील, मुले रमतील


धडे मिळतील, शिक्षण वाचेल


बाग उघडेल, झुले झुलतील


गर्दी होईल, भेळ संपेल


मंदीर उघडेल, देव पावेल


श्रद्धा जागेल, शांती नांदेल।


😄😄😄😄😄😄


सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

रक्तरंजीत बलिदानाची आठवण 'मोहरम' - विशेष मराठी लेख


रक्तरंजीत बलिदानाची आठवण 'मोहरम'

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

फोटो साभार: गूगल

      "मोहरम' हा आनंदाने साजरा करायचा सण नसून रक्तरंजीत बलिदानाची आठवण करण्याचा हा सण आहे. इस्लाम धर्मियांच्या वर्षाची सुरवात मोहरम या महिन्याने होते.

इतिहास:
       इस्लाम धर्माचे प्रेषित महंमद पैगंबर यांची कन्या बीबी फातिमा हिचा विवाह हजरत अली यांच्याशी झाला होता. त्यांना इमाम हसन व इमाम हुसैन अशी दोन मुले होती. हजरत अलीनंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव इमाम हसन खलिफा झाले. खलिफा म्हणजे खिदमत करणारा म्हणजेच भक्ती करणारा.

       अमर माविया यांचा पुत्र यजिद हा दुष्ट व अहंकारी होता. कपट कारस्थान करून त्याने आपल्या कबिल्यातील मुलीचे लग्न इमाम हसन यांच्याशी केले. या नववधूने पहिल्याच रात्री विष देऊन इमाम हसन यांचा खून केला.

       इमाम हसन यांच्यानंतर त्यांचे कनिष्ठ बंधू इमाम हुसैन खलिफा झाले. अमर माविया यांनी यापूर्वी झालेल्या तहाचा भंग करून आपला मुलगा यजिद याला खलिफा घोषित केले. त्याने इमाम हुसैन यांच्या कुराण व पैगंबरांच्या शिकवणुकीविरुद्ध वर्तन करण्यास सुरवात केली. स्वत:ला ईश्वराचा प्रेषित समजून तो लोकांना त्रास देऊ लागला. ही गोष्ट इमाम हुसैन यांना आवडली नाही. त्यांनी यजिदला विरोध केला. 

      कडक उन्हाळ्याच्या दिवसात मोहरमच्या पहिल्या तारखेपासून या सत्य-असत्य धर्मयुद्धास कर्बलाच्या मैदानात सुरुवात झाली. इमाम हुसैन प्रबळ आहेत हे पाहून यजिदने त्यांचे अन्न-पाणी बंद केले. पाच दिवस अन्न-पाण्यावाचून गेले. काफिल्यातील बालकांना पाण्याचा एक घोटसुद्धा मिळेना. इमाम हुसैन त्यांच्या सहकाऱ्यांचे अतिशय हाल होऊ लागले. एकेक शहीद होऊ लागले. इमाम हुसैन यांच्या काफिल्यात दोन वर्षांचा असगरअली होता. तो पाण्यासाठी तडफडत होता. त्याच्या आईने शत्रुपक्षातील एकास आपल्या तान्ह्यासाठी पाण्याची मागणी केली. त्या दुष्टाने त्या मुलाच्या घशात बाणाचे टोक घुसविले. रक्ताचा घोट घेऊन असगरअलीने प्राण सोडला.

फोटो साभार: गूगल

       मोहरमच्या सातव्या तारखेला जोरदार युद्ध सुरू झाले. इमाम हुसैन आणि त्यांचे चिरंजीव जैनुल आबेदीन हे दोन पुरुष व बाकीच्या स्त्रिया फक्त जिवंत राहिल्या. जैनुल आबेदिन हाही त्यावेळी आजारी होता. मोहरमच्या नवव्या दिवशी शुक्रवार होता. इमाम हुसैन युद्धात घायाळ झाले होते. जोहरची नमाज अदा करण्यासाठी त्यांनी शत्रूला परवानगी मागितली. ते नमाज अदा करीत असताना यजिदच्या दुष्ट साथीदारांनी इमाम हुसैन यांना भोसकले. त्या दुष्ट सैनिकाचे नाव सनान असे होते. शुमद नावाच्या एका सैनिकाने त्यांंचा शिरच्छेद केला. एवढे करून यजिद थांबला नाही. त्याने मृत शरीराचे पंजे धडावेगळे करून आपल्या भाल्याच्या टोकावर घेऊन विजयाचा जल्लोष करत, घोषणा देत मदिना मध्ये दाखल झाला. हे पाहून बीबी फातिमा बेभान होऊन जमिनीवर कोसळल्या त्याच जागी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. पुत्रवियोगाच्या दुःखाने त्या मरण पावल्या.

   आत्याचारी, जुलमी, भ्रष्ट, सत्तापिपासू शासकांपासून पीडित जनतेला मुक्त करण्यासाठी इमाम हुसैन यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या घटनेची आठवण म्हणून 'मोहरम' पाळला जातो. ताबूत काढून मोहरम पाळावा असे काहींना वाटते. कडेगावचे महान खलिफा (संत) साहेब हुसैन पीरजादे यांनी आपल्या पुस्तकात ताबूत काढून मोहरम पाळावा असे लिहिले आहे. मोहरम कसा साजरा करावा यामध्ये मुस्लिम लोकांमध्ये मतभिन्नता आहे. मतभिन्नता असली तरी मोहरम पाळून इमाम हुसैन यांच्या महान कार्याचे स्मरण, महंमद पैगंबर यांच्या शिकवणुकीवरील श्रद्धाभाव एकच आहे.

कडेगावचा मोहरम:

फोटो साभार: गूगल

      मोहरम सण गावागावात साजरा केला जातो. काही ठिकाणी या सणास थोडसे वेगळे स्वरूप आले आहे हे मान्य परंतु बऱ्याच ठिकाणी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून हा सण साजरा होतो. सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील ताबूत म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक होय. दोन-अडीच महिने ताबूत बांधणीचे काम सुरू असते. बांबूच्या कामठ्या चिकणमातीच्या सहाय्याने जोडतात. त्यावर आकर्षक कागदांची सजावट करतात. आधी कळस मग पाया या पद्धतीने हे नेत्रदीपक ताबूत तयार होतात. त्यांची उंची इतकी असते की कळसाकडे पाहताना डोक्यावरची टोपी खाली पडते. हे ताबूत म्हणजे हस्तकलेचा एक आदर्श नमुना होय. हे ताबूत तयार करण्यासाठी सर्व धर्माचे लोक एकत्र येतात. एकमेकांच्या सहकार्याने ताबूत बसवून ऐतिहासिक घटनांचा निषेध म्हणून मोठ्या बंधूभावाने हा सण साजरा करतात. पाटील-कुलकर्णी यांच्या घरीही ताबूत बसवतात. कडेगावमधील मोहरम जातीय सलोखा निर्माण करणारा सण आहे. सण-उत्सव साजरे करण्याचा उद्देश पूर्णपणे येथे सफल होतो.

सद्यः परिस्थिती:

फोटो साभार: गूगल

       मोहरमच्या पाचव्या दिवशी गावागावात 'पीर' बसतात. त्यापूर्वी घरातील साफसफाई होते. इमाम हुसैन यांच्या पंजाची नाल पीराच्या शिरोभागी असते. पीर बसविण्यामध्ये गावातील सर्वधर्मिय लोकांचा सहभाग असतो. सातव्या दिवशी मलिदा करून नैवेद्य दाखविला जातो. मोहरमचा नववा दिवस ज्यादिवशी इमाम हुसैन शहीद झाले तो दिवस कत्तल रात म्हणून साजरा करतात. या दिवशी अलावा करून अग्नी पेटवला जातो व त्यातून लोक पीर घेऊन जातात. हा चमत्कार किंवा अंधश्रद्धा नसून त्याचे वैज्ञानिक कारण असे कि विस्तवात पाय घातल्यानंतर चटका बसल्याची संवेदना मेंदूपर्यंत जाण्यासाठी काही अवधी लागतो. ती संवेदना पोहोचण्यापूर्वीच लोक विस्तवाच्या बाहेर येतात. कुऱ्हाडी, कडाका, सुया टोचणे असे खेळही यावेळी खेळले जातात या सर्व खेळांचा हेतू माझ्या मते एकच असावा तो म्हणजे आपल्या अंगी सोशिकता यावी. इमाम हुसैन यांनी ज्या यातना सोसल्या त्या यातना त्यांची आठवण म्हणून काही प्रमाणात का होईना सोसाव्यात. मोहरमच्या सणात करबलही खेळतात. करबल खेळत असताना महान शहिंदाची गौरव गीते गायिली जातात. सर्व युवा पिढी या निमित्ताने एकत्र येते व त्यांचे करबल पथक तयार होते. पीर व करबल पथके एकमेकांच्या गावी भेटीसाठी जातात. मोहरमच्या दहाव्या दिवशी ताबूत विसर्जन होते. आपल्या घरातील व्यक्ती मृत झाल्यावर ज्याप्रमाणे दफनविधि झाल्यावर दुखवटा पाळतात त्याप्रमाणे दुखवटा पाळून दफनच्या तिसऱ्या दिवशी जियारत केली जाते. मोहरमच्या सणामध्ये ढोल-ताशा या वाद्यांनी वातावरण दुमदुमून जाते. कत्तल व दफन या दिवशी रोजा करण्याचीही पद्धत आहे. हा रोजा चिंचेचा पाला खाऊन सोडतात. याचे कारण करबलच्या मैदानावर युद्ध काळात अन्न-पाणी मिळत नव्हते तेंव्हा बरेच लोक भूक भागविण्यासाठी युद्धभूमीवरील चिंचेच्या झाडांचा पाला खाऊन राहिले होते.

समारोप:
     असा हा मोहरम सण आनंदाने साजरा करण्यासाठी नसला तरी युद्धात शहीद झालेल्यांची आठवण जपण्याचा आहे. जातीय ऐक्याचे प्रतीक म्हणून हा सण साजरा व्हावा. काही अनिष्ट प्रथांना फाटा देऊन ऐक्य जपण्यासाठी हा सण साजरा व्हावा.


रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

मराठी लघुकथा संच - ५

 

मराठी लघुकथा संच - ५


लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

लघुकथा क्रमांक - २१

      एका काकांनी पुतणीला शिकण्यासाठी खूप मदत केली. काका केवळ शिक्षण देऊन थांबले नाहीत तर तिला नोकरी लावण्यासाठीही खूप प्रयत्न केले. पुतणीला नोकरी लागली. तिला लग्नासाठी स्थळं येऊ लागली. एक स्थळ जुन्या पाहुण्यातलं होतं. मुलगा आय. टी. आय. होऊन एक कारखान्यात नोकरी करत होता. ते लोक काकांच्या मागे लागले होते. त्याकाळी फोनची व्यवस्था नसल्याने काकांनी पुतणीला पत्र पाठवून याबाबतीत काय करायचं ते विचारलं. पुतणीने काकांना पत्रात लिहलं, "काका तुम्हाला याबाबतीत जे योग्य वाटेल ते करा, कारण मला खात्री आहे की माझं वाईट करायला प्रत्यक्ष परमेश्वर जरी आले तरी तुम्ही परमेश्वराला तसं करण्यापासून विनवणी करुन रोखाल." काकांनी पाहुण्यांना नकार कळवला व म्हणाले, "त्याला माझ्या मुलीची भाषाही कळणार नाही."


लघुकथा क्रमांक - २२

      एका मामाकडे दहा-बारा वर्षांची भाची शिकवण्यासाठी राहिली होती. भाचीची आजी स्वभावाने फारच कडक होती. मामीला वरचेवर माहेरी जाऊच द्यायची नाही, म्हणून मामा-मामी दुसऱ्या कुठल्या तरी कामाला गेले, की माहेरी जाऊन यायचे. सोबत भाची असायचीच. तिला आजीला सांगू नकोस असे सांगितले जायचे. ती मामाला ब्लॅकमेल करायची, मला हे घेऊन द्या नाहीतर आजीला सांगते. मामा बिचारे तिला काय हवं ते घेऊन द्यायचे. पुढे भाचीचे लग्न झाले. ती सासरी गेली पण ब्लॅकमेल करायची सवय मात्र गेली नाही. तिच्या सासरी एकत्र कुटुंब पद्धत होती. भाची नवऱ्याच्या संमतीने काही रक्कम आईकडे आणून ठेवायची. मामीच्या भावावर एक संकट आले. तो बहिणीच्या मळातल्या घरात राहून कामधंदा करुन उदरनिर्वाह करु लागला. ही गोष्ट आजीला माहीत नव्हती. एके दिवशी भाचीने मामीला फोन केला व म्हणाली, "मला सोन्याच्या रिंगा करून द्या नाहीतर आजीला सांगते." मामी वैतागून म्हणाली, "सांग, माझ्याकडे तुझ्या सासूचा फोन नंबर आहे, तिला तू पैसे साठवल्याचं सांगते." भाची सुतासारखी सरळ झाली.


लघुकथा क्रमांक - २३

     खाडे सर एकदम हुशार होते. अध्यापन उत्कृष्ट होतं. सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, स्पर्धा परीक्षा याबाबतीत विद्यार्थ्यांची उत्कृष्ट तयारी करून घ्यायचे. त्यामुळे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक त्यांच्यावर खूष होते. खाडे सरांना एकच वाईट सवय होती. प्रत्येक दोन-तीन वाक्ये बोलले की त्यानंतर 'च्याआयला' म्हणायचे. त्यांच्या या बोलण्याची सवय झाली होती. त्यांच्या शाळेत एक नवीन विद्यार्थी आला. त्याला ही गोष्ट खटकली. त्याने ही गोष्ट पालकांना सांगितली. पालकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली की, सर आईवरून शिव्या देतात. अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी त्यांना बोलावले व याबद्दल विचारले. खाडे सर म्हणाले, "साहेब, सवय आहे च्याआयला!" यावर साहेब काय बोलणार?


लघुकथा क्रमांक - २४

     पाटील काकूंचं घर रिकामे झाले होते. त्यांच्याकडे राहणाऱ्या कुळाची बदली अन्यत्र झाली होती. भाड्यानं घर हवंय म्हणून घर बघण्यासाठी एक नवीन कूळ आलं. ते डी. फार्मसी. कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. किती लोक राहणार? भाडं किती? वगैरे बोलणं झाल्यानंतर त्यांनी घर पसंत असल्याचं सांगितलं. पाटील काकू निवृत्त शिक्षिका होत्या. त्यांनी शिक्षणशास्त्र विषयात पी. एच्. डी. पदवी प्राप्त केली होती. त्यांचं राहणीमान अगदी साधं होतं. साधी राहणी व उच्च विचारसरणी असं वागणं होतं. प्राध्यापक म्हणाले, "मी बी. फार्म. झालोय, बी. फार्म. म्हणजे काय माहीत आहे का तुम्हाला?" काकी म्हणाल्या, "बॅचलर इन फार्मसी, मी पी. एच्. डी. झाले आहे. पी. एच्. डी. म्हणजे काय माहीत आहे ना तुम्हाला?". प्राध्यापक महाशय मागे न बघता निघून गेले.


लघुकथा क्रमांक - २५

      एक कुटुंबात तीन आपत्ये असतात. मोठा मुलगा असतो व त्याहून लहान दोन बहिणी असतात. तिघांत काही कारणाने कुरबुर झाली की, आईबाबा म्हणायचे, "अरे तू मोठा आहेस, त्या काय मागतात ते दे, रडवू नकोस त्यांना." हे शब्द ऐकून ऐकून मुलगा कंटाळला होता. प्रत्येक वेळी मीच का समजून घ्यायचे असं त्याला वाटत होतं. तो आता बारा वर्षांचा झाला होता व बहिणी दहा व आठ वर्षांच्या होत्या. एके दिवशी मुलींना रडताना पाहून आईबाबांनी पुन्हा तीच कॅसेट लावली. मुलगा म्हणाला, "हे बघा, मी मोठा आहे हे मला मान्य आहे. पण पुढे आयुष्यभर मी मोठाच राहणार आहे. या दोघी म्हाताऱ्या झाल्या तरी माझ्यापेक्षा लहानच असणार म्हणून काय प्रत्येक वेळी यांना मीच समजूनच घ्यायचं का?" आईबाबा अवाक् होऊन मुलाकडे पाहू लागले.

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील गणपती बाप्पांची आरती


कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील

गणपती बाप्पांची आरती

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


जयदेव जयदेव जय गणेश देवा 

कोरोना आलाय सर्वांच्या गावा

कोविडला देवा दूरच पळवा

प्रसाराला त्याच्या, घाला हो आळा

जयदेव जयदेव ।


चुका मानवाच्या पदरात घाला

भक्तांना शिकवा जपा निसर्गाला

कोरोना रूग्णांची घडू दे सेवा

कृपेचा तुमच्या मिळू दे मेवा

जयदेव जयदेव ।


लाखो लोकांचे गेले हो बळी

बेकार होण्याची सर्वांना पाळी

घास भितीने उतरेना गळी

तुझ्या कृपेची मिळू दे गोळी

जयदेव जयदेव ।


शासनाच्या सूचनांचे पालन करा

कोरोना पळवायचा निश्चय करा

सर्व भक्तांना, उराशी धरा

कोरोनाला देवू नका हो थारा

जयदेव जयदेव ।


सदरची आरती सुखकर्ता दुःखहर्ता या चालीवर म्हणता येईल.


शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

बहिणीची माया - मराठी कथा

 

बहिणीची माया

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


      सुनिता नुकतीच पदवीधर झाली. तिच्यासाठी वरसंशोधन सुरू झाले. सुनीताचे वडील सरकारी  नोकरीत असल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. शहरामध्ये छोटासा बंगला होता, गाडी दारात होती. सुनिता दिसायलाही सुंदर, बुद्धीनेही हुशार होती. तिला एक मिळवता भाऊ होता. दुसरा भाऊ इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. इतके सारे आलबेल असतानाही बऱ्याच स्थळांंकडून सुनिताला नकार येऊ लागला, याचे कारण एकच होते ते म्हणजे सुनिताचा मोठा भाऊ  संजय याच्या अंगावर गेल्या तीन वर्षांपासून पांढरे डाग दिसू लागले होते. हे डाग तोंडावर, हातावर असल्याने संजय दुर्दैवाने कांहीसा विद्रूप दिसत होता. हा त्वचारोग अनुवांशिक आहे या गैरसमजामुळे सुनिताला कोणी पसंत करत नव्हते.

     बऱ्याच कलावधीनंतर एका स्थळाकडून होकार आला. मुलगा इंजिनिअर होता. पगारही चांगला होता. आर्थिक परिस्थिती उत्तम होती. बंगला, गाडी सर्व काही होते पण त्यांची एक अट होती. तुझ्या भावाने आमच्या घरी कधीही येऊ नये. आम्ही तुमच्या घरी आलो की घरात थांबू नये. लग्नातही त्याने हजर राहू नये. सुनिताला ही अट मान्य नव्हती. तिने या स्थळाला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर तिच्यासाठी आणखी एक स्थळ आलं. बऱ्याच कालावधीनंतर एका वराकडून होकार आला. अमोल नुकताच इंजिनिअर झाला होता. खाजगी कंपनीत अल्पशा पगारावर नोकरीस लागला होता. त्याला शेत, घर  काहीच नव्हते. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईने मोलमजुरी करून त्याला शिकविले होते. अमोलनेही स्वतः कष्ट करून शिक्षण घेतले होते. अमोलने सुनिताच्या वडिलांकडे सुनिताला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यापूर्वीच सुनितानेही वडिलांकडे लग्न ठरविण्यापूर्वी अमोलला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती अमोल सुनिताच्या घरी आला. तो तिला म्हणाला, "तू श्रीमंत परिस्थितीत लहानाची मोठी झाली आहेस. इथे तुला सर्व प्रकारच्या सुखसोयी प्राप्त आहेत. असे असताना तू माझ्यासारख्या दरिद्री वराला कसा काय होकार दिलास?" सुनिता म्हणाली, "तुझं दारिद्रय मी अगदी मनापासून स्विकारलं आहे. दारिद्र्यात येणाऱ्या प्रत्येक संकटात, अडचणीत मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहीन, तुझी सावली बनेन. दारिद्रयातून येणारी प्रत्येक गैरसोय सोसेन. प्रसंगी उपाशी राहीन पण माझी एक अट आहे."

      अमोल घाबरला ही कोणती अट घालणार, त्याने अधिक सावरुन बसत सावधपणे विचारले, "सांग कोणती अट आहे तुझी?"  सुनिता म्हणाली, "लग्नानंतर दुर्दैवाने असा झालेल्या माझ्या भावाला तुम्ही योग्य सन्मान द्यावा. त्याची अवहेलना करू नये. तो आपल्याकडे येईल जाईल, त्याला योग्य वागणूक द्यावी". अमोलने ही अट मान्य केली.

   सुनिता अमोल विवाहबद्ध झाले. संजय त्यांच्या घरी येतो जातो. त्यांचा संसार सोन्यासारखा झाला आहे.

     या गोष्टीवरुन समस्त बहिणीनी आपला संसार फुलवत असताना दुर्दैवाने त्रस्त झालेल्या भावाला सुनिताप्रमाणे मायेचा वर्षाव केला, त्याला आधार दिला, तर बहीण भावाच्या या पवित्र नात्याला कधीही बाधा येणार नाही, होय ना?

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

ती कळी - मराठी कविता


'ती कळी'

लेखिका: ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: https://wallpapersafari.com


खळाळणारं, मध्येच रोखलेलं

दुसऱ्या बाजूनं उसळणारं

भरपूर पाणी होतं ।

पण ते पुलाखाली

रणरणतं ऊन झेलत

ती बिचारी केविलवाणी

एकटीच पडली होती

 तिला उमलण्याआधीच

कुणीतरी खुडलं होतं

सोनेरी स्वप्ने उराशी बाळगून

तिनं जन्म घेतला खरा

पण उमलून ईश्वराच्या

माथ्यावर बसण्याचं भाग्य

नव्हतेच तिच्या नशिबी

कुणीतरी खुडलं होतं

कुठल्या कुठं टाकलं होतं

तिला आशा होती

कुणीतरी येईल

अलगद मजला उचलून घेईल

विनाश टळेल सार्थक होईल...


बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

अनोखे पत्नीप्रेम - मराठी लेख.


अनोखे पत्नीप्रेम
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

फोटो साभार: thehitavada.com

      शहाजहान बादशहाने आपली पत्नी मुमताज बेगम हिच्या स्मृती प्रित्यर्थ ताजमहाल बांधला आणि संपूर्ण जगापुढे पत्नीप्रेमाचा एक आदर्श ठेवला. ते जगातील सातवे आश्चर्य ठरले. पण ताजमहाल मुमताजच्या कबरीवर बांधला गेला. मुमताजला ही भव्य दिव्य वास्तू पहाता आली नाही. ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही. आजही समाजामध्ये पत्नीप्रेमाचे उत्कट दर्शन घडविणारे शहाजहान आहेत याची प्रचिती एक बातमी वाचून आली. ती बातमी अशी...


    कर्नाटक राज्यातील कोप्पल येथील उद्योजक श्रीनिवास गुप्ता यानी आठ ऑगस्ट २०२० रोजी आपल्या नव्या बंगल्यात प्रवेश केला. या गृहप्रवेशासाठी त्यांनी बनवून घेतलेला दिवंगत पत्नीचा अगदी हुबेहूब दिसणारा सिलिकॉन वॅक्सचा पुतळा सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. हा पुतळा श्रीनिवास यांच्या इच्छेनुसार बंगळुरू येथील कलाकार श्रीधर मूर्ती यांनी वर्षभराच्या अथक परिश्रमातून हा पूर्णाकृती पुतळा साकारला आहे. श्रीनिवास यांची पत्नी माधवी यांचा जुलै २०१७ मध्ये कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर पत्नीच्या स्वप्नातील बंगला उभारण्याचा निश्चय केला व एक आलिशान बंगला बांधला. या बंगल्याच्या वास्तुप्रवेश सोहळ्याच्यावेळी माधवी यांच्यासारखाच दिसणारा गुलाबी रंगाच्या भरजरी साडीतील पुतळा पाहून सर्व पाहुणे व मित्रमंडळी अवाक् झाली.

   बंगल्याचे बांधकाम जुलै महिन्यातच पूर्ण झाले. माधवी शिवाय गृहप्रवेश करण्यास श्रीनिवास व त्यांच्या दोन कन्या इच्छुक नव्हत्या कारण सुंदर बंगला बांधण्याचे माधवींचे स्वप्न होते. मात्र हा बंगला पाहण्यासाठी त्या या जगात नाहीत याची खंत त्यांना वाटत होती. अखेर श्रीनिवास यांनी त्यातून मार्ग काढला. पुतळ्याच्या स्वरूपात का होईना पत्नी नव्या बंगल्यात आमच्यासोबत राहील. तिचं अस्तित्व असल्याचं समाधान मिळेल. सिलिकॉन वॅक्सचा पुतळा असल्याने वर्षानुवर्षे राहील असे श्रीनिवास यांना वाटले. अशाप्रकारे आधुनिक युगात त्यांनी पत्नी प्रेमाचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे.

    पत्नीप्रेमाच्या या उदाहरणावरुन समस्त पतीदेवांनी काही बोध घ्यायला हवा. पत्नी आपल्या सोबत असताना तिचा आदर करायला हवा. काही पतीदेव पत्नीचा आदर करत असतीलही पण बहुतेक ठिकाणी पत्नीला गृहीत धरले जाते. त्यातल्या त्यात ती गृहिणी असेल तर, तुला काय काम आहे? चार भाकरी थापल्या की झालं असं म्हणून तिला हिणवलं जातं. नोकरी करणारी पत्नी ही तारेवरची कसरत करत असते. नोकरी संसार या दोन्ही आघाड्यांवर लढत असते. अशावेळी तिला मानसिक आधाराची गरज असते. तिला भक्कम आधार पतींनी द्यायला हवा. स्वतःकडे दुर्लक्ष करून ती पतीसाठी, मुलांसाठी झटत असते. तिच्या कष्टांची, त्यागाची दखल ती जिवंत असतानाच घ्यायला हवी. पतीने तिला जास्तीत जास्त सुखी ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा कारण ती माहेरच्या मायासागरातून मोठ्या अपेक्षेने, विश्वासाने तुमच्या घरात आलेली असते. तिलाही भावना असतात, तिची कांही स्वप्ने असतात याचा विचार व्हायला हवा.

     पती-पत्नी ही संसाराची दोन चाके आहेत. त्या दोन चाकांनी एकमेकाला सांभाळून घेतले पाहिजे. एकमेकांची मने जाणून घेऊन त्याप्रमाणे वर्तन ठेवले पाहिजे. फक्त पतीनेच पत्नीवर प्रेम करायला हवे असे नाही तर पत्नीनेही पतीच्या कार्यात समर्थपणे साथ देऊन प्रेम करायला हवे. पतीला व सासरच्या सर्व मंडळींना सुखी ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्तीसाठी पतीला वेठीस धरणे योग्य नव्हे.

   श्रीनिवास यांनी जिवंतपणी पत्नीवर मनापासून प्रेम करून तिला सुखी समाधानी ठेवून दिवंगत झाल्यावर पुतळा बनवून स्मृती जागवल्या.

      मला माधवी ताईंच फार कौतुक वाटतं कारण त्यांच्या नशिबी श्रीनिवास यांच्याकडून असं अनोखं प्रेम मिळालं. दिवंगत झाल्यावरही एवढा मोठा आदरसत्कार मिळाला. असे प्रेम, असा आदर समस्त पत्नींना त्यांच्या पतीकडून मिळावा हीच अपेक्षा.



बातमी साभार: दैनिक पुण्यनगरी, कोल्हापूर दि. १२ ऑगस्ट २०२० पान क्र. ३

 


बातमी साभार : https://www.esakal.com/desh/husband-fulfills-late-wifes-dream-owning-bungalow-installing-her-lifesize-wax-tatue-karnataka

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०

लावू भरपूर झाडे - मराठी कविता

 

वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. झाडे लावा झाडे जगवा  चे नारे आपण ऐकतो पण प्रत्यक्षात झाडे लावून ती वाढवायला हवीत  ही जाणीव विद्यार्थ्यांना लहानपणीच होणे आवश्यक आहे. अशी जाणीव निर्माण करण्यासाठी या कवितेत झाडांचे महत्व पटवून दिले आहे. वाचा ही हिरवीगार  कविता....


'लावू भरपूर झाडे'

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल



 दरवर्षी लावू आपण भरपूर झाडे
झाडे लावूनिया सोडवू पावसाचे कोडे ।


प्रदूषण अनारोग्य जाईल दूर
विज्ञानाच्या प्रगतीला येईल पूर ।


लहानसहान रोपांची ठेवा निगा रे
 पाणी घाला भरपूर आळे करा रे ।


काळजी घ्या त्याची बालकासमान
शेते तुम्हा देतील भरपूर धान ।

 
बी एच् सी पावडरचा मारा फवारा
झाडे मग देतील सुखाचा निवारा ।


रोप वर येता त्याला द्यावा आकार
वस्त्रांचे स्वप्न मग होईल साकार ।


फळामुळे येईल तनूला मस्त उबारा  
फुले देतील तुम्हा हर्षाचा किनारा ।


झाडासम सखा नाही कोणीही दुजा
शुद्ध हवा, गारवा मिळेल ताजा ।


आकाश पिता त्यांचा धरणी माऊली
वृक्षवल्ली देती तुम्हा मायेची सावली ।


मित्र आणि गोत स्वार्थी जग सारे
झाडे नाहीत त्यातील ते देवरूप न्यारे ।



सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

श्री गणपती बाप्पांना पत्र - विशेष मराठी लेख

 

श्री गणपती बाप्पांना पत्र

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गुगल


प्रेषक,

सर्व त्रस्त भक्त


आदरणीय गणपती बाप्पा,

सस्नेह वंदन, कळकळीची विनंती विशेष।


       आम्ही सर्वजण तुमची आतुरतेने वाट पहात आहे कारण गेली सहा महिने तुमचे सारे भक्तजन मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यांना घरातून बाहेर पडायचीसुद्धा भिती वाटू लागली आहे. उजळ मनाने, मोकळ्या चेहऱ्याने, निर्भयपणे फिरणे इतिहासजमा झाले आहे. तुम्हीच सांगा गणराया घरातच बसून गोरगरिबांनी खायचं काय? उपाशी राहून मरायचं? का कोरोनानं मरायचं? तोंडाला मास्क, हाताला ग्लोव्हज घालून सर्व काळजी घेऊनही कोरोना हटेनासा झालाय. गणराया तुम्ही विघ्नविनाशक आहात मग एवढं मोठ्ठं विघ्न आलेलं असताना गप्प कसे बसू शकता? कांहीतरी करा आणि तुमच्या लाडक्या भक्तांना या संकटातून मुक्त करा.


    गणेशदेवा, यावर्षी तुमचे आगमन एका वेगळ्या परिस्थितीत होत आहे. कोरोनाच्या भितीने भक्तांनी जीव मुठीत धरला आहे. कोरोना केंव्हा, कसा, कोणाकडून आपल्याकडे येईल हे सांगता येत नाही. दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. दररोज सांगितले जात आहे की आजची संख्या उच्चांकी आहे. लाखो लोक कोरोनाला बळी पडत आहेत. कित्येकांचे प्रिय नातेवाईक यमसदनी गेले आहेत, जात आहेत. कित्येकांच्या संसाराचा डाव अर्ध्यावर मोडला आहे. कित्येकांचे संसार पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. कित्येक अनाथ झाले आहेत. मरणाच्या उंबरठ्यावर असताना कुणाचीच गाठभेट होईनाशी झाली आहे. प्राणप्रिय व्यक्ती चे शेवटचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. मला सांगा गणराया, हे सगळं तुम्ही पहात बसलाय, जराही दया येत नाही तुम्हाला?


     गणपती बाप्पा, प्रेतांना लाकडी ओंडक्याचे स्वरूप आले आहे. एकावर एक रचून स्मशानभूमीत नेले जात आहेत. प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात न देता परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. नातेवाईकांना जिवंतपणी मरणयातना सोसाव्या लागत आहेत. कांहीं ठिकाणी कोरोनाच्या भितीमुळे प्रेत ताब्यात घेण्यास असमर्थता दाखविली जात आहे. लॉकडाऊनमुळे माणसं माणसापासून दूर जात आहेत.


      गणराया बाकी समाधानाची बाब एवढीच की डॉक्टर्स, नर्सेस्, आरोग्य कर्मचारी, पोलिस यंत्रणा,  शिक्षक, सफाई कामगार या सर्वांमध्ये माणुसकीचे दर्शन होत आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून एखाद्या योद्धा प्रमाणे लढत आहेत. माणसांना कोरोनापासून वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या कुटुंबाची, मुलांबाळांची काळजी उरात साठवून ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत जनतेचा जीव वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे डॉक्टर्स, नर्सेस्, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, पोलिस व यंत्रणेतील सदस्य मरण पत्करत आहेत. या सर्वांबद्दल गणराया, तुम्हाला कांहीच कसं वाटेनासं झालं आहे?


      बाप्पा, बरेच उद्योगधंदे, कारखाने, कंपन्या बंद पडल्या आहेत. हाताला काम नसल्याने जीवनात राम नाही असे समजून कित्येकांनी जीवनयात्रा संपविण्याचा मार्ग धरला आहे. तरी देवा तुम्ही गप्प कसे?


      तुम्ही विद्धेचे दैवत आहात. पण सर्व विद्धेची मंदिरे बंद झालीत. शाळेत मुक्तपणे बागडणारी मुले घराच्या चार भिंतीत बंदिस्त झाली आहेत. टी.व्ही. आणि मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण ही केविलवाणी धडपड आहे. पदवी घेण्यास आतुर झालेले विद्यार्थी परीक्षेची प्रतिक्षा करून मेटाकुटीला आले आहेत. उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या कित्येक विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली आहेत.


       माणसाने निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न केला. निसर्गाचा ह्रास करण्याचा, पर्यावरणाचा समतोल बिघडविण्याचा सपाटा लावलाय हे आम्हाला मान्य आहे गणराया. तुमच्या उत्सवाला वेगळं रूप देण्याचा प्रयत्नही आमच्याकडून होत आहे हेही मान्य आहे. पण या चुका सुधारण्याचाही प्रयत्न होत आहे.


  डॉल्बीच्या दणक्याने तुमच्या कानठळ्या बसतात म्हणून डॉल्बी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्माल्या पासून खत तयार करण्याचं विधायक कार्य समाजसेवकांनी हाती घेतले आहे. ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, जलप्रदूषण रोखण्यासाठी शासनाने कांही नियम घालून दिले आहेत. नियमानुसार कार्यवाही बऱ्याच ठिकाणी चालू आहे. गणराया, कांही थोड्या लोकांच्या चुकांसाठी सर्वांना वेठीस धरू नका. त्यामुळे निष्पाप लोकांचा हकनाक बळी जातोय देवा. भक्तांची चूक तुमच्याशिवाय कोण पदरात घेणार? हे सगळं जाणत असूनही का कानाडोळा होतोय तुमच्याकडून?


    दरवर्षी तुमच्या आगमनाने फुलून येणारा उत्साह यावर्षी कोपऱ्यात लपून बसला आहे. आबालवृद्धांच्या आनंदावर कोरोनाचे विरजण पडले आहे. सर्व तरुण गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची अवस्था पंख कापलेल्या पक्षांप्रमाणे व्याकुळ झाली आहे. यावर्षी गणपतीबाप्पांचे स्वागत कसे करावे, कोणता देखावा उभारावा, कोणत्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, कोणत्या स्पर्धा घ्याव्यात, व्याख्यानाला कुणाला निमंत्रण द्यावे या विचारात दंग होणाऱ्या सर्वांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. कोरोनाच्या भितीने पोटात गोळा उठला आहे कारण कोरोना परदेशातून थेट उंबरठ्यावर येऊन बसला आहे. तो कधी येऊन जीव घेईल सांगता येत नाही. गणपती बाप्पा खूप घाबरून गेलोय आम्ही. आमच्या जिवावर बेतलेलं हे कोरोनाचं संकट तुम्हीच दूर करू शकता. या कोरोनाला हाकलून लावण्याची शक्ती तुमच्याकडेच आहे गणराया. कोरोनाची लस लवकरात लवकर पाठवून आम्हाला वाचवं. सर्व भक्त तुला कळकळीची विनंती करतो. लोभ आहेच आणखी वाढव.


शेवटी एक प्रार्थना करते तिचा स्विकार कर.


जोडोनिया कर तव चरणांवर

नमितो तुजला, गणराया, गणराया


संकटसमयी धावुनी येई

चूक भक्तांची पदरी घेई

चौदा विद्धेचा तू पाया गणराया


विनंती आमुची चरणी गणेशा

सुखवी माझ्या भारत देशा

हेच मागणे तुज पाया गणराया।


तुझे कृपाभिलाषी,

सर्व कोरोनाग्रस्त व कोरोनात्रस्त भक्तगण।