गुरुवार, २० मार्च, २०२५

हजरत सलमान फारशी (रदी.) यांची नम्रता

हजरत सलमान फारशी (रदी.) यांची नम्रता

                    डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी


                         फोटो:साभार गुगल


       मदाएनचे गर्व्हनर हजरत सलमान फारशी (रदी) हे अगदी साधेपणाने रहात असत. त्यांच्या अंगावर नेहमीच जाडे भरडे, ठिगळ लावलेले कपडे असत. एकदा ते बाजारातून सहज टेहळणी करत होते. त्यांना हमाल समजून एका सीरीयत व्यापाऱ्याने त्यांना बोलावून सांगितले की हे गवताचे ओझे आमच्या घरापर्यंत पोहोचवायचे आहे. योग्य ती मजूरी ओझे पोहोचविल्यावर मिळेल. व्यापाऱ्याचे बोलणे त्यांनी शांतपणे ऐकून घेतले आणि भर बाजारातून त्या व्यापाऱ्याच्या पाठीमागून डोक्यावर गवताचा भारा घेवून चालू लागले. भर बाजारातून ही जोडी निघाली असता त्यांच्याकडे पाहून कित्येक लोक अगदी स्तंभित झाले. तर कित्येक लोक माना खाली घालून त्यांच्या वाटेतून बाजूला सरकू लागले. शेवटी एका धाडशी तरूणाने त्या व्यापाऱ्याला सांगितले की, हे हजरत मुहंमद पैगंबर सल्लल्लाहू अलैहिवस्सल यांचे जीवश्च कंठश्च सहकारी असून हे मदाएनचे गव्हर्नर हजरत सलमान फारशी रदील्लाह आहेत.


       त्या तरूणाचे ते बोलणे ऐकून तो व्यापारी आश्चर्याने थक्क झाला. त्याला वाटले की जणू आपल्यावर आकाशच कोसळत आहे. तो व्यापारी गर्व्हनर साहेबांची क्षमायाचना करू लागला. मी आपल्याला ओळखले नाही मला माफ करा असे विनवू लागला. मी आपला खूप अपराधी आहे. पश्चातापाने माझे अंतःकारण विदीर्ण होत आहे असे म्हणत तो त्यांच्या डोक्यावरील ओझे खाली ठेवण्यासाठी वारंवार विनवणी करू लागला. तेंव्हा सलमान फारशी रदील्लाह म्हणाले, हे सद्गृहस्था तुझ्याकडून कसलाही अपराध घडला नाही. तुला घाबरण्याचे मुळीच कारण नाही. मी आपल्या सर्वांचा नम्र सेवक असून हजरत मुहंमद सल्लल्लाहू अलैहिवस्सलम यांचा एक मामूली सहकारी आहे. आपल्याकडून मला सेवा करण्याची संधी मिळाली. मला हे ओझे आपल्या घरापर्यंत पोहचवू दे. मी अंतःकरण पूर्वक  आपला ऋणी राहिन


       मदाएनचे गर्व्हनर सलमान फारशी (रदी) यांचे हे नम्रतापूर्ण वर्तन आजच्या काळात अनुकरणीय आहे. आजच्या थाटामाटात राहणाऱ्या लोकांनी, राज्यकर्त्यांनी त्यांचे थोडेफार हा होईना अनुकरण केल्यास आपल्या देशातून विषमतेचे उच्चाटन होईल व आपला देश वैभव संपन्न होईल यात शंका नाही. हजरत सलमान फारशी (रदी) यांच्याप्रमाणे साधी राहणी व उच्च विचारसरणी ठेवण्याचा प्रयत्न करू या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा