डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी
इस्लाम धर्माचे तिसरे खलिफा उस्मान बिन अफ्फान (रजि.) यांचा जन्म इ.स. ५७६ मध्ये मक्का शहरात झाला. त्या काळात मक्का शहरात कुरैश जमातीचे एकूण दहा कुळगट होते. त्यापैकी दोन कुळगट एक बनू हाशम व दोन बनू उमैय्या हे मातब्बर गट म्हणून ओळखले जात. हजरत उस्मान यांचा जन्म बनू उमैय्या कुळ गटात झाला. त्यांचे वडील हजरत अफ्फान हे मक्का शहरातील मुठभर साक्षर लोकापकी एक होते. ते प्रसिध्द व्यापारी होते. आर्थिकदृष्ट्या संपन्न कुटूंबात जन्म होवूनही हजरत उस्मान (रजि.) हे अतिशय नम्र स्वभावाचे होते. त्यांनी आपल्या वडीलांचा व्यापार आपल्या मधूर स्वभावामुळे नावारूपास आणला. श्रीमंत अरबामध्ये मदीरा आदि छंदापासून ते चार हात लांब होते. मात्र ते अनेकेश्वरवादी होते. ते मूर्तीपूजा करत. व्यापारानिमित्त अबेसिनीया, सिरीया, यमन इत्यादि देशात त्यांचे दौरे असत. इ.स. ६१० मध्ये सिरीयामध्ये असताना एका रात्री त्यांना दृष्टांत झाला की, मक्कामध्ये एक नवे प्रेषित उदयास आलेले आहेत. तुम्ही त्यांचे शिष्यत्व पत्करा. त्यावरून त्यांनी मक्का शहर गाठले. त्यांनी शहरातील दुसरे प्रसिध्द व्यापारी अबुबकर (रजि.) यांची भेट घेवून इस्लामसंबंधी माहिती जाणून घेतली.. ह. अबुबकर (रजि.) यांनी त्यांना इस्लाम धर्म स्विकारण्याचा सल्ला दिला.
हजरत उस्मान बिन अफ्फान (रजि.) यांनी थेट हजरत मुहमंद पैगंबर (स.अ.) यांच्याकडे जावून त्यांच्या हातवर हात ठेवून इस्लाम धर्म स्विकारला. त्यांच्यासारख्या श्रीमंत व्यक्तीने इस्लाम स्विकारल्यामुळे मक्का शहरामध्ये एकच गजहब उडाला. त्यांच्यासारखा व्यक्ती इस्लाम स्विकारतो म्हणजे इस्लाम हाच सत्यधर्म असावा असा एक प्रबळ विचार आमजनतेत पसरला. त्यांना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी आईसहित अन्य नातेवाईकांनी भरपूर प्रयत्न केले. त्यांचे चुलते बनी उमैय्या यांनी तर ह. उस्मान यांना हातपाय बांधून जबर मारहाणसुध्दा केली. परंतू ते आपल्या निश्वयापासनू जरासुध्दा विचलित झाले नाहीत. उलट आपल्याच कुळगटातील मातब्बर घरण्यातील दोन पत्नीना त्यांनी इस्लाम धर्म स्विकारण्यास नकार दिल्याने घटस्फोट (तलाक) दिला.
इस्लामी श्रध्देवर दृढ निश्चय असेल तर सुरूवातीला भरपूर त्रास होते. परंतू त्रास सहन केला व श्रध्देवर ठाम राहिला तर प्रत्येकाला अल्लाहची छुपी मदत येते. श्रध्दावान मनुष्य यशस्वी होतो हा प्रत्येक मुस्लिम बांधवाचा अनुभव आहे. हजरत उस्मान (रजि.) यांचेही असेच झाले. त्यानंतर ह. मुहमंद पैगंबर (स.अ.) यांनी आपली कन्या रूकैय्या यांचा विवाह उस्मान (रजि.) यांच्याशी करून दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा