शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

खुषीची शिक्षा - विशेष मराठी लेख


खुषीची शिक्षा

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

मी एक पती बोलतोय
एरवी माझी बायको भलतीच काटकसरी आहे. नखातील मातीसुद्धा विनाकारण वाया घालवत नाही. पण तिचा एक विक पॉईंट आहे, तो म्हणजे 'साडी'. साडी घेताना ती काटकसर सोडून देते. तिला नेहमीच दुसरीची साडी छान वाटते. साडीच्या खरेदीसाठी तिच्याबरोबर जाणे म्हणजे मला सश्रम कारावासाची शिक्षा  विनाकारण भोगत आहे असे वाटते.

       साड्यांचा ढीग समोर पडलेला असतो, पण तिची नजर कपाटातील अजून दाखवायच्या राहिलेल्या साड्यांकडेच असते. समोर असलेल्या साडीचा कधी रंग छान वाटतो पण त्या साडीचे काठ  तिला निबर वाटतात, तर कधी काठ आवडतात पण रंग उठावदार नसतो. काठ व रंग दोन्ही आवडलेल्या साडीचा पदर तिला विजोड वाटतो. तिच्या मते पदर कधी अगदी लहान असतो किंवा फारच मोठा असतो. काठ, पदर, रंग चांगला असलेली साडी तिच्याकडे यापूर्वीच घेतलेली असते. आता काय करायचे हा प्रश्न माझ्यासमोर असतानाच दुकानदाराच्या वैतागलेल्या चेहऱ्याकडे लक्ष न देता ती उठते व मला म्हणते, "चला दुसऱ्या दुकानात बघू." बिच्चारा मी नाईलाजाने तिच्यामागून चालू लागतो.

          अशा प्रकारे पाच सहा दुकानांची वारी होते. भुकेने, तहानेने व्याकुळ झालेली ती माझ्याकडे न पाहताच सातव्या दुकानात प्रवेश करते, तिथे एकदाची साडी पसंत पडते. त्याचवेळी तिची भिरभिरती नजर किंमतीच्या लेबलकडे जाते आणि क्षणभर तिच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद कुठल्या कुठे निघून जातो. ती सूचक नजरेने माझ्याकडे पहाते. खिशाला हात लावत मी म्हणतो, "घे घे तुला आवडलेली साडी, किमतीचा कसला विचार करतेस." माझे बोलणे ऐकून साडी खरेदी एकदाची आनंदाने पार पडते.

       साडी घेऊन घरी आल्यावर स्वस्थ बसेल ती बायको कसली? शेजारणींना आपली नवी साडी दाखविण्याची तिला अगदीच घाई झालेली असते. शेजारणींनी साडीची तारीफ  केली तर ठीक, नाही तर पुन्हा माझी पंचाईत येते. साडी बदलून आणण्याची टूम निघते आणि पहिल्या दुकानात पहिल्यांदा दाखविलेली साडी घेऊन यावी लागते. त्यानंतरच स्वयंपाकाला सुरूवात होते. मग तिच्या मूडप्रमाणे मेनू ठरविला जातो.

          साडी खरेदीनंतर बहुतेक वेळा भात पिठलं हाच मेनू नशिबी येतो. असो....पण काही असो मित्रांनो! साडी खरेदीनंतर बायको माझ्यावर जाम खूष असते. ती खूष राहण्यासाठी साडी खरेदीची शिक्षा मी जन्मभर आनंदाने स्विकारली आहे, एवढे मात्र अगदी खरे आहे.

काय मित्रांनो तुमचाही अनुभव असाच आहे ना?

गुरुवार, ३० जुलै, २०२०

झोपडीची राणी - मराठी कविता


सुख शेवटी मानण्यावरच असतं. एखाद्या बंगल्यातील महिला स्वतःला भिकारीण समजते तर एखादी झोपडीतील महिला स्वतःला राजाची राणी समजते. कसे ते पहा या श्रीमंत कवितेतून...

"झोपडीची राणी"

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

ना खिडकी ना दार
नाही भिंतीचा आधार।

तीन काठ्या मेढी आठ
दोन धाबळ्या एक माठ।

ताडपदरी जुनीपानी
ठिगळांन झालीय शानी।

नको विटा दगड माती
सिमेंट वाळू दूर राहती।

तवा परात भांडी चार
गाढवावर होती स्वार।

पोरांबाळानी झोपडी भरली
कुत्र्या कोंबड्यांनी चिंता सरली।

संसार माझा सुटसुटीत
बसतो बघि एकाच पेटीत।

मिळे सोबत सूर्य चंद्राची
नसे भिती ऊन पावसाची।

येता थंडी गार वारा
नाही पंखा एसीला थारा।

मी हो राणी झोपडीची
मला नाही भिती चोरांची।


बुधवार, २९ जुलै, २०२०

कोरोनानं मरण स्वस्त केलं - विशेष मराठी लेख.


कोरोनानं मरण स्वस्त केलं

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

कोरोनाचा कहर सारं जग अनुभवत आहे. प्रसारमाध्यमातून कोरोनाग्रस्तांचा वाढतच चाललेला आकडा पाहून छातीत धस्स होत आहे. बरे झालेल्यांचा आकडा पाहून थोडेसे हायसे वाटत असतानाच शेवटचा मरण पावलेल्यांचा आकडा पाहून डोके सुन्न होत आहे. कोरोनानं मांडलेलं मृत्यचं थैमान पाहून वाटतं कोरोनानं मरण स्वस्त केलय, बाकी सर्व महाग केलयं. दररोज शेकडो, हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. अंत्यविधीसाठी चार लोकही मिळेनात. मृत्यूमुखी पडलेल्याचे नातेवाईक वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाइन केलेले असतात. तो एकटाच असतो शेवटी मृत्यूला सामोरा गेलेला. हे पाहून "पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा" असंच म्हणायची वेळ आली आहे . "येशी एकटा जाशी एकटा, जगण्यासाठी करिशी नाटक तीन परवेशांचे हेच खरे."

 

        मरण कुणालाही चुकलेलं  नाही. देवादिकाना, साधुसंताना, थोर महात्म्यांना चुकले नाही तिथे तुमच्या आमच्या सारख्या पामरांची काय कथा. मरण अटळ आहे हे मान्य करूनही वाटत राहते, यापूर्वीचे मरण कसे होते? मरणासन्न अवस्थेत सर्व नातेवाईक आजूबाजूला बसलेले असायचे. हवं नको बघायचे, तोंडात एखादा घास भरवायचा प्रयत्न करायचे, चमच्याने घोटभर पाणी पाजायचे.आयुष्यभर ज्यांच्यासाठी झटलो, जिवाचे रान केले ती मुलंबाळं डोळे भरून पाहता यायची, हाडांची काडं करून उभारलेल्या संसारावर तृप्तीची नजर टाकता येत होती. शेवटची इच्छा बोलून किंवा खुणेने का होईना सांगता येत होती, ज्यांनी आपली सेवा केली त्यांचा हात हातात घेता येत होता. सद्या मरण पावणारे या सर्व गोष्टीला मुकत आहेत. कर्मचारी, आरोग्यसेवक असतात आजूबाजूला पण जिवा भावाच्या माणसांची जागा ते घेऊ शकतात का? ते यंत्रवतपणे आपली कामे करत असतात. त्यांचा तरी काय दोष म्हणा, ते आपला जीव धोक्यात घालून दिवसभरात अनेक लोकांचे अंत्यविधी पार पाडत असतात. जेसीबीने काढलेल्या एकेका खड्यात चार चार शव एकावर एक रचून खड्डे मुजवले जात आहेत, एकेका चितेत दोन तीन शव घालून दहन केले जात आहेत. पत्नी कोरोनाने मरण पावल्यावर पतीला अटॅक येत आहे. पतीला कोरोनाबाधा झाल्याचे ऐकूनच पत्नी प्राणाला मुकत आहे. तरुण अपत्य बाधित झाल्याचे ऐकून आईवडील घाबरूनच देवाघरी जात आहेत. कोणी कुणाला समजवायचे, कुणी कुणाला आवरायचे तेच समजेनासे झाले आहे, कारण सोशल डिस्टनिंग. 

 

        काय दिवस आलेत बघा. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून मनुष्य आयुष्यभर झटतो. त्याचा शेवट असा होतो आहे. तुम्ही म्हणाल, काय हा हळवेपणा! माणसाचं शरीर एक यंत्र आहे, ते बंद पडलं की द्यायच फेकून. तसं तात्विक दृष्ट्या बरोबर आहे तुमचं म्हणणं पण मन आणि मशीन यात फरक आहे. मनात भावना असतात. भावनाशून्य अवस्थेत मशीनवत् विधी नशिबी येत आहेत. 

 

        आईवडील गेल्याचे ऐकून मुलीने फोडलेला पूर्वीचा हंबरडा कुठे गेला? स्वतःचं अपत्य गेल्याचे बघून आईची आर्त किंकाळी कुठे गेली?आज वडिलांच्या अंत्यविधीसाठी आलेला मुलगा लॉजवर राहून शेजाऱ्यांना फोन करतो अंत्यविधीचा खर्च पाठवून देतो. तुम्हीच घ्या उरकून सगळं. शेजारची माणुसकी ला जागणारी माणसं जातपात विसरून अंत्यविधी करत आहेत. ज्यानं लाखो जणांना औषध देऊन बर केलं त्याच्या दफनविधीला नातलग तर सोडाच, चार माणसंही मिळू शकली नाहीत, दोघांवरच दफनविधी उरकावा लागला. कांही ठिकाणी कोरोनाने मरण पावलेल्यांच प्रेत नातलगांनी ताब्यात घेतला नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांनीच अंत्यविधी पार पाडला. ही सगळी परिस्थिती पाहून संवेदनशील माणसाच्या ह्रदयाच्या चिंधड्या होत आहेत. 

 

        अशाच चिंधड्या झाल्या एक मरण पाहून. उच्चपदस्थ अधिकारी, लेखिका, कवयत्री, समाजसुधारक  आदरणीय 'नीला सत्यनारायण' यांच्या मृत्यूने. जेंव्हा त्या जिवंत होत्या तेंव्हा त्यांना सतत मोठमोठ्या राजकीय नेत्याकडून फोन यायचे. त्या एवढ्या व्ही आय् पी होत्या की त्यांना चोवीस तास पोलिस संरक्षण होते. त्या जेंव्हा घराच्या बाहेर पडत तेंव्हा एकामागून एक पाच गाड्या जात होत्या आणि सोबत असायचा पन्नास साठ लोकांचा ताफा. कांही दिवसांपूर्वी त्यांच्यावर ओशिवरा येथे अंत्यसंस्कार झाले मृत्यूनंतर त्यांना हॉस्पिटलमधून स्मशानभूमीत एकट्यानेच जावे लागले, त्यांची मुलगी अनुराधा प्रभूदेसाई ही दादर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये विलगीकरणात होती. त्यांचा मुलगाही कोरोनामुळे त्याच हॉस्पिटलमध्ये होता तर त्यांचे पती अतिदक्षता विभागात ऍडमिट होते. मंत्रालयातील एकही कर्मचारी त्यांच्या सोबत नव्हता. एकही नातेवाईक हजर नव्हता. आत्तापर्यंत त्यांनी जवळजवळ पन्नास सरकारी उच्च पदे भूषविली होती. सोबत होते कांही कर्मचारी पीपीई किट घातलेले. त्यांनी अंत्यविधीचा व्हिडीओ करून ठेवला नातेवाईकांना दाखविण्यासाठी. त्यांच्या अंत्यविधीचे हे चित्र पाहून ह्रदयात वेदनेची कळ आल्याशिवाय राहिली नाही म्हणावेसे वाटले, कोण होतीस तू, काय झालीस तू ,अग वेडे कशी कोरोनाबाधित झालीस तू.

 

        कोरोनाच्या या करूण कहाण्या जीवनाचे एक विदारक सत्य सांगून जातात, "तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी."


 

मंगळवार, २८ जुलै, २०२०

ईद-उल-अज़हा (बकरी ईद) : त्यागाचे प्रतीक - विशेष मराठी लेख.


ईद-उल-अज़हा (बकरी ईद) : त्यागाचे प्रतीक

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गुगल


        प्रत्येक धर्मात व त्यांना मानणाऱ्या मानवी समूहात अनेक आनंदाचे क्षण येत असतात. जगातील सर्व समाज आपापल्या श्रद्धेनुसार हे आनंदाचे क्षण साजरे करतो. यालाच आपण धार्मिक सण म्हणतो. इस्लाम धर्मात दोन धार्मिक सण अतिशय महत्वाचे मानले जातात. रमजान ईद आणि बकरी ईद. बकरी ईद ला ईद-उल-अज़हा अथवा ईद-उल-अद्'हा, ईद-उल-झुआ, ईद-ए-कुर्बां असेही म्हणतात. हा सण कुर्बानीचा सण किंवा पवित्र हज यात्रेचा सण म्हणूनही ओळखला जातो. 
        समाजात अशा व्यक्तीलाच मानसन्मानाचा उच्च दर्जा प्राप्त होतो की जी व्यक्ती आपल्या जीवनात त्यागाला महत्व देते. बकरी ईद ही इब्राहिम अलैहिसल्लाम यांच्या ईश्वरावरील दृढ श्रद्धेचे, सहनशीलता आणि आदराचे तसेच बलिदानाचे प्रतीक म्हणून, अल्लाहने हजरत ईस्माइल अलैहिसल्लाम यांच्या बदल्यात बकऱ्याची कुर्बानी मान्य केली, या अद्भूत घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ, एक त्यागाची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो. हा सण मुस्लिम जिल्हेज महिन्याच्या दहा तारखेस जगभर साजरा केला जातो. पवित्र रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर जवळपास ७० दिवसानंतर हा सण साजरा केला जातो.


        इस्लामच्या महत्वाच्या घटनाक्रमामध्ये हजरत मुहम्मद पैगंबर सल्ललाहु अलैहिवस्सलम यांच्या जन्माच्या पूर्वी ज्या घटनाक्रमांचा प्रकर्षाने पवित्र कुरआनमध्ये उल्लेख आला आहे त्यापैकी कुर्बानीची महत्वपूर्ण घटना नमूद आहे. मूलतः इस्लाम धर्म हा हजरत मुहम्मद पैगंबर (स. अ.) यांच्यापासून पुढे चालू झाला असा समज आहे परंतु खरा इस्लाम धर्म आदम अलैहिस्सल्लाम व त्यांच्या हव्वा या मूळ महापुरुषांपासूनच अस्तित्वात आहे. कालचक्रानुसार ज्या वाईट सवयी व चालीरिती समाजात येतात, जातात त्यांच्यापासून मनुष्यजातीचे संरक्षण करावे याकरिता अल्लाहने वेळोवेळी प्रेषित पाठविले व त्यांना मनुष्यजातीला पापांपासून दूर ठेवण्याचे साधन बनविले. अल्लाहनी आपले संदेशवाहक व प्रेषित म्हणून त्यांना दर्जा दिला. पवित्र कुरआनमध्ये यापैकी बऱ्याच प्रेषित किंवा पैगंबरांची नावे उल्लेखित आहेत. साधारणत: आदम अलैहिस्सल्लाम यांच्यापासून हजरत मुहम्मद पैगंबर साहेबांच्यापर्यंत एक अल्लाहनी मानवाच्या कल्याणासाठी या भूतलावर एक लाख चोवीस हजार प्रेषित पाठविले. या प्रेषितांना वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळे आदेश मिळत गेले व त्यांचे अनुपालन त्यांनी केले. काळाच्या ओघात पाप आणि पुण्य यांची लकेर पुसली जात आहे असे वाटले त्या त्या वेळी अल्लाहने पैगंबराची जगामध्ये पाठवण केली. ज्या पैगंबरांचा पवित्र कुरआनमध्ये उल्लेख आला आहे ते म्हणजे हजरत इब्राहिम अलैहिस्सल्लाम व हजरत ईस्माइल अलैहिस्सल्लाम या पिता-पुत्रांना त्यांच्या कर्तृत्वावर अल्लाहने विशेष गौरविले आहे.

        अशा या महान प्रेषिताचा इब्राहिम अलैहिस्सल्लाम यांचा जन्म साडेचार हजार वर्षांपूर्वी इराक या राष्ट्रामध्ये झाला.  हजरत इब्राहिम अलैहिस्सल्लाम यांना ख्रिश्चन व यहूदी लोक अब्राहम या नावाने मानतात. त्यांचे वडील प्रसिद्ध पंडीत होते. त्यामुळे घरामध्ये भरपूर सुखसंपत्ती होती. त्यांना वंशपरंपरागत सर्व संपत्ती मिळत होती. परंतु त्यांनी सर्व संपत्तीचा त्याग करून सहनशीलतेने कष्टप्रद जीवन जगणे मान्य केले. ते सतत एका ठिकाणी बसून विश्वाच्या उत्त्पतीच्या रहस्याचे चिंतन करीत. पृथ्वी, चंद्र, सूर्य, तारे या सृष्टीतील पशू पक्षी मानव यांचा निर्माणकर्ता एकच ईश्वर आहे. या ईश्वराच्या इच्छेनुसार सर्वकाही बदल होत असतात. आपली धनसंपत्ती अल्लाहची अमानत आहे म्हणून तिचा त्याग केला पाहिजे असे त्यांना वाटे.

         हजरत इब्राहिम अलैहिस्सल्लाम यांना दोन पत्त्नी होत्या एका पत्नीचे नाव हाजरा व दुसरीचे नाव साहरा. साहरापासून त्यांना इसहाक हा पुत्र झाला. इसहाक यांच्या वंशात पुढे हजरत याकुब, हजरत मुसा म्हणजेच मोझेस ईसा (येशू) असे प्रेषित झाले. हजरत इब्राहिम अलैहिस्सल्लाम ईश्वराचा दिव्य संदेश लोकांना देण्यासाठी इराक देश सोडून सिरिया, इजिप्त, फिलीस्तान आणि अरबच्या मक्का भूमीत फिरत राहिले. तेंव्हा त्यांच्याबरोबर हाजरा या पत्नी होत्या. त्यांना अद्याप पुत्रप्राप्ती झाली नव्हती. हजरत इब्राहिम अलैहिस्सल्लाम यांना वयाच्या ८६ व्या वर्षी हाजरा या पत्नीस पुत्रप्राप्ती झाली. त्यांचे नाव ठेवले 'ईस्माइल'. ते आईवडिलांचे प्रिय पुत्र होते. इब्राहीम अलैस्सलाम यांची अल्लाहवर अतूट अशी श्रद्धा होती. 

       अल्लाहनी ज्या ज्या वेळी प्रेषितांची परीक्षा घेतली त्या त्या वेळी त्यात ते खरे उतरले. असाच एक प्रसंग हजरत इब्राहीम व त्यांची पत्नी हाजरा व पुत्र ईस्माइल यांच्या बाबतीत घडली. त्यांना सर्वात पहिली अल्लाहची आज्ञा झाली की आपली प्रिय पत्नी 'हाजरा' आणि पुत्र 'ईस्माइल' यांना वाळवंटातील सुनसान जागेत सोडून यावे. अल्लाहची आज्ञा झाल्यानंतर होणाऱ्या परिणामांची तमा बाळगली तर ते पैगंबर कसले? म्हणून त्यांनी पत्नीप्रेम, पुत्रप्रेम यापेक्षा अल्लाहचे आदेश महत्वाचे समजून त्यांना वाळवंटात सोडले. वाळवंटात भन्नाट वारा, कडाक्याचे ऊन, आजूबाजूस चीट पाखरुही नाही अशा परिस्थितीत माय लेकांच्या स्थितीची कल्पना काय करावी? तान्हुल्यास तहान लागल्यानंतर प्रचंड विस्तारलेल्या वाळवंटात आईची घालमेल सुरु झाली. हाजराने मुलास एका ठिकाणी ठेवून पाण्याचा शोध सुरु केला. त्यासाठी वाळूच्या या टेकडी-वरून त्या टेकडीकडे सातवेळा पळत राहिली. पाणी कुठेच दिसेना. त्या निर्जन ठिकाणी छोट्या ईस्माइलची धडपड पाहवत नव्हती. जशी त्याची व्याकुळता वाढली तसा आईचा फेराही वाढत गेला. प्रत्येक वेळी तिचे मुलाकडे पाहत पळणे अखंडपणे चालू राहिले आणि सरतेशेवटी तिने पहिले की, मुलाचा नरम मुलायम पाय जमिनीवर घासला जात होता. त्या ठिकाणी जमिनीतून एक झरा फुटला. तो झरा आजही 'सफा-मरवा' या टेकड्यांच्या जवळून वाहतो आहे. हाजरामातेने झरा पाझरला त्या ठिकाणी लहानसे मातीचे कडे करून पाणी रोखले आणि तान्हुल्याची तहान भागली. त्या झऱ्याला 'आबे जमजम' असे संबोधले जाते. बकरी ईदसाठी मक्का येथे गेलेले प्रत्येक मुस्लिम बांधव 'आबे जमजमला' भेट देतात व आबे जमजमचे पाणी पवित्र जल म्हणून घेवून जातात. जमजमचे पाणीसुद्धा हजरत इब्राहीम यांच्या कुटुंबीयांमुळेच जगभरास मिळाले.

        पुढे मक्का हे तीर्थस्थान हजरत इब्राहिम अलैहिस्सल्लाम यांनी बांधले. हे तीर्थस्थान इतके पवित्र मानले जाते की, त्या दिशेला तोंड करुन जगभरात नमाजपठण केले जाते. बकरी ईदनिमित्त जगभरातून सुमारे ७० ते ७५ लाख हज यात्रेकरू मक्का येथे जमतात. बकरी ईदनिमित्त मक्का येथे 'संगे अस्वद' याला प्रदक्षिणा घातली जाते. सात वेळा घातलेल्या प्रदक्षिणेस 'तवाफ' असे म्हटले जाते.

        हजरत इब्राहिम अलैहिस्सल्लाम यांची अतूट श्रद्धा होती अल्लाहवर, त्यामुळे अल्लाहनी  त्यांना 'खलीलुल्लाह' म्हणजेच ईश्वराचा दोस्त अशी पदवी दिली. काही प्रेषितांंनी अल्लाहना प्रश्न केला की, ते तुमचे दोस्त कसे? या प्रेषितांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी इब्राहिम अलैहिस्सल्लाम यांची अंतिम परीक्षा घेण्याचे अल्लाहने ठरविले. त्यांच्या स्वप्नामध्ये अल्लाहनी प्रेषितांंमार्फत सांगितले की कुर्बानी कर. त्यांनी या संदेशाबाबत खूप विचार केला. या संदेशाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या दिवशीही रात्री स्वप्नामध्ये अल्लाहनी प्रेषितांंमार्फत सांगितले की तुझी सर्वात प्रिय गोष्ट कुर्बान कर. इब्राहिम अलैहिस्सल्लाम यांनी या स्वप्नाचे चिंतन केले आणि त्यांचा ठाम विश्वास झाला की, ईश्वराला (अल्लाहला) आपला प्रिय पुत्र हजरत ईस्माइल याची कुर्बानी हवी आहे. अल्लाहचा आदेश त्यांनी ईस्माइल व हाजरा यांना सांगितला. ते दोघेही अल्लाहचे परमभक्त होते. ईस्माइल यांनी आई-वडिलांसमोर त्वरित  अल्लाहइच्छेला व वडिलांच्या कर्तव्यपूर्तीला आपली तयारी दर्शविली. इब्राहिम अलैहिस्सल्लाम यांनी प्रिय पुत्र ईस्माइल यांना कुर्बानी देण्यासाठी मक्का शहराजवळील मीना पर्वताच्या टेकडीवर घेवून निघाले. वाटेत सैतानाने ईस्माइलला तीन वेळा मज्जाव केला परंतु ते जराही विचलित व भयभीत झाले नाहीत. मीना पर्वताच्या टेकडीवर अल्लाहची प्रार्थना करुन इब्राहिमनी आपल्या लाडक्या ईस्माइलच्या मानेवर सुरी चालविली, परंतु सुरी चालेना. म्हणून ईस्माइलनी वडिलांना सुचविले की, त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधावी, म्हणजे पुत्रप्रेमापोटी न चालणारी सुरी चालू लागेल. त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आणि अल्लाहचे स्मरण करुन सर्व शक्तीनिशी आपल्या मुलाच्या मानेवर सुरी चालविली. गरम रक्ताचा स्पर्श इब्राहिम अलैहिस्सल्लाम यांना झाला. आपण अल्लाहची इच्छा पूर्ण केली असे त्यांना वाटले आणि त्यांनी डोळ्यांवरची पट्टी काढली. पाहतात तो काय चमत्कार, त्यांच्या समोर एक दुंबा बकरा बळी पडला होता. अल्लाहनी आपला दूत जिब्राईल यांच्यामार्फत हजरत ईस्माइल यांच्या जागी दुंबा बकरा ठेवला होता आणि शेजारी ईस्माइल जिवंत उभे होते. या घटनेच्या स्मरणार्थ ईस्लाम धर्मात अल्लाहवरील श्रद्धेचे प्रतिक म्हणून बकऱ्याची कुर्बानी केली जाते.

        इब्राहिम अलैहिस्सल्लाम अल्लाहच्या इच्छेपुढे कोणत्याही गोष्टीची पर्वा करीत नसत. त्यांना 'खलीलुल्लाह' अशी पदवी का दिली ते इतरांना या प्रसंगामुळे समजले. 

        हजरत इब्राहिम अलैहिस्सल्लाम व हजरत ईस्माइल अलैहिस्सल्लाम या पिता-पुत्रानी मक्का या पवित्र भूमीत अल्लाहची उपासना करण्यासाठी एक काबागृह बांधले. त्या काबागृहाला अल्लाहनी आपले घर म्हणून घोषित केले. तसेच ज्या कोणाला उपासना अर्थात नमाज पठण करायचे असेल त्यांनी काबागृहाकडे आपले तोंड करुन ती करावी अशी आज्ञा केली. जगातील कोणत्याही भागात कानाकोपऱ्यात राहणारा असो, त्यांची ऐपत असल्यास आयुष्यात एकदा तरी या काबागृहाचे दर्शन घेण्यासाठी, तवाफ म्हणजेच प्रदक्षिणा घालण्याकरिता यावे, हज यात्रा करावी असे अल्लाह म्हणतात.

        पुढे हजरत ईस्माइल यांच्या वंशात इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहिवस्सलम यांचा जन्म या पवित्र मक्का भूमीत झाला. त्यांनी काबागृहाचा जीर्णोद्धार कुरेश लोकांच्या सहाय्याने केला. पैगंबर साहेबांनी पाच आचार नियमांचे पालन करण्याची आज्ञा ईस्लाममध्ये केली आहे. या पाच नियमांना 'अरकाने दीन' म्हणतात. पहिली आज्ञा ईमान, दुसरी नमाज, तिसरी रमजानचे रोजे, चौथी आज्ञा जकात व पाचवी हजची यात्रा बकरी ईदच्या वेळी केली जाते. हजयात्रा ही एक महान उपासना आहे. हज यात्रेस जाणाऱ्या श्रद्धावानाचे आचरण पवित्र असावे. तो अत्याचारापासून दूर, अपवित्र गोष्टीपासून दूर असावा. तो पूर्णतः अल्लाहच्या चिंतनात गढून गेलेला असावा. हज यात्रेमध्ये प्रत्येक हाजी पुरुषाला दोन पांढऱ्या चादरी परिधान कराव्या लागतात. त्यांना 'एहराम' म्हणतात. मक्का या पवित्र भूमीत काबागृहाजवळ प्रत्येक हाजी 'लब्बैक अल्लाहुमा लब्बैक' म्हणजे हजर आहे अल्लाह हजर आहे असा उदघोष करतात.

        हज यात्रेस विविध ठिकाणाहून लाखो श्रद्धावान हाजी मक्केत येतात. सर्वजण सामुदायिकरीत्या एकाच वेळी नमाजपठण करतात. त्यांच्यात गरीब-श्रीमंत, कृष्णवर्णीय-गौरवर्णीय अथवा प्रांतिक असा कोणताही भेदभाव केला जात नाही. आपण सर्वजण प्रथम मानव हजरत आदम अलैस्सलामची संतती आहोत अशीच प्रत्येकाची प्रेमभावना असते.

        हजरत इब्राहिम अलैहिस्सल्लाम, हजरत ईस्माइल अलैहिस्सल्लाम आणि हाजरा यांनी ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केले त्या त्या ठिकाणी हज यात्रेस गेलेले हाजी विविध विधी पूर्ण करतात. इस्लामच्या उद्याच्या चिरकाल आठवणी व तत्कालीन अवशेष तेथे पावलोपावली हाजीसमोर उभे राहतात. ते केवळ इस्लामच्या महानतेची साक्षच देत असतात. या सर्व चिरकाल आठवणीने व तेथील पुण्यस्थळे पाहून हाजी लोकांची अंत:करणे अल्लाहच्या प्रेमाने ओसंडून वाहू लागतात व आयुष्यभर स्मरणात राहतात. मक्का येथील अल्लाहमय वातावरणाचे वर्णन शब्दातील आहे. एकीकडे हज यात्रेकरु हजचा आनंद घेत असतात व जगभर सर्वजण कुर्बानीचा आनंद साजरा करतात.

        बकरी ईदच्या दिवशी सकाळी शुचिर्भूत झाल्यावर नवे कपडे घालून इमामांच्या सूचनेनुसार पुरुष सामुदायिक नमाज पठण करतात. नंतर इमामांचे प्रवचन होते. त्यानंतर एकमेकांना भेटून 'ईद मुबारक' अशा शुभेच्छा दिल्या जातात. नमाज पठाणांनंतर कुर्बानी केली जाते. इस्लामी धार्मिक इतिहासाचे वाचन केल्यास आपणास असे दिसून येते की, अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी भक्तिभावाने ज्या गोष्टी सणाप्रसंगी केल्या जातात ती प्रत्येक गोष्ट कोणत्यातरी प्रेषितांच्या जीवनाशी संबंधित असणारी, त्यांनी केलेली कृती किंवा त्यांच्या कृतीची आठवण देणारी असते. यालाच इस्लाम धर्मात सुन्नत म्हणतात. एके दिवशी हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहिवस्सलम यांना त्यांच्या एका मित्राने म्हणजेच साहबीने विचारले, "या रसूलुल्लाहू, यह कुर्बानी क्या है?" आकाने जवाब देते हुये कहा, "यह तुम्हारे बाप हजरत इब्राहिम खलीलुल्लाह की सुन्नत है!" त्यांनी अल्लाह आज्ञेनुसार केलेल्या महान अशा त्यागाची आठवण आहे. सर्वोच्च अल्लाहला, कुर्बान करण्याच्या भावनेचे प्रतिक म्हणून इस्लाममध्ये कुर्बानी जरुरीची ठरली हे सर्वोच्च समर्पण आहे. कुर्बानी ही इस्लाममध्ये इमान व परमेश्वरावरील विश्वासाचे प्रतीक आहे. ज्याची आठवण म्हणून आज जगभरातील मुस्लिम बांधव कुर्बानी देवून बकरी ईद साजरी करतात. हेतू हा की, प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या अंतर्मनात समर्पणाची तीच भावना, इस्लामवरील ईमान, अल्लाहवरील प्रेम जागृत रहावे. कुर्बानी करण्यामागे खरा उद्देश हाच आहे की मानवाने आपल्या निर्माणकर्त्या अल्लाहसाठी कोणताही त्याग करण्यास सदैव तयार असले पाहिजे.

        कुर्बानीचा दुसरा अर्थ कुर्बे रब्बनी म्हणजेच अल्लाहशी जवळीक साधणे असा होय. ईद साजरी करताना आपल्या शेजारी-पाजारी कोणीही भुकेला राहू नये, आपला कुणीही नातेवाईकही उपाशी राहू नये, आपल्याला मिळणाऱ्या सुविधांपासून कोणीही वंचित राहू नये याचीही जबाबदारी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. हीच इस्लामची शिकवण आहे. हेच इस्लामचे सार आहे. 

        असा हा ईद-ए-कुर्बान हा सण म्हणजेच बकरी ईद, असीम त्याग व सहनशीलतेचा संदेश मानवाला देतो. सहनशीलता व त्याग जोपासणारे कधीच अंत पावत नाहीत. आज मानवजातीच्या कल्याणासाठी या दोन गुणांची गरज आहे. अशा प्रकारे बकरी ईदच्या निमित्ताने हजरत इब्राहिम अलैहिस्सल्लाम व हजरत ईस्माइल अलैहिस्सल्लाम, त्यांच्या मातोश्री हाजरा अजरामर झाले आहेत. 


सोमवार, २७ जुलै, २०२०

कुणी सून देता का सून - मराठी कथा.


" कुणी सून देता का सून? "

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

        सुशीलाताई धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांचे उपास-तापास, देवधर्म, व्रतवैकल्ये, नवस सुरू होते. पण का कोण जाणे, कुठलीच देव-देवता प्रसन्न होत नव्हती. त्या दोघांची नाराजी वाढतच चालली होती. प्रकाश आईबाबांची धडपड पहात होता पण काही करू शकत नव्हता. येणारा प्रत्येक दिवस कामात व्यस्त राहून कसातरी ढकलत होता. मुलींच्याकडून येणारे नकार पचविण्याची सवय लावून घेत होता.

        सुशीलाताई एके दिवशी नित्याची भरमसाठ कामे संपविल्यावर क्षणभर डोळे मिटून पहुडल्या. त्यांच्यासमोर त्यांचा जीवनपट चलतचित्रपटाप्रमाणे सरकू लागला. वयाची अठरा वर्षे संपायला कांही महिने कमी असतानाच त्यांनी या घराचे माप ओलांडले होते. पंचवीस तीस सदस्यांच्या एकत्र कुटुंब पद्धतीत असलेल्या या शेतकरी कुटुंबात आल्या. त्यांच्या तिघी जावानां दोन तीन मुलेबाळे होती पण लग्न होवून सात वर्षे झाली तरी त्यांच्या संसारवेलीवर फूल फुलत नव्हते. या दरम्यान त्यांनी कितीतरी वेळा अपमान सहन केला. वांझोटी म्हणून बोलणी खावी लागली. नशिबाचा भोग म्हणून सर्व सहन केले. परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवली. त्याचे फळ म्हणून की काय प्रकाशच्या रूपात एकुलता एक पुत्र परमेश्वराने दिला. त्या दोघांचे जीवन खऱ्या अर्थाने प्रकाशमान झाले. गोऱ्या गोमट्या गुटगुटीत प्रकाशने सर्वांची बोलतीच बंद करून टाकली.

        प्रकाश दिसामासाने मोठा होत गेला. त्याच्या शांत व सुस्वभावाने सर्वांची मने जिंकली. आईबाबाना शेतीकामात मदत करत करत शिक्षण घेऊ लागला. अभ्यासात फारसा हुशार नव्हता तरी सत्तर टक्केच्या आसपास मार्कस् मिळवून उत्तीर्ण होत गेला. शेतीच्या कामात मात्र बापसे बेटा सवाई होता. बी.ए. झाल्यावर त्याने आधुनिक शेती करण्याचे ठरविले होते. शेतीत नवनवे प्रयोग करून उत्पन्न वाढवू लागला. त्यामुळे जो तो त्याची तारीफ करू लागला. प्रकाशने पंचविशी कधी ओलांडली कळलेच नाही. त्याच्या बरोबरीच्या मुलांच्या लग्नाचे बार उडू लागले. प्रकाशचे लग्न थाटामाटात करायचा मनसुबा रचून एका शुभमुहूर्तावर मुली पहाण्यास सुरूवात केली पण आजतागायत तो मुहूर्त शुभ आहे असे वाटत नाही. पहिल्या वर्षी दहा बारा मुली पाहिल्या. काही मुली त्यांना पसंत पडल्या नाहीत, तर काहीना शेती करणारा प्रकाश पसंत पडला नाही. पहिलं वर्ष असंच गेलं, वाटलं ठीक आहे. पुढच्या वर्षी योग जुळून येईल, पण दुर्दैव आमचे प्रत्येक वर्ष असेच  जात आहे.

         थोडीशी सावळी असू दे, कमी उंचीची किंवा जास्त उंचीची असू दे, खर्च मानपान न करणारी असू दे या निष्कर्षापर्यंत ते आलेत पण नकार कांही संपत नाही. मुलाचं लग्न जुळावे म्हणून कित्येक एजंटाना भेटून झाले. अर्थपूर्ण व्यवहारही झाले पण दोन तीन मुली दाखविण्यापलीकडे त्यांनी काहीच केले नाही. अनेक वधू वर सूचक मंडळाच्या मेळाव्याला भाऊसाहेब हजर राहिले. त्यांच्यासारखेच समदुःखी मित्र त्यांना भेटले. त्यांच्याकडून हल्लीच्या मुलींच्या व त्यांच्या पालकांच्या उंचावलेल्या अपेक्षा ऐकून मन सुन्न झाले.

        कुणालाच शेती करणाराई नवरा, किंवा जावई नको आहे. प्रत्येकाला इंजिनिअर, उच्चपदस्थ अधिकारी, जम बसलेला, स्थिर-स्थावर झालेला डॉक्टर जावई हवा. पगार पॅकेज भरमसाठ असावे. किमान पन्नास साठ हजार दरमहा मिळविणारा हवा. मुलाला नोकरी शक्यतो मुंबई पुण्यातच हवी, निमशहरी गावात नको. त्याचा स्वतःचा अलिशान व चांगल्या वस्तीत पुण्यात, मुंबईत  फ्लॅट हवा. मुलाचे आईबाबा फ्लॅटमध्ये फक्त विशिष्ट ठिकाणीच फोटोत चालतील. ते गावाकडेच राहणारे असावेत. इतक्या अपेक्षा पूर्ण झाल्यावर तरी अपेक्षासत्र थांबेल असे वाटते, परंतु तसे होत नाही. मुलाला गावाकडे सर्व सुविधानीयुक्त घर हवे. कमीत कमी चार ते पाच एकर बागायती शेती हवी. नुसती आहे शेती याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाहीत, सातबारा पाहिला जातो. उतारा फार पूर्वीचा नको दोन चार दिवसापूर्वीच काढलेला हवा. काय म्हणावे या मुलींच्या पालकांच्या अपेक्षांंना?

        वधू वर मेळाव्यात मुलांच्या बाबांची चर्चा झाली. एवढ्या सगळ्या अपेक्षांची पूर्ती करून कन्यादान  करून दिलेल्या मुलीने जीवनात पुढे काय करायचे? त्या दोघांच्या कार्यकर्तृत्वाला संधी देणार आहेत की नाहीत हे लोक? पैशापेक्षा, इस्टेटीपेक्षा, माणुसकीला, सुस्वभावाला किंमत देणार आहेत की नाही हे लोक? या चर्चेमध्ये चुकून सामील झालेला एक मुलीचा बाप म्हणाला, "आम्ही मुलीला शिकवतो खर्च करून लग्न करून देतो. उद्या हिच्या नवऱ्याचं काही बरंवाईट झालं तर मुलीनी करायचं काय? म्हणून आम्ही आधीच सर्व बघून सवरून निर्णय घेतो." भाऊसाहेबांंना या सर्व चर्चा ऐकून वाटले, मुलींना समजावून सांगावे पालकांनी, अगं पोरी, मातीतून मोती  पिकवणाऱ्या सोन्यासारख्या पोरांना नाकारू नका.  धडधाकट, उमदा, स्वकर्तुत्वावर जगणारा, सुस्वभावी, स्वावलंबी, स्वाभिमानी मुलाला पसंत करा व सुखाने संसार करा.

माझ्यासारख्या आर्त सासऱ्याची सून बनून घराला घरपण द्या. मग काय म्हणता वाचकहो। मी तुम्हाला विचारतेय, 

कुणी सून देता का सून?

रविवार, २६ जुलै, २०२०

मराठी लघुकथा संच - २


मराठी लघुकथा संच - २


लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी




लघुकथा क्रमांक - ६

संध्याकाळी साडे-सातची वेळ होती. सासरेबुवाना भूक लागली होती. म्हणून त्यांनी सुनेला विचारले, "भाकरी केल्यास का?" सून म्हणाली, "नाही अजून केल्या. मी बचतगटाच्या मिटिंगला निघाले आहे. आल्यावर भाकरी करणार आहे." ती गेली मिटींगला. सासऱ्यानी शिळी भाकरी तर आहे का पहावी म्हणून बुट्टीत बघितलं तर गरमागरम भाकरी दिसल्या. त्यांनी दोन भाकरी फस्त केल्या व आरामात बसले पुस्तक वाचत. सूनबाईनी आल्यावर बुट्टीत बघितले भाकरी कमी झाल्याचे पण सासऱ्याना विचारले नाही कारण उत्तर आलं असतं न केलेल्या भाकरी कोण कसा बरं खाईल ?


लघुकथा क्रमांक - ७

सासूबाईनी आपल्या उच्चशिक्षित पण बाळ लहान असल्याने नोकरी न करणाऱ्या सूनबाईना स्वावलंबी होण्याचा सल्ला दिला. शहरात पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या फॅशन डिझायनिंगच्या कोर्सला जाण्यास सांगितले आणि नातवाला सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी घेतली. आपल्या सूनबाईना फॅशन डिझायनिंगची आवड आहे हे सासूबाईनी ओळखले होते. सूनबाईनी अगदी मनापासून तो कोर्स जॉईन केला. कोर्समध्ये तिनं एक छानशी पर्स तयार केली. खरंच पर्स खूप सुंदर व नीटनेटकी बनवली होती. फोटो काढून  स्टेटस ठेवला होता. सासूबाईनी सुनेला क्लासमध्ये मेसेज पाठवला, "यू आर गुड फॅशन डिझायनर." सुनेने रिप्लाय पाठवला "इट्स  क्रेडिट गोज टू यू." सासूबाई जाम खूष।


लघुकथा क्रमांक - ८

संदीप ब्लिचिंग कारखान्यात अगदी प्रामाणिकपणे काम करत होता. सुट्टीच्या दिवशीही कारखान्यात जाऊन ओव्हर टाईम करायचा. दरवर्षी दहावीत शिकणाऱ्या, परिस्थितीने गरीब असलेल्या पाच विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या इंग्रजी विषयाच्या क्लासची फी भरायचा. त्या  मुलांना नियमित क्लासला जायची विनंती करायचा. एका मित्राने त्याला विचारले, "का करतोस संदीप हे सगळं?" संदीप म्हणाला, "क्लास न लावल्यामुळे मला इंग्रजीमध्ये सात मार्क कमी पडले व माझे शिक्षण थांबले. त्याची शिक्षा मी भोगतोय. असं कुणाचं शिक्षण थांबू नये, त्यांना माझ्यासारखी शिक्षा होवू नये म्हणून."


लघुकथा क्रमांक - ९

प्राथमिक शाळेची पहाणी करणाऱ्या भागाधिकाऱ्याना सवय होती की, शिक्षकांचा वर्ग त्यांच्या नकळत खिडकीतून डोकावून पहाण्याची. एका वर्गाच काम व्यवस्थित सुरु होतं. मुले अध्ययनात रमली होती. स्वाध्याय करत होती. वर्गातून फिरताना त्या मॅडमनी स्वतःच्या रूमालाने एका विद्यार्थ्यांचे नाक पुसल्याचे त्यांनी पाहिले. त्यांना त्या मॅडमच्या या कृतीचे फार कौतुक वाटले. स्टाफ मिटींगमध्ये अधिकाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन त्या मॅडमचा सत्कार केला. बाकीच्या मॅडम मात्र नाराजी ने पुटपुटल्या, साहेबांना काय माहिती तो तिचा स्वतःचा मुलगा आहे म्हणून।


लघुकथा क्रमांक - १०

सूनबाई शाँपिंगला गेल्यावर सासूबाईंच्या लक्षात आले की एक वस्तू आणायला सांगायची विसरली. त्यांनी फोन करून सूनबाईना सांगितले, "अग लता, येतांना एक पर्स घेऊन ये. " सूनबाईनी खरेदीच्या नादात लगेच फोन बंद केला. येताना एक साधी, कमीत कमी किमतीची, मळकट रंगाची पर्स आणली. सासूबाई म्हणाल्या, "अगं तुझी आई उद्या आपल्याकडे पुण्याला जाता जाता येणार आहे ना, त्यांचा उद्या वाढदिवस आहे, विसरलीस की काय. त्यांना गिफ्ट देण्यासाठी पर्स आणायला सांगितली तुला." सूनबाई मनात म्हणाल्या, "तसं सांगायचं ना आधी."



मराठी लघुकथा संच - १

मराठी लघुकथा संच - १


लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

लघुकथा क्रमांक - १

तिन्हीसांजेची वेळ होती. गावच्या वेशीजवळच समीर व रेश्मा यांची दुचाकी बंद पडली. जवळच्याच गॅरेजमध्ये समीर गाडी दुरूस्त करून घेत होता. बाजूला रेश्मा ऊभी  होती. गावातील लोक शेतातून घरी परत येत होते. डोक्यावर जळणाचा भारा घेतलेली एक स्त्री रेश्माजवळ येऊन थांबली. गाडी नादुरुस्त झालीय का म्हणत रेश्माला न्याहाळू लागली . रेश्माला तिची नजर चांगली वाटली नाही, म्हणून तिने पदराने गळ्यातील दागिने झाकून घेतले. हातावरही पदर ओढून घेतला. ती स्त्री म्हणाली बाई, किती वेळ उभी आहेस?  हे समोरच माझं घर आहे. तिथं बस चल. चहा करून देते तुला. पण रेश्मा नको नको म्हणाली, थोड्याच वेळात ती स्त्री हातात चहाचे कप घेऊन गॅरेजकडे आली व म्हणाली, "चाललं नव्हं गरिबाचा चहा?"


लघुकथा क्रमांक - २

एका कार्यक्रमासाठी बहिणी चे कुटूंबिय व भावाचे कुटूंबिय गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर दोघांच्याही चारचाकी एकदम बाहेर पडल्या. वाटेत सर्वानी मिळून चहा घेतला कारण दोन्ही कुटुंबे वेगवेगळ्या गावी जाणार होते. एक फकीर मोरपिसांची जुडी घेऊन त्यांच्यासमोर आला. बहिणी च्या मिस्टरांनी त्याच्या ताटात दहाची नोट ठेवली. तो भावाकडेही मागू लागला. भाऊ म्हणाला, "आम्ही दोघे एकाच घरातील आहोत". तो बाजूला गेला. बहीण दुसऱ्या गावाला गेली, भाऊही आपल्या गावाला निघाला. थोड्याच अंतरावर मागून येणाऱ्या ट्रकने भावाच्या कारला जोराची धडक दिली. सुदैवाने कुणाला इजा झाली नाही. पण कारचे दार चेपून गेले, लोक गोळा झाले. जमलेल्या लोकात मगाचचा तो फकीर पण होता. दार बदलण्यास पाच हजार खर्च झाले.


लघुकथा क्रमांक - ३

दहा बारा वर्षाचा एक मुलगा पळत पळत मेडिकलमध्ये आला. त्याच्या हातात एक पुस्तक, एक डॉक्टरांची चिठ्ठी व दहा रुपयांची नोट होती. त्याने चिठ्ठी मेडिकलवाल्याला दिली. मेडिकलवाला म्हणाला, या गोळ्यांंना शंभर रूपये लागतील. मुलगा म्हणाला, "काका माझी आई फार आजारी आहे, हे दहा रुपये घ्या आणि एका दिवसाच्या तरी गोळ्या द्या." तो म्हणाला, असं कसं देता येईल? मुलगा म्हणाला, हे पुस्तक घ्या ठेवून तुमच्याकडे. मला निबंध स्पर्धेत बक्षिस मिळालय.पन्नास रूपये किंमत आहे याची. मी पैसे दिले की मला परत द्या. दुकानदार म्हणाला, हे दहा रूपये कुठून आणलेस? मुलगा म्हणाला, त्या समोरच्या बंगल्यातील बागेत काम करून आणले. उद्या आणखी काम करून पैसे देईन तुमचे. दुकानदाराने पुस्तक ठेवून न घेता त्याला पूर्ण औषधे दिली व सांगितले, तुझी आई बरी झाली की मला भेटायला ये.


लघुकथा क्रमांक - ४

एक समाजसेवक वृद्धाश्रमात देणगी देण्यासाठी गेले होते. आश्रम चालकांनी त्यांना कांही वृध्दांशी संवाद साधण्याची संधी दिली. समाजसेवक प्रत्येकाला पूर्वायुष्याबद्दल प्रश्न विचारत होते. वृद्ध मंडळीही त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलू लागली, कारण बऱ्याच दिवसांनी कोणीतरी त्यांची आपुलकीने चौकशी करत होते. त्यांनी एका वृद्धेला प्रश्न विचारला आजीबाई तुम्हांला मुलंबाळं आहेत का? ती म्हणाली, "हो आहेत ना मुलंबाळं, म्हणूनच मी इथे दाखल झाले आहे".


लघुकथा क्रमांक - ५

एक तरुण कार्यकर्ता आपल्या निवडक मित्रांसह कोल्हापूरला ला एका महत्वाच्या कामासाठी निघाला होता. रिमझिम पाऊस पडत होता. हातकणंगले बसस्टँडजवळ एक वयस्क शेतकरी पावसात भिजत भाजीविक्री करत बसला होता. त्या कार्यकर्त्याने ते दृश्य पाहिले. गाडीत असलेली छत्री उचलली, गाडीतून उतरला व छत्री उघडून त्या शेतकऱ्याच्या डोक्यावर धरली. त्याला नमस्कार करून गाडीत बसला. त्या दिवशी त्यांच्या सेवा संघाच्या रजिस्ट्रेशनचे रखडलेले काम चुटकीसरशी फत्ते झाले, शासनाचे अनुदानही मिळाले.

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

करु या कोरोनाचा बिमोड - मराठी कविता


               कोरोनाच्या भितीने घाबरलेल्या सख्याला त्याची सखी नाना परीने त्याला समजावत आहे. भिऊ नकोस सख्या, काहीतरी कर असं भिऊन कसं चालेल मनातलं बोलून टाक, मला सांग मोकळा हो. नियम पाळून आपण जोडीने कोरोनाचा सामना करू शकतो. हे ती पटवून सांगत आहे या छान कवितेतून

" करु या कोरोनाचा बिमोड "

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

बोल सख्या बोल, मनातलं बोल
आहे जीवन आपले, फारच अनमोल।

सांग सख्या सांग, साठवलेलं सांग
दोघे मिळून फेडू या, सर्वांचे पांग।

काढ सख्या काढ, सुरेख चित्र काढ
सुख समाधानात, करू या वाढ।

पळ सख्या पळ, जोरात पळ
 मिळेल त्यामुळे, सर्वानाच बळ।

बस सख्या बस, आरामात बस
मीच ओळखते तुझी, दुखरी नस।

चाल सख्या चाल, भरभर तू चाल
नको करू या, कुणाचेच हाल।

झोप सख्या झोप, निवांतपणे झोप
दोघे विणू या, संसाराचा गोफ।

वाच सख्या वाच, लक्षपूर्वक वाच 
जोडीने सोसू या, कोरोनाचा जाच।

वापर सख्या वापर, मास्क तू वापर 
कोरोनाच्या माथ्यावर फोडू या खापर।

सोड सख्या सोड, भिती तू सोड
नियम पाळून करू या, कोरोनाचा बिमोड।

गुरुवार, २३ जुलै, २०२०

कुटुंबजीवन काल, आज आणि उद्या - विशेष लेख


कुटुंबजीवन काल, आज आणि उद्या

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

फोटो साभार: गुगल

  
प्रस्तावना:
        
        कुटुंब म्हणजे अशा व्यक्तींचा समूह की त्यांचे एकमेकाशी एक उत्कट नातं असतं. कुटुंबातील व्यक्ती एकमेकांच्या आधाराने वात्सल्याची कस्तुरी जणू एकमेकांच्या ह्रदयामध्ये भरतात आणि त्यामुळेच त्यांच्या ह्रदयाच्या तारा जुळून गेलेल्या असतात. कुटुंबामध्ये एकमेकांशी मोकळेपणी विचारांची, सुखदुःखाची देवाण घेवाण होत असते. एकमेकांतील संवादाने आयुष्यातील चढ उतार सहज पार होतात. थोडक्यात कुटुंब म्हणजे जीवनातील उन्नतीचे उगमस्थान होय.

कुटुंबजीवन काल:

        पूर्वी एकत्रित कुटुंबात खळाळणारा आनंद होता. व्यक्ती व्यक्तीच्या प्रेमाचं जाळं विणलं जात होतं. एकमेकात जिव्हाळा, प्रेम, माया होती. कुटुंबातील सर्वच घटक एकमेकांच्या वात्सल्याने, आपुलकीने बांधलेली असत. एकमेकांच्या साथीने सुख-दुःखात अश्रूनी न्हाऊन निघत. वडीलकीच्या मायेच्या सावलीत सर्व निर्भयपणे वावरत. एकोणविसाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत एकत्र कुटुंबजीवन अस्तित्वात होते आणि ते आदर्शवत होते. एका कुटुंब प्रमुखाच्या छत्राखाली घरातील सर्व लहान थोर मंडळी गुण्यागोविंदाने नांदत होती. पूर्वीचे कुटुंबजीवन साधे नि सोपे होते. अन्न, वस्त्र, निवारा एवढ्याच मूलभूत गरजा होत्या. कुणाच्याच अपेक्षा, महत्वाकांक्षा उच्च कोटीच्या नव्हत्या. त्यामुळे कर्तासवरता कुटुंबप्रमुख जे सांगेल ते ऐकून संसाराचा रथ व्यवस्थितपणे चालविण्यातच धन्यता मानली जात होती. कुटुंबातील जेष्ठ मंडळी सन्मानाने जगत होती. पूर्वीच्या कुटुंबजीवनात एकाला काटा लागला तर दुसर्याच्या डोळ्यात अश्रू दाटून यायचे. सख्खा, चुलत हा भेदभाव नव्हता कुटुंबजीवन फुललेलं होतं

कुटुंबजीवन आज:

        काळ बदलला. यंत्रयुगामुळे परंपरागत व्यवसाय बंद पडले. जीवनकलह तीव्र झाला. तरूण शिक्षण घेऊन तयार झाले. व्यक्तीविकासाला, महत्वाकांक्षेला पंख फुटले. शहरीकरण वाढून चौकोनी त्रिकोणी कुटुंबे निर्माण झाली. हम दो, हमारे दो चा जमाना जावून हम दो हमारा एक चा जमाना आला. व्यक्ती च्या गरजा वाढल्या आणि त्या भागविण्यासाठी अर्थार्जन व्हावे म्हणून स्त्रिया घराबाहेर पडल्या. काही ठिकाणी केवळ मुलांना सांभाळण्यासाठीच आजी आजोबांचा उपयोग होऊ लागला.

        नंतर त्यांचीही अडचण, अडगळ होऊ लागली. मुलं पाळणाघरात वाढू लागली आहेत. अतिश्रीमंत बनण्याच्या नादात सहा महिन्याची मूलं बारा बारा तास पाळणाघरात वाढत आहेत. मुलांना आई वडिलांचे प्रेम मिळेनासे झाल्यामुळे भावी पिढी चिडचिडी, हेकेखोर, हट्टी बनत आहे. आर्थिक संपन्नतेतून चंगळवाद वाढत आहे. दोन पिढ्यात वैचारिक दरी निर्माण होत आहे. सून-मुलगा त्यांच्या नोकरीत बारा-चौदा तास मग्न असतात. नातवंडे त्यांच्या शाळा-क्लास, कॉम्पुटर, टेनिस, डान्स यात बिझी आहेत. प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र खोली आहे. लँपटाँप, मोबाईल आहेत. संध्याकाळी एकत्र जेवायला बसायची शिस्त दिसते. काही ठिकाणी पण जेवतांनाही प्रत्येकजण व्हाटस्अपवर असतो. आईला भाजी वाढू का हा मेसेज समोरच बसलेल्या मुलाला करावा लागत आहे. ह्रदयात वेदनांचा पूर आलेला असतानाही एकमेकांजवळ व्यक्त करायला आज वेळ नाही. आजच्या कुटुंबजीवनात माझा फ्लॅट, माझी पत्नी, माझी मुलं एवढ्यांनाच स्थान आहे. बाकीची नाती अडगळीच्या खोलीत जाऊन पडली आहेत. थोडक्यात आजचे कुटुंबजीवन

पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरी गुरू
बालबच्चे साधुसंत, अब किसकी सेवा करू 

कुटुंबजीवन उद्या:

        उद्याच्या तरूणांच्या आशा आकांक्षा दाही दिशांना झेप घेतील. कुटुंबाच्या पंखाखाली राहून जीवन संकुचित करणे, त्यांना वेडेपणाचे वाटेल. त्यांना या विशाल जगात आकांक्षाचे पंख लावून उतुंग भरारी घेणे योग्य वाटेल. हम दो हमारा एक ही कुटुंबजीवन पद्धती संपुष्टात येईल. पती पत्नी ही नातीही हंगामी असतील. लिव्ह इन् रिलेशनशिप ही विचारधारा प्रबळ होईल. दोघेही करिअर पैसा यांच्या मागे लागतील. त्यामुळे नवीन 'डिंक (DINK) संस्कृती ' निर्माण होईल "डबल इन्कम विथ नो किड" चा उदय होईल. मागच्या पिढीच्या एकुलत्या एक जन्मलेल्या तरूणांना बहीण-भाऊ, काका-काकू, आत्या-मामा, मावशी, आजी-आजोबा, चुलत, मावस, मामे या नात्यांची ओळखही नसेल. त्यामुळे आधारासाठी मित्र मैत्रिणींचा स्वछंद, मुक्त आधार घ्यावा लागेल. आजी-आजोबांचे वाडे रिकामे राहतील. आजी आजोबा, आई वडील म्हणतील 

घर नाही घरासारखे, आहेत नुसत्या भिंती
प्रेम, जिव्हाळा लावू कुणाला दूर गेली नाती।

        उद्याचे कुटुंबजीवन सैरभैर असेल बोंडातून निघालेल्या कापसासारखे. वाट्टेल तिकडे पळेल. प्रसंगी मातीत मिसळून जाईल. उद्याच्या पिढीला सांगावे लागेल फार फार वर्षापूर्वी एकाच घरामध्ये आजी आजोबा, आई वडील व त्यांची मुले रहात होती.

लोकगीतातील नागपंचमी - विशेष मराठी लेख


लोकगीतातील नागपंचमी

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

 

फोटो साभार: गुगल


 श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे

क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी उन पडे।

 

               अशा श्रावणात अनेक सण आणि उत्सवांची झुंबड उडते. नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी,असे एक ना अनेक सण आणि त्यात पावसाच्या सरीवर सरी येत असतात. ऊन पावसाचा लपंडाव रंगलेला असतो. सृष्टीदेवता टवटवीत हिरवीगार दिसत असते. खरीपाची पेरणी आटोपल्याने शेतकरी खुषीत व निश्चींत असतात. श्रावणातला प्रत्येक दिवस जणू उत्सवाचा, कथाश्रवणाचा व आनंदाचा असतो. अशा या नितांतसुंदर श्रावणातील शुद्धपंचमी म्हणजेच नागपंचमी होय.

 

               पूर्वीच्याकाळी श्रावण महिना व त्यात येणारी नागपंचमी ही स्त्रियांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारी होती. नागपंचमीच्या सणाला भारतीय संस्कृतीत मोठे महत्व आहे. हा सण जवळ आला की स्त्रियांच्या मनामध्ये अनेक सुरम्य, सुरेख आठवणींचे झुले झुलू लागायचे. त्या झुल्यामध्ये विराजमान झाल्यावर गत आयुष्यातील मोरपंखी क्षण पिंगा घालू लागायचे. फेर, झोपाळे, झिम्मा-फुगडी, पिंगा यातून आनंदाने भारून गेलेले दिवस आठवायचे. या सणाला सासुरवाशिणी माहेरी येत. कधी नव्हे तो मिळणारा मोकळेपणा हसण्या-खेळण्यात घालवत. कारण पूर्वी स्त्रिया फारशा घराबाहेर पडत नसत. त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम एकच असे तो म्हणजे 'रांधा, वाढा व उष्टी काढा' त्यामुळे नागपंचमीचा सण म्हणजे स्त्रियांना घराबाहेर पडण्याची, खेळण्याची, व्यक्त होण्याची नामी संधी असायची. 

 

               नागपंचमीच्या सणापूर्वी ८ ते १० दिवस आधी गल्लीतील सर्व लहानथोर स्त्रिया एकत्र येवून फेर धरून गाणी म्हणायच्या. झिम्मा-फुगडी, घोडा-चुईफुई, पिंगा-काटवटकाना, पिंगा इत्यादी खेळ मनसोक्त खेळायच्या. खेळता-खेळता उखाणे, गाणी म्हणून मन मोकळं करायच्या. सासुरवासात नांदून आलेल्या स्त्रिया मनाच्या कुपीत साठवून ठेवलेल्या लोकगीतातून आलेले सुख-दु:खाचे कढ व्यक्त करायच्या. पंचमीच्या सणाला माहेरी नेण्यासाठी तिचा बंधू यायचा. माहेरी जाण्याकरिता परवानगी घेण्यासाठी तिला सासू-सासरे, दीर-नणंदा, पतीराज यांची आर्जवे करावी लागत. अशावेळी ती या लोकगीतातून सासूरवाशिण, सासूला म्हणते _ _ _ _ _

 

पंचमीच्या सणाला, बंधू आल्यात नियाला|

बंधू आल्यात नियाला, रजा द्या मला जायला|

 

सासू म्हणते, मला काय विचारतीस? विचार तुझ्या सासऱ्याला

सासरा म्हणे, मला काय विचारतीस? विचार तुझ्या पतीला |

 

               अशा प्रकारे तिची माहेरी जाण्यासाठी अडवणूक व्हायची. पूर्वी सासुरवास, छळ, कुचंबना स्त्रिच्या पाचवीलाच पूजलेली होती. माहेरहून सासरी जाताना तिला अतीव दु:ख व्हायचे. डोळ्यातून अश्रूधारा ओघळू लागायच्या. आपले दु:ख स्त्रिया नागपंचमीच्या खेळातून व्यक्त करायच्या. असे दु:ख व्यक्त करणारे हे लोकगीत.

 

दारी जास्वंदीचा वेल, त्याला करंजीएवढी फुलं

तुला न्यायला कोण ग आलं |

 

सासरे आले न्यायला दारी

माझ्या डोळा आले पाणी |

 

               अशाप्रकारे सासू, दीर, नणंद न्यायला आलेले पाहून तिच्या डोळ्यात पाणी यायचे. गीतात शेवटी पतीदेव न्यायला यायचे तेंव्हा ती म्हणायची.

 

आई कर ग बांधाबाधी

मी जाते आता सासरी

 

               सासर कितीही द्ववाड असलं तरी मनाच्या खोल कप्प्यात सासरबद्दल जिव्हाळा असायचा. दीर, नणंदा, जावा यांच्याबद्दल आपुलकी वाटायची. स्वतःला दाग-दागिन्यांची हौस असतानाही दागिने घालताना ती नणंद, जावा यांचा विचार करायची. त्या काय म्हणतील ? असे तिला वाटायचे हे या लोकगीतात पहा. 

 

काळ्या रानामधी, कारल्याचा वेल,

तिथं उतरिला सय्याप्पा सोनार

त्यानं घडविलं घडविलं, पैंजणाचं जोड,

दादा म्हणितो म्हणितो, ले ग ले ग राधा

ले ग ले ग राधा कशी लिवू मी दादा

घरी सासू-नणंदा, दारी जावा-भावा

त्या करतील करतील माझा हेवा-दावा

 

               सासूबाई, नणंदा, जावा यांच्याबद्दल तिच्या मनात आदरयुक्त भिती असायची. दीर-भावजयीचं नातं बऱ्याच ठिकाणी भावा-बहिणीप्रमाणे असायचे. त्यांच्यात चेष्टा-मस्करीही चालायची. हे दाखवणारे हे लोकगीत.

 

पाच फडीचा नागोबा, एका फडीची नगदारी

पडली ग माझ्या पायावरी, दीर म्हणितो वैनी |

 

साखळ्या कशानं मोडल्या

तुमचं काय गेलं आमच्या बापानं घडविल्या |

 

मोडल्या तर मोडल्या हिन्नाच्या

करून आणीन मी सोन्याच्या |

 

               पूर्वीची स्त्री सासरी दबलेली असली तरी अशाप्रकारे गीतातून का होईना माहेरबद्दलचा अभिमान व्यक्त करायची. अशाच एका सासूबाईंची सुनेला माहेरी न पाठवण्याबद्दलची कारणे या सुरेख लोकगीतातून कशी व्यक्त झालीत पहा.

 

बंधू आलेत माहेरी न्यायला

सासूबाई, जावू का हो माहेरा |

 

कारल्याचे आळे कर ग सूनबाई

मग जा आपल्या माहेरा |

 

कारल्याचे आळे केलं हो सासूबाई

जाऊ का हो माहेरा |

 

कारल्याला पाणी घाल ग सूनबाई

मग जा आपल्या माहेरा |

 

               अशा प्रकारे कारल्याचे बी पेरून कारली लागेपर्यंत, त्याची भाजी करेपर्यंत सासूबाई माहेरी जाण्यास परवानगी देत नाही. बहीण-भाऊ, दीर-भावजय, बहिणी-बहिणी यांच्याप्रमाणेच जिव्हाळ्याचं नातं असतं नणंद-भावजयीचं. त्या दोघीजणी खेळत असताना एके दिवशी गंमत होते ती या गीतात पहा.

 

नणंद-भावजा दोघीजणी, घरात नव्हते तिसरे कोणी |

खेळता खेळता डाव रंगला, भावजेवरती डाव आला |

 

यादवराजा राणी रुसून बसली कैसी |

सासरे गेले समजावयाला, चला चला सूनबाई आपल्या घराला |

 

तिजोरीच्या किल्या देतो तुम्हाला |

 

               अशाप्रकारे रुसलेल्या त्या स्त्रीला समजवण्यासाठी सासू, दीर, नणंद, जाऊ येतात. तिला कांंही-बाही देण्याचे आश्वासन देतात. पण ती कांंही उठत नाही. शेवटी तिचे पतीदेव येतात व तिला म्हणतात.

 

चला चला राणी आपल्या घराला 

लाल लाल चाबूक देतो तुम्हाला |

 

               पतीदेवांचे हे बोलणे ऐकून ती चटकन घरी जाते. या गीतातील चित्रदर्शी वर्णनाची प्रासादिक रचना सोप्या चालीमुळे चटकन मनाची पकड घेते.

 

               पूर्वीच्या स्त्रिया कितीही दबलेल्या असल्या, दुय्यम नागरिकांच्या भूमिकेत असल्या तरी त्यांच्या जीवनप्रेरणा उत्कट आहेत. त्या आपल्या सृजनाचा आनंद पाककलेत, विणकाम, शिवणकाम, भरतकामात शोधतात. स्त्री गीतात, जात्यावरच्या ओव्यात, आपल्या प्रतिभा फुलवतात. नागपंचमी हा असाच प्रतिभेला फुलोरा देणारा सण. सासर-माहेराबरोबरच रामायणातील प्रसंग गीतातून सांगण्याचा यशस्वी प्रयत्न या नागपंचमीच्या गीतातून करतात.

 

अलीकडं नारळाचं बन, पलीकडे नारळाचं बन |

मधी सीताची ग कुटी, जोगी गेला दानयाला |

 

मी नाही दान करायाची, मी नाही दान करायाची |

तुझ्या पायरी बसीन, तुझा सत्तव घेईन |

 

               या गीताप्रमाणेच झिम्मा खेळताना रामायणातील पुढचा प्रसंग सांगणारे हे गीत. 

 

धौम्य ऋषी सांगतसे रामकथा पांडवा |

 

रामासंगे जानकी नांदताना काननी |

सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी |

 

सांबर मला भावाला, सीता सांगे राघवा |

कातड्याची कंचुकी, त्याची मला लेववा |

 

राम गेले धावुनी, बाण भाता घेऊनी |

सीता पाहे वाटुली, दारी उभी राहुनी |

 

साद आला दूरचा, कोणी मला वाचवा |

ओळखीचा साद तो, बावरली सुंदरा |

 

रामामागे धाडिले, लक्ष्मण देवरा |

 

               पूर्वीच्या अशिक्षित स्त्रियांनी मौखिक पद्धतीने आईकडून लेकींच्याकडे अशा लेकरवारसाने ही स्त्रीगीते जतन केली आहेत. कोणत्याही विद्यापीठाची पदवी न घेतलेल्या स्त्रियांनी केलेल्या या रचना अद्वितीय आहेत. फेराच्या या लोकगीतांंमध्ये विविधता आढळते. आता हे एक सुंदर लोकगीत सुरेख शब्दांनी, उत्कृष्ठ यमक साधत स्वतःबद्दलचा अभिमान सांगणारे आहे. 

 

झाड-झबाक, फूल टबाक बाई शोभिलं दोघं |

दार-चौकट त्यात मी बळकट बाई शोभिलं दोघं |

झरोका-खिडकी त्यात मी लाडकी बाई शोभिलं दोघं |

दौत-लेखणी त्यात मी देखणी बाई शोभिलं दोघं|

 

               स्त्रिया फेर धरून गाणी म्हणायच्या. त्या गाण्यात विनोदी गीतांचीही रेलचेल असायची. घरजावई झालेल्या एका पुरुषाची व्यथा सांगणारे हे एक विनोदी गीत.

 

केली होती बहुत पुण्याई|

कसा झालो मी घरजावई |

 

सासूची लुगडी धुतो मी|

बायकोचीही घालतो वेणी |

सांभाळतो मी धाकटी मेहुणी|

 

पहा आमच्या बायकोचे गोड रुप

अंगावर खरुज खूप |

 

रंगाने काळी शाई|

कसा झालो मी घरजावई |

 

               असे हे गीत म्हणताना फेरातील स्त्रियांची हसून हसून पुरेवाट व्हायची. 

 

               अशी सुरेख लोकगीते तुमच्या-माझ्या आजीच्या आजीकडून लेकवारसाने आली आहेत. अशा पद्धतीची सलग तीन तास चालणारी गीतंही पूर्वीच्या स्त्रियांना मुखोद्गत होती. अशा रचनातून तिचे आत्मप्रगटीकरण होत असावे. पूर्वी भोगावा लागणारा सासुरवास, संसाराच्या अपार कष्टाचं ओझं अशा सणाच्या निमित्ताने खेळता खेळता गीतातून व्यक्त करायच्या. इंदिरा संत, सरोजिनी बाबर, शांता शेळके यांसारख्या थोर स्त्रियांनी आपल्या परीने हे संचित साठवलं आहे. काळाच्या ओघात हा लोकगीतांचा वारसा नाहीसा होत आहे. कॉम्पुटर, इंटरनेट, फेसबुक, व्हाटसअप च्या जमान्यात अशी लोकगीते काळाच्या ओघात लोप पावत असली तरी माझ्या सारख्या असंख्य स्त्रियांच्या मनात या गीतातील गोडवा कायमपणे रुजला आहे. न्हवे तो कर्णशिंपल्यातून अखंड झिरपत राहिला आहे. स्त्री गीतांचा हा परंपरागत वारसा आपल्या परीने जतन करण्याचा प्रत्येक लेकीसुनेने प्रयत्न केला पाहिजे. हे 'संस्कृती-धन' हा आपला इतिहास आहे आणि ज्यांना इतिहास आहे त्यानांच भविष्य आहे हे आपण लक्षात ठेवायला हवे.

 

               भारतासारख्या कृषिप्रधान देशात नागपंचमीचे महत्व विशेष आहे. अन्नधान्याच्या उत्पादनाच्या क्षेत्रात आपण स्वावलंबी व स्वयंपूर्ण होत आहोत. एकूण उत्पादनाच्या पंधरा टक्याहून अधिक अन्नधान्याची नासाडी उंदीर करतात. उंदीर हे नागाचे भक्ष्य आहे. अशा उंदराचे उत्पादन अन्य प्राण्यांच्या तुलनेत शेकडो पटीने अधिक आहे. उंदराचा नायनाट करुन धान्य वाचविणारा एक उपकारकर्ता म्हणून नागाचे संरक्षण करण्याची गरज आहे. केवळ नागदेवता म्हणून नव्हे तर मानवाचा मित्र म्हणून त्याची जोपासना व्हावी ही अपेक्षा. नागमैत्री वृद्धींगत होण्यास या सणाचा उपयोग व्हावा ही अपेक्षा.