बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०

थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले


२८ नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा विशेष लेख.


थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       समाजाने छळले आणि राजाने झोडपले तर तक्रार कोणाकडे करायची? अशा काळात छळ, अपमान, कष्ट सहन करीत दिवसरात्र देह झिजवित जोतिबांंनी मानव समाजाला प्रकाश दाखविला. जोतिबा ज्या काळात जन्मले, वाढले त्या काळात त्यांनी आपल्या कार्याने सर्व मानवांच्या ह्रदयात आदराचे स्थान मिळविले. अज्ञान, दुष्ट रूढी, अनिष्ट परंपरा आणि भयंकर दारिद्र्याने समाजाला ग्रासून टाकले होते. मूठभर लोकांच्या हाती विद्याधन होते. तर बहुजनांना  शिक्षण म्हणजे काय हेही समजत नव्हते. स्त्रियांची अवस्था तर गुलामासारखीच होती. हक्क आणि स्वातंत्र्य त्यांच्यापासून कैक योजने दूर होते. विद्याधन त्यांना प्राप्त करता येत नव्हते. समाजातील दलित वर्गाला कोणी जवळ घेत नव्हते. एवढेच नव्हे तर त्यांचा स्पर्शदेखील वर्ज्य मानीत होते. अशा या काळात जोतिबा समाजसुधारक म्हणून अवतरले.


       जोतिबांना स्वतःसाठी कांही मिळवायचे नव्हते. त्यांना समाजाची अधोगती थांबवायची होती. समाजातील मानसिक गुलामगिरीच्या बेड्या तोडून, समाजाला समता, स्वातंत्र्य आणि माणुसकीचे हक्क मिळवून द्यायचे होते. रूढी परंपरांच्या नावाखाली समाजावर जो अनिष्ट, अमानुष पगडा बसला होता तो दूर करायचा होता. माणसाला माणूसपण बहाल करायचे होते. गुलामगिरीतून माणसाला मुक्त करून त्यांच्या जीवनात चैतन्य आणायचे होते. जोतिबांचा समाजात जो अपमान झाला, त्याने त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची उर्मी पैदा केली. त्यांच्या मनात सामाजिक चळवळ उभी करण्याच्या कल्पनेने जन्म घेतला. त्या दृष्टीने त्यांची पावले पडू लागली. त्यांच्या मनात विचार आला, मी तर चांगला सुशिक्षित आहे. चांगले वाईट मला कळते. आम्ही तर सर्व मानव, आम्ही एकाच धर्माचे. मग मी कमी दर्जाचा असे त्या लोकांना का बरे वाटते? नीती ने वागणे हाच खरा मानवधर्म. एकमेकांमध्ये भेदभाव करणे हा समाजावरचा कलंक आहे. बहुजन समाजातील लोकांना शिक्षणाचे दरवाजे खुले करून त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करायला हवा. त्यामुळे ते गुलामगिरीविरुद्ध लढायला तयार होतील.


       स्त्रिया आणि दीन दलितांना शिक्षणाचे दरवाजे खुले करण्याचे जोतिबांनी ठरविले. सन १८४८ च्या सुमारास त्यांनी पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींसाठी शाळा काढली. समाजाचा रोष पत्करुन आपल्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षिका म्हणून कार्यरत होण्यासाठी संधी दिली. जोतिबा आणि सावित्रीबाई शाळेत विनावेतन राबत होते. घरखर्च भागविण्यासाठी जोतिबा कपडे शिवण्याचेकाम करायचे, तर सावित्रीबाई चटया विणायच्या.


      त्या काळी अनेक क्रूर आणि वेडगळ समजुतींनी समाजाला अवकळा आणली होती. पती निधनानंतर पत्नी ला सती जावे लागत असे. केस कापून तिला घरातच डांबून ठेवले जात असे. विधवा स्त्रियांना कोणी वाली नव्हता. म्हणून त्यांनी विधवा विवाहाला पाठिंबा दिला. कांही विधवा स्त्रियांचे विवाहही त्यांनी लावून दिले. टाकून दिलेल्या मुलांसाठी जोतिबानी माणुसकीच्या दृष्टीकोनातून एक अनाथालय सुरु केले. एकदा एक विधवा स्त्री त्यांच्या अनाथालयात आली, तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला व निघून गेली. जोतिबांना मूलबाळ नव्हते. त्यांनी त्या मुलालाच आपला पुत्र मानले. त्याचे नांव यशवंत ठेवले. त्याला डॉक्टर बनविले. पुढे त्यानेही समाजसेवेचा वारसा चालू ठेवला.


      दीनदलित मुलांसाठी शाळा काढणारे पहिले भारतीय, स्त्रियांसाठी देशात पहिली शाळा काढणारे स्त्री शिक्षणाचे जनक, स्त्रियांचे हक्क व स्वातंत्र्याचे जनक, शेतकरी आणि कामगार यांचे दुःख आणि दारिद्रय निवारण्यासाठी लढा उभारणारे पहिले पुढारी, भेदभाव मानणाऱ्यांंवर हल्ला चढविणारे आणि समानतेची घोषणा करणारे पहिले लोकनेते, सामान्य जनतेच्या दुःखाला वाचा फोडणारे पहिले महात्मा आणि सत्यमेव जयते या दिव्य मंत्राने भारावून गेलेले जोतिबा फुले हे खरे सत्यशोधक होते.


       स्त्रिया, कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नाप्रमाणेच जोतिबांनी दलित वर्गाच्या दैन्यावस्थेकडेही समाजाचे आणि सरकारचे लक्ष वेधले. इंग्लडचे राजपुत्र आपल्या देशात आले असता, त्या समारंभात शेतकऱ्याच्या वेशात उपस्थित राहून जोतिबांनी खरा भारत कसा आहे हे प्रत्यक्ष दाखवून दिले.


       शैक्षणिक कार्यासाठी जोतिबांनी केलेला त्याग आणि घेतलेले अपार कष्ट आणि सोसलेला छळ यांविषयी महाराष्ट्रभर त्यांचे नांव झाले. त्यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती इंग्लंडमधल्या ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचली होती. सरकारने जाहीररीत्या त्यांना मानाची शालजोडी अर्पण करून त्यांचा बहुमान केला. त्यावेळी जोतिबा अवघे पंचवीस वर्षांचे होते. त्यांचे कार्य आणि त्याग पाहून लोक त्यांना महात्मा म्हणू लागले. जोतिबा खऱ्या अर्थाने महात्मा ठरले.


त्यांच्या पवित्र स्मृतींना शतशः प्रणाम ।


शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

ऑनलाईन शिक्षण शाप की वरदान - विशेष मराठी लेख


ऑनलाईन शिक्षण: शाप की वरदान

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: pexels.com

             

       मार्च २०२० महिना सुरु झाला. उन्हाळ्याची चाहूल लागली. उन्हाच्या झळांबरोबरच आणखी एकाची चाहूल लागली. ती होती कोरोना नावाच्या महाभयंकर, प्रखर महामारीची, ज्या महामारीने जगाची जीवनशैलीचं बदलून गेली. सगळं कांही बंद झालं. लॉकडाऊन नावाचा भयानक शब्द उदयास आला. बागेतील टपोऱ्या, टवटवीत फुलांंप्रमाणे शाळेत बागडणारी गोड मुले घरबंद झाली. त्यांचं नाचणं, बागडणं, हसणं, उड्या मारणं घरातच बंद झालं. शाळेला सुट्टी मिळाली म्हणून आनंदित झालेला विद्यार्थीवर्ग थोड्याच दिवसात उदास व हिरमुसलेला दिसू लागला. मुलांना शाळेत पाठवून कांही काळ सुखाचा श्वास घेऊ पहाणाऱ्या मातापालकांना उपजतच खोडकरपणा मिळालेल्या पाल्यांनी मेटाकुटीला आणले. विद्यार्थ्यांचा लळा लागलेल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी कांहीतरी केले पाहिजे असे वाटू लागले आणि लॉकडाऊनचा भाऊ ऑनलाईन उदयास आला. त्यांच्या मदतीला मोबाईल नावाचा प्रचंड शक्तीमान असलेला भाऊ आला आणि ऑनलाइन शिक्षण सुरू झाले.


       ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या मरगळलेल्या जिवात जीव आला. बुडत्याला काडीचा आधार मिळाला. विद्यार्थ्यांना शिक्षक जेंव्हा मोबाईलवर दिसले त्यावेळी त्यांना हरवलेले पालक सापडल्याचा आनंद झाला. त्यांचे मित्रही मोबाईलवर हाय हॅलो करू लागले आणि दिशाहीन अवस्थेत भटकणाऱ्या शिक्षण नौकेला एक नवी दिशा मिळाली. युनिफॉर्म घालून, नवी पाठ्यपुस्तके घेऊन विद्यार्थी वर्गात बसल्याच्या अविर्भावात मोबाईल समोर बसू लागली. या निमित्ताने पुस्तके उघडली गेली. होमवर्क दिले जाऊ लागले. पूर्ण केलेला होमवर्क शिक्षकांच्या मोबाईलवर सहजपणे पाठवले जाऊ लागले. ज्युनिअर केजीत शिकणारा चार वर्षाचा विद्यार्थी मोबाईल ऑपरेट करायला शिकला. तंत्रज्ञ, तंत्रस्नेही शिक्षकांनी आपल्या अंगभूत कौशल्याने कठीण पाठ्यांशाचे मनोरंजक व्हिडीओज तयार केले. त्याद्वारे विद्यार्थ्यांचे आनंददायी अध्ययन सुरू झाले. मध्यंतरी एका मुलीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत डोंगरावर छोटीशी झोपडी बांधून व्हेटर्नरी डॉक्टरकीचे शिक्षण घेतले. रेंज प्रॉब्लेमवर मात केली. हे चित्र आशादायी आहे.


       शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगिण विकास. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक विकास हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. ऑनलाईन शिक्षणाने असा विकास होणे शक्य आहे का? हा चिंतनाचा विषय आहे. ऑनलाईन शिक्षणाने विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल आला आणि विद्यार्थी शिक्षणाबरोबरच गेम खेळण्यात तरबेज झाला. त्यांच्या कोवळ्या स्नायूंवर ताण पडू लागला. चष्मा असलेल्यांचा नंबर वाढला. चष्म्याच्या काचा सोडावॉटरच्या बनल्या. चष्मा नसलेल्याला चष्मा लागला. मोबाईल सतत पाहण्याने विद्यार्थ्यांला पाठदुखी सुरु झाली. मुलांना मोबाईल देणे, नेमक्या वेळी मोबाईलसमोर बसवणे, तो क्लासकडे लक्ष देतो का? याकडे सतत लक्ष देणे ही पालकांची  डोकेदुखी सुरू झाली. मुलाचा ऑनलाईन क्लास सुरू असताना त्याच्या छोट्या भावंडांना शांत बसविणे ही मातापालकांची कसरत ठरू लागली आहे. त्यावेळी कुटुंबातील इतर सदस्यांनी काय करायचे? हाही प्रश्न उपस्थित आहे. काही पालक मोबाईलसह ड्युटीवर जातात. मोबाईल घरी नसतो. अशावेळी सायंकाळी सातची वेळ ठेवण्यात येते. यावेळी विद्यार्थी दमलेले असतात, जांभया देत बसतात नाईलाजाने, कारण पालकांचा खडा पहारा सुरू असतो. मॅडमनी प्रश्न विचारला की एकसाथ उत्तरे दिली जातात. एकच गोंगाट सुरु होतो. मध्येच लाइट जाते. कांही वेळा रेंज नसते. अशा वेळी अख्ख्या कुटूंबाला मनःस्ताप होतो.


       ऑनलाईन शिक्षणाच्या कांही मर्यादा आहेत. मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑपरेशन चे शिक्षण ऑनलाईन देता येईल का? सिव्हील इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांला बांधकामाचे शिक्षण याप्रकारे देता येईल का? त्यासाठी प्रात्यक्षिक शिक्षणच आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी ऑनलाईन दूर करता येतील का? पालकांचे दुर्लक्ष झाल्या मुळे ऑनलाईन शिकत असलेला विद्यार्थी हुंदक्याने दाटला तर त्याचे अश्रू ऑनलाईन पुसता येतील का? मोबाईल समोर बसलेला विद्यार्थी शिकता शिकता झोपी गेला तर त्याचवेळी जागे करून त्याला समजवता येईल? ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यावर कितीतरी पाल्यांनी मोबाईल घेवून दिला नाही म्हणून आत्महत्या केल्या याला जबाबदार कोण? ऑनलाईन शिक्षण गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहचणे अवघड आहे हेच खरे आहे.


      ऑनलाईन शिक्षणामुळे घराघरात अनेक गमतीजमती घडत आहेत. एक दादीमाँ आपल्या तीन वर्षांच्या नातवाला बडबडगीत म्हणायला सांगत असते.


दो चोट्यावाली, आम्मदकी साली।

आम्मद बुलाता, पेरू खलाता 

पेरुमें शक्कर, तेरी मेरी टक्कर ।


             असे म्हणत नातवाला टक्कर देणार असते, इतक्यात तिचा सात वर्षाचा नातू म्हणतो, "दादीमाँ टक्कर ऑनलाईन दे दो। उसको कोरोना हो जायेगा।कोरोना काळात इतक्या जवळून टक्कर द्यायची नसते."


       मोबाईल विश्वात न गुरफटलेला एक मुलगा सकाळी उठल्याबरोबर ब्रश करत असतो. ते पाहून मोबाईल विश्वातील मुलगा पळतच आईकडे जातो व म्हणतो, "आई बघ ना तो वेडा, उठल्याबरोबर मोबाईल बघायचं सोडून ब्रश करत आहे." म्हणून म्हणते ऑनलाइन शिक्षण म्हणजे दुधाची तहान ताकावर भागविणे होय, तो सर्वोत्तम उपाय नव्हे.


ऑनलाईन शिक्षणाने वेड लागले मोबाईलचे।

या वेडाला वेळीच आवरावे।

नाहीतर मातेरे होईल जीवनाचे।


ऑनलाइन शिक्षण ना शाप ना वरदान।

ते तर केवळ ऑनलाइन ज्ञानदान।


सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२०

दिवाळीचा बाजार - मराठी कविता


दिवाळीचा बाजार

कवयित्री: डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


चल चल कमला, पारू

दिवळीचा बाजार करू ।


प्रथम घेऊ गोडे तेल 

राहिले पैसे तर पाहू सेल ।


डाळीचा तर भडकलाय भाव

नकोच काढू या लाडूचं नाव ।


घेऊ या आपण मैदा नि रवा

बंड्याला घेऊ सदरा नवा ।


अंगणात घालू सडा रांगोळी

आनंदाने करू पहाटे आंघोळी ।


करू या थोडी शेव चकली

सोनूला आणू पैंजण नकली ।


खाऊ फक्त चिवडा मस्त

वाटेल दिवाळी स्वस्तात स्वस्त ।


गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०

पंडीत जवाहरलाल नेहरु - विशेष लेख

 

पंडीत जवाहरलाल नेहरु

मुला, माणसातील प्रतिभावंत नेते

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


       पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे अतूट बालप्रेम आणि बालकांचा त्यांच्यावरील अपार विश्वास या सहसंवादी नात्यातून दिनांक १४ नोव्हेंबर १९५२ पासून पंडीत नेहरूजी यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.


       पंडीत जवाहरलाल नेहरु हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि ब्रिटिशांच्या तावडीतून देशाला मुक्त करणाऱ्यांचे अध्वर्यू महात्मा गांधीजींचे एक प्रमुख अनुयायी, आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आणि समाजवादासारख्या नव्या सामाजिक, राजकीय विचारसरणीचे लोकप्रिय उद्गाते, सोपे व उत्कृष्ट इंग्रजी लिहिणारे ग्रंथकार, साहित्यिक पश्चिमी जगतामध्ये विलक्षण दबदबा असलेले राष्ट्रप्रमुख इत्यादी अनेक उपाधीमुळे हयातभर आणि नंतरही गाजत राहिलेले महापुरुष होते.


       पंडीत नेहरूजींच्या व्यक्तिमत्वातील उदारमतवादी देशभक्तीच्या पदरावर उच्च दर्जाच्या सुसंस्कृतपणाचे आणि अभिजात मानवतेचं जे बहारदार विणकाम केलेले होते, त्याचा अनेक देशातील थोरामोठ्यांना हेवा वाटतो. स्वतंत्र झालेल्या स्वदेशाच्या भवितव्यावर स्थिर नजर ठेवून पंडीत नेहरूजींनी भारतात सुरू केलेले कार्य हा जगातील विचारवंतांच्या कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय होऊन बसला आहे.


पंडीत नेहरूजींचा मुलांबद्दलचा जिव्हाळा:

        एकदा आपला नातू राजीव याच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांनी चार पाचशे मुलांना आपल्या घरी आनंदभवनात बोलावले, त्यांच्या खेळाच्या स्पर्धा लावल्या आणि त्यात स्वतःही भाग घेतला. खेळ सर्वांनी खेळण्याजोगे लपंडाव व शिवाशिवीचे होते. गोष्टी सांगायचे होते. गाणी म्हणायचे होते.


       दिल्लीतील एका शिशु विहाराला त्यांनी कळवून ठेवले होते. मला वेळ मिळाला की मी तुमच्याकडे येईन आणि विद्यार्थ्यांच्या संगतीत वेळ घालवीन.


       जपानमधील मुलांनी हत्ती पाहिला नव्हता. त्यांनी हत्तीची मागणी पंडीतजींच्याकडे केली. त्यांनी लगेच म्हैसूरच्या जंगलातून चेन्नईकडे आणि तेथून बोटीने जपानकडे एका हत्तीणीची विनाविलंब पाठवणी केली. तेथे मुलांची हत्ती पाहण्यासाठी चढाओढ लागल्याचे फोटो जपानी वृत्तपत्रातून झळकले. ही दहा वर्षाची हत्तीणी टोकिओच्या प्राणिसंग्रहालयचे आकर्षण ठरली.


पंडीत नेहरूजींचे वाचनप्रेम:

        थोड्या मोठ्या मुलाशी बोलण्याचा प्रसंग येई तेंव्हा पंडीतजी त्यांना स्वानुभवाचे जे विषय आवर्जून सांगत त्यात बालपणापासूनच मुलांनी वाचनाचे वेड लावून घेण्याच्या गोष्टी प्रथम येत असत. आपल्या लहान बहिणीस म्हणजेच कृष्णा हाथीसिंग यांना नवनवीन पुस्तकाबद्दल ते पत्रे लिहित. आपली कन्या इंदिरा हिने विशिष्ट पुस्तके वाचलीच पाहिजेत याबद्दल ते आग्रही असत. ते स्वतः घाई गर्दीच्या कार्यक्रमातही नित्यनियमाने वाचन करीत. आपले ज्ञानभांडार सतत समृद्ध व संपन्न करण्यांवर त्यांचा भर असे. जणू कांही जीवनातील हीच अग्रक्रमाची इच्छा ते उराशी बाळगून होते.


पंडीत नेहरूजींची शारीरिक, मानसिक तंदुरुस्ती व आत्मपरीक्षण:

        योगव्यायाम आणि प्राणायाम ते रोज न चुकता करीत. स्वतःच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना आपला कोणताही नियोजित कार्यक्रम रद्द करावा अगर बदलावा लागलेला नव्हता. शीर्षासनासारखे अवघड आसन ते सहजपणे करीत. नियमित व्यायामाचे महत्व ते अगदी आत्मविश्वासाने सांगत. त्यांच्या उपदेशाचा आवडता विषय होता आत्मपरीक्षण. आपण घरीदारी कसे वागतो, कसे बोलतो, विचार करण्यात कुठे चुकतो, दुसऱ्याला दुखावतो का सांभाळून घेतो, स्वभावाच्या आणि वृत्तीच्या कोणत्या गुण दोषांचा अधिक विचार करावयास हवा इत्यादी गोष्टींच्या निखळ चिंतनाची सवय त्यांनी स्वतःस लावून घेतली होती.


पंडीत नेहरुजींचा वाढदिवस बालदिन झाला:

       बालदिनाचे उद्गाते म्हणून ज्या मराठी कार्यकर्त्याचा उल्लेख केला जातो ते विनायक मार्तंड कुलकर्णी होत. ते पंडीत नेहरूजी आणि इंदिरा गांधी यांच्या विशेष जवळच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांपैकी होते. त्यांनी पंडीत नेहरूजींचा वाढदिवस हा बालदिन म्हणून साजरा करावा अशी कल्पना मांडली आणि विविध वरिष्ठांकडून तिला मान्यताही मिळविली. सन १९५२ पासून बालदिन  अधिकृतपणे साजरा  होवू लागला.


पंडीत नेहरूजींची अंतिम इच्छा:

        पंडीत नेहरूंनी आपल्या अंतिम इच्छेत म्हटले आहे....

भारतीय जनतेने माझ्यावर एवढे अपरंपार प्रेम केले आहे, एवढा जिव्हाळा दाखविला आहे की, या प्रेमाची परतफेड अल्पांशानेही करणे केवळ अशक्य आहे. खरे म्हणजे प्रेमासारख्या दिव्य भावनेची परतफेड तरी कशी होणार? माझ्या वाट्याला भारताच्या सर्व भागातील, सर्व थरातील जनतेचे जे प्रेम आले, त्यामुळे मी भारावून गेलो आहे.


        मृत्यूनंतर माझ्यासाठी कोणताही धार्मिक विधी केला जाऊ नये. अशा कर्मकांडावर माझा मुळीच विश्वास नाही. माझ्या निधनानंतर माझ्या देहाचे दहनच करावे माझ्या देहाची राख, ज्या भूमीत भारतातील शेतकरी दिवसरात्र राबतो, काबाडकष्ट उपसतो, त्या भूमीत विखरून टाका. माझ्या देहाचे हे अणूरेणूसुद्धा या भारताच्या मातीत मिसळून जाऊ देत आणि मला भारताच्या भूमीशी एकरुप होऊ द्या. या राखेपैकी मूठभर राख भारताच्या प्राचीन परंपरेचे, वर्तमान प्रयत्नांचे व उज्ज्वल भविष्याचे प्रतिक असलेल्या गंगा नदीत विसर्जन करावी. गंगा ही सर्वार्थाने भारताची नदी आहे. माझ्या मनिषांचा व भावभावनांची गंगा ही साक्षीदार आहे तिच्यात विसर्जित केलेली माझी रक्षा म्हणजे भारताच्या सांस्कृतिक परंपरेला माझा अखेरचा प्रणिपात होय. अलाहबादला गंगेत टाकलेली ही रक्षा आपोआपच सागराला मिळेल, जो सागर भारतमातेच्या चरणतळांना स्नान घालतो. मात्र मूठभर रक्षेचं गंगेत विसर्जन केल्यावर जी राख उरेल ती विमानातून उंच आकाशात न्यावी आणि तिथून ती भारतभूमीवर विखरून टाकावी. तिथल्या मातीशी, धुळीशी ती एकजीव व्हावी. भारताच्या भूमीचाच तो एक अंश बनावा हीच माझी अखेरची इच्छा आहे.


       पंडीत नेहरूजींच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्यातील एखादा तरी गुण आपल्या अंगी बाणविण्याचा प्रयत्न करु या. हीच खरी आदरांजली ठरेल...


बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०

आनंददायी दिवाळी - विशेष मराठी लेख

 

आनंददायी दिवाळी - विशेष मराठी लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


       आनंदाचा क्षण न् क्षण उधळण करत दिवाळी येते. सर्वत्र चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण पसरते. भारतीय संस्कृतीमध्ये सणांची अगदी रेलचेल असली तरी दिवाळी हा सर्व सणांचा राजा आहे. दरिद्री नारायणापासून ते कोट्याधीशापर्यंत सर्वच लोक अगदी धुमधडाक्यात, जल्लोषात, उत्साहात व अत्यंत आनंदात दिवाळी साजरी करतात.


       दिवाळी आली की दूरगांवी नोकरी चाकरीसाठी गेलेली माणसे घराच्या ओढीने परत येतात. शिक्षणासाठी दूरगांवी गेलेली मुले आपल्या आनंद घरट्याकडे परततात. मुलांना घरांची व घरांंना मुलांची ओढ असते. ती परस्परांंना भेटलेली पहाण्यातील आनंद वेगळाच असतो. पाठीवरचे बहीण भाऊ मोठे झालेले जाणवतात. आईला कालपर्यंत अवतीभवती भिरभिरणारं आपलं बाळ आता एकदम वेगळं रंगरूप घेत आहे असे वाटते आणि वात्सल्याचे निर्झर अनेक दिशांनी वहायला लागतात. घरातून कांही निमित्ताने उडालेली चिमणी पाखरे दिवाळीतील दिवसांच्या उबेसाठी योग्यवेळी पोहचण्याची काळजी घेतात.


       दिवाळीत बाजारांना उधाण येते, साहित्यिकांना सृजनांंसाठी समृद्ध दालने मोकळी होतात. त्यामुळे दिवाळीच्या दिवसातील आनंददायी समाज आपल्यापुढे उभा ठाकतो. ही दिवाळी बळीराजांची दिवाळी असते, कामगार बांधवांची असते आणि कष्टकऱ्यांचीही असते. त्या सार्यांची प्रसन्न पाऊले दिवाळीत आनंदाची बरसात करत घरोघरी उमटत असतात, त्यामुळेच प्रत्येक घरात भाग्योदय होतो व घरांना आनंदाचे आंदण मिळते.


       दिवाळीतील सुवर्णकाळ म्हणजे सायंकाळ. प्रत्येकाच्या घरापुढे रांगोळ्या सजलेल्या असतात. ओट्यावर, पायऱ्यावर, गच्चीवर, फाटकावर पणत्या आणि मेणबत्त्या तेवत असतात. रात्रीच्या दाट काळोखात चमकणारा आकाशदिवा सर्वानांंच सोबती वाटतो.

दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची पार्श्वभूमी अशी आहे.


वसूबारस - गोवत्स द्वादशीः

आश्विन कृष्ण द्वादशीला गोवत्स द्वादशी किंवा वसुबारसही म्हणतात. या दिवशी संध्याकाळी गृहिणी गाय वासराची पूजा करतात. गाईला फराळाचे पदार्थ, बाजरी व गूळ खायला घालतात.


धनत्रयोदशी:

या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून जगदीप लावतात. याची दंतकथा अशी आहे, हैमू नावाच्या राजाचा मुलगा अल्पायुषी होता. षष्ठीदेवीने भविष्य वर्तविले होते की हा मुलगा लग्नानंतर चारच दिवसांनी मरेल. हे संकट टाळण्यासाठी राजाने यमुना नदीच्या डोहात एक महाल बांधला आणि नंतर त्याचे लग्न केले. राजपुत्र त्या महालात राहू लागला पण होणारी घटना टळली नाही. तेंव्हा यमाने सांगितले जे लोक त्रयोदशीला मला टोपी दान करतील आणि प्रदोष समयी दीपोत्सव करतील त्यांच्यावरील संकट टळेल.


नरकचतुर्दशीः

नरकासूर हा प्राण ज्योतिषपूरचा राजा होता. ज्योतिषपूर भूतानच्या दक्षिणेला आहे. नरकासुर राजा अत्यंत बलाढ्य, तितकाच दुष्ट होता. देशात आणि देशाबाहेर त्याने धुमाकूळ घातला. देवांचा आणि सज्जन माणसांचा तो छळ करू लागला. हजारो मुली त्याने पळविल्या. पृथ्वीला नरकासुराचा त्रास सहन होईना. शेवटी दुष्टांचा नाश करणाऱ्या, सज्जनांचे रक्षण करणाऱ्या श्रीकृष्णाने नरकासुरावर स्वारी करून त्याला युद्धात ठार मारले आणि सर्वाना वर दिला की आजच्या स्थितीला जो मंगलस्नान करील त्याला नरकाची पीडा होणार नाही.


लक्ष्मीपूजन:

आश्विनातल्या अमावस्येला घरोघरी लक्ष्मीपूजन होते त्याचे कारण दैत्यराज बलीने लक्ष्मीचे हरण केले असता विष्णूने तिची सुटका  केली. त्या आनंदाप्रित्यर्थ घरेदारे  सजवून, फुलांच्या माळा बांधून, खमंग पदार्थाचा आस्वाद घेऊन हा दिवस साजरा केला जातो. सगळीकडे दिव्यांची रोषणाई केली जाते व फटाक्यांच्या आतषबाजीत लक्ष्मीचे मोठ्या  थाटामाटात पूजन केले. म्हणून आजही तो प्रघात रूढ झाला आहे.


बलिप्रतिपदा - पाडवा:

लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी कार्तिक मासाचा प्रथम दिवस असतो. कार्तिक शुद्धप्रतिपदा या दिवशी विष्णूनी दैत्यराज बलीला पाताळात पाठविले म्हणून या दिवसाला बलिप्रतिपदा असे म्हणतात. प्रल्हादाचा नातू बळीराजा खूप दानशूर होता. त्याला इंद्रपद हवे होते म्हणून त्याने खूप यज्ञ केले. विष्णू बळीवर संतुष्ट झाला आणि त्याने वामनरूप घेऊन बळीराजाजवळ तीन पावलाइतकी जमीन मागितली. वामनाने फक्त दोन पावलात सगळी जमीन व्यापली आणि बळीराजाला विचारले, आता तिसरे पाऊल कुठे ठेवू? तसेच बळीने आपले डोके पुढे केले. वामनाने तिसरं पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात पाठवले आणि वामन म्हणाला, "तुझे दातृत्व पाहून मी संतुष्ट झालो मी तुला पाताळाचे राज्य देतो. त्याचा द्वारपाल मी होतो आणि तुझी सेवा करतो". ही घटना घडली कार्तिक शुद्ध प्रतिपदेला म्हणून या दिवसाला बलिप्रतिपदा म्हणतात. इंद्र पाऊस पाडतो म्हणून त्याची पूजा करायचे. श्रीकृष्ण लोकांना म्हणाला, "इंद्रदेव पाऊस पाडत नाही तर पर्वत, डोंगर ढग अडवतात म्हणून पर्वताची पूजा करा". लोक पर्वताची पूजा करू लागले. याचा इंद्रदेवाला राग आला म्हणून इंद्रदेवाने खूप पाऊस पाडला पण श्रीकृष्णाने गोकुळातील लोक भिजू नयेत म्हणून आपल्या करंगळीवर पर्वत उचलून धरला आणि सर्व लोकांना आश्रय दिला. ही घटना कार्तिक शुद्ध प्रतिपदेला घडली.

       

       या दिवशी विक्रमादित्य राजाचा राज्याभिषेक झाला व या दिवसापासून विक्रमादित्य संवंत्सर सुरु झाले म्हणून व्यापारी लोक हा दिवस नवीन वर्षारंभ दिन मानतात. या दिवसाला पाडवा असेही म्हणतात. या पाडव्यापासून व्यापारी वर्ष सुरु होते. घरोघरी वह्या, पुस्तके, यंत्रे वगैरेंचे पूजन होते. बायकोने नवऱ्याला, आईने मुलाला व मुलीने वडिलांना ओवाळण्याची पद्धत आहे. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.


भाऊबीज - यमद्वितीया:

यमाची बहीण यमी. यमीने यमाला या दिवशी आपल्या घरी बोलावले. यमाची पूजा करून त्याला पाटावर बसविले. पाटाभोवती सुंदर रांगोळी काढली. पंचपक्वानांंचे स्वादिष्ट भोजन  वाढले. यम प्रसन्न झाला आणि यमीला म्हणाला, "आज तू माझे जे स्वागत केले त्यावर मी खूष आहे. तुला हवा तो वर माग." यमी म्हणाली, "भाऊराया दरवर्षी याच दिवशी तू माझ्या घरी जेवायला यावे, तसेच जो भाऊ स्वतःच्या बहिणीच्या हातचं जेवेल त्याला तू सुखी ठेव." यम म्हणाला, 'तथास्तु'. त्यावेळेपासून भाऊबीज दरवर्षी साजरी केली जाते.


आनंदाचं शिंपण करीत

दीपावलीनं तुमच्या दारी यावं


नवस्वप्नांनी, आकांंक्षानी

जीवन सारं उजळून जावं


सप्तरंगी रांगोळीसारखं

जीवन रंगीबेरंगी व्हावं


स्नेहमयी शुभेच्छांनी 

घरदार बहरत रहावं ।


दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा।


सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०

माझे कुटुंब माझी जबाबदारी - विशेष प्रासंगिक लेख


माझे कुटुंब माझी जबाबदारी - विशेष प्रासंगिक लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल



कुटुंब असावे कुटूंबासारखे।

 नकोत नुसत्या व्यक्ती।

त्यात असावी जबाबदारी ।

नकोच नुसती नियमसक्ती ।


       एखादी व्यक्ती शिकून कितीही उच्चपदस्थ झाली, श्रीमंत झाली, प्रसिद्धीस आली तरी त्या व्यक्तीला कुटुंब हेच आपलं विश्व वाटतं आणि वाटलंच पाहिजे. पशुपक्ष्यांनाही कुटुंबाची ओढ असते. सायंकाळी जिवाच्या आकांताने ती आपल्या कुटूंबाकडे झेपावतांना दिसतात. हजारो-लाखो किलोमीटरचा प्रवास करुन कुटुंबाला भेटण्याची ओढ कांही औरच असते. कारण कुटूंबात असतो लळा-जिव्हाळा, माया-प्रेम, आपुलकी आणि बरंच कांही....? कुटुंबात एकमेकांसाठी झटणं असतं, एकमेकाची वाट पहाणं असतं, एकमेकावर जीव ओवाळून टाकणं असतं.


       मार्च २०२० पासून कोरोना महामारीने जगात थैमान घातले आहे. प्रत्येकाचा जीव टांगणीला लावला आहे. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाची जबाबदारी शतपटीने वाढली आहे. पूर्वी कुटुंबातील एका व्यक्तीला काटा लागला की दुसऱ्याच्या डोळ्यात आपोआप पाणी यायचं. आज कोरोनामुळे कुटुंबातील एक व्यक्ती बेजबाबदार वागली तर कुटुंबातील सर्वांच्याच शरीरात कोरोना प्रवेश करतो आहे. पूर्वी कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनाधीन असली की म्हटलं जायचं की, किती सांगितलं तरी ऐकत नाही, शेवटी तो भोगेल आपल्या कर्माची फळं। पण आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की एकाने केलेल्या कर्माची फळं अनेक जणांना भोगावी लागत आहेत. म्हणून प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः तर घ्यायला हवीच शिवाय आपल्यामुळे आपल्या कुटूंबाला त्रास होवू नये ही काळजी घ्यायला हवी. कुटूंबाची जबाबदारी स्विकारायला हवी.


       कुटुंबातील प्रत्येकाने अगदी गरजेचे असेल तरच घराबाहेर पडायला हवे आणि बाहेर पडतांना विचार करायला हवा की, पाळण्यातील इवलासा जीव तुमच्याकडे येण्यासाठी झेपावत आहे, कुणीतरी तुमच्या खिशातून आणलेली कॅडबरी खाण्यासाठी उत्सुक आहे, सांजवेळी डोळ्यात जीव आणून तुमचा जीवनसाथी तुमची वाट पहात आहे, स्वतः काठीचा आधा घेणारे तुमचे बाबा तुम्हाला खंबीर साथ देण्यासाठी सज्ज झालेले आहेत, थकलेल्या, सुरकुतलेल्या हातानी तुम्हाला कुरवाळण्यासाठी तुमची आई वाटेकडे डोळे लावून बसली आहे. या सगळ्यांंसाठी तुम्हाला जगायचं आहे. कोरोनाशी सामना करायचा आहे. कुटुंबातील प्रत्येकाने ही त्रिसूत्री लक्षात ठेवायला हवी.

१. सॅनिटायझर

२. मास्क

३. फिजिकल डिस्टन्स


१: सॅनिटायझर स्वच्छता ज्याचे घरी आरोग्य तेथे वास करी, या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या शरीराची व घराची स्वछता राखायला हवी. बाहेरून आल्याबरोबर कपडे बदलायला हवेत. त्यांचं निर्जंतुकीकरण करायला हवे. हात सॅनिटायझरने वरचेवर धुवायला हवेत. महिन्याला आणायच्या साहित्ययादीत प्रथम सॅनिटायझरचे नांव लिहावे व त्याचा नित्यनियमाने आवश्यक वापर करावाच.


२: मास्क - ऑफिसला जाताना टाय लावायला विसरलात तर फारसं बिघडत नाही पण मास्क लावायला अजिबात विसरायचं नाही. आणि हो, तो मास्क नाकातोंडावरच ठेवायला हवा. मास्क नावालाच लावून तो दाढीवर ठेवू नये. असं केल्याने तुमचा दंड वाचेल पण जीव वाचणार नाही. आणि हे लक्षात ठेवा, जगातील सर्व गोष्टीपेक्षा तुमचा जीव महत्वाचा आहे, लाखमोलाचा ही आहे. तुमच्या चुकीची शिक्षा तुमच्या कुटुंबाला मिळणार आहे. ज्या कुटुंबावर तुमची खूप खूप मर्जी आहे.


३: फिजिकल डिस्टन्स - तुमची ड्यूटी सांभाळत असताना, व्यापार धंदा करताना, उपजिविकेसाठी बाहेर पडताना शारीरिक अंतर ठेवा. उपजिवीकेसाठी बाहेर पडावेच लागते हे मान्य आहे. पण उपजिवीकेसाठी जीव शाबूत रहाणे आवश्यक आहे. हे कायमपणे लक्षात ठेवा. घरगुती किंवा सार्वजनिक कार्यक्रम माचे आयोजन करतांना गर्दी होणार नाही ही काळजी घ्या.वारेमाप खर्च टाळून बचत करा या निमित्ताने बचत होईल, जी भविष्यात उपयोगी पडेल. ती रक्कम गरजूना मदत करा.


शासनाच्या नियमांचे पालन करून कुटुंबाला जपू या कारण माझे कुटुंब ही माझी जबाबदारी आहे.


आली कोरोना महामारी ।

स्वच्छता ठेवू घरोघरी ।

मास्क लावू तोंडावरी ।

हात धुवू या वरचेवरी ।

अंतर ठेवू परोपरी ।