सत्कार्य करा पण गर्व नको
✍️डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी
फोटो:साभार गुगल
बनी इस्राएलमध्ये एक वयस्क मनुष्य होता. त्याने अल्लाहजवळ प्रार्थना केली, ए अल्लाह तू मला या संसाराच्या चिंतेपासून मुक्त कर कि ज्यामुळे मी रात्रंदिवस तुझी भक्ती, नामस्मरण करू शकेन. अल्लाहनी त्याची प्रार्थना ऐकली. त्याला एका डोंगरावर पोहोचविले. तेथे एक डाळिंबाचे झाड उत्पन्न केले. एक झरा निर्माण केला. तो मनुष्य दररोज डाळिंब खायचा, झऱ्याचे पाणी प्यायचा व रात्रं दिवस अल्लाहचे नामस्मरण व प्रार्थनेत मग्न रहायचा. आपल्या पाचशे वर्षाच्या आयुष्यात तो मनुष्य एकही गुन्हा न करता अल्लाहची उपासना करत राहिला. त्यांच्या मृत्यूनंतर त्याला फरिस्त्यांनी (देवदुतांनी) अल्लाहसमोर उभे केले तेव्हा अल्लाहनी हुकूम दिला की जा मी तुला माझ्या कृपेने माफ केले आहे.
त्याला मोठे आश्चर्य वाटले. त्याच्या मनात एक विचार चमकून गेला की माझ्या मुक्ततेसाठी माझी पाचशे वर्षाची उपासना उभी असताना अल्लाहनी आपल्या कृपेने मला कसे काय मुक्त केले? विश्वकर्ते अल्लाह तर मनातील विचारही जाणतात. त्यांनी फरिशत्यांना हुकूम दिला की याला स्वर्गाकडे घेवून जा. पण पायी पायी, स्वर्गाचा रस्ता नरकाच्या वरूनच जातो. पुलसिरात हा मार्ग नरकाच्यावर आहे. तो प्रत्येकाला पार करावाच लागतो. अल्लाहचे जे प्रामाणिक भक्त आहेत. ते या रस्त्यावरूनच वीजेच्या वेगाने जाऊ शकतात. परंतू जे भक्त अप्रामाणिक आहेत. त्यांना फारच संकटे अडचणी येतात.
जेव्हा फरिश्ते त्या मनुष्यास पायी पायी स्वर्गाकडे घेवून चालले तेव्हा स्वर्गाच्याजवळ जाईल तशी उष्णता वाढू लागली. त्याला तहान लागली. घसा कोरडा पडू लागला. त्याची तहान इतकी वाढली की सहनशक्तीच्या बाहेर गेली. त्याचवेळी एक हात त्याच्यासमोर अवतरला. त्या हातात पाण्याचा एक ग्लास होता. त्या हातातून आवाज आला. हे पाणी विकत घेणार आहेस का? तुझी इच्छा असेल तर घे. तो तहानेले व्याकुळ झाला होता. त्याने विचारले, केवढ्याला देशील हे पाणी. त्याची किंमत तुझी पाचशे वर्षाची उपासना आहे. ताबडतोब त्यांने आपली उपासना दिली व घटाघट पाणी प्यायला आता त्याच्या नोंदवहीत सत्कार्याच्या बाजुला काहीच नव्हते. ते पाहून फरिशत्यांनी त्याला दारातच उभे केले. त्या मनुष्याने अल्लाहचरणी नतमस्तक होवून क्षमा याचना केली. तो म्हणाला, ए अल्लाह तु ज्याच्यावर कृपेचा वर्षाव करशील ज्याला क्षमा करशील तोच स्वर्गात जाईल. त्या मनुष्याने उपासना केली खरी पण आपल्या सत्कार्याबद्दल त्याला गर्व झाला. त्यामुळेच त्याला स्वर्गप्राप्ती होऊ शकली नाही. अल्लाहची कृपा, अल्लाहचा आशिर्वाद असेल तरच स्वर्गप्राप्ती (जन्नतप्राप्ती) होऊ शकते.
एके ठिकाणी म्हटले गेले आहे की नेक अमालपर किसी को गुरूर नही होना चाहिए । अल्लाहची उपासना करावी पण त्याबद्दल गर्व बाळगू नये. मी उपासना करतो याचा दिखावा करू नये. दुसरा उपासना करत नाही आणि मी एवढी उपासना करतो आहे, असा विचारही मनात आणू नये. त्याला आपल्या परीने उपासनेसाठी प्रवृत्त करावे. मग कराल ना निगर्वीपणे अल्लाहची उपासना ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा