गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

स्वातंत्र्यवीर सावरकर - विशेष लेख


२६ फेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुण्यदिन त्यानिमित्त......


स्वातंत्र्यवीर सावरकर - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


अल्प परिचय:

       स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पूर्ण नांव विनायक दामोदर सावरकर. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गांवी २८ मे १८८३ रोजी झाला. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी बी. ए. ची पदवी संपादन केली. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला गेले. तेथे त्यांनी एल्. एल्. बी चा अभ्यासक्रम पूर्ण केला. लहानपणापासून त्यांच्यावर क्रांतिकारक विचारांचा प्रभाव होता. १ जानेवारी १९०१ रोजी त्यांनी 'मित्रमेळा' नामक संघटना स्थापन केली. पुढे इ. स. १९०४ मध्ये तिचे नाव 'अभिनव भारत' असे ठेवण्यात आले. या संघटनेच्या सभासदांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी तन-मन-धन अर्पण करण्याची शपथ घ्यावी लागे. अभिनव भारत संघटनेमार्फत सावरकरांनी तरूणांत राजकीय जागृती निर्माण केली आणि त्यांना क्रांतिकारी कार्याकडे वळविले. 


       सावरकर इ. स. १९०६ मध्ये बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी 'जोसेफ मँझिनी' या इटालियन देशभक्ताचे चरित्र लिहिले. इ. स. १८५७ च्या उठावासंबंधी 'भारतीय स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ लिहिला. हा उठाव म्हणजे बंड नसून स्वातंत्र्ययुद्ध होते असे त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केले. इंग्लंडमध्ये त्यांचा अनेक भारतीय क्रांतिकारकांशी संबंध आला. या क्रांतिकारकाना प्रेरणा देण्याचे कार्य त्यांनी केले. सावरकर एक साहित्यिक व विचारवंत म्हणूनही प्रसिद्ध होते. माझी जन्मठेप, भारतीय स्वातंत्र्यसमर, संन्यस्त खड्ग, हिंदु पदपादशाही, कमला हा काव्यसंग्रह व काळे पाणी ही त्यांची ग्रंथसंपदा आहे. इ. स. १९३८ मध्ये मुंबई येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.


स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जगभर गाजलेली साहसी उडी:

       इंग्लंडमध्येच राहून इंग्रज सरकारवर दहशत निर्माण करण्याचे काम सावरकरांनी केले. पुढे त्यांचे अनेक सहकारी पकडले गेले. मदनलाल धिंग्राना फाशी झाली. कांहीना तुरुंगात डांबण्यात आले. त्यामुळे आपले इंग्लंडमध्ये राहणे हे धोकादायक आहे, असं समजून त्यांनी भारतात परतण्याचा निश्चय केला. पण भारतात परतण्याच्या तयारीत असतानाच इंग्लंड च्या व्हिक्टोरिया स्टेशनवर त्यांना पकडण्यात आले. राजद्रोह आणि इंग्रज अधिकाऱ्यांच्या हत्या करण्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली.


       सावरकरांवर खटला चालविण्यासाठी त्यांना 'मोरिया' जहाजावरुन भारतात नेण्याचे ठरले. त्यांना मोरिया जहाजावर चढविण्यात आले. जहाज काही दिवसाच्या प्रवासानंतर 'मार्सेलिज' या फ्रान्सच्या समुद्रकिनाऱ्याजवळील बंदराजवळ आले. सावरकर पहारेकऱ्याला म्हणाले, "मला शौचालयात जायचे आहे". पहारेकरी त्यांना शौचालयाकडे घेऊन गेले. सावरकरांनी आतून दरवाजा बंद केला आणि आतील हालचाली कळू नयेत म्हणून शौचालयाच्या काचेवर आपला ओवरकोट ठेवला आणि त्यांनी पोर्टहोलमधून स्वतःला बाहेर झोकून दिले. समुद्रात उडी घेतली. शरीरावर जागोजागी खरचटले होते, ओरखडे निघाले होते. त्यातून रक्त निघत होते, पण त्याची त्यांना पर्वा नव्हती. भारताचे स्वातंत्र्य आणि विकास हेच अंतिम ध्येय मानलेल्या सावरकरांच्या डोळ्यासमोर फक्त आपले ध्येय दिसत होते.


       बराच वेळ झाला तरी कैदी बाहेर येत नाही हे लक्षात येताच त्यांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. काही पहारेकरी जहाजावरच्या डेकवर धावत आले, पहातात तो काय! सावरकर समुद्रातून विजेच्या वेगाने मार्सेलीजकडे चालले होते. जहाजावर गोंधळ उडाला. 'कैदी पळाला...कैदी पळाला' असा गलका झाला. ताबडतोब समुद्रात पहारेकऱ्यांच्या उड्या पडल्या. तोपर्यंत सावरकर फ्रान्सच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहचले होते. आता या परक्या भूमीवर इंग्रजांची सत्ता नसल्यामुळे आपल्याला पकडण्यात येणार नाही असं त्यांना वाटत होतं, परंतु त्यांना पकडण्यात आलं आणि पुन्हा जबरदस्तीने मोरियावर चढविण्यात आले.


       सावरकरांची ही साहसी उडी त्रिखंडात गाजली. भारतात तर स्वातंत्र्यवीराचे नांव ज्याच्या-त्याच्या तोंडी आले. इंग्रज सरकारचे नाक चांगलेच कापले गेले. 


असे होते स्वातंत्र्यवीर सावरकर. भारताचे स्वातंत्र्य आणि भारताचा विकास हेच त्यांचे ध्येय होते, हाच त्यांचा श्वास होता.


स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पवित्र स्मृतीस आमचे शतशः प्रणाम।


मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

कीर्तनातून उपदेश देणारे संत गाडगेबाबा - विशेष लेख

 

२३फेब्रुवारी हा संत गाडगेबाबा यांचा जन्मदिवस त्यानिमित्त हा खास लेख..


कीर्तनातून उपदेश देणारे संत गाडगेबाबा - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       फुलपाखराला पहावे बागेत, सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे पाण्यात तसे गाडगेबाबांना पहावे कीर्तनात, हजारो माणसांच्या समुदायामध्ये बाबा एकदा उभे राहिले म्हणजे पावसाळ्यातील मेघाप्रमाणे ते आभाळभर गडगडू लागत. श्रोत्यांच्या डोक्यावर सदभावनेचा, सद्विचारांचा नि साहित्याचा असा कांही वळवाच्या पावसासारखा मारा सुरु होई की, त्या कीर्तन गंगेत हजारो श्रोते आपले देहभान विसरून अक्षरशः डुंबत रहात. कीर्तनासाठी बाबांना साहित्य लागत नसे. टाळ नाही, वीणा नाही, बाजाची पेटी नाही. मिळाली तर वाहवा, न मिळाली तरी वाहवा. रस्त्यावरचे दोन दगड वेचून ते वाजवायला लागत. श्रोत्यांच्या टाळ्या आणि घोष, हेच त्यांच्या कीर्तनाचे सारे भांडवल असे. गरिबांचा आणि दलितांचा उद्धार हाच त्यांच्या कीर्तनाचा विषय असे. ते सांगत, "मूर्तीची पूजा करू नका, देवापुढे पैसे, फुले ठेवू नका, तीर्थयात्रेला जाऊ नका, सत्यनारायण पुजू नका, पोथीपुराणातल्या चमत्कारावर विश्वास ठेवू नका, कुणाचा गुरूमंत्र वा उपदेश घेऊ नका, प्राण्यांची हत्या करू नका, दारू पिऊ नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, आपल्या मुलांना जास्तीत जास्त शिक्षण द्या. ही शिकवण, सतत पन्नास वर्षे हजारो कीर्तने घेवून बाबांनी दिली.


       गाडगेबाबा कीर्तनात सॉक्रेटिस तंत्राचा अवलंब करीत म्हणजे एकेक प्रश्न विचारीत व श्रोत्यांना आपल्या चुका कबूल करायला लावीत. उदाहरणार्थ "बासुंदी चांगली का बोंबील चांगलं?" लोक म्हणत, 'बासुंदी'. ते पुन्हा विचारीत, "श्रीखंड चांगलं का सागुती?" लोक सांगत, 'श्रीखंड'. मग बाबा त्यांच्यावर एकदम कडाडत, "तुम्ही कबूल करता श्रीखंड चांगल व घरी जाऊन बोंबील व सागुती खाता". श्रोते विचारात पडत व वर्तनात सुधारणा करत. बाबांचे कीर्तन श्रोत्यांच्या मनावर बिंबले जाई. त्यात अध्यात्म नव्हते, कर्मकांड नव्हता, पोथी नव्हती, पुराणे नव्हती, मूर्ती पूजाही नव्हती. आयुष्यात बाबा देवळात कधीच गेले नाहीत. हजारो वर्षे समाजाच्या आर्थिक सत्तेखाली आणि धार्मिक दबावाखाली भरडून निघाल्यामुळे दूधखुळ्या, देवभोळ्या, आंधळ्या, पांगळ्या, हीन-दीन समाजाच्या उद्धाराचा झगझगीत प्रकाशझोत म्हणजे 'गाडगेबाबा'. मार्क्स हा माणूस कोण होता हे गाडगेबाबांना ठाऊक नव्हते पण सतत पन्नास वर्षे आपल्या जीवनामधून मार्क्सवादी शिकवण त्यांनी जनतेला दिली. गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ होते. 


गाडगेबाबांच्या जीवनातील एक ह्रदयद्रावक प्रसंग:

       जीवनातील दुःखाचे हलाहल प्राशन करण्याचे आणि पचविण्याचे विलक्षण सामर्थ्य त्यांच्या अंगी होते. त्यांचा एकुलता एक पुत्र मुदगल उर्फ गोविंद ऐन तारुण्यात अकस्मात मरण पावला. त्यावेळी बाबा कोकणात एका गांवी कीर्तन करीत होते. पुत्राच्या अपघाती मृत्यूची तार घेऊन स्वतः पोस्टमास्तर त्यांच्याकडे गेले. त्यांचे कीर्तन रंगात आले होते, म्हणून त्यांना ती तार दाखविण्याची हिंमत होईना. अखेर त्यांनी तारेमधला मजकूर कसाबसा सांगितला. बाबा क्षणभरच थांबले आणि म्हणाले..

"ऐसे गेले कोट्यानुकोटी।

रडू काय तेथे एकासाठी?

बोला गोपळा गोपाळा

देवकीनंदन गोपाळा ..।


धन्य ते गाडगेबाबाआणि धन्य ते त्यांचे मनोधैर्य !


सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१

कुलकर्णी काकांच्या मिश्किल आठवणी - विशेष लेख.

 

कुलकर्णी काकांच्या मिश्किल आठवणी - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       आमच्या परसदारी शेवग्याचे झाड होते. आषाढ महिन्यात शेवग्याची पालेभाजी खावी असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे स्वातीकाकी आणि सासूबाईनी शेवग्याची भाजी काढून करायला सुरुवात केली. दोन-तीन वेळा सर्वांनी आवडीने भाजी खाल्ली. चौथ्यांदा शेवग्याची भाजी समोर येताच काका काकीना म्हणाले, "आम्हाला काय शेळ्या-मेंढ्या समजलात की काय, शेवग्याची भाजी ओरबडून काढता आणि आमच्या समोर ठेवता". सर्वांची हसून हसून पुरेवाट झाली.


       एकदा मी आजारी होते. औषधोपचार करूनही तब्येत बरी होत नव्हती म्हणून मी आमच्या साहेबांना म्हणाले, "माझं कांही खरं नाही. ही पासबुकं, विमा पॉलिसीज इथं एकत्र ठेवल्या आहेत, त्या तुमच्या ताब्यात घेऊन ठेवा." काकांनी दरवाज्याच्या पलीकडून माझे बोलणे ऐकले व मोठ्याने म्हणाले, "भाभी, शेजारी या नात्याने आमच्यासाठी पण कांहीतरी ठेवता की नाही? आत्ताच सांगून ठेवा." आजारी असतानाही मी मोठमोठ्याने हसू लागले.


       काका दर पौर्णिमेला न चुकता नरसोबाच्यावाडीला दत्तदर्शनाला जायचे येतांना प्रसाद म्हणून तिथले सुप्रसिद्ध पेढे आणायचे. आमच्या छोट्या मुलीला यास्मिनला ते पेढे फार आवडायचे. काका वाडीला गेलेत हे समजताच त्यांच्याकडे पेढे मागायची. एकदा मी तिला दटावत म्हटलं, "असं काही मागायचं नसतं, दिलं तरी नको म्हणायचं असतं." नंतर काकांनी तिला पेढा देतांना ती नको म्हणाली. ती त्यावेळी तीन वर्षांची होती. काका मला म्हणाले, "काय सांगून ठेवलयं भाभी?" मी म्हणाले, "कांही नाही." काका म्हणाले, "काही नाही म्हणू नका. तुम्ही ज्या शाळेत शिकलात ना त्या शाळेचा मी मुख्याध्यापक होतो. परत तिला असं सांगू नका प्रसाद लहान मुलांनी खायचा नाही तर कुणी खायचा." मी बिचारी गप्पच बसले.


       काकांच्या स्कूटरवरून एकदा कार्यक्रमासाठी निघाले होते. एक मोटरसायकलवाला राँग साईडने समोरच आला. प्रसंगावधानी काकांनी जोरात ब्रेक दाबला व त्याला म्हणाले, "घरी सांगून आलाय का?" भांबावलेला तो मनुष्य म्हणाला, "नाही हो, काय सांगून यायचं  असतं". काका म्हणाले, "भावा, वर जातो म्हणून सांगून यायचं आणि मग अशा प्रकारे गाडी चालवायची." तो खाली मान घालून सॉरी म्हणून निघून गेला.


       आमच्या साहेबांच्यासाठी एम्.8० गाडी खरेदी करायची होती. नेहमीप्रमाणे गाडी खरेदीला काका बरोबर होतेच. मी यांना सांगितलं होतं की गाडी लाल रंगाचीच आणा. त्यावेळी लाल रंगाची गाडी शोरूम मध्ये उपलब्ध नव्हती. काका यांना म्हणाले, "रंगाचं काय घेऊन बसलात, ग्रे कलरची घेऊन टाका आज मार्गशीर्ष गुरूवार आहे. मी सांगतो भाभीनां काय सांगायचं ते." गाडी घरी आली मी म्हटलं, "लाल रंगाची गाडी आणा म्हणून सांगितलं होतं ना?" काका म्हणाले, "हा कलरही सुंदर आहे भाभी. कांहीं दिवसांनी तुम्हाला हाच कलर आवडू लागेल. आता माझंच बघा ना, स्वाती लग्नाच्या वेळी मला अगदी मनापासून पसंत नव्हती पण पदरात पडली नि पवित्र झाली. आता स्वाती मला फारच आवडू लागलीय बघताय ना तुम्ही". यावर मी काय बोलणार?

       आज सव्वीस वर्षे झाली, गाडी फारच आवडते यांना. दुसऱ्या दोन-तीन गाड्या घेतल्या आहेत पण तिला विकले नाही. ती फारच लाडकी व आवडती गाडी आहे यांची.


       एखाद्याला सहकार्य करणे हा तर काकांचा स्थायीभाव. आमच्या साहेबांना सब-रजिस्टार पदावर प्रमोशन मिळाले. त्यांना कागल जि. कोल्हापूर येथे हजर व्हायचे होते. नेहमीप्रमाणे ते एस्. टी. महामंडळाच्या गाडीने जाणार होते. दुसऱ्या दिवशी काका जाण्याच्या वेळेपेक्षा आधीच तयार झाले. यांना म्हणाले, "साहेब, आवरा लवकर मी तुम्हाला सोडायला येणार आहे. मी रजा घेऊन आलो आहे." आम्हाला आश्चर्याचा गोड धक्काच बसला. काका म्हणाले, "माझ्या मित्राला एवढं मोठ्ठ प्रमोशन मिळालय तो एकटा कसा जाणार? आपली ओळख आपणच कशी करून देणार?" काका यांना घेऊन गेले. सर्वांना ओळख करून दिली व संध्याकाळी घेऊन आले व सासूबाईना म्हणाले, "दादीजी, तुम्हारे बेटेको ऐसे लेके गया और वापस लेके आया, पेटमें का पानी भी हिला नही होगा." 


       असे हे परोपकारी, शिस्तप्रिय, मनमिळाऊ, हजरजबाबी आणि प्रसंगावधानी काका. तुम्हाला विसरणे अगदीच कठीण!


गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

छत्रपती शिवाजी महाराज - विशेष मराठी लेख


छत्रपती शिवाजी महाराज - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र:

       शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. महाराजांपूर्वी सुमारे साडेतीनशे वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोन राजांनी आपसांत वाटून घेतला होता. त्यांचे अधिकारी ठिकठिकाणी कारभार पहात होते. हे राजे मनाने उदार नव्हते. ते प्रजेवर जुलूम करत होते. या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते. त्यांच्यात नेहमी लढाया होत. त्यात रयतेचे हाल होत. रयत सुखी नव्हती. उघड उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. रहायला सुरक्षित निवाराही नव्हता. सगळीकडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त वतनावर, जहागिरीवर. वतनासाठी ते एकमेकांशी भांडत, आपसांत लढत. त्यात रयतेचे खूप हाल होत. या सर्व गोष्टीमुळे रयत त्रासून गेली होती. सगळीकडे अंदाधुंदी माजली होती.


       शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापण्याचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. भांडखोर वतनदारांना त्यांनी आपल्या काबूत आणले. त्यांचा स्वराज्याच्या कामी उपयोग करून घेतला तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी त्यांनी झुंज दिली. जुलमी राजवटीचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जातीधर्माच्या लोकांचे होते. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू, मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधुसंतांचा त्यांनी सन्मान केला. त्यांना वर्षासने लावून दिली. अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते.


शिवरायांचे उदार धार्मिक धोरण:

       शिवरायांनी साधुसंतांचा आदर केला. शिवरायांची कुलदेवता भवानीदेवी. तिच्यावर शिवरायांची अपार भक्ती होती. त्यांना मंदिरे प्रिय होती. त्यांनी मशिदींचेही रक्षण केले. त्यांना गीता पूज्य होती. त्यांनी कुराणाचाही मान राखला. ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थना मंदिरानाही ते जपत. शिवराय विद्वानांचा आदर करत. परमानंद, गागाभट्ट, धुंडिराज, भूषण इत्यादि विद्वानांचा त्यांनी सत्कार केला तसेच रामदास, तुकाराम, बावा याकुत, मौनीबाबा इत्यादी संतांचा त्यांनी बहुमान केला. 'सज्जनांना राखावे, दुर्जनांना ठेचावे 'हा शिवरायांचा बाणा होता. तो त्यांनी हयातभर पाळला .


शिवरायांचा स्वदेशाभिमान:

       शिवराय एका जहागिरदाराचे पुत्र होते. धनदौलत त्यांना कमी नव्हती, पण लहानपणीच त्यांना गुलामगिरीचा वीट आला. आपल्या देशात आपले राज्य व्हावे, प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे वागता यावे, सर्वांना सुखासमाधानाने जगता यावे, मराठी भाषेला स्वधर्माला मान मिळावा यासाठी शिवरायांनी बलाढ्य शत्रूंशी झुंज देऊन स्वराज्य स्थापन केले. स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा यांच्या उत्कर्षासाठी ते आयुष्यभर झटत राहिले आणि अखेर यशस्वी झाले. शिवरायांना मायबोलीचा अभिमान होता. राज्यकारभारात मराठी शब्द वापरता यावेत यासाठी त्यांनी राजव्यवहारकोश करवला.


हिंदवी स्वराज्य स्थापना:

       हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते. हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, कोणत्याही जातीचे असोत, ते हिंदवी. त्यांचे राज्य ते हिंदवी स्वराज्य.


शत्रू बलाढ्य होते, पण शिवरायांनी हिम्मत सोडली नाही.

काळ कठीण होता, पण त्यांनी स्वाभिमान सोडला नाही.

बादशहाच्या बाजूने लाखो लोक होते, पण शिवरांयानी न्यायाची बाजू घेतली.

बलाढ्य परकीय सत्तेपुढे ते कधीच नमले नाहीत.


शिवरायांच शौर्य व धैर्य:

       शिवरायांनी वयाच्या अठराव्या वर्षी शंभू महादेवासमोर स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी रायगडावर त्यांनी आपला देह ठेवला. अवघ्या पस्तीस वर्षाचा हा काळ! या काळात शिवरायांनी आपल्या पराक्रमाच्या व मुत्सद्देगिरीच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले. स्वराज्यासाठी ते हयातभर लढत राहिले. अत्यंत कठीण प्रसंगी समशेर हाती घेऊन स्वतः लढाईत उतरले आणि विजय मिळविले. त्यांचे आयुष्य युद्ध प्रसंगानी भरलेले आहे. स्वराज्यावर अनेक संकटे आली, पण शिवरायांनी प्रसंग पाहून आणि दूरवरचा विचार करून त्यांना तोंड दिले. शिवराय पराक्रमी होते, तसेच थोर मुत्सद्दीही होते. शक्ती कमी पडली तेंव्हा त्यांनी युक्ती चालवली. अफजलखान म्हणजे तुफान ताकतीचा वीर, पण शिवरायांनी त्याची बेधडक भेट घेतली व त्याचा निकाल लावला. धो-धो पावसात व दाट काळोखात शिवराय सिद्दी जौहरच्या वेढ्यातून बाहेर पडले. रात्रीच्या अंधारात शायिस्तेखानावर छापा घालून त्यांनी त्याची खोड मोडली. आग्रा येथील औरंगजेबाच्या कैदेतून युक्तीने ते निसटले!त्यांच्यासारखा धाडसी आणि मुत्सद्दी सेनानायक सापडणे कठीण !


शिवरायांच्या सरदारांची स्वामिनिष्ठा:

       शिवराय स्वतः शूर योद्धे होते. त्यांनी आपल्या सरदारांनाही शूर बनविले. सरदारांची शिवरायांवर केवढी निष्ठा होती! शिवरायांना वाचविण्यासाठी पावनखिंडीत बाजीप्रभूने आनंदाने मरणाला मिठी मारली. फिरंगोजी नरसाळा याने चाकणचा किल्ला जिवावर उदार होऊन लढवला. तानाजीने मुलाचे लग्न टाकून कोंढाणा घेण्यासाठी प्राणार्पण केले. त्यांच्या सेवकांच्या स्वामिनिष्ठेची अशी कितीतरी उदाहरणे आहेत.


शिवरायांची सेवकांवरील माया:

       बाजीप्रभूंनी देशासाठी मरण पत्करले, शिवरायांनी त्याच्या मुलाचे संगोपन केले. तानाजीने देशासाठी आत्मबलिदान केले, शिवरायांनी स्वतः त्याच्या गावी जाऊन रायबाचे लग्न केले. रायबाला आपल्या मायेचे छत्र दिले. आग्र्याच्या कैदेत मदारी मेहतर याने आपला जीव धोक्यात घातला, शिवरायांनी त्याला शेवटपर्यंत अंतर दिले नाही. अशा किती गोष्टी सांगाव्यात! शिवराय राजे होते, पण आपल्या सेवकांची त्यांनी पित्याप्रमाणे काळजी घेतली.


शिवरायांनी चांगले ते केले:

       जुन्यातील वाईट टाकून देणे आणि चांगले निर्माण करणे हा शिवरायांच्या राज्यकारभाराचा विशेष गुण होता. देशमुख, देशपांडे व इनामदार यांना महसूल गोळा करण्याचा हक्क असे. ते शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त वसूल करत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे हाल होत. शिवरायांनी ही पद्धत बंद केली. त्यांनी शेतकऱ्यांना शेतसारा ठरवून दिला. त्यापेक्षा जास्त वसूल करणाऱ्या अधिकाऱ्याना कडक शिक्षा ठोठावल्या. वतनदारी पद्धती बंद करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला कारण ही पद्धत स्वराज्याला घातक आहे असे त्यांचे मत होते. सुभेदारापासून कमाविसदारापर्यंत सर्व अधिकाऱ्यांना रोख पगार देण्याची पद्धती त्यांनी सुरू केली. 


शिवरायांचे आठवावे रूप:

काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढायची;

संकटे आली असता डगमगून न जाता त्यांवर मात करून पुढे जायचे;

बलाढ्य शत्रूंशी आपल्या तुटपुंज्या बळाने झुंज देत आपले सामर्थ्य वाढवतजायचे;

सहकाऱ्याना उत्साह देत व शत्रूंना सता चुकवत यश मिळवायचे हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते. 

आदर्श पुत्र, सावध नेता, हिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सज्जनांचा कैवारी असे शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. हे सारे पाहिले की, पुन्हा पुन्हा वाटते.....


शिवरायांचे आठवावे रुप ।

शिवरायांचा आठवावा प्रताप।।

शिवरायांना कोटी मानाचे मुजरे ।।

(आधारित)


मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०२१

वासुदेव बळवंत फडके - विशेष मराठी लेख


१७ फेब्रुवारी हा वासुदेव बळवंत फडके यांचा पुण्यदिन त्यानिमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारा विशेष लेख....

वासुदेव बळवंत फडके - विशेष मराठी लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी




फोटो साभार: sharechat


       वासुदेव बळवंत फडके हे एकेकाळी ब्रिटिशांचे विश्वासू नोकर होते. पुण्यातील लष्कराच्या लेखा विभागात त्यांनी लेखनिक म्हणून ब्रिटिशांची वाहवा मिळविली होती. चांगले तीस रुपये वेतन त्यांना मिळत होते. त्या काळात तीस रूपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती. त्या रकमेतून सुखासमाधानाचे दिवस जात होते आणि अचानक स्वाभिमान जागृत होण्याची गोष्ट घडली.


       १८७० सालची गोष्ट. वासुदेव बळवंत फडके यांच्या आईची तब्येत बिघडली. कर्जत-शिरढोणला जायचे म्हणजे रजा घ्यावी लागणार होती. दुसऱ्या बाजूला त्यांना वाटलं, आईचं दुखणं नेहमीसारखंच असेल. चार दिवस औषधपाणी केल्यानंतर होईल बरी. रजा न घेणचं बरं पण त्यांचा अंदाज चुकला. दहा दिवसांनी निरोप आला, तातडीने शिरढोणला या. आई खूप आजारी आहे. फडके यांना शिरढोणचे वेध लागले. अर्थात त्याआधी बॉसची परवानगी घेणं आवश्यक होतं. त्यांनी रजेचा अर्ज केला. आपलं काम लक्षात घेऊन रजा पटकन मंजूर होईल, अशी त्यांची समजूत होती, पण ती गैरसमजूत ठरली. या टेबलवरुन त्या टेबलवर त्यांचा अर्ज जात होता. त्यात काहीं दिवस उलटले. फडके चिडले. अखेर वरिष्ठांनी त्यांना रजा नाकारल्याचे कळवले. त्यांना खूप दुःख झाले, पण त्याहूनही अधिक त्यांचा स्वाभिमान दुखावला होता. 'आई गंभीर असताना मला रजा मिळणार नसेल तर ही नोकरी करुच कशाला?' असे म्हणून त्यांनी वरिष्ठांना चिठ्ठी लिहिली, मी आजारी आईला भेटायला शिरढोणला जात आहे, याची नोंद घ्यावी. ते तडक शिरढोणला निघाले. पण पोहचेपर्यंत खूप वेळ निघून गेला होता. त्यांची आई जग सोडून निघून गेली होती. फडके तेथेच कोसळले. आपल्या आईची शेवटची भेटही आपण घेऊ शकलो नाही, हे दुःख त्यांना अनावर झाले होते. त्यामागे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्यावर केलेला अन्याय कारणीभूत आहे, याची जाणीव त्यांना झाली. दुसऱ्या दिवशी ते तडक पुण्याला आले आणि सरळ ऑफिसात घुसले. बॉसच्या समोर उभे राहून त्यांनी 'रजा का नाकारली?, तुम्ही इथे आम्हा भारतीयांचा छळ करायला आला आहात का?', असा थेट सवाल त्यांनी केला. बॉस हुशार होता. तो गप्प राहून भडकलेल्या वासुदेवांचं बोलणं ऐकत राहिला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी बॉसची तक्रार वरच्या ऑफिसात केली. त्या तक्रारीची चौकशी झाली. तेंव्हा त्यांच्यावर अन्याय झाल्याचे स्पष्ट झाले होते. पण बॉसवर कोणतीच कारवाई झाली नव्हती.

       

       १८७१ मध्ये आईच्या श्राद्धाचा दिवस होता. त्यासाठी त्यांनी पुन्हा रजा मागितली. पण पुन्हा रजा फेटाळली गेली. ते भयंकर संतापले. आधीच देशात गुलामगिरी आणि त्यात ब्रिटिशांची ही नोकरी म्हणजे गुलामगिरीचं भयंकर रूप. त्यांनी ठरवलं सूड घ्यायचा. ब्रिटीश बॉसचा नव्हे तर बॉसगिरी मिरवणाऱ्या सर्व ब्रिटिशांचा सूड घ्यायचा. एका प्रखर क्रांतीची ज्योत तेंव्हा पेटली होती. ज्यांच्याकडे स्वाभिमान असतो, त्यांच्याच मनात ही ज्योत पेटते हेच खरे.


क्रांतीची पहिली बीजे:

२३ फेब्रुवारी १८७९ हा वासुदेव बळवंत फडके यांच्या क्रांतीसेनेच्या कारवाईचा पहिला दिवस. धामारी गावातील श्रीमंतावर ते छापा टाकणार होते. पुणे सोडून लोणी गाव आणि तेथून धामारी अशी दरमजल करण्याचे त्यांनी ठरवले. प्रवासात पुढे काय होईल, त्यावेळी काय करायचे, हेच विचारचक्र फडके यांच्या डोक्यात फिरत होते. या कारवाईनंतर पोलिसांचा ससेमिरा आपल्यापाठी लागणार हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. तेंव्हा भूमीगत व्हायचे आणि त्यासाठी काय करायचे, याचाही आराखडा त्यांनी पक्का केला होता. लोणीतील हनुमान मंदिरात त्यांनी रात्र काढली आणि सर्व सैनिकांनी जवळच्याच चिंचुशीच्या गुहेत जमायचे ठरले. तेथे लोणी गावचे वतनदार पाटील शिंदे यांनी आणि त्यांच्या मुलीने या सैनिकांच्या जेवणाची व्यवस्था केली. अर्थात पाटील शिंदे यांना क्रांतीसेनेचा उदात्त विचार माहित होता म्हणूनच त्यांनी सहकार्याचा हात पुढे केला होता. हे सर्व आटोपून सैनिकांनी अखेर २३ फेब्रुवारीला सायंकाळी धामारी गाठलं. सैनिक शिस्तबद्ध चालत होते. कांहीच्या हातात बंदुका, कांहीकडे तलवारी, भाले, काठ्या व गोफणी होत्या पण त्यांची शिस्त पाहता ते एक प्रशिक्षित सैन्यच वाटत होते.


       गावच्या वेशीवर आल्यानंतर सैनिकांनी रणशिंग आणि शंख फुंकले. 'शिवाजी महाराज की जय, वासुदेव महाराज की जय' असे जयघोष सुरु झाले. कांहीनी बंदुकीचे बारही उडवले. तेथे पहारा देणाऱ्या रामोशाला सैनिकांनी ताब्यात घेऊन त्याला गावातल्या शेठ सावकारांची घरे दाखवण्याची सूचना फडके यांनी केली. रावजी रामोशी घाबरला. तत्काळ हातापाया पडत त्यांने सैनिकांना सावकाराच्या घराच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली. त्यावेळीही सैनिकांच्या तोंडात 'शिवाजी महाराज की जय' चा घोष सुरु होताच. हे ऐकतांना लोकांना प्रश्न पडला तो म्हणजे दरोडेखोरांच्या तोंडात शिवाजी महाराजांचे नाव कसे? अर्थात त्यांना माहीतच नव्हते की ही क्रांतिसेना आहे देशकार्याला वाहून घेतलेली. किलाचंद या सावकाराच्या घराला सर्व सैनिकांनी घेराव घातला आणि त्याच्या घरातील पैसाआडका घेऊन त्यांनी दुसऱ्या सावकाराकडे मोर्चा वळवला. त्यांना कोठेही मज्जाव झाला नाही. रामोशाचा तो संघटित 'अवतार' प्रत्येकाला अपरिचित होता .

   

       सर्व पैसाआडका फडके यांच्यासमोर ठेवण्यात आला. तेवढ्यात खुणेची शीळ वाजली. श्रीमंताची घरे दाखवल्यानंतर रावजी रामोशीने पोलीस ठाणे गाठले होते. तेथून पोलिसांना घेऊन तो धामारीकडे येत होता. फडके यांनी लगेच चिंचुशीच्या जंगलाकडे कूच केली. त्यापूर्वी टेकडीवरच बेसावध ब्रिटीश सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी त्यांनी आपले सैनिक लपवले. व्हायचे तेच झाले. ब्रिटिश पोलिस अचानक झालेल्या हल्ल्याने बिथरले आणि तेथून पळाले. ब्रिटिशांना खऱ्या अर्थाने दिलेला हा पहिला पराभव होता. तीच त्यांच्या क्रांतीची पहिली बीजे होती. तदनंतर जमा झालेल्या पैशापैकी त्यांनी रामोशाना वेतन दिले आणि उरलेले पैसे पुण्याहून काडतुसं आणि बंदुकी आणण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्याजवळ दिले .

  

       असे होते महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. त्यांना अगदी मनापासून सॅल्यूट ।


सोमवार, १५ फेब्रुवारी, २०२१

संत तुकाराम महाराज - विशेष मराठी लेख


संत तुकाराम महाराज यांचा १६ फेब्रुवारी हा जन्मदिन त्यानिमित्ताने विशेष लेख....


संत तुकाराम महाराज - विशेष मराठी लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे होते. त्यांच्या घरी शेतीभाती होती. किराणा मालाचे दुकान होते, परंतु तुकाराम संसारात फार काळ रमले नाहीत. जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत. आषाढी-कार्तिकीला पंढरीला जात. कीर्तन करत, अभंग रचत, ते लोकांना म्हणून दाखवत. हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत. तुकाराम महाराज त्यांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण देत, समतेचा उपदेश करत.

"जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले

तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा "

हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. लोकांच्या मनात विचार जागे केले. लोक संत तुकाराम महाराजांचा जयजयकार करू लागले. आजही महाराष्ट्र भर आपल्याला 'ग्यानबा-तुकाराम' हा जयघोष ऐकू येतो.


आधी प्रपंच करा नेटका...

       संत परंपरेने मायावादाला नकार दिला आहे. मायावादाच्या प्रभावातून समाजाला मुक्त करण्याचे महत्वपूर्ण कार्य संतांनी केले आहे. संत तुकाराम महाराजांच्यासह सर्व संतांनी संन्यासाकडून संसाराकडे जाण्याचा मार्ग सामान्य माणसांना दाखविला. 'ब्रम्हज्ञानातून प्राप्त होणाऱ्या जीवनमुक्त अवस्थेपेक्षाही  भक्तीची जोड देऊन केलेल्या संसारातील आनंद श्रेष्ठ आहे अशी वारकरी संतांची धारणा आहे.

घोटविन लाळ ब्रम्हज्ञान्या हाती ।

मुक्ता आत्मस्थिती सोडविन ।

या अभंगात तुकोबारायांनी ब्रम्हज्ञान्याला जीवनमुक्त अवस्था सोडून लाळ घोटायला लावीन असा दावा केला आहे तो यामुळेच. मायाब्रम्हाची शुष्क चर्चा करून पांडित्य मिळविणाऱ्या तथाकथित ब्रम्हज्ञान्यांचा तुकोबारायांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

मायाब्रम्ह ऐसे म्हणती धर्मठक ।

आपणासरिसे लोक नागविले ।।

अशा शब्दांत तुकोबांनी त्यातला फोलपणा उघडा पाडला आहे.

संतांंनी जगाला मिथ्या मानलं नाही, उलट परमात्मा जगत् रूपाने नटलेला असल्यामुळे जग हे परमात्म्याचे रूप आहे अशी संतांची धारणा आहे. जगत् रुपाने नटलेल्या या विश्वात्मक पांडुरंगाची सेवा करण्याचा मार्ग म्हणजे भक्तीची जोड असलेला संसार करणं. त्यामुळे संताना संसाराची भिती वाटत नाही.


मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा ।

आम्हा विष्णू दासा सुलभ तो।।

या अभंगात तुकोबारायांनी ऋषी मुनी गर्भवासाला घाबरून मुक्त झाले असले तरी, आम्ही वारकरी मात्र गर्भवासाला घाबरत नाही असं स्पष्ट केलंय. संसार म्हणजे केवळ दुःखाची अखंड मालिका समजून त्यापासून पळ काढणं संताना मंजूर नाही. उलट उत्तम व्यवहाराने धन जोडून केलेला नीतिमय संसारच वैराग्याच्या परमपदावर नेऊन पोहोचवतो असा तुकोबारायांना विश्वास वाटतो म्हणून ते म्हणतात

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे।

उदास विचारे वेच करी ।

तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ ।

परमपद बळ वैराग्याचे ।।


मायावा जगाला माथ्या मानून परलोकातल्या मोक्षाचे वेध लावतो. तुकोबांना मात्र इहलोतला भक्तीचा आनंद मोक्षसुखापेक्षा अधिक महत्त्वाचा वाटतो. 'मोक्षफदा हाणोलाथा' असं म्हणत तुकोबाराया मोक्षाला लाथाडतात.


       संतांनी मायावाद नाकारल्यामुळे केवळ तत्वज्ञानाच्या पातळीवरच उलथापालथ झाली तर महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनातही उलथापालथ झाली. महाराष्ट्राचा प्रवास संन्यासाकडून संसाराकडे, परलोकाकडून इहवादाकडे, ब्रम्हज्ञानाकडून विठ्ठलभक्तीकडे झाला, तो मायावाद नाकारल्यामुळेच झाला असे म्हणावे लागेल.


तुकोबारायांचे तत्वज्ञान - एक उदाहरण..

       एकदा पंढरपूरच्या यात्रेला जाण्यासाठी तुकाराम महाराजांचे मित्र त्यांना आग्रह करू लागले पण त्यांना जाता आले नाही पण त्यांंनी एक भोपळा त्यांच्या जवळ दिला व सांगितले की हा भोपळा विठ्ठलाच्या पायावर घाला व येताना परत आणा. मित्रांनी तसे केले व येताना तुकोबांच्याकडे त्यांनी तो भोपळा परत दिला. त्यांनी मित्रांना जेवण करून जाण्याचा आग्रह केला व आपल्या पत्नीला, आवडाला त्या भोपळ्याची भाजी करण्यास सांगितले. जेवतांना सर्वांच्या लक्षात आले की भाजी कडवट झाली आहे. तुकोबाराय म्हणाले, "बघा विठ्ठलाच्या पायावर घालूनही हा गोड झाला नाही. श्रद्धा ह्रदयात असावी. श्रद्धेविना पायावर डोके ठेवून काय उपयोग?"


असे होते तुकाराम महाराज। अशा या महान संताला मनःपूर्वक वंदन ।


बुधवार, १० फेब्रुवारी, २०२१

१४ फेब्रुवारी: व्हॅलेंटाईन्स डे - विशेष लेख


१४ फेब्रुवारी: व्हॅलेंटाईन्स डे - विशेष लेख

लेखिका - डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


व्हॅलेंटाईन्स डे!
सख्याचा दिवस!
सौख्याचा दिवस!
प्रेमाची नशा ओतण्याचा दिवस!
या हृदयीचे त्या हृदयी घालण्याचा दिवस!

प्रेम म्हणजे काय असतं ?

"मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं,
सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं ।
काय म्हणालात? यात वेगळं काय घडलं?
हे त्यालाच कळेल ज्याचं असं मन जडलं"

असं मंगेश पाडगावकर म्हणतात ते अगदी खरं आहे.

       माणसाला ईश्वराकडून अगणित गुणांचं वरदान मिळालं आहे. त्यापैकी एक म्हणजे त्याचं हळवं मन. या हळव्या मनाच्या सरोवरात उठणारे हळुवार तरंग हीच प्रेमाची व्याख्या, जी व्यक्तीपरत्वे आणि परिस्थिती नुसार बदलत जाते. प्रेम या केवळ अडीच अक्षरी शब्दामध्ये प्रीतिचा फुलोरा फुलला जातो. मनातल्या भावना पानापानावर ओसंडाव्यात, एवढा हा तरल शब्द! प्रेम हा शब्द उच्चारताच ओठांच्या लालचुटूक पाकळ्या उमलतात आणि स्मितहास्य गालावर झळकू लागतं, जणू आवडता मोहक स्पर्श व्हावा आणि मन आनंदानं बेभान व्हावं! प्रेम मैत्रीतलं असो, नात्यातलं असो अथवा आईचं मुलावरचं असो, प्रत्येक क्षणी प्रेमाच्या फक्त भाषा बदलतील मात्र प्रेमातून पाझरणारा हा प्रीतरस भावनेच्या अत्युच्च टोकास जाऊन बसतो. त्यात दिसते ती निःस्वार्थ निरागस आणि निस्सीम माया. त्यासाठी ठराविक दिवसाची, ठराविक वेळेची गरज नाही.

       प्रेमात आणि युद्धात सारे अपराध क्षम्य असतात असे कुणी म्हटले आहे पण हे म्हणताना प्रेमाबरोबर युद्धाची निवड का बरे केली असेल? कारण दोन्ही गोष्टीत धाडसाची गरज असते. प्रेमभावना व्यक्त करतांना नकार पचविण्याची आणि युद्धभूमीवर मरणाला सामोरं जाण्याची तयारी असावी लागते.

       रामाला न पाहताही, रामावर प्रेम करणारी, हेच ते चरण अनंताचे असे म्हणणारी, रामहृदयावर प्रेम करणारी वैदेही जानकी किती भाग्यवान होती नाही!

One unlucky man says
Love is
L - Lake of tears
O - Ocean of Sarrow
V - Valley of death
E - End of life

पण या बाबतीत प्रत्येकाचा अनुभव वेगळा असावा.

व्हॅलेंटाईन्स डे ची पार्श्वभूमी:
  इंग्रजी भाषेतील कांही ज्ञानकोशात व्हॅलेंटाईन नावाचा एक संत होता असे म्हटले आहे. संत व्हॅलेंटाईन हा रोमचा प्रिस्ट होता तर दुसरा व्हॅलेंटाईन लेर्नी प्रांताचा बिशप होता. त्याचा १४ फेब्रुवारी हा मृत्यूदिन आहे.

प्रेमाच्या राज्यात एडवर्ड याचे नांव प्रेमिक प्रातःसमयी घेतात. वाँलिस सिमसन हिने प्रेम मिळविण्याची किमया कशी केली ते पहा......

       राजा एडवर्ड इंग्लंडच्या मुकूटाचा वारस होता. त्याला लग्नाचा आग्रह होत होता. त्याच्या पायाशी युरोपमधील राजकीय पुढाऱ्यांंनी देशोदेशीच्या बहुश्रुता रूपसुंदरी आणून उभ्या केल्या परंतु राजमुकुटाचा लोभ त्याला आपल्या प्रेमापेक्षा जास्त महत्वाचा वाटला.

       सातत्य आणि पाठपुरावा या दोन गुणांच्या जोरावर वाँलिस सिमसन ने एडवर्डचे प्रेम संपादन केले. त्यासाठी जगातील एक राज्य तिने हादरवून टाकले. सर्वसाधारणपणे ज्याला प्रौढ वय म्हणतात त्या वयात तिने राजा एडवर्ड चे प्रेम मिळविले. राजा एडवर्ड ने आपल्याला हव्या असलेल्या स्त्रीसाठी राजत्याग केला. सुमारे चाळीस वर्षे राजमुकूटामुळे त्याला मुक्त जीवन जगता आले नव्हते. त्याने जाहीरपणे प्रीतिचा निर्णय घेतला. वस्तुतः त्याला राजमुकूट आणि वाँलिस सिमसनचे छुपे प्रेम त्याला मिळविता आले असते. पण त्याने तसे न करता प्रेमत्रुप्तीचा मार्ग धरला.

व्हॅलेंटाईन्स डे: अस्सल स्वदेशी अपभ्रंश
       कांही वेदशास्त्रसंपन्न महाभारतकालीन इतिहासावर अध्ययन करणारे पंडीत म्हणतात, विलातिना हे रूक्मिणीचे पाळण्यातील नांव. रूक्मिणीने घरात कुणाला कळू नये म्हणून कृष्णाला लिहिलेल्या पत्रावर सदैव तुझीच, विलातिना असे लिहिले होते. तिला घरात रूक्मिणी या नावाने ओळखत असत. त्यामुळे पत्र कुणाला सापडले तरी रूक्मिणीचा कुणालाही संशय नव्हता. श्रीकृष्णाने विलातिना म्हणजेच रूक्मिणी हे तात्काळ ओळखून रथ तिच्या घरापाशी नेला. आपण तिला हाक मारत आहोत हे कुणाला कळू नये म्हणून कृष्णाने कोड लँग्वेज वापरून तिला पाचारण केले. त्यामुळे व्हॅलेंटाईन हा कुणा पाश्चिमात्याने केलेला अपभ्रंश नसून तो अस्सल स्वदेशी अपभ्रंश आहे असे संशोधकांनी सिद्ध केल्याचे समजते.

सध्यःस्थिती:
       आजच्या भावनाहीन जगात शून्य मनानं जगणाऱ्या माणसांना भररस्त्यात तरुणीवरचा बलात्कार किंवा हल्ला हा चेष्टेचा विषय असतो. कुणाच्याही अंगात क्रोधाचं रक्त सळसळत नाही. आज सगळीकडे जाणिवेची कमतरता दिसत आहे, तिथे प्रेमातला गोडवा काय कळणार? पावला-पावलावर डोकं सुन्न करणाऱ्या घटना आढळतात त्या सर्व आपण टाळू शकत नाही हे खरे पण त्या कमी करण्याचा प्रयत्न जरूर करू शकतो हे निश्चित!

माझ्या सर्व रसिक वाचक बंधू भगिनींना व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा ।