कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

खरी मैत्री - मराठी कथा



खरी मैत्री - कथा

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी
             
            

फोटो साभार: गूगल


       जया व उषा अगदी पहिली पासूनच्या मैत्रिणी. दोघींची घरे एकमेकींच्या जवळ नव्हती पण दोघींची मने फारच जवळ होती. दोघींनाही एकमेकीशिवाय अजिबात करमायचे नाही. एकीने कांही अपरिहार्य कारणास्तव शाळा चुकवायचं ठरवलं की, दुसरीही त्या दिवशी शाळा चुकवायची. त्या दोघींना मैत्रिणींनी जोडगोळी हे टोपणनांव ठेवले होते. हायस्कूलमध्ये या दोघींसाठी रेकॉर्ड फिश पाँड़ ठरलेला होता' यें दोस्ती हम नही तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे'.

       उषाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. शिवाय ही पाच भावंडं. उषाला दोन भाऊ व दोन बहिणी होत्या. तिचे वडील शेतकरी होते. याउलट जयाची परिस्थिती होती. जयाचे वडील शिक्षक होते. त्यांचे कुटुंबही छोटे होते. जयाला एक भाऊ होता. तिचे वडील अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यायचे. जया उषाला अभ्यासात मदत करायची.

       दोघींनी अकरावीची म्हणजेच मॅट्रिकची परीक्षा दिली. दोघीनी एकत्रच कॉलेजला जायचे ठरविले. पण दैवाचे फासे कसे पडतील सांगता येत नाही. उषाला एक स्थळ चालून आलं. मुलाला चार-पाच एकर बागायत शेती होती. तो एकुलता एक होता. उषाच्या वडिलांनी विचार केला आपल्याला तीन मुली आहेत पाठोपाठ. त्यामुळे असं सोन्यासारखं चालून आलेले स्थळ नाकारण बरं नाही. एका मुलीच्या कर्तव्यातून मुक्त होण्याची नामी संधी आहे. ती कशाला सोडून द्यायची? त्यांनी उषाचं लग्न करून टाकलं, उषा चारचौघीसारखी संसारात रमून गेली. पतीला मदत करू लागली.

       इकडे जया बी. कॉम् झाली. बँकेत नोकरी करणाऱ्या उत्तमरावांशी ती विवाहबद्ध झाली. उत्तमरावांची नोकरी नॅशनल बँकेत असल्याने तिला बदली होईल तिकडे स्थायिक होणे भाग पडले. सुरुवातीच्या काळात सणावाराच्या, यात्रेच्या निमित्ताने माहेरी आल्यावर दोघींची भेट व्हायची. छान गप्पा रंगायच्या, सुखदुःखाची बोलणी व्हायची. कालांतराने दोघींचेही माहेरी येणे जाणे कमी झाले. दोघीही आपापल्या संसारात रंगून गेल्या. त्यामुळे मैत्रीत कांही काळ अंतर पडले. उषाला दोन मुले. दोघेही ग्रॅज्युएट झाले. एक मुलगा गावातील पतसंस्थेत नोकरी करु लागला. दुसरा मुलगा बी एस्.सी. ॲग्री झाला. त्याला शेतीची आवड असल्याने स्वखुषीने तो वडिलांना शेतीत मदत करू लागला. शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न दुपटीने घेवू लागला. दोन्ही सुना सुस्वभावी मिळाल्या. उषाचा संसार दृष्ट लागण्या सारखा झाला.

       जयाला एक मुलगा व एक मुलगी. दोघेही खूप हुशार होते. मुलगा इंजिनिअर झाला. कंपनीत भरपूर पगाराची नोकरी लागली. कंपनी तर्फे अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली, थोड्या कालावधीसाठी गेलेला तो तिथेच रमला. आईवडिलांना न कळवता तिथल्याच मुलीशी विवाहबध्द झाला. त्यांची लेकही इंजिनिअर झाली. जया उत्तमरावांनी तिचा विवाह करून दिला. जावई अमेरिकेत जॉब करत असल्याने तीही पतीबरोबर अमेरिकेला निघून गेली. तिथेच नोकरी करू लागली. अशाप्रकारे दोन पिलं घरट्याबाहेर निघून गेली.

       योगायोगाने उत्तमरावांची बदली उषाच्या गावात झाली. भाजी मंडईत दोघी अचानकपणे एकमेकींसमोर आल्या, आणि त्यांची बालपणीची मैत्री बहरून आली. दोघी वेळात वेळ काढून एकमेकींकडे जायच्या. उषाच्या कुटुंबातील छोट्या मोठ्या कार्यक्रमात जया व उत्तमराव सहभागी होऊ लागले. सुट्टीच्या दिवशी शेतात सहभोजन होऊ लागले. घरोबा इतका वाढला की उषाची मुलं-सुना-नातवंडं यांना ही दोघं घरचीच वाटू लागली. या दोघांनाही आपली मुलं आपल्याजवळ नाहीत याचा विसर पडला. दिवस सुखासमाधानात चालले होते.

       दैव जाणिले कुणी? म्हणतात ते अगदी खरे आहे. एके दिवशी बँकेतून परत येत असताना उत्तमरावांच्या स्कूटरला एका ट्रकने ठोकरले, त्यातच त्यांचा अंत झाला. उषाच्या संपूर्ण कुटूंबाने जयाला मानसिक आधार दिला. तिच्या सासर माहेरच्या नातेवाईकांना बोलावून त्यांनीच अंत्यविधी पार पाडला. निवृत्ती जवळ आल्याने उत्तमरावांनी त्याच गावात एक बंगला घेतला होता. पण त्या बंगल्यात जया घायाळ पक्षिणीप्रमाणे राहू  लागली. वडिलांच्या अंत्यविधीला डिलेव्हरी झाल्याने मुलगी येऊ शकली नाही. मुलगा पाच दिवसानंतर आला. आईला अमेरिकेला येणार का असं विचारून तिनं कशाला म्हटल्याबरोबर आपलं कर्तव्य संपल असं समजून निघून गेला. पती निधनानंतर जया मनानं खूप खचली. उषासमोर आनंदी असल्याचं नाटक करायची पण एकांतात खूप रडायची. रात्र तिला खायला उठायची. या प्रचंड मानसिक तणावामुळे व्हायचे तेच झाले. एके दिवशी झोपेतच तिला पॅरालेसिसचा अटॅक आला. शेजाऱ्यांनी उषाला फोन केला. उषाचे कुटुंब धावून आले. तिला दवाखान्यात नेले. उपचार सुरु केले. तिच्या मुलांना फोन केला. पण रजा नसल्याचे सांगून दोघेही आले नाहीत. उत्तमराव एकुलते एक असल्याने सासरचे कोणीच इकडे येऊन तिची सेवा करण्यासारखे नव्हते. जयाचा भाऊही मुंबईत नोकरीला होता. भावजयही नोकरी करणारी त्यामुळे तो दवाखान्यात आला व पाहुण्यासारखा बघून निघून गेला. जयाच्या तब्येतीत किंचीत सुधारणा होऊ लागली.

       पण ती बोलू शकत नव्हती. तिला उठवून बसवावे   लागायचे. भिंतीला तक्क्या लावून त्याच्या आधाराने थोडा वेळ बसू लागली. तिला घास भरवावा लागायचा, तिचे केस विंचरावे लागायचे. कपडे बदलावे लागायचे. उषा पाठच्या बहिणी प्रमाणे अगदी मनापासून तिची सेवा करत होती. जयाला बोलता येत नव्हते पण सर्व काही समजत होते. तिचे डोळे खूप बोलके होते. ती डोळ्यानेच उषाचे आभार मानायची. आपल्या हलणाऱ्या एका हाताने तिच्या तोंडावरून हात फिरवायची.

       तब्बल पंधरा दिवसांनी मुलाला रजा मिळाली तो हॉस्पिटलमध्ये आला. त्याला पाहून जयाच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. आईची ही अवस्था बघून पुढं काय करायचं या विचाराने तो पुरता गोंधळून गेला. उषानं त्याला सांगितलं की चार-पाच दिवसांनी तिला डिसचार्ज मिळणार आहे. जयाचे चिरंजीव तिचा हात हातात घेऊन उषाला म्हणाले, "उषाअंटी आईला अशा अवस्थेत अमेरिकेला नेणे शक्य नाही. मी तिची शहरातील कुठल्यातरी चांगल्या वृद्धाश्रमात ठेवण्याची व्यवस्था करून जातो. अधेमधे तुम्ही तिकडे जाऊन लक्ष द्या. मी ही फोनवर चौकशी करत जाईन "उषा म्हणाली, " जयाची ही मैत्रिण जिवंत असतांना तिला बेवारसाप्रमाणे वृध्दाश्रमात जाऊ देणार नाही " चिरंजीव आनंदाने म्हणाले, "हे ठिक होईल आंटी! मी दरमहा सांभाळण्याचे पैसे पाठवत जाईन. तुमचा खातेनंबर द्या. महिन्याला खात्यावर पैसे जमा होतील" उषा म्हणाली, "तुझ्याकडून पैसे घेऊन माझ्या जिवाभावाच्या बालमैत्रिणीची सेवा करायला आम्हाला कांही भीक नाही लागली. देवानं खूप दिलंय आम्हाला. पती, मुलं, सुना, नातवंडांनी घर भरलंय माझं त्यात माझी मैत्रिण मला जड नाही. सगळी मदत करतात मला. सुना तिला खाऊ घालतात. मुलं बाहुलीप्रमाणे उचलून आंघोळीला नेतात आणतात. तू निर्धास्तपणे जा. मी बघते माझ्या मैत्रिणीचं!"

       उषाने जयाची कुटुंबियांच्या मदतीने मनोभावे सेवा केली. तिला फुलाप्रमाणे जपलं. स्वच्छ ठेवलं. जया हे सर्व डोळे भरून पहायची. खाणाखुणा करून देव तुमचं भलं करो अशी प्रार्थना करायची. आणि मैत्रिण असावी तर तुझ्यासारखी असं इशाऱ्यानं बोलायची. अशा अवस्थेत दोन वर्षे कशी निघून गेली ते कळलेच नाही. एके दिवशी झोपेतच जयाने जगाचा निरोप घातला. उषाला थँक्यू म्हणून ती निघून गेली!


शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

चूक कुणाची, शिक्षा कुणाला? - मराठी कथा


चूक कुणाची, शिक्षा कुणाला? - मराठी कथा

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       कॉलेजचा जिमखाना हॉल कॉलेज युवक युवतींनी खचाखच भरला होता. आज गॅदरिंगमधील सर्वांना आवडणारा विविध गुणदर्शन म्हणजेच सांस्कृतिक कार्यक्रमाचा दिवस होता. कार्यक्रम सुरु झाला आणि टाळ्या शिट्ट्याना पूर आला. ओरडण्याचे खास सूरही पुरात मिसळू लागले. त्यामुळे आवाजाच्या महापुराने हॉल दुमदुमून गेला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बी. ए. भाग ३ ची विद्यार्थिनी पूनम व प्रकाश करत होते. खरं तर कार्यक्रयापेक्षाही सूत्रसंचलनातील भावपूर्ण निवेदन, विनोदी किस्से कार्यक्रमात रंगत आणत होते. कार्यक्रम उंचीवर पोहचलेला असतानाच पूनम आणि प्रकाश यांनी एक द्वंद्वगीत सादर केले 'वादा कर ले साजना, तेरे बिना मै न रहूँ, मेरे बिना तू न रहे, ना होंगे जुदा, ये वादा रहा।' या गीताने तर कमालच केली. हॉलमधील सर्वांनी स्टँडिंग रिस्पाँन्स दिला. टाळ्यांचा कडकडाट झाला. शेवटी त्या दोघानांच आपल्या खास शैलीत प्रेक्षकांना शांत करावे लागले. तेंव्हा कुठे पुढचा कार्यक्रम सुरु झाला.

       प्रकाश एक हुशार, विनयशील व समंजस विद्यार्थी म्हणून कॉलेजमध्ये नावाजलेला विद्यार्थी होता. तो अभ्यासात तर हुशार होताच, शिवाय वक्तृत्व, चित्रकला, गायन, लेखन व क्रीडा या सर्व क्षेत्रांत चमकणारा तारा होता. या अष्टपैलू प्रकाशला शोभेल अशीच शरीरयष्टी त्याला लाभली होती. रंगाने गोरा, नाकीडोळी छान, उंची त्याला साजेशी होती. एवढे सगळे असूनही त्याचे पाय जमिनीवर होते. त्याला गर्व अजिबात नव्हता. त्यामुळे सर्व प्राध्यापकांचा व मित्रमैत्रिणींचा तो फारच लाडका प्रकाश होता.

       पूनमही इतकी सुंदर होती की तिला पाहून हे गीत ओठावर यायचे, 'कुदरतने बनाया होगा, बडी फुरसतसे मेरे यार' पूनम अभ्यासाबरोबरच गायन, वादन, वक्तृत्व, खेळ या सर्व क्षेत्रात अग्रेसर होती. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे सर्व क्षेत्रात चमकणारी होती. श्रीमंत बापाची एकुलती एक लेक असूनही कमालीची मनमिळावू , प्रेमळ व समंजस होती. सर्वजण तिला  'काॅलेज क्वीन' म्हणून ओळखायचे.

       कॉलेजच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात प्रकाश व पूनम एकत्र यायचे. परिसंवादात भाग घ्यायचे. ठामपणे आपले विचार मांडायचे. वक्तृत्व स्पर्धेत दोघांपैकी कुणाला नंबर द्यावा हा परीक्षकांना प्रश्न पडायचा. त्या दोघांना एकत्र पाहून प्रत्येकजण म्हणायचा, दोघे एकमेकांना किती अनुरूप आहेत. किती मस्त जोडी होईल या दोघांची! आणि घडलेही तसेच, त्या दोघांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागले, ओढ वाटू लागली. नकळतपणे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. भेटी वाढल्या. पण दोघांनीही मर्यादा न ओलांडता समंजसपणे स्वतःला सावरून घेतले.

       बघता बघता कॉलेजचे ते मोरपंखी दिवस संपले. दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. प्रकाशने एम्. बी. ए. साठी चेन्नईला ऍडमिशन घेतले. जड अंतःकरणाने पूनमने प्रकाशला निरोप दिला. दोन वर्षाचा तर प्रश्न आहे, अशी मनाची समजूत घालून जड पावलांनी प्रकाश निघून गेला. पूनम मनाने खूप हळवी झाली होती पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजून ती एम्. ए. चा अभ्यास करू लागली. दररोज ठराविक वेळी दोघांच्या फोनभेटी होऊ लागल्या. में महिन्यात व दिवाळीच्या सुट्टीत दोघे एकमेकांना भेटायचे, मनातलं बोलायचे. मनोराज्यात गुंग व्हायचे. आपल्या लग्नासाठी किती दिवस उरले ते मोजायचे.

       लास्ट सेमची परीक्षा होण्यापूर्वीच प्रकाशचं कँम्पस् सिलेक्शन झालं. त्यामुळे दोघांना फार आनंद झाला. आता लग्नाच्या आड येण्यासारखे कांहीच नाही असे त्यांना वाटले. प्रकाश परीक्षा देऊन आला. त्यानंतर चारच दिवसांनी पूनमचा वाढदिवस होता. प्रकाशने आईला पूनमबद्दल सांगितले होते. त्याचे वडील तो लहान असतानाच देवाघरी निघून गेल्याचे आईने त्याला सांगितले होते. पूनमनेही आईवडिलांना सांगितले होते त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व मित्र मैत्रिणींना अर्थात प्रकाशसह घरी बोलवायचे ठरले.

       ठरल्याप्रमाणे सर्वजण पूनमच्या घरी जमले. बर्थडे पार्टी सर्वांनी मस्त मजेत साजरी केली. खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला. पण प्रकाश या पार्टीत कांहीसा नाराज दिसला कारण त्याला आठवलं की त्यांने लहानपणी आईजवळ हट्ट केला होता माझे पप्पा कसे दिसत होते दाखव म्हणून, आईने कपाटात खास ठिकाणी जपून ठेवलेला एक फोटो दाखवला होता. त्या फोटोतील माझे पप्पा आणि आज प्रत्यक्ष पाहिलेले पूनमचे पप्पा यांच्यात खूपच साम्य होते. तो मनाला समजावत होता की साधारण एकसारखी दिसणारी माणसं असू शकतात पण मन मानायला तयार नव्हतं.

       दुसऱ्या दिवशी दोघांनी आपापल्या घरी सांगून टाकले की आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही लग्न करणार आहोत. प्रकाशच्या आईने त्याला वाढवले होते. कारण तिला लग्नापूर्वीच एका व्यक्तीने धोका दिला होता. लग्नाचे अमिष दाखवून वाऱ्यावर सोडून दिले होते. तिने समाजाची सर्व बंधने झुगारून प्रकाशला जन्म दिला आणि त्यानंतर नर्सचे ट्रेनिंग घेऊन प्रकाशला मोठे करण्यात व रूग्णांची सेवा करण्यात आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं होतं. प्रकाश हेच तिच्या जीवनाचं सर्वस्व होतं. आता प्रकाशनं पसंत केलेल्या मुलीला मागणी घालून त्याचं लग्न करून दिलं की तिच्या जन्माचं सार्थक झालं असा विचार करून ती प्रकाशला म्हणाली, "मी या रविवारी पूनमच्या घरी रीतसर मागणी घालण्यासाठी जाणार आहे". प्रकाशने पूनमला तसे कळविले.

      ठरल्याप्रमाणे प्रकाश आईसह पूनमच्या घरी पोहोचला. पूनमचे आईवडील गेटजवळ स्वागतासाठी उभे होते. हात जोडून उभ्या असलेल्या पूनमच्या वडिलांना पाहून प्रकाशच्या आईला आभाळ कोसळल्यासारखे वाटले. तिला इतक्या जोरात चक्कर आली की ती खाली पडता पडता थोडक्यात वाचली. पूनमच्या घरी नाष्टा चहा कसाबसा उरकून कांहीच न बोलता ती घरी आली. प्रकाश पूनम दोघेही संभ्रमात पडले पण करणार काय?

       प्रकाशची आई घरी आल्यावर प्रकाशला म्हणाली, "बाळ, तुला पूनमशी लग्न करता येणार नाही कारण ती तुझी बहीण आहे. पूनमचे पप्पा तुझे ही पप्पा आहेत". प्रकाशच्या डोळ्याला अंधारी आली. तो मटकन खाली बसला व मनात म्हणाला, "चूक कुणाची शिक्षा कुणाला!"

मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

भिन्न जाती, जिव्हाळ्याची नाती - मराठी कथा


भिन्न जाती, जिव्हाळ्याची नाती - मराठी कथा

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी





फोटो साभार: गूगल


       एप्रिल महिना सुरू होता. उन्हाचा तडाखा प्रकर्षाने जाणवत होता. अंगाची लाही लाही होत होती. अशावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये कांही कामासाठी जावे लागले. ते काम अपेक्षेपेक्षा लवकर झाले आणि आम्ही दोघांनी कुलकर्णी काकांना भेटण्यासाठी दिंडेनगरला जायचे ठरविले. दिंडेनगर तिथून तसे खूप लांब होते. त्यात ऊन मी म्हणत होते. शिवाय त्यांचे नवीन घर नेमके कुठे आहे हे पण आठवत नव्हते. कारण दोन वर्षांपूर्वी वास्तुशांतीच्या निमित्ताने त्यांच्याच गाडीतून जाऊन बघितले होते. बस स्टॉपपासून घर सापडणे कठीण होते, त्यामुळे रिक्षाने जाण्याचा निर्णय झाला. अर्धा तास थांबून लगेच परत येता येईल असा विचार करून एका रिक्षावाल्याला पत्ता सांगून भाडे विचारले. तो म्हणाला, "तीनशे रूपये लागतील. रिक्षाभाडे २५० रुपये व वेटिंग चार्ज ५० रू आणि हो अर्ध्या तासाच्या वर एक मिनिटही जास्त थांबणार नाही". दुसऱ्या रिक्षावाल्याला विचारले तर तो ३५० रूपये म्हणाला, म्हणून पहिल्या रिक्षावाल्याला २५० रू. घे आणि चल म्हणालो. पण तो तयार झाला नाही. शेवटी असू दे बाबा म्हणून रिक्षात बसलो.


       रिक्षा कांही अंतर पार करत असतानाच आकाशात ढगांनी गर्दी केली. ढगांच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या. पाऊस येणार की काय म्हणत असतानाच पाऊस जोरात पडू लागला. गारा रिक्षावर जोराने आदळू लागल्या. वळवाचा पाऊस असाच असतो. रिक्षा कशीबशी दिंडेनगर बोर्डजवळ उभी राहिली. तो म्हणाला, "सांगा आता कुणीकडे जायचं?" आम्हाला कांहीच समजेना. म्हणून काकांना फोन केला. त्यांनी रिक्षावाल्याला नेमका पत्ता सांगितला पण धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे रिक्षा चालवणेही कठीण झाले. थोडा वेळ थांबलो इतक्यात काकांचा फोन आला, अजून कसे नाही आलात? कांही वेळाने रिक्षा कशीबशी काकांच्या गेटजवळ थांबली. पहातो तर काय काकी छत्री धरून हातात दोन तीन छत्र्या घेऊन उभ्या होत्या. ड्रायव्हरसह आम्हा दोघांसाठी छत्र्या दिल्या हेतू हा की गेटपासून घरात येईपर्यंत आम्ही भिजायला नको. बाथरूममधून बाहेर  काकी  टॉवेल घेऊन उभ्या होत्या. पाच मिनिटाच्या आतच फक्कड असा गरमागरम चहा दिला. घरातील सर्वासर्वांची आस्थेने चौकशी केली. त्यांच्या मते चौकशीत कमालीची माया, आपुलकी होती. थोड्याच वेळात मस्त पैकी ओलं खोबरं व कोथिंबीरीने सजलेली पोह्यंची प्लेट आमच्यासमोर हजर झाली.


       अर्धा तास झाल्याबरोबर रिक्षावाल्याला आम्ही म्हणालो, "चला, अर्धा तास संपला". तो म्हणाला, "थांबा अजून थोडा वेळ. पाऊस कमी झाल्यावर निघू या". पुन्हा गप्पा रंगल्या. काकीनी मुलांना खाऊचे पॅकिंग दिले. माझी खणानारळाने ओटी भरली. ड्रायव्हरला व यांना नॅपकिन, पानसुपारी दिली. पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहून आम्हीच उठलो. काका काकीना निरोप देऊन रिक्षात बसलो. रिक्षावाल्याला यांनी शंभराच्या तीन नोटा दिल्या. त्याने त्यातली शंभराची नोट परत दिली. प्रश्नार्थक नजरेने पाहिल्यावर तो म्हणाला, "तुमच्या दोन कुटुंबातील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी बघून मी थक्कच झालो. तुमचा धर्म वेगळा त्यांचा वेगळा पण मनाने तुम्ही एकमेकांच्या किती जवळ आहात हे मी जवळून बघितल. खूष झालोय मी, नाहीतर हल्ली कुठं बघायला मिळतं असं चित्र?"


       ड्रायव्हरप्रमाणेच सर्वांना थक्क करून सोडणारं आमच्या दोन कुटुंबातील हे नातं जातीधर्माच्या पलीकडचे आहे. कुलकर्णी काका मिल्ट्रीमन पंधरा वर्षाच्या सेवेनंतर कलेक्टर ऑफिसमध्ये क्लार्क आणि आमचे हे रजिस्टार ऑफिसमध्ये क्लार्क. दोघांची अगदी घट्ट मैत्री होती. काकांची गावाकडे शेती, घर होते. नोकरी संपल्यानंतर गावाकडे किंवा कोल्हापूरात त्यांना स्थायिक व्हायचं होतं. तिथून गावाकडच्या शेतीकडे लक्ष देता येईल, म्हणून ते जयसिंगपूरात भाड्याच्या घरी रहात होते. त्याचवेळी आम्ही बँकेचे कर्ज घेऊन सहा खोल्यांचे घर बांधले व तीन खोल्या भाड्याने द्यायचे ठरविले. अशाप्रकारे काकांची फॅमिली आमच्या घरात रहायला आली. मैत्री होतीच त्यात इतक्या जवळ रहायला आले त्यामुळे दुधात साखर पडली. दोघेजण ऑफिसला एका गाडीवरून जाऊ लागले. एकत्र खरेदी होऊ लागली. माझ्या सासूबाई व काकी एकत्र गप्पा मारत भाजी निवडू लागल्या. काकांच्या मुलीने स्मिताने आमच्या लेकीना अरमान व यास्मिन ला इतका लळा लावला की स्मिता परगांवी गेली की या दोघींना तिचा जोसरा काढून ताप येऊ लागला. काकांचा मुलगा स्वप्निल, पुतणे सचिन व सुयोग आमच्या मुलापेक्षा मोहसीनपेक्षा थोडे मोठे असल्याने आमच्या मुलांना  सायकलवरून शाळेत नेऊ आणू लागले. काकांना पाच बहिणी आहेत. त्या इकडे आल्या की आम्हाला भेटू लागल्या. त्यांच्याशीही आमची घट्ट मैत्री झाली. आमची दोन कुटुंबे एकरूप होऊन गेली.


       स्वातीकाकी पत्रद्वारा दासबोध अभ्यास करत होत्या. मी त्यांच्याकडे चौकशी केली व मलाही अभ्यास करता येईल का असे विचारले. काकी म्हणाल्या, "का नाही?, उलट तुमचं विशेष कौतुक होईल." त्यांच्यामुळे मी तीन वर्षाचा पत्रद्वारा दासबोध अभ्यास पूर्ण केला. भारतीय संस्कृती दर्शनाच्या काकींसमवेत परीक्षा दिल्या. काका आम्हा दोघींना चेष्टेने म्हणायचे, "तुम्ही दासबोध अभ्यास करून आम्हा दोघांना सज्जनगडावर पाठवू नका म्हणजे झाले."


       २००६ साली अयोध्येत बाबरी मशीद प्रकरण सुरु होते. नेमक्या त्याच वेळी बेंगलोरच्या आत्या व त्यांच्या मुली काकांकडे आल्या होत्या आणि दोन्ही कुटूंबाचे आमच्या अंगणात चांदणी भोजन सुरु होते. रस्त्याने जाणारे लोक म्हणत होते, "थोडा आदर्श घ्यावा या दोन्ही कुटुंबाचा आणि संपवून टाकावा तो वाद."


       रमजानमध्ये काका सत्ताविसावा रोजा करायचे. दिल्लीच्या जामा मशिदीत नमाज पडून आल्याचे अभिमानाने सांगायचे. काकी मोहरममध्ये पीराला नैवद्य व वस्त्र अर्पण करायच्या. काकांच्या तुळशीच्या लग्नाला आम्ही सहकुटुंब सहपरिवार आहेर घेऊन हजर असायचो. मंगळागौर, ऋषीपंचमी, चैत्रागौर या सर्व कार्यक्रमांना आमची हजेरी ठरलेली असायची. दोन्ही कुटुंबातील पै पाहुण्यांच्या घरातील मुंजीपासून लग्नापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांना आम्ही आवर्जून हजर रहायचो. अशा प्रकारे आमचं अनुभवविश्व समृद्ध व संपन्न  झालं.


       असे हे आमचे कुलकर्णी काका एकदा खूप आजारी पडले. ते आजारी असल्याचा फोन येताच आम्ही दोघे ताबडतोब दवाखान्यात हजर झालो. काकांंची तब्येत खूपच गंभीर होती. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते पण प्रतिसाद नव्हता. त्यांच्या किडनीचा प्रॉब्लेम होता. डॉक्टरांनी आशा सोडली होती. नातेवाईकांना बोलवून घ्या असं सांगितल्यानं त्यांच्या बहिणी, भाऊ, मेहुणे, भाचे, पुतणे सगळे सगळे हजर होते. जेवणाचे डबे असूनही दोन वाजून गेले तरी कुणी अन्नाचा कणही घेतला नव्हता. त्यांची अवस्था बघून दोघीतिघी नातेवाईक स्त्रिया पुढच्या म्हणजेच अंतिम तयारीसाठी घरी गेल्या. काकी पूर्ण खचून गेल्या होत्या. आम्हाला पाहिल्यावर त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्या गळ्यात पडून खूप रडल्या. त्यांना रडतांना बघून सर्वांनाच गलबलून येत होते. पेशंट बघायला आत कुणालाही जायला परवानगी नव्हती. त्यांचा डॉक्टर भाचा निरंजन फक्त त्यांच्याजवळ होता. आम्ही डॉक्टरांना खूप विनवलं व दोनच मिनिटासाठी आत जावून काकांना बघून आलो. विमनस्क मनःस्थितीत सगळेजण देवाचा धावा करत होते. असाच अर्धा तास निघून गेला. आणि काय आश्चर्य निरंजन हसतच बाहेर आला आणि म्हणाला, "मामा प्रतिसाद देताहेत. त्यांनी डोळे उघडले आहेत. ते पूर्ण शुद्धी वर आलेत. डॉक्टरांच्या संपलेल्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत."


       सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची बरसात झाली. आम्ही तिथे थांबलो व सर्वांना जेवण करण्यासाठी बाहेर पाठवलं. कदाचित आम्ही तिथे जाणं आणि काका बरं होणं हा निव्वळ योग असावा. डॉक्टरांच्या प्रयत्नाचं फळ असावं किंवा बोला फुलाला गाठ पडली असावी, ईश्वर अल्लाहची कृपा असावी. पण काकी म्हणाल्या, "मोहरम सुरू आहे. पीरबाबांसाठी आमच्यातर्फे वस्त्र घेऊन जा".


       असा हा जिव्हाळा अंतःकरणात रूजलेला मनात साठवून ठेवलेला.


शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

जगू या प्रत्येक क्षण आनंदाने - मराठी कथा


जगू या प्रत्येक क्षण आनंदाने!

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी

फोटो साभार: गूगल

       हिरेमठ सर तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. ते नुसतेच नावाला तत्वज्ञानाचे प्राध्यापक नव्हते तर खऱ्या अर्थाने तत्वज्ञानाचा जीवनात अंगिकार करत होते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीनुसार त्यांची जीवनशैली  होती. त्यामुळे हिरेमठ सर आदर्श व विद्यार्थीप्रिय होते. त्यांची पत्नी मधुरा, नावाप्रमाणेच मधुर होती. ती जेमतेम जुनी मॅट्रिक शिकलेली होती पण सरांच्या सहवासात राहून, त्यांचं जीवनाबद्दलचं तत्त्वज्ञान ऐकून ती जणू तत्त्वज्ञानाचं विद्यापीठच बनली होती. संसार काटकसरीने, निगुतीने कसा करावा हे तिच्यापासून शिकण्यासारखं होतं. सरांच्या पगारातील पैसा न् पैसा ती सत्कारणी लावायची. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन संसार सुखासमाधानाचा करण्यात ती यशस्वी झाली होती. दोन्ही मुलांना सुसंस्कारित बनविले होते. सद्या ते दोघेही उच्चशिक्षण घेऊन फॉरेनमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहेत.


       कोरोना लॉकडाऊनच्या या बिकट काळात मधुरा कांहीशी नाराज  दिसत होती. दोन्ही मुलांच्या काळजीने त्यांचा जीव तीळ तीळ तुटत होता. आजूबाजूला कोरोना बाधितांची सतत वाढत चाललेली संख्या पाहून मनातल्या मनात त्या हबकून गेल्या होत्या. जवळच्या नातेवाईकांंच्या, परिचीत व्यक्तींच्या मृत्यूची बातमी मधुराला घायाळ करत होती. तिला वाटायचे इथे आपण दोघेच आहोत. आपलं कांही बरंवाईट झालं तर आपली मुलं येतील का? आपल्या मुलांना त्या देशात कोरोनाची बाधा होईल का? अशा असंख्य विचारांनी ती गारठून गेली होती. सरांनी तिची मनःस्थिती ओळखली होती आणि त्यांच्या परीने ते तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते.


       लॉकडाऊन संपले, दुकाने उघडली आणि मधुराने सरांकडे बेडशीट आणण्यासाठी तगादा लावला. सर विचार करत होते, एरव्ही कांही आणू या म्हटले की राहू दे आता नंतर आणू या, म्हणणारी मधुरा बेडशीट आणण्याची एवढी घाई का करत असेल? बेडशीट मध्यभागी फाटले होते हे मान्य परंतु यावेळी ती अतिघाई करतेय असे सरांंना वाटत होते.


    सरांनी बेडशीट आणून दिले. बेडशीट बेडवर विराजमान झाल्याचे त्यांनी पाहिले. कांही दिवसानंतर एका निवांत क्षणी त्यांनी मधुराला विचारले, "मधुरा, नवे बेडशीट बेडवर अंथरल्याचे मी पाहिले. पण त्या जुन्या बेडशीटचं काय केलंस?"


मधुरा म्हणाली, "अहो त्या बेडशीटचा मध्यभागी जीर्ण झालेला भाग काढून टाकला. बेडशीटचे गादीखाली फोल्ड केलेले दोन्ही भाग एकदम छान होते. ते दोन्ही भाग एकमेकांना जोडून दिवाणवरील छोट्या गादीवर अंथरण्यासाठी त्याचे छानसे बेडशीट तयार केले."


सर म्हणाले, "मग त्या दिवाणवरील जुन्या बेडशीटचं काय केलंस?"


मधुरा म्हणाली, "अहो त्या बेडशीटचा चांगलासा भाग काढून त्याचे दोन पिलोकव्हर शिवले."


सर म्हणाले, "अरे वा! पण त्या जुन्या पिलोकव्हरचं काय केलंस?"


मधुरा म्हणाली, "अहो त्या पिलोकव्हरचा चांगला भाग काढून घेतला. त्या कापडाचा तुकडा मी भांडी, डबे पुसायला घेतला."


सर म्हणाले, "फारच छान केलंस. पण त्या जुन्या कपड्याचं काय केलंस?"


मधुरा म्हणाली, "अहो त्या जुन्या कापडाचे धागे काढून आपल्या काथ्याच्या पायपुसणीतील छिद्रात बसवले. त्यामुळे ती पायपुसणी  मऊसूत झाली."


सर म्हणाले, "हे बघ मधुरा, मी तुला एक बेडशीट आणून दिलं आणि तू त्याचा किती हुशारीने, कौशल्याने वापर केलास. कसलाही एक कण वाया न घालवता त्याला नवं नवं सुंदर रूप दिलंस, असंच आहे आपल्या आयुष्याचं! परमेश्वराने आपल्याला एक सुंदर जीवन दिलंय. त्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपण आनंदाने जगायला हवा. या आयुष्यातील सुंदर क्षणांचा उपभोग घ्यायला हवा. आपल्या आयुष्यातील बरेच क्षण आपण काळजी करण्यात घालवत आहोत. कित्येक दिवस आपण कोरोनाच्या भीतीच्या छायेत वावरत आहोत. ही भितीची छाया, काळजी सर्व बाजूला ठेवून प्राप्त परिस्थितीत आलेला प्रत्येक क्षण आनंदाने घालविण्याचा प्रयत्न करू या."


मधुरा म्हणाली, "छान समजवलंत हो मला जीवनाचं तत्त्वज्ञान. म्हणून तर मी नवं बेडशीट आणण्याची घाई केली. त्याच्या येण्यामुळे असं काय काय बनवायचं होतं. कोरोनाच्या काळजीला पळवायचं होतं." दोघेही मोठमोठ्याने हसले व कामाला लागले.

 

सरांनी सांगितलेले तत्वज्ञान ह्रदयाच्या कुपीत अत्तराप्रमाणे जपून ठेवू या.


जगू या आनंदाने

कोरोनाचा सामना करू नेटाने।


मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

कोणता पुत्र श्रेष्ठ? - मराठी कथा


कोणता पुत्र श्रेष्ठ?

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


       सविता आपल्या पतीसह पुण्याला निघाल्या होत्या.  ५, ६ तासांचा प्रवास होता. आता मुलांकडे जाणार म्हटल्यावर आईच्या मुलांवरील मायेपोटी घेतलेले बरेच साहित्य होते. तिखट, पीठ, डाळी, घरचे तांदूळ, भाज्या, भडंग, मुद्दाम केलेले तुपातील बेसनचे लाडू आदी बसमध्ये सर्व साहित्य चढवताना त्या दोघांना पुरेवाट झाली. पण त्यांना समाधानही वाटत होतं की सर्व काही लेकासाठी घेता आलं याचं. एवढ्यात सविताची बालमैत्रिण वनिता पतीसह बसमध्ये चढल्या. सविताप्रमाणेच वनिताही आपल्या मुलांकडे निघाल्या होत्या. त्यांच्याकडेही सविताप्रमाणेच भरपूर साहित्य होते. सामान व्यवस्थित ठेवल्यावर दोघी एका बाकावर बसल्या. मग काय गप्पांना पुण्यापर्यंत पूर आलेला होता. तुझा मुलगा काय करतो? कोठे राहतो? सविताने विचारले. वनिता म्हणाली, "माझा मुलगा बी.कॉम झालाय. टेलिफोन ऑपरेटर आहे. २०-२२ हजार पगार आहे. माझी सून पण कंपनीत जॉब करते. तिलाही १५ हजार पगार आहे. दोघं खूप आनंदात आहेत. ४- ५ महिन्यांंनी मी आजी होणार आहे. मुलानं आधीच सांगितलं आहे की, नातवडं आलं की तुम्ही दोघांनी इथेच कायमपणे रहायचं. माझा मुलगा वडगांवमध्ये रहातो, तुझा मुलगा काय करतो? कोठे राहतो? वनिताने विचारले. सविता जरा सावरून बसत अभिमानाने सांगू लागली. माझा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मोठ्या कंपनीत मुख्य मॅनेजर आहे. ९० हजार पगार आहे. शिवाय दोन वर्षे अमेरिकेत राहून आला आहे. सूनबाईही इंजिनिअर आहे. तिलाही ६० हजार पगार आहे. पैशांचा पाऊस पडतोय महिन्याला. चांगला अलिशान फ्लॅट घेतलाय त्यानं. त्या दोघांनी ठरवलय सद्या तरी मूल नकोच लाईफ एन्जॉय करायचं.


          एवढं बोलून थांबेल ती सविता कसली? ती पुढे म्हणाली, ३०-३५ हजारात पुण्यात राहताना तुझ्या मुलाला कठीण जात असेल. फ्लॅट वगैरे घेण्याचा विचारसुध्दा केला नसेल त्यानं. वनिता म्हणाली, "खरं आहे तुझं म्हणणं पण माझा मुलगा व सून दोघे समजूतदार व काटकसरी आहेत . नियमितपणे बचत करतात. त्यांनी फ्लॅटही बुक केलाय. येत्या एक-दीड वर्षात फ्लॅटचा ताबा मिळेल. वनिता मध्यमवर्गीय सुखी, समाधानी रहाणीमानाचे यथार्थ समर्थन करत होती. तर सविता आपल्या मुलांच्या व सुनेच्या उत्तुंग कार्याचे व भरमसाठ पगाराचं तोंड भरून कौतूक करत होती. मध्यंतरी दोन वेळा तिच्या मुलाचा फोन आला. आई-बाबा तुम्ही कुठपर्यंत आलाय? तुम्ही आल्यावरच सगळे मिळून जेवण करू या म्हणून. दोघींच्या गप्पात बस स्वारगेटला केव्हा येवून पोहोचली ते कळलेच नाही.


          बस थांबताच वनिताचा मुलगा व सून चपळाईने बसमध्ये चढले. त्यांना बिलगून नमस्कारही केला त्यांनी. ते दोघे १० मिनिटे आधीच इथे पोहचून चारचाकी पार्क करून थांबले होते. त्या दोघांनी आई-बाबांना सांगितले की तुम्ही निवांत मोकळेपणाने खाली उतरा. प्रवासाने तुमचे पाय भरून आले असतील. आई-बाबांनी आणलेले साहित्य गाडीत व्यवस्थित ठेवल्यावर हे दोघे वर चढणार तोपर्यंत मुलाचा एक मित्र त्याला भेटायला पुढे आला. ते दोघे थोडा वेळ गप्पात रंगले.


           वनिताने सविता गेली की काय म्हणून नजर टाकली. कारण तिने अध्यातासापूर्वीच मुलाला फोन करून तसे सांगितले होते. वनिता बघते तर काय सविता बसमधून एकेक बॅग खाली आणत होती. तिचे पती लंगडत लंगडत ते बाकावर ठेवत होते. प्रवासी बसमध्ये चढण्यासाठी गडबड करत होते. त्यामुळे सामान उतरवताना या दोघांची दमछाक चालली होती. सामान उतरवून झाल्यावर तिच्या मुलाचा फोन आला गाडीतून न उतरताच त्याने सांगितले की इकडे गाडीकडे या म्हणून. दोघे सामानाच्या बॅगा घेवून गाडीकडे गेले व स्वतःच बॅग गाडीत चढवू लागले. वर तिचे चिरंजीव म्हणाले, "आई-बाबा तुम्हाला हजार वेळा सांगितलय की गावाकडून एवढं सामान आणत जावू नका म्हणून. तरी एवढं सामान घेवून येता कशाला? आणि काय गं आई मी बरोबर आठ वाजता जेवायला बसतो हे माहित असूनही बरोबर आठ वाजता कशाला फोन केलास? मग मला जेवण करूनच निघाव लागलं. यापुढे काहीही न बोलता मुलानं गाडी स्टार्ट केली व निघाले. मघाशी अभिमानाने, मोठमोठ्याने मुलाचं कौतुक करणाऱ्या सविताचा चेहरा फोटो काढण्यासारखा झाला होता. हे वेगळं सांगायला नको. 

     

          थोडक्यात समाधान मानून सुखाने जीवनाला सामोरे जाणारी वनिताची फॅमिली आनंदाने घरी पोहोचली. आता तुम्हीच सांगा वाचक बंधू-भगिनींनो पगार कमी असला तरी आई-वडिलांवर मायेचा वर्षाव करणारा पुत्र श्रेष्ठ की फॉरेन रिटर्न, उच्च शिक्षित, भरमसाठ पगार असलेला पुत्र श्रेष्ठ?


शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

बहिणीची माया - मराठी कथा

 

बहिणीची माया

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


      सुनिता नुकतीच पदवीधर झाली. तिच्यासाठी वरसंशोधन सुरू झाले. सुनीताचे वडील सरकारी  नोकरीत असल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. शहरामध्ये छोटासा बंगला होता, गाडी दारात होती. सुनिता दिसायलाही सुंदर, बुद्धीनेही हुशार होती. तिला एक मिळवता भाऊ होता. दुसरा भाऊ इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. इतके सारे आलबेल असतानाही बऱ्याच स्थळांंकडून सुनिताला नकार येऊ लागला, याचे कारण एकच होते ते म्हणजे सुनिताचा मोठा भाऊ  संजय याच्या अंगावर गेल्या तीन वर्षांपासून पांढरे डाग दिसू लागले होते. हे डाग तोंडावर, हातावर असल्याने संजय दुर्दैवाने कांहीसा विद्रूप दिसत होता. हा त्वचारोग अनुवांशिक आहे या गैरसमजामुळे सुनिताला कोणी पसंत करत नव्हते.

     बऱ्याच कलावधीनंतर एका स्थळाकडून होकार आला. मुलगा इंजिनिअर होता. पगारही चांगला होता. आर्थिक परिस्थिती उत्तम होती. बंगला, गाडी सर्व काही होते पण त्यांची एक अट होती. तुझ्या भावाने आमच्या घरी कधीही येऊ नये. आम्ही तुमच्या घरी आलो की घरात थांबू नये. लग्नातही त्याने हजर राहू नये. सुनिताला ही अट मान्य नव्हती. तिने या स्थळाला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर तिच्यासाठी आणखी एक स्थळ आलं. बऱ्याच कालावधीनंतर एका वराकडून होकार आला. अमोल नुकताच इंजिनिअर झाला होता. खाजगी कंपनीत अल्पशा पगारावर नोकरीस लागला होता. त्याला शेत, घर  काहीच नव्हते. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईने मोलमजुरी करून त्याला शिकविले होते. अमोलनेही स्वतः कष्ट करून शिक्षण घेतले होते. अमोलने सुनिताच्या वडिलांकडे सुनिताला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यापूर्वीच सुनितानेही वडिलांकडे लग्न ठरविण्यापूर्वी अमोलला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती अमोल सुनिताच्या घरी आला. तो तिला म्हणाला, "तू श्रीमंत परिस्थितीत लहानाची मोठी झाली आहेस. इथे तुला सर्व प्रकारच्या सुखसोयी प्राप्त आहेत. असे असताना तू माझ्यासारख्या दरिद्री वराला कसा काय होकार दिलास?" सुनिता म्हणाली, "तुझं दारिद्रय मी अगदी मनापासून स्विकारलं आहे. दारिद्र्यात येणाऱ्या प्रत्येक संकटात, अडचणीत मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहीन, तुझी सावली बनेन. दारिद्रयातून येणारी प्रत्येक गैरसोय सोसेन. प्रसंगी उपाशी राहीन पण माझी एक अट आहे."

      अमोल घाबरला ही कोणती अट घालणार, त्याने अधिक सावरुन बसत सावधपणे विचारले, "सांग कोणती अट आहे तुझी?"  सुनिता म्हणाली, "लग्नानंतर दुर्दैवाने असा झालेल्या माझ्या भावाला तुम्ही योग्य सन्मान द्यावा. त्याची अवहेलना करू नये. तो आपल्याकडे येईल जाईल, त्याला योग्य वागणूक द्यावी". अमोलने ही अट मान्य केली.

   सुनिता अमोल विवाहबद्ध झाले. संजय त्यांच्या घरी येतो जातो. त्यांचा संसार सोन्यासारखा झाला आहे.

     या गोष्टीवरुन समस्त बहिणीनी आपला संसार फुलवत असताना दुर्दैवाने त्रस्त झालेल्या भावाला सुनिताप्रमाणे मायेचा वर्षाव केला, त्याला आधार दिला, तर बहीण भावाच्या या पवित्र नात्याला कधीही बाधा येणार नाही, होय ना?

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

जादू शब्दांची - मराठी कथा

 

जादू शब्दांची

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

 

      रुपाताई आदर्श शिक्षिका म्हणून नावाजलेल्या होत्या. शाळेचे गॅदरिंग,  वेगवेगळ्या स्पर्धा, परीक्षा, शैक्षणिक उपक्रम, सहली या सर्वात त्यांचा सहभाग वाखाणण्यासारखा होता. त्यांच्या अध्यापनाच्या विशिष्ट पद्धतीमुळे त्या विद्यार्थ्यांच्या लाडक्या शिक्षिका होत्या. मितभाषी व लाघवी बोलण्यामुळे त्या सर्व सहकारी शिक्षकांच्याही आवडत्या शिक्षिका होत्या. त्यांचे पती जवळच्याच गावात शिक्षक होते. अरूण व अनिता ही दोन अपत्ये होती. दृष्ट लागण्यासारखा त्यांचा संसार होता. पण नियतीला हे मंजूर नव्हते.

       अरूण आठवीत आणि अनिता सहावीच्या वर्गात शिकत होते. दोन्ही मुलांच्या उज्ज्वल भविष्याची सुंदर स्वप्ने पहात असतानाच रूपाताईंच्या पतीना हार्ट अटॅक आला आणि ते  देवाघरी निघून गेले. संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडून पडला. दुःखाचा डोंगर कोसळला. मुलांची जबाबदारी एकटीवरच येऊन पडली. दुःख बाजूला ठेवून त्यांनी ही जबाबदारी पेलण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सासर माहेरचा विशेष पाठिंबा नसतानाही आपल्या मुलांना कांही कमी पडू दिले नाही. स्वतःच्या इच्छा आकांक्षा दाबून ठेवत त्यांनी मुलांना सर्व गोष्टी अगदी वेळेवर पुरवल्या.

       अरुण सायन्स साईडने बारावी पास झाला. चांगल्या क्लासमध्ये घालूनही जेमतेम मार्कस् मिळाले. इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणे कठीण झाले. त्याने प्रायव्हेट कॉलेजला डोनेशन भरून प्रवेश घेण्याचा हट्ट केला. डोनेशन देण्यासाठी रूपाताईंकडे रक्कम नव्हती. मुलाच्या भविष्यासाठी त्यांनी स्वतःचे दागिने  विकून प्रवेश घेतला. अरूण पहिल्या सेमिस्टरला सर्व विषयात नापास झाला. दुसऱ्या सेमिस्टरला एकाच विषयात पास झाला. मला हे जमणार नाही म्हणून नाद सोडून दिला? पुढे एक वर्ष असेच गेले. नंतर त्याने मी हॉटेल मॅनेजमेंटला प्रवेश घेण्याचा हट्ट केला. फी भरुन प्रवेश घेतला व कांही महिन्यानंतर कोर्स अर्धवट  सोडून दिला. अशा प्रकारे प्रत्येक वेळी नवीन कुठल्यातरी कोर्सला प्रवेश घेतो व मध्येच सोडून देतो. अलीकडे तर सर्वच सोडून दिले आहे. दिवसभर मित्रांसोबत बाहेर हिंडतो. रात्री अपरात्री केंव्हातरी घरी येतो. स्मोकिंग, ड्रिंक्स करून येतो. रोज आईकडे पैसे मागतो. पैसे न मिळाल्यास खूप संतापतो. आईच्या अंगावर धावून येतो म्हणून आई नाईलाजास्तव त्याला पैसे पुरवते. परवाच त्याचा पंचविसावा वाढदिवस झाला. आईकडून पैसे घेऊन त्याने मित्रांना मोठ्ठी पार्टी दिली. अरूणच्या अशा वागण्याने आई हैराण झाली.

       अनिता अरुणच्या मानाने शिक्षणात ठीक आहे. तिने बी. कॉम. होऊन एम्. बी. ए. पूर्ण केले व एका कंपनीत नोकरीला लागली. अनिताची तऱ्हा कांही वेगळीच होती. अनिता आत्मकेंद्री झाली होती. घरातील कुठल्याच गोष्टीशी तिचा कांहीच संबंध नव्हता. घरातील कुठल्याही कामाला ती हात लावायची नाही. आईला घरकामात थोडीही मदत करायची नाही. उलट स्वतःची सर्व कामे आईकडून करून घ्यायची. तिची सर्व कामे आईने केलीच पाहिजेत, ते तिचे कर्तव्यच आहे, असे तिला वाटायचे. शिवाय मी इतकं शिकलेय त्या मानाने आपली आई निव्वळ अडाणी असे तिला वाटायचे. आई तुला काय कळतय? असं वारंवार म्हणायची, स्वतःला फार हुशार समजत होती ती. दिवसभर जॉब, सुट्टीच्या दिवशी मित्र मैत्रिणी बरोबर फिरणे, पिकनिक, मौजमजा यातच गुंग असायची. ती बी. कॉम झाल्यापासून स्थळे येत होती पण तिला एकही  मुलगा पसंत पडत नाही. आत्ता तर तिने आईला चक्क सांगून टाकलय, माझ्या लग्नाचा विषय तू अजिबात काढायचा नाहीस. मी माझं बघून घेईन तू या भानगडीत पडू नकोस.

       काय करावं रुपाताईनी अशावेळी! हळूहळू त्या डिप्रेशनमध्ये जायला लागल्या. मुलांच्या वागण्यामुळे सतत हिणवण्यामुळे आत्मविश्वास गमावू लागल्या, निरूत्साही बनू लागल्या, अबोल बनू लागल्या. ही गोष्ट त्यांच्या एका खास मैत्रिणीच्या लक्षात आली. निवांत क्षणी तिने रूपाताईना बोलते केले. रूपाताईनी खरी हकीकत अश्रूभरल्या डोळयानी सांगितली. मैत्रीण वैशाली हुशार होती. तिने रूपाताईंना या प्रसंगातून बाहेर काढण्याचा निश्चय केला. वैशालीची मावसबहिण समुपदेशक होती. त्यांची मदत घ्यायची असे ठरविले. मुलांना तिकडे घेऊन जाणे शक्य नव्हते त्यामुळे वैशाली ने आपल्या घरी एक छोटी पार्टी ठेवून अरूण, अनिता व रूपाताईना आमंत्रण दिले. आपल्या मावसबहिणीला रत्नालाही पूर्व कल्पना देऊन बोलवून घेतले.

       बोलता बोलता समुपदेशक रत्ना म्हणाल्या, "काय हो रूपाताई, काय करतो तुमचा मुलगा?" अरूणला वाटले, आई आता आपले सारे पाढे वाचणार. तो पटकन म्हणाला, "आईला काय विचारताय तिला काय कळतंय यातलं? आई निव्वळ अडाणी आहे." हे ऐकल्यावर रत्नाला फार राग आला. त्या संतापाने म्हणाल्या, "अरुण लाज नाही वाटत तुला आईला अडाणी म्हणायला. स्वतःला फार शहाणा समजतोस काय? आईने इतक्या कठीण परिस्थितीत लाखो रूपये खर्च करून तुला इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊन दिला तेंव्हा ती अडाणीच होती का? इंजिनिअरिंग सोडून तू पुन्हा हॉटेल मॅनेजमेंटला प्रवेश घेतलास तेही तुला पूर्ण करता आले नाही, आत्ता तर तू सर्व सोडून बसला आहेस." अरुण म्हणाला, "मला इथे रहायचेच नाही आई मला जराही फ्रीडम देत नाही. फॉरेनमध्ये बघा कसं स्वातंत्र्य मिळतं मुलांना. रात्री थोडा जरी उशीर झाला तरी ही लगेच फोन करते, कुठे आहेस बाळा? हिचं हे मला अजिबात आवडत नाही." त्यावर रत्ना म्हणाल्या, "अच्छा म्हणजे तुला फॉरेन कल्चर आवडते?" अरुण म्हणाला, "हो आवडते, तिथे प्रत्येकाला स्वतःची स्पेस असते." रत्ना म्हणाल्या, "अरे तुला हे माहित नाही का की तिथे मुलं बारा वर्षाची झाल्यावर स्वतः कमावतात व खर्च करतात. तिथे अर्न अँड  लर्न ही सिस्टीम आहे वयाची पंचविशी ओलांडली तरी घरी बसलेल्या तुझ्यासारख्या मुलाला फक्त भारतातील आईच खायला घालू शकते रोज आईकडे पैसे मागताना जराही लाज वाटत नाही तुला? तुझी काळजी वाटते म्हणून ती फोन करते. आईच्या मायेला तू अडाणी म्हणतोस. तिच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन तिलाच अडाणी म्हणतोस?"

       थोडा तरी विचार कर आईच्या मनाचा, तिने तुमच्या साठी केलेल्या त्यागाचा आणि कष्टाचा असे म्हणत रत्नाने मोर्चा वळवला अनिताकडे. त्या तिला म्हणाल्या, "काय ग अनिता फेल न होता ग्रॅज्युएट झालीस म्हणून असे कोणते मोठे दिवे लावलेस? आई तुझ्या लग्नासाठी स्थळं बघते आणि तू ते नाकारतेस. आत्ता तर तू लग्नच करायचे नाही म्हणतेस. तिला कधी तुझा विचार काय आहे हे समजावून सांगितलसं? घरात तरुण मुलगी असल्यावर आईला काळजी वाटणारच. तुझी आई शिक्षित आहे. त्या काळातील ग्रॅज्युएट आहे हे विसरलीस वाटतं. तुझ्या आईने सर्व्हिस करायची, तुमची जबाबदारी घ्यायची, घरातील सर्व कामे करायची आणि वर ऐकून घ्यायचे तिला काय कळतय, अडाणी आहे. तू तिला घरकामात काहीच मदत करत नाहीस. तू स्वार्थी आहेस.  अनिता एच्. आर्. मध्ये एम्. बी. ए. केलंस वा! काय दुर्दैव बघ घरातील दोन व्यक्तींंशी आई भावाशी कसे वागावे हे तुला कळत नाही. मग काय उपयोग तुझ्या पुस्तकी शिक्षणाचा."

      रूपाताई शांतपणे रत्नाचे व आपल्या मुलांचे चेहरे न्याहाळत होत्या. मनातल्या मनात घाबरल्या होत्या. घरात गेल्यावर आपली कांही खैर नाही हे त्यांनी गृहीत धरले होते. रत्नाने दोघानाही आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला व त्या निघून गेल्या.

        एका महिन्याने रुपाताईनी रत्नाला फोन केला. खूपच आनंदात होत्या. त्या म्हणाल्या, रत्नाताई, "तुमच्या शब्दानी जादू केली माझ्या मुलांवर. तिथून आल्यापासून दोघेही खूप बदललेत. अरुण एका टेलिफोन ऑफिस मध्ये नोकरी करत आहे. संंध्याकाळी सातच्या आत घरात येतो. आणि हो त्याने माझ्याकडे अजिबात पैसे मागितले नाहीत, मीच त्याला पगार होईपर्यंत पाचशे रूपये घे म्हणून दिले. पगार झाल्यावर त्याने मला पाचशे रुपये तर दिलेच, शिवाय तीन हजार घे तुला खर्चाला म्हणून दिले. अनिता तर सकाळी लवकर उठते. मला स्वयंपाकात मदत करते. संध्याकाळी मला चहा करून देते. नशीब उघडले माझे. तुमच्या तोंडात साखर पडो रत्नाताई. मी तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही."

       आजची युवा पिढी भरकटली आहे. गोंधळलेली आहे. त्यांना वेळीच योग्य मार्गदर्शन, समुपदेशन करून मार्गावर आणावे लागेल हेच खरे.

 

  

बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

सुखी हैदर - मराठी कथा


'सुखी हैदर'

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
       


        कृष्णा नदीच्या काठावर वसलेले पुणदी ता. पलूस जि. सांगली हे माझ्या सासरचं समृद्ध गाव. आमचं घर एकदम नदीच्या कडेला आहे. अंगणातून कृष्णामाईचे दर्शन होते. २००५च्या पुरात कृष्णामाई आमच्या घरात येऊन खेळून गेली. ३१ मे २०१५ रोजी माझ्या नातीचं आयेशाचं म्हणजे माझ्या पुतण्याच्या मुलीचं लग्न झालं. दुसऱ्या पिढीतील हे पाहिलंच लग्न असल्याने आमच्या फॅमिलीचा मुक्काम १०-१२ दिवस तिकडेच होता. दागिने, कपडे यांची खरेदी, रुखवताची तयारी सुरु होती. लग्न तीन दिवसावर येऊन ठेपले आणि हळद लावणे, मेहंदी काढणे, मुहूर्तमेढ रोवणे, सवाष्ण जेवण इत्यादी लग्नापूर्वीचे विधी सुरु झाले. या विधीमध्ये सर्व नातेवाईक स्त्रिया, भाऊबंदातील सदस्य, शेजारच्या व ओळखीच्या सर्व स्त्रिया उपस्थित होत्या. विशीष्ट विधीत पुरुषही सामील होते. बच्चेकंपनीचा धमाल दंगा व तरुणाईचा मस्त गोंधळ सुरु होता. रात्री निद्राप्रिय मंडळी झोपी गेल्यावर अंताक्षरी, रेकॉर्ड डान्स यांचबरोबर टी. व्ही. वरचे गेम्स चालू होते. कधी कधी उखाणा घ्यायची टूम निघायची, त्यामुळे सर्वांचे मस्त मनोरंजन सुरु होते. या कालावधीत घराच्या शेजारी राहणारे हैदरमामू रसिकतेने सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचे. अशाच एका रात्री पासष्टी ओलांडलेल्या हैदरमामूला आमचे दीर म्हणाले, "हैदर तुमचं एक गाणं होऊन जाऊ दे की आज".

        हैदर एका पायावर गाणं म्हणायला तयार झाला. जणू काही कुणाच्या तरी उठवण्याचीच वाट बघत होता. त्याने 'प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजुळ गाणी' हे गाणं म्हणायला सुरवात केली आणि मंडपातील गोंधळ एकदम शांत झाला. सर्वजण कान टवकारून त्याचं गाणं ऐकू लागले. एवढ्यात त्याने हे द्वंद्वगीत असल्याने स्त्रीच्या आवाजात 'साजणा मी तुझी कामिनी' म्हणायला सुरवात केली आणि सर्वांनी उत्स्फुर्तपणे टाळ्या वाजवल्या. हैदरला आणखी एक गाणं म्हणायचा मुलांनी आग्रह केला तेंव्हा आपल्या गोड आवाजात त्याने 'परदेशी परदेशी जाना नही, मुझे छोडके मुझे छोडके' ही कव्वाली म्हटली. काव्वालीला सर्वांनी कोरस दिला आणि त्या रात्रीचा हैदर 'हिरो' झाला. सर्वांना आपले गाणे आवडल्याचे पाहून हैदरही हरखून गेला व त्याने स्वरचित गाणे म्हणायला सुरवात केली. 'शिट्टी वाजली, म्हैस सुटली, दावा तोडूनं रानी पळाली' या आधुनिक गाण्याचा स्वर ऐकून मुला-मुलींनी नृत्याला सुरवात केली. हैदरही गाता गाता नाचू लागले. त्याची बायको हमीदा व लग्नासाठी आलेल्या त्याच्या दोन मुली, जावई, नातवंडे पोट धरून हसू लागली. तर असा हा हैदर कोण? प्रश्न पडला असेल ना. सांगते.

        हैदर अख्या पुणदी गावाला परिचित असलेला पासष्टी ओलांडलेला, मध्यम उंचीचा, मध्यम अंगकाठी असलेला साधा माणूस. सुरवातीला पांढरी असलेली पण नंतर काहीशी काळी पडलेली विजार, तसलाच ओपन शर्ट, खांद्यावर मळकट रंगाचा टॉवेल हाच त्याचा कधी न बदलणारा पोषाख. तोंडात पानाचा तोबरा चघळत चघळत नेहमी हसतमुख चेहऱ्याने समोरच्याला हसवत असतो. लहान मुलांना चिडवणं, खेळवणं, मोठ्या माणसांना विनोद सांगून हसवणं हा त्याचा दोन कलमी कार्यक्रम सुरु असतो. गावात कुणाची वरात निघाली की हैदर तिथे हजर. गॅसबत्ती धरायला, कृत्रिम घोडा कमरेला बांधून नाचायला, पडेल ते काम करायला, गावातील कुणाचेही कष्टाचे काम असो सर्वांना हैदरचीच आठवण होते. शेतातील पेरणी असो, भांगलण असो, ऊसाचा पाला काढायचा असो, मळणी असो, पोती उचलायची असो हैदर कधीही मागे सरकत नाही. त्याच्या या विविधांगी गुणदर्शनामुळे तो सर्वांचा लाडका बनला आहे. अंगठा बहाद्दर असलेली एक व्यक्ती सर्वांना आपलसं कसं काय करू शकते? रात्रंदिवस शेतात राबूनही इतक्या खेळकरपणे आपले छंद - कला कशा काय जोपासू शकते? सर्वांबरोबर मलाही पडलेले हे प्रश्न.

        तर असा हा हैदर पंचावन्न वर्षापूर्वी या गावात आला. आई वडिलाविना पोरकं असलेलं हे पोर. कुण्या दूरच्या नातेवाईकांनी एका श्रीमंत शेतकऱ्याकडे चाकरीसाठी आणून सोडले. त्यावेळी त्याचे वय साधारण १२-१३ वर्षांचे असावे. नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगून टाकले की, "दादा, तुम्हीच आता त्याचे मायबाप, आमची गरीब परिस्थिती असतानाही याला पाच वर्षे आम्ही सांभाळलं. आता आमच्या संसाराचा गाडा चालवताना नाकी नऊ आले आहे. त्यात याचं कसं बघणार?" त्या दिवसांपासून हैदर त्यांच्या शेतावर राहू लागला. सांगेल ते काम करुन, देतील ते अन्न खाऊन मोठा होऊ लागला. काळाचा रथ आपल्या वेगाने पुढे जाऊ लागला. तो ज्याच्याकडे काम करत होता त्यांना शेती विकायची पाळी आली. येथील सर्व मालमत्ता विकून त्यांनी शहरात बिझनेस करायचा प्लॅन केला होता. हैदारलाही बरोबर घेऊन जायला ते तयार होते. पण काळ्या मातीशी नातं निर्माण झालेला हैदर शहरात जायला तयार नव्हता. हैदरचे मालक व आमचे आजे सासरे यांची मैत्री होती. त्यांनी सासऱ्याना हैदरबाबत सांगितले. हैदर त्यावेळी १८-१९ वर्षाचा झाला होता. आपल्या समाजातील एक अनाथ मुलगा आपल्या मोहल्ल्यात ठेवून घ्यायला ते तयार झाले. आमच्या शेजारीच त्याच्यासाठी त्यांनी एक छप्पर घालून दिले व अशा प्रकारे हैदर आमच्या घराजवळ राहू लागला. आमच्या सासऱ्यासह एकूण आठ सख्खे-चुलत भाऊ होते. या आठ घरातील कोणतेही काम असो हैदर तेथे हमखास हजर असायचा. पडेल ते काम आनंदाने करायचा. थोडक्यात काय तर या आठ कुटुंबातील तो एक अविभाज्य सदस्य बनला होता. गावातील सर्वांच्या परिचयाचा तर होताच, पण या आठ कुटुंबाच्या पै-पाहुण्यांच्याही अगदी जवळचा 'नातलग' बनला होता. दिवसभर शेतात कामाला जायचा व रात्री त्या छपरात विसावा घ्यायचा. छपरात चूल होती. कधी कधी स्वयंपाक करुन खायचा! पण नावालाच. तो दिसला की आठ घरांपैकी कुणीही हैदरला ये जेवायला म्हणून बोलवायचे, घासातील घास द्यायचे. सणावाराला तर त्याची चैनीच असायची. प्रत्येकाला वाटायचे बिचारा हैदर काय खाईल? सणावाराला म्हणून प्रत्येकजण आळीपाळीने सकाळ संध्याकाळ ठरवून त्याला जेवू घालायचे. हैदरही कुणाच्या कुठल्याच कामाला नाही म्हणायचा नाही. लहान मुलांना घेऊन फिरायचा. वृद्धांना आधार द्यायचा. त्यामुळे हैदर लाडका झाला होता सर्वांचा!

       बघता बघता हैदरचे लग्नाचे वय झाले. आमच्याच एका नातेवाईकाने त्याच्यासाठी एक मुलगी पाहिली. गरीबाघरची, वडील, भाऊ नसलेली. तिच्या आईला आमच्या लोकांनी स्पष्ट कल्पना दिली आणि गोऱ्या रंगाची, शांत स्वभावाची हमीदा, साध्या भोळ्या हैदरच्या जीवनात पत्नी म्हणून आणायचे ठरले. सर्वांनी मनावर घेतल्याने लग्न थाटामाटात करायचे ठरले. हैदर नवऱ्याच्या रुपात मंडपातील स्टेजवर दाखल झाला. लग्नविधीस सुरुवात झाली. कुराणातील वचनांचे वाचन झाले. प्रार्थना झाली आणि काझीनी हैदरला विचारायला सुरवात केली, "ऐ हैदरमिया" हैदरला मित्रांनी सांगितले होते, 'मित्रा घाबरू नकोस, काझी काय म्हणेल त्याच्यामागून म्हणायचे.' मित्रांनी सांगितल्याप्रमाणे हैदरने कलमा दुवा म्हटले होते. त्याला वाटले आताही तसेच म्हणायचे आहे. हैदरने स्वतःच म्हटले "ऐ हैदरमिया" आणि मंडपात हास्याचे फवारे उडाले. या छोट्याशा छपरातच हैदरचा सुखी संसार सुरू झाला. बायकोही कष्टाळू होती.  दोघे मिळून शेतात कामाला जायचे. पोटापुरते मिळवायचे. कुठे धांदल नाही, गडबड नाही. दोघे मजेत राहू लागले. निसर्गाने आपले काम केले आणि त्यांच्या संसार वेलीवर शहिदा, वहिदा नावाच्या देखण्या कळ्या जन्माला आल्या. हमिदाची डिलिव्हरी त्या छपरातच व्हायची कारण तिची आई ही देवाघरी निघून गेली होती. आमच्या सासवा ४-८ दिवस पाणी घालायच्या. दोन महिने कसेबसे निघून जायचे आणि हमीदा बाळासह शेतात मजुरीला जायची. दिवस असेच जात होते. हमीदाला तिसरी मुलगी झाली नादिरा आणि हैदरचं डोकं सणकलं. चौथ्यांदा मुलगा होईल अशी त्या दोघांना आशा होती. आजूबाजूच्या बायका म्हणायच्या, " ह्या वेळेला मुलगाच होईल, तीन मुलींवर बऱ्याच जणींना मुलगा होतो आणि सर्व लक्षणे मुलाचीच दिसत." त्यांचं बोलणं ऐकून हैदर व हमीदा खूश व्हायचे. पण झालं भलतंच! चौथ्यांदाही मुलगी झाली. तिचे नाव जुबेदा ठेवण्यात आले. हैदर अलीकडे गप्प गप्प असायचा. त्याला लोक म्हणायचे, "हैदर ऑपरेशन करुन टाक, आता चार मुली झाल्या. या सगळ्यांच्या कसा पेलवणार? तुला कुठं इस्टेट बोंबलाय लागलीय." त्यावर हैदर म्हणायचा, "ज्यानं तोंड दिलय, तो घासही देईल, बाचं नाव सांगायला नको का? या पोरी काय निघून जातील आपापल्या घरला." समोरचा गप्पचं बसायचा. काय बोलणार त्याच्यासमोर?

        याच क्रमाने रुबेदा, रुकैय्या व सुलतानाचा जन्म झाला. हैदर हमीदा सात मुलींचे पालक झाले. प्रत्येक डिलिव्हरीत वरच्या दोघी आईची सेवा करायच्या. स्वयंपाक, धुणीभांडी करायच्या. दोघी वडिलांबरोबर मजुरीला जायच्या. या आठ घरातील छोटी छोटी कामे करायच्या. मूठ पसा आणून छोट्यांना घालायच्या. लहान तिच्यापेक्षा लहानगीचा सांभाळ करायची. आंधळ्याच्या गाई देव राखतो म्हणतात ते काही खोटे नाही. सातही मुली एकापेक्षा एक देखण्या. तीन नंबरची नादिराच नाकात जराशी सुमार होती. नाहीतर आईचा गोरा रंग, वडिलांच्या लांब नाकाची ठेवण आणि दोघांचीही कष्टाळू वृत्ती मुलींनी उचलली होती. त्या छपरातच या नऊ जणांचा संसार आरामात सुरु होता. मुली घरकामात, स्वयंपाकात, शिक्षणात एकदम तल्लख होत्या कारण आजूबाजूच्या प्रत्येक घरात मदतीला जायच्या त्यामुळे त्यांच्यात बहुश्रुतता आली होती. आपल्यापेक्षा लहान सहा बहिणींना सांभाळत शहिदा फस्ट क्लास मध्ये बारावी पास झाली. मुंबईत राहणाऱ्या एका नातेवाईकांकडून तिला मागणी आली आणि हमीदाने ठरवलं, आता एकेक कर्तव्यातून मुक्त व्हायचं. त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून ते नातेवाईक मुलगी नारळ स्वीकारायला तयार झाले. तरीपण आम्ही सर्वांनी तिचं लग्न दारातच करुन दिलं. तिला मणीमंगळसूत्र व भांडी घेऊन दिली. शहिदा सासरी निघून गेली जड अंतःकरणाने!

        इकडे अजूनही हैदरला मुलाची आशा होतीच. पण सातव्या वेळी हमीदाला डॉक्टरांच्याकडे न्यायची वेळ आली आणि त्यांनी सांगितले की आता यापुढे तिला मूल होवू दिले तर हिच्या जीवाला धोका आहे. हिचं ऑपरेशन आत्ताच करावं लागेल. त्यामुळे हैदर थोडा नरमला व ऑपरेशनला परवानगी दिली. मोठया शाहिदाप्रमाणेच वहिदा, नादिरा, जुबेदा, रुबेदा, रुकैय्या व सुलताना यांची लग्ने झाली. पाहायला येणारा मनात म्हणायचा, या सात जणीत मला काहीही मिळणार नाही. हातावरचं पोट असलेले सासू-सासरे मला काय देणार? हे गृहीत धरूनच मुली पसंत करायचा. जोडलेल्या लोकांकडून थोडाफार मानपान व्हायचा. त्यातच समाधान मानून जावई खुश व्हायचे. मुली माहेरी येतानाच नवऱ्याकडून काही बाही घेवून येतात. आई वडिलांना खाऊ घालतात. आनंदाने मुलाबाळांसह चार दिवस राहून जातात. सहाजणींना दोन दोन मुलं झाली आहेत. मुली डिलिव्हरीला आईकडे येतात पण लागणारा सर्व खर्च नवऱ्याकडून घेवून येतात. हमीदा प्रत्येकीची मनापासून सेवा करते. आईच्या मदतीला दुसरी बहीण हजर असते. सगळ्या बहिणी एकाच वेळी न येता दोघी दोघी ठरवून सणाच्या, यात्रेच्या, लग्न कार्याच्या निमित्ताने आईकडे येतात. आईवडिलांना एकटं वाटू नये म्हणून खूप काळजी घेतात. एकमेकींच्या अडीअडचणीला धावून जातात. त्या सात जावयांमध्येही एकी आहे. एकमेकांत मायेचा ओलावा व जिव्हाळाही आहे. मोठ्या मुलीची मुलगी व मुलगा लग्नाला आली आहेत. अशा प्रकारे हे मुलींचं गोकुळ आनंदाने नांदत आहे. 

        आमच्या नातीच्या लग्नाला या सातीजणींना निमंत्रण पाठवलं होतं. मुलांना सुट्टी असल्याने शहिदा आपल्या पतीसह लग्नाअगोदर चार दिवस आली होती. लग्नाच्या प्रत्येक विधीत उत्साहाने सहभाग घेत होती. मुंबईत राहून या ग्रामीण जीवनाशी फारकत झालेली शहिदा हे कार्यक्रम बघून हरखून गेली होती. अगदी लहानपणापासून तिची व माझी गट्टी असल्याने, खूप दिवसांनी तिची माझी भेट झाल्याने माझ्याशी भरभरून बोलत होती. मुंबईत ती लहान मुलांचे क्लासेस घेते. छोटे पाळणाघर चालवते. पतीच्या धंद्यात हातभार लावते. स्वतःचा फ्लॅट खरेदी केल्याचेही तिने सांगितले. स्वतःसाठी, मुलीसाठी दागदागिने घेतल्याचेही तिने सांगितले व बोलता बोलता अश्रूभरल्या डोळ्यांनी एक प्रसंग सांगितला. तो तुम्हाला सांगितल्याशिवाय पूर्ण होणार नाही.

        शहिदा म्हणाली, "चाची, पिछले साल रमजान में रातको मैने माँ को फोन किया था. मेरी माँ रमजान के पूरे रोजे रखती है, यह मेरे को मालूम था, इसलिए मैने माँ से पूछा, माँ तूने रोजा  क्या खाकर खोला?" शहिदा त्या दिवशी खूप रडली. मनात म्हणाली, "मी इथे खजूर, फळे, मिठाई खात आहे व माझी आई तिथे मीठाचा खडा खाऊन रोजा सोडत आहे. 

         शहिदाने लगेच मनीऑर्डर करुन पैसे पाठविले व आईला सांगितले, "फळे, खजूर, मिठाई आणून खा." आईने या वस्तू आणून खाल्ल्याचे सांगितल्यावरच शहिदाने या वस्तू ग्रहण केल्या. शहिदा म्हणाली, "चाची, ये साल मैने माँ के लिए चार किलो खजूर आते वक़्त लाया है." शहिदाची आईवरील ही माया पाहून वाटले की लोक हट्ट करतात मुलगाच होण्याचा? स्त्रीभृणहत्या करुन का होतात पारखे या मायेपासून?

        हैदर-हमीदाची कहाणी सांगताना महत्वाचा भाग सांगायचा राहूनच गेला की! ते दोघे त्याच चंद्रमौळी छप्परात सुखा समाधानात रहात आहेत. त्या दोघांकडे पाहतांना कुणालाही वाटेल माझ्याप्रमाणेच! किती सुखी आहेत हे दोघे! दिवसभरात जमेल तेवढं काम करतात, चार पैसे मिळवतात. मिळालेल्या पैशात चैनीत राहतात. चार पैसे साठवतात. मुली आल्या की चोळी, काकण सध्याच्या भाषेत ब्लाऊज बांगड्या करतात. नातवंडाना खाऊसाठी जमतील तेवढे पैसे देतात. आपल्या परीने एखादा चांगला पदार्थ करुन देतात. हे सगळं घडतं त्या छोट्याशा छप्परात. माझ्या लग्नाला ३५ वर्षे पूर्ण झाली तेंव्हापासून ते छप्पर त्याच जागेवर तसेच उभे आहे. कुडाच्या भींती मातीने लिंपून लिंपून गुळगुळीत झाल्या आहेत. जमीन शेणाने सारवून सारवून घट्ट झाली आहे. फरक इतकाच झाला, २००५ साली मोठा पूर आला.

        त्या छप्परात पाणी येऊन चार दिवस राहून गेले. पण छप्पर आहे तसेच राहिले. भींती दोघांनी पुन्हा लाल मातीने सारवल्या. छप्पराचा पाला काढून कुणाचं तरी घर बांधताना निघालेली कौले घातली व एक मजबूत दार व छप्परात एक न्हाणी बांधून घेतली. त्या दोघांना कोणतीही मोठी अपेक्षा नाही. मोठं घर असावं, घरात फरशा असाव्यात, भिंतीना गिलावा असावा, स्वयंपाकाला बर्शन-कट्टा असावा, स्वतःच शौचालय असावं, सरकारकडून मदत मिळावी, भरपूर बँक बॅलन्स असावा, स्वतःसाठी गाडी असावी, घराला माडी असावी, किमती साडी असावी अशी कोणतीच मोठी स्वप्ने पहाणे त्या दोघांच्या गांवीही नाही. सकाळी लवकर उठायचे, स्वयंपाक पाणी करायचे, पाळलेल्या शेळ्यांची उसाबर करायची, त्यांना पोटभर चारा घालून , न्याहारी आवरुन शेतात जायचे. सहकाऱ्यांसोबत बोलत चालत, चेष्टा मस्करी करत काम करायचे. जेवण झाल्यावर आमच्या किंवा आमच्या शेजारच्या घरात थोडा वेळ टी. व्ही. पहायचा. त्यांचे काही काम असल्यास करायचे व निवांत झोप घ्यायची.

        त्यांच्या जीवनशैलीकडे पाहून माझी मलाच कीव येते. भाड्याच्या घरातून स्वतःच्या कौलारू घरात गेलो. चांगल्या वस्तीत प्लॉट घेतला. त्यावर स्लॅबचे घर बांधण्याचा चंग बांधला. त्यातही नुसते स्लॅबचे लोड बेअरिंगचे नको. आर. सी. सी. चे घर बांधले, स्वतःपुरते नको सोबत हवी या नावाखाली भाड्याने देण्यासाठीही तीन खोल्या बांधल्या. काही वर्षांनी ते घरही जुन्या पद्धतीचे वाटू लागले म्हणून त्या घरावर पुन्हा आधुनिक पध्दतीने बंगला बांधला. आजही यांच्याकडे कुरकुर असते, घराचे गेट जुने झाले आहे, नवीन बसवा. दारातल्या सध्याच्या साध्या फरशा काढून पेव्हिंग ब्लॉक्स बसवा, म्हणजे आमच्या महत्त्वाकांक्षा थांबायचं नावच घेत नाहीत. ओव्हन घ्या, वॉशिंग मशीन घ्या, एल .ई.डी. टी. व्ही. घ्या, हे घ्या ते घ्या, अखंड घ्या चा जप चालूच आहे.

        तुम्ही म्हणाल, सतत काहीतरी घ्यायलाच हवं, त्याशिवाय आमच्या राहणीमानाचा दर्जा कसा उंचावणार? आपली प्रगती कशी होणार? मलाही पटतंय तुमचं म्हणणं, पण आहे त्यात समाधान मानून आपण सुखात केंव्हा राहणार आहोत? हैदर हमीदाप्रमाणे सुखी स्वछंदी जीवन कधी जगणार आहोत? भौतिक सुविधांच्या मागे लागून खरे सुख कशात आहे हे पाहणार आहोत की नाही आपण? का सतत सुखाच्या मृगजळामागे असेच धावत रहाणार आहोत? 

        मध्यंतरी हैदरच्या जावयांनी मुलींनी आहे ते छप्पर पाडून घर बांधून देण्याचा विचार केला पण या दोघांनी नकार दिला. ग्रामपंचायतीनेही त्याला घरासाठी जागा व इंदिरा आवास योजनेतून घर बांधून देण्याचे ठरविले पण त्यालाही या दोघांनी नकार दिला. या मोहल्ल्यात आमचा जन्म गेला, मुली वाढल्या, हे घर सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. देवाघरी जाताना ही तुमची जागा तुम्हाला देऊन जाऊ. कुठं शिकले हे शहाणपण? हे दोघे म्हणतात, "ते राजास जी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या."

        सुखी माणसाचा सदरा कोणी शोधावयास आलं की सांगा त्यांना आमच्या हैदरचा मळलेला शर्ट खुशाल घेऊन जा. शर्ट नेल्यावरही हैदर मस्त मजेत गाणं म्हणत बसेल, गाण्याच्या तालावर मनसोक्त नाचेल व ते पाहून हमीदा पोटभरून हसेल! 

        

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

असे हे पती! - मराठी कथा


" असे हे पती! "

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

फोटो साभार: गुगल


       माझी मैत्रिण पुष्पा हिने तिच्या मिस्टरांकडे म्हणजेच माझ्या दाजींकडे नेकलेस करण्याचा हट्ट धरला होता. तिला नेकलेस घालून मिरवायची फार हौस होती. सुरुवातीला त्यांनी नकार दिला, पण पुष्पा नाराज झाली हे पाहून त्यांंनी नाही हो म्हणता होकार दिला, परंतु एका अटीवर. पुढच्या महिन्यात पुष्पाच्या भाचीचं लग्न होतं. त्या लग्नात तिने नेकलेस सुटकेसमधून न्यायचा, पण गळ्यात घालायचा नाही, कुणालाही दाखवायचा नाही. कुणालाही नेकलेस केला आहे असं सांगायचं नाही. जर या अटींपैकी एखादी गोष्ट तिच्या हातून घडली, तर पुढील दहा वर्षांत पुन्हा एकही दागिना मागयचा नाही. पुष्पाने विचार केला अटी पाळणे अवघड आहे पण एकाच कार्यक्रमाचा तर प्रश्न आहे. पुष्पाने असा विचार करुन दाजींना म्हटलं, "ठीक आहे, मला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत."

       अगदी मनासारखा नेकलेस तयार झाला. लग्नास जातांना सुटकेसमध्ये पुष्पाने आठवणीने नेकलेस घेतला. लग्नाच्या दिवशी दाजी डोळ्यात तेल घालून पुष्पाच्या पाळतीवर होते. पुष्पाला कित्येक वेळा आईला, बहिणींना, भावजयीला नेकलेस दाखविण्याचा मोह झाला पण तिने मोठ्या प्रयासाने मोह आवरला. लग्न पार पडले, लांबचे पाहुणे निघून गेले, रात्रीचे जेवण झाले, पुरूष मंडळी माडीवर झोपण्यासाठी निघून गेली, बायकांची आवराआवर झाली. आत्ता मात्र पुष्पाला चैन पडेना. तिने माडीवरचा अंदाज घेतला. सर्वजण झोपी गेल्याची तिची खात्री झाली. तिने हळूच सुटकेसमधून नेकलेस काढून घेतला व सर्वांना कौतुकाने दाखवू लागली. नेमक्या त्याच वेळी दाजी खाली येत म्हणाले, "छान, माझी पुढची दहा वर्षे सुटका झाली दागिन्यातून." पुष्पाची अवस्था मात्र पुतळ्यासारखी झाली.

तर 'असे हे पती' महाचलाख!

सोमवार, २७ जुलै, २०२०

कुणी सून देता का सून - मराठी कथा.


" कुणी सून देता का सून? "

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

        सुशीलाताई धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांचे उपास-तापास, देवधर्म, व्रतवैकल्ये, नवस सुरू होते. पण का कोण जाणे, कुठलीच देव-देवता प्रसन्न होत नव्हती. त्या दोघांची नाराजी वाढतच चालली होती. प्रकाश आईबाबांची धडपड पहात होता पण काही करू शकत नव्हता. येणारा प्रत्येक दिवस कामात व्यस्त राहून कसातरी ढकलत होता. मुलींच्याकडून येणारे नकार पचविण्याची सवय लावून घेत होता.

        सुशीलाताई एके दिवशी नित्याची भरमसाठ कामे संपविल्यावर क्षणभर डोळे मिटून पहुडल्या. त्यांच्यासमोर त्यांचा जीवनपट चलतचित्रपटाप्रमाणे सरकू लागला. वयाची अठरा वर्षे संपायला कांही महिने कमी असतानाच त्यांनी या घराचे माप ओलांडले होते. पंचवीस तीस सदस्यांच्या एकत्र कुटुंब पद्धतीत असलेल्या या शेतकरी कुटुंबात आल्या. त्यांच्या तिघी जावानां दोन तीन मुलेबाळे होती पण लग्न होवून सात वर्षे झाली तरी त्यांच्या संसारवेलीवर फूल फुलत नव्हते. या दरम्यान त्यांनी कितीतरी वेळा अपमान सहन केला. वांझोटी म्हणून बोलणी खावी लागली. नशिबाचा भोग म्हणून सर्व सहन केले. परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवली. त्याचे फळ म्हणून की काय प्रकाशच्या रूपात एकुलता एक पुत्र परमेश्वराने दिला. त्या दोघांचे जीवन खऱ्या अर्थाने प्रकाशमान झाले. गोऱ्या गोमट्या गुटगुटीत प्रकाशने सर्वांची बोलतीच बंद करून टाकली.

        प्रकाश दिसामासाने मोठा होत गेला. त्याच्या शांत व सुस्वभावाने सर्वांची मने जिंकली. आईबाबाना शेतीकामात मदत करत करत शिक्षण घेऊ लागला. अभ्यासात फारसा हुशार नव्हता तरी सत्तर टक्केच्या आसपास मार्कस् मिळवून उत्तीर्ण होत गेला. शेतीच्या कामात मात्र बापसे बेटा सवाई होता. बी.ए. झाल्यावर त्याने आधुनिक शेती करण्याचे ठरविले होते. शेतीत नवनवे प्रयोग करून उत्पन्न वाढवू लागला. त्यामुळे जो तो त्याची तारीफ करू लागला. प्रकाशने पंचविशी कधी ओलांडली कळलेच नाही. त्याच्या बरोबरीच्या मुलांच्या लग्नाचे बार उडू लागले. प्रकाशचे लग्न थाटामाटात करायचा मनसुबा रचून एका शुभमुहूर्तावर मुली पहाण्यास सुरूवात केली पण आजतागायत तो मुहूर्त शुभ आहे असे वाटत नाही. पहिल्या वर्षी दहा बारा मुली पाहिल्या. काही मुली त्यांना पसंत पडल्या नाहीत, तर काहीना शेती करणारा प्रकाश पसंत पडला नाही. पहिलं वर्ष असंच गेलं, वाटलं ठीक आहे. पुढच्या वर्षी योग जुळून येईल, पण दुर्दैव आमचे प्रत्येक वर्ष असेच  जात आहे.

         थोडीशी सावळी असू दे, कमी उंचीची किंवा जास्त उंचीची असू दे, खर्च मानपान न करणारी असू दे या निष्कर्षापर्यंत ते आलेत पण नकार कांही संपत नाही. मुलाचं लग्न जुळावे म्हणून कित्येक एजंटाना भेटून झाले. अर्थपूर्ण व्यवहारही झाले पण दोन तीन मुली दाखविण्यापलीकडे त्यांनी काहीच केले नाही. अनेक वधू वर सूचक मंडळाच्या मेळाव्याला भाऊसाहेब हजर राहिले. त्यांच्यासारखेच समदुःखी मित्र त्यांना भेटले. त्यांच्याकडून हल्लीच्या मुलींच्या व त्यांच्या पालकांच्या उंचावलेल्या अपेक्षा ऐकून मन सुन्न झाले.

        कुणालाच शेती करणाराई नवरा, किंवा जावई नको आहे. प्रत्येकाला इंजिनिअर, उच्चपदस्थ अधिकारी, जम बसलेला, स्थिर-स्थावर झालेला डॉक्टर जावई हवा. पगार पॅकेज भरमसाठ असावे. किमान पन्नास साठ हजार दरमहा मिळविणारा हवा. मुलाला नोकरी शक्यतो मुंबई पुण्यातच हवी, निमशहरी गावात नको. त्याचा स्वतःचा अलिशान व चांगल्या वस्तीत पुण्यात, मुंबईत  फ्लॅट हवा. मुलाचे आईबाबा फ्लॅटमध्ये फक्त विशिष्ट ठिकाणीच फोटोत चालतील. ते गावाकडेच राहणारे असावेत. इतक्या अपेक्षा पूर्ण झाल्यावर तरी अपेक्षासत्र थांबेल असे वाटते, परंतु तसे होत नाही. मुलाला गावाकडे सर्व सुविधानीयुक्त घर हवे. कमीत कमी चार ते पाच एकर बागायती शेती हवी. नुसती आहे शेती याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाहीत, सातबारा पाहिला जातो. उतारा फार पूर्वीचा नको दोन चार दिवसापूर्वीच काढलेला हवा. काय म्हणावे या मुलींच्या पालकांच्या अपेक्षांंना?

        वधू वर मेळाव्यात मुलांच्या बाबांची चर्चा झाली. एवढ्या सगळ्या अपेक्षांची पूर्ती करून कन्यादान  करून दिलेल्या मुलीने जीवनात पुढे काय करायचे? त्या दोघांच्या कार्यकर्तृत्वाला संधी देणार आहेत की नाहीत हे लोक? पैशापेक्षा, इस्टेटीपेक्षा, माणुसकीला, सुस्वभावाला किंमत देणार आहेत की नाही हे लोक? या चर्चेमध्ये चुकून सामील झालेला एक मुलीचा बाप म्हणाला, "आम्ही मुलीला शिकवतो खर्च करून लग्न करून देतो. उद्या हिच्या नवऱ्याचं काही बरंवाईट झालं तर मुलीनी करायचं काय? म्हणून आम्ही आधीच सर्व बघून सवरून निर्णय घेतो." भाऊसाहेबांंना या सर्व चर्चा ऐकून वाटले, मुलींना समजावून सांगावे पालकांनी, अगं पोरी, मातीतून मोती  पिकवणाऱ्या सोन्यासारख्या पोरांना नाकारू नका.  धडधाकट, उमदा, स्वकर्तुत्वावर जगणारा, सुस्वभावी, स्वावलंबी, स्वाभिमानी मुलाला पसंत करा व सुखाने संसार करा.

माझ्यासारख्या आर्त सासऱ्याची सून बनून घराला घरपण द्या. मग काय म्हणता वाचकहो। मी तुम्हाला विचारतेय, 

कुणी सून देता का सून?