रमजान : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक
डॉ.ज्युबेदा मन्सूर तांबोळी
मुस्लिम समाजातील पाच वेळा नमाजपठण करणाऱ्या बांधवाबद्दल मुस्लिमेतर सर्वच बांधवांच्या मनात आदराचे स्थान आहे. त्यामुळे या देशाची संस्कृती, रितीरिवाज, लोकपरंपरा या सर्वाबद्दल सर्वांना माहिती आहे. धर्म भिन्न असले तरीही सहजीवन, समाजातील वावर, एकमेकांशी असलेला व्यवहार यामुळे एकमेकांच्या नात्यातील वीण घट्ट बांधलेली आहे. कोणत्याही हिंदू किंवा इतर धर्मिय बांधवांचा एखादा तरी अत्यंत जवळचा मुस्लिम मित्र नाही, असे फार क्वचित दिसेल. प्रत्येक मुस्लिम बांधवाचा एक तरी हिंदू बांधव अत्यंत जिवलग मित्र असतोच. याच मैत्री, प्रेम आणि बंधुतेच्या धाग्यामुळे ते एकमेकांचा आदर करतात. यातूनच रमजान महिन्यात अनेक हिंदू बांधव रोजाधारकांचा आदर करतात. तसेच बरेच हिंदू बांधव रोजे करतात. सत्ताविसावा रोजा खासकरून करतात. मुस्लिम बांधवांना इफ्तारसाठी मिठाई, फळे पाठवतात.
अलिकडच्या काळात असामंजस्यामुळे आणि काही राजकीय खेळीमुळे यासंबंधात दुरावा आणला जात असला तरी भारतातील सर्व धर्माचे बांधव सुज्ञ आणि विचारी आहेत. त्यामुमळेच तर हिंदू मुस्लिम ऐक्याचे सहजीवन शेकडो वयापासून अबाधित आहे. आपला देश एका शरीराप्रमाणे आहे. शरीराच्या कोणत्याही अवयवाला जर इजा झाली तर संपूर्ण शरीराला अस्वस्थता येते. वेदना, यातना भोगाव्या लागतात. आपले शेजारी, आप्त मंडळी सुखी समाधानी असतील. तरच आपण सुखी होवू शकतो. खरे तर आपण सारेच एकाच आई वडिलांची, एकाच धर्माची लेकरे आहोत. हा बंधुभाव सर्वांनी आपल्या मनात कायम ठेवून तो वृध्दींगत केला पाहिजे. इस्लामची तशी शिकवणच आहे, की सर्व माणसांनी एक समुदाय बनून राहिले पाहिजे. जसे की ईश्वराने त्यांना समुदायाच्या रूपात जन्मास घातले आहे असे पवित्र कुरआनमध्ये नमूद आहे. प्रारंभी लोकांचा एकच समुह समाज होता. (अलब क्र.२:२३१)
अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी जास्त ईशपारायण आहे. म्हणजेच अल्लाहचे भय ठेवून सदाचार करणारा आहे. (अल्हजरात ४९:१३) आपल्या प्रतिष्ठेचे आणि यशाचे निकष आपला सदाचार आणि ईशपारायणात आहे. आपण सर्वांनी सर्वांशी हा बंधुभाव जोपासला तरी आपले जगणे व सहजीवन सुलभ आणि सहज होईल. नेमकी हीच संधी आपणास रमजान महिना करून देतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा