बुधवार, २६ मार्च, २०२५

व्यापारात नितीमत्ता शिकविणारे हजरत उस्मान बिन अफ्फान (रजि.)

                      डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी


                            फोटो:साभार गुगल


        हजरत उस्मान बिन अफ्फान (रजि.) यांनी बाजारपेठेतील ज्यू व्यापाऱ्यांच्या वागणुकीचा अभ्यास करून शुध्द इस्लामी पध्दतीने मदीना येथे व्यपार सुरू केला. मालाची गुणवत्ता स्पष्ट करण्याची पध्दत सुरू केली. हलका माल व भारी माल वेगवेगळा केला. सुका माला व ओला माल वेगवेगळा ठेवला व त्याच्या किमतीही गुणवत्तेप्रमाणे कमी अधिक ठेवल्या. तसेच मक्काहून येताना त्यांनी प्रचंड संपत्ती आणलेली असल्यामुळे मुळ भांडवल बिनव्याजी मिळाले. त्यामुळे कमी किमतीत ते माल विकू लागले. खोट्या शपथा खाणे निषिध्द असल्याने त्यांनी खरे बोलून व्यापार सुरू केला. दुकान उघडण्याच्या व बंद करण्याच्यावेळा निश्चित केल्या. हजरत मुहमंद पैगंबर (स.अ.) यांच्या आदेशाप्रमाणे प्रामाणिकपणे व्यापार सुरू केला. त्यांना इतर मुस्लिम व्यापाऱ्यांची मोलाची साथ मिळाली व अल्पावधीतच मदिना बाजारपेठेचा नूर पालटला व ज्यू व्यापाऱ्यांच्या एकाधिकारशाहीला हादरे बसू लागले.


        ह.उस्मान बिन अफ्फान (रजि.) यांचे दातृत्व सर्वविधीत होते. त्यांनी अनेक व्यापाऱ्यांना बिनव्याजी कर्ज देवून बाजारपेठेत उभे केले. पैगंबरसाहबांनी सुरू केलेल्या मस्जिदीसाठी हजरत अबुबकर (रजि.) यांनी जो जमिनीचा तुकडा खरेदी केला होता त्यावर मस्जिदीच्या बांधकामाचा सर्व खर्च त्यांनी केला. त्यानंतर साठ वर्षांनी विस्ताराचा खर्चही त्यांनी उचलला. लढायांमध्ये त्यांनी सढळ हाताने संपत्ती खर्च केली. एकदा पैगंबर साहेबांनी स्वतः सांगितले की, इस्लामच्या विस्तारामध्ये हजरत उस्मान (रजि.) यांच्या संपत्तीचा मला जेवढा उपयोग झाला तेवढा कोणाच्याच संपत्तीचा झाला नाही. यावरून त्यांच्या दातृत्वाची कल्पना येते. मदिनामध्ये एक गोड पाण्याची विहिर होती व ती कधीच आटत नव्हती. ती विहिर एका ज्यू व्यापाऱ्याच्या खाजगी मालकीची होती. हजरत उस्मान (रजि.) यांनी लोकांच्या पाण्याची अडचण लक्षात घेवून ती विहिर दहा हजार दिरहम देवून खरेदी केली व ती सर्वासाठी खुली केली. लोकांची सोय झाली.


        सन ६२४ मध्ये ह. रूकैय्या यांची अल्पशा आजाराने निधन झाले. तेव्हा पैगंबरसाहेबांनी आपली दुसरी कन्या उम्मे कुलसूम (रजि.) ज्या विधवा झाल्या होत्या. त्यांचा विवाह ह.उस्मान (रजि.) यांच्याशी करून दिला. हजरत उस्मान (रजि.) यांची तृतीय खलिफा पदी निवड ते सत्तर वर्षाचे असताना झाली. ते बारा वर्षे खलिफा पदावर कार्यरत होते. दुर्दैवाने त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेत कुफा व सिरीयामधून आलेल्या दोन हजार मुस्लिमांच्या बंडखोर गटाने त्यांच्यावर हल्ला करून शहीद केले. अशा महान शहिदास सलाम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा