अतिथी सत्कार हे महान कृत्य
डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी
फोटो:साभार गुगल
इबादत से जन्नत और खिदमतसे खुदा असे म्हटले जाते. याचा अर्थ असा भक्ती व प्रार्थना केल्याने स्वर्ग प्राप्ती होते. आणि अतिथींचा सत्कार (पाहुणचार) केला तर अल्लाहची प्राप्ती होते, असा महत्वपूर्ण संदेश इस्लाम देतो.
भारतीय संस्कृतीचा एक महत्वाचा स्तंभ अतिथी देवो भव यापेक्षा वेगळा कोणता संदेश देतो. आपल्या घरी पाहुणा आला तर त्याला अत्यंत सन्मानाने वागविले पाहिजे. त्यांच्याशी गोड भाषेत बोलले पाहिजे, असे हजरत मुहंमद पैगंबर सल्लल्लाहू अलैहिवस्सलम आपल्या अनुयायास शिकविले. आपणास त्रास झाला किंवा आपली गैरसोय झाली तरी त्याची पर्वा न करता आपण पाहुण्यांच्या सुखसोयीकडे लक्ष दिले पाहिजे. पवित्र कुरआनमध्ये (१०:६९) याचा संदर्भ आला आहे. इस्लामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव नसल्याने भेटावयास आलेली व्यक्ती जगाच्यादृष्टीने कितीही हलक्या दर्जाचा असली तरीही तिचा आदरपूर्वक सन्मान व्हावा.
एकदा हजरत मुहंमद पैगंबर (स.अ.) आपल्या सोबतियांबरोबर बसलेले असताना एक पाहुणा आला. पैगंबर साहेबांनी उपस्थितांना विचारले, आहे कुणी ! जो या पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था करू शकेल ? कुणीही पुढे सरसावला नाही. दुसऱ्यांदा विचारले असता एक सोबती उठला आणि त्याचे पाहुण्याला घरी नेले. पत्नीला विचारले असता उत्तर मिळाले, की घरात दोनच नान आहेत आणि मुले अजून जेवली नाहीत. ते पत्नीला म्हणाले, की काळजी करू नकोस. मुलांना कसेबसे गोष्टी सांगून झोपव. मी काही बहाणा करून दिवा विझवतो. दोघे अंधारात जेवायला बसले. सोबती पाहुण्याबरोबर जेवण केल्याचा अभिनय करत होते. पूर्ण परिवार उपाशी झोपला. पाहुण्याला मात्र त्यांनी उपाशी झोपू दिले नाही.
इस्लाममध्ये सतकृत्याची फार मोठी कदर आहे. मनुष्याचा मोठेपणा हा नेहमी सत्कृत्यावरून मोजला जातो. नुसता अफाट पैसा, उच्च प्रतिचा मानसन्मान किंवा खानदानी घराणे यामुळे मोठेपणा प्राप्त होत नाही. मोठेपणा प्राप्त करण्यासाठी सत्कृत्य केले पाहिजे. (पवित्र कुरआन २:१९५) ही शिकवण पवित्र कुरआन देते. हजरत मुहमंद पैगंबर (स.अ.) प्रवचन करीत असता सत्य, सदाचार, या विषयावर बोलताना म्हणाले की, प्रत्येक सत्कार्य म्हणजे परोपकारच होय. रस्त्यावर पडलेले दगड, कोटेकुटे दूर करणे, तहानलेल्यांना पिण्यासाठी पाणी देणे या सर्व गोष्टी परोपकाराच्या सदरात येतात. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव असा परोपकार करून पुण्य मिळवतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा