मंगळवार, ११ मार्च, २०२५

नमाजमध्ये एकाग्रता ठेवा

 नमाजमध्ये एकाग्रता ठेवा 

               ✍️:डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी


                         फोटो:साभार गुगल


        दररोज पाचवेळा मस्जिदअमनमध्ये नमाजसाठी जात असे. एके दिवशी काय झाले कुणास ठाऊक, तो हाफिजीना म्हणाला, मी उद्यापासून मस्जिदमध्ये नमाजला येणार नाही. यावर हाफिजी म्हणाले, का काय झाले, का नाही येणार. अमन म्हणाला, मी दररोज बघतो की लोक इथे येवून गप्पा मारतात. काहीजण नेहमी फॅनखालचीच जागा , विषयाला सोडून इतर गोष्टीवर चर्चा करण्यात वेळ घालवतात. अमका नमाजला येत नाही, तमका वर्गणी देत नाहीत याबद्दल बोलतात म्हणून मी उद्यापासून येणार नाही.


       अमनच्या बोलण्यावर हाफिजी शांतपणे बसले व नंतर म्हणाले, ठीक आहे तु म्हणतोस ते पण अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मी तुला काहीतरी सांगू इच्छितो ते कर. अमन म्हणाला, सांगा मी तयार आहे. हाफिजी म्हणाले, हा पाण्याने भरलेला काचेचा ग्लास घे आणि मस्जिदीभोवती दोन प्रदक्षिणा घाल. परंतू माझी एक अट आहे की प्रदक्षिणा घालताना पाण्याचा एक थेंबसुध्दा खाली पडता काम नये. अमन म्हणाला, हे तर फारच सोपे काम आहे. ग्लास घेवून तर दोन प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्यात काय मोठं काम आहे.


       अमन ग्लास धरून प्रदक्षिणा घालू लागला. ग्लास पाण्याने काठोकाठ भरलेला होता. भरभर चालता येत नव्हते. कारण पाण्याचा थेंब खाली पडण्याची भिती होती. अमनने दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या व हाफिजीजवळ गेला. हाफिजीनी अमनला तीन प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता प्रदक्षिणा घालताना तू लोकांच्या गप्पा ऐकल्यास, तुझ्या मनात त्यांच्या गप्पांचा विचार आला. दुसरा प्रश्नहोता, ठराविक लोक फॅनखालची जागा घेतात हा विचार आला. तिसरा प्रश्न होता लोकांच्या भक्ती सोडून चाललेल्या चर्चाबद्दल विचार मनात आला. अमन म्हणाला, मला यातलं काहीच मनात आले नाही. तसा विचारही मी केला नाही. माझे लक्ष फक्त या ग्लासकडेच होते. हाफिजी म्हणाले, पाणी खाली पडू नये म्हणून तू पूर्णपणे एकाग्र झाला होतास म्हणून तुझ्या मनात इतर गोष्टी आल्या नाहीत. यापुढे जेव्हा तू मस्जिदीमध्ये येशील तेव्हा एकाग्र होवून नमाजपठण कर. इतर गोष्टीबद्दल विचार करून नकोस. अल्लाह आपल्याकडे पहात आहे किंवा आपण अल्लाहना पहात आहोत असा भाव मनात ठेवनू अल्लाहची उपासना कर. अल्लाह तुला क्षमा करतील. तुझ्या इच्छा पूर्ण करतील. आपली नमाज कबुल होईलच ही खात्री बाळग.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा