शनिवार, २२ मार्च, २०२५

जकात देताना उद्देश चांगला हवा

जकात देताना उद्देश चांगला हवा

                    डॉ.ज्युबेदा मन्सूर तांबोळी 

                         फोटो: साभार गुगल 


       पवित्र कुरआनच्या आज्ञेप्रमाणे इस्लाम धर्माची इमारत मुख्य पाच स्तंभावर उभी आहे. या पाच स्तंभापैकी चौथे तत्व आहे दानधर्म. याला इस्लाम धर्मात जकात असे म्हणतात. आपल्या एकूण उत्पन्नापैकी २ टक्के रक्कम गरीब गरजू लोकांना दान करायची असते. जकात देताना देणाऱ्याचा उद्देश प्रामाणिक व स्वच्छ असावा हे सांगणारी कथा.


        रफिकखान नावाचा एक श्रीमंत मनुष्य होता. सचोटीने व्यापर धंदा करत होता. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे या तत्वाचे तो पालन करत होता. मिळालेल्या उत्पन्नातून तो गरजूना मदत करायचा. त्याला प्रसिध्दीची अजिबात हाव नव्हती. कोणत्याही प्रकारचा दिखाऊपणा जकात देताना तो करायचा नाही. एकदा त्याने जकात दयायचे ठरविले. पण जकात रात्रीच्यावेळी करायची तेही स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून करायची. जेणेकरून जकात देताना कुणी पाहणार नाही व स्वतःलाही कुणाला जकात दिली हे कळणार नाही. रफिकखानचा उद्देश खरा, प्रामाणिक होता.


        ठरल्याप्रमाणे त्याने रात्रीच्या वेळी डोळे बांधून एका व्यक्तीला जकात दिली. दुसऱ्या दिवशी चर्चा झाली. काल एका वेड्या माणसाने चोराच्या हाती पैशाचे पाकिट दिले. रफिकखान नाराज झाला. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा त्याचप्रकारे जकात दिली. दुसऱ्या दिवशी चर्चा झाली. त्या वेड्या माणसाने एका वेश्या स्त्रीला पैशाचं पाकिट दिले. रफिकखानला वाटले अल्लाहनी जकता मान्य केली नाही. नाउमेद न होता त्याने तिसऱ्या दिवशीही तीच कृती केली. दुसऱ्या दिवशी चर्चा झाली. त्या माणसाने एका श्रीमंताला पैशाचे पाकिट दिले.


        रफिकखान नाराज होवून एका जाणकार हाफिजीकडे गेला व त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. हाफिजी त्याला पूर्णपणे ओळखत होते. ते म्हणाले, बिल्कुल निराश होवू नकोस. जकात देण्याबाबतचा तुझा उद्देश चांगला होता. प्रामाणिक होता. तु चोराला जकता दिलीस त्यामुळे चोराला वाटेल की चोरी न करताही अल्लाह आपल्याला देत आहे. मग मी चोरी कशाला करू. वेश्या स्त्रिला वाटत असेल देहविक्री न करताही अल्लाह आपल्याला देत आहे. मग मी देहविक्री कशाला करू. श्रीमंताला वाटले असेल माझ्याकडे एवढी श्रीमंती आहे त्या दात्याप्रमाणे मी ही दानधर्म केले पाहिजे.


       या कथेचा सारांश असा की, दानधर्म करावा पण ते या कानाचे त्या कानाला कळू नये. प्रसिध्दी करू नये. दानधर्म करण्याचा हेतू चांगला असावा. अल्लाह त्याचीच जकात मंजूर करतो ज्याची नियत (उद्देश) साफ आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा