हजरत मुहमंद पैगंबर (स.अ.) यांचे झाडांबाबतचे विचार
✍️: डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी
फोटो : साभार गुगल
इस्लामचे प्रेषित हजरत मुहमंद पैगंगर सल्लल्लाहू अलैहिवस्सलम प्रवासात असताना एकदा दोन कबरीजवळ पोहोचले. ते त्या दिवशी थोडे विचलित झाले. त्याने जवळच असलेल्या एका झाडाच्या दोन फांद्या तोडल्या आणि दोन्ही कबरीवर रोवल्या. त्यांची ही कृती पाहून सोबत्यांनी त्यांना असे करण्याचे कारण विचारले तेव्हा पैगंबरसाहेब म्हणाले, या कबरीत असलेल्यांना अजाब म्हणजेच यातना होत आहेत. मला याची जाणीव झाली. मी या फांद्या कबरीवर खोचल्या आहेत. या डहाळ्या जोपर्यंत वाळत नाहीत, तोपर्यंत त्या डहाळ्या अल्लाहच्या नावाचा जप करत राहतील आणि त्यामुळे कबरीत असलेल्यांच्या यातना दूर होतील.
हजरत मुहमंद पैगंबर सल्लल्लाहू अलैहिवस्सलम यांच्या या कृतीने एक गोष्ट अशीही सिध्द होते की, आजपासून १४०० वर्षापूर्वी पैगंबर साहेबांना या विधानाची जाणीव होती की, झाडे सजीव आहेत म्हणूनच ते अल्लाहच्या नावाचा जप करू शकतात. म्हणजेच श्वास घेतात. झाड वाळल्यानंतर कदाचित ते मरत असतील. पण जिवंतपणी मानवासाठी वरदान ठरतात. आणखी एके दिवशी पैगंबर साहेबांनी सांगितले आहे की, झाडांना सुर्यास्तानंतर हात लावून त्रास देवू नका. कारण ही वेळ त्यांच्या विश्रांतीची असते. त्यांची झोपमोड करणे पाप आहे. १४०० वर्षापूर्वी प्रेषितसाहेबांनी केलेली ही कृती त्यांच्या दूरदर्शीपणाची साक्ष देते.
पैगंबर साहेबांच्या वचनसंग्रहात एक विलक्षण वचन असे आहे. ज्यात प्रेषित हजरत मुहमंद (स.अ.) फर्मावतात की, तुम्ही प्रलय येत असलेला पाहत असाल आणि तुमच्या हातात खजुराच्या झाडाचे रोपटे असेल तर आधी त्याचे रोपण करा. झाडे, पर्यावरण याबाबत प्रेषितसाहेबांनी दिलेली ही केवळ एक सूचना नसून संपूर्ण मानवजातीला जणू काही आदेशच देण्यात येत आहे. त्यांना प्रलयाची कल्पना होती. आपणास माहिती आहे की, प्रलयानंतर विश्वात काहीच उरणार नाही. तरीसुध्दा प्रेषितसाहेब झाडे लावण्याचा आग्रह करीत आहेत. यातून आपण झाडे आणि पर्यावरणाच्या संरक्षणाची आवश्यकता समजू शकतो. पवित्र कुरआनात अनेक अध्यायामधून पर्यावरणाचे संरक्षण करण्याची ताकीद दिली आहे. झाडे लावून पर्यावरण संरक्षण करण्याची जबाबदारी तुमची, आमची आपल्या सर्वांची आहे. म्हणून यावर्षी रमजानमध्ये झाडे लावून ती वाढवण्याचा संकल्प करूया.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा