शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

इंदिरा गांधी: एक कणखर नेतृत्व - विशेष मराठी लेख


       ३१ ऑक्टोबर हा भारताच्या माजी पंतप्रधान प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचा दिवस त्यानिमित्ताने हा विशेष लेख


इंदिरा गांधी: एक कणखर नेतृत्व

लेखिका: डॉ ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       आज मी जिवंत आहे. कदाचित् उद्या मी नसेनही. पण कांहीं झालं तरी माझ्या रक्ताचा थेंबन् थेंब देशाच्या कामी येईल. माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात बिहार प्रांताच्या पाच दिवसाच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. ३० ऑक्टोबर १९८४ रोजी, दौऱ्याच्या शेवटच्या दिवशीच्या  भाषणात त्यांनी वरील उद्गार काढले होते. जणू कांही त्यांना आपलं भविष्य कळलं असावं.


       २७ मे १९६४ रोजी पंडीत नेहरू स्वर्गवासी झाले. इंदिराजींचा खंबीर आधार गेला. पण पित्याप्रमाणे पाठीशी असलेल्या लालबहादूर शास्त्रीजी नेहरूजींच्या नंतर पंतप्रधान झाले. त्यांनी इंदिराजींना नभोवाणी प्रसारणमंत्री केले. इंदिराजींनी केवळ अठरा महिन्यात आपल्या खात्यात सुधारणा केल्या. टेलिव्हिजनवर लहान मुलांचे कार्यक्रम, शालेय कार्यक्रम सुरु केले. त्या कालावधीत त्यांनी रशियाचा दौराही पार पाडला. भारत आणि पाकिस्तान या युद्धाबाबत चाललेल्या बैठकीमध्ये भारताची बाजू परराष्ट्राच्या लोकांना पटविण्यात इंदिराजीना यश मिळाले.


    ११ जानेवारी १९६६ रोजी शास्त्रीजींचा मृत्यू झाला आणि इंदिराजींना पंतप्रधानपद मिळाले. २४ जानेवारी १९६६ रोजी वयाच्या ४८ व्या वर्षी इंदिराजींना पंतप्रधानपद मिळाले. जगातील दुसऱ्या स्त्री पंतप्रधान म्हणून सर्वांनी त्यांचा गौरव केला. संकटसमयी विचारपूर्वक निर्णय त्या घेत असत. त्यांची काम करण्याची एक विशिष्ट पद्धत होती. रोज एक तास जनतेच्या तक्रारी ऐकून त्यांचे प्रश्न सोडवायचे काम त्या करीत असत. देशाला पुढे आणण्यासाठी, इतर देशांशी मैत्रीचे संबंध ठेवण्यासाठी त्या झटत असत.


      अनेक संकटांंशी सामना करून इंदिराजींनी धाडसाने आणि धीराने प्रत्येक प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान पासून पूर्व बंगालमधील जनता स्वतंत्र होऊ इच्छित होती. त्यासाठी त्यांनी पूर्व बंगालच्या जनतेच्या मदतीला भारतीय सैन्य पाठविले. या मदतीमुळेच १९७१ साली पूर्व बंगाल स्वतंत्र झाला. सन १९७२ सालच्या निवडणूकीत इंदिराजींच्या पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले. १९७५ साली त्यांनी आणीबाणी पुकारली. त्यांचा हेतू असंतोष रोखण्याचा होता पण कांही सहकाऱ्यांमुळे आणीबाणीतील अधिकाराचा दुरूपयोग झाला. त्यामुळे लोकमत बिघडले. १९७७ साली त्यांच्या पक्षाचा फार मोठा पराभव झाला. १९८० च्या जानेवारीत झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी परत इंदिराजींना प्रचंड बहुमताने निवडून दिले. हा त्यांच्या कणखर नेतृत्वाचा विजय होता.


       २३ जून १९८० रोजी त्यांचे चिरंजीव संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन झाले. इंदिराजींवर फार मोठा आघात झाला पण त्यातूनही सावरून त्यांनी जुलै महिन्यात नऊ दिवसाचा अमेरिका दौरा केला व भारत अमेरिका संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. तेथील लोकांचे प्रेम संपादन केले. त्याच वर्षी त्यांच्या पुढाकाराने भारतात नवव्या 'एशियाड' खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर १९८३ च्या सात ते दहा मार्च यादरम्यान नवी दिल्ली येथे अलिप्त राष्ट्र परिषद भरविण्यात आली. त्यात इंदिराजींची परिषदेच्या अध्यक्षपदी निवड सर्व देशांच्या प्रतिनिधींनी एकमताने केली. १९८० साली २७ नोव्हेंबर पासून नवी दिल्ली येथे राष्ट्रकुल परिषदेचे आयोजन करण्यात इंदिराजीनी पुढाकार घेतला.


       ज्याप्रमाणे देशात इंदिराजींना सन्मान मिळाला त्याप्रमाणेच देशाबाहेरही मिळाला.

  • १९५३ साली अमेरिकेने त्यांना मातृ पारितोषिक दिले.
  • १९६० साली येल विद्यापीठातर्फे हॉलंड मेमोरिअल हे पारितोषिक त्यांना देण्यात आले.
  • १९६५ मध्ये रोममध्ये 'इझाबेल डी एस्टे' नावाचे पारितोषिक त्याना मिळाले.
  • रोमन अकादमीकडून 'राजधुरंधर महिला' म्हणून इंदिराजींना प्रथम सन्मान मिळाला.


       १ मे १९६० ला द्विभाषिक राज्य संपले आणि संयुक्त महाराष्ट्र तयार झाला यामागे मुख्यत्वे इंदिराजींचे प्रयत्न होते.


    खलिस्तानवादी अतिरेक्यांनी अमृतसरमधील शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिराचा आश्रय घेऊन दहशतीची कृत्ये सुरू केल्यामुळे नाईलाजाने इंदिराजीना ६ जून १९८४ रोजी सुवर्णमंदिरात लष्कर पाठविण्याचा अप्रिय निर्णय घेतला. दहशवाद्यांचा बिमोड करण्यात लष्कर यशस्वी झाले पण त्या दहशतवाद्यांंपैकी कांही माथेफिरूंंनी उघड उघड त्यांच्यावर सूड उगविण्याची भाषा सुरु केली, पण त्या जराही डगमगल्या नाहीत.


       ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी सकाळी त्या आपल्या नवी दिल्ली येथील निवासस्थानातून निघून शेजारच्या कार्यालयाच्या इमारतीकडे जात असता एका माथेफिरूने त्यांच्यावर पिस्तुलातून सोळा गोळ्या झाडल्या. लगेच त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्ली येथील इस्पितळात नेण्यात आले. डॉक्टारांनी त्यांचे प्राण वाचविण्याचे शर्थीने प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही. भारताच्या लाडक्या इंदिराजींचे प्राण पंचतत्वात विलीन झाले.


       अचूक निर्णय घेणाऱ्या, स्पष्ट बोलणाऱ्या, धैर्यशील वृत्तीच्या, कणखर इंदिराजींना कोटी कोटी प्रणाम।


मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०

मुहम्मद पैगंबर यांंचे जीवनचरित्र व शिकवण - विशेष मराठी लेख

        

ईद-ए-मिलाद (हजरत मुहम्मद पैगंबर स. अ. यांची जयंती)


मुहम्मद पैगंबर यांंचे जीवनचरित्र व शिकवण

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी




फोटो साभार: गूूूगल


             हजरत मुहम्मद पैगंबर यांंचा जन्म मक्का येथे २२ एप्रिल इ. स. ५७० मध्ये झाला. इस्लामी पंचागानुसार १२ रबिलावल या दिवशी जन्म झाला. हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस 'ईद-ए-मिलाद' म्हणून साजरा केला जातो.  कुरैश कबिल्याचे सरदार अब्दुल मुत्तलिब यांचे सुपुत्र अब्दुल्लाह हे मुहम्मद यांचे पिता. मुहम्मद पैगंबर यांचा जन्म होण्याच्या काही दिवसापूर्वीच त्यांंच्या पित्याचे निधन झाले. ते जेमतेम सहा वर्षाचे असतानाच त्यांची आई अमिना यांचेही निधन झाले. आठ वर्षाचे असताना आजोबा अब्दुल मुत्तलिब यांंचेसुध्दा निधन झाले. तेंव्हा मुहम्मद यांच्या संगोपनाची सर्वस्वी जबाबदारी त्यांचे काका अबू तालिब यांच्यावर आली. अबू तालिब यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने मुहम्मद आपल्या काकांंच्या मेंढ्या सांभाळण्याचे काम करायचे. पुढे काकांबरोबर व्यापार करण्यासाठी लांब प्रवासास गेल्याने त्यांना व्यावहारिक माहिती व शहाणपण पुष्कळ मिळाले. व्यापाराच्या निमित्ताने सामाजिक परिस्थिती न्याहाळता येईल या विचाराने त्यानी व्यापारी पेशा पत्करला.


       मक्का शहरातील अत्यंत समृध्दशाली व प्रतिष्ठित घराण्यातील खदिजाशी वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. खदिजा मुहम्मदांपेक्षा १५ वर्षानी मोठ्या शिवाय विधवा होत्या, मुहम्मद यांचे सौंदर्य, सच्चेपणा, दयाशील वृत्ती, दिलदार स्वभाव पाहून खदिजाने त्यांच्यावर निस्सिम प्रेम केले. मुहम्मद यांचेही खदीजाबीवर अतिशय प्रेम होते. तिचा सल्ला घेतल्याशिवाय ते कोणतेही काम करीत नसत. इस्लाम धर्म प्रचाराचे बिकट व अचाट कार्य मुहम्मदांनी केले त्याचे बरेचसे श्रेय खदिजाबीस दिले पाहिजे. एका स्त्रीची प्रेरक शक्ती इस्लाम धर्माची मुहूर्तमेढ रोवण्यास कारणीभूत झाली ही गोष्ट अतिशय विलक्षण आहे.


       मुहम्मदांनी आपले कार्य सुरू केले त्यावेळी राज्यपध्दती अस्तित्वात नव्हती. जो प्रबळ तोच सत्ताधारी होता. लोक टोळ्याटोळ्यांनी रहात. क्षुल्लक गोष्टीवरून रक्तपात घडत असे. गरीब स्वभावाच्या माणसाने केलेली न्यायाची गोष्ट अन्यायाची ठरत असे. तत्कालीन लोकांना जबाबदारीची जाणीव नव्हती. प्रत्येक टोळी स्वत:स श्रेष्ठ समजून दुसऱ्या टोळीवर बेलाशक हल्ला करी. वेडगळ समजुतींच्या आहारी पडून त्यांची प्रखर बुध्दीमता निकामी झाली होती. लुटमार व दरोडे घालणे हा कित्येकांचा कायमचा पेशाच होता. जिकडे पहावे तिकडे मूर्ती बसवलेल्या होत्या. या मूर्तीपुढे हजारो जिवांची हत्त्या होई. मूर्तीसमोर नरबळीही दिले जात. लोक अनेक व्यसने करीत. गल्ली-गल्लीत जुगार खेळला जाई व माणसांची गुलाम म्हणून विक्री होई. मुहम्मदांनी ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी आपले आयुष्य वेचले.


मुहम्मद पैगंबर यांची शिकवण:

       मक्का येथे त्यांचे अनुयायी वाढू लागले तेथे दररोज लोकांसमोर ते प्रवचन देताना सांगत, प्रत्येक सत्कार्य म्हणजे परोपकारच होय. लोकांना सन्मार्गावर आणण्याकरीता उपदेश करणे हे परोपकाराइतकेच पुण्यकृत्य आहे. चुकलेल्या वाटसरूस वाट दाखविणे, आंधळ्यास सहाय्य करणे, रस्त्यावर पडलेले काटे-कुटे, दगड-धोंडे दूर करणे, तहानलेल्यास पाणी देणे या सर्व गोष्टी तुम्ही आचरणात आणा. मनुष्याची खरी संपत्ती म्हणजे त्यांनी केलेली सत्कार्ये होत.


       जगातील सर्व मानवात प्रेम व सहानुभूती उत्पन्न झाली पाहिजे असे ते सांगत. परमेश्वराने निर्माण केलेल्या मानवजातीवर जो प्रेम करीत नाही, त्याच्यावर परमेश्वर कधीही प्रेम करणार नाही. आपल्या मुलांबाळावर, आपल्या आप्तेष्टावर, आपल्या देशबांधवावर जगातील यच्चयावत मानवांवर आपण प्रेम कराल तर आपणावर परमेश्वर संतुष्ट होईल. परमेश्वराची भक्ती करू इच्छिता तर प्रथम आपल्या बांधवावर प्रेम करा. दुसऱ्याच्या अंत:करणात प्रेम उत्पन्न होईल अशा तऱ्हेचे आचरण ठेवा. रक्तपात किंवा अनाचार करून तुमचा केंव्हाही उद्धार होणार नाही. तुमचा कट्टर शत्रू असला तरी त्याच्याशी प्रेमाने वागा. प्रेम हे इस्लाम धर्मातील महान तत्व आहे. तुमच्या हृदयात द्वेष बुध्दीस थारा देवू नका. द्वेषाने चांगल्या भावना देखील गढूळ होतील. अन्यायाची एकही गोष्ट करू नका. स्त्रियांचा मान राखत जा. स्त्रियांना दयाळूपणाने वागवा. स्त्रियांची इज्जत राखा आणि तुमच्या प्रत्येक कार्यात त्यांना भागिदार करा, तुमच्या नोकर-चाकरांशी प्रेमाने वागा. तुम्ही खाल ते अन्न व तुम्ही वापराल ते वस्त्रे त्यांना द्या. त्यांच्या शक्तीबाहेरचे काम त्यांना करण्यास सांगू नका. त्या सर्व शक्तिमान विधात्यास शरण जा. त्याच्याजवळ मनोभावे प्रार्थना करा तो दयाधन तुम्हा-आम्हा सर्वांचा उद्धार करणारा आहे.


         मुहम्मद पैगंबर यांची वृत्ती अत्यंत साधी होती. ऐश्वर्य, ऐषआराम व बडेजाव यांचा त्यांना तिटकारा होता. अंगावरचा कपडा फाटला तर स्वतः ठिगळ लावून ते वापरत असत. घराची झाडलोट करणं, विस्तव पेटविणे, बाजारहाट करणे इ. कामे ते स्वत: करीत. त्यांची वृत्ती साधी व अपरिग्रही होती.


       मुहम्मद पैगंबर हे थोर व दृढनिश्चयी सुधारक होते. अविश्रांत परिश्रम करून त्यांनी अधःपात झालेल्या जनतेस खऱ्या धर्माचा मार्ग दाखविला व ८ जून ६३२ रोजी समाधानाने नामस्मरण करत करत जगाचा निरोप घेतला.


गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०

दसरा सण मोठा - विशेष मराठी लेख

 

दसरा सण मोठा

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूूूगल


दसरा सण मोठा। नाही आनंदाला तोटा।

      असे म्हटले जाते, ते अगदी खरे आहे. या सणाच्या वेळी धो धो कोसळणारा पाऊस थोडासा कमी झालेला असतो. नद्यांचा पूर ओसरलेला असतो. वातावरणात सर्वत्र एक प्रकारचा प्रसन्न, आनंदी व आल्हाददायक सुगंध दरवळत असतो. आकाश निरभ्र झालेले असते. शेतामध्ये ज्वारी-बाजरीची, भाताची पिके मजेने  डोलू लागतात. झाडे फळाफुलांंनी बहरून गेलेली असतात. अशा सुंदर वातावरणात नवरात्रीची सुरुवात होते. दहाव्या दिवशी दसरा येतो. आश्विन शुद्ध दशमीचा दिवस विजयादशमी किंवा दसरा या नावाने साजरा केला जातो. विजयादशमीला सीमोल्लंघनाचा दिवस किंवा शिलंगणाचा दिवस असेही म्हटले जाते.


       पूर्वीच्या काळी अनेक शूर, पराक्रमी राजे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर स्वारीसाठी निघत. अन्य राज्यांवर हल्ला चढवत. याला सीमोल्लंघन असे म्हणतात. आपल्या गावाची सीमा ओलांडून दुसऱ्याच्या हद्दीत जाण्याची सुरुवात करणे म्हणजेच सीमोल्लंघन होय.


   पांडवांचा अज्ञातवास संपला. त्यांनी विजयादशमीच्या दिवशी शमी वृक्षाचे पूजन केले व त्या वृक्षाच्या ढोलीत ठेवून दिलेली आपली शस्त्रास्त्रे परत धारण केली असे महाभारतात नमूद आहे. म्हणून दसरा सणाच्या पूर्वी या घटनेची आठवण म्हणून खंडेनवमी हा सणही साजरा केला जातो. या दिवशी आपल्या घरात वापरली जाणारी सर्व हत्यारे काढून ती स्वच्छ धुवून त्यांचे पूजन केले जाते. खंडेनवमीच्या निमित्ताने घरातील विळी, कोयते, खुरप्या, कात्र्या, कुऱ्हाडी, खोरी इत्यादी सर्व हत्यारे स्वच्छ व चकचकीत बनतात.


       दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवशी सुरु केलेल्या कोणत्याही कामात यश मिळणारच अशी श्रद्धा आहे. विजयादशमी म्हणजे विजय देणारा दिवस मानला जातो.


      दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मराठे सरदार स्वारीवर निघायचे. इसवी सन १६३९ साली याच दिवशी शहाजीराजे, जिजाऊ आणि शिवाजीराजे यांना घेऊन बेंगलोरला गेले होते. इ. स. १६५६ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर लढाई करून शिवरायांनी सुपे प्रांत काबीज केला. इ. स. १७२६ मध्ये याच दिवशी थोरल्या बाजीरावांनी निजामवरील मोहिमेसाठी प्रस्थान केले होते. शिवरायांनी प्रतापगडावर श्रीभवानी देवीचा उत्सव सुरु केला. नऊ दिवस हा उत्सव मोठ्या धामधुमीत आजही साजरा केला जातो. कोल्हापूरची महालक्ष्मी आणि तुळजापूरची भवानी माता यांचा नवरात्रोत्सव प्रसिद्ध आहे.


पुण्यातील पेशवेकालीन दसरा:

       पुण्यात पेशवाईच्या काळात हा सण मोठ्या थाटामाटाने साजरा होत असे. हत्ती, घोडे, उंट यांना या दिवशी स्वच्छ धुवून सजविण्यात येई. दुपारी शनिवारवाड्यात समारंभपूर्वक शस्त्रांची पूजा केली जाई. या दिवशी नवा भगवा झेंडा आणि जरीचा पटका उभारून पूजा होत असे. सायंकाळी पालखी मिरवणूक मोठ्या थाटामाटात निघत असे. या मोठ्या मिरवणुकीत अनेक सरदार, सरंजामदार, मानकरी नटूनथटून सहभागी होत असत. स्वतः पेशवे अंबारीत बसून मिरवणुकीत हौसेने सहभागी होत असत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पगड्या, शेले आणि रंगीबेरंगी मुंडासे बांधलेले स्वार आपापल्या घोड्यावर स्वार होवून मिरवणुकीबरोबर जात असत. ईशान्येस मुहूर्तावर शमीवृक्षाची पूजा केली जाई. आतषबाजी होई. तोफांची सरबती केली जाई. परत आल्यावर विजयादशमीचा दरबार भरत असे. यावेळी अनेकांना वस्त्रदान केले जाई.


  विजयादशमीच्या दिवशी ईशान्येकडे सीमोल्लंघनासाठी जिथे शमीवृक्ष किंवा आपटा असेल तिथे लोक जमतात. शमीची विधीवत पूजा केली जाते. तिथे असलेली आपट्याची पाने सोने म्हणून लुटली जातात. प्रथम देवाला सोने वाहून नंतर घरच्या वडिलधाऱ्यांंना, भावंडांना हे सोने वाटतात.


       विजयादशमीला शमी व आपटा या दोन झाडांची पूजा केली जाते. शमी पाप शमवते अशी लोकांची धारणा आहे. पांडवांनी आपली शस्त्रास्त्रे शमी वृक्षात दडवून ठेवली होती. त्यांच्या साहाय्याने त्यांनी कौरवांचा पराभव केला. आपट्याचा वृक्ष आहे तो शत्रूंचा नाश करणारा व सर्व दोष निवारण करणारा आहे. म्हणून त्या दिवशी आपट्याची पूजा करण्याची प्रथा पूर्वजांनी घालून दिली आहे. यातून वृक्षवल्ली आम्हा सोयरे... हाच संदेश पूर्वजांनी घालून दिलेला आहे. वृक्षारोपण व संवर्धनाची आणि त्यातून पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज असल्याचा संदेश देण्याचा दृष्टीकोन पूर्वजांकडे होता, हे आपल्याला मान्यच करावे लागेल.


      दसरा या सणास ऐतिहासिक व पौराणिक परंपरा आहे. त्याचे महत्व सांगणाऱ्या त्या काळानुसारच्या कथा सांगण्यात आल्या आहेत. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत त्या कथांपासून नवा अर्थ, नवा बोध आणि नवा विचार घ्यावा लागेल. विजयादशमीला सीमोल्लंघन, शमीपूजन व शस्त्रपूजा केली जाते, त्या सर्वामागे पूर्वजांनी महत्वपूर्ण घटनांचा आधार सांगितलेला आहे.


       पुराणामध्ये दसऱ्यासंबधी एक कथा अशी आहे. प्रभू रामचंद्रांच्या हातून रावणाचा वध व्हावा म्हणून नारदांनी प्रभू रामचंद्राना नवरात्र व्रत आचरण्यास सांगितले. अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री श्रीदेवीने प्रभू रामचंद्रांना दर्शन दिले व सांगितले की, तुझ्या हातून रावणाचा वध होईल. देवीने आशीर्वाद दिल्यानंतर रामांनी नवरात्र व्रत पूर्ण करून दहाव्या दिवशी लंकेवर स्वारी केली व रावणाला ठार केले. श्रीदुर्गेने अशाप्रकारे दैत्यांचा पराभव केला. त्यांच्यावर विजय मिळविला तो दिवस नवरात्री नंतरचा दहावा दिवस होता, म्हणून या सणाला विजयादशमी म्हणतात.


विजयादशमीच्या पौराणिक कथा:

पूर्वी गुरुकुल पद्धती ही शिक्षणाची आदर्श पद्धती होती. साक्षात भगवान कृष्ण यांनी सांदिपनी रूषींच्या आश्रमात राहून विद्यार्जन केले. वरतंतू नावाचे एक ऋषी होते. त्यांचा कौत्स नावाचा एक शिष्य होता. वरतंतूच्या आश्रमात राहून कौत्साने विद्यार्जन पूर्ण केले. ऋषींचा निरोप घेऊन घरी परतताना त्याने गुरूंना विचारले, "मुनीवर्य, मी आपल्याला गुरूदक्षिणा काय देऊ?" गुरू म्हणाले, "काहीही नको, मी शिकवलेल्या विद्येचा योग्य उपयोग कर, म्हणजे झाले."

कौत्स म्हणाला, "तसं म्हणू नका..? कांहीतरी मागा."

"मग चौदा कोटी सुवर्ण मोहरा दे." निर्लोभी मुनीवर्य रागानेच म्हणाले.

कौत्स, मुनींच्या आश्रमातून जो बाहेर पडला तो थेट रघू राजाकडे गेला. रघू राजाने नुकतेच विश्वजित यद्न्य केले हौते. त्यामुळे त्याचा खजिना रिकामा होता. त्याच्याजवळ फक्त एक मातीचं भांडं होतं पण अतिथीला रिक्त हस्ते परत पाठवण्याची रघुकुलाची रीत नव्हती. रघुने कुबेरांशी युद्ध करण्याची तयारी केली. तेंव्हा कुबेराने रघूशी युद्ध टाळण्याच्या दृष्टीने आकाशातून सुवर्ण मोहरांचा पाऊस पाडला. तेंव्हा रघू कौत्साला म्हणाला, "आपल्याला हव्या तेवढ्या मोहरा आपण घ्याव्यात। त्यापैकी नऊ कोटी मोहरा कौत्साने मोजून घेऊन त्या वरतंतू ऋषीना अर्पण केल्या. बाकीच्या मोहरा लोकांनी वेचल्या आणि त्या परस्परांना प्रेमाने दिल्या. त्या दिवशी तिथी होती दशमी. तीच तिथी पुढे विजयादशमी म्हणून साजरी होवू लागली. त्या दिवशी लोक सोनं म्हणून आपट्याची पाने वाटू लागले. ज्या झाडावर सोन्याचा पाऊस पाडला गेला, ते झाड होते आपट्याचे. म्हणून या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटून आणतात ते सोने देऊन परस्परांना शुभेच्छा देऊन वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. दातृत्व, गुरुविषयी आदर व वडीलधाऱ्यांसमोर नतमस्तक होण्याची शिकवण या सणातून मिळते. शेवटी असे म्हणावेसे वाटते.


आला आला दसरा।

चेहरा करा ना हसरा ।

दुःख, चिंता विसरा।

आनंदाचे मोती पसरा।







सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

अपेक्षांंचे ओझे - विशेष मराठी लेख


अपेक्षांंचे ओझे

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


      आमच्या शेजारी रहायल्या आलेल्या बिऱ्हाडाच्या खोल्यातून मोठमोठ्याने वाद चाललेला ऐकू येऊ लागला. ते बिऱ्हाड नुकतेच रहायला आल्यामुळे त्यांच्याशी फारशी ओळखही झालेली नसल्याने काही वेळ मी दुर्लक्ष केले. पण वाद विकोपाला जाण्याची चिन्हे दिसू लागली. ती आपला मुद्दा सोडायला तयार नव्हती. तो ही आपल्या मुद्यावर ठाम होता. शेवटी "बॅग भरून जातेच माहेरी" असे म्हणून ती बॅग भरण्याच्या तयारीत असतानाच त्याचा आवाज आला. "जा. जा. तुझी मला गरज नाही" इथपर्यंत वादाने मजल मारली. त्यामुळे नाईलाजाने वडिलकीच्या नात्यांनी मी वाद मिटवण्यासाठी तेथे गेले. मी विचारले, "कशासाठी चाललय हे भांडण?" 

      

    बायको म्हणाली, "बघा ना, मी मुलाला डॉक्टर करायचं म्हणते तर आमचे हे त्याला इंजिनियर करायचं म्हणतात, मी आई आहे मुलाची माझा काय अधिकार नाही? सगळं यांच्या म्हणण्याप्रमाणेच वागायचं, काय म्हणून?" तो तावातावाने म्हणाला, "हे बघा मॅडम, आता डॉक्टरला कोण विचारतं? गल्लोगल्ली डॉक्टर झालेत. रुग्णालय काढून द्यायला आम्ही कुठं एवढे श्रीमंत लागून गेलोय. इंजिनियर केलं की मोठ्या पगाराची नोकरी लागते."


        दोघांच्याही रागाचा पारा खाली आल्याचे पाहून मी म्हटले, "अहो तुम्ही कशाला वाद घालत बसलात ? कुठं आहे तुमचा मुलगा? विचारा की त्याला तुला काय व्हायचंय म्हणून? माझ्या बोलण्याने त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले व किंचीत हसत ती म्हणाली, "तो अजून जन्माला यायचाय." त्याला समाजात चांगल्याप्रकारे रहाता यावं यासाठी आई-बाबांची धडपड सुरू असते. असावीही, परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नसावा. आपल्या अपेक्षांचे भले मोठे गाठोडे तो जन्मापूर्वीच त्याच्या डोक्यावर लादू नये. त्याचे योग्य संगोपन करून, त्याचा कल, त्याची अभिरुची पाहूनच त्याला शिक्षण द्यावे. त्याला मुक्तपणे खेळायला, बागडायला आपण वाव देणार आहोत की नाही? सखी, सर्व आई-बाबांनी आपल्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा मुलांमध्ये पूर्ण व्हाव्यात ही अपेक्षा धरू नका. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे शिकून मोठे होऊ द्या. असं सांगना ना सखी ! तुझं नक्की ऐकतील सगळे.


गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

घटस्थापना मनमंदीरातही - विशेष मराठी लेख

 

घटस्थापना मनमंदीरातही

डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


     आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नवरात्रीची सुरुवात होते. नवरात्र म्हणजे नऊ दिवस व नऊ रात्री होय. नवरात्रीच्या पूर्वी घराची, भांड्यांची, अंथरूण पांघरूणाची, कपड्यांची साफसफाई करण्याची प्रथा आहे. याला घरातील स्वच्छता अभियानचं म्हणा ना. याला वैज्ञानिक कारण असावं. पावसाळा संपत आलेला असतो. पावसामुळे घरातील भिंतीना, जमिनीला ओल आलेली असते, बुरशी साचलेली असते, ती दूर करून शेतात पिकलेल्या नव्या धान्याची साठवण स्वच्छ जागेत व्हावी हा या स्वच्छतेमागील उद्देश असावा.


       नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी वारुळाची माती आणून देव्हाऱ्याजवळ एका पत्रावळीवर पसरवली जाते. त्यात वेगवेगळी धान्ये पेरून घटस्थापना केली जाते. धान्य पेरणी करून त्याची उगवणक्षमता आजमवण्याची पूर्वजांची ही प्रयोगशीलता म्हणावी लागेल. घटस्थापना म्हणजे शेतीचे आपल्या जीवनातील महत्वपूर्ण स्थान लक्षात आणून देण्याची कल्पकता होय. मातीचा छोटासा चौथरा, त्यात नऊ धान्याची पेरणी आणि त्यावर पाणी, सुपारी, नाणं घालून मातीचा कलश, आंब्याची व खाऊची पानं कलशावर नारळासह ठेवून त्या कलशाची गंध, हळदकुंकू, चुना, काव यांची सजावट केली जाते. या नऊ दिवसात घराघरात देव्हाऱ्यात अखंड नंदादीप तेवत असतो. सजावटीसाठी झेंडूच्या फुलांचा वापर खुबीने केला जातो. त्यामुळे फारच नयनमनोहर दिसतो हा घटस्थापनेचा सोहळा.


       या नऊ दिवसात उपवास करण्याची प्रथा आहे. आरोग्यशास्त्राची जाणीव करून देणारी ही उपवासाची पद्धत आहे. पावसाळ्यानंतर आपल्या शरीरातील पचनेंद्रियांना विश्रांतीची गरज असते. ती विश्रांती मिळावी म्हणून उपवास करण्याची प्रथा असावी. उपवासाच्या कालावधीत दूध, फळे, खजूर, खोबरे खाण्याची योजना म्हणजे शरीराला अधिक पौष्टिक पदार्थ मिळावेत. पचनेंद्रियांना विश्रांती देत असताना अशक्तपणा येऊ नये हा हेतू असावा. उपवासाची ही रीत आहारशास्त्र व आरोग्य शास्त्राची साक्ष देणारी आहे.


    नवरात्र म्हणजे नऊ दिवस देवीची पूजा बांधण्याचा उत्सव होय. आजच्या ग्लोबल जगात व चंगळवादाच्या युगातही भारतीय संस्कृतीमध्ये नवरात्र उत्सव, विजयादशमीसारखे सण साजरे करण्याची टिकून राहिलेली मानसिकता भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारी आहे. एकविसाव्या शतकात माणसाच्या जगण्याचे संदर्भ बदलले आहेत. या पार्श्वभूमीवर या सण समारंभाचे संदर्भही थोडेसे बदलण्याचा आपण प्रयत्न करायला हवा असे मला वाटते. याचा अर्थ असा नव्हे की, जुन्या संस्कृती, परंपरा, चालीरीती पूर्णपणे बदलून टाकाव्यात. आपली संस्कृती, परंपरा, चालीरीती यांचे पूर्णपणे पालन करत नवीन संदर्भ स्विकारायला हवेत.


घरातील देव्हाऱ्यात आपण घटस्थापना करतो. त्याप्रमाणे देहमंदिरात, मनमंदिरात चांगल्या आचार विचारांची घटस्थापना करायला हवी. एका भक्तीगीतात म्हटले आहे.


देह देवाचे मंदिर, आत आत्मा पांडुरंग।


      या नवरात्रीत आपलं आरोग्य चांगले ठेवण्याचा संकल्प करु या, इतरांनाही त्यांच्या आरोग्याला जपण्याच्या सवयींबाबतीत मार्गदर्शन करु या, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी यथाशक्य प्रयत्न करण्याच्या विचारांची स्थापना करु या. देवघरात धान्य तर रुजवूयाच पण त्याचबरोबर आपल्या घराच्या परिसरात, सार्वजनिक ठिकाणी एक तरी झाड लावून त्याची जोपासना पुढच्या नवरात्रीपर्यंत करून त्या इवल्याशा रोपाचे मोठे झाड करण्याचा विचार मनामनात रूजवू या. ही खरी घटस्थापना होईल. होय ना?


मनामनात स्थापन करूया घट......

आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचे।

पर्यावरणाचा समतोल राखण्याचे।

गरजूंना यथाशक्य मदत करण्याचे।


मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

थांब पावसा! - मराठी कविता


थांब पावसा!

कवियत्री: डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: pixabay.com


पावसा, थांबव तुझा खेळ

घरी परतायची झाली वेळ।


संपले तुझे महिने चार

आला तुझा कंटाळा फार।


मुलांना नाही बागडता येत

घरीचं कोंडण्याचा आहे का बेत?


ढगाकडे लागले किसानांचे डोळे

पिके गेली वाहून उरले अश्रु मळे।


ओढे-नाले भरले येईल नदीला पूर

गरीबांचे सुख जाईल दूरदूर।


असा कसा तू झाला आहेस लहरी

खरं सांग, तुझी त्तबेत नाही का बरी?


जा तुझ्या घरी आलाय दसरा

सर्वांचा चेहरा होवू दे ना हसरा।


काय तुझ्या मनात, कानात माझ्या सांग

पण आत्ता मात्र लगेचच थांब।


शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

मराठी लघुकथा संच - ७


मराठी लघुकथा संच - ७


लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

लघुकथा क्रमांक - ३१


शांताबाई गेली पाच वर्षे प्रमिलाकडे धुणीभांडी, फरशी पुसण्याचे काम करायच्या प्रमिला तिला अडी नडीला मदत करायच्या. बरीच उचल होती त्यांच्या अंगावर, पण प्रमिलाची एक अट होती. कामाला खाडं करायचं नाही. खाडं केलं की जाम चिडायच्या. गेले दोन महिने प्रमिलाच्या दोन्ही लेकी व त्यांची चार मुलं लॉकडाऊनमुळे इथेच अडकली होती. त्यामुळे शांताबाईंच काम तिपटीने वाढलं होतं. शिवाय कोरोनाच्या भितीने सॅनिटायझरने हात धुवून मास्क लावून, टेंपरेचर बघूनच त्यांच्या घरात प्रवेश मिळे. या सर्व कामाचा शांताबाईना फार कंटाळा आला होता. तिला वाटायचं मी पण माणूसच आहे ना? किती काम करायचं दररोज? एक दिवसही सुटका नाही यातून! असा विचार करत असतानाच तिला एक मस्त आयडिया सुचली. तिने प्रमिलाला फोन केला, बाईसाहेब काल तुमच्याकडून आल्यावर मला ताप आलाय. डॉक्टरनी टेस्ट करायला सांगितलय. प्रमिला म्हणाल्या, होय का मग महिनाभर आली नाहीस तरी चालेल. काळजी घे. तुझा पगार कापला जाणार नाही.


लघुकथा क्रमांक - ३२


एका शेतकऱ्याकडे एक बैलजोडी असते. पोळा या सणादिवशी त्याने बैलांना सजवले. पत्नीने बैलांचं पूजन केले. औक्षण करून नैवद्याचा घास भरवला. गडबडीत पूजेसाठी आणलेले मंगळसूत्र तिथेच विसरले. कांही वेळाने मंगळसूत्राची शोधाशोध सुरू झाली. एक बैलाने नकळतपणे वैरणीबरोबर ते खाल्ले. शेतकऱ्याला शंका आल्यावर त्यांनी डाक्टरांकडून एक्सरे काढून घेतला. बैलाच्या पोटात मंगळसूत्र दिसले ऑपरेशन करून मंगळसूत्र काढता येईल असे डॉक्टरांनी सांगितले त्यावर डोळ्यात पाणी आणून शेतकरी म्हणाला, "डॉक्टरसाहेब मंगळसूत्र ५०/६० हजाराचे असेल, ते राहू द्या बैलाच्या पोटात पण आमच्या सुखदुःखात साथ देणाऱ्या माझ्या सख्याला त्रास होता कामा नये. माझा सखा ऑपरेशनमुळे अधू होता कामा नये. बैलावर जिवापाड प्रेम करणाऱ्या शेतकऱ्याचे हे बाणेदार उत्तर ऐकून डॉक्टर थक्क झाले आणि विशेष म्हणजे तिसऱ्या दिवशी रवंथमधून मंगळसूत्र बाहेर पडले. याला म्हणतात प्राणीप्रेम।


लघुकथा क्रमांक - ३३


जयाताई प्राथमिक शिक्षिका होत्या. शिक्षणशास्त्र विषयाच्या जानकार होत्या. त्यांचं मत होतं की मुलांना त्यांच्या कलाप्रमाणे शिक्षण द्यावे. आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नये. दहावीला ७८% मार्कस् असूनही आपल्या मुलीला त्यांनी कला शाखेत पाठवले, कारण तिचा कल कलेकडे होता. तिच्या सर्वांगिण विकासासाठी तिला टायपिंग आणि कॉम्प्युटर क्लासला घातले, तिला हार्मोनियम वादनाची आवड असल्याने ती त्या क्लासलाही जावू लागली. वक्तृत्व स्पर्धेत चमकू लागली. क्रीडाक्षेत्रातील धनुर्विद्येत ती राज्यस्तरीय खेळाडू बनली. बारावीनंतर तिने डी. एड्. ला ऍडमिशन घेतले. स्टाफ मेंबर जयाताईना म्हणाले, "तुमची मुलगी हुशार असूनही तिला डॉक्टर, इंजिनिअर बनवायचं सोडून शिक्षिका बनवणार?" जयाताई म्हणाल्या, "तुमची सर्वांची मुलं डॉक्टर, इंजिनिअर होणार त्यांच्या मुलांना शिकवायला कुणीतरी शिक्षक व्हायला हवंच ना?"


लघुकथा क्रमांक - ३४


शामराव खूपच विनोदी होते. आपल्या कुटूंबियांवर त्यांची खूप माया होती. लहान मुले त्यांना खूप आवडायची. त्यांच्याशी ते फार मोकळेपणाने बोलायचे, त्यांच्यात रमायचे. त्यांना एक सवय होती. एक काम ते फार दिवस करायचे नाहीत. चार दिवस काम केले की आठ दिवस आराम करायचे, परत दुसऱ्या कामाला सुरूवात करायचे. त्यांच्या काम करण्याच्या या पद्धतीमुळे त्यांच्या संसारात कायम आर्थिक चणचण असायची. उधारी पाधारी व्हायची. उधारी वसूल करायला कुणी आलं की पुढचा वायदा सांगून, त्यांच्याशी गोड बोलून, एखादा विनोद सांगून हसवून परत पाठवायचे. एके दिवशी भाजीपाला विकणारी मावशी रागानेच उधारी वसूल करायला आली. तिला शामराव म्हणाले, "कुणाची उधारी दिलीया आजपर्यंत आमी, तवा तुमची बुडवायची हाय।" भाजीवाली मावशी हसतच परत गेली.


लघुकथा क्रमांक - ३५


दोन जिवलग मैत्रिणी असतात. लॉकडाऊनच्या काळात त्या एकमेकींना भेटू शकत नव्हत्या. पण फोनवरून संपर्कात होत्या. पहिलीने कोरोनाची फारच धास्ती घेतली होती. फळे, फळभाज्या, पालेभाज्या आणायचे तिने सोडून दिले होते. फक्त कडधान्यावरचं भागवू लागली. हे नाही खायचं ते नाही खायचं करत बसली. दुसऱ्या मैत्रिणीलाही तिने तसाच सल्ला दिला. दुसरीने तिला समजविण्याचा प्रयत्न केला. स्वच्छ धुवून फळे, भाज्या खाण्याचा सल्ला दिला पण तिने ऐकला नाही. शेवटी व्हायचं तेच झालं. तिला व तिच्या मिस्टरांना अशक्तपणा जाणवू लागला. चालतांना धाप लागू लागली म्हणून डॉक्टरांना दाखविले. त्या दोघांचा एच्. बी. पाचवर गेला. ऑक्सिजन लेवल ८४ झाली. कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू झाले. तिने आपल्या मैत्रिणीला फोन केला व म्हणाली, "तू म्हणत होतीस तेच बरोबर आहे. माझंच चुकलं, तुझं ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती. यापुढे मी सर्व भाज्या, फळे स्वच्छ धुवून खात जाईन आणि हो कोरोनाची धास्ती घेणार नाही. त्याचा सामना करीन. मैत्रीण म्हणाली, "शानी झाली माझी बाय।"


शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

काळ मोठा बिकट - मराठी कविता


कोरोना (कोविड १९) महामारीमुळे सर्वांवर उद्भवलेल्या परिस्थितीचे चित्रण करणारी कविता


काळ मोठा बिकट

कवयित्री: डॉ. ज्युबेदा तांबोळी

फोटो साभार: गूगल


काळ मोठा बिकट आला

मेला नाही तोच जगला ।


आधी बातम्या बाधितांच्या

आता येताहेत मृत्यूच्या ।


पहाटे फोन खणखणतो

स्नेही कुणीतरी दगावतो ।


उपचार सुरु खाजगीत श्रीमंताचे

बेड मिळेनात, हाल गरिबांचे ।


परस्पर जाळतात प्रेताला

श्वान सज्ज लचके तोडायला।


नंबर लागलेत दफनविधीला

रडूच न येई बघा कोणाला।


वणवा पेटलाय घराभोवती

केंव्हा आपल्याकडे? हीच भिती।


दर दिवशी आकडा वाढतो

घाबरून पेशंट घरीच बसतो।


जगला काय मेला काय

कोणाला आता पर्वा नाय।


ज्याचं जळतं त्यालाच कळतं

जगण्याचं महत्व, मेल्यावर कळतं।



रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

गोड आठवणी पत्रांच्या - विशेष मराठी लेख


दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त पत्रांच्या कांही गोड आठवणी.


गोड आठवणी पत्रांच्या

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

फोटो साभार: गूगल


       आज विज्ञान तंत्रज्ञानानं इतकी झपाट्याने प्रगती केली आहे की अवघं जग जवळ आलं आहे. एका क्लिकवर जगातील ज्ञान भांडार खुलं झालं आहे. एवढ्याशा जादूमयी, छोटेखानी, चपट्या बॉक्समधून म्हणजेच लाडक्या मोबाईलमधून जगातील कोणत्याही व्यक्तीशी सहज संपर्क आपण साधू शकतो, त्याला पाहू शकतो, त्याला मेसेज पाठवू शकतो, त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आपल्या घरातच बसून करू शकतो. ही प्रगती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. हे सर्वांना मान्यच करावे लागेल. आज ई-मेल, फेसबुक, व्हाटस् अप्, एस्. एम्. एस्, ट्विटर या सर्व माध्यमातून सगळे एकमेकांच्या जवळ आले आहेत पण इतक्या जवळ येऊनही मनाने जवळ आलोत का? हा प्रश्न आत्मचिंतनाचा आहे हे मात्र खरे.


      पूर्वी पत्रव्यवहार हे एकमेव संपर्कमाध्यम होते. हा पत्रव्यवहार करण्यात जी मजा होती ती मजा आज अभावानेच मिळते आहे. आम्ही लहान असताना सायकलवरून खाकी पोशाख घातलेला एक पोष्टमन सायंकाळी पाच वाजता यायचा कारण त्याच्याकडे टपाल वाटण्यासाठी तीन-तीन गावं असायची. आपल्या नातेवाईकांची खबरबात घेऊन येणारा पोष्टमन देवदूतच वाटायचा. तो दारात येऊन नावासह उच्चार करून पत्र हाती द्यायचा. पत्र आलं की घरातील सगळं वातावरण एकदम बदलून जायचं. त्यात एखादी गोड बातमी असेल तर मन हरखून जायचं. घरात असणारी व्यक्ती प्रथम पुन्हा पुन्हा वाचायची आणि कधी एकदा कामानिमित्त बाहेर गेलेल्या व्यक्ती घरी येतात असं तिला व्हायचं. तिनं तोंडानं सांगितलेली बातमी ऐकूनसुद्धा पत्र वाचायचा मोह आवरता यायचा नाही. पत्र वाचल्यावर घरातील सर्वांचा आनंद गगनात मावेनासा होई. पत्रातून पुत्ररत्न कन्यारत्न झाल्याची, एखाद्याला मुलाखतीला बोलवल्याची, कुणाला नोकरीवर हजर होण्याची ऑर्डर यायची आणि दुसऱ्या दिवशी पोस्टमनची पेढे देण्यासाठी वाट पाहिली जायची गोड बातमी आणली म्हणून. पत्र प्रकरण एवढ्यावरच थांबायचे नाही, रात्री जेवताना पत्रातील मजकुरावर सामुदायिक चर्चा सत्र व्हायचे. पत्र पाठविणाऱ्याने आपली नावासह दखल घेतली, तब्येतीची विचारपूस केली आहे हे पाहून अशक्त शरीरावर मूठभर मांस चढायचं. पत्रातील मजकूर ठराविक असायचा. आम्ही इकडे खुशाल आहोत, तुम्ही सगळे कसे आहात, तुमचीच काळजी वाटते, बाकी सर्व ठीक आहे, पत्रोत्तर ताबडतोब पाठविणे, तुमच्या पत्राची आतुरतेने वाट पहात आहे. पत्रातील हे शब्द हृदयाला थेट भिडायचे. आज फोनवर अर्धा अर्धा तास बोलूनही मायेचा, जिव्हाळ्याचा स्पर्श होतो का? पत्राने तो व्हायचा. आवडलेल्या मजकुराची घरातील सगळीच मंडळी अक्षरशः पारायणं करायची. हृदयाच्या खोल कप्प्यात पत्रं जपून ठेवली जायची. भविष्यात ही पत्रं म्हणजे भावविश्वातील अनमोल खजिना ठरायची.


पत्रांच्या कांही सुंदर आठवणी:

       माझी कन्या मलिका जन्मतःच अधू होती. माझी मनःस्थिती फारच बिघडलेली होती. मी पुरती कोलमडून गेले होते. अशावेळी माझी मैत्रिण सुनंदा हिने मला एक अंतर्देशीय पत्र पाठवलं होतं. हल्ली सर्व व्याधीवर उपचार निघाले आहेत, तुमची कन्या औषधोपचारांने निश्चित बरी होईल. पत्रातील या शब्दांनी मला त्यावेळी इतका धीर दिला की मी त्याचे वर्णन करू शकत नाही.


       पेपरमध्ये, मासिकामध्ये माझे लेख नुकतेच प्रकाशित होऊ लागले होते त्यावेळी माझ्या आठ वर्षांच्या भाच्याने मला पत्र लिहिले होते. आत्या, तुला हे सगळं कसं सुचतं गं? त्याच्या या वाक्याने मला लेखनासाठी पुष्कळ बळ मिळालं.


       महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत प्रकाशित होणाऱ्या जीवन शिक्षण मासिकात माझा पहिला लेख प्रकाशित झाला, त्यावेळी संपादकांनी मला पत्रात लिहिले होते. आपण विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर हळूवार फुंकर घालणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका आहात. या शब्दांनी माझ्यातील शिक्षिकेवर जादूच केली. त्या जादूने मी अधिक उपक्रमशील बनत गेले.


      चौतीस वर्षापूर्वी माझ्या मोठ्या भावाचे हार्टचे ऑपरेशन झाले. कांही दिवसांनी तो रायगड जिल्ह्यातील नाते येथील हायस्कूलवर हजर होवून अध्यापन करू लागला. ते ठिकाण आमच्या गावापासून खूप लांब होते. तिथे त्याला फार एकटेपणा वाटू लागला. त्याने मला पत्र पाठवले की तुझ्या कवीभाषेतील एक सविस्तर पत्र पाठव म्हणजे मला थोडं बरं वाटेल. मी त्याला लिहिलं


"कृपाछत्र प्रभूचे, वात्सल्याच्या ठेवा।

भैय्या का होतोस हळवा?


 जगविख्यात डॉक्टरन,

केलं तुझं ऑपरेशन


प्रमाद प्रभूचा, प्रभूनेच सुधारला सगळा

भैय्या का होतोस हळवा?"


या पत्राने भैय्यास खूप धीर मिळाला तो त्या एकटेपणातून सावरला.


       मी माझ्या शाळेत पत्रलेखनाची प्रत्यक्ष कृती हा उपक्रम राबवला. माझ्या विद्यार्थिनी अर्चनाने तिच्या वडिलांना पत्र पाठविले. तिचे वडील इतके खूष झाले की बस्स, त्यांनी शाळेला पत्र पाठवले. हा उपक्रम खूपच छान वाटला. त्या पत्राने मला आणखी कार्यशील बनवलं.


       माझा आत्तेभाऊ उर्दू माध्यमात शिकून अकरावीत गेला होता. त्याने माझ्या काकांना पत्रात लिहिले होते, मामा मी अकरावीत गेलोय मी कोणते विष घेवू ते कळवा. ते खुलं पत्र त्यांच्या एका मित्राने वाचलं व भीतभीतच काकांच्या हातात दिलं. त्याला विषय लिहायचे होते. पत्र वाचून सर्वजण पोट धरून हसलो. अशा गमतीजमतीही पत्रातून घडत होत्या.


       मला किशोर मासिकाकडून एक पत्र आलं. ते पत्र पाहून माझ्या छातीत धस्स झालं. असं का झालं सांगते, पूर्वी एकाद्याच्या मृत्यूची बातमी द्यायची झाली तर अर्ध पत्र यायचं, अमक्या अमक्याला देवाज्ञा झाली. ईश्वर इच्छेपुढे नाईलाज। मला आलेल्या पत्रात फक्त एवढाच मजकूर होता, आपली आज्ञाधारक अरूण ही कथा प्रकाशित करण्यासाठी निवडली आहे. धस्स झालेल्या छातीत आनंदाचे उमाळे आले.


गीतातून व्यक्त झालेले पत्रप्रेम:

माहेरी आलेल्या पत्नीला पती रसभरीत पत्र पाठवायचे. पत्नी लाजून चूर व्हायची व म्हणायची


नांदायला नांदायला

मला बाई जायाचं नांदायला।

पत्र आलया रायाचं

 लिवलय मोठ्या गमतीचं।

लाज मला बाई सांगायला।

मला बाई जायचं नांदायला।


कांही कारणाने पत्नी पतीच्या नोकरीच्या गांवी जाऊ शकत नव्हती. पतीविरहाने ती व्याकुळ व्हायची आणि म्हणायची

मी मनात हसता प्रित हसे

हे गुपित कुणाला सांगू कसे।

 कांही सुचेना काय करावे

पत्र लिहू तर शब्द न ठावे।


 प्रेमपत्राची गोडी काही औरच होती. त्यामुळेच एखादी युवती पत्राला छातीशी घट्ट धरून म्हणायची


ये मेरा प्रेमपत्र पढकर,

तुम नाराज न होना।

की तुम मेरी जिंदगी हो

की तुम मेरी बंदगी हो।


तर आपल्या पत्नीच्या किंवा प्रेयसीच्या आठवणीत  पत्र लिहताना एखादा म्हणायचा


लिखे जो खत तुझे

वो तेरी याद में

हजारो रंग के

नजारे बन गए


आज कोणत्या संपर्कमाध्यमात हजारो रंगाच्या स्वप्नांचे 'नजारे' बनविण्याची शक्ती आहे?


आता पत्रांचा प्रभाव दाखविणारे एक अप्रतिम गीत पाहू या.


फूल तुम्हें भेजा है खत मे,

फूल नहीं मेरा दिल है।


या गीतातील आशय सांगून जातो की, पत्रातून मी फूल पाठवलं आहे. ते फूल नसून माझं काळीज आहे. पत्रातून अशा प्रकारे व्यक्त होणं काळजाचा ठाव घेत होतं. आता ही सोय राहिली नाही असे वाटते.


पत्र फक्त पोष्टातूनच पाठविले जात होते असे नाही तर ते  प्राण्याकडून, पक्षांकडून विशेषतः कबूतरांकडून पाठविले जायचे म्हणून एक युवती कबुतराला म्हणते


कबूतर जा..जा..जा

कबूतर जा...जा...जा...

पहले प्यारकी पहली चिठ्ठी

साजनको दे आ....


       या झाल्या गीतातून व्यक्त झालेल्या पत्र लेखनाच्या आठवणी. लष्करातील जवानांना देशाच्या सीमेवर आपल्या कुटुंबापासून दूर जाऊन लढावे लागते. आपले कर्तव्य बजावत असताना त्याला आपल्या कुटुंबाची आठवण येत असते पण त्यांना भेटणे त्याला शक्य होत नाही. अशा या वेगळ्या भावविश्वात असताना त्याला कुटुंबाकडून पाठवलेलं पत्र मिळतं. पत्र पाहून त्याला अत्यानंद होतो आणि तो म्हणतो


संदेसे आते हैं

चिठ्ठी आती है,

हमे तरसाती है।

की घर कब आओगे?

लिखो कब आओगे।


देशभक्तीने अंगावर रोमांच उभे करणारे पंकज उदास यांनी गायलेले हे गीत ऐकत असताना डोळ्यातून अश्रूधारा केंव्हा वाहू लागतात हे कळतही नाही.


चिठ्ठी आयी है,

चिठ्ठी आयी है।

बडे दिनोंके बाद

हम बेवतनोंको याद

वतनसे मिठ्ठी आयी है।


या गीतातील एका चरणात पत्राचे महत्त्व सांगताना म्हटले आहे.


पहले जब तू खत लिखता था।

कागजमें चेहरा दिखता था।


अशी ही पत्र आज दृष्टीआड झाली आहेत. आपण सर्वांनी वर्षातून एकदा तरी एकमेकांना पत्रं लिहून पत्रांच्या या सुखद आठवणी जपायला हव्यात कारण...

पत्रांची जादू लयी मोठी

सर्वा सर्वांना त्याची हाव।


गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

महात्मा गांधीजींचे स्मरण: विशेष मराठी लेख


महात्मा गांधीजींचे स्मरण

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

फोटो साभार: गूगल


       "आपला धर्म म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. सगळी जणं  माणसंच आहेत. आपण अस्पृश्यांवर अन्याय करणे योग्य नाही, ते पाप आहे, आपण त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे." अशी शिकवण देणाऱ्या, ज्यांना आपण राष्ट्रपिता म्हणून संबोधतो त्या बापूजींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ हा जन्मदिवस. महात्मा गांधीजी यांनी आपल्या आचार विचारांनी सर्व जगात मानाचे स्थान मिळविले. त्यांनी आपले विचार व आचरण यांच्यात एकवाक्यता ठेऊन जीवन व्यतित केले.


       'विनाशस्त्र, रक्ताचा एकही थेंब न सांडता, ज्यांनी केवळ अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला असा 'हाडामांसाचा माणूस' या पृथ्वीवर होवून गेला यावर पुढील पिढी क्वचितच विश्वास ठेवेल.' असे अल्बर्ट आईनस्टाईन यांनी म्हटले आहे. किती सार्थ आहेत ना त्यांचे विचार?


     संपूर्ण राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देणे हीच त्यांच्या दृष्टीने ईश्वरसेवा होती. या सेवेसाठी आयुष्यभर त्यांनी कांही व्रते अंगीकारली. गांधीजींच्या चिंतनाची प्रगल्भता जसजशी वाढत गेली तसतशी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, असंग्रह, शरीरश्रम, अस्वाद, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी, स्पर्शभावना ही एकादश व्रते त्यांना जाणवली, दिसत गेली. महात्मा गांधीजींच्या विचारांचे मंथन करून पूज्य विनोबाजींनी ही व्रते कविताबद्ध केली. ही व्रते आपल्याला माहीत झाली पाहिजेत.


अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, असंग्रह।

शरीराश्र, आस्वाद, सर्वत्र भयवर्जन।

सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी, स्पर्शभावना।

ही एकादश सेवावी नम्रत्वे व्रत निश्चये।


      महात्मा गांधीजींच्या एकादश व्रतापैकी शरीरश्रम हे एक व्रत आहे. या ठिकाणी शरीरश्रम म्हणजे व्यायाम नव्हे किंवा मजुरीने शरीर झिजवणे नव्हे. जीवनाला आवश्यक असणारे पदार्थ उत्पन्न करण्यासाठी स्वतः शारीरिक परिश्रम करणे हा येथे शरीरश्रमाचा अर्थ आहे. जीवनाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी मेहनत न करता उपभोगणे किंवा स्वतंत्र मेहनतीचा मोबदला न देता एखाद्या गोष्टीचा उपभोग घेणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने चोरी करणे होय. ते म्हणत आपला उदरनिर्वाह आपला आपण करावा या हेतूने परमेश्वराने मनुष्यजन्म दिला आहे. जो स्वतः कष्ट न करता जगतो, तो एक प्रकारे चोरीच  करतो असे बापूजींना वाटायचे.


       आपल्या देशाला इतकी महान संस्कृती, विचार लाभलेले असताना कांही लोकांना स्वच्छता किंवा त्यासंबधी असणाऱ्या कामांची सामाजिक जबाबदारी ही माझी नसून शासनाची आहे असे वाटते. विशेषतः उच्चपदस्थ किंवा शिकलेले लोक बरेचदा शारीरिक श्रमापासून दूर राहू इच्छितात. त्यांनी महात्मा गांधीजींच्या जीवनशैलीकडे पाहून श्रमप्रतिष्ठा वाढवायला हवी.


       महात्मा गांधीजींच्या विचारसरणीत मनुष्याने आपल्या गरजा कमी करणे, खाजगी परिग्रह शक्य तितका कमी करणे, स्वतःचे काम स्वतः करणे या बाबी एखाद्या व्रताप्रमाणे मानल्या गेल्या आहेत. म्हणूनच गांधीजींनी सूत कातणे, सफाई करणे यांना यज्ञाइतके महत्त्व दिले आहे. त्यांच्या मते शारीरिक श्रम करून जे प्रामाणिकपणे काम करतील अशा सर्वांना आपल्या देशात पुरेशा प्रमाणात काम आहे. ज्याला पै न् पै प्रामाणिकपणे मिळवायची आहे, त्याला कोणत्याही प्रकारचे काम हलके किंवा कमी दर्जाचे वाटत नाही. प्रत्येकाची आपले हात-पाय हलविण्याची तयारी हवी. म्हणजेच शरीरश्रम व कष्ट करायची तयारी हवी. भुकेल्या आणि आळशी लोकांना परमेश्वराचे खरे रूप पहावयाचे असेल तर ते त्यांना कामातच दिसेल. आपण प्रत्येकाने जीवनात हे व्रत तंतोतंत आचरल्यास देशात क्रांति झाल्याशिवाय रहाणार नाही.


      महात्मा गांधीजींचे स्मरण करताना सत्य, अहिंसा ही मूल्ये चटकन् आठवतात. ती आजन्म पाळणे ही सोपी गोष्ट नाही, पण स्वावलंबन आणि कोणतेही काम करण्याची तयारी ही मूल्ये सामान्य माणसाच्या अवाक्यातील आहेत.गांधीजी स्वत्ःची सगळी कामे स्वतः करीत. ते कपडे धुवायचे, स्वयंपाक करायचे, झाडलोट, आजाऱ्यांची सेवा ही तर त्यांची नित्याचीच कामे होती. याशिवाय भंगी, न्हावी, चांभार, धोबी, शिंपी यांची कामेही त्यांनी शिकून घेतली होती. मोठ्या आनंदाने व उत्साहाने ते ती कामे करीत असत. त्यांच्या कामात नियमितता होती, शिस्त होती, आनंद होता. कोणतेही काम त्यांना कमी दर्जाचे किंवा किळसवाणे वाटत नसे. म्हणूनच त्यांनी परचुरे शास्त्रीसारख्या महारोगी रूग्णाची सेवा प्रेमाने केली. संडास सफाई करणे त्यांना ओंगळवाणे वाटत नव्हते.


थोर महात्मे होऊनी गेले, चरित्र त्यांचे पहा जरा।

आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा।।


थोर पुरूषांच्या चरित्रांचे वाचन, श्रवण त्यांच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने केले जाते, पण आपण त्यांच्या समान व्हावे असा प्रयत्न केला जातो का? ते कसे शक्य आहे? ते महात्मे कुठे आणि आम्ही सामान्य माणसे कुठे? त्यांची बरोबरी कशी करता येईल? असा प्रश्न विचारण्यात येतो. तो प्रश्न चुकीचा नाही. पण महान व्यक्ती या जन्मतःच महत्पदाला पोहोचलेल्या नसतात, त्यासाठी त्यांनी सोसलेले कष्ट, केलेला त्याग, संघर्ष, त्यांची नीतिमत्ता, त्यांनी प्राणापलीकडे जपलेली तत्वे यांचा कांही प्रमाणात स्वीकार सामान्य माणसालाही करता येईल. आज लहानसहान कामासाठी आपण दुसऱ्यावर अवलंबून राहतो. अशी कामे करण्यात आपल्या सुशिक्षित मनाला लाज वाटते. अशा वेळी गांधीजींचे स्मरण करावे. त्या महात्म्याने घालून दिलेली श्रमप्रतिष्ठेची व स्वावलंबनाची वाट आपण यथाशक्ती चालण्याचा, अंगिकारण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने राष्ट्रपित्याची जयंती साजरी होईल असे मला वाटते.

शेवटी ही काव्यपुष्पांजली


प्रियतम आमचे गांधीजी।

नमन तयांना आज करू।

जन्मदिनी या फुले वाहुनी।

गान तयांचे कर जोडोनी।


लाल बहादूर शास्त्री: विशेष मराठी लेख


लाल बहादूर शास्त्री

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


    मूर्ती लहान कीर्ति महान असलेले भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मुगलसराई या गांवी २ ऑक्टोबर १९०४ साली झाला. घरची अत्यंत गरिबी होती. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी काशी विद्यापीठाची 'शास्त्री' ही पदवी मिळविली. तेथील प्राध्यापक डॉ. भगवान दास यांचा त्यांच्यांवर फार मोठा प्रभाव पडला. त्यामुळे ते पुरोगामी विचारसरणीचे आणि समन्वयवादी बनले. महात्मा गांधीजींच्या सहवासाने स्वातंत्र्यलढ्यात उतरले. सत्याग्रहात भाग घेतला. ९ वर्षे त्यांनी तुरुंगात काढली. स्वातंत्र्यानंतर पंडीत नेहरूजींच्या मंत्रीमंडळात ते रेल्वेमंत्री, गृहमंत्री होते. पंडीत नेहरूंच्या नंतर ते भारताचे दुसरे पंतप्रधान झाले. अखेरपर्यंत ते गरिबीतच राहिले. त्यांच्या शुद्ध, सात्विक, निर्मळ, कणखर जीवनाचा आदर्श आपल्या सर्वांना घेण्यासारखा आहे. 'जय जवान, जय किसान' हा त्यांचा संदेश आजही सर्वांनी आचरणात आणला पाहिजे. जवान आणि किसान यांचा सन्मान केला पाहिजे. दि. ११ जानेवारी १९६६ मध्ये रशियातील ताश्कंद येथे त्यांचे निधन झाले.


     अशा या थोर नेत्याच्या बालपणातील एक आठवण इथे नमूद कराविशी वाटते.....।


       आयुष्यात अगदी लहान सहान गोष्टींमधून देखील खूप कांही शिकता येते. छोटा नन्हे अशा छोट्याशा गोष्टीकडे अधिकच लक्ष द्यायचा, ती त्याची वृत्तीच होती. नन्हे शाळेत शिकत असताना एकदा कांही शाळा सोबत्यांंसह तो एका बागेत गेला. ही सर्व मुले त्या बागेत हसत खेळत फिरु लागली. बागेत फिरत असताना रसाळ फळे लगडलेली तेथील कांही झाडे पाहून अगदी स्वाभाविकपणे त्या लहान मुलांच्या तोंडाला पाणी सुटले. इकडे तिकडे पाहून आजूबाजूला कोणीही नाही याची खात्री करून घेऊन ती सर्व मुले अगदी आनंदाने त्या फळांच्या झाडांवर चढली. नन्हेसुद्धा त्या सर्वांसोबत एका झाडावर चढला. झाडावरच बसून फळे तोडून मुले त्या फळांचा आस्वाद घेऊ लागली. फळे खाण्यात मुले अगदी मग्न झाली होती. इतक्यात त्यांच्यापैकी एका मुलाचे लक्ष  बागेपुढच्या रस्त्याकडे गेले. त्याने पाहिले तर त्याला त्या बागेचा माळी येत असल्याचे दिसले. तो माळीबाबा बागेच्या दिशेनेच येत होता. तो मुलगा चटकन् ओरडला, "अरे बागेचा माळी आला। चला चला पटकन् पळा।" त्या मुलांचा हा ओरडा ऐकून घाबरलेल्या सर्व मुलांनी झाडावरून पटापट उड्या मारल्या व ती पळूनही गेली.


     पण छोटा नन्हे मात्र झाडावरून उतरून त्याच झाडाखाली हात बांधून उभा राहिला. माळी रागारागाने आला व त्याचा हात धरून वाट्टेल तसे बोलू लागला. नन्हेला चार दोन गुद्दे लगावण्यासाठी त्याने आपला हातही उचलला. तेंव्हा नन्हे त्या माळ्याला म्हणाला, "माळीदादा मला मारू नका, मी खूपच गरीब आहे. मला वडील नाहीत!" माळी म्हणाला, "मग तर तू असे अजिबात वागता कामा नये. तू चांगले वागलेच पाहिजेस. इतर मुलांपेक्षा चांगले वागण्याची तुझ्यावर अधिक जबाबदारी आहे. जा पण पुन्हा असं करू नकोस!" माळ्याने त्याचा हात सोडला आणि नन्हे भरल्या डोळ्यांनी जड पावले टाकत निघाला.माळ्याच्या उपदेशाचा त्याच्या मनावर खोल परिणाम झाला. त्याने चांगले वागण्याची शपथ घेतली व तशी कृतीही केली.


      हा नन्हे म्हणजे आपले माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री हे होते.


अशा या थोर विभूतीला कोटी कोटी प्रणाम।