सोमवार, १७ मार्च, २०२५

हजरत अयुब अलैस्सलाम यांची अल्लाह भक्ती

 हजरत अयुब अलैस्सलाम यांची अल्लाह भक्ती

                  डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी



                        फोटो:साभार गुगल


       हजरत अयुब अलैहिस्सलाम हे फार श्रीमंत गृहस्थ होते. त्यांना पुष्कळ शेती, जनावरे, गाई, उंट, शेळ्या होत्या. तेथे त्यांची सात मुले व सात मुली व हे दोघे नवराबायको रहात असत. इतकी श्रीमंती असून ते अल्लाहची प्रार्थना करण्यात मश्गुल असत. त्यांची अल्लाहची भक्ती मोडण्याचा अगर त्यांना त्या भक्तीपासून परावृत्त कसे करता येईल व त्या मार्गापासून दूर ठेवण्याची शैतानने आव्हान देवून अल्लाहचा लाडका सेवक अल्लाहपासून अलग करून दाखवीन असा विडा उचलला. परंतू अल्लाहनी त्याला सांगितले की, माझी भक्ती करणारा माझा सेवक हा कितीही संकटे आली तरी तो इबातद(भक्ती) पासून दूर होणार  नाही. पुढे शैतानाने एकामागून एक संकटे आणण्यास सुरूवात केली.


        पहिले संकट त्यांची शेती, पिके नष्ट केली. दुसरे संकट सर्व जनावरे मारून टाकली. तिसरे संकट भुकंप झाला. त्यात हजरत अयुब (स.) यांची सर्व मुले दफन झाली. फक्त ते दोघे पती-पत्नी शिल्लक राहिले. या संकटानेही दोघे भ्याले नाहीत. त्यांची भक्ती चालूच होती. एका श्रीमंताची पत्नी उदरनिर्वाहासाठी बाहेर काम करून पोट भरण्याची वेळ आली. हे सर्व एवढ्यावरच थांबले नाही तर पुढे हजरत अयुब (स.) यांच्या शरीरात किडे पडले व घाण वास मारू लागला. त्यामुळे शेजारी पाजारी, गावातील लोक त्यांचा तिटकारा करू लागले. त्या साध्वीस छळू लागले. तुझ्या पतीला गावाबाहेर घेवून जा असे म्हणू लागले. तिने एके दिवशी आपल्या पतीला पाठीवर उचलून घेवून एका वनात आणून ठेवले. ना पाणी ना अन्न असे ते जंगल पण त्या साध्वीने धीर सोडला नाही. इबादत थांबवली नाही. हजरत अयुब (स.) यांचे सर्व शरीर खराब झाले. फक्त जीभ शाबुत होती. त्या जिभेने ते नमाज पठण करत. त्यांची पत्नी बीबी रहिमत गावात मजुरीचे काम करून जे मिळेल ते घेवून आपल्या पतीस जेवू घालत असे. त्यांचे सर्व शरीर सर्व नासले तरी ती सेवा करत होती. ह. अयुब (स.) इबादत बंद करत नव्हते. त्यांच्यापुढे शैतानही थकला.


       शेवटी अल्लाहनी दया दाखवून हा माझा खरा बंदा (सेवक) आहे असे दाखवून दिले. ह. अयुब (स.) यांना बीबी रहिमतने विचारले, इबादतीकरीता जीभ शिल्लक आहे, मग तुम्ही अल्लाहजवळ प्रार्थना का करत नाही. त्यावेळी ते म्हणाले, जेवढे सुख मी भोगले, तेवढे दुःख भोगल्याशिवाय अल्लाह मला क्षमा करणार नाही. हे शब्द ऐकून अल्लाहनी जिब्राईल अलैसल्लम यांना पृथ्वीवर पाठवले ते हजरत अयुब (स.) जवळ येवून बसले व अल्लहाच्या कृपेने त्यांनी पाण्याच्या दोन विहिरी निर्माण केल्या. एक गरम व एक थंड पाण्याची. जिब्राईल अलैस्सलम यांनी त्यांना आंघोळ घातली. त्याबरोबर ते संपूर्ण चांगले झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा