शनिवार, २७ मार्च, २०२१

होळी पौर्णिमा - विशेष लेख


होळी पौर्णिमा - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       वसंत ऋतूच्या च्या आगमनाची  सूचना देणारा होळी हा सण फाल्गुन शुद्ध नवमीपासून पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो. या सणास होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, किंवा वसंतोत्सव असे म्हणतात. वसंत ऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ हा सण साजरा केला जातो, असा उल्लेख प्राचीन ग्रंथात आढळतो. यावेळी जत्रा-यात्रा उत्साहात सुरू असतात. कुस्त्यांचे फड, बैलांच्या शर्यती गाजत असतात. धरणीमाता हिरव्या पानाफुलांनी बहरलेली असते. शेतकऱ्यांची घरे धान्यांनी भरलेली असतात. त्यामुळे सर्वांची मनेही नवतेजाने बहरलेली असतात. हिवाळ्याची बोचरी थंडी दूर पळालेली असते. हा सर्व आनंद द्विगुणीत करण्यासाठी होळीचा सण येतो.  होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदन. त्यानंतर पाच दिवसांनी रंगपंचमी असते.


होळी हा सण का साजरा करतात याविषयीच्या पौराणिक कथा....

       हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णूचा लाडका भक्त होता. या भक्तीपासून त्याला परावृत्त करण्यासाठी हिरण्यकश्यपूने त्याचा खूप छळ केला. त्याला उंच कड्यावरून खाली टाकले. उकळत्या तेलाच्या कढईत टाकले तरीही प्रल्हादावर त्याचा कांहीही परिणाम झाला नाही. तो जसाच्या तसा राहिला. शेवटी दैत्यराज हिरण्यकश्यपूची बहीण होलिका उर्फ ढुंढा म्हणाली, "मला वर लाभल्यामुळे आगीपासून मला कोणतेच भय नाही. मी जळणार नाही. मी प्रल्हादाला घेऊन आगीत बसते. प्रल्हाद जळून जाईल, मला कांहीच होणार नाही." ठरल्याप्रमाणे भक्त प्रल्हादास जिवंत जाळण्याच्या उद्देशाने होलिका प्रल्हाद यास मांडीवर घेऊन धगधगत्या अग्नीत जाऊन बसली. सभोवताली गोवऱ्या रचून पेटविले गेले. पण काय आश्चर्य वर मिळविलेली होलिका आगीत जळून भस्म झाली. प्रल्हाद मात्र आगीतून नारायण नारायण म्हणत सुखरूप बाहेर पडला. जे वाईट होते ते जळून गेले, जे अस्सल होते ते तावून सुलाखून शुद्ध बनले. भक्त प्रल्हादाने जणू अग्नी परीक्षाच दिली. या आनंदाप्रीत्यर्थ होळी हा सण साजरा करण्यास सुरुवात झाली.


       श्रीकृष्णाला ठार मारण्यासाठी कंसमामाने पुतना या राक्षसीला गोकुळात पाठविले. तिने एका तरुण सुंदर स्त्रीचे रुप घेतले होते. तिने श्रीकृष्णाला जवळ बोलविले. श्रीकृष्णाने तिचा कावा ओळखला व तिला ठार केले. तो दिवस होता फाल्गुन पौर्णिमेचा. नंतर गोकुळातील गवळ्यांनी मयत झालेल्या पुतनाच्या देहाला गोवऱ्या रचून, होळी करून अग्नी दिला. अमंगलाचा नाश झाल्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद पसरला. तो दिवस गोकुळवासियांनी आनंदाने साजरा केला, त्या दिवसाची आठवण म्हणून होळी साजरी करतात.


       होळी संदर्भात आणखी एक कथा पुराणात प्रसिद्ध आहे. ती क्रुतयुगातील रघु नावाच्या राजाची. रघु राजाच्या राज्यात 'ढौढा' नावाच्या राक्षसीने हैदोस माजविला होता. सर्व प्रजाजन राजाकडे संरक्षण मागण्यास आले. चिंताग्रस्त रघुराजाने वशिष्ठ मुनींना तिच्या नाशासंबधी उपाय शोधण्याची विनंती केली. ढौढा राक्षसीने कठोर तपश्चर्या करून शंकरास प्रसन्न करून घेतले होते, व त्यांच्याकडून देव, दानव व मानव यापासून तिन्ही ऋतूत कोणत्याही शस्त्रापासून मला मरण येणार नाही असा वर मागितला होता. वर देतांना शंकरानेही एक अट घातली होती, की हिवाळ्याच्या अखेरीस व उन्हाळ्याच्या सुरवातीस अग्नी पेटवून तिला शिव्या देऊन हुसकावून लावले तर ती पळून जाईल. हीच ती आपली होळी दुष्टांना पळवून लावणारी. 


       या सर्व कथामधून एक गोष्ट आपणास दिसून येते की या कथात राक्षसी इतरांना त्रास देत होत्या, त्यावर उपाय म्हणून त्यांना ठार करून दहन केले गेले. पुराणकाळात ते ठीक होते. पण आजच्या काळात होळी अशी साजरी करावी...


आधुनिक होळी:

सद्या दुष्ट, राक्षसी प्रवृत्तीचे दहन करून होळी साजरी करावी. हवेतील प्रदूषण वाढवून, लाकूडतोड करून सण साजरा करणे योग्य नव्हे. गांवातील सर्व लोकांनी एकत्र येऊन एकाच पटांगणात गावातील कचरा जाळून होळी करावी. वेगवेगळ्या रसायनांनी युक्त रंग एकमेकांच्या शरीरावर फासून रंगपंचमी साजरी न करता अतिशय सौम्य रंग वापरून आनंदाने हा सण साजरा करावा. होळीसाठी झाडे न तोडता टाकाऊ पालापाचोळा, कचरा जाळावा. दुसऱ्याला हानी किंवा इजा होणार नाही याची खबरदारी घेऊनच होळी व रंगपंचमी साजरी करावी. झाडे तोडण्यापेक्षा प्रत्येकाने एक झाड लावून नवा उपक्रम सुरु करावा. संस्कृती व प्रगती यांना हाताशी धरुनच सण साजरे करावेत.


       होळी भोवती पाणी शिंपडून रांगोळी घालून मंगल वाद्यांच्या गजरात होळीची पूजा केली जाते. पेटलेल्या होळीत अनेकजण पोळी, नारळ, पैसे, सुपाऱ्या टाकतात. हे सर्व न करता या वस्तू गरजूना दान कराव्यात. होळी लहान करा व पोळी दान करा हा मंत्र सर्वांनी आचरणात आणावा त्यामुळे गरीबांना दोन घास गोडधोड मिळतील. देणाऱ्याला समाधान मिळेल.


       होळीभोवती फिरताना बोंब मारण्याची प्रथा आहे. होळीभोवती पुराणकथा सांगतात, पोवाडे, कीर्तने यातून पूर्वजांचा पराक्रम सांगितला जातो. खेडेगावात लोकगीतांना ऊत येतो. ही गीते स्वयंस्फूर्त व स्वरचित असतात. त्यात निर्मळ विनोद व खट्याळ टीकाही असते. आज या गोष्टीतून लोकांचे प्रबोधन व्हावे.


       गावाच्या मध्यभागी किंवा चव्हाट्यावर एरंड, आंबा, माड, पोकळ इत्यादी झाडांची फांदी जमिनीत खोल खड्डा करून त्यात उभारली जाते. म्हणून या पौर्णिमेला दांडी पौर्णिमा असेही म्हणतात. होळी पूर्ण झाल्यानंतर ती दूध, तूप घालून शांत केली जाते. जमलेल्या लोकांना खोबरं गूळ, पपनस, केळी ही फळे वाटली जातात. दुसऱ्या दिवशी होळीची रक्षा विसर्जित करतात. कांही ठिकाणी ही रक्षा चिखल शेण दुसऱ्याच्या अंगावर मारतात वाट अडवून पैसे मागतात ही प्रथा बंद व्हावी. कांही ठिकाणी ही रक्षा अंगाला लावून डान्स करण्याची पद्धत आहे. म्हणून म्हटले आहे...।

होळी रे होळी, पुरणाची पोळी।

धुलवडीचा रंग खेळी, सोंगट्यांची टोळी।


होळीचा संदेश:

       पूर्ण चंद्राच्या साक्षीने साजरा होणारा हा सण आकाशातील चंद्र आणि चांदण्याचे सौंदर्य टिपून, मन प्रसन्न करणारा सण आहे. गोडधोड करून खाण्याचा, नृत्य गायनाचा, मनसोक्त रंग उधळण करण्याचा आणि नववर्षाच्या आगमनाचे स्वागत करणारा हा सण होय. मनातील दुष्ट भावना, क्लेश, वाईट वृत्तींचे दहन होळीत करून वसंत ऋतूच्या आगमनाने जशी सृष्टी हिरवीगार शाल पांघरून जीवनसृष्टीला आनंदित करते त्याप्रमाणे आपणही तन, मन आनंदित, प्रसन्न ठेवून जीवनात आनंदी वृत्ती जोपासावी हा संदेश देणारा हा सण पर्यावरणाचे रक्षण करत नवविचारांनी प्रेरित होवून साजरा करू या।म्हणू या....

आला आला होळीचा सण।

आनंदून गेले तन आणि मन।


सोमवार, २२ मार्च, २०२१

महान क्रांतिकारक भगतसिंग - विशेष लेख

 

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना २३ मार्च १९३१ रोजी ब्रिटिशांनी फाशी दिली. आज त्यांचा शहीद दिन त्यानिमित्त त्यांना विनम्र श्रद्धांजली..... 


महान क्रांतिकारक भगतसिंग - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       शहीद भगतसिंग यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ रोजी प. पंजाबमधील म्हणजेच विद्यमान पाकिस्तान मधील बंग जिल्हा ल्यालपूर या गांवी एका शेतकरी देशभक्त शीख कुटूंबात झाला. आई विद्यावती व वडील किशनसिंग. किशनसिंग लाला लजपतराय यांच्याबरोबर मंडालेच्या तुरुंगात होते. त्यांना क्रांतिकारी वाग्मयाचा प्रसार केल्याबद्दल दहा महिन्याची शिक्षा झाली होती. १९०९ साली प्राथमिक शिक्षण बंग येथे घेऊन भगतसिंग लाहोरच्या डी. ए. व्ही. व पुढे नॅशनल कॉलेजमधून बी. ए. झाले. विद्यार्थीदशेत जयचंद्र विद्यालंकार व भाई परमानंद या शिक्षकद्वयींचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. डी. ए. व्ही. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभारण्यात पुढाकार घेतला आणि आजन्म अविवाहित राहून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची शपथ घेतली. त्यांनी प्रारंभीच्या काळात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, परंतु काँग्रेसचे तत्कालीन धोरण त्यांना रुचले नाही. गदर चळवळीचे एक नेते कर्तारसिंग सरबा यांना दिलेली फाशी (१९१५), रौलट कायदा व जालियनवाला बाग येथील हत्याकांड (१९१९) यासारख्या घटनांमुळे लाहोर हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र बनले होते. भगतसिंगांनी आपले सर्व जीवन मातृभूमीच्या स्वातंत्र्याला समर्पित करून १९२३ मध्ये हिंदूस्थानात सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेत ते दाखल झाले. त्यांची लवकरच मध्यवर्ती समितीचा सचिव म्हणून नियुक्ती झाली. स्वातंत्र्य मिळविण्याच्या लढाईत त्यावेळी दोन मार्ग होते. एक होता जहाल गट व दुसरा होता मवाळ गट. त्यापैकी भगतसिंग हे जहाल गटातील होते. वास्तविक प्रथमतः भगतसिंग हे महात्मा गांधीजींच्या विचाराने भारावून शिक्षण सोडून महात्मा गांधींच्या असहकार अंदोलनात सामील झाले होते, परंतु १९२२ मध्ये चौरीचौरा या ठिकाणी पोलिसांवर जनतेकडून झालेल्या हिंसक हल्ल्यामुळे गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले. भगतसिंग नॅशनल कॉलेजमध्ये असताना भगतसिंग, सुखदेव, भगवतीचरण, यशपाल, रामचंद्र कपूर यांनी 'नौजवान भारत सभेची' स्थापना केली. या सभेचे भगतसिंग जनरल सेक्रेटरी व भगवती चरण प्रचार सेक्रेटरी होते. नौजवान भारत सभेचे उद्दिष्ट तडजोडवादी दृष्टीकोनाशी वैचारिक संघर्ष करून जनतेला क्रांतिकारक अंदोलनात सहभागी करणे हे होते. त्याचबरोबर जातिधर्माचे भेद नष्ट करून जनतेची एकजूट उभी करणे हासुद्धा उद्देश होता त्यासाठी नौजवान भारत सभेतर्फे लाहोर कोर्टात फाशी गेलेल्या कर्तारसिंगांचा गौरव करणारी जाहीर सभा लाहोरच्या बरसीबाँडला हॉलमध्ये घेऊन क्रांतीचा पुरस्कार करण्यात आला. नौजवान भारत सभेचे आणखी एक उद्दिष्ट होते ते म्हणजे कामगार शेतकऱ्यांचे गणराज्य स्थापन करून माणसाने माणसाची चालविलेली पिळवणूक नष्ट करणे. इन्कलाब झिंदाबाद व हिंदूस्थान झिंदाबाद या त्यांच्या प्रमुख घोषणा होत्या.


       मध्यंतरी भगतसिंग यांनी लाहोर व्यतिरिक्त दिल्ली, कानपूर, बंगाल आदी ठिकाणी असलेल्या क्रांतिकारकांशी संपर्क साधण्यासाठी लाहोर सोडले होते. त्यांचे वडील त्यांना लग्नासाठी सतत विचारत होते. हेसुध्दा लाहोर सोडण्याचे दुसरे कारण होते. स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय लग्न करणार नाही असा त्यांनी निश्चयच केला होता. 


       भगतसिंग आणि त्याचा मित्र बाबूसिंग यांना लाहोरमध्ये घडलेल्या एका बाँबस्फोटामध्ये आरोपी म्हणून अटक करण्यात आली, परंतु भगतसिंग यांच्या विरोधात कोणताच पुरावा नव्हता. भगतसिंगांना लालूच दाखवून खोटी साक्ष देण्यासाठी फोडण्याचे प्रयत्न देखील सरकारने केले पण भगतसिंगांनी त्यांना साथ दिली नाही. त्यांना चाळीस हजार रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले. पण ते पैसे भरु शकत नसल्यामुळे अखेर पंजाब असेंब्लीमध्ये याबाबत चा प्रश्न एका सदस्याने उपस्थित केल्यानंतर भगतसिंग यांच्यावरील जामिनीची अट रद्द करून त्यांची सुटका झाली.

       

       भगतसिंग यांनी भूमिगत राहून कार्य करण्यास सुरूवात केली. भारताला कोणत्या राजकीय सुधारणा द्याव्यात याच्या शिफारशी करण्यासाठी स्थापण्यात आलेल्या सायमन कमिशनवर एकही भारतीय सदस्य नव्हता. त्यामुळे त्याविरोधात भारतात प्रचंड जनक्षोभ उसळला. या कमिशन विरोधात नौजवान भारत सभेने लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. त्यावर पोलिसांनी अचानक लाठीहल्ला केला. त्यात लाला लजपतराय यांचे निधन झाले. भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी लालाजींच्या हत्येबद्दल ब्रिटिशांना धडा शिकविण्यासाठी ब्रिटिश अधिकारी सोंडर्स याचा वध केला व वधाच्या समर्थनार्थ तशी पत्रके वाटली.


       भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशीची शिक्षा जाहीर करण्यात आली. शिवा वर्मा, किशोरीलाल, गयाप्रसाद, जयदेव कपूर, विजयकुमार सिन्हा, महावीरसिंह आणि कमलापती तिवारी यांना आजन्म काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. इतरांना ही दीर्घ मुदतीच्या शिक्षा देण्यात आल्या. या खटल्याचा निकाल ऐकताच देशभर त्याविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उसळल्या. ठिकठिकाणी निदर्शने झाली. कामगारांनी संप केले. शहरात हरताळ झाले. त्र्यंबक शंकर शेजवळकर यांनी मुंबईतील 'प्रगती' च्या १६ ऑक्टोबर १९३० च्या अंकात म्हटले आहे, "महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाचा प्रसार सर्वात जास्त ज्या ठिकाणी झाला आहे, त्या मुंबईतील लोकांनी शिक्षेची वार्ता ऐकून अगदी कडकडीत हरताळ पाळला. आजपर्यंत गेल्या सहा महिन्यांच्या चळवळीत सुद्धा जेवढी गर्दी जमली नव्हती तेवढी सुमारे एक लाख लोकांची गर्दी येथील मैदानातील सभेस जमली होती. यावरून अखिल जनतेस या फाशीबद्दल काय वाटत आहे, याची कल्पना सरकारला येण्यासारखी आहे."


       त्यामुळेच भगतसिंग नावाच्या वादळासमोर ब्रिटीशांचा जुलमाचा वटवृक्ष उन्मळून पडला व लोकक्षोभ व भगतसिंगांच्या करारीपणाला घाबरून सर्व नियम व कायदे डावलून ब्रिटिशांनी भगतसिंगाना २४ मार्च ऐवजी २३ मार्च रोजीच फाशी दिली.


       भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांची दफनभूमी हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता. पण भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळवला. तेथे १९६८ मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्यावेळी भगतसिंगांच्या वृद्धमाता विद्यावती तेथे उपस्थित होत्या.


धन्य ती वीरमाता ! आणि धन्य तो तिचा क्रांतिकारी पुत्र !


बुधवार, १० मार्च, २०२१

मी बालिका बोलतेय.... - विशेष मराठी लेख.


मी बालिका बोलतेय......

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       खरं सांगू, माझ्या जन्मापासूनच नकारघंटा वाजायला सुरूवात झाली कारण, माझ्या आई-वडिलांना माझा जन्म होण्यापूर्वी एक धनाची पेटी व एक वंशाचा दिवा होता. 'पहिली बेटी धनाची पेटी' हे वाक्य ज्यानं कोणी पहिल्यांदा उच्चारलं त्या व्यक्तीला हार्दिक सलाम. कारण त्यामुळेच पहिल्याच मुलीचं स्वागत चांगलं होतं. तिच्या जन्माने धनाची पेटी घरात आली आहे, असे वाटते. त्याचवेळी कुणाला पहिला मुलगा झाला तर तोंड सुपाएवढं होतं. त्या मुलाच्या आईला सहजपणे म्हटलं जाते, 'नंबर मारलीस बाई, आता दुसऱ्यांदा काही का होईना'. 


तर मी सांगत होते माझ्या बद्दल,


४० वर्षापूर्वी चा तो काळ,


       मी आईच्या कुशीत असताना आमची आजी उठता बसता म्हणायची, 'एवढा मुलगा झाला की फार बरं होईल भावाला भाऊ असावा, पाठबळ होईल. मुलगी झाली तर दोघींच्या लग्नाचा भार माझ्या लेकावर पडेल.' आई-वडीलानाही आजीच म्हणणं पटायच, आई मनातल्या मनात देवाला नवस बोलायची की, 'एवढा मुलगा होवू दे म्हणून'. या पार्श्वभूमीवर माझा जन्म झाला. माझ्या जन्माने कुणालाच आनंद झाला नाही. अनिच्छेनेच माझा स्विकार झाला. केवळ नाईलाज म्हणून, टाकता येत नाही म्हणून त्या दोन भावंडाबरोबर माझे संगोपन सुरू झाले. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणतात ना तसं! माझी दीदी धनाची पेटी असल्याने सर्वांची लाडकी होती. शिवाय ती दिसायला चांगली, गुटगुटीत व वृत्तीने शांत होती. त्यामुळे तिने सर्वांच्या हृदयात अढळपद प्राप्त केलेले होते. माझ्या दादाचे लाड इतके व्हायचे की, विचारूच नका. त्याला जबरदस्तीने दुधाचा ग्लास दिला जायचा. मला मात्र, मागून घ्यावा लागायचा. नशीब माझं मागितल्यावर तरी मिळत होतं. माझ्या काही मैत्रिणींना मागूनही दूध मिळायचं नाही. तिला मिळायच्या ताक कण्या. वर ऐकावं लागायचं की, 'हिला दुध देवून काय पैलवान करायच आहे काय?' उलट तब्बेत जाम झाली तर कोण पसंत करणार नाही, लग्न लवकर करावे लागेल, खपली नाही लवकर तर हुंडा जास्त द्यावा लागेल. खर्च जास्त करावा लागेल. माझा दादा अती लाडामुळे हट्टी बनला होता. त्याचा प्रत्येक हट्ट पुरवला जायचा न रागावता. मी एखादा हट्ट केला, की मला कळायला लागल्यापासून ऐकत होते, की मुलीच्या जातीनं असले हट्ट-बीट्ट काही करू नयेत. मुलीला परक्या घरी नांदायला जायचं आहे. तिथं असा हट्ट अजिबात चालायचा नाही. नांदण्याचं चांदण होईल. मुलीनं देईल ते घ्यावं आणि मिळेल ते खावं. मी रडायला सुरूवात केली तरी कुणी फारसं लक्ष द्यायचं नाही. पण, दादा रडायला लागला, की म्हटलं जायचं, 'बायकासारखा मुळमुळू रडतोस कशाला?' ते ऐकून दादाला वाटायचं मी कुणीतरी स्पेशल आहे. मी रडायच नसतं. जमलं तर दुसऱ्याला रडवायचं असतं. मला आठवतंय, की अगदी लहान असताना दादानं दीदीची एक बांगडी घेवून हातात घातली तर लगेच आजोबा त्याला म्हणाले, 'अरे मर्दा बांगड्या घालायला काय मुलगी आहेस काय?' त्या वेळीच दादाच्या मनात पक्क रूजलं, की मी मर्द आहे आणि बांगड्या घालणं हे बायकांचे काम आहे.


       दादा सुट्टीच्या दिवशी दिवसभर मित्राबरोबर खेळायला जायचा. रात्री उशिरा आला तरी घरातले लोक त्याला काही म्हणायचे नाहीत. मला व दीदीला मात्र सक्त ताकीद दिली जायची, की पाचच्या आत घरात यायला पाहिजे. एवढ्या लहान वयातही आम्हाला वाटायचं, की दादाचं आपलं बरं आहे. आपणही मुलगा असतो तर बरं झालं असतं! घरात दररोज दादाच्या आवडीचेच पदार्थ असायचे. भाज्या त्याच्या आवडीच्याच केल्या जायच्या. दादाची आवड आमची आवड सक्तीने बनली होती. नशीब त्याच्या आवडीची का असेना भाजी आम्हा दोघींना पोटभर अन्न मिळायचे. माझ्या काही मैत्रीणींना ही भाजीही मिळत नव्हती. ताक-कण्या, आमटी-भाकरीवरच भागवावे लागायचे. धुणं, भांडी, स्वयंपाक इतरांप्रमाणे माझ्या पाचवीलाच पुजलेला होता. त्या कामात सफाईदारपणा, निटनेटकेपणा येण्यासाठी आजी, आई, काकी म्हणायच्या की, "मुलीच्या जातीला हे काम सुटलेलं नाही. कितीही शाळा शिकलीस ना तरी तुला भांडी घासावीच लागतील, धुणं धुवावचं लागेल, स्वयंपाक करून वाढणं तरी तुझं आद्य कर्तव्य आहे. स्वयंपाक करणं हा तुझा जन्मसिध्द हक्क आहे. तो हक्क हक्काने स्विकारण्यातच तुझं भलं आहे." आई वारंवार आठवण करून द्यायची, की स्वयंपाक नीट कर, भाकरी नीट भाज. उद्या तुझ्या सासरी माझे नाव निघेल, तुझी सासू म्हणेल, की हेच शिकवलयं का तुझ्या आईन?


       दादा मस्तपैकी खेळून यायचा. आवडीच्या पदार्थांनी भरलेले ताट त्याच्या समोर ठेवलं जायचं. त्याचवेळी मला ऐकाव लागायचं, की हे पातेलं नीट घासलं नाहीस, दादाचा शर्ट नीट धुतला नाहीस, कॉलरला साबण लावला नाहीस, आज भाकऱ्या फुगल्याच नाहीत, काठ जाड झालेत इ. सूचनांचे डोस मिळायचे. कपडे खरेदी करतानाही माझ्या वाट्याला नवे कपडे कमीच मिळायचे कारण दीदी-दादांचे न बसणारे कपडे मला मिळायचे. घरकाम करत मी शिकत होते. दादा मॅट्रीकला गेल्यावर त्याला नवी सायकल मिळाली. त्याला ज्यादा तासाला जाता यावे म्हणून, पण मी जेंव्हा मॅट्रीकला गेले तेव्हा ज्यादा तासाला पायी जाणेही अशक्य होते कारण एवढ्या लवकर ज्यादा तासाला गेले तर धुण-भांडी, पाणी कोण भरणार?, आईला स्वयंपाकात मदत कोण करणार? तिला बिचारीला घरातील कामे आवरून शेतात जावे लागायचे. तरीही मी शिकत होते. जेवढा वेळ मिळेल तेवढ्यात मन लावून अभ्यास करत होते. त्यावेळी वारंवार ऐकावं लागायचं, की हिला शिकवून काय उपयोग? हे तर परक्याचं धन. शिकून नोकरी लागली तरी पगार तिच्या नवऱ्यालाच मिळणार, दादाला पन्नास टक्के मार्क्स मिळाले तरी कौतुक व्हायचे. त्याला शिकवण्यासाठी, डॉक्टर इंजिनिअर बनवण्यासाठी कर्ज काढायचीही तयारी असायची आई-बाबांची. पण मला फर्स्ट क्लास मिळाला तरी विशेष कौतुक वाटायचं नाही कारण आई-वडीलापुढे प्रश्न होता, हिला जास्त शिकवलं तर जास्त शिकलेलं स्थळ शोधावं लागेल. जास्त खर्च करावा लागेल. बरोबरच होतं माझ्या आई-बाबांचे!


सोमवार, ८ मार्च, २०२१

लेकापरीस लेक, कशानं झाली उणी? - विशेष लेख

 

८ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने महिलांच्या अनेक समस्यांवर प्रकाश टाकणाऱ्या, चिंतनपर, हृदयस्पर्शी, उद्बोधनात्मक, वैचारिक लेखमालिका खास रसिक वाचक बंधूभगिनींसाठी........


लेखपुष्प तिसरे


लेकापरीस लेक, कशानं झाली उणी? - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गुगल

८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साऱ्या जगभर साजरा केला जातो. हा दिवस कुणी सुरू केला व कशा प्रकारे सुरू झाला ते पाहू...


इतिहास:

       सुमारे शंभर सव्वाशे वर्षापूर्वी इंग्लंड व अमेरिकेत कापडांचे व तयार कपड्यांचे कारखाने व गिरण्या निघाल्या. या गिरण्यांमध्ये स्त्रिया मोठ्या प्रमाणात काम करू लागल्या पण त्यांना मजुरी मात्र अगदी थोडी मिळत असे. त्यामुळे त्या स्त्रियानी न्यूयॉर्क शहरातील कापड कारखान्यात ८ मार्च १९०८ साली संघर्ष उभारला. कामाचे तास सोळाऐवजी कमी व्हावेत आणि मजुरी वाढवावी यासाठी लढा दिला. अमेरिकन सरकारने त्यांच्यावर लाठीमार केला. जगाच्या इतिहासात स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचे अधिकार मागण्यांसाठी केलेला हा पहिला संघर्ष होता.


       १९९० साली विविध देशातील महिला प्रतिनिधींची परिषद कोपनहेगन येथे झाली. त्या परिषदेत जर्मनीतील कार्य कर्ती क्लारा झेटकी हिने ८ मार्च हा दिवस महिलांनी जगभर साजरा करावा, असे सुचविले व सर्वांनी या सूचनेस मान्यता दिली. अन्याय अत्याचाराविरुद्ध महिलांनी संघटित होऊन उठविलेल्या संघर्षाची ही खूण होती.


       ८ मार्च १९१७ ला जर्मनीतील महिलांनी घुसखोरी विरूद्ध आवाज उठविला. शांततेची मागणी केली. मार्च १९१७ ला रशियातील कापड कामगार महिलांनी निदर्शने केली होती.


आजची परिस्थिती:

       स्त्रियामधील शक्तीची जाणीव या महिला दिनाच्या निमित्ताने जगभरातील महिलांना करून दिली जाते. हा दिवस स्त्री आंदोलनाच्या प्रेरणेचा दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. आपल्या देशातही गेल्या वीस वर्षांत हा दिवस गावागावापर्यंत पोहचला आहे. स्त्रियांनी लढा देऊन मिळविलेल्या हक्कांची या दिवशी आठवण केली जाते. अनेक प्रकारचे कार्यक्रम राबविले जातात.


       स्त्रियांनी सर्वच क्षेत्रांत उज्ज्वल यश मिळविले आहे. त्या उच्चशिक्षित, सुसंस्कृत, सुजाण व सबल झाल्या आहेत. महिलांनी आपल्या प्रतिभेच्या अविष्कारातून आम्हीही कांही कमी नाही, हे सिध्द करून पुरुषप्रधान समाजाला आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. रूढी परंपरेच्या जोखडाखाली वावरणाऱ्या भारतीय स्त्रीने प्राप्त परिस्थिती, नैसर्गिक मर्यादा आणि उपजत कौशल्य व मेहनतीने आज चारी मुलखी आपला लौकिक वाढविला आहे. कोणतेही क्षेत्र स्त्रीने आपल्या प्रतिभेपासून वंचित ठेवलेले नाही.


       एकविसाव्या शतकात स्त्री पुरुष समानतेच्या कितीही घोषणा ऐकू येत असल्या तरी स्त्रियांची स्थिती शंभर टक्के सुधारली आहे, असे म्हणता येणार नाही. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून ती उभी असली तरी ती अनेक बंधनातून आजही मुक्त झाली नाही. समाजात यशस्वीपणे वावरणाऱ्या महिलांची संख्या वीस टक्के असावी असा अंदाज आहे. बाकीच्या ऐंशी टक्के महिलांची काय अवस्था आहे? या परिस्थितीला कोण जबाबदार आहे? याविषयी विचार करताना महिलाच जबाबदार आहेत, हे आपणास नाईलाजाने मान्य करावेच लागेल. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. गर्भजल चाचणी करून मुलीचा गर्भ काढून टाकण्याची प्रवृत्ती हे कशाचे निदर्शक आहे? २०११ च्या जनगणनेत स्त्रियांचे दर हजारी प्रमाण घटत चालल्याचे दिसून आले आहे, दिसत आहे, ही बाब अत्यंत लाजीरवाणी आहे. शासनाला अशा प्रकारचा गर्भपातविरोधी कायदा करावा लागला, गर्भजल तपासणीवर बंदी  करावी लागली. पण आजही कमी अधिक प्रमाणात असे प्रकार घडतच आहेत, याला कारणीभूत स्त्रीच असते कारण आईला, आजीला, मावशीला, बहिणीला, वहिनीलाच मुलगी नको असते, त्यांना वंशाचा दिवा हवा असतो. या वंशाच्या दिव्याचा प्रकाश कसा पडतो हे माहिती असूनही स्त्री गर्भजल चाचणी करून गर्भपात करण्यास तयार होते. तिने या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला पाहिजे ना? समाजसेवेचे व्रत अंगिकारलेल्या स्त्री डॉक्टरकडून असा गर्भपात होतो ही गोष्ट दुर्दैवीच म्हणावी लागेल.


       हा सर्व प्रकार थांबविण्यासाठी स्त्रियांनी पुढाकार घ्यायला हवा. मुलगा मुलगी समानता दाखविणारे एक पारंपारिक लोकगीत मला आठवले ते असे.....


ल्येकापरीस लेक कशानं झाली उणी?

एका कशीची रतंनं ही दोनी।

लेकीच्या आईला, कुणी म्हणू नका हलकी।

लेकाच्या आईला, कुणी दिलीया पालकी।


       अशिक्षित, अडाणी समजल्या जाणाऱ्या पारंपरिक स्त्रियांची ही समज आजच्या सुशिक्षित स्त्रियांना मार्गदर्शक ठरेल. या लोकगीताचा मतितार्थ जाणून घेऊन आपण सर्व स्त्रियांनी प्रतिज्ञा केली पाहिजे की, मी मुलीचा गर्भपात करून घेणार नाही, असा प्रकार लक्षात आला तर त्या स्त्रीला त्यापासून दूर करण्यासाठी माझ्या परीने आटोकाट प्रयत्न करीन.


रविवार, ७ मार्च, २०२१

आधी प्रमाणपत्र, मग लग्न! - विशेष लेख

८ मार्च जागतिक महिला दिन विशेष

पुष्प दुसरे

आधी प्रमाणपत्र, मग लग्न। - विशेष मराठी लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       एप्रिल महिना सुरू होता. वीज कपातीचा काळ सुरु होता. वारंवार रात्री अपरात्री लाईट अचानक जात होती. भयंकर उष्म्यामुळे जनता जाम वैतागली होती. अशावेळी आजाराने अशक्त झालेली २६ वर्षाची विवाहित छाया आपले खोल गेलेले डोळे किलकिले करून क्षीण स्वरात आपल्या वडिलांना सांगत होती, "बाबा घरात इन्व्हर्टर बसवून घ्या". वडिलांनी छायाला विचारले, "छाया बेटा इन्व्हर्टर कशासाठी गं?" छाया म्हणाली, "बाबा, रात्री अपरात्री मी देवाघरी गेले तर तुमची धावपळ होईल, माणसं, नातेवाईक गोळा करायला". हृदय पिळवटून टाकणाऱ्या या बोलण्याने बाबांना अश्रू आवरता आले नाहीत. मरणाच्या दारात उभी असलेली त्यांची लाडकी लेक तिच्या निधनानंतर होणारा बाबांचा त्रास कमी करू पहात होती.


       छाया ठेंगणी, दिसायला चार-चौघीसारखी होती. मध्यम परिस्थितीतील सुसंस्कृत घरात वाढलेली छाया शिक्षणात फार हुशार नव्हती, पण बालपणापासूनच घरकामात निपुण होती. घरकामात ती फार रमायची. कधीही कंटाळा करायची नाही. आईला घरकामात मदत करण्यात ती नेहमी पुढे असायची. घराची स्वच्छता, टापटीप ठेवण्यात तिला विशेष रस होता. स्वयंपाक करण्यात तिचा हातखंडा होता. विविध खाद्यपदार्थ करून ती सर्वांना खूष करायची. छोट्या बहिणीची, मोठ्या भावाची ती लाडकी बहीण होती. थोडक्यात, छाया सुगृहिणी होणार असे तिच्या आई वडिलांना वाटायचे. घरकाम सांभाळत ती बारावी आर्ट्सची परीक्षा ५५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. सोबत इंग्रजी, मराठीच्या टायपिंग परीक्षाही ती पास झाली. एफ्. वाय्. बी. ए. चा अभ्यास करत करत छाया खाजगी कार्यालयात अर्धवेळ नोकरीही करू लागली. अशाप्रकारे गुणी छायाचे सर्व व्यवस्थित कामकाज सुरु झालेले असतानाच....


       एका ओळखीच्या व्यक्तीने छायासाठी एक स्थळ आणले. मुलगा दिसायला सुंदर, एकुलता एक, कारखान्यात नोकरी, पाच एकर शेत असलेला होता. छायाच्या आई वडिलांना हे स्थळ छायासाठी अनुरूप वाटले. त्यांनी अधिक चौकशी न करता, अधिक विचार ही न करता ताबडतोब यादीपे शादी करून टाकली.


       छाया सासरी गेली, पण कांहीं दिवसांतच नवऱ्याच्या असभ्य वर्तनाने व चिडखोर स्वभावाने हैराण झाली. पण आई वडिलांना त्रास नको म्हणून जन्मतःच प्रेमळ, समंजस असलेली छाया निमूटपणे संसार रेटू लागली. तिला आई बनणार असल्याची चाहूल लागली, पण सासरच्या कोणीच तिच्याकडे लक्ष दिले नाही, तिला दवाखान्यात ही नेले नाही. शेवटी बाळंतपणासाठीच माहेरी पाठविले. छायाने मुलाला जन्म दिला पण तेंव्हा पासूनच तिच्या व बाळाच्या तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्या. छाया स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून बाळाचे संगोपन करु लागली, पण दुर्दैवाने तिचे बाळ वाचले नाही. छायाची तब्येत दिवसेंदिवस ढासळू लागली. शेवटी डॉक्टरांनी एच. आय्. व्ही. टेस्ट केली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. तिकडे तिचा नवरांही मरण येत नाही म्हणून जगत होता. इकडे छायाचीही अवस्था बघवत नव्हती. सुखी संसाराची स्वप्ने पाहणारी एक कोमल कळी उमलण्याआधीच करपून गेली.


       समाजात अशा अनेक दुर्दैवी छाया असतील, ज्या कोणताही गुन्हा न करता हकनाक फाशी जात असतील. त्यांच्यासाठी पालकांनी घाई न करता एच. आय्. व्ही. प्रमाणपत्र पाहूनच लग्न ठरवावे. त्यामुळे अशा असंख्य छायांना आपण निश्चितपणे वाचवू शकतो.


       आपल्या लाडक्या लेकीचा हात दुसऱ्याच्या हाती सोपवताना योग्य ती खबरदारी घेणे आपले कर्तव्य आहे, होय ना?


मंगळवार, २ मार्च, २०२१

मुलीच्या लग्नाची घाई कशाला? - विशेष लेख


८ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने महिलांच्या अनेक समस्यांवर प्रकाश टाकणाऱ्या, चिंतनपर, ह्रदयस्पर्शी, उद्बोधनात्मक, वैचारिक लेखमालिका खास रसिक वाचक बंधूभगिनींसाठी........


८ मार्च महिला दिनानिमित्त वैचारिक, चिंतनपर लेखांची मालिका.......


जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेख पुष्प पहिले


मुलीच्या लग्नाची घाई कशाला? - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


कळी खुलू द्या....

       गव्हाळ रंगाची, बोलक्या डोळ्यांची एक तरूणी, दोन्ही हातांना दोन छोट्या मुलींसह मला रस्त्यावर समोरून येताना दिसली. माझ्याकडे पाहून गोड हसली व म्हणाली, "मॅडम, ओळखलं का मला". मी तिच्याकडे निरखून पहात म्हटले, "तू उषा कोकाटे ना?" तिने होय म्हणताच मी विचारले, "या दोन छोट्या कुणाच्या? तुझ्या भावाच्या का?" ती म्हणाली, "भावाच्या न्हाईत माझ्याच हैत". मी आश्चर्याने विचारले, "अगं लग्न केंव्हा झालं? बोलवलं नाहीस लग्नाला". ती सहजपणे म्हणाली, "लग्न झालं बी, अन् नवरा मरून बी गेला, दारू पीत होता, लिव्हर खराब झालं नि गेला मरून". मी खेदाने विचारले, "पाठीमागे इस्टेट वगैरे आहे की नाही?" ती म्हणाली, "कुठली इस्टेट आणि कुठलं काय, फुटक्या कवडीचीबी इस्टेट न्हाय". मी विचारले, "मग काय करतेस आता?" ती म्हणाली, "वडील आधीच वारले होते. माझ्या काळजीनं आई बी दोन वर्षापूर्वी मरून गेली. एक भाऊ हाय पण या महागाईच्या काळात त्याचं त्याला फुरं झालय. माझी मी भाड्याची खोली घेऊन राहते. चार घरची धुणीभांडी करून घरखर्च भागवते. काय करायचं मॅडम माझं नशीबच फुटकं म्हणायचं. काय बी करून या पोरीस्नी लहानाचं मोठं करायचं ठरवलंय बघा".


       एवढं बोलून उषा गडबडीने निघून गेली. पण माझ्या मनात असंख्य विचारांचे काहूर माजवून गेली. चार-पाच वर्षापूर्वी स्वच्छंदपणे बागडणारी, क्रीडा स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळविणारी, सांस्कृतिक कार्यक्रमात उत्साहाने भाग घेणारी उषा आज 'विधवा' बनली होती. अकाली प्रौढ बनून अंधारमय जीवनात प्रकाशाची ज्योत लावू इच्छित होती. अठरा वर्षे पूर्ण होण्याच्या आतच तिच्या आईने आमची गल्ली चांगली नाही. मी दिवसभर कामाला जाते, तरण्याताठ्या पोरीची जबाबदारी कोण घेणार? म्हणून उषाचे लग्न करून मोकळी झाली होती. मुलीच्या जबाबदारीतून मुक्त झाली होती.


       आज समाजात मुलीचे लवकरात लवकर लग्न करून मुक्त होणाऱ्या अनेक माता आहेत. त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपण आपल्या मुलीचं यामुळे वाटोळं करत आहोत. उषासारख्या दुर्दैवी अनेक उषाही आहेत. दर २९ व्या मिनिटाला बलात्कारास, दर दिवशी ५० हुंडा अत्याचारास बळी पडणाऱ्या आपल्या महान देशात अशा उषानी दोन कोमल कलिकासमवेत कसे जगावे? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. देशाच्या कानाकोपऱ्यात स्त्रियावरील अत्याचारांवर चर्चा होतात. अत्याचार रोखण्यासाठी कायदे होतात. समाजातील मूठभर लोक विचारमंथन करतात पण या चर्चेने, विचारमंथनाने किंवा कायद्याने स्त्रियांवरील अत्याचार दूर होतील असे म्हणणे धाडसाचे ठरेल. समाजाची, लोकांची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत अशा लाखो उषा दुर्दैवाच्या अंधारात चाचपडतच राहणार का?


       शेवटी एकच सांगावेसे वाटते आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी मुलीचे लग्न लवकर उरकून टाकू नका तिला स्वावलंबी बनवा, स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहण्याची क्षमता तिच्यात येऊ द्या. करालना एवढं!