शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची एकादश व्रते - विशेष लेख


दि. ३० जानेवारी हा महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीचा दिवस. हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त हा विशेष लेख.


राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची एकादश व्रते - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूूगल


दे दी हमें आझादी बिना खडग बिना ढाल ।

साबरमती के संत तूने कर दिया कमाल ।

आँधी में भी जलती रहे गांधी तेरी मशाल ।

साबरमती के संत तूने कर दिया कमाल ।


किती सार्थ आहेत या ओळी! महात्मा गांधीजीनी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसा म्हणजे सत्याचा पाया आहे असे ते मानत. कुठल्याही गोष्टीत जास्त हाव धरू नका, शेजारधर्म पाळा, ईश्वरावर विश्वास ठेवा, भ्याडपणा सोडा, शूर बना ही त्यांची शिकवण होती. साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी हे गांधीजींचे तत्व! गांधीजी आंघोळीला साबणही वापरत नसत. ते दगडाने अंग घासायचे. गांधीजीना वेळ वाया घालवलेला अजिबात आवडत नसे. अशा प्रकारे व्रतस्थ जीवन जगणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी एकादश व्रते जीवनभर आचरणात आणली, ती पुढीलप्रमाणे....


अहिंसा, सत्य, अस्ते, ब्रम्हचर्य, असंग्रह,

शरीराश्रम, आस्वाद, सर्वत्र भयवर्जनम्,

सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी, स्पर्शभावना

ही एकादश सेवावी नम्रत्वे व्रतनिश्चये ।


एकादश व्रताची संकल्पना गांधींनी पुढीलप्रमाणे स्पष्ट केली आहे.


१. अहिंसा:

मानवी जीवनाचा आधार म्हणजे अहिंसा होय. दुसऱ्यासाठी त्याग, सहनशीलता, सेवा, आत्मक्लेश यांचा अहिंसेमध्ये समावेश होतो. हिंसेने हिंसा कधीच नाहीशी होऊ शकत नाही. अहिंसा हा शूरांचा धर्म आहे. 'अहिंसा परमोधर्मः' हे त्रिकालाबाधित सत्य आहे. दुसऱ्याच्या बाजूने विचार करणे, त्याचे हित जोपासणे यातून अहिंसेचा उदय होतो. दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळा वाटणे ही अहिंसेची प्राथमिक स्थिती होय. सत्यनिष्ठ मनुष्याच्या शुद्ध आणि न्यायी वृत्तीतून व्यापक अहिंसेचा जन्म होतो म्हणून गांधीजींनी सत्य आणि अहिंसा यांचा समन्वय साधला. त्यांच्या मते मानवा-मानवातील क्रिया-प्रतिक्रियांची प्रभावी पद्धती म्हणजे अहिंसा होय.


२. सत्य:

सत् चा अर्थ आहे अस्तित्व. सत्य म्हणजे जे अस्तित्वात आहे ते. गांधीजींचे जीवन म्हणजे सत्यनिष्ठेचे प्रयोग होय. सत्य चिरंतन शाश्वत असते. सत्य हाच परमोच्च धर्म आहे. सत्य हे वैचारिक व प्रात्यक्षिक आहे. ते सतत शुद्ध, सनातन आणि अपरिवर्तनीय आहे. त्यालाच गांधीजी ईश्वर असे मानत. सत्याला परमेश्वराइतके महत्त्व देत. वासना सोडून सेवाकार्यात रममाण होणे, सहिष्णू वृत्ती बाळगून परमेश्वराशी एकरुप होणे म्हणजे सत्याचरण करणे होय. सत्य हेच ईश्वरज्ञान. अज्ञानाचे पटल दूर झाले की सत्याचा प्रकाश दिसतो असे गांधीजी नेहमी म्हणत .


३. अस्तेय:

अस्तेय म्हणजे दुसऱ्याच्या वस्तूची चोरी न करणे एवढाच अर्थ नसून आपल्यावरील समाजऋण फेडणे असा आहे. गांधीजीना अस्तेय हे व्रतसुद्धा प्राणप्रिय होते. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे समाजामध्ये राहून समाजाच्या उपकारामुळे ज्या ज्या अनेक सोयी व्यक्तीला मिळतात त्यापैकी कांहीं भाग समाजाला न देता सर्वस्वी स्वतःच उपभोगणे म्हणजे चोरी होय. अशी चोरी आपल्या हातून होवू नये, असे गांधीजीना वाटे.


४. ब्रम्हचर्य:

ब्रम्ह म्हणजे वेद. त्यांचे अध्ययन सुरू करण्यासाठी उपनयन संस्कार करून तद्नुरुप जीवनसाधना सुरू करण्यासाठी जीवन जगण्याचे जे नियम घालून दिले जातात ते ब्रम्हचर्य होय. ब्रम्हचर्य म्हणजे इंद्रिय संयम करणे. ब्रम्हचर्यामध्ये शरीररक्षण, बुद्धिरक्षण आणि आत्म्याचे रक्षण आहे. फलाहार हाच खरा ब्रम्हचर्य व्रताचा आधार होय. ब्रम्हचर्य म्हणजे काया, वाचा, मने करून सर्व इंद्रियांचा संयम होय. यासाठी त्याग केला पाहिजे. ईश्वर प्राप्तीसाठी ब्रम्हचर्य व्रताचे पालन आवश्यक आहे अशी त्यांची श्रद्धा होती. जननेंद्रिय व स्वादेंद्रिय यांच्यावर विजय मिळविण्यासाठी ब्रम्हचर्य व्रताचे पालन गांधीजीनी जीवनभर केले. त्यातूनच त्यांनी आत्मशुद्धी करण्याचा  प्रयत्न केला. आहार व उपवास यांचा ब्रम्हचर्याशी निकटचा संबंध असला तरी त्याचा मुख्य आधार मन हेच आहे. मलिन मन केवळ उपवासाने शुद्ध होत नाही. मनाचा मळ विचारांने, ईश्वर चिंतनाने आणि शेवटी ईश्वर प्रसादानेच स्वच्छ होतो यासाठी ब्रम्हचर्य व्रताचे पालन महत्त्वाचे आहे, असे ते म्हणत.


५. असंग्रह:

गरज नसताना कोणत्याही वस्तूंचा संग्रह करु नये, म्हणजे समाजातील प्रत्येकाला ती वस्तू सहज उपलब्ध होऊ शकेल. या व्रताचे पालन करून लोकशाही मूल्ये आचरणात आणणारा समाज गांधीजीना हवा होता. सर्वोदय समाज निर्माण करणे हे त्यांचे सामाजिक उद्दिष्ट होते. सामाजिक न्याय, आर्थिक समता आणि सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध होण्यासाठी असंग्रह या व्रताचे सर्वांनी पालन करावे असे ते म्हणत.


६. शरीरश्रम:

श्रम हा महत्वाचा मुख्य संस्कार. शिक्षण म्हणजे शरीर, मन व आत्मा यांचा विकास असे गांधीजी मानत. त्यामुळे श्रम या संस्कारासाठी स्वावलंबन या तत्वाचा जीवनात अंगीकार करा. ते स्वतः सूत कातून खादीचे कापड विणत. स्वतःचे कपडे स्वतः धूत असत. श्रमातून शरीराचा संपूर्ण विकास होतो असे ते मानत.


७. आस्वाद:

जिभेचे चोचले न पुरविता अन्न सेवन करणे म्हणजे आस्वाद. गांधीजींचे जेवण अतिशय साधे असे. अन्नासाठी शरीर नसून शरीर कार्यक्षम करण्यासाठी अन्न आहे असे  ते म्हणत. गांधीजी या व्रताचे नियमित आचरण करीत. आफ्रिकेत असतानाही ते शाकाहारी भोजन करीत असत.


८. भयवर्जनम्:

भयवर्जनम् म्हणजे भीती नाहीशी करणे. व्यक्तीया आचरणात सत्य गोष्टींचा समावेश असेल तर कोणत्याही बाबींची भीती नाही. महात्मा गांधीजींचे जीवनच प्रयोगशील होते. त्यांनी अनेक प्रयोग केले. त्यासाठी कोणतीही भीती बाळगली नाही. ईश्वरावर त्यांची नितांत श्रद्धा होती. ज्यांना नवीन प्रयोग करावयाचे असतील त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, तसे झाल्यास सत्य लवकर प्रकट होते. असे प्रयोग करणाऱ्याला ईश्वर सांभाळून घेतो. धोक्यांचा विचार त्यांच्या मनाला कधीच शिवला नाही.


९. सर्वधर्मी समानत्व:

गांधीजींच्या मते धर्म म्हणजे सत्य व अहिंसा. सर्व धर्माबद्दल सारखीच आदराची व समानत्वाची भावना सर्वामध्ये रूजण्यासाठी धार्मिक व आध्यात्मिक शिक्षणाची गरज आहे असे ते मानत. भिन्न भिन्न जातीमध्ये ऐक्य निर्माण व्हावे, आपल्या धर्माबरोबरच अन्य धर्माची श्रेष्ठता जाणून त्याबद्दल पूज्य भाव वाढवावा, मैत्रीची भावना वाढवावी, या गोष्टींना जीवनात व शिक्षणात मोठे स्थान आहे. शिक्षणातून सर्व धर्म समानत्व प्रस्थापित करावे यासाठी विविध धर्माच्या सिद्धांताचा अध्यापनात समावेश करावा, सर्वामध्ये सर्वधर्म समभाव वाढीस लागावा, विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक श्रद्धा दृढ करावी असे गांधीजी म्हणत.


१०. स्वदेशी:

स्वदेशी म्हणजे यंत्रोद्योगी मालाच्या विरूद्ध हस्तोद्योगाचा पुरस्कार होय. यामागे श्रमसंस्कार आणि स्वयंरोजगार हा हेतू होता. आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू देशातच निर्माण होण्यासाठी गांधीजींनी स्वदेशीचा पुरस्कार केला. त्यानुसार जीवनभर हातमागावर खादीचे कापड विणून त्याचा वापर केला. देशाच्या विकासासाठी खेड्याकडे चला, आपल्या हक्काबद्दल जागरूक राहून स्वदेशीचा प्रसार करा हा स्वदेशीचा हेतू आहे असे ते मानत.

 

११. स्पर्शभावना: 

व्यापक करूणा हा गांधीजींचा स्वभाव विशेष होता. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे. समाजाच्या उच्च थरामधून खालच्या थरापर्यंत शिक्षण झिरपत जावे हा मेकाँले यांचा विचार त्यांना मान्य नव्हता. शिक्षणाच्या बाबतीत धर्म, जात, पंथ, वर्ण, उच्चनीच हा भेदभाव नष्ट करून सर्वच समाजाला शिक्षण मिळावे असा त्यांचा आग्रह होता. आपल्या देशात प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व शाळा व महाविद्यालयांचे दरवाजे सर्वांसाठी सतत उघडे असले पाहिजेत अशी त्यांची उत्कट इच्छा होती. गांधीजीनी दक्षिण आफ्रिकेत काळे-गोरे भेद दूर करण्यासाठी दिलेला लढा स्पर्शभावनेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला.


ही होती महात्मा गांधीजींची एकादश व्रते आणि त्यांचे थोडक्यात विश्लेषण. या व्रतानुसार व्रतस्थ जीवन असणाऱ्या थोर महात्म्यांचे विचार आपण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करू या, हीच महात्मा गांधीजीना खरी श्रद्धांजली ठरेल.


सोमवार, २५ जानेवारी, २०२१

प्रजासत्ताक दिनाचा निर्धार - विशेष लेख

 

जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला आपला भारत २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. त्यानिमित्त....


प्रजासत्ताक दिनाचा निर्धार - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश दास्यत्वाच्या निबिड अंधकारातून बाहेर पडला. स्वातंत्र्यानंतर 'स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल' असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता म्हणून संविधानाच्या निर्मितीसाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. संविधान सभेच्या कामात सुसूत्रता यावी यासाठी वेगवेगळ्या समित्या तयार करण्यात आल्या. संविधानाचा मसुदा तयार करण्याचे काम मसुदा समितीकडे सोपविण्यात आले. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली. डॉ. आंबेडकर यांचा विविध देशाच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या प्रत्येक मसुद्यावर घटना समितीसमोर चर्चा, वादविवाद होत असत. त्यातून सर्वानुमते मान्य केला जाणारा मसुदा पुन्हा लिहिण्यात आला. अशा प्रकारे ३९५ कलमे व ९ परिशिष्टे असलेल्या घटनेचा मसुदा तयार करण्यात आला. २ वर्षे ११ महिने १८ दिवस अहोरात्र श्रम करून आपल्या प्रचंड अशा विद्वत्तेतून डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताचे संविधान तयार केले. या योगदानामुळेच डॉ. बाबासाहेबांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात.


संविधानाचा स्वीकार:

       संविधान सभेने संपूर्ण संविधानाचा स्वीकार २६  नोव्हेंबर १९४९ रोजी केला. संविधानाच्या  अंमलबजावणीसाठी २६ जानेवारी १९५० हा दिवस निश्चित करण्यात आला. कारण पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी १९३० पासून २७ जानेवारी हा दिवस 'स्वराज्य दिन 'म्हणून साजरा केला जात असे. या दिवसाची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस निवडण्यात आला. संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्यास २६ जानेवारी १९५० पासून सुरूवात झाली. म्हणून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करतो. या आनंददायी सोहळ्यापासून कोणताही भारतीय नागरिक पारखा राहू शकत नाही. कारण या प्रजासत्ताक दिनाचा संबंध देशातील प्रत्येक देशाभिमानी नागरिकांशी आहे.


संविधानाचा सरनामा:

       आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संविधान सभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. हा सरनामा म्हणजे संपूर्ण संविधानाचा थोडक्यात सारांश आहे. देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे देशातील प्रत्येक नागरिकास चांगल्या प्रकारे कसे उपभोगता येईल? त्यांना आपल्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव निर्माण करून देणे आणि हे सर्व करत असताना राष्ट्राची एकात्मता आणि एकता कशी राखता येईल याचा विचार घटनाकारांनी केला आहे.


देशाची सद्यस्थिती:

       संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले असले तरी सर्वच नागरिकांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य उपभोगता येते का? असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण सर्वांना संधीची समानता अजूनही नाही. मूठभर भांडवलदारांच्या जवळ अब्जावधीची संपत्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला गरीब माणूस हा अजूनही कंगालच आहे. म्हणजेच देशात मोठ्या प्रमाणात अजूनही आर्थिक विषमता आहे. ही विषमता नष्ट व्हायची असेल तर सध्या उपलब्ध असलेल्या शासकीय नोकऱ्यामध्ये प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस शासनाने नोकरी द्यावी.


       महिलांवरील अत्याचारांंनी तर उच्चांक गाठला आहे. फक्त महाराष्ट्रात नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोच्या अहवालानुसार महाराष्ट्रात दररोज १०७ महिला बेपत्ता होतात आणि १७ महिलांची अवैध वाहतूक होते. सन २०१९ च्या अहवालानुसार त्या वर्षात अवैध वाहतुकीची शिकार झालेल्या ९८९ स्त्रियांंपैकी ८८ टक्के तरुण महिला तर सहा टक्के अल्पवयीन बालिका होत्या. मुंबई शेजारच्या पेणमध्ये तीन वर्षाच्या लेकीवर पाशवी अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. मुंबईतच एका तरूणीवर अत्याचार करून तिला खाडीत ढकलण्याचा प्रयत्न झाला. बीड शहराच्या वळचणीस असलेल्या एका पीडित तरूणीने अत्याचारास वाचा फोडली म्हणून तिला बहिष्कृत करण्यात आले. लातूरजवळ साठ वर्षाच्या महिलेवर बलात्कार झाला. यावरून महिलांवरील अत्याचारांची विदारक स्थिती कलक्षात येते.


       धर्मवाद तर पूर्वीपेक्षा अधिकच घट्ट होत आहे. धर्माच्या नावाखाली माणसांच्या कत्तली होत आहेत. यातून परस्परांमध्ये असणारा बंधुभाव नष्ट होत आहे. न्यायव्यवस्थेमध्ये सामान्य माणसाला न्याय मिळेलच याची खात्री आता राहिली नाही. ज्यांच्याकडे जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी आहे तेच आता कायदा हातात घेऊन सामान्य माणसांचे मुडदे पाडत आहेत.


       अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी माणसाला स्वतःचा विचारही निर्भिडपणे मांडता येत नाही. आपल्या विचारातून समाजाला विवेकाची दिशा देणाऱ्या विचारवंतांच्या हत्या केल्या जात आहेत. नागरिकांना मतदानाचा अधिकार असला तरी सर्वजण निर्भयपणे मतदान करू शकत नाहीत. ज्यांचाकडे आर्थिक पाठबळ आहे तेच लोक निवडणूकीत विजयी होत आहेत. यातून लोकशाहीची पायमल्ली होत आहे. 'बळी तो कान पिळी' अशी व्यवस्था पुन्हा उभारी घेत आहे.


आपला निर्धार:

       एकंदरीत परिस्थिती पाहता घटनात्मक मूल्यांची जोपासना करणे गरजेचे असताना आपण सर्वजण या मूल्यांचे अवमूल्यन करीत आहोत. हे आपणच थांबवायला हवे. मोठ्या लोकांच्या मोठमोठ्या गोष्टी सोडून द्या. आपण सामान्य नागरिकांनी आपापल्या पातळीवर आपल्यापरीने प्रयत्न करू या.

  • आपण आपले व आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राखू या.
  • आपले घर व घराचा परिसर स्वच्छ व सुंदर राखू या.
  • वृक्ष लागवड संवर्धन करू या. वृक्षतोडीला आळा घालू या.
  • प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणाचा समतोल राखू या.
  • गरीब व गरजूंंना यथाशक्य मदत करू या.
  • शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊ या.
  • निर्भयपणे मतदान करून योग्य उमेदवाराला निवडून देऊ या.
  • नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करू या.
  • आपल्या देशाचा  सांस्कृतिक वारसा जपूया.
  • वाहतुकीच्या नियमांचे पालन करु या.
  • आपल्या हक्काबरोबरच कर्तव्यांचे पालन करू या.


       प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिन केवळ परंपरा म्हणून नव्हे तर वैचारिकतेची जोपासना म्हणून साजरा करू या. वाढता धर्मवाद नष्ट करू या. त्यामुळे प्रत्येकाच्या मनांमध्ये एकमेकांविषयी बंधुभाव निर्माण होईल व आपला भारत खऱ्या अर्थाने समृद्ध व महासत्ता बनेल.

मग कराल ना एवढं आपल्या देशासाठी ?


गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

नेताजी सुभाषचंद्र बोस: धडाडीचे नेतृत्व - विशेष लेख

 

नेताजी सुभाषचंद्र बोस: धडाडीचे नेतृत्व - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       आधुनिक भारताच्या इतिहासात एक मनस्वी, प्रतिभावान व असामान्य धडाडीचे देशभक्त म्हणून नेताजींच्याकडे पाहिले जाते. प्रारंभापासून सुभाषबाबूनी देशहित ही एकच गोष्ट स्विकारली आणि तिच्या आड येणारे परकीय राज्यकर्ते असोत अथवा स्वकीय नेते असोत त्यांना कटाक्षाने बाजूला सारले. त्यांची विचारसरणी तरूणांना देशप्रेमाकडे आकर्षित करणारी होती. आझाद हिंद सेनेचे सरसेनापती या नात्याने  त्यांनी राष्ट्रवाद नवतरुणांच्यापुढे निर्माण केला.


       नेताजी सुभाषचंद्र बोस हे क्रांतिकारकांचे मेरूमणी होते. ज्या सशस्त्र क्रांतीचे स्वप्न बॅरिस्टर सावरकरांनी बाळगले ते स्वप्न नेताजींनी पूर्ण केले. आझाद हिंद सेनेची स्थापना, नौदलातील उठाव या घटना घडल्या नसत्या तर काय वाटेल ते करून हिंदी लोकांना ताबडतोब स्वातंत्र्य देऊन टाका असा आदेश अँटली यांनी लॉर्ड माउंटबॅटन यांना दिला असता असे वाटत नाही. यावरून नेताजींच्या कार्याचे महत्त्व समजून येते.


       अशा या महान, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ मध्ये कटक येथे झाला. विद्यार्थीदशेत असतानाच ते कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांचे नेते झाले. ते १९१९ साली तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बी. ए. ची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. विलायतेला जाऊन ते आय. सी. एस्. झाले होते. पण ब्रिटिशांची चाकरी नको म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.


       महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली १९२१ मध्ये असहकार चळवळीत सुभाषबाबूंनी भाग घेतला आणि तुरुंगवासही भोगला. त्यांना एकदा देशातून तीन वर्षे हद्दपारही व्हावे लागले. त्या काळात ते व्हिएन्ना ऑस्ट्रिया येथे होते. तेंव्हाच त्यांनी फॅसिझम आणि साम्यवादाचा सखोल अभ्यास करून युरोपमधील राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला.


       सुभाषबाबू काँग्रेसमधले एक लोकप्रिय नेते मानले जाऊ लागले होते. हरिपूर आणि त्रिपुरा येथे भरलेल्या काँग्रेसचे ते अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांच्या जहाल स्वभावामुळे त्यांना गांधीजींचे विचार पटले नाहीत. त्यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. तेंव्हा त्यांना काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले.


       नेताजी त्यांच्या घरात नजरकैदेत असताना एके दिवशी वेषांतर करून निसटले आणि पेशावर मार्गे जर्मनीत गेले. परदेशात जाऊन तिथल्या भारतीयांची संघटना करण्यासाठी त्यांनी फार श्रम केले. जर्मनी, इटली येथे असलेल्या भारतीय सैन्याला त्यांनी इंग्रजाविरूद्ध लढण्यासाठी अवाहन केले.


       २१ ऑक्टोबर १९४३ ला सुभाषबाबू सिंगापूरला आले. त्यांनी तेथे आझाद हिंद सेनेची स्थापना केली. ते स्वतः राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, सरसेनापतीही झाले. त्यांनी समांतर सरकार स्थापन केले. आझाद हिंद सेना विजयी होत, लढत इंफाळपर्यंत आली. पुढे जपानचा युद्धात पराभव झाला. सुभाषबाबूंनाही माघार घ्यावी लागली. तेंव्हा विमानाने ते रशियाकडे निघाले, पण त्या विमानाला अपघात झाला. त्यात त्यांचे निधन झाले असे मानले जाते.


       "तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूँगा।" हा त्यांचा नारा होता. सुभाषबाबू भारताचे एक महान सुपूत्र होते, झुंजार नेते होते. परदेशात जाऊन परदेशाच्या सहकार्याने इंग्रजांना पळवून लावावे ही त्यांची जिद्द होती.


       सुभाषबाबू आझाद हिंद सेनेचे सरसेनापती म्हणून काम पहात असताना त्यांनी खरोखरच एक अदभूत जग निर्माण केले होते. त्यांनी देशोदेशी पसरलेल्या जाती धर्माच्या हिंदी नागरिकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये देशभक्ती निर्माण केली. एक राष्ट्रवादी परंपरा निर्माण करून त्यांना उत्कृष्ट उत्साहाने स्वार्थत्याग करावयास शिकविले. हे करीत असताना गांधीजी व त्यांच्या सहकाऱ्यांना कधीच अवमानिले नाही. या देशभक्तांचा तितकाच आदर केला. त्याचबरोबर भारतीय प्राचीन परंपरा ही आधुनिक विज्ञानाशी व आधुनिक समाजाशी, शिस्तीशी विसंगत नाही हे सर्वांना दाखवून दिले.


नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विद्यार्थी जीवनातील आठवणी - विशेष लेख

 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विद्यार्थी जीवनातील आठवणी - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल

       ओरिसा प्रांतातील कटक या शहरात राहणाऱ्या जानकीनाथ बोस या तेजस्वी अशा पित्याच्या घरात छोट्या सुभाषबाबूना कसलीही कमतरता नव्हती. सुभाषचंद्र यांच्या वयाची पाच वर्षे पूर्ण होताच त्यांच्या वडिलांनी त्यांचे नांव कटकमधील एका प्रसिद्ध अशा प्रोटेस्टंट युरोपियन स्कूलमध्ये दाखल केले.


      एके दिवशी सुभाषचंद्र शाळेतून परत आले ते संताप आणि दुःख यामुळे रडत रडतच. ते वडिलांना रडतच म्हणाले, "मी त्या शाळेत परत कधीच जाणार नाही." त्याचे कारण विचारल्यांवर ते म्हणाले, "तिथली मुले मला इंडियन म्हणूनच हिणवतात." वडील म्हणाले, "अरे सुभाष, मग त्यात तुला लाज वाटण्यासारखे अथवा अपमानित होण्यासारखे काय आहे? माझ्या मते काहीच नाही. अरे रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक अशी सर्व मोठी माणसे 'इंडियन' म्हणजे भारतीयच आहेत ना?"


सुभाषचंद्र म्हणाले, "ते खरे आहे पण मी वर्गात पहिला आलो तरी म्हणे स्कॉलरशिपला बसायचं नाही. मला कवायत येते, तरीही मला दलात घेत नाहीत. शिवाय त्या शाळेत अजून एक वाईट पद्धत आहे. आम्ही बंगाली मुले आपापसात बंगाली बोलू लागलो की आम्हांला हटकतात, दंड करतात आणि फक्त इंग्लिशमध्येच बोलण्याची सक्ती करतात."


       जानकीनाथांनी लहानग्या सुभाषचंद्राची तक्रार ऐकून घेतली व त्यांना ती पटलीही. त्यांनी लगेच त्या शाळेच्या प्राचार्यांना अर्ज केला. त्यात लिहिले, "माझा मुलगा बंगाली आहे. त्याची मातृभाषा बंगाली आहे व धर्मभाषा संस्कृत आहे. तुमच्या मान्यवर शाळेत बंगाली व संस्कृत या भाषांना बंदी आहे, तरी कृपया माझ्या मुलाचे नांव आपण आपल्या शाळेतून कमी करून त्याचा दाखला त्वरित द्यावा". त्यानुसार त्यांचा दाखला मिळाला व सुभाषचंद्र यांचे नांव दुसऱ्या शाळेत दाखल केले. ज्या शाळेत जवळजवळ सर्वच विद्यार्थी बंगाली होते. असे होते सुभाषचंद्र मायभूचा व मायबोलीचा अभिमान बाळगणारे थोर सुपूत्र.


दुसरा एक असाच त्या शाळेत असतानाचा प्रसंग...

आपला भारत त्यावेळी इंग्रजांच्या अधिपत्याखाली असल्यामुळे साहजिकच इंग्रजांच्या मुलांचा, इंग्रजी अधिकाऱ्यांच्या मुलांचा भारतीय मुलांकडे पहाण्याचा कल हा तुच्छतेचा असे. या तुच्छतेच्या मानसिकतेतून इंग्रज अधिकाऱ्यांची मुले त्या शाळेत शिकणाऱ्या भारतीय मुलांना तुच्छतेची वागणूक देत. त्यांना शिव्या देत, त्यांना मारत असत.


        एके दिवशी मधल्या सुट्टीत इंग्रज अधिकाऱ्यांची मुले मैदानात खेळत होती. दुसरीकडे एका झाडाखाली भारतीय मुलं झाडाखाली बसून खेळ बघत होती. सुभाष तेथे आला आणि त्या बसलेल्या मुलांकडे बघत म्हणाला, "तुम्हाला खेळायला आवडत नाही का?" मुले म्हणाली, "खूप आवडतं, पण ती इंग्रजांची मुले खेळू देतील तर ना. ती मारतात आणि तिथं खेळूही देत नाहीत." हे ऐकून सुभाष म्हणाला, "तुम्हाला हात नाहीत का, तुम्ही शेणामातीचे आहात का? चला काढा चेंडू, आपणही खेळू". आधी तर भारतीय मुलं जरा बिचकली. ती एकमेकांकडे बघू लागली, पण मग सुभाषचा उत्साह आणि आत्मविश्वास बघून ती सगळी सुभाषसह मैदानाकडे वळली. त्यांनीही खेळायला सुरुवात केली. हे बघितल्यावर इंग्रज मुलांनी त्यांना अडविले. दोघांमध्ये चांगलीच जुंपली. भारतीय मुलांनी इंग्रज मुलांना चांगलेच बदडले. शिक्षक, प्राचार्य मध्ये पडले आणि त्यांनी त्यांची मारामारी सोडविली. प्राचार्यांनी सगळ्यांना समजावले आणि पुन्हा असं न करण्याबद्दल सक्त ताकीद दिली.


       दुसऱ्या दिवशी दोन्ही बाजूची मुलं तयारीतच होती. दुसऱ्या दिवशीही पुन्हा मारामारी झाली. पुन्हा इंग्रजांच्या मुलांना भारतीय मुलांनी चांगले बदडून काढले. या सगळ्या भारतीय मुलांचे नेतृत्व सुभाष करीत होता. प्राचार्यांनी सुभाषबाबूंच्या वडिलांना जानकीनाथ दासांना चिठ्ठी पाठवली. 'तुमचा मुलगा अभ्यासात हुशार आहे, पण तो मारामारीतही पुढे आहे, त्याला समज द्या.'


       वडिलांनी जेंव्हा सुभाषला जवळ बोलावून विचारले तेंव्हा त्यांनी सगळ्या घडलेल्या गोष्टी सविस्तरपणे सांगितल्या. शेवटी वडिलांना त्यांनी सांगितले, 'तुम्हीदेखील त्यांना उत्तर देऊन कळवा की, तुम्ही इंग्रजांच्या मुलांना सांगा. त्यांनी जर आम्हाला शिव्या दिल्या, आम्हाला मारलं किंवा आम्हाला खेळताना अडविले तर आम्ही ते सहन करणार नाही. त्यांनी आम्हाला मारलं तर आम्हीही त्यांना बदडून काढू.'


       असे होते नेताजी सुभाषचंद्र बोस. लहानपणापासून ते स्वाभिमानी आणि जिद्दी होते. या स्वाभिमानातूनच पुढे त्यांनी 'आझाद हिंद सेनेचे नेत्रुत्व केले आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.'


अशा महान देशभक्तास  त्रिवार मुजरा.


गुरुवार, १४ जानेवारी, २०२१

ईश्वरा, अजब तुझी करणी - मराठी कविता


आमच्या संसारवेलीवर पहिलं फूल उमललं 'मलिका' नावाचं कन्यारत्न. जन्मतःच मणक्यांची वाढ अपूर्ण असलेने पाठीवर जखम घेऊन जन्माला आलं. तिला बरं करण्यासाठी खूप औषधोपचार केले, पण यश आले नाही. १४ जानेवारी रोजी ती देवाघरी निघून गेली. तिला मांडीवर घेऊन सुचलेल्या या काव्यपंक्ती तिच्या स्मृती दिनानिमित्त भावसुमनांजली......।।


ईश्वरा, अजब तुझी करणी - मराठी कविता

कवियत्री: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


ईश्वरा अजब तुझी करणी ध्रु।
करिती पूजा नवस सायास
माता बनण्याची तिला आस
देतोस तिला एकच ध्यास
थकते अंती वाट पाहुनी ।।१।।

टाकुनी पाठीवर बालका
घास भरविण्या अर्भका
माता फिरते दारोदारी
आणुनी अश्रू नयनी।।२।।

पाप स्वतःचे लपविणारी
टाकते तान्हा रस्त्यावरी
हीच का ममता मातेची
टाकते तुझिया चरणी।।३।।

करूनी भविष्याचा विचार
उदरीही होतो अत्याचार
ही असे तुझीच कृपा
पाहतोस हे डोळे मिटुनी।।४।।

घेऊन हातावर सोनुली
भरूनी श्रद्धेची थैली
आणुनी उसने साहस
करिते तुला विनवणी ।।५।।

बुधवार, १३ जानेवारी, २०२१

मकर संक्रांतीचा आरोग्यमंत्र - विशेष मराठी लेख


मकर संक्रांतीचा आरोग्यमंत्र - विशेष मराठी लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       भारतीय संस्कृतीतील सणांचे आयोजन अतिशय दूरदृष्टीने आपल्या पूर्वजांनी केले आहे. प्रत्येक सण साजरे करत असताना त्या त्या ऋतुनुसार शरीरास आवश्यक असणाऱ्या पदार्थांची योजना केली आहे. आता हेच पहा ना, मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. या दिवशी बाजरीच्या भाकऱ्या तीळ लावून केल्या जातात. पावटा, वाटाणा, वांगी, गाजर, घेवडा इत्यादींची मिक्स भाजी केली जाते. कांदापात व हरभऱ्याची भाजी केली जाते. हे सर्व पदार्थ करण्यामागील हेतू हाच की थंडीच्या दिवसांत शरीरात उष्णता निर्माण व्हावी. सर्वांनाच पोषक व चौरस आहार मिळावा. एरव्ही आपण गव्हाची चपाती व ज्वारीची भाकरी खातो पण या सणाला बाजरीची भाकरी खाण्याचा प्रघात आहे कारण बाजरी उष्ण आहे. या दिवशी तांदळाच्या भाताऐवजी राळ्याचा भात खातात. त्यामुळे शरीरास आवश्यक असणारी उर्जा मिळते, शरीर बलवान बनते.


       बाजरीच्या भाकरीवर मिक्स भाजी, पालेभाजी, राळ्याचा भात, भातावर दही घालून पाच सवाष्णीना वाटण्याची पद्धत आहे आणि हो, भाकरीबरोबर गाजर आणि कांद्याची पातही दिली जाते. या देण्यामागे हेतू हाच असावा की, आपल्या घासातील चार घास इतरांना ही मिळावेत, देण्याची सवय लागावी. या पदार्थांमुळे सर्वांना शारीरिक बळ तर मिळतेच शिवाय बंधुभाव, आपुलकी निर्माण होते.


       मकर संक्रांतीचा सण म्हणजे तिळगुळ वाटण्याचा सण. थंडीच्या दिवसात पोटाची स्निग्ध गुणाचे जड पदार्थ पचविण्याची शक्ती असल्यामुळे तीळ व गुळाच्या औषधी गुणधर्मांची ओळख करून घेणे उचित होईल.


तीळाचे औषधी गुणधर्म:

       उष्ण, पचायला जड असणारा परंतु थंडीत अतिशय उपयुक्त. याच्या उष्णपणामुळे याचा उपयोग वातनाशक व शरीरातील उष्णता वाढविण्यासाठी होतो. तीळाचे तेल कफनाशक आहे. दृष्टी दोषांसाठी हे तेल पोटातूनही घेता येते. तिळाचे तेल कृमिनाशक, केसांना काळेपणा देणारे असते. केसातील कोंड्यावर इतर तेलाबरोबर या तेलाचा प्रयोग फलदायी ठरतो. सतत कफाचा त्रास असणाऱ्यानी तीळाचे पदार्थ खावेत व छातीला तीळाचे तेल गरम करून लावावे. तीळ हा पित्त, अग्नी वाढवणारा असून बल वाढवणारा आहे. त्यामुळे त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना बुद्धी व बल वाढवण्यात होऊ शकतो. सर्व सांध्यांना तीळाचे तेल गरम करून लावल्यास त्वचेचा वर्णही सुधारतो व सांध्यांचे रक्षण होते. पुराणकाळात तीळाच्या तेलाच्या अभ्यंगानेच सर्व देव अजरामर होऊन दैत्यांचा नाश करू शकले असे म्हणतात.


       तिळाच्या दाण्यात तांबे, मँगेनीज, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी १ आणि बी ६, थायामीन फॉलेट, नायासिन, झिंक, मॉलिब्डेनम, सेलेनियम तसेच  सिसॅमिन व  सिसॅमोलीन हे दोन अत्यंत महत्वाचे दुर्मीळ  पोषक घटक असतात. सिसॅमिन व  सिसॅमोलीन हे लिग्नन्स म्हणून ओळखले जातात आणि ते रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी करणारे तसेच इ व्हिटॅमिन देणारे आहेत. अत्यंत महत्वाच्या घटकयुक्त अशा तिळांमुळे मधुमेहाला प्रतिबंध करायला आणि त्याचे  नियंत्रण करायला मदत होते. या शिवाय पचनक्रिया सुधारणे, कॅन्सरचा धोका कमी करणे, हाडांची शक्ती वाढवणे, सूज प्रतिबंध, पचनक्रियेत सर्व अवयवांची शक्ती वाढविणे इत्यादी गोष्टीतदेखील तीळामुळे मदत होते. हृदयाची कार्यक्षमता वाढविणे, उच्च रक्तदाब कमी करणे, स्नायू आणि केसांची ताकत वाढविणे, अकाली वृद्धत्व टाळणे आदींसाठी देखील तीळ फार उपयुक्त आहे.


गुळाचे औषधी गुणधर्म:

       गूळ हा तिळाचे गुणधर्म वाढवणारा, तिळाला चिकटणारा व माधुर्य वाढवणारा असल्याने त्याचा उपयोग शरीराला होतो. गूळ खायला आरोग्यदायक व पथ्यकारी गुणधर्माचा आहे. गूळ दुर्बलाना बलवान करणारा आहे. शरीरातील थकवा तसेच क्षय रोगासारख्या दीर्घकालीन व्याधीनी आजारी असणाऱ्या रूग्णांचे बल वाढवणारा, छातीत जळजळ असणाऱ्याना उपयुक्त आहे. गूळ शरीरातील वात नाश करणारा आहे.


       गुळामध्ये व्हिटॅमिन बी ६, बी १२, आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रोटीन्स, फॉलेट, सेलेनियम असा खजिना भरलेला असतो. गुळाचे अतिसेवनही कफ वाढवणारे, अग्नीमंद करणारे आहे. शेंगदाण्यासोबत खाल्ल्यास पित्त वाढवणारे व छातीत जळजळ वाढवणारे ठरते. परंतु तीळासोबत खाल्ल्यास त्याचा दुरूपयोग होत नाही. म्हणूनच तीळगूळ खा, तीळगूळ वाटा. तीळाची स्निग्धता व गुळाची गोडी अंंगी बाणविण्याचा प्रयत्न करा.


नवीन वर्षाची सुरुवात नुकतीच झाली आहे. नवीन वर्ष माझ्या वाचक बंधू भगिनींना सुखासमाधानाचे, भरभराटीचे, आनंददायी व आरोग्यदायी जावो हीच  मनापासून प्रार्थना ।


मकर संक्रांत: तिळगूळ घ्या, गोड बोला - विशेष लेख


मकर संक्रांत: तिळगूळ घ्या, गोड बोला - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       भारतीय समाजाला फार मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा वारसा वृद्धींगत करण्यासाठी सण व उत्सवांची मोठी मदत झाली आहे. प्रत्येक सणामुळे आपली परंपरा व संस्कृती समृद्धच होते. त्यापैकीच एक सण म्हणजे मकर संक्रांत.


       मकर संक्रांत हा हिंदू धर्मात महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्रात या सणाला धार्मिकतेबरोबर सामाजिकतेचे स्वरूप दिले आहे. माणसाच्या परस्पर संबधामध्ये स्नेह व माधुर्य हवे असा संदेश हा सण देत असल्याने सामाजिक दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. प्रत्येक सण साजरा करताना त्यात आहाराचा, आरोग्याचा, कुटुंबाचा, समाजाचा सखोल विचार केलेला असतो. संक्रांतीच्या सणातही तिळगूळाचा गोडपणा मुखात राहून माधुर्याचा, औषधी गुणांचा परिणाम शरीर व मनावर होऊन स्वभावात, आचरणात मधुरता येऊन सुख, आनंद, आरोग्य प्राप्त करावे हा या सणाचा मूळ उद्देश आहे.


नैसर्गिक परिस्थिती:

       सूर्याचा मकर राशीतील प्रवेश म्हणजे मकर संक्रांत होय. शिशिर ऋतुमध्ये येणारा, अधिक प्रमाणात थंडी असताना येणारा हा सण. या कालावधीत शरीर बलवान असते. भूक भरपूर लागते. व्याधींची प्रबळता कमी प्रमाणात असते परंतु शरीरातील रूक्षता, कोरडेपणा थंडीमुळे वाढलेला असतो व त्याचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. तो घालविण्यासाठी तीळ व गुळाच्या औषधी गुणधर्माचा उपयोग होतो शिवाय या दिवसात पोटाची स्निग्ध गुणाचे जड पदार्थ पचविण्याची प्रबळ शक्ती असल्यामुळे तिळगूळ खाणे फायद्याचे ठरते.


इतिहास:       

       पूर्वी संकरासुर आणि किंकरासुर नावाचे राक्षस होते. ते लोकांना त्रास देत. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड आणि ९ बाहू असलेल्या एका देवीने दोन्ही राक्षसाना ठार मारले. संकराला ठार मारले ती संक्रांत आणि कंकराला ठार मारले ती किंक्रात होय. संक्रातीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रात. दरवर्षी या देवीचे वाहन, वस्त्र, शस्त्र, अवस्था, अलंकार वगैरे गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या भावी घटनांच्या सूचक मानल्या जातात.


भौगोलिक परिस्थिती:

       मकर संक्रांत हा निसर्गाचा उत्सव आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्यास उत्तरायाणही म्हणतात. ही आहे या सणामागची भौगोलिक पार्श्वभूमी. मानवी जीवनातही नेहमी संक्रमण होत असते. रात्रीच्या गर्भात उध्याचा उषःकाल असतो त्याप्रमाणे संक्रांत म्हणजे प्रकाशाचा अंधारावर विजय. मानवी जीवनही अंधार व प्रकाश यांनी जखडलेले आहे. मनाचे संकल्प परिवर्तनाची इच्छा ठेवून बदलणे गरजेचे आहे. सूर्याचा प्रकाश, तिळाचा स्नेह, गुळाचा गोडवा आपल्या जीवनात योग्य संक्रमण करील ही उदात्त भावना या सणानिमित्त सर्वांनी ठेवली पाहिजे. या सणानिमित्त स्नेह्याकडे जाऊन, तिळगूळ देवून, जुने मतभेद विसरून स्नेहाची प्रतिष्ठापना करायला हवी. तिळगुळाद्वारे आपल्या मनाची स्निग्धता व ह्दयाचा गोडवा देवून स्नेहाची सरिता प्रवाहित करण्याचा हा सण होय.


प्रांतिक संक्रात:

       भारतात बहुतेक सर्व भागातून हा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात या दिवशी डाळ व भात यांची खिचडी खातात व दान देतात त्यामुळे संक्रांतीला तेथे खिचडी संक्राती म्हणतात. बंगालमध्ये या दिवशी काकवीत तीळ घालून बनविलेला तिळुआ नावाचा पदार्थ तसेच तांदळाच्या पीठात तूपसाखर घालून केलेला पिष्टक नावाचा पदार्थ खातात व एकमेकांना वाटतात. गुजरातमध्ये मकरसंक्रांतीचा दिवस उतराण म्हणून ओळखला जातो. या दिवशी घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवतात. जगभरातील पर्यटक हा पतंगोत्सव पाहण्यासाठी गुजरातला भेट देतात. दक्षिण भारतात यावेळी पोंगल नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो.


       थोडक्यात सगळ्यानी एकत्र यावे आणि एकमेकांशी मैत्री करावी, गोड बोलावे हाच संदेश देतो संक्रांतीचा सण .

सण संक्रांतीचा मोठा आला ।

भेटा प्रेमभरे एकमेकाला ।

फाटा द्या द्वेष मत्सराला ।

वाटा प्रेमभरे तिळगूळ सर्वाला।


सोमवार, ११ जानेवारी, २०२१

युवकांचे दीपस्तंभ: स्वामी विवेकानंद - विशेष लेख

 

युवकांचे दीपस्तंभ: स्वामी विवेकानंद - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


       युवकच राष्ट्राची उभारणी करू शकतात. युवक राष्ट्राची खरी संपत्ती होय, असा ठाम विश्वास बाळगणाऱ्या स्वामी विवेकानंद यांची आज १२ जानेवारी ही जयंती. आज राष्ट्रीय युवक दिन म्हणूनही साजरा केला जातो.


       "कर्तव्य कोणतेही असो त्याची उपेक्षा करु नये, एखादा मनुष्य हलके काम करीत असेल तर तेवढ्यानेच तो हलका होतो असे नाही. मनुष्य काम कोणते करतो यावरून त्याची परीक्षा न करता तो कसे करतो हे पहावे. त्याची रीत, आकलन शक्ती हीच त्याची खरी कसोटी होय. साऱ्या आयुष्यभर मूर्खपणाची बडबड करणाऱ्या एखाद्या पढिक पंडीतापेक्षा थोड्या वेळात सुंदर व टिकाऊ जोडा तयार करणाऱ्या चर्मकाराची योग्यता अधिक आहे" असे प्रेरणादायी विचार मांडणाऱ्या आधुनिक काळातील एक महान विचारवंत स्वामी विवेकानंद जगविख्यात आहेत.


       स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे मूळ नांव नरेंद्र असे होते. त्यांच्या वडिलांचे नांव विश्वनाथ व आईचे नांव भुवनेश्वरीदेवी असे होते. विश्वनाथ दत्त हे व्यवसायाने वकील होते. विवेकानंद हे लहानपणापासून चिंतनशील होते. त्यांचे शिक्षण कलकत्ता येथे झाले. इ. स. १८८४ मध्ये ते बी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. कलकत्ता विद्यापीठात त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यास केला. शालेय जीवनात त्यांच्यावर पाश्चात्य विचारांचा प्रभाव होता. त्यांनी स्पेनर, मील, कान्ट, हेगेल, प्लेटो, अरिस्टॉटल इत्यादी विचारवंतांच्या जीवनाचा आणि तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला. ते प्रतिभावंत विद्यार्थी होते.


       महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते ब्राम्हो समाजाकडे आकर्षित झाले. ब्राम्हो समाजाचे एक प्रख्यात नेते केशवचंद्र सेन यांच्या सुधारणावादी विचारांचा विवेकानंद यांच्यावर प्रभाव पडला होता. त्यामुळे मूर्तीपूजा व बहुदेव वादावर त्यांचा मुळीच विश्वास नव्हता. इ. स. १८८१ मध्ये स्वामी विवेकानंद यांची भेट रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली. कांही दिवस विचार, तपश्चर्या, चर्चा यात घालविल्यानंतर आणि मनाचे पूर्ण समाधान झाल्यानंतर त्यांनी स्वतःला रामकृष्ण परमहंस यांना समर्पित केले. रामकृष्ण परमहंस यांनी आपल्या तपश्चर्येने तेज आणि दिव्य दृष्टी नरेंद्रला देवून त्यांचे नांव विवेकानंद असे ठेवले. त्यांच्या सहवासात राहिल्याने विवेकानंद यांच्या पूर्वीच्या विचारात बदल घडून आला आणि ते सनातन हिंदू धर्म व त्याचे अद्वैत तत्त्वज्ञान यांचे समर्थक बनले.


       १५ ऑगस्ट १८८६ रोजी रामकृष्ण परमहंस यांचे निधन झाले. त्यानंतर विवेकानंदानी संन्यास धर्माचा स्विकार केला. त्यांनी देशातील विविध भागात प्रवास करण्यास सुरूवात केली. आपल्या शिष्यांना घेऊन त्यांनी कलकत्ता येथे १ मे १८८७ रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. इ. स. १८८८ ते १८९३ या काळात ते अज्ञातवासात होते. म्हणजे कुणालाही काहीही न सांगता त्यांनी भारतीय परिस्थितीचा जवळून अभ्यास केला. आपल्या देशाची व देशबांधवांची एकंदर स्थिती समजावून घेतली. लोकांचे दारिद्रय व अज्ञान पाहून विवेकानंद यांचे मन अतिशय कळवळले.


       ११ सप्टेंबर १८९३ दिवस जगातील धर्माच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवला गेला कारण याच दिवशी पौर्वात्य व पाश्चिमात्त्य विचारांचे अमेरिकेच्या भूमीवर मीलन झाले. याच दिवशी विश्वबंधुत्त्वाचा शुभारंभ झाला. अमेरिकेतील शिकागो या शहरी जागतिक धर्मपरिषद भरली होती. या परिषदेत विवेकानंदानी हिंदू धर्माची बाजू अतिशय प्रभावीपणे मांडली. आपल्या भाषणाची सुरुवात माझ्या 'बंधू भगिनींनो' अशी करून उपस्थित श्रोत्यांच्या हृदयात हात घातला आणि आपल्या विद्वत्तेच्या तेजाने सर्वांना दिपवून टाकले. विवेकानंदांच्या त्या संबोधनात विश्वबंधुत्वाचे बीज होते, विश्वमानवतेचा झंकार होता. विश्वमानवतेचे बीज स्वामी विवेकानंदांनीच शिकागो धर्मपरिषदेत प्रथम पेरले होते. शिकागो येथील धर्मपरिषदेतील त्यांचे भाषण, विचार आणि तत्वज्ञान श्रेष्ठ ठरले होते. दी न्यूयार्क हेराल्ड या वर्तमानपत्राने त्यावेळी लिहिले होते की, धर्म संसदेतील सर्वात महान व्यक्ती म्हणजे विवेकानंद होय. त्यांचे व्याख्यान ऐकल्यावर आम्हाला चांगले कळून आले की, भारतासारख्या ज्ञानसंपन्न देशात सुधारण्यासाठी ख्रिस्ती धर्म प्रचारक पाठविणे हा निव्वळ मूर्खपणा आहे.


       स्वामी विवेकानंद हे धार्मिक असहिष्णुता, सामाजिक मागासलेपणा, स्त्रियांची गुलामगिरी, गरिबी यांच्या विरोधात होते. त्यांनी विविधतेतील एकता या तत्वाचा पुरस्कार केला. भारतीय प्रबोधनाच्या चळवळीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पंडीत जवाहरलाल नेहरु या नेत्यांनी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात जी भूमिका बजावली तिच्या मागे स्वामी विवेकानंद यांचीच प्रेरणा होती. त्यांच्या ओजस्वी वाणीने भारतातील लोकांत सर्वत्र चैतन्य संचारले. त्यांनी युवाशक्तीला प्रेरणा व दिशा दिली. जनता जागृत झाली. युवकांचे ते दीपस्तंभ होते. स्वामी विवेकानंद हे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे प्रमुख प्रेरणास्तोत्र होते. त्यांनी भारतीय जनतेला राष्ट्रभक्ती व देशाभिमानाचे धडे दिले. आपले राष्ट्र सामर्थ्यवान बनावे ही त्यांची इच्छा होती. अशा या महान महामानवाने ४ जुलै १९०२ रोजी बेलूर मठात देहत्याग केला. 


       शेवटी स्वामी विवेकानंद यांचे जीवन तत्वज्ञान समजावून घेऊ या कारण हे तत्वज्ञान आपणास फारच उपयुक्त ठरेल. व्यक्तीचे चारित्र्य त्याच्या विचारावर अवलंबून असते. सुखमय प्रसंगापेक्षा दुःखमय प्रसंगाने व श्रीमंतीपेक्षा गरिबीमध्ये व्यक्तीच्या मनामध्ये अधिक चांगले व प्रेरणा देणारे संस्कार निर्माण होतात. परमेश्वराची सतत आठवण रहावी यासाठी कुंतीने श्रीकृष्णाजवळ सुखाची किंवा श्रीमंतीची मागणी न करता दुःखाचीच मागणी केली. पराच्या गादीवर लोळून केवळ ऐष आरामात जीवन कंठणाऱ्यापैकी फार थोडे लोक आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास करतात असे इतिहास म्हणतो. दुःखाची व हालअपेष्टांची वादळ सोसल्यानंतरच आणि निराशेच्या अंधकारातून कर्तव्याची व आत्मविश्वाससाची काठी टेकीत प्रवास करणाऱ्यास आत्मोन्नतीचा मार्ग सापडतो. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी आपण त्यांच्या या तत्वज्ञानाचा अंगिकार करू या हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल आणि त्यामुळे आपणही सुखी होऊ.



शनिवार, ९ जानेवारी, २०२१

राजमाता जिजाऊ: विशेष मराठी लेख

 

राजमाता जिजाऊ: विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


तेजाची मशाल होत्या जिजामाता ।

अंधाराची सत्ता नष्ट केली ।।१।।

स्वातंत्र्याचा ध्यास जन्मभरी त्यांनी

तोडिती बंधना गुलामीच्या ।।२।।

स्वातंत्र्याचे प्रेम शिवबाच्या मनी।

 वाढे तरारून मातेमुळे ।।३।।

युगस्त्री जिजाऊ महापराक्रमी। 

तुलनेला कमी दुर्गा चंडी ।।४।।

पंचकन्याहून चरित्रे सरस।

निर्मी इतिहास स्वराज्याचा ।।५।।

प्रातःस्मरणीय थोर जिजामाता।

पावित्र्याची गाथा जिणे त्यांचे ।।६।।

जिजामाता आद्य स्वातंत्र्यदेवता।

त्यांच्या पायी माथा नम्र माझा ।।७।।

त्यांच्या चरित्राचे करू पारायण।

राष्ट्राचे जीवन उंच होण्या ।।८।।

  

       राजमाता जिजाऊ मातेचे स्मरण केल्याशिवाय स्वातंत्र्यसूर्य, छत्रपती शिवरायांचे चरित्र सांगणे कठीणच नव्हे, तर अप्रस्तुतही ठरेल. थोर विचारवंत न्यायमूर्ती रानडे म्हणतात, "थोरपुरूषांचा थोरपणा जर आईच्या शिकवणीमधील स्फूर्तीवर अवलंबून असेल, तर शिवाजींच्या कामगिरीत जिजाबाईंचा वाटा अव्वल दर्जाचा मानावा लागेल. त्यांच्या बळाचे जिजाबाई हेच प्रमुख कारण होते." शिवचरित्र घडविण्यात जिजाऊ मातेचे योगदान फार महत्त्वाचे आहे. अशा या थोर जिजाऊंचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गांवी १२ जानेवारी १५९८ रोजी एका प्रतिष्ठित व मातब्बर अशा लखुजीराव जाधव यांच्या घराण्यात झाला. जिजाऊंना चार मोठी भावंडे होती. लखोजीराजे हे त्यावेळचे निजामशाहीतील सर्वात मातब्बर सरदार होते. अशा मातब्बर घरात जन्मलेल्या मुलीचे नांव जाणिवपूर्वक जिजा असे ठेवले. जिजा शब्दातच जय आणि विजय आहेत. 

       जिजाऊंनी केवळ स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवबांची आई म्हणूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची एक कर्तबगार माता होऊन अन्याय, अत्याचार व गुलामगिरीत खितपत पडलेल्या आपल्या रयतेला स्वतःचे अस्तित्व दाखविले. आपले पुरोगामी विचार अस्तित्वात आणण्यासाठी शिवबांना सातत्याने मार्गदर्शन केले. जो राजा रयतेची काळजी घेतो, रयतेच्या सुखदुःखात सहभागी होतो, त्यालाच रयत आपला राजा मानते अशी शिकवण दिली आणि त्यामुळेच शिवाजी महाराजांना रयतेचा राजा होता आले. 

       जेंव्हा लखुजीराजे आणि त्यांच्या तीन मुलांचा खून निजामशहाच्या भर दरबारात करण्यात आला तेंव्हा जिजाऊ दौलताबादच्या जवळच होत्या. अशा कठीण प्रसंगात त्या आपली आई म्हाळसाराणी व एका भावास घेऊन पुण्यात आल्या. सतीची चाल बंद करण्याचा बहुमान जर खऱ्या अर्थाने कोणाला जात असेल तर तो म्हाळसाराणीनाच कारण पतीच्या निधनानंतर त्या सती गेल्या नाहीत. सतीच्या नावावर महिलांना जिवंत जाळण्याच्या कर्मकांडाला त्यांनी विरोध केला व अखेरपर्यंत जिजाऊ राबवित असलेल्या सामाजिक सुधारणेच्या विचारांना चालना देत राहिल्या. त्यामुळेच पुढे शहाजी राजांच्या निधनानंतर जिजाऊंनी सतीची प्रथा बंद पाडली.

        शिवाजीराजे पाच वर्षांचे असताना आदिलशाही सरदार जगदेव मुरारी पंडीत याने पुणे परिसरावर गाढवाचा नांगर फिरवून परिसर उद्ध्वस्त केला. या जमिनीवर कोणीही वास्तव्य करू नये म्हणून एक हजार पहारी रोवून त्यावर चपलांचे जोड बांधले आणि दवंडी पिटवली की जो कोणी या परिसरात राहील किंवा जमीन नांगरेल त्याचे घराणे निर्वंश होईल. खरेतर हा सगळा प्रकार म्हणजे एक प्रकारे धार्मिक दहशत आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा होता. अशावेळी जिजाऊनी पाच वर्षाच्या बाल शिवरायांच्या हातात सोन्याचा फाळ लावलेला नांगर दिला आणि नांगरणी करण्यासाठी पाच बालकांचा हात त्या नांगराला लावला. ते चार बालक म्हणजे महार, मांग, चांभार व रामोशी म्हणजेच वेगवेगळ्या जातीचे होते. तसेच सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराची पूजाही विधवा असणाऱ्या म्हाळसाराणी व त्यांच्या विधवा सुनेच्या हाताने करावयास लावली. अशा प्रकारे जिजाऊनी शुभकार्यात विधवांचा सन्मान केला. ही गोष्ट सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली.

       आदिलशहाच्या भितीला न जुमानता पुणे परिसरात शेतीत नांगर फिरवून ती जमीन वैचारिक दृष्ट्याही सुपीक बनविली आणि पुणे शहराला पुन्हा वसविले. पुण्याची लोकसंख्या हळूहळू वाढत गेली. लोकांची वाढती गरज लक्षात घेऊन बाजारपेठ बनवावी याकरिता आग्रह करण्यास काही लोक जिजाऊंच्याकडे आले. तेंव्हा ही बाजारपेठ आपण सरकारी खर्चाने बांधून देऊ आणि बाजारपेठेच्या सुरक्षिततेची जबाबदारीही घेऊ असे आश्वासन दिले आणि पाषाण परिसरात अद्ययावत अशी बाजारपेठ बनवली यामुळेच पुण्याचा चेहरामोहरा बदलला आणि बारा मावळातील त्या शहराला जिजापूर असे नांव दिले.

         आदिलशहाने शहाजीराजांना फसवून कैद केले. शिवाजी व संभाजी या त्यांच्या दोन पुत्रानांंही मारण्यासाठी पाठविलेल्या फरीदखान व फतेहखान या दोन्ही सरदारांचा जिजाऊंनी पुरता बंदोबस्त केला. शहाजीराजांच्या मुक्ततेसाठी शहाजहानचा दक्षिणेतील सुभेदार मुरादबक्ष याच्याशी संधान साधून आदिलशाहीला शह दिला त्यामुळे आदिलशहाने बिनशर्त शहाजीराजांना मुक्त केले आणि सन्मानपूर्वक दरबारात पुन्हा फर्जत म्हणून नियुक्त केले. या ठिकाणी जिजाऊनी मुत्सद्देगिरी दाखविली नसती तर स्वराज्याचे रोपटे मूळ धरण्या अगोदरच नष्ट झाले असते.

        स्वराज्याची निर्मिती जरी शिवाजी महाराजांच्या नावाने झाली असली तरी यामागची प्रेरणा आणि मुत्सद्देगिरी मात्र निर्विवादपणे जिजाऊंचीच होती. शिवाजी महाराजांना मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढणारा आणखी एक मुत्सद्देगिरीचा प्रसंग म्हणजे अफजलखानचा वध. चाळीस हजार फौज घेऊन आलेल्या अफजलखानच्या फौजेचे तीन विभाग करणे, जावळीच्या प्रतिकूल परिसरात त्याची भेट घडविणे, अफजलखानच्या विश्वासघातकी स्वभावाची राजांना जाणीव करून देणे अशी सर्व व्यवस्था जिजाऊंनीच केली आणि त्यामुळेच प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाचे पानिपत करणे महाराजांना शक्य झाले.

         अफजलखानाचे कापलेले मुंडके संभाजी कावजी या शूराने रायगडावर नेऊन जिजाऊंना प्रत्यक्ष दाखविले आणि या शिराचे काय करायचे असे त्याने विचारले तेंव्हा त्या म्हणाल्या, "मेला तो गनिम, संपली ती गनिमी। मरणानंतर वैर शिल्लक रहात नसते." सन्मानपूर्वक अफजलखानाचे शिर राजगडाच्या बुरूजापाशी दफन करून त्या बुरूजाला अफजल बुरूज असे नांव देण्यात आले आणि जेथे अफजलखानला मारण्यात आले तेथे त्याची कबर बांधण्यात आली. याच लढाईत तावडीत सापडलेल्या अफजलखानाच्या दोन मुलांना मुक्त करून जिजाऊ नी माणुसकीचा अतुल्य परिचय करून दिला. स्वराज्याची संकल्पना अस्तित्वात आणून सर्वसामान्य रयतेला सन्मान पूर्वक जीवन जगण्याची हमी दिली.

       अशाप्रकारे महाराष्ट्राच्या क्रांतिकारी मातीत स्वातंत्र्याचे बीजारोपण करत, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी त्या अनेक प्रसंगाना मुत्सद्देगिरीने सामोऱ्या गेल्या, म्हणूनच शिवरायांना स्वराज्याची स्थापना करता आली व ते रयतेचे राजे झाले. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी झाला. हा राज्याभिषेक ही जिजाऊंची अदम्य महत्वाकांक्षा होती. आपला पुत्र महापराक्रमी आहे पण तो समाजमान्य झाला पाहिजे हे जिजाऊंचे स्वप्न होते. ते पूर्ण झाले. अशा या महान जिजाऊंचा स्वर्गवास शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर केवळ बाराव्या दिवशी म्हणजे १७ जून १६७४ रोजी पाचाड येथील वाड्यात रात्री बारा वाजता झाला.

        महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारताची अस्मिता ठरलेल्या शिवरायांची ही कूस खऱ्या अर्थाने सार्थक ठरली.

या महान जिजाऊमातेला जयंत्तीनिमित्त कोटी कोटी प्रणाम, अभिवादन।


शनिवार, २ जानेवारी, २०२१

स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या: सावित्रीबाई फुले - विशेष लेख


 ३ जानेवारी हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन त्यानिमित्त त्यांना ही भावफुलांची आदरांजली


स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या: सावित्रीबाई फुले - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार:गूगल

       महाराष्ट्राच्या भूमीत अनेक नरवीर रत्ने जन्मली. त्यांनी आपल्या कार्याने केवळ देशालाच नव्हे तर जगाला दिशा देण्याचे काम या महामानवांनी केले. त्यांनी आपापल्या क्षेत्रात धृवताऱ्यासारखे अढळ स्थान पटकावले आहे. त्यांच्या विचारांच्या पायधुळीवर आज आपण मार्गक्रमण करीत आहोत. या द्रष्ट्या विभूतीमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे नांव घ्यावे लागेल.


         सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगांव, तालुका खंडाळा येथे ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. त्यांचे वडील खंडोजी सिदूजी नेवसे नायगावचे पाटील होते. तत्कालीन प्रथेनुसार वयाच्या नवव्या वर्षी १८४० मध्ये सावित्रीबाईंचा विवाह पुण्याचे जोतिराव गोविंद फुले यांच्याशी झाला. या विवाहाने लोकोत्तर गुण लाभलेल्या दोन व्यक्तींचं मीलन घडून आले आणि त्यांच्या गुणांचे तेज शतपटीने वाढले. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे तद्वत जोतिरावांच्या सहवासाने सावित्रीबाईंच्या ठायी असणारे अनेक सद्गुण विकसित झाले. विवाहापूर्वी सावित्रीबाई अक्षरशत्रू होत्या. जोतिराव स्त्री पुरुष समानता मानणारे होते. पुरूषासारखाच स्त्रियांनादेखील शिक्षण घेण्याचा हक्क आहे असे मानून त्यांनी सावित्रीबाई व मावसबहीण सगुणाबाई क्षीरसागर या दोघींना धूळपाटीवर अक्षरे गिरविण्यास शिकविले. त्यावेळेपासूनच खऱ्या अर्थाने फुले दांपत्याच्या युगप्रवर्तक क्रांतिकार्यास आरंभ झाला.


       ज्या काळात शिक्षण घेणे ही वरिष्ठवर्णिय पुरूषांची मक्तेदारी होती, स्त्रियांचे शिकणे धर्मविरोधी व अनीतीचे समजले जात होते, त्या काळात जोतिरांवानी सावित्रीबाईंना शिक्षणाची संधी दिली. सावित्रीबाई मुळातच जिज्ञासू होत्या. त्यांची ज्ञानलालसा उच्च प्रतीची होती. सावित्रीबाईंनी १८४८ मध्ये शिक्षकी पेशाचे प्रशिक्षण घेऊन अध्यापन कला अवगत केली. सावित्रीबाई या पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका होत्या. याच वर्षी जोतिबांनी आणि सावित्रीबाई यांनी शतकानुशतके अज्ञानात खितपत पडलेल्या स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांचा उद्धार करणाऱ्या शिक्षणकार्यास आपले जीवन समर्पित करण्याचा निर्धार केला. १ जानेवारी १८४८ रोजी मुलींसाठी आणि १५ मे १८४८ रोजी शूद्रांसाठी पहिली शाळा काढून जोतिबांनी ज्ञानाचा दीप लावला. भिडे वाड्यात मुलींच्या शाळेत शिक्षिकेचे काम सावित्रीबाई करु लागल्या. हे काम सुरु केल्यावर त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. अंगावर शेण, चिखल झेलावा लागला पण त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी आपले कार्य नेटाने सुरु ठेवले. सावित्रीबाईंनी प्रारंभी शिक्षिका नंतर मुख्याध्यापिका व शेवटी निरीक्षक म्हणून विनावेतन सेवा केली. एत्देशीय व्यक्तीने या देशातील मुलींच्या शिक्षणासाठी चालविलेली ही पहिली शाळा होती. सावित्रीबाई या केवळ पोपटपंची करणाऱ्या शिक्षिका नव्हत्या तर शिक्षणावर भाष्य करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्या आपल्या कवितेत म्हणतात, 


"शूद्रांना सांगण्यासारखा शिक्षण मार्ग हा ।

शिक्षणाने मनुष्यत्व येते. पशुत्व हाटते पहा" ।।


मुलांना उपदेश करतांना त्या सांगतात, "ज्ञान शिक्षण हे सर्व धनांहून श्रेष्ठ धन आहे"


       प्रतिगाम्यांचे केंद्रस्थान असलेल्या पुण्यात त्याकाळी सावित्रीबाईंसारख्या कनिष्ठ वर्णातील स्त्रीने शिक्षण घेऊन मुलींना शिकविण्याचे काम करणे ही गोष्ट निःसंशय धाडसाची व क्रांतिकारक अशीच आहे. परंपरेने हेतुपुरस्सर ज्ञानापासून वंचित ठेवलेल्या स्त्रियांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा करून एक प्रकारे फुले दांपत्याने सामाजिक जीवनात नव्या मनूचा प्रारंभ केला. आजच्या बालिका भावी राष्ट्रमाता असल्याने त्यांच्या पोटी जन्म घेणारे स्त्री पुरुष गुणसंपन्न, बुद्धिमान, कर्तबगार निपजावयाचे असतील, तर त्या राष्ट्रमाता सुशिक्षित, सुसंस्कारित असल्या पाहिजेत, असा फुले दांपत्याचा उद्देश होता. म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणापासून समाजपरिवर्तनाच्या कार्यास सुरुवात केली. या महत्त्वाच्या कार्यात सावित्रीबाईंचा सिंहाचा वाटा होता.


        त्या काळी उच्चवर्णीय विधवांना पुनर्विवाह करण्याची मुभा नव्हती. बालविधवांची स्थिती तर केविलवाणी होती. तरुण विधवा भावनेच्या भरात किंवा असह्य परिस्थितीमुळे फसल्या जात. त्यांना समाजात तोंड दाखविणे देखील मुश्कील होई. जन्मास येणाऱ्या निष्पाप अर्भकाची गुप्तपणे हत्त्या केली जाई. दयाळू सावित्रीबाईनी मानवतेच्या भावनेतून अशा दुर्दैवी विधवांच्या सहाय्यार्थ उपाय योजण्यास जोतिबांना प्रेरित केले. त्या दोघांनी या समस्येवर विचार विनिमय केला आणि आपल्या घरीच बालहत्या प्रतिबंधक सदनाची स्थापना केली. अनेक फसलेल्या विधवांनी या बालहत्या प्रतिबंधक सदनाचा आश्रय घेतला.


       विधवा स्त्रीयांचे केशवपन करण्याची दुष्ट प्रथा बंद करण्यासाठी सावित्रीबाईनी पुण्या-मुंबईच्या नाभिक बांधवांची परिषद भरविली. त्यांचे प्रबोधन करून केशवपनासारखी अघोरी प्रथा बंद केली.


       दारिद्र्य, अज्ञान व भोळ्या धर्म समजुतीचा अंधार नाहीसा करण्यासाठी जोतिबांनी ज्ञानाचा दिवा लावला, दिव्यातील ज्योत बनले आणि तेल झाली सावित्रीबाई, त्यामुळे सारा महाराष्ट्र उजळून निघाला.


       गाडी, बंगला, पैशाच्या राशी आणि असंख्य ऐष आरामाच्या बाबी पळवाटा शोधून मिळत असतील तर प्रकाशाची, सत्त्याची वाट कोण धरील? सत्य, न्याय आणि समानतेकडे नेणारी वाट ही सर्वांना प्रकाशाकडे नेणारी आहे. जीवन सफल करणारी आहे पण ही वाट संघर्षाची आहे, रक्तबंबाळ करणारी आहे. या वाटेवरून वाटचाल करण्याची हिंमत भल्याभल्यांना होत नसते. जेंव्हा कोणी अशी हिंमत दाखवितो तेंव्हा पळवाटा शोधणाऱ्यांच्या भाऊगर्दीत तो उठून दिसतो. सावित्रीबाई हे असेच पळवाटा शोधणाऱ्यांच्या भाऊगर्दीत वेगळपण जपणारे व्यक्तीमत्व. त्या आपल्या कवितेत म्हणतात, 


निर्मिके निर्मिला मानव पवित्र।

कमीजास्त सूत्र बुद्धीमध्ये ।

पिढीजात बुद्धी नाही सर्वामधी ।

शोध करा आणि पुरतेपणी ।

धर्मराज्य भेद मानवा नसावे ।

सत्त्याने वागावे ईशापाशी ।


ही क्रांतिकारी ज्योत १० मार्च १८९७ साली काळाच्या फुंकरीने मालवली ।

अशा थोर समाजसेविकेस नम्र अभिवादन ।