साद-प्रतिसाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
साद-प्रतिसाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २० मे, २०२३

अमेरिकेतील गौरीची कराडमध्ये स्नेहभेट

 

अमेरिकेतील गौरीची कराडमध्ये स्नेहभेट 


✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी



चि. गौरी, अविनाश व बिल्लूस,

अनेक शुभ आशीर्वाद ।


       गौरी, साताऱ्यातील सबस्क्रायबर भेटीनंतर कराड भेटीची चाहूल लागली आणि तुझ्या परिवाराला भेटण्याचे मनसुबे सुरू झाले. आमच्या साहेबांच्या मित्राच्या मुलीचे लग्न त्याच दिवशी होते, त्या लग्नाला हजर राहणे अपरिहार्य असल्याने ते माझ्याबरोबर येऊ शकत नव्हते. सूनबाई व छोटी नातवंडे मामाच्या गावी सुट्टीला गेल्याने ती येऊ शकत नव्हती. राहिला एकमेव आधार असलेला, माझ्या मनातील भावना अचूक ओळखणारा माझा लाडका चिरंजीव मोहसीन. त्याला मी या भेटीबद्दल बोलले. त्याने अनुकूल प्रतिसाद दिला आणि पुढील योग जुळून आला. त्याच दिवशी वाठारच्या एका लग्नकार्यालयामध्ये पाहुण्यांच्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण आले होते. मोहसीन म्हणाला, "शक्य आहे". दुसऱ्या दिवशी माझी कराडस्थित कन्या यास्मीन हिच्या सासरेबुवांची तबेत्त बरी नसल्याचे समजले. मोहसीन म्हणाला "शक्य आहे". उन्हाळा जबरदस्त सुरु असल्याने चारचाकीने जायचे ठरले. नेमकी त्याच दिवशी चारचाकी नादुरुस्त झाली. ताबडतोब दुरूस्त होण्याची शक्यता नसल्याचे कळाले. मोहसीनने दुचाकी काढली, मातृदिन असल्याने आईची इच्छा पूर्ण करण्याचा त्याने चंगच बांधला होता जणू! त्याच दिवशी आमच्या शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीचे मतदान होते. मतदान करून ठीक वेळेत लग्न कार्यालयात पोहोचलो. लग्न समारंभ व भोजन आटोपून आम्ही कराडला निघालो. अडथळ्यांची शर्यत अजून संपलेली नव्हती. कराडजवळ पुलाचे काम सुरु असल्याने ट्राफिक जाम, वरून उन्हाचा तडाखा पण याचे कांहीच वाटत नव्हते कारण दोन मुलींना व त्यांच्या परिवाराला भेटण्याची अनिवार ओढ लागली होती. शेवटी साडेचार वाजता यास्मीनच्या घरी पोहचलो. मन भरून लेकीला भेटल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन व्याह्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. सहा वाजले होते. आता अलंकार हॉटेलमध्ये गौरीला भेटण्यासाठी उत्सुक झालो होतो. कधी एकदा भेटतोय असं झालं होतं.


       आणि तो क्षण आला. दारातच अ अमेरिकेचा बोर्ड पाहिला आणि जीवात जीव आला. गौरीची आई आस्थापूर्वक सर्वांचे स्वागत करत होत्या, त्यांचे डोळे सांगत होते, या माझ्या लेकीचं कौतुक बघा. स्टेजवर तुम्ही तिघे उभे होता, लयी भारी दिसत होता. चेहऱ्यावरील हास्य खूप बोलत होतं. तिथं हजर असलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या जीवाभावाची, जिव्हाळ्याची असल्याचे जाणवत होते. सर्वांच्या मनात आपुलकी होती.


गौरी, तुझ्या परिवाराला भेटून खूप आनंद वाटला. एक सर्व श्रुत चारोळी आठवली.

शब्दानांही कोडं पडावं,

अशी गोड माणसं असतात ।

केवढं आपलं भाग्य असतं,

की ती आपल्या जवळची असतात,

आणि ती अमेरिकेत राहतात.


       तुझ्या चॅनलच्या स्नेहात गुरफटल्यापासून अमेरिकेत आपलं कोणी नाही असं वाटत नाही. तुमच्या परिवारातील साधेपणा, सच्चेपणा सर्वांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करतो. तुम्हा दोघांच्या स्वभावातील विशेष म्हणजे तुमचा सकारात्मक दृष्टीकोन. भल्या बुऱ्या प्रसंगाना हसत सामोरे जाण्याची तयारी. 'ठेवू नये नावं, चांगलं तेवढं घ्यावं' हा भाव मनात ठेवून तुम्ही वागत असल्याचे मला दिसून आले, ही अनुकरणीय बाब आहे. आपल्या मोठेपणाचं प्रदर्शन न मांडता तुम्ही त्याचं श्रेय इतरांना देता किती  मोठेपणा आहे हा मनाचा!


       सातासमुद्रापार एक सामान्य कुटुंबातील मुलगी जाते, तिथल्या संस्कृतीशी जुळवून घेत घेत 'अ अमेरिकेचा' हे चॅनल सुरू करते, सव्वा लाख सबक्रायबर्स मिळवते ही गोष्ट वाटते इतकी सोपी नक्कीच नाही. भारतात आल्यावर फक्त आपल्याच परिवारात न गुरफटता, सर्वांना भेटण्याचं नियोजन करते माझ्या सारख्या अनेकांना बोलण्याची संधी देते, सगळंच कित्ती छान व सुंदर! 


अ अमेरिकेचा म्हणताना भ भारताचा न विसरलेल्या गौरी परिवारासाठी शेवटी एवढंच म्हणेन की,

उगता हुआ सूरज रोशनी दे आपको,

खिलता हुआ गुलाब खूशबू दे आपको,

हम तो सिर्फ दुवा देनेके काबिल हैं,

देनेवाला दस लाख सबक्रायबर्स दे आपको ।


       एका दिवसात २२० कि. मी. प्रवास दुचाकीवरून करूनही अजिबात त्रास झाला नाही कारण लाडक्या गौरी परिवाराला भेटल्याचा आनंद विलक्षण समाधनकारक होता.


आपकी शुभचिंतक ,

डॉ. सौ. ज्युबेदा तांबोळी

जयसिंगपूर .

शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३

अमेरिकेतील गौरीस पत्र

 

अमेरिकेतील गौरीस पत्र

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: अ अमेरिकेचा इन्स्टाग्राम

प्रेषक,

डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी

जयसिंगपूर, ता. शिरोळ,

जि. कोल्हापूर,


चि. गौरी, अविनाश व बिल्लूस,

अनेक शुभाशिर्वाद ।

       

       मी ६५ वर्षांची मनाने तरुण असलेली प्राथमिक शिक्षिका. ३८ वर्षांच्या सेवेनंतर सात वर्षांपूर्वी निवृत्त झाले आहे. शिक्षणशास्त्रात पी. एचडी. झाले असून वाचन लेखनाचा छंद जोपासत आहे. माझी तीन पुस्तके व पाचशेच्या वर लेख प्रकाशित झाले आहेत. चिरंजीव मोहसीन व सूनबाई हिना यांच्या सहकार्याने ब्लॉग लेखन करत आहे.


       २/३ वर्षांपूर्वी मोहसीनने स्मार्ट फोन घेऊन दिला. मुलांच्या व नातवंडाच्या मदतीने मोबाईल ऑपरेट करायला शिकले. एके दिवशी यूट्यूबवर तुझा अमेरिकेतील आमचं घर हा व्हिडीओ बघितला आणि अक्षरशः 'अ अमेरिकेचा' या चॅनेलच्या प्रेमात पडले. वेड लावलं मला तुझ्या चॅनेलने. आठ दिवसात भारावलेपणातच व्हिडीओ बघत राहिले. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी मला गौरीचं दिसू लागली. आनंदाला, समाधानाला पारावारच राहिला नाही.


       आमच्या शिक्षक स्टाफमधील बऱ्याच मित्र मैत्रिणींची मुले अमेरिकेत आहेत. ते ४/६ महिने अमेरिकेत वास्तव्य करून आलेत. ते परत आल्यावर त्यांच्या तोंडून त्यांच्या मुलांच, अमेरिकेचं कौतुक ऐकलं होतं. गौरी, खरं सांगू तुला? तू ना! प्रत्यक्ष अमेरिका पाहण्याचं भाग्य माझ्यासारख्या अमेरिकेत जाऊ न शकणाऱ्या ज्येष्ठांना मिळवून दिलंस. आमची सुप्त इच्छा पूर्ण केलीस, त्याबद्दल तुला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत.


       अ अमेरिकेमुळे अमेरिकेतील  सगळं सगळं बघता आलं. गौरी अविनाश तुम्ही एवढ्या कमी वयात सातासमुद्रापार गेलात आणि तिथं जाऊन फक्त स्वसुखात मश्गूल न राहता भारतीयांना, मराठी भाषिकांना तुमच्या सुखसागरात मनमुराद विहार करण्याची संधी देत आहात हे पाहून मला खूपच समाधान वाटते. स्वतःचा संसार तर सगळेच सांभाळतात, आम्ही अमेरिकेत राहतो म्हणून वेगळ्याच अभिमानाने फुगून जातात, इतरांना कमी लेखतात पण तुमचं असं नाही. तुमच्या वागण्या बोलण्यात गर्वाचा लवलेशही दिसत नाही. आपल्या घरातील प्रत्येक इव्हेंट मग तो सणवार असो, फेरफटका असो, शाॅपिंग असो तुम्ही कोट्यावधी लोकांशी शेअर करता ही गोष्ट वाटते तितकी सोपी मुळीच नाही. स्वतःची नोकरी, घरकाम, पतीपत्नी धर्म, छोटंसं बाळ सांभाळत सांभाळत व्हिडीओ करणे खरोखरच दिव्य आहे पण ते तुम्ही लीलया पार पाडता, जराही न चिडता, न रागावता व चेहऱ्यावरील हास्य जराही कमी न करता हे सगळं कसं जमतं तुम्हाला? गौरी, तू इतकं छान बोलतेस की ऐकणाऱ्याला वाटतं आपल्या घरातीलच एक व्यक्ती बोलत आहे, ऐकतचं बसावं. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना समजेल उमजेल अशी तुझी कथनशैली मला अगदी मनापासून आवडते. तुझ्या वागण्या बोलण्यातील सहजता सर्वांना खिळवून ठेवते. परदेशात राहून स्वदेशांशी नाळ जोडून ठेवण्याचा तुमचा प्रयत्न खरंच लाजवाब आहे. पिकनिकला तर सगळेच जातात, फोटो सेल्फी कढतात, स्टेटस्ला लावून शायनिंग मारतात पण अशा रम्य ठिकाणी जाऊन स्वतः एन्जॉय करत एवढ्या मोठ्या कुटुंबाला त्यात सामील करून घेण्याची तुमची शैली प्रशंसनीय आहे, कौतुकास्पद आहे. तुम्हा तिघांचा सोन्याचा संसार सद्या अमेरिकेत आहे असं मला वाटत नाही तर तो पृथ्वीवरच्या स्वर्गात स्वच्छंदपणे विहार करत आहे असे वाटते.


       यूट्यूब चॅनलवर भल्याबुऱ्या कमेंट्स येतच असतात. एखाद्या वाईट कमेंटने नाउमेद न होता आपलं काम नेटाने कसं करावं याचं आदर्श उदाहरण आहात तुम्ही. तुमचं व्हिडीओचं काम सुरू असताना बिल्लूनं डिस्टर्ब केला तर न चिडचिड, आदळापट न करता समजूतदारपणे, समंजसपणे त्याला हाताळता ही गोष्ट सर्व आईबाबांना अनुकरणीय आहे. खरं सांगा इतका कमालीचा समंजसपणा, कुठून आला तुमच्यात? भारतातून जातांनाच पोती भरून भरून नेलात वाटतं!


       तुमच्या अमेरिकेतील घराचा व्हिडीओ तिथल्या राहणीमानाचे दर्शन घडवून गेला. शिकागो ट्रिपच्या व्हिडिओमुळे घरबसल्या शिकागो ट्रिप अनुभवता आली. सफरचंद सुगीचा व्हिडीओ फार आवडला. रसरशीत लालगुलाबी सफरचंद पाहून पोट तृप्त झाले. झीरो बजेट बर्थडे सेलिब्रेशन काटकसरीचा मंत्र सांगून गेले. साचलेला बर्फ काढतानाचा व्हिडीओ श्रमप्रतिष्ठा शिकवून गेला. दिवाळीच्या पार्सल उघडतानाचा गौरीच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद मनात घर करून राहिला. अविनाशच्या जीवन प्रवासाचा व्हिडिओ बालपणातील आमच्या कष्टाची आठवण जागी करणारा ठरला. तुमच्या प्रेमकहाणी चा व्हिडीओ प्रेमात वाहून न जाता संयमी सफल प्रेमाची शिकवण देणारा आहे. 'अ अमेरिकाचा' मुळे सर्वांना तेथील आठवडी बाजार, मच्छी मार्केट, माॅल्स, बगीचे, शेती, तलाव  पाहता आले. थोडक्यात काय तर तुमच्या 'अ अमेरिकेचा' या चॅनलमुळे अमेरिकेतील राहणीमान, जेवणखाण, पिकनीकस्, बर्थडे पार्टीज, वीकेंड सेलिब्रेशन पार्टीज्, फेस्टिव्हलस् या सर्व बाबी प्रत्यक्ष बघता आल्या त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!


        आता थोडसं आमच्या कुटूंबाविषयी यात मोठेपणा सांगणे हा उद्देश नाही. फॅमिली मेंबर्सचा परिचय व्हावा हाच उद्देश. मला एक पुत्ररत्न व दोन कन्यारत्ने आहेत. चार नातवंडे व दोन नाती आहेत. गोकुळासारखं गजबजलेलं घर आहे आमचं. 'मज काय कमी या संसारी, सुख आले माझ्या दारी' असे वाटते. माझी कन्या यास्मिन कराडला असते. तुझा परिचय झाल्यापासून वाटते कराडमध्ये माझ्या दोन मुली आहेत दुसरी गौरी बरं का !


       अजून खूप लिहावंसं वाटतय पण आवरतं घेते. वेळ काढून पत्राचं उत्तर देशील? आणि भारतात आल्यावर जयसिंगपूरला येशील?


तुमची शुभचिंतक,

डॉ. सौ. ज्युबेदा तांबोळी.

बुधवार, २१ जुलै, २०२१

बेंदूर बैलपोळा: श्रमाची पूजा - विशेष लेख


२२ जुलै दिवशी बेंदूर म्हणजेच बैलपोळा हा सण साजरा केला जातोय त्यानिमित्त या सणाविषयी थोडेसे....

बेंदूर बैलपोळा: श्रमाची पूजा - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       भारत हा कृषिप्रधान देश आहे. कृषिसंस्कृती हा देशाचा प्राण आहे. कृषीसंस् कृती म्हटले की शेती, शेतकरी, शेतीची अवजारेही आपसूकच येतात. आषाढ पौर्णिमेला हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. वर्षभर कष्ट उपसणाऱ्या बळीराजाच्या आणि बैलांच्या प्रेमाचे प्रतिक असलेला बैलपोळा मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. वर्षभर कामाचे जोखड म्हणजेच जू ओढणाऱ्या बैलांचा सण म्हणून ओळखला जाणारा बेंदूर दक्षिण भारतात 'पोंगल', दक्षिण महाराष्ट्रात 'बैलपोळा', कर्नाटकात 'कार हुजरी' या भिन्न नावांनी ओळखला जातो. ज्येष्ठ पौर्णिमेला जून महिन्यात कर्नाटकी बेंदूर तर जुलै महिन्यात देशी बेंदूर म्हणजेच महाराष्ट्रीयन बेंदूर या नावाने स्थानपरत्वे दोन वेळा साजरा केला जातो.

बेंदूर सणांविषयीची एक आख्यायिका:
       बेंदूर हा सण कसा सुरू झाला याविषयीची एक आख्यायिका आहे. कैलास पर्वतावर एकदा शंकर व पार्वती सारीपाटाचा डाव खेळत होते. पार्वतीने सारीपाटाचा डाव जिंकला. मात्र शंकराने मीच डाव जिंकला असा दुराग्रह धरला. हा वाद कांहीं मिटेना. तेंव्हा  पार्वतीने साक्षीदार असलेल्या नंदीला डाव कोणी जिंकला? असे विचारले. मात्र नंदीने शंकराच्या बाजूने मान हलवताच रागावलेल्या पार्वतीने 'मृत्यूलोकी तुझ्या मानेवर जू बसेल आणि तू जन्मभर कष्टच उपसशील' अशी शापवाणी उच्चारली. या शापवाणीने भयभीत झालेल्या नंदीने पार्वती कडे उःशाप मागितला. तेंव्हा पार्वतीने वर्षातील एक दिवस शेतकरी तुझ्या मानेवर जू न ठेवता तुझी पूजा करतील असा उःशाप दिला. तेंव्हापासून बेंदूर हा सण साजरा केला जातो. ही आख्यायिका एका कवीने काव्यबद्ध केली आहे. ही कविता आम्ही पांचवी-सहावीला असताना पाठ्यपुस्तकात होती. ती कविता अशी....

सहज एकदा कैलासावर
बसुनी पार्वती आणिक शंकर
मजेत सारीपाट खेळती
गंमत नंदी हसत बघे ती ।

बेंदूर सण कसा साजरा केला जातो..
बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पहाटे गरम पाण्याने आंघोळ घातली जाते. नंतर त्याला शेंगतेल, कोंबडीच्या अंड्यातील बलक बैलाना पाजतात. डोक्याला बाशिंग बांधून पाठीवर झुली टाकतात. बैलांच्या शिंगाना छान रंग लावतात. त्यावर सोनेरी, चंदेरी कागद चिकटवून रिबीनी बांधतात. गळ्यात घुंगराची माळ घालतात. या दिवशी नवीन वेसण, म्होरकी, कंडा बैलाना घालतात. बैलांच्या अंगावर विविध रंगाचे ठसे उमटवले जातात. बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. या सणाचे वर्णन यथार्थपणे एका कवीने या कवितेत केले आहे. ती कविता अशी...

शिंगे रंगविली, बाशिगे बांधली
चढविल्या झूली, ऐनेदार ।
राजा, प्रधान, रतन दिवाण
वजीर पठाण सुस्त मस्त ।

खांदेमळणी:
बैलांच्या वशिंडापासून पुढील भाग आणि मानेचा वरचा भाग म्हणजे खांदा. बेंदूर सणाच्या दिवशी बैलांची खांदेमळणी केली जाते. या दिवशी बैलांचे खांदे गरम पाण्याने धुतले जातात म्हणजेच शेकले जातात. त्यानंतर बैलांच्या खांद्याना हळद लावली जाते.

मिरवणूक व कर तोडणे:
या दिवशी संध्याकाळी बैलांना सजवून मिरवणूक काढली जाते. बैलांच्या शिंगाना फुगे, पायात तोडे, गळ्यात घुंगराच्या माळा, अंगावर झूल टाकून गावच्या वेशीत कर तोडण्यास जातात. गावच्या वेशीत सर्व बलुतेदार लोक गवत व पिंजर एकत्र करून त्यामध्ये पिंपळाची पाने टोचून लावतात त्याला कर म्हणतात. ही कर दोन्ही बाजूला ओढून आडवी धरली जाते. बैलाला वाजत गाजत पळवत आणून त्यावर उडी मारण्यास भाग पाडतात. बैलाने उडी मारताच कर तुटते. कर तोडणे म्हणजे सर्व बंधने तोडून नव्याने सुरुवात करणे होय.

       बैलाने वर्षभर केलेल्या काबाडकष्टाच्या जोरावर अन्नधान्य पिकवून शेतकरी सधन व संपन्न होतो त्यामुळे बैल हेच त्यांचे दैवत असते. या सणाच्या वेळी शेतकरी पेरण्या करून रिकामा झालेला असतो. पिकांचे हिरवेगार अंकुर पाहून आनंदी झालेला शेतकरी आनंदाने हा सण साजरा करतो.

शेतकरी व बैल यांचे नाते कसे जिवाभावाचे असते हे दाखविणारा एक ह्रदयद्रावक प्रसंग:
       ता. आष्टी, जि. बीड उस्मानाबाद येथील दादासाहेब झानजे या शेतकऱ्याकडे एक बैलजोडी असते. बैलपोळा या सणाच्या दिवशी त्याने बैलाला सजविले. पत्नीने बैलांचे पूजन केले, औक्षण केले. बैलांना नैवेद्याचा घास भरवला. गडबडीत पूजेसाठी आणलेले मंगळसूत्र तिथेच विसरले. कांहीं वेळानंतर मंगळसुत्राची शोधाशोध सुरु झाली. एका बैलाने नकळत वैरणीबरोबर ते गिळले असावे अशी शंका आल्यावर शेतकऱ्यांने व्हेटर्नरी डॉक्टराकडून एक्सरे काढून घेतला. बैलाच्या पोटात मंगळसूत्र दिसले. ऑपरेशन करून मंगळसूत्र काढता येईल असे डॉक्टरांनी सांगितले. त्यावर डोळ्यात पाणी आणून शेतकरी म्हणाला, "डॉक्टरसाहेब, मंगळसूत्र पन्नास-साठ हजाराचे असेल ते राहू द्या बैलाच्या पोटात पण आमच्या सुखदुःखात साथ देणाऱ्या माझ्या या सख्याला त्रास होता कामा नये. माझा मित्र ऑपरेशनमुळे अधू होता कामा नये. बैलावर जिवापाड प्रेम करणाऱ्या शेतकऱ्याचे हे बाणेदार उत्तर ऐकून डॉक्टर थक्क झाले. आणि विशेष म्हणजे, तिसऱ्या दिवशी रवंथमधून मंगळसूत्र बाहेर पडले. याला म्हणतात बैलावरील प्रेम. धन्य तो शेतकरी व धन्य तो त्याचा बैल.

शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

गृहिणींचे अनमोल योगदान - विशेष मराठी लेख

 

गृहिणींचे अनमोल योगदान

शब्दांकन: मोहसीन तांबोळी

फोटो साभार: share chat.com

 

       गृहिणी म्हणजे घरकाम करणारी स्त्री असा समज करुन आपण तिच्या स्वाधीन घर करुन बाहेर निघून जातो, परंतु त्या गृहिणीला करावी लागणारी कामे जर पाहिली तर मोठे मोठे धुरंधर ही ती कामे करू शकत नाहीत अशी असतात. गृहिणी ही कामे जराही कमीपणा न मानता अगदी सहजपणे करत असते.


       तर हे सर्व सांगायचे म्हणजे परवा झी मराठी या दूरचित्रवाणी वरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतील एक प्रसंग जो गृहिणी कोण असते, तीचे योगदान, तिचे काम, तिची भूमिका हे सर्व दाखवणारे एक बोलके उदाहरण म्हणावे लागेल.


       या मालिकेमध्ये अभिजित राजे (डॉ. गिरीश ओक), त्यांची पत्नी आसावरी (निवेदिता अशोक सराफ), मुलगा सोहम उर्फ बबड्या (आशुतोष पत्की) व सून शुभ्रा (तेजश्री प्रधान) असं चार लोकांचं कुटुंब दाखवलेले आहे. यातील अभिजित यांचा हॉटेल व्यवसाय असतो व ते एक नामांकित शेफ असतात. आसावरी ही एक उत्कृष्ठ गृहिणी असते. बबड्या हा एक काहीही काम न करणारा, आईने लाडावून ठेवलेला, आईला मोलकरीण व स्वतःला फार हुशार समजणारा मुलगा असतो. शुभ्रा ही एक नोकरी करणारी, रोखठोक बोलणारी, समजदार, घरकामात मदत करणारी सून असते.


       यातील एका प्रसंगात असे दाखवले आहे की, आसावरी शाबुदाण्याची खिचडी बनवणार असते. त्यासाठी लागणारे शेंगदाणे संपलेले असतात. शेंगदाणे आणण्यासाठी ती तिच्या जवळील सर्व डबे, पर्स तपासते परंतु पैसे संपलेले असतात. ती पैसे मागण्यासाठी पती अभिजीत यांच्याकडे जाते. तिला पैसे मागताना फार संकोच वाटत असतो. ती पैसे मागताना फार सविस्तरपणे स्पष्टीकरण सांगत असते. ही गोष्ट अभिजीत यांच्या लक्षात येते. ते तिला म्हणतात, “किती पैसे पाहिजे तेवढे अगदी विनासंकोच माग. खरंतर तू न मागता आम्ही तुला पैसे दिले पाहिजेत.” यानंतर लगेचंच अभिजीत व शुभ्रा हे पैसे देतात. आसावरी ते पैसे बबड्या ला देते व शेंगदाणे आण्यासाठी पाठविते. बबड्या ७० रुपयांचे शेंगदाणे घेवून येतो व म्हणतो, “३० रुपये माझी टीप, शेंगदाणे घेवून यायची.”


       ही गोष्ट शुभ्रा व अभिजीत यांना ही खटकते. ते म्हणतात, “आजपासून या घरात प्रत्येकाला प्रत्येक कामाचा मोबदला मिळाला पाहिजे.” त्यानंतर अभिजीत सर शाबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी बसल्यावर प्रत्येकजण ७० रुपये जमा करायला सांगतात. सोहमला पैसे देताना कसेबसे वाटते. आसावरीला ही गोष्ट आवडत नाही. ती तिथून निघून जाते. पाठोपाठ अभिजीत व शुभ्रा ही तिच्या मागे निघतात.


       आसावरी म्हणते, “असे कोणी घरकामाचे पैसे देतात का? ही काय खानावळ आहे का? अशा घरातील कामाचे कुठेही बाजाराप्रमाणे मोल होऊ शकत नाही.” अभिजीत सर तिला समजावतात व म्हणतात, “आपण देवाकडेही काहीही मागतो व ते पूर्ण करण्यासाठी देवालाही काही रक्कम, वस्तू अर्पण करतो. म्हणजे काय ती किंमत नसते तर त्या मागील भावना महत्वाच्या असतात.” तरीही आसावरी हे सगळे न करण्यावर ठाम असते.


      त्यानंतर अभिजीत, शुभ्रा व बबड्या हे तिघे मिळून एक शक्कल शोधून काढतात. आजपासून घरातल्या प्रत्येकाचे एक एक बॉक्स तयार करतात त्यावर चार जणांची नावे लिहितात. काही छोटे व काही मोठे बॉक्स असतात. जो जेवढे काम करेल तेवढे पैसे त्या व्यक्तीच्या बॉक्स मध्ये जमा करायचे. बबड्याला वाटते मी घरात फार काम करतो त्यामुळे माझे सगळ्यात जास्त पैसे जमा होतील. तो शुभ्राकडे मोठा बॉक्स मागतो. ही सर्व गोष्ट आसावरी पासून लपवून ठेवतात. दिवसभर प्रत्येकजण त्या त्या व्यक्तीच्या कामानुसार पैसे बॉक्समध्ये जमा करत असतो. आसावरी भरपूर काम करत असते. बबड्याचे सर्व पैसे जवळपास संपत आलेले असतात कारण तो काहीच काम करत नसतो. आई साफसफाई करत असताना बबड्या मनातल्या मनात म्हणतो, “आई खूप काम करू नकोस नाहीतर मी कंगाल होईन.” तो आईला म्हणतो, “तू बस इथे मी तुझ्यासाठी चहा करुन आणतो” जेणेकरून थोडेतरी पैसे जमा होतील. शुभ्राही बबड्याला चहा करायला सांगते तो नाही म्हणणार इतक्यात त्याला पैसे दाखवते. बबड्या लगेचंच चहा करायला तयार होतो. चहा करताना त्याला घरातील काही वस्तू सापडत नाहीत. तो चिडतो व त्याच्या हातून साखरेची बरणी फुटते. ती बरणी व पडलेली साखर आसावरी येवून साफ करते. त्याचेही पैसे बबड्याला द्यावे लागतात.


     शेवटी रात्री सर्व कामे आटोपल्यावर सर्वजण एकत्र जमतात व त्या बॉक्समधील जमा रक्कम मोजू लागतात. बबड्या म्हणतो, “माझा बॉक्स आधी उघड, त्यात खूप पैसे जमा झाले असतील” प्रत्यक्षात बॉक्स उघडल्यावर त्यात फक्त ७० रुपये असतात. शुभ्रा त्यातील वीस रुपये काढून घेते व म्हणते हे तू मला चहा करुन दिला नाहीस त्याचे हे पैसे. शुभ्राच्या बॉक्स मध्ये ३०० रुपये जमा असतात. अभिजीत सरांच्या बॉक्स मध्ये ४५० रुपये जमा असतात तर आसावारीच्या बॉक्स मध्ये ११०० रुपये जमा असतात.


       या जमा रकमेतून घरातील सर्वजण आसावरीला हे दाखवून देतात की तू दिवसभर किती काम करतेस. या सर्व प्रसंगातून सांगायचा उद्देश एवढाच की घरातील गृहिणी ही दिवसभर किती काम करत असते. सकाळी सर्वजण उठण्याआधी पासून रात्री सर्वजण झोपेपर्यंत ती सतत काम करत असते. दिवसभर ती वेगवेगळ्या भूमिका पार पडत असते. ती आई, बायको, सासू, आजी, सून या नात्यांसोबतच कामाच्या विविध भूमिका पार पडत असते. ती घरातील स्वयंपाक, साफसफाई, धुणीभांडी, कपडे इस्त्री, इ. तसेच इतर अनेक कामे प्रत्येकाच्या वेळानुसार करत असते. कधी घरातील नळ दुरुस्त करताना ती प्लंबर बनते, तर कधी वस्तू दुरुस्त करताना मेकॅनिक बनते, कधी एकाद्याला मार्गदर्शन करताना मार्गदर्शक बनते, कधी लहान मुलांची शिक्षक बनते, कधी घरातील आजारी माणसाची काळजी घेताना डॉक्टर, नर्स बनते, कधी घराची सुरक्षारक्षक बनते, तर कधी कुणी चिंतेत असेल तर त्याची कौन्सिलर बनते. या सर्वांबरोबर ती सर्वांची मैत्रीण बनते.


       खरे पाहता चार भिंतीच्या या इमारतीला ती घर बनवते. घराला घरपण देते. जर गृहिणीला तिच्या कामाचा योग्य मोबदला मिळाला तर ती सर्वात श्रीमंत व्यक्ती बनेल कारण नोकरी, व्यवसाय किंवा शाळा, कॉलेज या निमित्ताने आपण घराबाहेर पडत असतो पण घरची पूर्णपणे जबाबदारी ही गृहिणी पार पडत असते. तिला तिच्या प्रेमळ स्वभावाचा गैरफायदा घेवून घरातील सर्व लोक गृहीत धरत असतात. इतरांना वाटते हिला काय काम असते? आम्ही बाहेर जाऊन खूप काम करतो हिचे आपले घरच्या घरी निवांत! त्यामुळे तिचा बरेचदा अपमान केला जातो, तिला टोमणे मारले जातात. त्यामुळे तिच्या मनाचे खच्चीकरण होते. तीसुद्धा बाहेर तिची ओळख मी घरात असते अशीच करुन देते. तिला आभाराचे दोन शब्दसुद्धा पुरेसे असतात पण आपण नेमके करतो उलट आपण तिलाच रागावतो व म्हणतो तुला काही कळत नाही.


      तरी समाजातील या घरच्या खऱ्याखुऱ्या योद्ध्यांना आपण योग्य तो सन्मान दिला तरच गृहिणींच्या या अनमोल योगदानाचे चीज होईल.


 संदर्भ: झी मराठी या दूरचित्रवाणी वरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतील दिनांक ७ व ८ सप्टेंबर २०२० रोजी प्रसारित भाग.


सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

शिक्षकाने घडविले माणुसकीचे दर्शन - विशेष मराठी लेख


शिक्षकाने घडविले माणुसकीचे दर्शन

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी




        कोरोनामुळे माणसाचे जीवन बदलून गेले आहे. जीवन किती क्षणभंगुर आहे, याचा प्रत्यय येत आहे. प्राप्त परिस्थितीत कोरोनायोद्धे आपले प्राण पणाला लावून लढत आहेत. पोलिस यंत्रणा, आरोग्य कर्मचारी, बँक अधिकारी, शिक्षक बांधव जे कार्य करत आहेत ते खरोखरच प्रशंसनीय आहे. शिक्षक बंधू भगिनी घरोघरी जाऊन आरोग्य सेविकांच्या बरोबरीने प्रत्येक कुटूंबाची  माहिती घेत आहेत. आरोग्य सल्ले देत आहेत. प्रत्येक कोविड सेंटर मध्ये जाऊन रूग्णांची सेवा करत आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. तंत्रस्नेही शिक्षक आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण देण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. शिक्षिका कुटूंबाची जबाबदारी घेत, विद्यार्थ्यांसाठी व्हिडीओ तयार करत आहेत. विद्यार्थ्यांशी, त्यांच्या पालकांशी संवाद साधून शिक्षणाची नौका कौशल्याने पैलतीरी नेण्याचा प्रयत्न करत आहेत.


       परवाच ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा झाला. शिक्षक करत असलेल्या उचित कार्याचा यथोचित गौरव झाला. ७ सप्टेंबर २०२० रोजी दैनिक युवकांचा नवा महाराष्ट्र या वर्तमानपत्रामध्ये माझ्या एका शिक्षक बांधवाने केलेल्या छोट्याशा पण महत्वपूर्ण कार्याची बातमी वाचली आणि मला याचा खूपच अभिमान वाटला.


   आलास बुबनाळ हायस्कूल, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर येथे कार्यरत असलेले हेरवाड या गावचे रहिवासी श्री. विजय नरसगोंडा पाटील यांनी केलेले कार्य असे की, हेरवाड गावातील स्मशानभूमीत कांही कोरोनाबाधित मयत रूग्णांवर अंत्यसंस्कार केले गेले होते मात्र स्मशानशेडच्या आवारात अनावश्यक असे बरेच साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. या शेडजवळूनच पंचगंगा नदीच्या पाणवठ्यावर जाणारा रस्ता असल्याने तेथून महिला व  नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्या अनावश्यक साहित्यामुळे नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पाटील सरांनी सामाजिक बांधिलकी स्विकारून स्मशानभूमी परिसरातील अनावश्यक साहित्य एकत्र करून ते सर्व जाळून टाकले व स्मशानभूमीचा सर्व परिसर जंतूनाशक व औषध फवारणी केली आणि शिक्षकांमध्ये ठासून भरलेल्या माणुसकीचे दर्शन घडविले.


     अशा संवेदनशील, प्रसंगावधानी शिक्षकाला अगदी मनापासून मानाचा मुजरा. देशाचे आधारस्तंभ असलेल्या विद्यार्थ्यांना घडवत असतानाच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्वच कोरोनायोद्धा शिक्षकांना खूप खूप धन्यवाद.



बातमी संदर्भ: दैनिक युवकांचा नवा महाराष्ट्र दि. ०७ सप्टेंबर २०२० पृष्ठ क्रमांक २.


बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०

समाज सुधारतोय - मराठी लेख

 

समाज सुधारतोय !




गणेशोत्सवातील साधेपणा:

       कोरोनाच्या संकटाने जगभर सर्वच गोष्टीना मर्यादा आल्या आहेत. जगाचे आतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. मंदीचे सावट सर्व क्षेत्रात दिसू लागले आहे. महागाईने डोके वर काढले आहे. बेकारी वाढली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर धार्मिक सणांंवरही मर्यादा आल्या आहेत. दरवर्षी धुमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सव यंदा साधेपणाने साजरा होत आहे. कोरोनाचं सावट प्रकर्षाने जाणवत असल्याने उत्सवाच्या निमित्ताने होणारी कोट्यावधींची उलाढाल लक्षणीयरीत्या घटली आहे. आकर्षक भव्य मूर्ती, सजावट, देखावे, प्रबोधनात्मक कार्यक्रम यांंसह विविधता जपणाऱ्या मंडळांंनी श्रींची प्रतिष्ठापनाचं केली नाही. शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी कटाक्षानं सुरु आहे. वर्षानुवर्षे धामधुमीची परंपरा जपणाऱ्या मंडळानी कोणताही गाजावाजा न करता लहान मंडपात किंवा छोट्याशा पोर्चमध्ये केवळ लहानशा मूर्तीची प्रतिष्ठापना करून उत्सवाची औपचारिकता पूर्ण केली आहे. यावर्षी वर्गणीसाठी मंडळाचे कार्यकर्ते कुणाच्याही दारात फिरकले नाहीत हे समाजसुधारणेचं शुभचिन्हचं मानावं लागेल.


कोल्हापूर जिल्ह्याची सध्य: स्थिती:

     कोल्हापूर जिल्ह्यातील एकतीस पोलिस ठाण्याच्या हद्दीत सन २०१९ मध्ये ७,३२६ नोंदणीकृत सार्वजनिक मंडळानी श्रींची प्रतिष्ठापना केली होती. त्यापैकी यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल ४० टक्के म्हणजेच ३,१८० मंडळांंनी श्रींची प्रतिष्ठापनाच केली नाही. दुःखात काही प्रमाणात सुख दडलेले असते असं म्हणतात हे यावर्षीच्या गणेशोत्सवातून दिसून येते.


हिंदू मुस्लिम ऐक्य जपण्याचा आदर्श:

       दुसरी आशादायी व आनंददायी घटना म्हणजे गणेशोत्सव व मोहरम एकत्र साजरा करण्याची परंपरा जपली जात आहे. कुरूंदवाड ता. शिरोळ जि. कोल्हापूर येथील नागरिकांनी धार्मिक एकात्मता जोपासत मशिदीत भक्तिमय वातावरणात गणपती व पीरपंजाची प्रतिष्ठापना केली आहे. यातून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश समाजाला मिळत आहे. यातून कुरूंदवाडची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याची वीण घट्ट होत आहे. मोहरममध्ये भेटीसाठी पीर धरण्याचा बहुतांश मान हिंदू समाजातील बांधवांना आहे. खत्तलरात्री अग्नीकुंडातून जाणाऱ्यामध्ये हिंदू बांधवांची संख्या मोठी आहे. कुरुंदवाड चा हा आदर्श आजूबाजूच्या गावातील लोक घेत आहेत.

       अशा प्रकारे गणेशोत्सव व मोहरम सामाजिक बांधिलकी जपत काटकसरीने व साध्या पद्धतीने साजरा होणारा गणेशोत्सव म्हणजे समाजसुधारणेची नांदी होय. तसेच हिंदू मुस्लिम ऐक्य हे प्रगतीचे पहिले पाऊल होय. गणरायांंवर पूर्ण श्रद्धा ठेवून उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याची ही पद्धत कायम ठेवली तर समाजाचे भले होईल व गणरायानांही ते फार आवडेल. होय ना सुजाण वाचकहो!


बातमी साभार: दैनिक युवकांचा नवा महाराष्ट्र कोल्हापूर दिनांक २६ ऑगस्ट २०२० पान क्रमांक ४


बातमी साभार: दैनिक युवकांचा नवा महाराष्ट्र कोल्हापूर दिनांक २४ ऑगस्ट २०२० पान क्रमांक ४


बाबूजमाल तालीम कोल्हापूर मोहरम व गणेशोत्सव २०२०


हे ही वाचा: 


बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

अनोखे पत्नीप्रेम - मराठी लेख.


अनोखे पत्नीप्रेम
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

फोटो साभार: thehitavada.com

      शहाजहान बादशहाने आपली पत्नी मुमताज बेगम हिच्या स्मृती प्रित्यर्थ ताजमहाल बांधला आणि संपूर्ण जगापुढे पत्नीप्रेमाचा एक आदर्श ठेवला. ते जगातील सातवे आश्चर्य ठरले. पण ताजमहाल मुमताजच्या कबरीवर बांधला गेला. मुमताजला ही भव्य दिव्य वास्तू पहाता आली नाही. ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही. आजही समाजामध्ये पत्नीप्रेमाचे उत्कट दर्शन घडविणारे शहाजहान आहेत याची प्रचिती एक बातमी वाचून आली. ती बातमी अशी...


    कर्नाटक राज्यातील कोप्पल येथील उद्योजक श्रीनिवास गुप्ता यानी आठ ऑगस्ट २०२० रोजी आपल्या नव्या बंगल्यात प्रवेश केला. या गृहप्रवेशासाठी त्यांनी बनवून घेतलेला दिवंगत पत्नीचा अगदी हुबेहूब दिसणारा सिलिकॉन वॅक्सचा पुतळा सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. हा पुतळा श्रीनिवास यांच्या इच्छेनुसार बंगळुरू येथील कलाकार श्रीधर मूर्ती यांनी वर्षभराच्या अथक परिश्रमातून हा पूर्णाकृती पुतळा साकारला आहे. श्रीनिवास यांची पत्नी माधवी यांचा जुलै २०१७ मध्ये कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर पत्नीच्या स्वप्नातील बंगला उभारण्याचा निश्चय केला व एक आलिशान बंगला बांधला. या बंगल्याच्या वास्तुप्रवेश सोहळ्याच्यावेळी माधवी यांच्यासारखाच दिसणारा गुलाबी रंगाच्या भरजरी साडीतील पुतळा पाहून सर्व पाहुणे व मित्रमंडळी अवाक् झाली.

   बंगल्याचे बांधकाम जुलै महिन्यातच पूर्ण झाले. माधवी शिवाय गृहप्रवेश करण्यास श्रीनिवास व त्यांच्या दोन कन्या इच्छुक नव्हत्या कारण सुंदर बंगला बांधण्याचे माधवींचे स्वप्न होते. मात्र हा बंगला पाहण्यासाठी त्या या जगात नाहीत याची खंत त्यांना वाटत होती. अखेर श्रीनिवास यांनी त्यातून मार्ग काढला. पुतळ्याच्या स्वरूपात का होईना पत्नी नव्या बंगल्यात आमच्यासोबत राहील. तिचं अस्तित्व असल्याचं समाधान मिळेल. सिलिकॉन वॅक्सचा पुतळा असल्याने वर्षानुवर्षे राहील असे श्रीनिवास यांना वाटले. अशाप्रकारे आधुनिक युगात त्यांनी पत्नी प्रेमाचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे.

    पत्नीप्रेमाच्या या उदाहरणावरुन समस्त पतीदेवांनी काही बोध घ्यायला हवा. पत्नी आपल्या सोबत असताना तिचा आदर करायला हवा. काही पतीदेव पत्नीचा आदर करत असतीलही पण बहुतेक ठिकाणी पत्नीला गृहीत धरले जाते. त्यातल्या त्यात ती गृहिणी असेल तर, तुला काय काम आहे? चार भाकरी थापल्या की झालं असं म्हणून तिला हिणवलं जातं. नोकरी करणारी पत्नी ही तारेवरची कसरत करत असते. नोकरी संसार या दोन्ही आघाड्यांवर लढत असते. अशावेळी तिला मानसिक आधाराची गरज असते. तिला भक्कम आधार पतींनी द्यायला हवा. स्वतःकडे दुर्लक्ष करून ती पतीसाठी, मुलांसाठी झटत असते. तिच्या कष्टांची, त्यागाची दखल ती जिवंत असतानाच घ्यायला हवी. पतीने तिला जास्तीत जास्त सुखी ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा कारण ती माहेरच्या मायासागरातून मोठ्या अपेक्षेने, विश्वासाने तुमच्या घरात आलेली असते. तिलाही भावना असतात, तिची कांही स्वप्ने असतात याचा विचार व्हायला हवा.

     पती-पत्नी ही संसाराची दोन चाके आहेत. त्या दोन चाकांनी एकमेकाला सांभाळून घेतले पाहिजे. एकमेकांची मने जाणून घेऊन त्याप्रमाणे वर्तन ठेवले पाहिजे. फक्त पतीनेच पत्नीवर प्रेम करायला हवे असे नाही तर पत्नीनेही पतीच्या कार्यात समर्थपणे साथ देऊन प्रेम करायला हवे. पतीला व सासरच्या सर्व मंडळींना सुखी ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्तीसाठी पतीला वेठीस धरणे योग्य नव्हे.

   श्रीनिवास यांनी जिवंतपणी पत्नीवर मनापासून प्रेम करून तिला सुखी समाधानी ठेवून दिवंगत झाल्यावर पुतळा बनवून स्मृती जागवल्या.

      मला माधवी ताईंच फार कौतुक वाटतं कारण त्यांच्या नशिबी श्रीनिवास यांच्याकडून असं अनोखं प्रेम मिळालं. दिवंगत झाल्यावरही एवढा मोठा आदरसत्कार मिळाला. असे प्रेम, असा आदर समस्त पत्नींना त्यांच्या पतीकडून मिळावा हीच अपेक्षा.



बातमी साभार: दैनिक पुण्यनगरी, कोल्हापूर दि. १२ ऑगस्ट २०२० पान क्र. ३

 


बातमी साभार : https://www.esakal.com/desh/husband-fulfills-late-wifes-dream-owning-bungalow-installing-her-lifesize-wax-tatue-karnataka