मंगळवार, २५ मे, २०२१

कोरोना काळातील माणूसकीचे झरे - विशेष मराठी लेख


कोरोना काळातील माणूसकीचे झरे - विशेष मराठी लेख

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: Facebook


       जीवनात अनेकदा असे प्रसंग येतात, अनेक घटना घडतात, ज्याने मनुष्याचे जीवन बदलून जातं, जगणं बदलून जातं, पण कांही दुर्मिळ प्रसंग असेही असतात जे पूर्ण मानवजातीलाच आतून-बाहेरुन बदलून टाकतात. कोरोना व्हायरसने आणि त्यामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हे दुर्मिळ काम केले आहे. प्रत्येक घटनेचे चांगले-वाईट परिणाम होतात. कोरोनाने अनेक दुर्भाग्यपूर्ण गोष्टी केल्या असल्या तरी कांही चांगल्या गोष्टीही कोरोनामुळेच घडून आल्या आहेत. माणसाची रोगप्रतिकारक शक्ती, आरोग्य, योगा, प्राणायाम किती आवश्यक आहे हे कोरोनामुळे माणसाच्या लक्षात आले. शारीरिक स्वास्थ, मानसिक स्वास्थ या गोष्टीकडे माणूस गंभीरपणे बघू लागला आहे. कोरोनाने पर्यावरण शुध्द केलं. प्राण्यांना या काळात मोकळेपणाने वावरता आले. नद्या शुध्द व स्वच्छ झाल्या. या काळात जणू निसर्गाने स्वतः ला बरंच रिफ्रेश करुन घेतलं. गरिबांना, अडचणीत असलेल्या लोकांना मदत करणाऱ्या लोकांची माणुसकी समोर आली. लॉकडाऊनच्या काळात माणुसकीचे असंख्य झरे वाहू लागल्याचे आपण पाहिले. त्यातील तीन लोकांच्या माणुसकीच्या झऱ्यांचे दर्शन घडविण्यासाठी हा लेखन प्रपंच.




पोलीस आकाश गायकवाड
फोटो साभार: Twitter

       त्यातील पहिला झरा पोलिसातील परमेश्वराचा, मुंबई पोलीस क्र. १४००५५ आकाश बाबासाहेब गायकवाड, मूळ गांव माळवाडी, ता. मिरज, जि. सांगली यांचा. ते सद्या नेमणूक स. पो. ताडदेव (A कंपनी) मुंबई येथे कार्यरत आहेत. दि. ३ जून २०२० रोजी कोरोनाने भयग्रस्त झालेल्या जनतेला चक्रीवादळाने वेढले. निसर्गाच्या या भयंकर कोपाने लोक सैरभैर झाले. अनेकांची घरे उध्वस्त झाली. लाखो संसार उघड्यावर पडले. त्याच दिवशी हिंदुजा रुग्णालय मुंबई येथे चौदा वर्षाच्या सना फातिमा खान या मुलीला अचानकपणे ओपन हार्ट सर्जरी च्या वेळी A+ रक्त देण्याकरीता तिच्या कुटुंबातील व नातेवाईकातील कोणीही रुग्णालयात येवू शकत नव्हते. अशा गंभीर परिस्थितीत आकाश गायकवाड यांना ही बातमी समजली. क्षणाचाही विचार न करता त्यांनी हिंदुजा रुग्णालयात जाण्यासाठी आपली बाईक स्टार्ट केली. चक्रीवादळाने बाईक चालविणे महाकठीण झाले. बाईक कित्येक वेळा आडवी झाली. पण ते अजिबात डगमगले नाहीत. त्यांच्यापुढे एकच ध्येय होते, सना फातिमाचा जीव वाचवायचेच. त्यांनी अतिशय कौशल्याने चक्रीवादळावर मात केली व काही मिनीटातच हिंदुजा रुग्णालय गाठले व डायरेक्ट टेबलावर गेले. रक्तदान केले. सना फातिमाची ओपन हार्ट सर्जरी सक्सेस झाली. तिला जीवनदान देणारा हा योध्दा माझ्या माहेरचा माझ्या भाच्यांचा मित्र आहे, हे सांगायला मला अभिमान वाटतो व पवित्र कुरआनमधील एक वचन आठवते "जिसने किसकी जान बचायी, उसने सारा जहाँ बचाया!"





तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे धुुमाळ
फोटो साभार: Facebook

       दुसरा माणुसकीचा झरा भरुन वाहताना दिसला तो शिरोळ जिल्हा कोल्हापूर च्या तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांच्या रुपात. कोरोना लॉकडाऊनच्या काळात आपल्या पदाचा, प्रतिष्ठेचा, अधिकारांचा तोरा न मिरवता मातीशी आणि लोकांशी नाळ जोडलेल्या आणि सेवेला सर्वोच्च मानणाऱ्या डॉ. अपर्णा मॅडम यांच्या रुपात. श्री महंमदहनिफ मुबारक मुल्ला, रा. औरवाड यांची बारा वर्षाची पुतणी सना ही कोरोना पॉझिटीव्ह सापडली. त्यांच्या कुटुंबाची अवस्था दयनीय झाली. सनाला उपचारासाठी सीपीआर कोल्हापूरला नेण्यात आलं आणि तिच्या कुटुंबीयांना शिरोळ येथे क्वारंटाईन करण्यात आलं. सना बिचारीला एकटीलाच ५०-६० कि. मी. लांब जावं लागलं. कुटुंबीयांनी साश्रू नयनांनी काळजावर दगड ठेवून तिच्याकडे एक मोबाईल दिला व तिच्याशी संवाद साधून तिला धीर देणे सुरु केले. संवाद साधताना कुटुंबीयांना कळलं की, फक्त तेच तिला धीर देत नव्हते तर अजून एक व्यक्ती दररोज तिच्याशी संवाद साधून तिला धीर देत होती, ते नांव होतं तहसीलदार डॉ. सौ. अपर्णा मोरे-धुमाळ. इतकी महाभयंकर स्थिती आजूबाजूला असताना, दररोज वेगवेगळे विषय हाताळावे लागत असताना, नव्या समस्यांना तोंड द्यावे लागत असताना यातून वेळ काढून डॉ. अपर्णा मॅडम दररोज सनाशी गप्पा मारत होत्या, तिला धीर देत होत्या. आपल्या मुलीसारखीच लहान लेक कुटुंबापासून दूर राहून कोरोनाशी झुंज देत आहे हे पाहून त्यांच्यातील मातृहृदय जागं झालं. त्या स्वत: तर बोलत होत्याच शिवाय सनाएवढ्याच आपल्या मुलीला तिच्याशी गप्पा मारायला लावायच्या. एकमेकींना कधीही न भेटलेल्या त्या दोघी. आता चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत. अशा संकट काळात आपलं आईपण सांभाळणाऱ्या मातृहृदयी अपर्णा मॅडमना मानाचा मुजरा.


रिक्षाचालक अक्षय कोठावळे

फोटो साभार: गूगल


       तिसरा माणुसकीचा झरा दिसला, तो अक्षय कोठावळे या तीस वर्षाच्या युवकामध्ये, तो रिक्षाचालक आहे. त्याच्या वडिलांचे कांही दिवसापूर्वीच निधन झाले. त्याच्या लग्नासाठी दोन लाख रुपये या कुटुंबाने साठवले होते. ते महात्मा फुले पेठ, पुणे येथे राहतात. अक्षय यांचे मे महिन्यात लग्न करण्याचे ठरले होते. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे संवेदनशील मनाच्या अक्षयने रस्त्यावरुन पायी जाणारे कामगार पाहिले, गोर-गरीब लोकांचे जेवणाअभावी होणारे हाल पाहिले. परोपकारी अक्षयने त्यांचे हाल कमी करण्याचा निर्णय घेतला. विवाहासाठी जमविलेल्या रकमेतून शहरात रस्त्यावर दिसणाऱ्या उपाशीपोटी नागरिकांना एकवेळचे जेवण देण्याचा उपक्रम हाती घेतला. दररोज सुमारे चारशे परप्रांतीय कामगार तसेच रस्त्यावरील गोरगरीब नागरिकांना तो जेवणाचे वाटप स्वतःच्या रिक्षातून करत राहिला. त्याच्या वडिलांचे १८ मे रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. तेही ऑटोरिक्षाचालक म्हणून काम करीत होते. मात्र वडिलांच्या निधनाने डोंगराएवढे दुःख उराशी बाळगून अक्षय यांनी दररोज गरिबांसाठी सुरु केलेल्या या उपक्रमाच काम न थांबवता चारशे लोकांची भूक भागविली. केवढे हे महान कार्य! अक्षयच्या या कार्यास मानाचा मुजराही कमी पडेल. देश अडचणीत असताना मदत करणाऱ्या रतन टाटा, अक्षयकुमार, सोनू सूद अशा अनेकांची उदात्त भावना देशासमोर आली. स्वच्छता, सावधानता, सहकार्य, सहनशीलता, सहवेदना यांचे महत्व लोकांच्या लक्षात आले.


       आकाराने अतिशय लहान असलेला एक विषाणू विज्ञान, धर्म, वैद्यकीय सुविधा या सर्व क्षेत्रांच्या मर्यादा अधोरेखित करुन गेला. वाईटातून वाईट घडतेच, पण वाईटातून काही चांगले घडते हे सर्व जगाने पाहिले. आपण वाईटातून जे चांगलं घडलं, जे चांगलं शिकायला मिळालं त्यातून एक नवा चांगला माणूस आणि एक नवा देश नक्कीच उभा करु शकतो. यासाठी कोरोनातून मिळालेल्या या निर्मळ झऱ्यांचे पाणी आपण निश्चित प्राशन करु शकतो. अशा या खळखळ वाहणाऱ्या माणुसकीच्या झऱ्यांना - आकाश, डॉ. अपर्णा व अक्षय यांना त्रिवार वंदन !


गुरुवार, १३ मे, २०२१

त्याग, बंधुभाव व संयम जोपासणारा 'पवित्र रमजान' - मराठी लेख


त्याग, बंधुभाव व संयम जोपासणारा 'पवित्र रमजान'

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       'इस्लाम' या शब्दाचा अर्थ अल्लाहवर (परमेश्वरावर) नितांत श्रद्धा. अल्लाहप्रती संपूर्ण शरणागती म्हणजेच इस्लाम आणि तोच अल्लाहचा खरा धर्म (कुराण ३ - १७) असे मानले जाते. 'रमजान' महिन्याला इस्लाममध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे. या महिन्यामध्ये अल्लाहने 'पवित्र कुराण' या धर्म ग्रंथाचे पृथ्वीवर अवतरण केले. इस्लाम धर्माच्या आध्यात्मिक स्त्रोताची माहिती इबादत (भक्ती) व जकात या माध्यमातून आपल्या संपत्तीचे रक्षण व शुद्धिकरण एवढेच नव्हे तर पवित्र रोजाच्या माध्यमातून अल्लाहवरील अगाढ श्रद्धा व प्रेम तसेच संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी कोणताही त्याग करण्याची शिकवण 'रमजान' आपल्याला देत असतो.


       हजरत ईस्माइल यांच्या वंशात इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्म पवित्र मक्का भूमीत झाला. त्यांनी पाच आचारनियमांचे पालन करण्याची आज्ञा इस्लाममध्ये केली आहे. या पाच नियमांना 'अरकाने दीन' म्हणतात. १) इमान २) नमाज ३) रोजा ४) जकात ५) हज. रमजान महिन्यात संपूर्ण महिनाभर (रोजे) उपवास केले जातात. या महिन्यात पवित्र वातावरणाने संपूर्ण मोहल्ला सुगंधित, उल्हसित व्हावा अशी इस्लाम धर्माची अपेक्षा आहे.


       रोजा करणे म्हणजे पहाटे सहेरी (नाष्टा) करून दिवसभर अन्न-पाण्यावाचून अल्लाहच्या नावावर उपाशी राहणे नव्हे. अशी मर्यादित अपेक्षा रोजाकडून नाही तर संपूर्ण शरीर व मन रोजामय व्हावे अशी आहे. शरीराच्या एकेका अवयवाचा रोजा असण्याची व्यापक अपेक्षा आहे. रमजानमध्ये हाताने कोणतेही दुष्कृत्य होऊ नये, डोळ्यांनी कोणत्याही अमंगल गोष्टी पाहू नये, कानांनी वाईट ऐकू नये, तोंडाने वाईट बोलू नये, हातांनी आपल्या घासातील घास गरजूंना द्यावा, अशी संपूर्ण इबादत (उपासना) म्हणजे 'रोजा' होय. भक्तीने भारलेल्या व भरलेल्या या रमजानमध्ये जे या आचारांचे पालन करतील त्यांना अल्लाह खुशी प्राप्त करून देतो. त्यांना इच्छिलेले फळ देतो, अशी दृढ श्रद्धा मनामनांत दिसून येते.


       रमजानमध्ये अगदी लहान लहान बालकेसुद्धा रोजा करतात. रोजामुळे अगदी लहान वयातच बालकांना संयमाचा आदर्श पाठ गिरविण्याची संधी मिळते. आपल्या अपत्याने प्रथमच रोजा केल्यावर आई-वडिलांना व सर्वच कुटुंबीयांना अतिशय आनंद होतो. त्या बालकाला  रोजाच्या दिवशी नवा ड्रेस आणतात, हार-तुरे घालून, छानशी भेटवस्तू देऊन त्याचे मनापासून कौतुक करतात. आपल्या मुलाबाळांसाठी, वृद्ध कुटुंबीयांसाठी भल्या पहाटे स्त्रिया उठून ताजा स्वयंपाक करून सेहरीसाठी वाढण्यात त्याचप्रमाणे रोजा सोडण्यासाठी लगबगीने स्वयंपाक करण्यात महिलावर्ग धन्यता मानतो. हीच त्यांच्या दृष्टीने सर्वोत्तम उपासना असते.  


       रमजान महिन्यातील रोजे सर्व धर्मातील लोक भक्ती भावाने करतात. आमच्या परिचयाचे कुलकर्णीकाका, शेजारचा सुरेश पाटील, गल्लीतील पवार दाम्पत्य, ओळखीच्या सुशीलाकाकूं हे सर्वजण रोजे करतात. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक रमजानमध्ये सर्वत्र दिसते. रोजा इफ्तारसाठी (रोजा सोडण्यासाठी) सर्व लहान थोर मंडळी मशिदीमध्ये जमा होतात. रोजा सोडण्यासाठी आपापल्या घरात तयार केलेला पदार्थ डब्यात घेऊन येतात. कोणी खजूर आणतो, केळी, सफरचंद, डाळिंब आदी फळे आणतो, तर कोणी शिरा, पुलाव, गुलगुले आणतो. सर्वांचे डबे एकत्र करून हा 'मिक्स मेवा' मोठ्या आवडीने खाऊन रोजा सोडतात व मगरीबची (सायंकाळची) नमाज पठण करतात. रात्री साडेआठनंतर पुन्हा ईशाच्या (रात्रीच्या) नमाजसाठी सर्वजण एकत्र येतात. या महिन्यात 'तरावीह' म्हणजेच (२० रकाअत) खास नमाज पठण केले जाते. रमजानमध्ये कुवतीनुसार गोरगरीब, अनाथ व विधवा स्त्रियांना दान दिले जाते. यामध्ये विशेषकरून रोख रक्कम, कपडे, गहू, आदींचा समावेश असतो. बंधुभाव, संयम, त्याग शिकविणारा रमजान संपूर्ण मानव जातीला मुबारक व्हावा हीच अल्लाहचरणी प्रार्थना !


अक्षयतृतीया - विशेष मराठी लेख


अक्षयतृतीया - विशेष मराठी लेख

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       अक्षयतृतीया या सणाला ग्रामीण भाषेत आकिती असे म्हणतात. पूर्वीच्या आजीबाई म्हणायच्या आकिती दिवशी परसात फळभाज्यांच्या बिया पेरा. आकितीचं आळं आणि बेंदराला फळं. बेंदूर या सणापर्यंत फळं हवी असतील तर अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बियांची पेरणी करा. किती छान मंत्र दिलाय पूर्वजांनी आपल्यासाठी !


या सणाची नैसर्गिक पार्श्वभूमी:

       चैत्र आणि वैशाख हे दोन महिने वसंत ऋतूचेच आहेत. या महिन्यातील पौर्णिमेला सायंकाळी विशाखा नक्षत्र क्षितिजावर उगवते म्हणून या महिन्याला आपल्या पूर्वजांनी वैशाख असे नांव दिले. वैशाख महिना अगदीच वेगळा. या महिन्यात सर्वत्र कडक असा रखरखीत उन्हाळा असतो. सगळे वातावरण तापून गेलेले असते. उष्म्याने जीव अगदी नकोसा झालेला असतो. दिवस रात्रीपेक्षा मोठा झालेला असतो.


       वसंताच्या कडक उन्हातच निसर्ग देवतेचा एक हिरवा चमत्कार दिसतो. झाडावेलीना सर्वत्र हिरवीकंच कोवळी लुसलुशीत पालवी फुटलेली असते. वातावरणात रानफुलांचा एक मधुर सुगंध दरवळत असतो. हिरव्या गर्द  पानाआड बसून शेपटी खालीवर करत कोकिळा आनंदाने गात असते.


या सणामागील पौराणिक कथा:

       भगवान श्री परशुराम महापराक्रमी होते. त्यांनी एकवीस वेळा निःक्षत्रिय केली. परशुरामांचा जन्म याच तिथीला अक्षयतृतीयेला झाला, म्हणून या दिवशी सर्वत्र श्री परशुरामांची जयंती साजरी केली जाते. कोकणात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराजवळच्या महेंद्रगिरी नावाच्या पर्वतावर भगवान श्री परशुरामांचे पावन क्षेत्र आहे. या ठिकाणी हा जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात कथा कीर्तन चालते. जागरणाचा कार्यक्रम असतो. या निमित्ताने अन्नदानही केले जाते.


       दुसरी एक फार फार वर्षापूर्वी ची गोष्ट सांगितली जाते. कुशावती नावाचे एक शहर होते. तेथील राजा सदा चैनीत, ऐष आरामात रहायचा. प्रजेच्या कष्टावर चैन करायचा. प्रजेची त्याला कसलीच काळजी नव्हती. त्याचे अधिकारी प्रजेवर अन्याय करीत, लोकांचा छळ करीत. त्या राजाने या अन्यायाची कधीच दखल घेतली नाही. अधिकाऱ्याविरूद्ध तक्रार करणार कोण? सर्वजण धास्तावले होते. त्याच राज्यातील वनात एक तपस्वी ऋषी रहात होते. राजाला या तपस्व्याबद्दल नितांत आदर वाटत होता. लोकांना युक्ती सुचली. लोक त्या तपस्वी ऋषीकडे गेले. त्यांनी आपले दुःख तपस्वी ऋषीना सांगितले. लोकांचे म्हणणे ऐकून ऋषी थेट राजवाड्यात गेले. त्यांनी राजाची कान उघडणी केली. आपण प्रजेवर अन्याय केला याची जाणीव राजाला झाली. त्यांनी ऋषींचे पाय धरले आणि प्रजेला सुखी करण्याचे वचन दिले. ऋषींनी राजाला कल्पना दिली की की, "हे राजा, तू पूर्वी केवळ एक गरीब ब्राह्मण होतास परंतु तुझ्या अक्षय पुण्याईने या जन्मी राजा झालास. वैशाख शुद्ध तृतीयेला गोरगरिबांना दानधर्म केल्यामुळे अक्षयतृतीयेचे दानव्रत पाळल्यामुळेच तुला या जन्मी राजवैभव प्राप्त झाले. या जन्मी असे काही पुण्य केले नाहीस तर पुर्वीप्रमाणेच गरीब होऊन यातना भोगाव्या लागतील!" ऋषींच्या या खड्या बोलण्याने राजाचे डोळे उघडले. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर राजाने अन्नदान केले. जलकुंभ दान केले. लोक संतुष्ट झाले. प्रजा सुखी झाली. तेंव्हापासून लोक भर उन्हाळ्यात अनेक ठिकाणी गार पाण्याचे माठ, रांजण भरून ठेवतात. कडक उन्हात वाटेने जाणाऱ्या येणाऱ्या वाठसरूचा जीव कासावीस होतो. अशावेळी हे व्याकुळ जीव थंडगार पाण्याने शांत होतात. आजही ठिकठिकाणी यादिवशी अनेकजण अन्नदान करतात. पाणपोई सुरु करतात.


सण कसा साजरा करतात:

       या दिवशी अनेक लोक ज्ञानी, शास्त्री पंडीतांना घरी बोलावून गोडधोड, उत्तम भोजन देतात. दानधर्म करतात. अशा ज्ञानी लोकांमुळेच समाजाचे पाऊल पुढे पडते. आपण जे शक्य असेल ते दान द्यायचे. पाण्याने भरलेला कुंभ द्यायचा. अशा या दानाची अक्षय म्हणजेच अखंड आठवण रहाते असे मानले जाते. दान करणाऱ्यास सुखसमृद्धी लाभते अशी आपली परंपरा आहे.


       अक्षयतृतीयेला वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. या दिवशी आपणास जे शक्य आहे असे एखादे पुण्यकर्म करावे. समाजातील गोरगरीब, पददलित, उपेक्षित यांना मदत करण्याची प्रेरणा देणारा हा सण आहे. त्यामुळे समता निर्माण होऊन बंधुभाव आणि ऐक्य वाढण्यास मदत होते.


       अक्षयतृतीयेच्या दिवशी अनाथ विद्यार्थ्यांना मदत केली जाते. अन्नदान, वस्त्रदान केले जाते. सुवासिनी इष्ट मैत्रिणींना बोलावून, हळदीकुंकू व सौभाग्य अलंकाराची देवाण-घेवाण करतात. सौभाग्य दान म्हणून चूडे बांगड्या देतात. त्याबरोबर थंडपेये देऊन संतुष्ट करतात अक्षयतृतीयेला केलेले दान, सत्कृत्य अखंड टिकणारे असते म्हणून दान द्या. सत्कार्य करा. 


सर्वांना अक्षयतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..।


बुधवार, १२ मे, २०२१

इस्लाम मधील स्वावलंबनाची शिकवण व बंधुभाव - मराठी लेख


इस्लाम मधील स्वावलंबनाची शिकवण व बंधुभाव

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


       मक्कावासीयांच्या द्वेष व अत्याचाराला कंटाळून जेव्हा प्रेषित हजरत मुहम्मद साहेबांनी स्वदेश त्याग केला आणि अंदाजे ४५० कि.मी. उत्तरेकडे प्रवास करून मदिना शहरी स्थायिक झाले, तेंव्हा त्यांचे अनेक नातलग, अनुयायी व सोबती देखील त्यांच्या पाठोपाठ हिज्जत (स्थलांतर) करून मदिनेत दाखल झाले. ते पूर्णत: लुटले गेले होते. शरीरावर असलेले वस्त्र, एवढीच त्यांची मालमत्ता होती. परंतु यापैकी एकालाही पैगंबरसाहेबांनी भीक मागू दिली नाही. त्यांनी मदिनेत मुआखतीची (बंधुसंघाची) स्थापना केली. कांहीनी तर आलेल्या दिवशीच कामासाठी बाजारपेठ गाठली, कांहीनी दुसऱ्या दिवशी जंगलाची वाट धरली, आणि जळाऊ लाकडे तोडून बाजारात विकायला लागले. कांहीनी मोलमजुरीची कामे पत्करली आणि पाहता पाहता मदिना शहर हे एक स्वावलंबी समाज असलेले शहर म्हणून परिसरात प्रसिध्द झाले.


       मदिनावासियांनी मक्केतून आलेल्यांना आश्रय दिला. पण दोघांनीही एकमेकांच्या हक्कांवर अतिक्रमण केले नाही. मक्कावासी नेहमी मदिनावासियांचे उपकार मानत राहिले, मदिनावासियांनी कधीही आपल्या उपकाराची जाहिरातबाजी केली नाही. पैगंबर साहेबांच्या शिक्षण आणि प्रबोधन कार्यामुळे एका आत्मनिर्भर आणि आदर्श समाजाची निर्मिती झाली. मदिनावासियांचे सर्वात मोठे संरक्षक त्यांचे शेजारी होते आणि हे शेजारी एकाच धर्माचे नसून विविध धर्मीय होते. पैगंबर साहेबांनी दाखविलेल्या स्वावलंबनाच्या वाटेवरील आपण वाटसरू बनू या.


मंगळवार, ११ मे, २०२१

स्त्री सन्मान आणि इस्लाम - मराठी लेख


स्त्री सन्मान आणि इस्लाम

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       बरीरह नावाची एक महिला हजरत मुहम्मद (स.) यांच्या धर्मपत्नी हजरत आएशा यांची सेविका होती. तिला हजरत आएशा यांनी मुक्त केले होते. त्या महिलेचा विवाह मुगीस नावाच्या व्यक्तीशी (ज्यांना त्या पसंत करत नव्हत्या) झाला. कांही दिवसांनी त्यांचा हा विवाह संपुष्टात आला. त्यांचे पती त्यांच्याबरोबर पुनर्विवाह करण्याचा आग्रह करत होते. त्यांच्यामागे अक्षरश: रडत फिरायचे. एकदा ते आपली मागणी घेऊन हजरत प्रेषितांजवळ गेले आणि बरीरहने त्यांच्याशी पुनर्विवाह करावा, अशी शिफारस करण्यास भाग पाडले. पैगंबर साहेबांनी बरीरह यांना त्यांच्या पतीची इच्छा सांगितली. बरीरहने विचारले, "या रसूलिल्लाह (स.) हा आपला सल्ला आहे की आदेश?" प्रेषितसाहेब म्हणाले, "हा आदेश नसून केवळ सल्ला आहे". याचा अर्थ असा की, हा जर आदेश असता तर आज्ञापालन करणे भाग पडले असते म्हणून प्रेषित साहेबांनी केवळ सल्ला दिला. बरीरह म्हणाल्या, "मग तर मी त्यांच्याशी विवाह करू इच्छित नाही"..


       पैगंबर साहेबांनी त्यांचा आदर राखला. तिला आग्रह केला नाही. एका महिलेच्या इच्छेला प्राधान्य दिले. आजही मुस्लिम समाजात जमाअतीने (समाजाने) मान्यता दिलेल्या रजिस्टरवर महिलेची सही घेतल्याशिवाय तिचा निकाह होत नाही. स्त्री व पुरुष दोघांच्या संमती दर्शक सह्या घेऊनच विवाहविधी पार पडतो.


सोमवार, १० मे, २०२१

इच्छापूर्ती करणारी रात्र: शबे कद्र - विशेष मराठी लेख


इच्छापूर्ती करणारी रात्र: शबे कद्र

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       अल्लाह आपल्या भक्तांवर अत्यंत दयाळू, कृपाळू आणि मेहेरबान असतो. अल्लाहने मानवी समाजाला रमजानच्या महिन्यात एक पवित्र भेट म्हणून एक रात्र दिली आहे. रमजानमधील २६ व्या रोजाच्या दिवशी ही रात्र असते. या रात्रीला शबे कद्र म्हणतात. या रात्री केलेली प्रार्थना आणि उपासना एक हजार महिन्यांपेक्षा जास्त पुण्य मिळवून देणारी आहे. या पवित्र रात्रीचा उल्लेख पवित्र कुरआनच्या तिसऱ्या खंडात सूरह (अध्याय) अल्कद्रमध्ये आहे. ज्यात म्हटले जात आहे की, तुम्हाला काय माहित की लैलतुल कद्र काय आहे? लैलतुल कद्र हजार महिन्यांपेक्षा बेहतर रात्र आहे.


       या रात्री शांतपणे जागरण करून केल्या जाणाऱ्या सर्व प्रार्थना, नमाज, दुआ, जप (जिक्र तसवी) कुरआन पठन आणि याच प्रकारच्या सर्व उपासनांचा मोबदला हजार पटीने देण्यात येतो.


       या रात्री इशाची (रात्रीची) नमाज व तरावीह (रमजान महिन्यातील विशेष प्रार्थना) झाल्यानंतर सर्व मुस्लिम बांधव कुरआन पठण करतात. अल्लाहजवळ दुआ मागतात. या रात्री खास हाफिजींना निमंत्रित करून बयानचे (प्रवचनाचे) आयोजन केले जाते. स्त्रियाही एकत्र येवून नमाजपठण व कुरआन पठन करतात. आपल्या परिवारासाठी अल्लाहकडे दुआ मागतात.  शबे कद्र ची रात्र आपणा सर्वांना फलदायी ठरो.


शनिवार, ८ मे, २०२१

कर्मवीर भाऊराव पाटील: एक अस्मिता - विशेष लेख


       ९ मे हा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुण्यदिन त्यानिमित्त त्यांच्या महान शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकणारा हा   विशेष लेख..

कर्मवीर भाऊराव पाटील: एक अस्मिता

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या केवळ स्मरणानेच आज लाखो सुशिक्षितांच्या तनामनात प्रेरणेचा, कृतज्ञतेचा दीप प्रज्वलित होतो. कर्मवीर हे केवळ नांव नव्हते ते एक युग होते.

परिचय:
       महाराष्ट्रातील या महान समाजसेवकांनी त्यांचे शिक्षण संपल्यावर ओगले व किर्लोस्कर या कारखान्यांचे विक्रेते म्हणून काम केले. हे काम फिरतीचे असल्यामुळे या निमित्ताने त्यांचा संपूर्ण भारतभर प्रवास झाला. या भारत भ्रमणात त्यांना एक गोष्ट समजली की विचार, उच्चार व आचार यांचे उगमस्थान म्हणजेच शिक्षण होय. शिक्षण म्हणजे जनजागृती. जनजागृती म्हणजे समाजक्रांती आणि समाजक्रांतीमधूनच नवसमाजनिर्मिती हे सूत्र त्यांनी मनाशी पक्के केले.

शैक्षणिक कार्याचा आरंभ:
       १९११ साली तत्कालीन सातारा आणि सद्याच्या सांगली जिल्ह्यातील दुधगांव या गावी त्यांनी एक शिक्षणसंस्था स्थापून आपल्या शैक्षणिक कार्याचा आरंभ केला. १९१९ मध्ये सातारा येथे त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. तिथून पुढे शैक्षणिक प्रचारासाठी त्यांनी व्याख्याने दिली. १९४७ मध्ये त्यांनी सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय सुरु केले. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शिक्षण सुविधा मोफत देणाऱ्या या महाविद्यालयावर मोठे आर्थिक संकट आले. काही कारणामुळे महाविद्यालयाचे शासकीय अनुदान मिळणेही बंद झाले. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शैक्षणिक कार्याचा वसा घेतलेल्या या समाजसेवकांनी पदयात्रा काढली व देणग्या गोळा करण्यास सुरुवात केली. अगदी गिरणी कामगारांकडून देखील त्यांनी एक-एक रूपया गोळा केला.

भाऊरावांचे बाणेदार उत्तर:
       हे भले गृहस्थ देणगी मिळविण्यासाठी वणवण करत आहेत, ही बातमी खानदेशातील एका धनाढ्य मनुष्याला समजली. त्यांनी भाऊरावांना निरोप पाठविला की, 'असा एक-एक रूपया गोळा करण्यापेक्षा मी स्वतः एकरकमी कांही लाख रूपये देतो. फक्त त्या महाविद्यालयाला माझ्या वडीलांचे नांव द्या'. हा निरोप मिळताच भाऊरावांनी त्वरित उत्तर पाठविले, 'एक वेळ मी माझ्या बापाचे नांव बदलीन, पण पैशाच्या लोभाने छत्रपती शिवरायांचे नांव मुळीच बदलणार नाही'.

कर्मवीरांच्या उतुंग कार्याचा काव्यमय आढावा...
       अक्षय परिश्रम, अपार जिद्द, अतूट सत्यनिष्ठा, अभंग ताठपणा यांनी बनलेलं एक तेजस्वी संयुग होते कर्मवीर आण्णा.

       या तेजस्वीतेच्या उदरी होती एक प्रखरता..... जी अज्ञानाच्या अंधकाराला जाळून पोळून टाकत निघाली होती ज्ञानियाच्या तेजाकडे.

       त्यांच्या ठिकाणी होते घणाघाती प्रहार, जे जाती व धर्मभेदाच्या पाषाणांना भेदून तयार करत होते... समानतेचे, स्वतंत्रतेचे एक सुंदर शिल्प.

       कर्मवीर एक अस्मिता, जिनं माणसाला माणूस म्हणून जगायला  शिकवलं.

       या तेजस्वीतेच्या पोटी होती तेवढीच अथांग माया, मायेनं वत्सलतेला डोळस रुप दिलं, चेतना दिली नि हळूच फुंकला त्यात तेजोमय जीव.

       ही तेजोमय ज्योत तुझ्या माझ्यासाठी देखील आहे. या प्रकाशाने तुझं-माझं, प्रत्येकाचं  जीवन उजळण्याचा हक्क आहे हा दिलासा दिला कर्मवीरांनी.

       तो काळ होता उच्च वर्णियांच्या हक्कदारीचा, रूढीप्रिय समाजव्यवस्थेत प्रत्येकाच्या कार्याच्या चतुःसीमा ठरल्या होत्या. हजारो वर्षाच्या सवयीनं बेड्या, बेड्याही वाटत नव्हत्या. आपल्याचं शरीराचं, मनाचं एक अंग वाटत होत्या. मनं मृतप्राय होतात ती अशानच. पण कर्मवीरांनी ती मनं तळापासून हलवून सोडली, अंतःप्रेरणेनं जिवंत केली.

       श्रमाला विद्येची, विद्येला श्रमाची जोड देवून घडवली नवीन मनं.

       कर्मवीरांनी गीतेतील कर्मयोग कधी वाचला नसेल, पण ते जगले तो कर्मयोगच.

       ही यशोगाथा गायली जातेय आज घराघरातून, ज्यांनी हाती धरलं पुस्तक आणि वाचली देवाची अक्षरं, ही अक्षरे त्यांच्यासाठी घेऊन आली नवं गान, नवा प्राण
पण ठेवायला हवंय  खरंखुरं भान ।

आपण सर्वांनी काय करायला हवं ?
       फक्त पुतळे उभारून, गुणगान करून कर्मवीर आण्णांचे स्मरण न करता त्यांनी लावलेल्या वटवृक्षाचे संगोपन, जतन केले पाहिजे. शिक्षणाला श्रमाची जोड द्यायला हवी.

       आजचा शिक्षित श्रमाला कमी लेखू लागला आहे. श्रमदेवतेचं आणि विद्यादेवतेचं सहचर्य किती भाग्याचं असतं हे अनुभवायला हवे.

       श्रमामुळे येणाऱ्या घामाने डबडबलेले शरीर हाच सर्वोच्च अलंकार आहे. निकोप मनाची आणि निरोगी शरीराची माणसेच सामाजिक स्वास्थ्य टिकवू शकतील. श्रमाने बुद्धीला धार चढते. घामाने बुद्धीला तेज येते ही कर्मवीरांची शिकवण अंगीकारण्याचा प्रयत्न करायला हवा. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. प्रत्येक खेड्यात शाळा असली पाहिजे, प्रत्येक नांगरामागे एक पदवीधर मनुष्य उभा राहिला पाहिजे असे स्वप्न बाळगणाऱ्या या थोर समाजसेवकांस ही भावसुमनांली....।

खलिफा हजरत उमर यांचा योग्य न्याय - विशेष मराठी लेख


खलिफा हजरत उमर यांचा योग्य न्याय

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       आदर्श खलिफा हजरत उमरच्या शासनकाळात एका व्यक्तीने आपली जमीन दुसऱ्याला घर बांधण्याकरीता विकली. पाया खणत असताना जमीन विकत घेणाऱ्याला तेथे सोन्याच्या नाण्याने भरलेले एक भांडे सापडले. तो जमीन मालकाकडे आला आणि म्हणाला, "ही तुमची संपत्ती आहे, याचा स्विकार करा. जमीन मालक म्हणाला, "मी जमीन तुम्हाला विकली आहे. त्याच्या पाताळापासून आकाशापर्यंत जे कांही आहे आता तुमचे". ग्राहक गृहस्थ त्यांना म्हणाले, "मी तुमच्याकडून फक्त जमीन खरेदी केली, त्यातील सोनं नाही". दोघांमधील वाद वाढला आणि निवाड्याकरीता दोघेही खलिफाकडे गेले. त्या दोघांची बाजू ऐकून खलिफा म्हणाले, "तुम्ही दोघेही बरोबर आहात... मला एक सांगा, तुम्हाला मुलंबाळ वगैरे आहेत कां ?" एक म्हणाला, "मला एक कन्या आहे" दुसरा म्हणाला, "मला एक पुत्र आहे". खलीफानी आदेश दिला की, दोघांचे एकमेकांशी लग्न करून टाका आणि सापडलेली संपत्ती दोघांत वाटून टाका.


       धन्य तो जमीनदार आणि त्याची जमीन घेणारा तो गृहस्थ. आज जिथे-तिथे लुबाडणूक सुरू आहे. माझे ते माझेच, दुसऱ्याचेही माझेच असे सर्वसाधारण चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मला संपत्ती नको म्हणणारे ते महनीय गृहस्थ निःस्वार्थी होते. त्यांच्यातील थोडीतरी निस्पृहता आपल्यात आणण्याचा प्रयत्न करू या.


शुक्रवार, ७ मे, २०२१

पवित्र कुरआन: मानवाचे प्रेरणास्थान - विशेष मराठी लेख


पवित्र कुरआन : मानवाचे प्रेरणास्थान

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

        कुरआन मानवांना पुरेपूर मार्गदर्शन करणारा, सत्य व असत्य वेगवेगळे करून दाखविणारा ग्रंथ आहे. (अल्कबरा-२:१८५) कुरआन हा ग्रंथ संबंध जगवासीयांसाठी सार्वत्रिक आदेश आहे. (अलअनआम ६:९०) जे लोक सत्याच्या शोधासाठी आणि मानसिक व आत्मिक शांतीसाठी सतत हैराण होत असतात, पवित्र कुरआन त्यांच्या शोध प्रवासाचे अंतिम चरण आहे. वाचकांने विश्वास व श्रध्दाभावाने त्याचे अध्ययन केले पाहिजे, कारण कुरआन ही अल्लाहची पवित्र वाणी आहे. अत्यंत कल्याणकारी व समृध्दी प्रदान करणारा ग्रंथ आहे. तसेच पूर्वीच्या ईशग्रंथातील सत्यताही प्रमाणित करणारा ग्रंथ आहे (अल्अनआम ६:९२)


       मानवाला अनेक रोगांचा संसर्ग होणे शक्य आहे. शारिरीक रोगांपेक्षा मानसिक, नैतिक आणि आत्मिक आजार अधिक धोकादायक असतात. मनःस्थिती तसेच मन:शांती व मन:शक्तीचे पवित्र कुरआन प्रेरणास्थान आहे. 'कुरआन मनाला बळकटी देणारा, सत्यज्ञान प्रदान करणारा आणि श्रध्दावंतासाठी उपदेश देणारा ग्रंथ आहे' (हूद ११-१२०) या संदर्भातच म्हटले जात आहे. 'श्रध्दावंतासाठी रोगनिवारक आणि कृपा आहे. (बनीइस्त्राईल १७:८२) कुरआन अरबी भाषेत उतरला आहे. त्यात लोकांना वक्र चालीपासून दूर ठेवण्यासाठी व त्यांना शुध्दीवर आणण्यासाठी विविध प्रकारे आदेश देण्यात आले आहेत.


बुधवार, ५ मे, २०२१

राजर्षि छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य - विशेष मराठी लेख


६ मे हा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीचा दिवस, त्यानिमित्त त्यांच्या आभाळाएवढ्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेणारा हा खास लेख.....

राजर्षि  छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य - विशेष मराठी लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


राजर्षि तू राजा प्रेमळ , निधडा दिलदार ।
मराठगडी तू नेता आमुचा प्रणाम शतवार ।

मान आमुचा शान आमुची, तू दैवत आमचे ।
तुझ्या प्रतापे मोला चढले, हे जीवन आमचे ।


       पायी गती, हाती शक्ती व ह्रदयी मानवाची उन्नती हा ध्येयवाद स्विकारून भारताच्या इतिहासात अजरामर झालेल्या राजर्षि शाहू महाराजांनी शिक्षण क्षेत्रात सामाजिक क्रांतीचे बीजारोपण केले. समाजात पडलेली दरी, पराकोटीची हीन अवस्था दूर करण्यासाठी शिक्षणाशिवाय तरूणोपाय नाही हे त्यांनी ओळखले. महात्मा फुले यांचा वारसा त्यांनी मोठ्या ताकतीने पुढे चालविला. देशाची सर्वांगिण उन्नती करावयाची असेल तर सर्वांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले पाहिजे ही महाराजांची भूमिका होती. १९१७ साली महाराजांनी प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. यासाठी एक लाख रुपये खर्च करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. त्यापैकी ऐंशी हजार रूपये दरबार खजिन्यातून व वीस हजार रुपये देवस्थान फंडातून खर्च करण्यात आले. देवस्थानचा पैसा प्राथमिक शिक्षणाकडे वळविणारे शाहू महाराज हे देशातील क्रांतिकारक राजपुरूष होते. पंढरपूर येथील अन्नछत्रासाठी कोल्हापूरच्या दरबारातून दरमहा एकशे बारा रूपये आठ आणे जात असत. महाराजांनी ते अन्नछत्राऐवजी 'मराठा विद्याप्रसारक समाज'  या संस्थेला देण्याचा निर्णय ऑक्टोबर १९२० च्या आदेशान्वये घेतला. अन्नदानापेक्षा विद्यादान श्रेष्ठ आहे, अशी शाहू राजांची धारणा होती. ज्ञानसंपन्न माणूस अन्नासाठी वणवण भटकणार नाही, हे महाराजांचे मत होते.

       प्राथमिक शिक्षण सक्तीचे केल्यानंतर जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविणार नाहीत त्यांना दर महिना प्रत्येकी एक रुपया दंड करण्याचा निर्णय महाराजांनी घेतला. यातून महाराजांना शिक्षणाच्या प्रसाराची किती तळमळ होती हे लक्षात येते. ज्यावेळी ते आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षणावर एक लाख रुपये खर्च करीत, त्यावेळी इंग्रज सरकारचा सिंध, गुजरात, मुंबई, कर्नाटक या सर्व प्रांताच्या शिक्षणावरील खर्च एक लाख रूपये होता. महाराजांनी अभ्यासक्रम तयार करण्यापासून ते शिक्षकांना प्रशिक्षण देणे, शाळा तपासणे याचीसुद्धा व्यवस्था केली. गावपाटलांना नियमितपणे शाळा तपासून तसा अहवाल पाठविण्याची योजना त्यांनी केली. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आपला राजवाडाच खुला केला. त्यामुळे बहुजन व दलित समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली झाली आहेत.

       राजर्षिंनी सर्व जातीधर्माच्या वसतिगृहांची एकत्र उभारणी करून राष्ट्रीय एकतेचा, समतेचा मंत्र खऱ्या अर्थाने जनतेला दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षणाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचण येवू नये म्हणून त्यांनी अनेक अभिनव प्रयोग केले. १८९६ मध्ये कोल्हापुरात एका वसतिगृहाची स्थापना करण्यात आली. पण ब्राह्मण नि अब्राम्हण विद्यार्थी तिथे एकत्र रहाणे मोठे कठीण जाऊ लागले. त्यामुळे आणखी एक प्रबळ कल्पना त्यांना सुचली. तो त्यांनी माता भवानीचा आदेशच मानला.

       वसतिगृह स्थापना हा एक नवीनच उपक्रम होता. मुंबई इलाख्यातच नाही तर संपूर्ण भारतातही विद्यार्थ्यांसाठी विविध जातीधर्माची वसतिगृहे नव्हती. आपले सल्लागार न्यायमूर्ती रानडे, गो. कृष्ण गोखले, गंगाराम म्हस्के यांच्याशी त्यांनी विचारविनिमय केला आणि १८ एप्रिल १९०१ रोजी मराठा वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. महाराजांनी त्या काळचे चार हजार रुपये देणगी म्हणून दिले.

       जातीपातींचे निर्मूलन हे त्या काळी अवघड होते. शिक्षणाचा प्रसार तर झालाच पाहिजे म्हणून अन्य जमातीसाठी वसतिगृहे उभारण्याचे ठरले. नाव जरी मराठा वसतिगृह असले तरीही अन्य जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. १९०१ मध्ये दिगंबर जैन वसतिगृह स्थापन करण्यात आले. महाराजांनी त्याला देणग्या दिल्या पण कांही मराठ्यांनी विरोध केला. तेंव्हा महाराजांनी त्यांना खडसावले, "मी केवळ मराठ्यांचा राजा नाही. मी साऱ्यांचा राजा आहे". १९०८-१९०९ मध्ये जैन  वसतिगृहाने खास मुलींसाठी एक वसतिगृह उघडले व त्याला नांव दिले श्राविकाश्रम. त्यावेळी त्यात सोळा विद्यार्थिनी होत्या.

       आणखी एक विशेष म्हणजे त्यांनी चित्रकलेच्या खास अभ्यासासाठी दोन जैन विद्यार्थ्यांना इटलीला पाठविले. मुस्लिम समाज अक्षरशत्रू, आर्थिकदृष्टया मागासलेला व प्रतिगामी होता. तेंव्हा महाराजांनी १५ नोव्हेंबर १९०६ रोजी 'किंग एडवर्ड महामेडन एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना करून तिच्या वतीने वसतिगृह सुरु केले. १९०७ मध्ये लिंगायत वसतिगृह सुरू केले. महाराजांनी सगळ्याच वसतिगृहांना उदार देणग्या दिल्या. 

महाराजांनी हाती घेतलेला एक क्रांतिकारक प्रकल्प:
       खऱ्याखुऱ्या पददलित, विद्येच्या वाऱ्यालाही वंचित व उपेक्षित अशा अस्पृश्य मानलेल्या जातीत विद्याप्रसार करणारी एक संस्था स्थापन करून १४ एप्रिल १९०८ रोजी अस्पृश्यासाठीचे वसतिगृह स्थापन केले. वंचितामध्ये शिक्षण घेण्याची लाट उसळली. त्यानंतर सोनार समाज, शिंपी समाज, पांचाळ, सारस्वत, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, वैश्य समाज यांचीही वसतिगृहे चालू झाली. ख्रिस्ती समाजासाठी वसतिगृह स्थापन झाले. म्हणूनच राजर्षिंच्या करवीर नगरीला वसतिगृहांची जननी, वसतिगृहांची सुवर्णभूमी म्हणतात.

राजर्षि शाहू महाराजांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतांना एका कवीने म्हटले आहे.

दिव्यत्वाची जेथे प्रचिती, 
तेथे कर माझे जुळती।

अश्रूंचा हा बांध फुटूनी,
ह्रदय येते आज भरूनी।

जाणार इतक्या लवकर, नव्हते जाणिले कुणी ।
साश्रू नयनांनी असे वाटते, तुम्ही यावे परतुनी।

निजदेहाचे झिजवून चंदन ।
 तुम्ही वेचिलाइथे कण कण ।

आणि फुलविले हसरे नंदन ।
स्मृतीस तुमच्या शतशः वंदन ।

'पवित्र कुरआन' चे अवतरण - विशेष मराठी लेख


'पवित्र कुरआन' चे अवतरण

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       रमजान महिन्याला कुरआनचा महिनाही म्हणतात, कारण या महिन्यातच कुरआनचे आकाशातून  पृथ्वीतलावर अवतरण झाले. या महिन्यातच पैगंबरसाहेब जास्तीत जास्त या ग्रंथाचे पठण करायचे आणि तसे करण्याचे आदेशही आपल्या सिहबींना (सोबत्यांना) द्यायचे. रमजानच्या महिन्यातच ईश्वराचे सर्वात प्रतिष्ठित दूत हजरत जिब्राईल अलैहिस्सलाम प्रेषित साहेबांच्या सेवेत येऊन त्यांनी मुखोद्गत केलेला कुरआन ऐकून घ्यायचे. प्रेषित साहेबांच्या जीवनातील अंतिम रमजानच्या महिन्यात याच ईशदूताने त्यांच्याकडून दोनदा कुरआन ऐकून घेतले. तसेच पैगंबर साहेबांनी आपल्या सर्व सोबतियांकडून त्यांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथाची सुनावणी करवून घेतली. त्यामुळे सर्व मसुदे आणि लोकांकडे उपलब्ध प्रती दोषमुक्त झाल्या. त्याच मसुद्यावरून इस्लामचे तिसरे सन्मार्गी खलिफा हजरत उस्मान (र.) यांनी सात प्रती एक तज्ज्ञ मंडळ नेमून त्यांच्या देखरेखीखाली तयार करून घेतल्या. आजही त्यापैकी पाच प्रती जगातील पाच मुस्लिमेतर राष्ट्रामधून उपलब्ध आहेत.


       रमजानच्या महिन्यात प्रत्येक मशिदीतून रात्रीच्या ईशाच्या नमाजनंतर एक ते दीड तास 'तरावीह' ची जादा नमाज पढली जाते. त्या नमाजमध्ये पवित्र कुरआनचे तीस खंड सत्तावीस दिवसात संपूर्णपणे नमाजी ऐकतात.


मंगळवार, ४ मे, २०२१

इस्लाम मधील औदार्य व सहिष्णुता - विशेष मराठी लेख


इस्लाम मधील औदार्य व सहिष्णुता

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       इसवी सन ६३० मध्ये मुहम्मद पैगंबर यांनी मक्का शहरावर विजय मिळविला. मक्केवर सत्ता म्हणजे सर्व अरब प्रदेशावर सत्ता काबीज करण्यासारखे होते.


       त्यापूर्वी मक्कावासीयांनी पैगंबर हजरत मुहम्मद (स.) यांना व त्यांच्या अनुयायांना खूप छळले होते. अनेकांची विनाकारण हत्या केली होती. ज्यावेळी प्रेषित साहेबांनी मक्केत प्रवेश केला, तेव्हा सर्वप्रथम घोषणा केली की, जे कोणी पवित्र काबागृहात प्रवेश करेल तो सुरक्षित आहे. पुढे अशी घोषणा केली की, इस्लामचे कट्टर विरोधी अबू सुफियान यांच्या घरात जो कोणी प्रवेश करेल तोसुध्दा सुरक्षित आहे. त्या ठिकाणी पैगंबर साहेबांनी 'आम मुआफी' म्हणजे सर्वांना क्षमा प्रदान करण्याची घोषणा केली. कुणाचाही सूड घेतला नाही. सार्वत्रिक माफीची घोषणा ऐकताच लोक अक्षरशः रडू लागले आणि कांही क्षणातच मक्केचा कायापालट झाला, कुठेही शिरच्छेदाचा ठोकळा अथवा फाशीचे स्तंभ लावले गेले नाहीत. अबू सुफियान सारख्या विरोधी सरदारानेही प्रेषित साहेबांच्याशी 'बैअत' (वचनबध्द) राहण्याची शपथ घेतली.


       प्रेषित साहेबांच्या या कर्तृत्वामुळे जगाच्या इतिहासात एका नवीन अध्यायाचा प्रारंभ झाला. इस्लामी औदार्याचे हे उदाहरण प्रलयापर्यंत संपूर्ण मानवजातीला एक मार्गदर्शक पर्वाच्या रूपाने अभ्यासण्यासारखे आहे. मुहम्मद पैगंबरांनी शत्रूवरही प्रेम करायला शिकवलं आहे. मुस्लिम समाजात औदार्य व सहिष्णुता निर्माण होण्याची अशी अनेक उगमस्थाने आहेत.


सोमवार, ३ मे, २०२१

इस्लाम' मधील शूचिर्भूतता - विशेष मराठी लेख


'इस्लाम' मधील शूचिर्भूतता

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       इस्लामी धर्मशास्त्राप्रमाणे जेंव्हा स्नान (गुस्ल) आणि वजूह म्हणजेच धर्मशास्त्राप्रमाणे तोंड-हात-पाय धुण्याची गरज असते, तेंव्हा माणसाने टाळाटाळ करू नये. शूचिर्भूत झाल्याने माणसात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो व त्या व्यक्तिस ईश्वर संरक्षणाचे कवच लाभते.


       इस्लामी शरीअतप्रमाणे अस्वच्छ कपडे परिधान करून कुठलीही इबादत (प्रार्थना) आपण करू शकत नाही आणि केल्याने अल्लाहच्या दरबारात त्यांना स्वीकृती लाभणार नाही. इस्लाम धर्मात शारिरीक पवित्रतेला खूप महत्व आहे. शरीर शुध्द असेल तर मनही शुध्द राहते, आत्मा शुध्द राहतो. शरीर शुध्द नसल्याने कांही विकार होणे अगदी नैसर्गिक आहे. त्या शारिरीक विकारांचा मनावर परिणाम होतो. मनाचे आरोग्य बिघडले की, आत्मा विचलित होतो. आत्मा बैचेन झाला की माणसाला झपाटल्यासारखे वाटते आणि तो नको त्या उपायांच्या शोधात हिंडत राहतो. म्हणून सफाई आणि पावित्र्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सफाई केवळ शरीराला शुध्द करू शकते; परंतु पवित्रता मात्र आत्म्याच्या आरोग्याचा एक अत्यावश्यक असा गुण आहे, ज्याला पर्याय नाही. पावित्र्य एक अदृश्य शक्ती आहे. त्यामुळे माणसाला ईश्वराचे सामीप्य प्राप्त होते. पवित्रता माणसाच्या शारिरीक, मानसिक व आत्मिक शक्तीच्या संरक्षणासाठी सदैव तयार असते. अपवित्र मनुष्य ईश्वरी देणग्यांच्या निकट जावू शकत नाही.


रविवार, २ मे, २०२१

रोजा इफ्तार: सामुदायिक भोजनाचा सोहळा - विशेष मराठी लेख

 

रोजा इफ्तार: सामुदायिक भोजनाचा सोहळा

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       माळवाडी ता. मिरज जि. सांगली माझं माहेर. या छोट्याशा गावात रमजान महिन्यात रोजा इफ्तारच्या सामुदायिक भोजनाचा एक वेगळा आनंददायी सोहळा अनुभवायला मिळतो.


       या गावामध्ये मुस्लिम समाजाची २० कुटूंबे राहतात. रमजान सुरु झाला की प्रत्येक दिवशी यापैकी एका कुटूंबाच्या घरी रोजा इफ्तारसाठी सामुदायिक भोजनाचा कार्यक्रम असतो. साधारणपणे १०० लोकांचा स्वयंपाक करायचा असतो पण हा स्वयंपाक करण्यासाठी कुणी आचारी वगैरे नसतो. मोहल्ल्यातील सर्व महिला दुपारपासून एकत्र येऊन स्वयंपाकाची तयारी करतात. बोलत-बोलत, हसत-खेळत स्वयंपाक करतात. कोण भाजी निवडते, कोण कांदा-टोमॅटो चिरते तर कोण मसाला बारीक करते. इकडे एक ग्रुप धान्य निवडत असतो, तर कोण चूल पेटवून फोडणी देण्याचे काम करत असतात. सर्वजणी सहभागी झाल्यामुळे कुणालाच जादा कामाचा ताण नसतो.


       मगरीबची नमाज झाल्यानंतर पहिल्यांदा बच्चे कंपनीची पंगत बसते, त्यानंतर रोजा असलेल्या सर्व महिला व पुरुषांची पंगत बसते. शेवटी उर्वरित सर्वांची पंगत बसते. मोहल्ल्यातील वृद्ध मंडळीना त्यांच्या जागेवर ताट पोहोचविले जाते. स्वयंपाक सुरु असतानाच महिला पुढच्या भोजनाचा बेत कुणाच्या घरी करायचा, मेनू कोणता ठेवायचा याविषयी चर्चा करून ठरवतात. भोजन करताना कुणी बनवलेला पदार्थ आज छान झालाय याची चर्चा होते, सुगरणींचे कौतुक होते. सध्याच्या धावपळीच्या, धक्काधक्कीच्या जमान्यात लोप पावत चाललेला बंधुभाव जतन करण्याचे कार्य करणारा हा सोहळा निश्चितच अनुकरणीय आहे.

 

असे सोहळे गावागावात, मोहल्ल्यात सुरु असतात. प्रातिनिधिक स्वरुपात माझ्या माहेरच्या सोहळ्याबद्दल लिहिले आहे.


शनिवार, १ मे, २०२१

महाराष्ट्र माझा - विशेष मराठी लेख


       आज १ मे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि मराठी भाषा बोलणाऱ्यांची छाती अभिमानाने भरून येण्याचा दिवस. महाराष्ट्र दिनानिमित्त हा विशेष लेख.


महाराष्ट्र माझा - विशेष मराठी लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: twitter.com

माझा महाराष्ट्र, माझी मराठी ।

महाराष्ट्रा तुला वंदितो ।

भवानीला आम्ही मानितो ।

दऱ्याखोऱ्यांचा तू ,

उंचसखल तू ।

कीर्ति  तुझी आम्ही गातो ।


       महाराष्ट्र राज्य म्हणजे मराठी भाषेच राज्य. हे राज्य व्हावे ही इथल्या जनता जनार्दनाची फार वर्षांपासून इच्छा होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच भाषावार प्रांतरचनेचे महत्त्व महात्मा गांधीजी पासून सर्वांनी आग्रहाने प्रतिपादित केले होते. पुढे राज्य पुनर्चनेचे महत्त्व  महात्मा गांधींच्या पासून सर्वांनी आग्रहाने प्रतिपादित केले होते. पुढे राज्य पुनर्रचनेतून निर्माण झालेल्या असंतोषातून महाराष्ट्राचे एकशे पाच हुतात्मे बळी पडले.


नकाशा पुढे पाहता भारताचा।

महाराष्ट्र आधी भरे लोचनी ।

अशी महाराष्ट्राची महती कवी यशवंतानी लिहिली आहे.


महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले ।

मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले ।

अशी अभिमानाची ग्वाही सेनापती बापट यांनी दिली आहे.


       या महाराष्ट्राच्या लेकरांनी मराठी भाषेची अनेकविध प्रकाराने सेवा तर केलीच, पण हिंदी भाषेचा आद्य पत्रकारही मूळचा महाराष्ट्रीय होता. गुजराती भाषेच्या व्याकरणाचे नियम करण्यात ज्याने फार मोठी कामगिरी बजावली तो विद्वान या मराठी भूमीचा पुत्र होता. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे गर्जून सांगणारे नरकेसरी लोकमान्य टिळक या भूमीतच जन्माला आले. देशाला समानतेचा मंत्र देणारे फुले, आंबेडकर या महाराष्ट्रातच निर्माण झाले. संगीतशास्त्राच्या क्षेत्रात आसेतु हिमाचल ज्यांची कारकीर्द गाजली, मौलिक स्वरूपाची ठरली, ते पलूसकर, भातखंडे इथलेच. बोलपटाची मुहूर्तमेढ रोवणारे दादासाहेब फाळके, मराठी चित्रपटातील पहिले राष्ट्रपती पदक मिळविण्याचा पराक्रम करणारे आचार्य अत्रे हे मराठी मातीत जन्मलेले मराठी मातीचेच सुपुत्र.


       महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन केले. महाराजांपूर्वी सुमारे साडेतीनशे वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. रयत त्रासलेली होती. अंधाधुंदी माजली होती. शिवरायांनी रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी झुंज देऊन जुलमी राजवटींचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आजही शिवरायांचे नाव घेतले की सर्वांना प्रेरणा व स्फूर्ती मिळते.


       महाराष्ट्रात चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ यांच्या सारखे अनेक थोर संतमहात्मे या भूमीत होऊन गेले. त्यांनी महाराष्ट्राला दया, परोपकार, त्याग, सेवा, समता, बंधुभावाची शिकवण दिली. या शिकवणीने महाराष्ट्राला समृद्ध केले आहे.


       महाराष्ट्रात समाजप्रबोधनाचे, समाजपरिवर्तनाचे व समाजजागृतीचे कार्य अनेक समाजसुधारकांनी केले आहे. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षि धोंडो केशव कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज, संत गाडगेबाबा, आचार्य विनोबा भावे, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिसिंह नाना पाटील, आण्णा भाऊ साठे, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, बाबा आमटे, हमीद दलवाई इत्यादि महान विभूतींची नावे घेता येतील. या सर्वांनी महाराष्ट्राचे  नांव उज्ज्वल केले आहे.


       क्रिकेटचा बादशहा सचिन तेंडुलकर महाराष्ट्रात जन्मला व जगात चमकला. गानकोकिळा लता  मंगेशकर यांनी महाराष्ट्रात जन्म घेतला आणि जगाचे कान तृप्त केले.


       देशाला प्रचलित काळानुसार धर्मशास्त्र समजावून सांगून धर्मसिंधूसारखा सर्वमान्य ग्रंथ लिहिणारे बाबा पाध्ये आपल्या पंढरपूरचे. किती नांवे सांगावीत? नाटक कंपनीबरोबर गावोगावी फिरून असंख्य हातांचे ठसे घेऊन त्रिरेखावेलाप्रबोध नावाचा लोकोत्तर ग्रंथ लिहिणारे ज. वा. जोशी इथलेच. केवळ मराठी तच नव्हे तर इंग्रजी, गुजरातीपासून हिब्रूपर्यंत विविध प्रकारचे टाईप तयार करणारे आद्य मुद्रक महर्षि जावजी दादाजी हे महाराष्ट्राचेच.


     अशा या थोर परंपरेने नटलेल्या महाराष्ट्राचे वर्णन करताना या काव्य पंक्ती म्हणाव्याशा वाटतात....

बहु असोत सुंदर संपन्न की महा ।

प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।


आदरणीय शाहिर कुंतीनाथ कर्के महाराष्ट्राची थोरवी गाताना म्हणतात...

या भारतात भाग्यवंत देश कोणता ।

देश महाराष्ट्र पुण्यशील भारता ।


या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी मनापासून प्रयत्न करू या.