डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी
फोटो: साभार गुगल
हमीदचाचा नियमितपणे सकाळी सकाळी वेळेवर मस्जिदमध्ये हजर असायचे. सकाळची नमाज झाल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी जायचे. पण हमीदचाचा तिथेच थांबायचे. मस्जिदचा परिसर मोठा होता. मस्जिदच्या सभोवताली चिंच, आंबा, डाळींब, लिंब अशी अनेक मोठी झाडे होती. मोगरा, गुलाब, शेवंती, चाफा अशी फुलझाडे होती. या सर्वांना पाणी घालणे, साफसफाई करणे, झाडांना अळे करणे हे त्यांचे नित्याचं काम होते. तासाभरात ही सर्व कामे संपवूनच ते घरी जायचे. एमएसईबीमध्ये वायरमन पदावर कार्यरत होते. आपली ड्युटी व्यवस्थितपणे सांभाळायचे. बायको-मुलांनाही हवं नको ते बघायचे. आपली पाच वेळची नमाज अजिबात चुकवायचे नाहीत.
संध्याकाळी मगरिबच्या नमाजाला आले की वयोवृध्द व्यक्तींना पायऱ्या चढून येण्यासाठी व उतरण्यासाठी मदत करायचे. लहान मुलांना कुरआन पठणाचे धडे द्यायचे. शिकण्यासाठी आलेल्या घर लांब असलेल्या मुलांना त्यांच्या घरी सायकल वरून पोहोचवायचे. मस्जिदमधला बल्ब गेल्या, वायरींग खराब झाले. फॅन नादुरूस्त झाला तर ताबडतोब दुरूस्त करतात. त्यांची कामातील ही तत्परता पाहून सगळे आश्चर्यचकीत होतात. विशेष म्हणजे या सर्व कामांसाठी ते एक रूपयाही मोबदला घेत नाहीत. स्थानिक लोकांना हे सर्व परिचीत होते.
एकदा काही दिवसासाठी मस्जिदमध्ये एक जमाअत आली. जमाअतमधील सलमान नावाचा तरूण हमीदचाचांचे हे काम पाहून खुष झाला. त्याने इतराजवळ त्यांच्याबाबत चौकशी केली. की चाचांना या सर्व कामाचा किती मोबदला मिळतो? लोकांनी सांगितले की, काहीही नाही. विनामोबदला तो हे सर्व करतो. सलमानच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणखीन वाढला न राहवून त्याने चाचांना विचारले. चाचा तुम्ही दररोज एवढं काम करता तेही मनापासून आणि हसत मुखाने विना मोबदला कसे जमते तुम्हाला.
हमीदचाचा अदबीनं म्हणाले, मला उदरनिर्वाहापुरता पगार मिळतो. अल्लाहाच्या कृपेने मी व माझे कुटूंबीय खाऊन पिऊन सुखी आहोत. पण मी जकात देवू शकत नाही. माझ्याकडे शिल्लक काही रहात नाही. त्यामुळे मी गोरगरीबांना मदतही करू शकत नाही. अल्लाहच्या कृपेने मला उत्तम आरोग्य लाभले आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेचे मी ही छोटी छोटी कामे करून जकात दिल्याचा, दुसऱ्याला थोडीफार मदत केल्याचा आत्मिक आनंद मिळवतो. हमीदचाचांचा सरळ स्वभाव व सेवाभाव पाहून सलमान अवाक् झाला. आपणही त्यांचा सेवाभाव घेऊ या.