'सुगी' हा शब्द बळीराजाच्या दृष्टीने खूपच जिव्हाळ्याचा आहे कारण पावसाच्या धारा, उन्हाळाच्या झळा व थंडीची बंडी अंगावर झेलत त्याने धरणीमातेकडे 'दान' मागितलेले असते. तिच्या पदरी पसाभर बियाणं देवून तिच्याकडून खंडीने घेण्याचे हेच ते दिवस असतात. याच काळात कष्टाला आलेली गोड फळे चाखायला मिळतात. मी किसानकन्या असल्याने भुईमुगाच्या शेंगाची सुगी मला फार आवडायची. ही सुगी हमखास दिवाळीच्या सुट्टीत यायची. आमच्या स्वतःच्या थोड्याश्या शेतातील शेंगा तोडायला आम्ही सर्व भावंडे जायचोच व उरलेल्या दिवसात दुसऱ्याच्या शेतातही शेंगा तोडायला हजेरी लावायचो. संध्याकाळी तोडलेल्या शेंगांची वाटणी व्हायची. तोडलेल्या शेंगांचा पंचविसावा किंवा विसावा भाग मिळायचा. वाटणीला आलेल्या शेंगा घेऊन घरी येताना फार आनंद व्हायचा. सकाळी थंडी, दुपारचे ऊन, केलेले कष्ट विसरुन जायचो. त्याकाळी दुकानात किंवा व्यापाऱ्यांकडून या ओल्या शेंगा विकत घेतल्या जायच्या. त्याबदल्यात चार पैसे मिळायचे. ते पैसे साठवून कवठेपिरानच्या यात्रेत केसांना रिबिनी, कानात डूल, गळ्यात मोतीहार घेण्याची संधी मिळायची आणि ती आमच्या दृष्टीने पर्वणी असायची.
सन १९७१ साली मी जिल्हा परिषदेच्या मराठी मुलींच्या शाळेतून सातवी पासून कन्या विद्यालय दुधगांव या हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात दाखल झाले होते. हायस्कूलला जाताना दररोज युनिफॉर्म असायचा पण दर गुरुवारी विदाऊट युनिफॉर्मचा असायचा. बुधवारी सायंकाळी पी. टी. चे शिक्षक जेंव्हा सांगायचे 'कल आप सब विदाऊट युनिफॉर्म आ सकते हो' तेंव्हा माझ्या सर्व मैत्रिणींना फार आनंद व्हायचा. त्या टाळ्या वाजवायच्या. पण मला तो गुरुवारचा विदाऊटचा दिवस अजिबात आवडायचा नाही. तो दिवस येवूच नये असे वाटायचे याचे कारण असे की त्या दिवशी सर्व मैत्रिणी नटूनथटून, नवनवे कपडे घालून यायच्या. त्यांनी घातलेले छान छान ड्रेस, नेसलेल्या सुंदर किंमती साड्या पाहून लाजल्यासारखे व्हायचे. युनिफॉर्म सोडून माझ्याकडे एखादाच जुना झालेला ड्रेस असायचा. प्रत्येक गुरुवारी तोच ड्रेस किंवा युनिफॉर्मच घालणे भाग पडायचे. माझी मोठी बहीण माहेरी आली की मला खूप आनंद व्हायचा. तिच्याकडे असलेली एकुलती एक नवी साडी एखाद्या दिवशी नेसायला मिळायची.
त्यावर्षी दिवाळीची सुट्टी लागली. वडिलांनी घरात पुरतील एवढ्याच शेंगा शेतात केल्या असल्याने त्या दोनच दिवसात तोडून झाल्या. अजून २० दिवस सुट्टी शिल्लक होती. मनात विचारचक्र सुरु होते सुट्टीत दररोज शेंगा तोडायला जावू या. शेंगा विकून आलेल्या पैशातून एखादा चांगला ड्रेस किंवा छानशी साडी घेवू. मी आईला घाबरतच माझा विचार सांगितला आणि विशेष म्हणजे तिला तो पटला. ती म्हणाली, "तुझ्या शेंगा वेगळ्या वाळवून पोतं भरुन मार्केट यार्डला पाठवू". मग तर काय माझ्या विचारांना पंखच फुटले. मी त्यावेळी बारा वर्षांची व माझी धाकटी बहीण होती सहा वर्षांची. आईने माझ्या बहिणीला रझियाला माझ्यासोबत शेंगा तोडायला जात जा तुला पण एक छान फ्रॉक घेता येईल असे सांगितले. रझिया पण हरखून गेली, माझ्या सोबत यायला एका पायावर तयार झाली. अशा प्रकारे आम्हा दोघी बहिणींची मोहीम दुसऱ्या दिवसापासून सुरु झाली.
दोघीही भल्या पहाटे उठायचो. आईला घरकामात मदत करायचो, पाणी भरायचो व आवरुन सर्वात आधी शेतात पोहचायचो. थंडीने कुडकुडत एवढ्या लवकर या मुली शेतात आल्याचे पाहून शेतकऱ्यांना कौतुक वाटायचे. शेंगा जलदगतीने तोडायला सुरवात करायचो. मी मोठी असल्याने माझी बुट्टी मोठी होती, राझियाची बुट्टी अगदी छोटी होती. शेंगा तोडताना तिचे लक्ष माझ्या बुट्टीकडे वारंवार जायचे. तिला वाटायचे दीदीची बुट्टी भरत आली माझी पण भरली पाहिजे. मध्येच भूक लागायची पण तेवढ्यापुरत्या दोन शेंगा तोंडात घालून भूक भागवायचो. थंडीचा जोर कमी होताच उन्हाचा तडाखा सुरु व्हायचा पण आम्हाला त्याची परवा नसायची. इतर स्त्रिया म्हणायच्या, "अगं पोरींनो डोक्याला कापड तरी बांधा ग" पण वेळ वाया जाऊ नये म्हणून शेंगा तोडत रहायचो, घामाने भिजलेला चेहराही पुसत नव्हतो, कारण हात माती चिखलाने भरलेले असायचे. इतर बायका जेवायला उठायच्या, रमतगमत जेवायच्या पण आम्ही दोघी चटकन जेवण उरकून पटकन शेंगा तोडायला सुरुवात करायचो. शेतकरी म्हणायचे या पोरी बघा कशा भरभर खाली न पडता व्यवस्थित शेंगा तोडतात. संध्याकाळ पर्यंत आम्ही सव्वा पोते शेंगा तोडायचो. त्यातील एक मोठी बुट्टी भरून शेंगा आमच्या वाटणीला यायच्या. त्या शेंगा उन्हात वाळवायला टाकून दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मालकाच्या शेतात हजर व्हायचो. या वीस दिवसात आमचा चेहरा काळवंडून गेला होता. थंडीत उठल्यामुळे अंग फुटले होते, हात दुखत होते, बोटांना घट्टे पडले होते, टाचांना भेगा पडल्या होत्या पण आमचे तिकडे लक्ष नव्हते. अंथरुणावर पडताच झोप लागायची. स्वप्नात छान छान ड्रेस, सुंदर साडी व नक्षीदार फ्रॉक यायचा. सगळे श्रम विसरुन जायचो आम्ही. आमच्या वाळलेल्या शेंगाचे पोते फुल्ल भरले एकदाचे आणि आम्ही मार्केट यार्डला ते पाठविले.
एके दिवशी माझे वडिल ज्यांना आम्ही बापूजी म्हणायचो ते म्हणाले, "उद्या आपण सांगलीला जायचे आहे साडी व फ्रॉक आणायला. शेंगाच्या पोत्याचे ५३ रुपये बिल आले. बापूजी गणपती पेठेतील सहकार वस्त्र निकेतन मध्ये आम्हाला घेवून गेले कारण त्या दुकानात आमचे शेजारी विलास जाधव काका नोकरीला होते. त्यांनी अगदी नवीन आलेल्या ब्रासो साड्या दाखविल्या. त्यातील गुलाबी रंगाची, गुलाबाच्या फुलांची नक्षी असलेली ब्रासो साडी मला आवडली पण लेबल पाहते तर काय त्या साडीची किमत ४५ रुपये होती. त्यावेळी एवढ्या किमतीची महाग साडी आवाक्याबाहेरची वाटली म्हणून मी नको म्हणाले. उरलेल्या पैशांतून राझियाला तिच्या मनासारखा फ्रॉक मिळेल का हा प्रश्न होता. एवढ्याश्या जीवाने, इवल्या हातांनी मला शेंगा तोडायला मदत केली होती. तिला तिचा हिस्सा मिळायलाच हवा असे मला वाटत होते. विलासकाका म्हणाले, "हीच साडी घे ज्युबेदा, फार चांगली व टिकाऊ आहे". ती साडी बाजूला ठेवून राझियासाठी फ्रॉक बघितले. तिने आकाशी रंगाचा सुंदर फ्रॉक पसंत केला. फ्रॉकची किंमत होती ८ रुपये. हिशोब तंतोतंत झाला म्हणून बापूजी माझ्याकडे पाहून हसले.
वीस दिवस थंडीवाऱ्याची, उन्हाची पर्वा न करता खरेदी केलेल्या त्या दोन वस्तूंची किंमत आमच्या दृष्ठीने लाख मोलाची होती आणि झालेला तो आनंद अविस्मरणीय होता. आठवी ते अकरावी पर्यंत मी ती साडी दर गुरुवारी नेसून जायची पण मला एकदाही लाजल्यासारखे झाले नाही कारण ती साडी होतीच तशी उठावदार, प्रत्येक धुण्याला जास्तच फ्रेश दिसणारी.
अकरावी नंतर डी. एड. होऊन नोकरीला लागेपर्यंत प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी ती माझ्या अंगावर असायची. मॅट्रिकच्या म्हणजे अकरावीच्या पहिल्या मराठीच्या पेपरला जाताना ती साडी मी नेसली नि मला मराठीचा पेपर एकदम सोपा गेला. माझ्या मैत्रिणींना वाटलं हिची साडी लकी आहे. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मैत्रिणीने ती साडी गणिताच्या पेपरला नेसली आणि योगायोगाने तिला ही पेपर सोपा गेला. त्यामुळे उरलेल्या दिवशी नंबर लावून ती साडी मैत्रिणींच्या अंगावर विराजमान झाली आणि ती लकी ठरली. पुढे डी. एड. ला गेल्यावर तो किस्सा सांगताच प्रत्येक पाठाच्या वेळी तिला मागणी असायची. त्या साडीमुळे मला मैत्रिणींच्या छान छान साड्या नेसायला मिळायच्या. मला माझ्या कष्टाने घेतलेल्या त्या गुलाबी साडीचा सार्थ अभिमान वाटायचा.
खूप छान कथा
उत्तर द्याहटवासाडीची कथा त्यासाठी केलेले कष्ट...... सलाम
उत्तर द्याहटवाछान कथा आहे
उत्तर द्याहटवा