'माझं माहेर'
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
माहेर हा शब्द उच्चारताच आठवणींचे ढग दाटून येतात, मोराप्रमाणे पिसारा फुलवून बालपण डोळ्यासमोर नाचू लागते. प्रत्येक स्त्रीच्या मनात माहेरच्या आठवणींंचे रंगीबेरंगी फुलपाखरू माहेरच्या रम्य बागेत, माहेरच्या माणसांच्या ताटव्यात मुक्तपणे विहार करत असते.
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात, वारणा नदीच्या काठावर वसलेलं, सावळवाडी माळवाडी हे चिमुकलं गाव, माझं माहेर. हे गांव सांगलीपासून चोवीस कि. मी. अंतरावर असून, ते सांगली जिल्ह्याचं पश्चिमेकडील शेवटचं गांव आहे. वारणा नदीच्या पलीकडे कोल्हापूर जिल्ह्याची सुरुवात होते. पावसाळ्यात गावाला वारणामाईचा चोहोबाजूंनी वेढा पडतो. आम्ही लहानपणी गंंमतीने म्हणायचो सावळवाडी सोन्याची काडी, कोण येईल त्याला अडकून पाडी. पुराच्या भितीने सावळवाडीपासून दोन किलोमीटरवर वसाहत झाली आहे, तिला माळवाडी म्हणतात. अशा प्रकारे सावळवाडी माळवाडी दोन जुळ्या बहिणीप्रमाणे आहेत. सद्या सावळवाडी व माळवाडी अशा दोन वेगवेगळ्या ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत.
माझ्या छोटेखानी गावाचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे गावानं जपलेला सर्वधर्मसमभाव. गावात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. याचं बोलकं उदाहरण म्हणजे येथील श्री लक्ष्मीदेवीच्या यात्रेनिमित्त संगीत भजनी मेळाव्याचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी माझे चुलत चुलते कै. बाबालाल तांबोळी गेली पन्नास वर्षे म्हणजे दोन हजार एकोणवीस पर्यंत करत होते. माझे वडील कै. युसूफ तांबोळी भजनी मंडळातील उत्कृष्ट हार्मोनियमवादक व गौळणगायक होते. मोहरम या सणामध्ये सर्व हिंदू बांधव सहभागी होतात. गणेशोत्सव, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, नवरात्रोत्सव इत्यादी सण उत्सव सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन साजरे करतात. रमजान ईद व ईद ए कुर्बानला सर्व हिंदू बांधव मुस्लिम बांधवांच्या घरी येऊन शीरखुर्म्याचा आस्वाद घेतात तर दसरा दिवाळीला मुस्लिम बांधव त्यांच्याकडे मस्त फराळ फस्त करतात. सद्या तरुण मंडळेही स्थापन झाली आहेत. अमरज्योत तरुण मंडळ सर्व विधायक कार्यक्रमात अग्रेसर आहे.
दोन हजार पाचच्या पुरानंतर सावळवाडी गांवचे चार पाच कि.मी. अंतरावर पुनर्वसन करण्यात आले आहे. तेथे पूर्वीची कौलारू घरे जाऊन स्लॅबच्या मजबूत घरांची सुंदर वसाहत निर्माण झाली आहे. माझ्या माहेरच्या गावाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात तिसरा क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्विकार केलेल्या या गावाचा आम्हा सर्व माहेरवासीणींना अभिमान वाटतो.
माझे वडील शांत स्वभावाचे कष्टाळू शेतकरी होते. माझी आई अशिक्षित होती पण कमालीची व्यवहारचतुर होती. तिच्या वात्सल्याच्या बळावरच आम्ही आयुष्याची वाटचाल समर्थपणे करत आहोत. माझी आजी कै. आमिनाबी कष्टाची व त्यागाची महान देवता होती. तिच्या प्रेमानेच माझ्या आयुष्यात सुख समृद्धी आली आहे. माझे चुलते गुलाब तांबोळी हे आदर्श शिक्षक होते. त्यांनी आम्हा भावंडांचा शिक्षणाचा भार वाहिला.ते आम्हा सर्वांचे भाग्यविधाते ठरले. माझी काकी कर्तव्यनिष्ठ व सुगरण होती. तिने आम्हा सर्वांना स्वच्छतेचा आदर्श घालून दिला आहे.
आम्ही तीन बहिणी व आम्हाला दोन भाऊ आहेत. काकांना दोन मुली व एक मुलगा आहे. अशा रितीने आम्ही पाच बहिणी व तीन भाऊ आजपर्यंत मायेच्या अतूट धाग्यांंनी बांधलेले आहोत. एक भाऊ रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलवर शिक्षक, दुसरा भाऊ वसंतदादा कारखान्याच्या लिफ्ट एरिगेशनमध्ये शाखाप्रमुख तर तिसरा भाऊ सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कॅशिअर आहे. आम्ही दोन बहिणी शिक्षिका, एक बालवाडी शिक्षिका तर दोघी उत्कृष्ट गृहिणी आहेत. एक वहिनी शिक्षिका असून दोघी कर्तव्यदक्ष गृहिणी आहेत. माझं माहेर म्हणजे एक सुखाचा खजिनाच आहे. जीवनाच्या वाटचालीतील मनमोहक बगिचा आहे. मे महिन्याच्या सुट्टीत व दिवाळीच्या सुट्टीत मुलांबाळासह सर्वजण एकत्र येतो तेंव्हा घराचे गोकुळ बनते. माझ्या भावजया इतक्या प्रेमळ आहेत की त्यांच्या प्रेमाने चिंब भिजूनच आम्ही सासरी येतो. माझ्या भावांचं बहिणींवरील प्रेम खरंच अवर्णनीय आहे. त्यांनी बहिणींना कधीच दुखवले नाही. उलट आम्हा बहिणींच्या पाठीशी पहाडाप्रमाणे उभे असतात. आम्हा आठ भावंडापैकी कुणाच्याही मुलामुलीचे लग्न किंवा अन्य कार्यक्रम असो आम्ही सर्व भावंडे आपल्या कुटुंबासह धमाल उडवून देतो. अंताक्षरीपासून झिंगाट डान्सपर्यंत सर्व प्रकार हाताळले जातात. आमच्यापैकी सहा भावंडांंना जावई व सुना आल्या आहेत. आमचे जावई व सुनाही प्रत्येक कार्यक्रमात अगदी मनापासून समरस होतात. सुनांच म्हणणं आहे की, तुमचं माहेर आम्हाला आमच्या माहेराइतकंच प्रिय आहे. वर्षातून एकदा सर्व परिवाराची सहलही ठरलेली असते.
माझं माहेर म्हणजे मायेचा वर्षाव, आनंदाची पर्वणी आणि सुखाचं नंदनवन आहे. लग्न होऊन चाळीस वर्षे पूर्ण झाली तरी माझी माहेरची ओढ कायम आहे. प्रत्येक सुट्टीत, सणावारात, इतर कार्यक्रमात आम्ही सर्वांनी एकत्र येऊन घालविलेले ते क्षण मनाच्या खोल कप्प्यात साठवून ठेवतो कारण ते क्षण सोनेरी व चंदेरी असतात. मायेच्या पंखाखाली घालविलेले ते दिवस आठवत सासरी मार्गक्रमण करतांना नवा उत्साह येतो.
माझ्या माहेरची वाट वृक्षवल्लींनी नटलेली, हिरव्यागार पिकांनी सजलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा पूल वारणा नदीवर झाल्याने माहेरची वाट अधिकच सुखदायी आनंददायी बनली आहे. असे हे समृद्ध माहेर सदैव लाभू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना।
खूप छान👌👌👌👌
उत्तर द्याहटवा👌👌👌👌
उत्तर द्याहटवाग्रेट
उत्तर द्याहटवा