शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

आई

           माझी पहिली अभंगरचना  मातेला समर्पित......

        

 आई


                                फोटो साभार: गुगल


आई थोर जगी । आई ईशरूप ।

राबते ती खूप । बाळांसाठी ।


मायेचा हा झरा।अखंडित वाही।

तहान भागवी। सकलांची ।


आई थोर गुरू। बाळा वाढवते।

सक्षम करिते। जीवनात ।


आईच्या पायाशी। स्वर्ग सामावला

भक्त विसावला। आईपाशी ।


आईची महती। तुम्हा सांगू किती।

अल्प माझी मती। लिखाणात।


आईच्या चरणी। सदा लीन व्हावे।

मनाला जपावे। मातेचिया ।

मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

लघुकथा संग्रह क्र. १२ ( विधायक अलक ) जावई आमचे भले !

 लघुकथा  संग्रह १२ ( विधायक अलक )
    जावई आमचे भले !


    
                       फोटो साभार: गुगल 


           जावयांबद्दल एक गोड गैरसमज आहे. जावयांबद्दल बोलताना लोक म्हणतात तो सासुरवाडीत ताठपणाने वागतो,  वेगवेगळ्या मागण्या करतो, हट्ट करतो, मानपान हवा असतो. हे सर्व बोलताना आपणही कुणाचेतरी जावई आहोत हे सोईस्करणे विसरतात. बदललेल्या जमान्यात जावयीबुवासुद्धा बदललेत. प्रसंगी ते सासुरवाडीच्या नातेवाईकांवर कसे प्रेम करतात ते वाचा या लघुकथांमधून.........।


(१ ) सलून बंद

विमलताई व केशवराव स्काटलँड या देशात मुलगी व जावयी यांच्या आग्रहास्तव एका महिन्याकरीता गेले. लेकजावयी दोघे इंजिनिअर, त्याठिकाणी जॉब करतात. त्यांनी या दोघांचे यथोचित स्वागत केले. त्यांना प्रेक्षणीय स्थळे दाखविली. तेथील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचा आस्वाद दिला. तृप्त मनाने आईवडील परतणार होते एवढ्यात कोरोनाने सर्व जगभर थैमान मांडले व त्यांना दोन महिने तेथेच राहणे भाग पडले. सलून बंद असल्याने केशवरावांचे केस कापण्याची पंचायत झाली. सट्टीच्या दिवशी जावयी म्हणाले, "बाबा बसा या खुर्चीवर मी तुमचे केस व्यवस्थित कापून देतो". जावयांनी टकाटक केस कापल्यावर सासरेबुवा खूश होऊन म्हणाले, "जावयी आमचे भले."


(२ ) मोठेपणा जावयाचा

रामरावांना चार मुली. चारही मुलींचे त्यांनी थाटामाटात विवाह करून दिले. चौघीही आपापल्या  संसारात रमल्या होत्या. रामरावांना मुलगा नव्हता. दुर्दैवाने रामरावांचे ह्रदयविकाराने आकस्मित निधन झाले. आत्ता प्रश्न आला वाटणीचा. मुलींनी समंजसपणे बँक बॅलन्सच्या पाच वाटण्या केल्या. त्यांचे घर होते आठ खोल्यांचे. चौघीनी दोन दोन खोल्या वाटून घेतल्या. प्रत्येकीने खोल्या भाड्याने देऊन महिन्याला भाडे मिळविण्याचा प्लॅन केला व आई चौघींकडे तीन तीन महिने राहील असे चौघीनी ठरविले पण आई मी कुणाच्याही घरी जाणार नाही असे म्हणाली. आता आई मग राहणार कोठे? चौघी एकमेकीकडे पाहू लागल्या. मनाचा मोठेपणा एकीनेही दाखविला नाही शेवटी छोटे जावयी म्हणाले, "आमच्या वाटणीला आलेल्या खोल्यांमध्ये आई तहयात राहतील".सासूबाई मनात  म्हणाल्या 'जावयी माझे भले '


(३ ) बेस्ट सेवा जावयाची

सलीमभाईना पॅरालिसीसचा अटॅक आला. औषधोपचार झाले पण त्यांच्या उजव्या बाजूची हालचाल होत नव्हती. डॉक्टरांनी फिजिओथेरपी सुरु करण्यास सांगितले. दर दिवशी सकाळ संध्याकाळ एका फिजिओथेरपिस्ट घरी येऊन मालिश करू लागला. त्याची फी दर दिवशी सातशे रूपये होती. सुदैवाने त्यांचे जावयी त्याच गावात रहात होते. ते ऑफिसला जाता येता  सासऱ्याना भेटायला यायचे. जावयांनी मालिश चालू असताना सूक्ष्म निरिक्षण केले. महिना झाल्यावर ते सासऱ्याना म्हणाले," उद्यापासून मालिशवाला बंद. मी करत जाईन मालिश सकाळ संध्याकाळ'. जावयांनी ही सेवा पुढे सहा महिने सुरु ठेवली. सलीमभाई काठी घेऊन चालू लागले. सर्वांना सांगू लागले. 'जावयी माझा भला'.


(४ ) माझी आई तुझी आई

श्रीधर सुजाताला सकाळी सकाळी म्हणाले, "आईची तबेत्त बिघडलीय मी निघतो आणि तिला आपल्याकडे घेऊनच येतो".  श्रीधरचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच सुजाताच्या तोंडाचा पट्टा चालू झाला'. मुलांच्या परीक्षा जवळ आल्यात, त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं. आणायला तुमचं काय बिघडतय, सेवा मलाच करावी लागते. प्रत्येक वेळा तुम्ही च का बघता तुमचे मोठे भाऊ नाहीत का बघायला?' तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून श्रीधर गाडी काढून निघून जातात. सायंकाळी पाच वाजता श्रीधर गाडीतून उतरले व मागे झोपलेल्या सासूबाईंना धरून येऊ लागले.सुजाताची बोलतीच बंद झाली. सासूबाई म्हणाल्या, 'जावयी माझे भले'.


(५ ) एक्स्प्रेस सेवा

जानकी शिक्षिका पदावर जयसिंगपूर येथे कार्यरत होत्या. एका ट्रेनिंगसाठी त्या कोल्हापूरला गेल्या होत्या. त्यांच्या लाडक्या मोठ्या भावाची तबेत्त अचानक बिघडल्याने त्यांना मिरज येथील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. अत्यवस्थ असल्याने वारंवार लवकर येण्यासाठी फोन येत होते. सुदैवाने त्यांचे लेकजावयी कोल्हापूरात रहात होते. सैरभैर अवस्थेत त्यांनी लेकीला फोन केला की मला बस स्टॅंडवर पोहचवायला जावयी येतील का?

 पाच मिनिटांत जावयी दुचाकीसह हजर झाले. गाडी स्टँडवर न नेता मिरजेच्या दिशेने वेगात निघाली. थंडीचे दिवस, सायंकाळची वेळ हवेत गारठा होता. जावयांनी गाडी थांबवून आपले जर्किन सासूबाईंना घालायला दिले व पाऊण तासात हॉस्पिटलमध्ये पोहोचविले व अत्यवस्थ भावाची भेट घडवली. भाऊ बरे झाले. बहीण आनंदाने म्हणाली 'जावयी माझे भले'

      

       म्हणून सांगते वाचक बंधूभगिनीनो मुलीचा जन्म टाळू नका.जावयीबुवासुद्धा मुलाची भूमिका बजाऊ शकतात.होय ना?......


शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५

आनंदाने जगावे असे !

                आनंदाने जगावे असे!


     
                          
                           फोटो साभार: गूगल
                       

        कुणाचा साखरपुडा असो वा लग्न, डोहाळेजेवण असो वा बारसे, वाढदिवस असो वा कार्यक्रम जयाचा उत्साह अगदी दुथडी भरून वहात असतो. तो कार्यक्रम थोडा हटके, अविस्मरणीय, मनोरंजक व थाटामाटात कसा होईल इकडं जयाचं जातीनं लक्ष असतं. साखरपुडा, डोहाळेजेवण, वाढदिवसाला तिच्याकडे खास फनीगेम्सचं नेटकं नियोजन असतं. फुगे फुगविण्यापासून साड्यांच्या घड्या घालण्यापर्यंतच्या ॲक्टीव्हिटीज त्यामध्ये असतात. शिवाय बुगडी घातलेल्या स्त्रीला व पत्नीचा फोटो जवळ बाळगणाऱ्या पुरुषाला अनायसे छोटेसे गिफ्ट जया खुबीनं देते. त्यामुळे जमलेल्या सर्वांचेच छान मनोरंजन होते. नातेवाईकातील कुणाचेही लग्न असो रूखवतावर शायऱ्या झळकतात, जयानं स्वतः तयार केलेल्या. त्यामुळे वधुवरांना रूखवतासोबत छान संदेशही मिळतो. लग्नसमारंभातील संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या प्रसंगात गीत गायनात जया अग्रेसर असतेच. बारशाच्या वेळी जया स्वतः पाळण्याची रचना करते व सर्वांच्या मदतीने पाळणे म्हणते. त्यामुळे बाळाच्या आई-वडिलांचे, आजी-आजोबांचे, मामा-मामींचे, काका-काकूंचे चेहरे असे खुलतात की विचारूच नका. जया खरोखरच जगावेगळी आहे. घरच्या कार्यक्रमात ब्लाऊज पीस ऐवजी कापडी पिशव्या देते तर साडी ऐवजी छान संसारपयोगी वस्तू देते. कार्यक्रम आनंदमय करत असतानाच सामाजिक भानही ठेवते. समाजासाठी एक पाऊलवाट तयार करते.

  

         तर अशी ही जया! तुम्हाला नक्कीच वाटलं असेल की ही जया असेल २५-३० वर्षाची तरूणी! पण नाही. जयानं नुकतीच साठी ओलांडली आहे. हा उत्साह, ही उर्जा, ही आपुलकी त्यांच्या प्रत्येक वागण्या बोलण्यात कुठून येते देव जाणे! या सगळ्या सकारात्मक वृत्तीचं जया म्हणजे एक भांडारच आहेत. आजुबाजुच्या जवळच्या कोणीही यावे आणि या उत्साहाचा, उर्जेचा, औदार्याचा, मनमोकळेपणाचा, गोड बोलण्याचा शिडकावा अनुभवावा; कारण त्यांचे घर सर्वांसाठी मुक्तद्वार वाटते. घरी येणाऱ्या - एका वर्षापासून ८५ वर्षाच्या व्यक्तीशीही जयाताईंचे छान - जमते. जयाताई इतक्या छान गप्पा मारतात की येणाऱ्याचा सहजपणे, बेमालूमपणे ब्रेन वाब्रेनवॉश होतो व तासाभरासाठी आलेली व्यक्ती २/३ तास छान रमते व मोकळी-ढाकळी होऊन समाधानाने परत जाते. त्यांच्या या मनमोकळ्या सहज स्वभावामुळे त्यांचे अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या संबंधामुळेच त्यांना कधीच एकटेपणा जाणवत नाही. दुःखी निराश व्हायला वेळच मिळत नाही. आपल्या पतीकडे, मुलांकडे, नातवांकडे येणाऱ्या प्रत्येकाशी  जयाताईंचा एक वेगळा मर्म बंध, ऋणानुबंध निर्माण होतो.  जयाताईंच्या स्वभावात फक्त सेलीब्रेशनच आहे. घरातील त्यांचा वावर, कामातील व्यग्रता, साधेपणातही नीटनेटके  राहण्याचा त्यांचा प्रयत्न येणाऱ्या प्रत्येकाला अचंबित करून सोडतो. येणाऱ्या प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करत असताना कुणाला काय हवं, नको हे बघण्यासाठी त्यांची अविरत धडपड सुरू असते. कुणी कसलीही समस्या सांगो ती सोडविण्यासाठी लागणारे धीराचे शब्द जयाताईंच्या तोंडून इतक्या आत्मियतेने, अंत:करणापासून बाहेर पडतात की समस्याग्रस्ताला समस्या दूर करण्यासाठी हजार हत्तींचे बळ येते. जयाताईंचा हा सारा व्यवहार ठरवून चाललेला नाही तर तो एक नैसर्गिक, सहजसुंदर आणि स्वभावतः स्त्रवणारा साठ वर्षे वयाचा स्वच्छ निखळ वाहता झरा आहे हे कोणाच्याही  लक्षात सहज येवून जाते. जयाताईंचे हे असे दर्शन ज्या ही क्षणी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीस होते, त्या क्षणापासून ती व्यक्ती त्यांची चाहती बनून जाते.


         जयाताईंचा जन्म छोट्याशा खेडेगावात, एका कष्टाळू, गरीब व सुसंस्कारीत शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच गरीबीवर मात करत जीवन आनंदाने कसं जगावं याच बाळकडू त्यांना मिळालं. लग्न होऊन सासरी आल्यावरही सर्वांना त्यांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने आपलेसे केले. सासर-माहेर यात भेदभाव न करता त्यांनी या दोन घरातील नात्यांची वीण इतकी घट्ट केलीय की त्यांच्या घरगुती कार्यक्रमात दीर कोणता? भाऊ कोणता? सासू-आई कोणती हे येणाऱ्याला विचारल्यावरच कळते. काटकसरीने संसार कसा करावा हे त्यांच्याकडूनच शिकावे. पतीच्या नोकरीतील ताणतणाव, अपत्यांचे यश-अपयश, नातेवाईंकांची आजारपणे, स्वतःची नाजूक तब्येत त्यांनी इतक्या खंबीरपणे पचवली आहे की एकदा आलेल्या संकटाने त्यांच्या जीवनात पुन्हा येण्याचे धाडस नाही केले.


       येणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक व्यक्ती त्या धीराने, आनंदाने स्विकारत असतात. केवळ रडत, कुठत बसणे, थांबणे, आराम करणे, त्यांच्या स्वभावात नाही. सतत काहीतरी करत राहणे हा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र आहे. सर्वसामान्य स्त्रीच्या जीवनात येणारे नानाविध प्रसंग, चढ-उतार त्यांच्याही जीवनात आले पण चढताना त्या घाबरल्या नाहीत व उतरताना दमल्याही नाहीत. टक्केटोणपे खूप खाल्ले. खूप सोसलं पण त्या आज कशाबद्दलही तक्रार करत नाहीत की, कुणाबद्दल अढीही धरत नाहीत. ज्यांनी त्यांना त्रास दिला, त्यांच्याशी त्या प्रेमाने वागतात. उलट मनापासून त्यांचे आभार मानतात, कारण जयाताईंच म्हणणं आहे की, अशा लोकांमुळेच आपल्याला जगण्याची, लढण्याची व जिंकण्याची नवी उर्जा मिळत गेली. बहुधा ही सकारात्मक वृत्तीच त्यांच्यासाठी शक्तीस्त्रोत ठरत असावी कारण साठी ओलांडल्यानंतरही त्या प्रचंड क्रियाशील व मनाने कणखर आहेत. त्यांच्यासोबत गप्पा मारताना अनेकदा जयाताई आपल्या पूर्वायुष्यातील घटना सांगत असतात तेव्हा त्यांनी परिस्थितीशी केलेला संघर्ष मनाला स्पर्शून तर जातोच शिवाय एक प्रेरणाही देतो.  त्यांच्या क्षमाशील वृत्तीचे दर्शनही घडते. दुसऱ्याकडून घडलेल्या चुका, घडलेले प्रमाद, त्यामुळे स्वत:ला झालेल्या यातना हे सारे मागे टाकून आनंदाने जगण्याची त्यांची वृत्ती आपल्याला बरंच काही शिकवून  जाते. आयुष्यभर त्या अशाच वागल्या आहेत. कोणासाठी काही करताना त्या स्वतःचा आनंद शोधत असतात. कुणाला काही मदत करताना त्यांचा निरपेक्ष भाव दिसतो. व्यक्तीगत आयुष्यात त्यांचे वागणे शिस्तप्रिय व वक्तशीर असते. स्वच्छतेबाबत त्या कमालीच्या आग्रही आहेत पण स्वच्छतेचा बाऊ करणे त्यांना आवडत नाही. आपले घर, अंगण, छोटासा बगीचा कुटुंबियांच्या मदतीने स्वच्छ व नीटनेटका ठेवतात. आपल्या बगिच्यात उमललेली फुले, फुलांच्या स्वतः तयार केलेल्या वेण्या, पुष्पगुच्छ व बुके तयार करून देण्यात त्यांना अनमोल आनंद मिळतो. त्यांच्या बागेत आलेली फळे पै-पाहुणे, स्नेह्यांच्या दृष्टीने गोड मेवा-मिठाई ठरते. अशा रितीने जयाताई हरितहस्तही आहेत.


        जयाताईना लेखन, वाचन, संगीत, कला नाट्य यात खूप रस आहे. आपल्याला आवडलेले कार्यक्रम, मालिका त्या रसिकतेने पाहतात पण नुसतंच पहात बसत नाहीत त्याचवेळी भाजी निवडत असतात किंवा शेंगा सोलत असतात. आकाशवाणीवरचे कार्यक्रम स्वयंपाक करताना, शिवणकाम करताना लक्षपूर्वक ऐकतात. कामात व्यस्त राहून ऐकण्या-पाहण्याचे त्यांचे कसब खरंच अनुकरणीय आहे. स्मरणशक्ती ही त्यांना मिळालेली दैवी देणगी असावी. आपल्या जीवनात येऊन गेलेल्या प्रत्येकाचं नाव, गाव, आपल्यावर उपकार केलेल्या व्यक्तीची स्वभाववैशिष्ट्ये, तो प्रसंग बारीकसारीक तपशीलासह त्यांना लख्ख आठवतो व तो प्रसंग त्या इतक्या खुबीनं आपल्यासमोर ठेवातात की एक सुरेख चित्रपट पाहिल्याचा भास होतो, पण त्यांच्या स्मरणाच्या मर्यादा इथपर्यंतच नव्हे तर बहीण-भावांच्या, मुलांच्या, परिचितांच्या कानावर पडलेल्या गोष्टी जशाच्या तशा मनाच्या कागदावर टिपून ठेवतात व दुसऱ्याला समजावताना, धीर देताना प्रकट करतात. त्यांनी सांगितलेला एखादा विनोदी प्रसंग उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडवून जातो. अशाप्रकारे जयाताई म्हणजे साठ वर्षापूर्वीचा चालता बोलता सुपर रोबोच वाटतो.


        एरवी आपल्या संसारात काटकसरी असलेल्या जयाताई एखादी चिंधीही जपून ठेवून त्याचा सदुपयोग करणाऱ्या, अन्न वाया जावू नये म्हणून शिळं खाणाऱ्या त्या, कुणी शिक्षणासाठी मदत किंवा देणगी मागितली तर हजाराची नोट अगदी सहजपणे काढून देतात. गरजू स्त्रीला वापरत असलेली चांगली साडीही देऊन टाकतात हे त्यांचे वर्तन म्हणजे कुणालाही न सुटलेले कोडे आहे, असे वाटते.


        एरवी शांतपणे ऐकून घेणाऱ्या, मोलाचा सल्ला देणाऱ्या, मनमोकळ्या गप्पा मारणाऱ्या जयाताई समोरच्या व्यक्तिने जाणून बुजुन कांही चूक केली किंवा त्यांच्या अस्मितेला धक्का देण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्यांचा अवतार कडाडणाऱ्या विजा प्रमाणे असतो. त्यामुळे त्यांच्या सानिध्यात असलेल्या व्यक्ती जरा सांभाळूनच असतात. कारण एरवी प्रेमळपणाचा वर्षाव करणाऱ्या त्या रागावल्याचं दुःख समोरच्याला पचवणं फार जड जातं. उधळपट्टी करणाऱ्याला काटकसरीचे महत्व सांगायलाही त्या योग्य संधीची वाटच पाहत असतात.


        चांगल्याचुंगल्या वस्तू जमविणे आणि इतरांना भेटीदाखल देणं हा त्यांचा छंद आहे. आणि हो, बारशाला जाताना स्वतः शिवलेली दुपटी, टोपडी, बाळलेणी न्यायला त्यांना फार आवडते. रुखवत सजविण्यासाठी स्वतः तयार केलेली वस्तू हमखास नेतात. एकंदरीत आपल्या जीवनात सर्वांच्यात मिसळूनही स्वतःचा वेगळेपणा त्यांनी जपला आहे. हा वेगळेपणा जपत असतानाच इतर कुणालाही त्रास होणार नाही याविषयी त्या नेहमीच दक्ष असतात. जयाताईंचे व्यक्तिमत्व असे संपन्न व बहुपेडी आहे. 

    

        त्यांचे आणखी एक खास वैशिष्ट म्हणजे गतिमान  धकाधकीच्या या जमान्यात, बदलत्या हवामानात, सर्वांच्या वाट्याला येणाऱ्या तबेत्तीच्या तक्रारी त्यांच्याही वाट्याला आल्या पण त्यांनी कधीच त्याचा बाऊ केला नाही. इतरांसमोर आपल्या तब्येतीच्या तक्रारी सतत मांडत बसणे त्यांना आवडत नाही. आपल्या अशा वृत्तीने समोरच्या व्यक्तीला नकळतपणे दुःखी करतो असे त्याना वाटते. त्यामुळे त्यांच्यासमोर कुणी माझं डोकं दुखतय म्हटलं की जयाताई सहज म्हणतात, आपलं आहे म्हणून दुखतं ते दुसऱ्याचं असतं तर दुखलं असतं का ?' समोरचा एकदम मोठ्याने हसतो.


        जयाताईच्या जीवनशैलीकडे पाहिले की वाटते काही माणसं आपल्या जीवनात काही मापदंड शिरोधार्य मानून आपली वाटचाल करीत असतात. कोणाला तरी आदर्श मानून, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जीवनात मार्गक्रमण करीत असतात. व आपले आयुष्य सफल संपूर्ण यशस्वी बनवतात. जयाताईंसारख्या व्यक्ती आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, व्यवहारातून इतरांसमोर जगण्याचे मापदंड प्रत्यक्ष उभे करतात हेच खरे!


 जयाताईंच्या जगण्याकडे पाहून शेवटी म्हणावेसे वाटते,


अशाही व्यक्ति आहेत भवती, जीवन त्यांचे पहा जरा। 'आनंदी जगावे असे' हाचि सापडे बोध खरा।





गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५

लघुकथा संग्रह क्र.११ ( विधायक - अलक )

 लघुकथा संग्रह क्र. ११ ( विधायक - अलक )


लघुकथा क्र. ५१ - पुत्र व्हावा ऐसा

माझा सर्दीमुळे आवाज बसला होता. एकत्र जेवताना मी सूनबाई हिनाला म्हटलं, "मला आज थोडीशीच भाजी आणि वरण वाढ. माझं तोंड आलय, तिखट लागू देईना". संध्याकाळी चिरंजीव मोहसीन ऑफिसमधून येतानाच कंठवटी गोळ्या, कफलेट, व तोंड आल्यावर लावायची ट्यूब घेऊन आला तेही न सांगता! ते पाहून माझा बसलेला आवाज खाड्कन उठून ऊभा राहिला आणि आलेलं तोंड मागे न बघता पळून गेलं.


लघुकथा क्र. ५२ - निर्णय त्यागाचा

सुदर्शन इंजिनिअर होऊन अमेरिकेत सर्व्हिसला होता. दोन तीन वर्षानंतर त्याची पत्नी श्वेता व छोट्या स्वराला अमेरिकेत नेण्याचा योग आला. पासपोर्ट, व्हिसा तयार झाला. सुदर्शन श्वेता हरखून जाण्याची  जय्यत  तयारी करत होते. परदेशात संसार थाटण्याची सोनेरी स्वप्ने पहात होते. आता फक्त आठच दिवस उरले होते. एवढ्यात सुदर्शनच्या आईला कँन्सर झाल्याचे निदान झाले. वेळ न दवडता सुदर्शनने आईचं ऑपरेशन करुन घेतलं व श्वेता व स्वराला सोबत न घेताच आईच्या सेवेला ठेवून, वडिलांना आधाराचे बळ देऊन निघून गेला. सुनेच्या सेवा सामर्थ्याने आई लवकरच खडखडीत बरी झाली.


लघुकथा क्र. ५३ - मोठेपणा मनाचा

धीरज व सूरज दोघे भाऊ. वडील BSNL मध्ये नोकरीत होते. सेवेत असतानाच त्यांचे हार्ट अटॅकने निधन झाले. धीरजने नुकतीच बी. ई. सिव्हिलची पदवी घेतली होती तर सूरज बी.कॉम च्या शेवटच्या वर्षात शिकत होता. वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर एकाला नोकरी मिळणार होती. धीरज म्हणाला, "मला  कुठेही नोकरी मिळू शकते, सूरजला मिळणे अवघड आहे, त्यालाच या संधीचा फायदा घेवू द्या. पुढे घरांच्या वाटणीची वेळ आली. एक जुना बंगला होता व एक मोठी एरिया असलेला नवा बंगला होता. सूरज म्हणाला, "जुना बंगला मला व नवा बंगला दादाला". नोकरीच्या वेळी मनाचा मोठेपणा दादाने दाखविला आता बारी माझी मनाचा मोठेपणा दाखविण्याची !


लघुकथा क्र. - ५४ वेगळा संसार नको मला !

रिध्दी सिध्दी दोघी जुळ्या बहिणी. रिध्दीचं लग्न ठरलं. तिच्या लग्नासोबतच सिध्दीचंही लग्न उरकून घेण्याचा आईवडिलांचा विचार होता. तिच्यासाठी एक स्थळ आले. मुलगा इंजिनिअर होता. बेंगलोरला मोठ्या कंपनीत सर्व्हिसला होता. आईवडील, भाऊबहिणी व इतर कुटूंबिय गांवी रहात होते. सर्वांना स्थळ पसंत पडलं कारण सिध्दीला बेंगलोरला राजाराणीचा संसार थाटायला मिळणार म्हणून. एवढ्यात सिध्दी म्हणाली, "मला हे स्थळ पसंत नाही. मला एकत्र कुटूंबात रहायचं आहे. फक्त राजाराणीचा संसार मला नको आहे".


लघुकथा क्र. ५५ - अनोखे आजीप्रेम

रौनकला टायफाईड झाल्याने हॉस्पिटलमध्ये ऎडमिट होता. दुर्दैवाने त्याच्या आजीलाही दुसऱ्या दिवशी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऐडमिट करावे लागले. रौनकला ते समजताच तो त्यांच्या डॉक्टरना म्हणाला, "डॉक्टर माझ्या हाताचे सलाईन लवकर काढा. मला माझ्या आजीला भेटायला जायचे आहे लगेच". आजीला हे समजताच नातवाच्या प्रेमाने भरून पावली. नातवाच्या मायेचे टाॅनिक मिळताच लवकरच बरी होऊन घरी आली.


अशा या विधायक, सकारात्मक कथा समाजापुढे मांडून सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणयाचा माझा प्रामाणिक प्रयत्न !