शनिवार, ३१ जुलै, २०२१

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक - विशेष लेख


१ ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय.......

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी 



फोटो साभार: गूगल


       भारत हा जेंव्हा परतंत्र, निर्धन आणि निःशस्त्र आणि तो काळ इंग्रजी साम्राज्याचा मध्यान्ह काळ होता, तेंव्हा इंग्रजांच्या सत्तेला जबरदस्त विरोध करणारा आशिया खंडातील पहिला पुढारी म्हणून लोकमान्य टिळकांची जगाला ओळख आहे. भारतासारख्या खंडतुल्य राष्ट्राचे नेतृत्व करून ते टिकवून धरणे हे अतिशय अवघड काम लोकमान्य टिळकांनी आपल्या कर्तृत्वाने केले. त्यावेळी त्यांच्या हातात कोणतीही सत्ता नव्हती. पैसा तर अजिबातच नव्हता. तरीही घरोघरी लोकांनी त्यांच्या प्रतिमा लावून त्यांचे पूजन केले. इतकी लोकप्रियता त्यांना मिळाली होती.


अल्पपरिचय:

       लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नांव बाळ गंगाधर टिळक. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गांवी झाला. त्यांचे मूळ नांव केशव असे होते तथापि 'बाळ' हे टोपण नावच पुढे कायम झाले. त्यांचे वडील गंगाधरपंत हे प्रथम प्राथमिक शिक्षक व नंतर शिक्षण निरीक्षक होते. ते दहा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली. त्यामुळे टिळकांचे बहुतेक सर्व शिक्षण पुणे येथेच झाले. ते १८७२ मध्ये मॅट्रिक झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजमधून ते १८७७ मध्ये बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे १८७९ मध्ये ते एल. एल. बी. झाले. एल. एल. बी. च्या वर्गात असताना त्यांचा आगरकरांशी परिचय झाला. समान ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोघा तरूणांनी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या देशाची सुटका करून घेण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्रोध्दाराच्या कार्यास स्वतःला वाहून घेण्याचा निश्चय केला.


लोकजागृतीस आरंभ:

       त्याकाळात क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव टिळकांच्या मनावर पडला. वासुदेव फडके यांच्यावरचा खटला कोर्टात सुरु होता. या खटल्यात वासुदेव यांच्यावर अन्याय होऊन त्यांची हार झाली कारण त्यांच्यामागे जनसमुदाय नव्हता. हे जाणून प्रथम लोकजागृती केली पाहिजे त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत असे वाटून स्वाभिमान शून्य झालेल्या लोकांना नवा विचार देण्यासाठी टिळक आणि आगरकर प्रयत्न करू लागले. यासाठी एक संधी लवकरच चालून आली. विष्णूशास्त्री चिपळूणकर हे एक शाळा काढणार होते. टिळक आणि आगरकर हे दोघे विष्णूशास्त्रीना जाऊन भेटले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूल या शाळेची स्थापना झाली. त्या पाठोपाठ आर्यभूषण नावाचा छापखाना काढण्यात आला. लोकजागरण होण्यासाठी मराठी भाषेतून 'केसरी' आणि इंग्रजी भाषेतून 'मराठा' हे वृत्तपत्र सुरु करण्यात आले. त्यातून लोकांपर्यंत स्वातंत्र्यप्राप्ती व्हावी या उद्देशाने विचार पोहचू लागले. १८८४ मध्ये न्यायमूर्ती तेलंग, न्यायमूर्ती मंडलिक, डॉ. भांडारकर यांच्या सहाय्याने टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन करून फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. स्वतः टिळक आणि आगरकर तेथे शिकवित असत. हे करीत असताना केसरीतून आपल्या अग्रलेखातून ब्रिटीश सरकार विरूद्ध टिळक झणझणीत अग्रलेख लिहू लागले. त्यांच्या कांही अग्रलेखांची शीर्षके ही ऐतिहासिक ठरलेली आहेत. 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?' 'राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे' 'हे उपाय टिकाऊ नव्हेत' या त्यांच्या समाज जागृतीच्या लेखनामुळे त्यांना बऱ्याच वेळा तुरुंगवास पत्करावा लागला. १०१ दिवस डोंगरीच्या तुरूंगात काढावे लागले. रँडचा वध  झाल्यानंतर त्याचे जनक म्हणून इंग्रजांनी त्यांना एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा केली होती, त्यानंतर राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षे मंडालेच्या तुरुंगात शिक्षा झाली. या तुरुंगातच 'गीतारहस्य' हा ग्रंथ त्यांनी लिहून काढला.


इंग्रज सरकारच्या अन्यायाचा प्रतिकार:

       इंग्रज सरकारच्या अन्यायी व पक्षपाती धोरणाविरूद्ध आवाज उठविण्यात टिळक आघाडीवर राहिले होते. त्यांचे केसरीतील अग्रलेख या गोष्टीची साक्ष देण्यास पुरेसे आहेत. दुष्काळ, प्लेग यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सरकारी अधिकारी व नोकरवर्ग यांच्याकडून सामान्य जनतेवर जे अत्याचार झाले त्यांचा त्यांनी अत्यंत कडक भाषेत निषेध केला. इ. स. १९०५ मध्ये इंग्रज सरकारने बंगालची फाळणी केल्यावर त्याविरुद्ध संपूर्ण देशातील लोकमत जागृत करण्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट घेतले. लोकमान्य टिळक हे हिंदी राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते होते. प्राचीन भारतीय वैदिक संस्कृती, हिंदू धर्म व धर्मग्रंथ आणि इतिहास हे हिंदी राष्ट्रवादाचे प्रमुख आधार आहेत असे त्यांचे म्हणणे होते. टिळकांनी स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या चतुःसूत्री कार्यक्रमाचा स्वीकार व पुरस्कार केला. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळविणारच" असा मंत्र उच्चारून त्यांनी राष्ट्राला स्वराज्याची प्रेरणा दिली.


जहाल राजकारण:

टिळकांनी राजकारणात जहालमतवादाचा पुरस्कार केला. हिंदी लोकांना अर्ज विनंत्यांच्या मार्गाने आपले राजकीय हक्क मिळणार नाहीत, असे त्यांचे स्पष्ट मत होते. आपल्या देशाचे राजकीय दास्य दूर करण्यासाठी परकीय राज्यकर्त्यांशी दोन हात करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे, असे त्यांना वाटत होते. पुढे याच प्रश्नावरून काँग्रेसमध्ये जहालमतवादी व मवाळमतवादी असे दोन गट पडले. टिळकांनी त्यातील जहाल गटाचे नेतृत्व केले. त्या काळातील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांमध्ये त्यांना स्थान प्राप्त झाले होते. इंग्रजी सत्तेला त्यांनी सर्व सामर्थ्यानिशी प्रखर विरोध केला होता. या देशातील सर्वसामान्य जनतेला जागृत करून तिला परकीय सत्तेच्या विरोधात उभे करण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी केले. सर व्हँलेंटाईन चिरोल यांनी 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हणून त्यांना दोष दिला असला तरी खरे तर तेच त्यांचे भूषण ठरले आहे.


लोकमान्य टिळक यांच्या  बालपणीचा एक उल्लेखनीय प्रसंग:

सरकारी शिक्षण खात्यात नोकरी करणाऱ्या त्यांच्या वडिलांना गंगाधरशास्त्री यांना पुस्तकांचे विलक्षण वेड होते. पुस्तक वाचायला बसले की, ते अगदी तल्लीन होऊन जात. त्यातूनही त्यांच्या आवडीची पुस्तके असतील तर त्यांची वाचनात समाधीच लागायची. बाणभट्ट हा त्यांचा अतिशय आवडता लेखक होता. त्याची कादंबरी ते वाचायला बसले की, मग त्यांना वेळेचे भानही राहात नसे. असेच एकदा ते बाणभट्टाची एक प्रसिद्ध संस्कृत कादंबरी वाचत बसले होते. त्यांचा मुलगा बाळ त्यांच्या भोवताली घुटमळत होता. खूप वेळ झाला तरी त्यांचे वाचन कांही संपेना बाळचे घुटमळणे सुरूच राहिले.

अखेर बऱ्याच वेळाने गंगाधर रावानी पुस्तक मिटले.


शुक्रवार, २३ जुलै, २०२१

गुरूंची थोरवी अर्थात गुरुमहात्म्य - विशेष लेख


२३ जुलै रोजी गुरूपौर्णिमा आहे त्यानिमित्त गुरुंच्या चरणी वंदन करण्यासाठी हा विशेष लेख...

गुरूंची थोरवी अर्थात गुरुमहात्म्य - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: ShareChat

       आज गुरूपौर्णिमा यालाच आषाढी पौर्णिमा व व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. महर्षि व्यास हे गुरूंचे गुरू होते. ते आद्यगुरू होते म्हणूनच त्यांना 'गुरूनाम गुरु' म्हटले जाते. महर्षि व्यासांनी महाभारत हा महान ग्रंथ लिहिला. 'महाभारत' हा मानवजातीला आदर्श जीवनमूल्ये देणारा ग्रंथ आहे. यात संपूर्ण मानवजातीला उपकारक अशी शिकवण दिली आहे. म्हणूनच असे म्हणतात 'व्यासोच्छिष्ट जगत् सर्वम् '.

       गुरू या दोन अक्षरी शब्दाचा अर्थ अज्ञान, अंधकार नष्ट करणारे असा होतो. गुरू हे ब्रम्हा, विष्णू, महेश आहेत. इतकेच नव्हे तर गुरू हे साक्षात परब्रह्म असे म्हटले आहे. 
'गुरूविण देव दूजा ।पाहता नाही त्रिलोकी'
असे संतश्रेष्ठांनी म्हटले आहे. 

संत कबीर गुरूंबाबत म्हणतात.
"गुरु गोविंद दोऊ खडे, किसके लागू पाय ।
बलिहारी गुरूदेवकी, जिन गोविंद मिलाय ।
याचा अर्थ असा गुरू आणि गोविंद एकाच वेळेला माझ्यासमोर उभे राहिले तर मी प्रथम गुरुंच्या पाया पडेन कारण गुरूंनीच गोविंद म्हणजेच ईश्वराचा रस्ता मला दाखविला. गुरू हे कुंभार व शिष्य हा घडा असतो. आतून हाताचा आधार देऊन वरून धपाटा मारून, त्याचे दोष काढून त्याला सुंदर आकार तो कुंभार देत असतो.

       गुरू शिष्याची परंपरा प्राचीन काळापासून भारतात आहे. आध्यात्मातील दीक्षागुरू,  माता पिता हे संस्कारगुरू, विद्यादान करणारे शिक्षणगुरू, कला शिकविणारे कलागुरू असे अनेक रूपातील गुरु आपले जीवन संपन्न करतात म्हणूनच गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजन, गुरूवंदन केले जाते. आज अगदी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातही ही परंपरा जपली जात आहे. संकटकाळी शिष्य गुरूचा धावा करतो व गुरूही शिष्याला तारून नेतो असे म्हणतात....
"ज्याच्या पाठीशी सद्गुरूनाथ, तो कैसा राहील अनाथ?"

गुरूंच्या सहवासात अज्ञ असणारे तज्ज्ञ होतात. म्हणून म्हणतात 'गुरु के साथ जीना एक मजा है और गुरू को छोड के जीना एक सजा है।' 

       शारदेच्या मंदिरात विद्यार्थी हे भक्त व गुरू हे पुजारी असतात. भक्त आणि देवता यांची भेट घालून द्यायचे पवित्र काम गुरुना करायचे असते. ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सूर्याला माहित नसते की त्याच्या किरणामुळे फुले फुलतात तसे गुरूंना माहित नसते की त्यांच्या संस्कारामुळे विद्यार्थी घडतात. म्हणून म्हटले जाते गुरूविण कोण दाखविल वाट' 'गुरुनी दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा ।'

       शिक्षकांच्या बौद्धिक उंचीवरुन राष्ट्राची उंची मोजली जाते. राष्ट्र उभारणीमध्ये गुरु हा महत्त्वाचा कणा असतो. गुरूंना गुरुमाऊली म्हटले जाते कारण गुरूंना मातेचे अंतःकरण असते. अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग व उपदेश गुरू आपल्या शिष्याला करतात. हा ज्ञानाचा प्रकाश देताना गुरू आपल्या शिष्याकडून कोणतीही अपेक्षा करत नाहीत याउलट त्याला सर्व प्रकारचे ज्ञान देऊन शिष्यांच्या जिवनाचे कल्याण करतात. सत्व-रज-तम या गुणांपासून उत्पन्न झालेली दिव्यशक्ती ज्याच्याजवळ असते तीच व्यक्ती गुरूपद भूषवू शकते.

       प्रत्येकाच्या जीवनात अनेक व्यक्ती येतात. त्यापैकी गुरूंचे स्थान हे अनन्यसाधारण आहे. आपल्या मनात ज्ञानार्जनाची खरी तळमळ, श्रद्धा, विश्वास, प्रेम या गोष्टी असतील तसेच आपली निष्ठा गुरूचरणी असेल तरच गुरूंच्या रूपात एक चांगली व्यक्ती आपल्याला भेटते व अशा गुरूंचा कृपाशिर्वाद आपणास मिळतो. संतवचनाप्रमाणे परीस लोखंडाचे सोने करतो कारण त्याचा तो गुणधर्म आहे. ते लोखंड नवे आहे, जुने आहे की गंजलेले आहे हे परीस पहात नाही. पण त्यासाठी गुरूबद्दल आदर व निष्ठा हवी.

       प्राचीन काळी मलयगिरीच्या चंदनवनापासून ते काश्मिरच्या नंदनवनापर्यंत अनेक गुरुंचे आश्रम होते. एका ऋषीच्या आश्रमात 'अरूणी' नावाचा एक शिष्य रहात होता. एकदा ऋषींनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले. आश्रमापासून कांही अंतरावर एक बांध फुटला होता व त्याचे पाणी आश्रमाच्या दिशेने येत होते. तेंव्हा तो बांध दुरूस्त करण्याचे व पाणी अडवण्याचे किम गुरूंनी अरूणीला सांगितले. अरूणी त्याठिकाणी गेला. त्याने पाण्याचा प्रवाह अडविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु त्याला ते जमले नाही.  शेवटी स्वतःच तो आडवा झोपला व त्याने तो प्रवाह थांबविला. रात्र झाली तरी अरूणी आला नाही. तेंव्हा ऋषी त्याला शोधत त्याठिकाणी गेले. "अरूणी तू कोठे आहेस?" असे म्हणत गुरु त्या बांधाजवळ आले. अरूणीचा आवाज क्षीण झाला होता. पाण्याने व थंडीने तो गारठला होता. गुरूनी त्याला उठविले. त्याला पाहून ते ऋषी धन्य झाले. ते म्हणाले, "शिष्य असावा तर अरूणीसारखा! गुरूंची आज्ञा पाळताना स्वतःच्या जिवाचीही पर्वा न करणारा! धन्य तो शिष्य आणि धन्य त्याचे गुरु!

       जन्मल्यावर पहिल्यांदा 'आई माझा गुरु' असते कारण ती खायला, प्यायला, बोलायला, चालायला शिकविते. त्यासाठी मातृदेवो भव म्हटले जाते, पितृदेवो भव असेही म्हटले जाते. कारण वडिलांच्या खांद्यावर बसून आपण हे जग पहातो. आपल्याला अक्षर ओळख करुन देणारे, आपल्याला ज्ञानामृत पाजणारे आपले शाळेतील गुरू असतात. तद्वत मला वाटते निसर्ग हा आपला सर्वात मोठा गुरू आहे, जो सातत्यपूर्ण कर्तव्यकर्माची व निरपेक्ष ज्ञानाची शिकवण आपल्या प्रत्यक्ष कृतीतून अखंडपणे देत असतो. अशा भिन्न भिन्न गुरूकडून आपण खूप कांही मिळवतो. खरंच जीवनात गुरूकडून कांहीतरी मिळवायचे असेल तर आपली समर्पणाची तयारी हवी. कारण घेण्यापेक्षा देण्यातून मिळणारा आनंद अनमोल असतो. शेवटी गुरूंची महती सांगताना मी एवढेच म्हणेन.....

रात्रीनंतर उगवते,
ती पहाट असते ।

कलेकलेने  वाढतो,
तो चंद्र  असतो ।

क्षीतिजापाशी झुकते ,
 ते आकाश असते ।

इतरांना श्रेष्ठ बनवतो,
तो गुरू असतो ।

बुधवार, २१ जुलै, २०२१

बेंदूर बैलपोळा: श्रमाची पूजा - विशेष लेख


२२ जुलै दिवशी बेंदूर म्हणजेच बैलपोळा हा सण साजरा केला जातोय त्यानिमित्त या सणाविषयी थोडेसे....

बेंदूर बैलपोळा: श्रमाची पूजा - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       भारत हा कृषिप्रधान देश आहे. कृषिसंस्कृती हा देशाचा प्राण आहे. कृषीसंस् कृती म्हटले की शेती, शेतकरी, शेतीची अवजारेही आपसूकच येतात. आषाढ पौर्णिमेला हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. वर्षभर कष्ट उपसणाऱ्या बळीराजाच्या आणि बैलांच्या प्रेमाचे प्रतिक असलेला बैलपोळा मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. वर्षभर कामाचे जोखड म्हणजेच जू ओढणाऱ्या बैलांचा सण म्हणून ओळखला जाणारा बेंदूर दक्षिण भारतात 'पोंगल', दक्षिण महाराष्ट्रात 'बैलपोळा', कर्नाटकात 'कार हुजरी' या भिन्न नावांनी ओळखला जातो. ज्येष्ठ पौर्णिमेला जून महिन्यात कर्नाटकी बेंदूर तर जुलै महिन्यात देशी बेंदूर म्हणजेच महाराष्ट्रीयन बेंदूर या नावाने स्थानपरत्वे दोन वेळा साजरा केला जातो.

बेंदूर सणांविषयीची एक आख्यायिका:
       बेंदूर हा सण कसा सुरू झाला याविषयीची एक आख्यायिका आहे. कैलास पर्वतावर एकदा शंकर व पार्वती सारीपाटाचा डाव खेळत होते. पार्वतीने सारीपाटाचा डाव जिंकला. मात्र शंकराने मीच डाव जिंकला असा दुराग्रह धरला. हा वाद कांहीं मिटेना. तेंव्हा  पार्वतीने साक्षीदार असलेल्या नंदीला डाव कोणी जिंकला? असे विचारले. मात्र नंदीने शंकराच्या बाजूने मान हलवताच रागावलेल्या पार्वतीने 'मृत्यूलोकी तुझ्या मानेवर जू बसेल आणि तू जन्मभर कष्टच उपसशील' अशी शापवाणी उच्चारली. या शापवाणीने भयभीत झालेल्या नंदीने पार्वती कडे उःशाप मागितला. तेंव्हा पार्वतीने वर्षातील एक दिवस शेतकरी तुझ्या मानेवर जू न ठेवता तुझी पूजा करतील असा उःशाप दिला. तेंव्हापासून बेंदूर हा सण साजरा केला जातो. ही आख्यायिका एका कवीने काव्यबद्ध केली आहे. ही कविता आम्ही पांचवी-सहावीला असताना पाठ्यपुस्तकात होती. ती कविता अशी....

सहज एकदा कैलासावर
बसुनी पार्वती आणिक शंकर
मजेत सारीपाट खेळती
गंमत नंदी हसत बघे ती ।

बेंदूर सण कसा साजरा केला जातो..
बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पहाटे गरम पाण्याने आंघोळ घातली जाते. नंतर त्याला शेंगतेल, कोंबडीच्या अंड्यातील बलक बैलाना पाजतात. डोक्याला बाशिंग बांधून पाठीवर झुली टाकतात. बैलांच्या शिंगाना छान रंग लावतात. त्यावर सोनेरी, चंदेरी कागद चिकटवून रिबीनी बांधतात. गळ्यात घुंगराची माळ घालतात. या दिवशी नवीन वेसण, म्होरकी, कंडा बैलाना घालतात. बैलांच्या अंगावर विविध रंगाचे ठसे उमटवले जातात. बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. या सणाचे वर्णन यथार्थपणे एका कवीने या कवितेत केले आहे. ती कविता अशी...

शिंगे रंगविली, बाशिगे बांधली
चढविल्या झूली, ऐनेदार ।
राजा, प्रधान, रतन दिवाण
वजीर पठाण सुस्त मस्त ।

खांदेमळणी:
बैलांच्या वशिंडापासून पुढील भाग आणि मानेचा वरचा भाग म्हणजे खांदा. बेंदूर सणाच्या दिवशी बैलांची खांदेमळणी केली जाते. या दिवशी बैलांचे खांदे गरम पाण्याने धुतले जातात म्हणजेच शेकले जातात. त्यानंतर बैलांच्या खांद्याना हळद लावली जाते.

मिरवणूक व कर तोडणे:
या दिवशी संध्याकाळी बैलांना सजवून मिरवणूक काढली जाते. बैलांच्या शिंगाना फुगे, पायात तोडे, गळ्यात घुंगराच्या माळा, अंगावर झूल टाकून गावच्या वेशीत कर तोडण्यास जातात. गावच्या वेशीत सर्व बलुतेदार लोक गवत व पिंजर एकत्र करून त्यामध्ये पिंपळाची पाने टोचून लावतात त्याला कर म्हणतात. ही कर दोन्ही बाजूला ओढून आडवी धरली जाते. बैलाला वाजत गाजत पळवत आणून त्यावर उडी मारण्यास भाग पाडतात. बैलाने उडी मारताच कर तुटते. कर तोडणे म्हणजे सर्व बंधने तोडून नव्याने सुरुवात करणे होय.

       बैलाने वर्षभर केलेल्या काबाडकष्टाच्या जोरावर अन्नधान्य पिकवून शेतकरी सधन व संपन्न होतो त्यामुळे बैल हेच त्यांचे दैवत असते. या सणाच्या वेळी शेतकरी पेरण्या करून रिकामा झालेला असतो. पिकांचे हिरवेगार अंकुर पाहून आनंदी झालेला शेतकरी आनंदाने हा सण साजरा करतो.

शेतकरी व बैल यांचे नाते कसे जिवाभावाचे असते हे दाखविणारा एक ह्रदयद्रावक प्रसंग:
       ता. आष्टी, जि. बीड उस्मानाबाद येथील दादासाहेब झानजे या शेतकऱ्याकडे एक बैलजोडी असते. बैलपोळा या सणाच्या दिवशी त्याने बैलाला सजविले. पत्नीने बैलांचे पूजन केले, औक्षण केले. बैलांना नैवेद्याचा घास भरवला. गडबडीत पूजेसाठी आणलेले मंगळसूत्र तिथेच विसरले. कांहीं वेळानंतर मंगळसुत्राची शोधाशोध सुरु झाली. एका बैलाने नकळत वैरणीबरोबर ते गिळले असावे अशी शंका आल्यावर शेतकऱ्यांने व्हेटर्नरी डॉक्टराकडून एक्सरे काढून घेतला. बैलाच्या पोटात मंगळसूत्र दिसले. ऑपरेशन करून मंगळसूत्र काढता येईल असे डॉक्टरांनी सांगितले. त्यावर डोळ्यात पाणी आणून शेतकरी म्हणाला, "डॉक्टरसाहेब, मंगळसूत्र पन्नास-साठ हजाराचे असेल ते राहू द्या बैलाच्या पोटात पण आमच्या सुखदुःखात साथ देणाऱ्या माझ्या या सख्याला त्रास होता कामा नये. माझा मित्र ऑपरेशनमुळे अधू होता कामा नये. बैलावर जिवापाड प्रेम करणाऱ्या शेतकऱ्याचे हे बाणेदार उत्तर ऐकून डॉक्टर थक्क झाले. आणि विशेष म्हणजे, तिसऱ्या दिवशी रवंथमधून मंगळसूत्र बाहेर पडले. याला म्हणतात बैलावरील प्रेम. धन्य तो शेतकरी व धन्य तो त्याचा बैल.

सोमवार, १९ जुलै, २०२१

खरा वारकरी - प्रासंगिक लेख


दिनांक २० जुलै २०२१ आषाढी एकादशीचा दिवस त्यानिमित्ताने विशेष प्रासंगिक लेख.


खरा वारकरी - प्रासंगिक लेख

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       ११ लाख वारकरी हरिनामाचा गजर करत करत पुण्यनगरी पंढरपुरात दाखल होतात. नितांत श्रद्धेने पांडुरंगांच्या चरणी माथा ठेवतात. श्रद्धेने ओलेचिंब झालेले वारकरी देहभान विसरून भक्तीमार्गात रममाण झाल्याचे चित्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण दरवर्षी पाहतो. हे सर्व वारकरी भक्तीमार्गातील दीपस्तंभ बनून आपणा सर्वांना प्रेरणा देत असतात. काही वर्षांपूर्वी मी सेवेत असताना आषाढी एकादशीपूर्वी मला एक आगळावेगळा व सच्चा वारकरी भेटला. त्या महान वारकऱ्यांविषयी...


       दुपारचे दोन वाजले होते. एका बावळ्या वेषातील व्यक्तीने शाळेच्या प्रांगणात प्रवेश केला. त्याच्या पोशाखावरून अनेक मागतकऱ्यांपैकी एक मागतकरी असावा असे आम्हा सर्व शिक्षकांना वाटले. तो आला. त्याने नम्रपणे सर्वांना नमस्कार केला म्हणाला, "मी वारकरी आहे. गेली २५ वर्षे मी एकदाही वारी चुकवली नाही. वर्षभर काबाडकष्ट करून वारीला जातो. यावर्षी माझे अपेंडिक्सचे ऑपरेशन झाल्याने पंढरीला जाण्याइतकी रक्कम मी जमवू शकलो नाही व चालतही जाऊ शकत नाही, पण छोटी छोटी कामे करून मी वारीला चाललो आहे. कृपया तुमच्या शाळेतील एखादे काम सांगा". आमच्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले, "आम्ही तुम्हाला काम न करता मदत केली तर?" वारकरी पट्कन म्हणाला, "नको मला फुकटचे पैसे नका देऊ. कुठलेही काम सांगा, सांगाल ते काम करीन. द्याल तेवढे पैसे घेईन. फुकटचे पैसे घेऊन वारीला आलेले माझ्या वारकरी पांडुरंगाला आवडणार नाही".


       शेवटी मुख्याध्यापकांनी त्याला बाथरूम व व्हरांडा स्वच्छ करण्यास मांगितले. क्षणाचाही विलंब न लावता तो उठला. त्याने खराटा व बादली घेतली. विठ्ठलनामाचा गजर करत करत त्याने व्हरांडा व बाथरूम चकाचक केले. तो काम करत होता आम्ही सर्व शिक्षक 'त्या वारकऱ्याचे सात्विक भाव, निस्सीम भक्ती, अजोड श्रद्धा व कार्यमग्रता न्याहाळत होतो'. मुख्याध्यापकांनी ५० रुपयांची नोट हातावर ठेवताच. त्यांचा चेहरा आनंदाने फुलून गेला. पण जाता जाता आम्हा... सर्वांना खऱ्या भक्तीचा मार्ग दाखवून गेला. 

धन्य तो वारकरी! धन्य त्याचा प्रामाणिकपणा.

                             

रविवार, ११ जुलै, २०२१

लोकसंख्या वाढः एक गंभीर समस्या - विशेष मराठी लेख


११ जुलै हा जागतिक लोकसंख्या विस्फोट दिन म्हणून पाळला जातो त्यानिमित्त हा विशेष लेख..

लोकसंख्या वाढः एक गंभीर समस्या - विशेष लेख

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी 


फोटो साभार: गूगल

       ११ जुलै १९८७ रोजी युगोस्लाविया या देशात जन्मलेल्या बालकांनी जगाची लोकसंख्या पाचशे कोटीच्या घरात पोहचवली, म्हणून लोकसंख्या वाढीची जाणीव करून देण्यासाठी ११ जुलै हा लोकसंख्या विस्फोट दिन म्हणून किंवा लोकसंख्या इशारा दिन म्हणून पाळला जातो. १६५० साली जगाची लोकसंख्या पन्नास कोटीच्या घरात पोहोचली. १८५० च्या दरम्यान लोकसंख्या दुपटीने वाढून १०० कोटी झाली. सध्या भारताची लोकसंख्या जगात दोन नंबरची असली तरी पुढील कांही वर्षात भारताची लोकसंख्या चीनच्या बरोबर होईल म्हणून ही वाढ रोखणे आवश्यक आहे. जगाच्या भूक्षेत्रापैकी २:४२ टक्के जमीन असणाऱ्या आपल्या भारत देशाला १५ टक्के लोकांचे पोषण करावे लागते. एकीकडे लोकसंख्या वाढत आहे तर दुसरीकडे पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्ती झपाट्याने कमी होऊन पाऊस काळ पूर्ण कमी झाला आहे.

       सध्या भारताची लोकसंख्या ढोबळमानाने १३५ कोटींच्या घरात आहे. सध्या भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर हा चीनपेक्षा अधिक आहे आणि अशाच पद्धतीने लोकसंख्या वाढत राहिली तर २०२७ पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असेल.

       या आकडेवारीला विशेष महत्त्व देण्याचे कारण हा आराखडा संयुक्त राष्ट्र संघाच्या पाहणीत समोर आला आहे. अशी लोकसंख्या वाढीची स्थिती बघता केंद्र सरकारने योग्य तो कायदा अथवा नियम करावे अथवा सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला लोकसंख्या वाढीला आळा घालण्याचे निर्देश द्यावेत.

भारताची लोकसंख्या वाढीची स्थिती:
       भारताच्या लोकसंख्या वाढीबाबत सरकारने स्वतः कांही निरीक्षणे केलेली आहेत. सध्याची भारताची लोकसंख्या वाढीची स्थिती या अहवालामधून अधोरेखित होते. त्यातील राष्ट्रीय कुटुंब आरोग्य निरीक्षणाचा रिपोर्ट भारतातील लोकसंख्या वाढीची स्थिती समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. या अहवालानुसार भारतातील लोकसंख्या वाढीचा दर हा एकसमान नाही. सर्वात गरीब लोकांमध्ये हा दर सर्वाधिक आहे, तर सर्वाधिक श्रीमंत लोकांमध्ये हा सर्वात कमी आहे. सर्वात गरीब व्यक्तीमध्ये हा दर ३.२ इतका आहे. म्हणजेच गरीब व्यक्ती मध्ये अपत्य दर तीन किंवा तीनपेक्षा जास्त अपत्य एवढा आहे. हाच दर मध्यमवर्गीय कुटुंबात २.५ एवढा आहे. यानुसार मध्यमवर्गीय कुटूंबात दोन ते तीन अपत्य दर आहे. यानुसार उच्च वर्गात प्रति कुटुंब अपत्य दर एक ते दोन आहे. या अहवालानुसार असे आढळून आले की, ज्या वर्गामध्ये आर्थिक उत्पन्न कमी आहे तेथे हा दर जास्त प्रमाणात दिसून येतो. तर जेथे आर्थिक उत्पन्न जास्त आहे अशा कुटुंबामध्ये हा दर सर्वात कमी आहे. यानुसार वाढणारी लोकसंख्या आणि आर्थिक स्थिती यांचं समीकरणही स्पष्ट होते.

लोकसंख्या वाढीचे परिणाम:
       कुठल्याही देशात लोकसंख्या सर्वात महत्त्वाचा घटक असतो. अर्थातच देशाची धोरणे, उत्पन्न आणि कारभार त्या लोकसंख्येला अनुसरूनच ठरविला जातो. अशावेळी लोकसंख्या मर्यादित नसेल तर उपलब्ध साधनसंपत्तीचे योग्य वितरण होण्यामध्ये बाधा निर्माण होते आणि पर्यायाने देशाच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो. देशातील गरिबी, भूक आणि कुपोषणाच्या समस्या जास्त प्रमाणात वाढतात. लोकसंख्या वाढीचा दुसरा प्रत्यक्ष परिणाम हा त्या देशाच्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावरही झालेला दिसून येतो. संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक पातळीवर मार्गदर्शनपर काही ध्येये घालून दिलेली आहेत प्रत्येक देशाने २०३० पर्यंत शक्य असेल तेवढ्या प्रमाणात या ध्येयाना प्रत्यक्षात आणण्यासाठी काम केले पाहिजे. यामध्ये सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे, भूक शमवून अन्न सुरक्षा प्रदान करणे यासोबतच उत्तम आरोग्य आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणे अशा तत्वांचा समावेश होतो. भारताची लोकसंख्या याच प्रमाणात वाढत राहिली तर शाश्वत विकासध्येय गाठणे भारताला शक्य होणार नाही. जागतिक पातळीवर भारतासाठी हा मोठा कलंक असेल. भारतातील रोजगाराची आकडेवारी अजूनच थक्क करणारी आहे. भारतात दरवर्षी अडीच कोटी सुशिक्षित शिक्षण घेऊन रोजगारासाठी तयार असतात परंतु त्या तुलनेत भारताची प्रतिवर्षी रोजगार निर्मिती क्षमता ही फक्त सत्तर लाख एवढी आहे. ही आकडेवारी बेरोजगारीच्या समस्यांचे विश्लेषण करते.

लोकसंख्या वाढ: उपाययोजना
       या गंभीर समस्येकडे हव्या तेवढ्या गंभीरतेने पाहिले जात नाही. लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी हुकूमशाहीची काहीच गरज नाही हे केरळने सिद्ध केले आहे. वास्तविक लोकसंख्यावाढ रोखणे हा शासकीय कार्यक्रम न होता तो जनतेचा कार्यक्रम व्हावा. यासाठी एक व्यापक चळवळ उभी करून निर्धार करून लोकसंख्या रोखता येईल. या देशाचे दारिद्रय, बेरोजगारी, आर्थिक विषमता यासाठी जनतेने एक जन आंदोलन उभारले पाहिजे.

       आज जगात संरक्षण साहित्य निर्मिती करण्यात फार मोठी चढाओढ लागली आहे. या प्रचंड खर्चामुळे सामान्य नागरिकाला मूलभूत गरजांपासून वंचित रहावे लागत आहे. आपल्यासारख्या विकसनशील देशाने लोकसंख्येला आळा घालून लोकसंख्येचे विकेंद्रीकरण करायला आरंभ करायला हवा. कमी होणाऱ्या साधन संपत्तीचा दर कसा रोखायचा, नवनवे पर्याय कोणते शोधायचे, नियोजन करून साधनसंपत्ती काटकसरीने कशी वापरायची हे ठरवायला हवे. समाजातील प्रत्येकाने कायद्याची वाट न बघता स्वतः जबाबदारीने या प्रश्नाकडे बघणे हाच या प्रश्नावर सर्वोत्तम उपाय आहे. आपल्या देशाची लोकसंख्या रोखली पाहिजे. आपण एक मूल एक झाड हे तत्व अंगिकारायला हवे. मुलगा-मुलगी एकसमान मानायला हवे. अन्यथा आजच्या गतीने लोकसंख्या वाढत राहिली तर पुढील कांहीं वर्षांत भारतीयांना रहायला घरचं काय, पाय ठेवायला सुद्धा जागा मिळणार नाही. म्हणून आपण कठोर निर्णय घेऊन व योग्य नियोजन करून वाढणारी लोकसंख्या रोखायला पाहिजे.

भारताची दिलासादायक  गोष्ट:
       सध्याच्या काळात जगातील सर्वात तरुण लोकसंख्या भारतीय आहे. याच गोष्टीचा फायदा भारताला सर्वात जास्त होतो आहे. आज जगातील सर्वाधिक कार्यक्षम वर्ग भारताकडे असणे हे आजचे भारताचे सर्वात महत्त्वाचे भांडवल आहे. याच कारणामुळे लोकसंख्या नियंत्रणासारखे उपाय मागे पडताना दिसत आहेत. तसेच या देशाची लोकसंख्या गरीब असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे लोकसंख्या नियंत्रणासाठी लोकांना गरिबीतून वरती काढणे हा लोकसंख्या नियंत्रण उपायापेक्षा सरस उपाय असल्याचे सरकारचे धोरण आहे.

       बंधू-भगिनींनो लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी आपण आपल्या परीने प्रयत्नशील राहू या. देशाच्या विकासासाठी खारीचा वाटा उचलू या ।

रविवार, ४ जुलै, २०२१

हराकी (कादंबरी) - पुस्तक परीक्षण

 

हराकी (कादंबरी) - पुस्तक परीक्षण

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी 






लेखक - मनोहर भोसले

प्रकाशक - तेजश्री प्रकाशन, कबनूर.

ISBN: 978-81-950181-2-3


       एका सुप्रसिद्ध, प्रतिभासंपन्न, चिंतनशील लेखकच्या धारदार लेखनीतून साकारलेली एक नितांतसुंदर कादंबरी वाचनात आली. ही कादंबरी वाचण्यापूर्वी 'हराकी' या शब्दाचा अर्थही माहित नसलेली मी कादंबरी वाचताना अक्षरशः भारावून गेले. स्मशानभूमीतून सुरु झालेली ही उत्कंठावर्धक कादंबरी स्मशानभूमीतच संपते, पण एकदा वाचायला सुरुवात झाली की वाचकाची अवस्था झपाटल्यासारखी होते. पुस्तक खाली ठेवावेसे वाटत नाही, हेच या लेखकांचे यश आहे. ग्रामीण बाज असलेली चटकदार भाषाशैली, सुंदर मांडणी, हुबेहूब प्रसंगवर्णने यामुळे एक उत्कृष्ट साहित्यकृती साकारण्यात लेखक शंभर टक्के यशस्वी झाले आहेत. या कादंबरीने जीवनाचे एक विदारक सत्य वाचकांसमोर उभे केले आहे. मानवी जीवनाची विफलता स्पष्ट करतांना लेखक म्हणतात....

'सरणावर ठेवल्यानंतर कमरेचा करदोडासुद्धा तोडून काढला जातो.'

यावरून आयुष्यभर माझं माझं म्हणून धन जोडणारे निश्चितच बोध घेतील. बहुजन समाजाच्या पाचवीला पूजलेल्या गरिबीचं वर्णन या श्रीमंत लेखकाने फारच सुरेख रेखाटलं आहे.


       स्मशानभूमीतून चिता पेटवून उरलेल्या राॅकेलचं कॅन घेऊन घरी आलेल्या नवऱ्याला बघून सखूला आनंद झाला. बऱ्याच दिवसानंतर आज दिव्याला तेल मिळालं असं तिला वाटलं.


       मनुष्यानं कुठल्या जातीत जन्माला यावं हे त्याच्या हाती नसतं पण जीवनात येऊन कसं वागावं? कसं जगावं? हे साध्याभोळ्या यमनाप्पाच्या जीवनातून शिकण्यासारखं आहे.


       या कादंबरीत समाजातील चालीरीती, अंधश्रद्धा यावर प्रकाश टाकून त्यामागील वैज्ञानिक, सामाजिक कारण सांगण्याचा अभ्यासपूर्ण  प्रयत्न केला आहे. जुने ते सोने आणि नवे ते हवे या कात्रीत सापडलेल्या लोकांना यामुळे निश्चित दिशा मिळेल असे वाटते कारण नैवेद्य शिवणारा कावळा निसर्गाचा समतोल राखणारा पक्षी कसा हे पटवून दिले आहे. हराळी दाहनाशक वनस्पती आहे असे सांगितले आहे. हराकी ची प्रथा सामाजिक ऐक्य टिकविण्यासाठी सुरु  झाली असावी. प्रेताच्या डोक्यावर दही का घालतात? प्रेताला कढत पाण्याची आंघोळ का घालतात? डोळ्यात सोन्याचा मणी का घालतात? निधन झाल्यावर घराची साफसफाई करून गोमूत्र का शिंपडले जाते? शिंकाळे कशासाठी असते? चितेभोवती पाणी का शिंपडले जाते? या सर्व प्रश्नांची उत्तरे या कादंबरीत मोठ्या खुबीने दिली आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी रसिक वाचकहो ही कादंबरी तुम्ही अवश्य वाचावी.


       या कादंबरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील एखाद्या प्रसंगाचे वर्णन करताना प्रसंगाला जिवंतपणा आणण्यासाठी जी वाद्ये वाजविली जातात त्यांच्या आवाजाला दिलेले शब्दरूप. ते वाचताना ती वाद्ये वाजत असल्याचा भास होतो...

ढिप्पांग टिप्पांग

ढगाडांग टकाडांग टांग टांग

टकाटकाटकाटका 

काटकूट काटकूट फुटांग फुटांग.


       या कादंबरीत जातीभेदातून माणसा-माणसात पडलेली दरी दिसते. दरी  मिटविण्यासाठी प्रयत्न करणारे कॅप्टन कुटूंबिय  भेटतात. वेगळं व्हायचंय मला म्हणणारी युवा पिढी पुढे येते. कोळी गुरुजींचे देशप्रेम, पैलवान आण्णांचे मित्रप्रेम, एस्. टी. चालकाची माणुसकी, आत्मारामच्या भावाचे शहाणपण या सर्वासर्वांचा प्रत्यय कादंबरी वाचतांना येतो.


       कादंबरीत ह्दय पिळवटून टाकणारे अनेक प्रसंग  वाचकांना मंत्रमुग्ध करून सोडतात. सखूच्या शेळी विक्रीचा प्रसंग, खुळ्या आत्मारामच्या मृत्यूचा प्रसंग, पैलवान आण्णांच्या निधनाचा प्रसंग अंगावर शहारे आणतात.


       थोडक्यात हराकी ही ग्रामीण साहित्यातील एक अनमोल रत्न आहे. पानां-पानावर लेखकाच्या अचूक निरिक्षण क्षमतेचा, शब्दसंपत्ती वरील प्रभुत्वाचा, चिंतनशील लेखनाचा प्रत्यय येतो.


       या कादंबरीचे नेमके परीक्षण करण्यासाठी मला वाटते दुसरी कादंबरीच लिहावी लागेल आणि ते मला जमेल असे वाटत नाही.


शेवटी एवढंच म्हणेन....

शब्दानांही कोडं पडावं 

असे थोर लेखक असतात ।

केवढं आपलं भाग्य असतं

की ते आपल्या जवळचे असतात.


शब्दांकन

डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी 

जयसिंगपूर.