पुस्तक परिक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुस्तक परिक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०२५

पुस्तक परीक्षण साथी आनंद के ( हिंदी अनुवाद )

 


पुस्तक परीक्षण

साथी आनंद के ( हिंदी अनुवाद )

मूळ लेखक ( मराठी ) - श्री. विजय दादा आवटी ( राष्ट्रपती                                                पुरस्कार विजेते मुख्याध्यापक )

हिंदी अनुवाद - डॉ. सौ.ज्युबेदा मन्सूर तांबोळी.

प्रकाशक- स्वरूप प्रकाशन ,जयसिंगपूर

प्रथम आवृत्ती- २ आक्टोबर २०२५

मूल्य-१५० रूपये

पृष्ठे -१४०


'सवंगडी हे आनंदाचे' हे व्याख्यान केसरी विजय दादा आवटी यांनी लिहिलेले मराठी पुस्तक आहे. या पुस्तकाचा डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी यांनी केलेला हिंदी अनुवाद 'साथी आनंद के' हे पुस्तक वाचनात आले.


         सुंदर, बोलके मुखपृष्ठ असलेले, मजबूत बांधणीचे, उत्कृष्ट छपाई असलेले हे पुस्तक मनोरंजनाचा खजिना आहे असे वाटले. या पुस्तकात १६३ विनोदी चुटकुले, घटना, सहज घडलेले प्रसंग समाविष्ट आहेत. प्रत्येक विनोदाला साजेशी बोलकी चित्रे आहेत त्यामुळे हे पुस्तक वाचताना खूपच मजा येते. हसू गालात लपून राहीना अशी अवस्था होते.


         या पुस्तकाचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकाची प्रस्तावना सतरा पानांची आहे. प्रस्तावनेमध्ये लेखकांनी सद्याच्या धावपळीच्या व तणावपूर्ण वातावरणात राहणाऱ्या लोकांना मनोरंजनाची व हसण्याची किती आवश्यकता आहे हे समजावून सांगितले आहे. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी हसण्याची गरज आहे आणि ही गरज या पुस्तकाच्या वाचनातून बऱ्याच अंशी पूर्ण होते असे मला वाटते. तणाव कोणत्या कारणांमुळे निर्माण होतात, त्यावरील उपाय कोणते?  आपण आनंद यात्री बनावे, गीत गुणगुणत जगावे, नेहमी आशावादी असावे, समाधानी व शांत रहावे, हसण्याचे फायदे, विचारविनिमय करावा, हसणे व हसविण्याचे तंत्र, विनोद कसे असावेत व कसे नसावेत या सर्व मुद्द्याबद्दलची शास्त्रोक्त माहिती प्रस्तावनेत वाचायला मिळते. वैद्यकीय ग्रंथातून संकलित केलेली हसण्याचे महत्त्व विषद करणारी माहिती प्रस्तावनेत वाचायला मिळते. ज्ञानातून मनोरंजन व मनोरंजनातून माणसाने मनापासून हसले पाहिजे हा संदेश लेखकांनी दिला आहे.


     हसण्यामुळे बऱ्याच व्याधी दूर होतात हे सांगताना अनुवादित पुस्तकात म्हटले आहे.

"ही दवाएँ, नही गोलियाँ ।

हँसते हँसते बजाएंगे तालिया ।।

सब रोगों की एक दवाई ।

हँसना सीखो मेरे भाई ।।"


१६३ विनोदी घटनाओं मे बहुतही हसीन किस्से आएं हैं जैसे की- कॉलेज बस स्टाॅप पर ग्यारहवी की अपेक्षा बारहवी कक्षा में पढनेवाले छात्र बहुत होशियार। 

बारहवी कक्षा में पढनेवाला एक लडका खडा था। सामने से एक खूबसूरत लडकी जा रही थी। उसे देखकर लडके ने कहा

" रूप तेरा , सूर मेरा

गाना एक कहूँ क्या ? "

लडकी खूबसूरती के साथ होशियार भी थी। उसने कहा....

"गाल तेरे, हाथ मेरे

कान के नीचे एक दे दूँ क्या ?" 

 

विनोदी घटनांचा समावेश लेखकांनी खुबीने केला आहे. 

उदा. दुनिया गोल है।

अध्यापक ने एक लडके से पूछा ।

" बेटा, दुनिया गोल है, य  तू कैसे साबित करके दिखायेगा ?"

लडका कहता है,"झिंगुर चूहे से डरता है। चूहा बिल्ली से डरता है। बिल्ली कुत्ते से डरती है। कुत्ता पप्पा से डरता है । पप्पा मम्मी से डरते हैं  और मम्मी झिंगुर से डरती है।

झिंगुर से  झिंगुर तक, दुनिया गोल है ।"


या पुस्तकात लेखकांनी विनोदी घटना व चुटकुल्यांची विभागवार मांडणी केली आहे. शाळा व अभ्यासाच्या बाबतीततले विनोद, कुटुंबातघडलेले विनोद, प्रवासातील विनोद, व्यवहारात घडणारे विनोद, वक्त्यांच्या बाबतीततले विनोद, थोर व्यक्तींच्या जीवनातील विनोद, जनावरे व पक्षी यांच्या बाबतीततले विनोद, वाईट सवयीमुळे घडलेले विनोद व इतर हास्यविनोद. या विभागणीमुळे वाचकांना विनोद वाचणे सहज व सुलभ झाले आहे.


साथी आनंद के या पुस्तकाच्या मलपृष्ठावर विनोदामुळे हसण्याचे फायदे सारांश रुपात मांडले आहेत. त्यामुळे आपले जीवन आनंदी होण्यास निश्चितच मदत होईल अशी मी ग्वाही देते.

मुस्कराता हुआ चेहरा सफलता की कुंजी है ।

हँसने से बीमारी दूर हो जाती है, लोग करीब आ जाते हैं ।

हँसमुख लोग दीर्घायु होते हैं ।

हँसी के लिए कुछ भी नही लगता, यह मुफ्त दवा है ।

हमारे जीवन का उद्देश खुश रहना है...आनंदी रहना है ।

विनोद से हम हँसते हैं ,दुसरों को भी हँसाते हैं।

हँसने के लिए यह किताब अवश्य  पढो.....

' साथी आनंद के '

परीक्षण कर्त्या - हिना चौधरी.

शनिवार, २६ जुलै, २०२५

पुस्तक परीक्षण आठवण ( कथा संग्रह )

                 ✍️:डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी


पुस्तक परीक्षण
आठवण ( कथा संग्रह )

लेखक- श्री.आबासाहेब सूर्यवंशी

            निवृत्त शिक्षणाधिकारी

प्रकाशक - सुनंदा प्रकाशन , 

                     जयसिंगपूर

पृष्ठे - ९५

मूल्य - १५० रूपये

प्रथमावृत्ती - ३० मार्च २०२५


      लेखक श्री. आबासाहेब सूर्यवंशी यांचा ' आठवण ' हा कथासंग्रह नुकताच वाचनात आला. या कथासंग्रहामध्ये वीस कथांचा समावेश आहे. हे पुस्तक न थांबता एकाच दिवसात वाचले. माझे पती मन्सूर तांबोळी  यांना वाचनाची विशेष आवड नाही. पण त्यांनीही पुस्तक वाचायला घेतल्यावर एकाच दिवसात वाचले. हेच या पुस्तकाचे यश आहे असे मला वाटते. छोटेखानी कथानक , अनुरूप भाषाशैली , मजेशीर प्रसंग , जिज्ञासा वाढविणारी लेखन शैली या सर्व वैशिष्ट्यपूर्ण बाबींनी नटलेल्या कथा वाचतांना अजिबात कंटाळा येत नाही.

    

        या कथासंग्रहातील अस्सल नक्कल , लिफ्ट , लोकप्रतिनिधी , स्पर्धेतील आजोबा , एक एप्रिल , योगायोग , आमचा जीवघेणा प्रवास , एक होता मोहम्मद रफी , राग उथळ प्रेम निथळ , तर आज मी नसतोच , नवरदेवाचा बूट , शिक्षण आणि संस्कार या बारा कथा लेखकांच्या जीवनातील जिवंत अनुभव आहेत. त्यामुळे या कथा वास्तव वाटतात. प्रसंग प्रत्यक्ष पहात आहोत असे वाचतांना वाटते. प्रत्येक कथा  वाचकांना कांही संदेश देवून जातात. या कथा आवडण्याचे दुसरे कारण कथा प्रसंगानुरूप चित्रांमुळे अधिक बोलक्या झाल्या आहेत.


        अस्सल नक्कल कथेमध्ये जातिवंत कलाकार भेटतो , जो अधिकाऱ्यानाही क्षणभर फसवतो. लिफ्ट कथेमधून लिफ्ट देतांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला मिळतो. स्पर्धतील आजोबा मधून नातवंडे म्हणजे आयुष्याचा बोनस असतो , त्यांच्यासाठी आजी आजोबा कांहीही करु शकतात हे समजते. एक एप्रिल या कथेतून एकाद्याची गंमत दुसऱ्याला प्रचंड मानसिक त्रास देऊ शकते हे कळते. आमचा जीवघेणा प्रवास  जगात अजूनही चांगल्या व्यक्ती आहेत याची जाणीव करून देते.

    

      मला सर्वात जास्त आवडलेली कथा आहे ' राग उथळ प्रेम निथळ ' लाख मोलाची सद्या दुर्मिळ झालेली एकत्र कुटूंबपद्धती या कथेत लेखकांनी खुबीने मांडली आहे. पत्नीला मारझोड करणे हा पुरूषांचा जन्मसिद्ध हक्क मानला जात होता ही वास्तविकता लेखकांनी हुबेहूब मांडली आहे. कथेचा शेवटही गोड केला आहे. शिक्षण आणि संस्कार मध्ये शिक्षणाधिकारी या नात्याने शिक्षण व संस्काराचे महत्त्व पटवून दिले आहे. शिक्षणातील गाभाभूत घटकांचे विवेचन केले आहे.

    

     हाँटेल सलून ही विनोदी कथा छान मनोरंजन करते. भूस्खलन ही कथा नैसर्गिक आपत्तीची भयानकता दाखवते. ह्रदय पिळवटून टाकते.

       

      सद्याचे जग हे धावते जग आहे. कुणालाच सद्या वेळ नाही. क्रिकेटवेड्या लोकांनाही हल्ली पाच दिवसाची कसोटी आवडत नाही , ट्वेंटी ट्वेंटी आवडते. हे ओळखून लेखकांनी थोडक्यात पण आशयपूर्ण कथा लिहिल्या आहेत.


      लेखकानी कांही सुंदर वाक्यांची सुरेख पेरणी केली आहे. ती अशी स्पर्धेतील आजोबा या कथेत ते म्हणतात ' माझ्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असणारी माझी तरुण वृद्ध  पत्नी , सत्तरीतला मी .' आमचा जीवघेणा प्रवास या कथेत ते म्हणतात ' नवऱ्याच्या भरघाव गाडीला बायकोचा अर्जंट ब्रेक ' अशी म्हण संसारात आणि प्रवासातही महत्त्वाची हे मला पटून चुकले.


     एक होता मोहम्मद रफी या कथेत ते म्हणतात ' परमेश्वर कोणाला कांही देताना जातधर्म पहात नाही. प्रत्येक माणसाजवळ असे काहीतरी असतेच असते. फक्त आपण ते ओळखणे गरजेचे आहे.'


      थोडक्यात उत्कृष्ट बांधणीचे , सुंदर मुखपृष्ठ असलेले , रेखीव मुद्रण व आशयपूर्ण कथा असलेले हे पुस्तक वाचकांना निश्चित आवडेल अशी मला आशा वाटते.

लेखकांना पढील लेखनकार्यास हार्दिक शुभेच्छा ।

बुधवार, २३ एप्रिल, २०२५

पुस्तक परीक्षण शब्दगंधाशी जडता नाते (काव्यसंग्रह )

 

                ✍️:डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी



             

पुस्तक परीक्षण    

शब्दगंधाशी जडता नाते (काव्यसंग्रह )

कवी -राजकुमार दामू चौगुले.

प्रकिशक -अक्षरदीप प्रकाशन ,

हरिओमनगर रंकाळा (पश्चिम )'कोल्हापूर.

प्रथमावृत्ती- २६/१/२५


पृष्ठे- १०४

मूल्य - रु.१५०-/

        'शब्दगंधाशी जडता नाते 'हा कवी राजकुमार चौगुले यांनी लिहिलेला कविता संग्रह पहिला वाचनात आला.सुंदर मुखपृष्ठ, मजबूत बांधणी, सुबक मांडणी यांनी परिपूर्ण असलेला हा काव्यसंग्रह वाचताना मनस्वी आनंद झाला. वाचकाच्या मनाची पकड घेण्यात हा काव्यसंग्रह यशस्वी झाला आहे.


         कवी राजकुमार चौगुले हे हाडाचे शिक्षक व शिस्तप्रिय मुख्याध्यापक आहेत. नोकरीच्या कालावधीत त्यांनी ' जीवनदीप - शारीरिक शिक्षण कार्यपुस्तिका व नोंदवही इयत्ता नववी व इयत्ता दहावी साठी अशी दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. यावरून त्यांची शारीरिक शिक्षणाबद्दलची अभिरुची दिसून येते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना असलेली तळमळ स्पष्ट होते. म्हणूनच 'ऐकशील का ' या कवितेत विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणतात "।पोपटपंची ज्ञानाने शाना कधी होशील का ?"कवी राजकुमार चौगुले यांनी विविध विषयांवर कविता लिहिलेल्या आहेत. त्यांच्या कवितांचे विषय आहेत निसर्ग, प्रवासवर्णन, शेतातील पिके, विद्यार्थी, समाजस्थिती, राजकारण, जीवनसाथी, नातवंडे, जीवनविषयक तत्त्वज्ञान इत्यादी.हे सर्व विषय पाहता असे दिसून येते की कवी एक आदर्श शिक्षक, कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक, कुटूंबवत्सल पिता, समजूतदार पती,कष्टाळू शेतकरी, संयमी नागरिक व प्रेमळ आजोबा आहेत. कवितांचे वाचन करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू उलगडतात.


          सेवानिवृत्तीनंतर मातीतून मोती पिकवत असताना त्यांच्या हाती शब्दांचे मोती आपसूकच हाती आलेले आहेत. त्या मोत्यांची सुरेख मांडणी करून त्यांनी 'शब्दगंधाशी जडता नाते' हे सुंदर शब्दशिल्प तयार केले आहे.

'आगमन मान्सूनचे ' या कवितेत ते म्हणतात,

रिमझिम बरसत

मान्सून आला

पाहूनिया मृगधारा

बळीराजा सुखावला


          या कविता संग्रहातील सर्वच कविता सहजपणे अंतर्मनातून सहज बाहेर पडल्या आहेत. त्यात कुठेही कृत्रिमता नाही कवीच्या मनीचे भाव प्रांजळपणे व्यक्त झाले आहेत.

          

        आजकाल सर्वच लोक पर्यटनाला जातात , निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना फोटो काढून स्टेटसला लावण्यातच धन्यता मानतात. सरांनी पर्यटनात निसर्गसौंदर्य डोळ्यानी टिपून ह्रदयात साठवून कवितेत मांडलय.

'सुंदर काश्मीर 'या कवितेत ते म्हणतात

सरीवर सर येते,

न्हाती धुती होते,

फूल फुलांच्या सुगंधाला.

भूल जीवाला पडते.

 

'स्वप्न पुस्तकाचे' या कवितेत कवी 

म्हणतात

पुस्तके येतात स्वप्नात

बोलतात माझ्या कानात 

सारखाच होतो हातात

 शब्दगंध असे मुखात

 

'शोध सुखाचा ' या कवितेत सरांनी समाजातील एक अलिखित सत्य मांडले आहे.

सुख शोधलं शोधलं

कधी नाही गवसलं 

वाटलं सापडलं सापडलं

पण हुलकावणीच दिलं

 सुख हे मृगजळ आहे, त्याचा मागे न धावता जीवनगाणे गातच राहिले पाहिजे हा कवींचा सकारात्मक दृष्टीकोन आहे.

'हूं म्हण 'या कवितेत ते म्हणतात

हूं म्हण लेका ,

कानी  सांगतो जन्माची

रात ध्याड, राबून मुला

शाणं कसं कसं झाल्याची.

       

        धर्माचे विडंबन न करता, मंदिरे बांधू नका , त्यापेक्षा ज्ञानमंदिरे बांधण्याचा सल्ला 'गरज 'या कवितेत कवीनी दिला आहे.

      

         'पैसा बोलतोय 'या कवितेत पैशांच्या खेळात जीव गुदमरतो हे सांगितले आहे.

        

         ' घराचे घरपण 'या कवितेत सौ.विषयी गोड तक्रार केली आहे. तिच्या सतत बोलण्याने घराचे घरपण जिवंत राहिल्याचे शेवटी त्यांनी कबूल केले आहे.


'मी जगाचा पोशिंदा 'या कवितेत शहरात राहणाऱ्या लोकांना उद्देशून म्हणतात

दररोजचे दूध तुला

गबाळ्याच्या गोठ्यातूनच येते

रोजची भाजी तुला

अडाण्याच्या शेतातूनच येते.


          या कवितासंग्रहातील कांहीं कवितेत कवींनी गेयता आणली आहे. गाजलेल्या मराठी गीतांवर आधारित रचना केलेली आहे.

उदा.सुंदर काश्मीर- काळया मातीत मातीत तिफन चालते.

राजकारण- कशी नशिबानं थट्टा कशी मांडली.

साज - गाडी चालली घुंगराची


        एकंदरीत हा काव्यसंग्रह उत्तम साहित्यकृती आहे.कवीचे मनापासून अभिनंदन व पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा।







बुधवार, १६ एप्रिल, २०२५

जागरण -पुस्तक परिक्षण


जागरण (आत्मकथन) - पुस्तक परीक्षण


✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


                     

पुस्तक - जागरण
लेखक - भारत सातपुते
 प्रकाशनगर , लातूर
पिन कोड - 413531
प्रकाशिका - सुषमा भारत सातपुते
मांजरा प्रकाशन, लातूर 
पृष्ठे - 302   
मूल्य - 600/-रू.
प्रथमावृत्ती - 09 एप्रिल 2024
ISBN: 11205471035



       
       'जागरण' हे लेखक भारत सातपुते यांचं आत्मकथन आहे. यामध्ये लेखकांनी बालपणापासूनचा गरिबीतील प्रवास ते नोकरीतील रिटायरमेंटपर्यंत चा संघर्षमय प्रवास प्रभावीपणे , दमदार शैलीत खुबीने मांडला आहे. 'बालपणाचा काळ सुखाचा'असे म्हणतात पण तो सर्वांनाच सुखाचा नसतो कारण गरिबी काहींच्या पाचवीलाच पूजलेली असते. तशी लेखकांच्याही पाचवीला पूजलेली होती. संबळ, तुणंतुणं घेऊन, झोळी खांद्यावर अडकवून जागरण करणाऱ्या, फिरस्ती कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अशाही परिस्थितीत आईवडिलांनी शिकविण्याचा प्रयत्न केला हेच कौतुकास्पद आहे. त्यांना दिवाळीत कधी फटाके मिळाले नाहीत. शेतीच्या कामात मदत करत शिक्षण घ्यावे लागले. आईवडिलांनी लेखकाना व त्यांच्या भावंडांना जागरणाला जाऊ दिले नाही. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी  मात्र आयुष्यभर जागरणे केली. त्यांच्या घरी साधी सांडशीसुद्धा नव्हती आई पदराने पातेली उचलायची. असे कमालीचे दारिद्रय वाटेला आलेले असतानाही त्यांनी आपल्या मुलांवर सुसंस्कार केले हे लेखकांनी अनेक उदाहरणे देऊन सांगितले आहे. 'रावण्या 'या श्रीमंत मित्राची ह्रदयद्रावक आठवणही लेखकांनी नमूद केली आहे. पायाला बसणारे चटके व दुखणारी कुरपे आठवून लेखकांनी लहानपणी एकदा दुसऱ्यांचे चप्पल उचलून आणले होते , ते वडिलांनी परत होते तिथे ठेवायला लावले. आईने एकदा पैशाच्या बदल्यात दुसऱ्यांचा तांब्या ठेवून घेतला असता वडील तिला रागावले. बालपणातील रेडिओ बद्दलचा व स्नेहसंमेलनातील धोतराबद्दलचा किस्सा मनोरंजक वाटला. लेखकांनी बालपणातील केलेले वर्णन माझ्याही बालपणातील परिस्थितीतीशी मिळते जुळते असल्याने मला अगदी मनापासून भावले पण हे वर्णन पान नंबर अडतीसवरच संपले आणि पान नंबर एकोणचाळीस पासून लेखकांच्या जीवनातील संघर्षमय पर्वाला सुरुवात झाली.
       
        श्री. सातपुते सरांना शिक्षक पदावर रुजू होताच समाजातील अस्पृश्यतेचा पगडा लक्षात येऊ लागला. स्त्री पुरुष यांची निखळ मैत्रीही समाजाला अमान्य आहे हे जाणवू लागले. काटकसरीचा मंत्र देणारे यादव गुरुजी त्यांना भेटले. प्रतिज्ञेचा अर्थ जाणून न घेता फक्त म्हटली जाते , त्याप्रमाणे आचरण होत नाही हे दिसून आले."हाँटेलच्या दोन माणसांच्या खर्चात दहा माणसे पोटभर खाऊ शकतात " हे सरांच्या आईचे वाक्य मला पटले. धूम्रपानास विरोध करताना माझ्या खिशातल्या पैशांनी खर्च करतोय, तुमचं काय जातय? असं ऐकून घ्यावं लागलं. शिक्षकांना वेळेवर शाळेत येण्याची सक्त सूचना अंगलट आली.शिक्षणाधिकाऱ्यानाही ' गुराख्यासारखे काय बोलायलाव 'असे म्हणून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचे साहस नोकरीत नवे असतानाही सरांच्या अंगी होते हे विशेष. ' बायकोने नवऱ्याच्या अन् कर्मचाऱ्यांने अधिकाऱ्याच्या विरोधात बोलू नये' असा अलिखित नियम सर्वजण पाळत असताना त्यांनी विरोध पत्करला यावरून त्यांचे धाडशी व्यक्तिमत्त्व लक्षात आले. सातपुते सरांनी  रागाने माहेरी निघालेल्या महिलेस परत सासरी नेऊन सोडण्याचे सत्कार्य केले.
    
        'नुसतंच थोबाड वर करून कविता लिहितोस कर्ज काय तुझ्या बापानं फेडायचं का'  या चेअरमनच्या बोलण्याने व्यथित होऊन त्यांनी स्वतःची जागा विकून कर्ज फेडले याला म्हणतात स्वाभिमान! 
        सातपुते सरांना नोकरीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना वर्गात थंडीत बसवून थंडीच्या दिवसांत जुने शैक्षणिक साहित्य जाळून शेकत बसलेले शिक्षक भेटले. रजामंजुरी, भविष्य निर्वाह निधी, कर्जाचे व मेडिकल बिलाचे प्रस्ताव इत्यादि कामात अडवणूक करत लाच खाणारे क्लार्क व अधिकारी भेटले. अधिकारी महाराष्ट्र दर्शनाच्या बिलासाठी टक्केवारी मागतात हे निदर्शनास आले.dirtrict primary education project म्हणजे d. P.e .p या प्रोजेक्ट बद्दल एक गटशिक्षणाधिकारी म्हणतात " डी. पी. इ. पी. म्हणजे देशी पी इंग्लिश पी. काय म्हणावे या अधिकाऱ्यांना? लेखकाप्रमाणे वाचकानाही चीड येईल नक्की. एका अधिकाऱ्याने तर केंद्रप्रमुखाना खेचर म्हटले.
       
        लाच घेणाऱ्यांची वेळेवर दखल घेऊन शिक्षा केली नाही तर लाचखोरीचे प्रकार वाढतात या सरांच्या मताशी मी 100% सहमत आहे. सोसायटीच्या निवडणुकीतील वात्रटपणा लेखकांनी खुल्या मनाने कबूल केला आहे. राजीव गांधी शाळा योजनेतील फोलपणा म्हणजे रोजगार हमी काम कमी , काम कमी अर्धै तुम्ही अर्धे आम्ही. ही योजना सरांनी बंद केली.
 उपचार वर्गातील 'त्या ' शिक्षिकेच्या आरोपामुळे सरांना राष्ट्रपती पुरस्कार मिळण्याची संधी गेली. या प्रसंगानंतर सरांचे हे स्वगत वास्तव व चिंतनीय वाटते. " माझे हे वागणे चुकलेच, आदर्श चारित्र्य, तत्वे, माणुसकी आदि या घटनेमुळे पायदळी तुडविली गेली. दुसऱ्याचा संसार सांभाळण्याच्या नादात
         
       स्वतः च या संसाराच्या इज्जतीचा पालापाचोळा केला त्याचे काय? सांडलेली प्रतिष्ठा, वाया घालवलेले क्षण हे सर्व आता परत येणार का?"
लेखकांच्या झुंजार वृत्तीची प्रतिमा लोकांच्या मनात होती त्यामुळे लोक म्हणायचे' "हे व्यवस्थापक माजी शिक्षणाधिकाऱ्याचे नातलग आहेत. ही कडू वाळकं तुम्हीच तोडू शकता" हा पाहुणचार आहे पण लोकांच्या खिशातून खाणे बरे नाही" ही सरांची भूमिका अनुकरणीय आहे. सरांच्या सडेतोड वागण्याबोलण्यामुळे अनेंकांची लबाडी उघड झाली. त्यामुळे त्यांची गाडी पंक्चर करणे, कुठे काचा फोडणे, कुठे अडवणूक चालायची पण सरांना या खाचखळग्यांची सवय झाली होती. शाळाभेटीच्या वेळी लेखकांना अनेक ठिकाणी हास्यास्पद विस्कळीतपणा दिसायचा. आठ आठ दिवस टाचण न काढणाऱ्या शिक्षिका दिसायच्या, नशापाणी करून धिंगाणा घालणारे शिक्षणाधिकारी दिसायचे कांही दिवसांनी तेच उपसंचालक पदावर हजर झालेले दिसायचे. अशावेळी' उध्दवा अजब तुझे सरकार' म्हणून आवाज उठवायची पाळी लेखकांवर यायची. मेवा दिल्याशिवाय सेवा न करणारे अधिकारी त्यांच्या निदर्शनास आले. शिक्षकांना नैतिकतेचे धडे देणाऱ्या डाएटचे लागोपाठ दोन प्राचार्य लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात सापडल्याचे लेखकांनी पाहिले. अधिकारी पळवाटांच्या पुढे नोटासाठी पायघड्या घालण्यात धन्यता मानतात. कुंपणानेच शेत खायचे ठरविले तर मालकाने काय करावे? ही शिक्षणव्यवस्थेची दुर्दशा पाहून मन व्यथित  होते. लेखक म्हणतात," भाषणात साने गुरुजी अन् वागण्यात नाणे गुरुजींचे पीक जोमात आहे. आदर्श मात्र कोमात आहे." लेखक पुढे म्हणतात" 
       
         यहाँ सब नकटोंका मेला है, जो भी नाकवाला है, वह भी मेरा चेला है।येथे चांगल्यांची कदर नाही. भ्रष्टाचार कमी व्हावा असे कोणाला वाटत नाही. प्रसादमाध्यमे सत्यासाठी चालू आहेत की सत्तेसाठी? हेच कळत नाही" जिल्हा परिषद प्रशाला निलंगा केंद्रापुढे लेखकांच्याबद्दल खोडसाळपणे लिहिले होते की, यह केंद्र मौत का कुआँ हे ,यहाँ भारत सातपुते केंद्रचालक है।हे वाक्य लेखकांच्या धारदार, शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्वाची साक्ष देते.
        सातपुते सरांना काँपी पुरविणारे शिक्षक दिसले. इमारतीवर संत नामदेव लिहिणारे संस्थाचालक दाम घेऊन काम करत असल्याचे दिसले. सतत लाचखोरीत वावरणाऱ्या प्रशासनाला तुकडा फेकून पुन्हा लाचार करणे अवघड नसते असे सरांचे मत आहे याबद्दल कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही.' पुण्यनगरी हितसंबंधामुळे पापनगरीला साथ देते 'या वाक्यावरुन सरांची लेखनातील कल्पकता व तळमळ दिसून येते. लेखकांनी पान नंबर १६९,१७० वर अप्रगत विद्यार्थ्यांची मांडणी शिक्षणाचे विदारक चित्र दर्शवते. 
     
         दहा हजार उत्पन्न कमी करून न आणता मुलीची फी भरणारे सरिंसारखे पालक दुर्मिळ आहेत. विद्यार्थ्यांचे शरीर मजबूत करण्यासाठी शाळेत पहाटे व्यायामाचे नियोजन म्हणजे  सर्वांगिण विकासाची गुरुकिल्ली आहे हे ओळखून झपाटून काम करणाऱ्या आदर्श शिक्षकाचे काम आहे हे सरांनी लीलया पार पाडले आहे. या आत्मकथनातील वैशिष्ट्य म्हणजे लेखकांनी मान सांगावा जना , अपमान सांगावा मना हे तत्व न वापरता जे व जसे घडले तसे लिहिले आहे. राष्ट्रगीत वैयक्तिक म्हणावयास सांगताना आत्मविश्वास ढळल्याने ते दडून बसल्याचे सांगितले आहे. चेक लिहिताना त्यांच्या हातून घडलेल्या चुका प्रांजळपणे कबूल केल्या आहेत.
      
        डी.लिट. पदवी साठी दीड लाख भरण्याचे टाळून लेखक म्हणाले," दीड लाखात तीन म्हशी येत्यात त्या सांभाळल्या तर महिन्याला दुधाचे लाखभर रुपये मिळतिल" हा त्यांचा त्याग वाखाणण्याजोगा आहे. पुरस्काराबाबत त्यांचे मत असे ' ना दाम, ना लिंगना वशिला, ना लाच,ना गटतट, ना जातधर्म वापरता केवळ गुणवत्तेवर, कार्यावर व निरपेक्ष भावनेने कोणी सत्कार केला तरच तो स्विकारावा" हे मत मला पटले.
वार्ताहर श्री. किशोरजी यांनी लेखकाविरूद्धची बातमी दिल्याने राजीनामा दिला. रागाने सहा सात महिने काम बंद केले ही लेखकांच्या सत्कार्याची पोचपावती आहे. त्यांच्या वरच्या खटल्याचा निकाल लागल्यावर लोक म्हणाले," सत्य  हे परेशान होते परंतु पराजित होत नाही. मँडमवर अब्रू नुकसानीचा दावा ठोका " पण सरांनी समंजसपणे ते टाळले.आजच्या समाजात गुलालापेक्षा दलालच श्रेष्ठ वाटतात. अशा समाजात लेखकांसारखे तत्वाला धरून वागणारे दहा हजार पेन्शन जास्त मिळाल्याचे पंचायत समितीच्या निदर्शनास आणून कमी करून घेतात. केवढा विरोधाभास आहे हा एकीकडे अंधार तर दुसरीकडे तेजस्वी लख्ख प्रकाश. 
     
    संपूर्ण आत्मचरित्रात आपल्या संसाराविषयी, मुलांबाळाविषयी फार कमी लिहिले आहे. मुलीच्या लग्नातील सूटकेस विसरल्याचा प्रसंग, सासूच्या पाठीवर त्यांनी मारलेला रट्टा इत्यादि गमतीदार प्रसंग वगळता सर्व प्रसंग शैक्षणिक दुरावस्था व त्याविषयीची लेखकांची चीड पानांपानावर दिसून येते. त्यांनी आई वडिलांविषयीचा आदर प्रसंगानुरूप व्यक्त केला आहे. वडिलांच्या चांगल्या शिकवणुकीचे व त्यांच्या शहाणपणाचे प्रसंग वाचकांसमोर उभे केले आहेत. 
आत्मचरित्रात लेखकांनी लिहिलेली बोलीभाषा ज्वलंत व वास्तव वाटते. त्यामुळे लेखनाला नवा साज चढलेला आहे. उदा. भुका लागल्यात, काढताल, म्हणायलात, रडाया लागलाबोलायलाव, मगा, घडतेल का?.

     लेखकांनी मांडलेला शिक्षणव्यवस्थेतील भ्रष्टाचार कमीअधिक प्रमाणात सगळी कडे दिसतो पण प्रत्येकजण कातडीबचाव धोरण स्विकारतो.लेखकांनी तसे न करता भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. हे बघून गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या एका वचनाची मला आठवण झाली ' अस्तमानाला जाणाऱ्या सूर्यास एकदा वाटले ,मी अस्तमानाला गेल्यावर इथं पूर्ण अंधार पसरणार,त्यावेळी कोण देईल इथं प्रकाश? कोणीही पुढे आले नाही. तेंव्हा एक छोटीशी पणती पुढे आली व म्हणाली मी देईन प्रकाश माझ्या परीने' सर या पणतीप्रमाणे तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात तुमचा कार्यरुपी प्रकाश दिला आहे. तुमच्या या अमूल्य कार्याला, धडपडीला अगदी मनापासून प्रणाम!
आत्मचरित्राच्या शेवटी लेखकांनी मांडलेले विचार जीवनाचा सार सांगून जातात. लेखक म्हणतात," चिखलावर दगड फेकला तर आपल्याच अंगावर चिखल येणार हे खरे असले तरीही चिखलाचा चिखल होण्याऐवजी सुगंधी फूल उगवावे असे वाटते." 
     
       सुषमाताईंचा लेखकांशी बोलणाऱ्या कवितांचा संग्रह ऊनसावली उशीरा का होईना प्रकाशित केला हे वाचून एक स्त्री या नात्याने मला खूप समाधान वाटले.
सर, आपले आत्मचरित्र वाचताना पुस्तकातील प्रत्येक पान आपल्या झुंजार वृत्तीची साक्ष देते व झुंज पिक्चमधील '    झुंजार माणसा झुंज दे,झुंज दे' या गाण्याची आठवण आली.
आपल्या पुढील लेखन कार्यास व समाज कार्यास हार्दिक शुभेच्छा!

बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४

बारा गावचं संचित (कथासंग्रह) - पुस्तक परीक्षण



बारा गावचं संचित (कथासंग्रह) - पुस्तक परीक्षण


डॉ. ज्युबेदा तांबोळी

लेखक - सुप्रसिद्ध कथाकथनकार जयवंत आवटे
प्रकाशक - शब्द शिवार प्रकाशन
पृष्ठे - १७२
मूल्य - २०० रुपये
प्रथम आवृत्ती - ३१ मे २०२२
ISBN: 978_93_91232_47_4
 

       बारा गावचं संचित हा कथासंग्रह वाचनात आला. पहिल्या कथेपासून सुरु झालेला वाचनप्रवास विनाथांबा शेवटची कथा वाचूनच थांबला. सर्व कथा वाचनीय, उत्कंठा वाढविणाऱ्या, मनोरंजक आहेत. या कथासंग्रहातील सर्वच पात्रे कष्टाळू आहेत. त्यांनी कष्टाबरोबरच इमानदारी जपलेली आहे. ही माणसं खेडेगावात राहणारी साधीसुधी माणसं आहेत. त्यांच्याजवळ प्रामाणिकपणा आहे. उदा. जाणती कथेतील सदाचे आईबद्दलचे विचार आदर्शवत आहेत. समाजातील नीतिमत्ता ढासळली तरी ती ढासळू नये म्हणून कथेतील पात्रे प्रयत्न करतात. उदा. 'गावधोंड' कथेतील शिक्षक. या कथासंग्रहातील पात्रे भोळीभाबडी आहेत, निष्ठा कथेतील भिमा मालकाचे नाटकी बोलणे खरे मानतो व स्वतः घाम गाळून मिळालेलं मानधन मालकाच्या हवाली करतो. असा स्वामीभक्त भिमा वाचकांना निष्ठा कथेत भेटतो. व्यसनाधीन नवऱ्याला स्वीकारुन, आपल्या मनातील वेदना उराशी बाळगून संसाराचा गाडा समर्थपणे सांभाळणारी मंजुळाची आई 'मंजुळा' कथेत भेटते.  आपल्या वाट्याला आलेली गरीबी देवाचं देणं समजून ही माणसं समाधानात जगून एक आदर्श समाजापुढे ठेवतात. उदा. 'माधवी' कथेतील सासूसासरे.


       या कथासंग्रहातील सर्व कथांचे शीर्षक एका शब्दांचे आहे, कथा आशयाने ओथंबलेल्या आहेत. कथा वाचून मनोरंजन होतेच शिवाय मनात कालवाकालव आणि ह्रदयात विचारांचं वादळ निर्माण होतं. समाजाचं प्रबोधन करण्यासाठी लेखकांनी केलेले प्रयत्न यशस्वी झालेले दिसतात.


       मला विशेष आवडलेली बाब म्हणजे लेखकांनी स्त्री ची विविध सामर्थ्यशाली रुपे. शीलरक्षणासाठी मंगळसूत्राचा त्याग करणारी बाजार कथेतील अलका, व्यसनी नवऱ्याला सांभाळून संसार नेटाने चालवणारी मंजुळा कथेतील पार्वती, आईला वाईट वाटू नये म्हणून आपलं दुःख काळजात लपवून ठेवणारी मंजुळा, शिक्षण घेत असताना फक्त वाचकमित्र म्हणून महेशशी मैत्री करणारी साधी, सोज्वळ अशी तरूणाई कथेतील सुलभा, विहीर कथेतील ज्ञानदा तर सर्व स्त्रियांची नायिका शोभते अब्रूवर उठलेल्या पतीच्या मित्राला शिक्षा करून अद्दल तर घडवतेच पण दोघांच्या मैत्रीत बाधा न आणता त्याला सुधारण्यासाठी संधीही देते. स्त्रियांची विविध रूपे रेखाटताना लेखकांच्या  लेखनशैलीचं आणि निरीक्षण शक्तीचं कौतुक करावं तेवढं थोडच आहे.


       बारा गावचं संचित या कथासंग्रहातील निष्ठा ही पहिली कथा काळजाचा ठाव घेणारी आहे. रात्रंदिवस कष्ट करून आपल्या मालकावर अपार निष्ठा ठेवणाऱ्या भिमाची ही अप्रतिम कथा आहे. एखादा माणूस मालकाच्या शेतात राब राब राबतो, घाम गाळून मळा फुलवून देतो पण मालकाला त्याची बिल्कुल पर्वा नसते. नोकर मालकाला देव मानतो पण मालक त्याला एक क्षुल्लक नोकर समजतो.  भिमाने रक्ताचं पाणी करून फुलवलेल्या मळ्यातून भरपूर उत्पन्न मिळते. त्या उत्पन्नाच्या जोरावर मालक राजकारण करतो, ऐष आराम करतो. प्रामाणिक भिमाने पैशाची मागणी केली असता खोटा अभिनय करून त्याला कटवतो, त्याच्या गरजांची खिल्ली उडवतो पण निष्ठावान भिमा रात्रभर कष्ट करून मिळालेली पाच हजाराची रक्कम मालकाला देतो, तेंव्हा म्हणावेसे वाटते वा! भिमा वा! मालकाची बायको म्हणजे कृतघ्नपणाचा कळस आहे. ती पतीच्या खोट्या बोलण्याचं, खोट्या अभिनयाचं कौतुक करते.

       ही कथा वाचल्यावर एक वाक्य आठवले.'एक मनुष्य म्हणतो, "मी इतका गरीब आहे की माझ्याजवळ नोटांच्या बंडलाशिवाय कांही नाही". तर दुसरा म्हणतो, "मी इतका श्रीमंत आहे की माझ्याजवळ चार शिळ्या भाकरीच्या तुकड्याशिवाय कांही नाही". या कथेतील गरीब कोण व श्रीमंत कोण? लक्षात येईल.

       भिमा मनाने श्रीमंत असलेला, घाम गाळून श्रम करणारा, प्रामाणिक व निष्ठावान माणूस. त्याची समंजस बायको आपल्या पतीला कोणत्याही परिस्थितीत साथ देणारी असते ती पतीला म्हणते, "असं खांदं पाडून बसलेला नवरा बघायची सवय न्हाय मला".

      कथेत वापरलेली भाषाशैली अतिशय प्रभावी व परिणामकारक वाटते. उदा. सरावलेल्या पायांना मळलेल्या वाटेचा अंदाज असतो. भिमाचा मालक म्हणतो, "आरं ही शेताची मेहनत, खतं, बी बियाणे हा खर्च बघतुयास तू. आता ही पाटीलकी मिरवायची म्हटल्यावर नुस्त बुलेट घेऊन फिरून चालत नाही. राजकारणात पद प्रतिष्ठा लागते बाबा, राहू दे आमदारकी, निदान पंचायत समिती तरी पदरात पाडून घेतली पाहिजे त्यासाठी लोकांना काय हवं काय नको पहावं लागतं. मंत्री संत्री आलं की घरी आणावं लागतं".


        'आरक्षण' ही कथा सध्याच्या भ्रष्ट राजकारणाचे हुबेहूब चित्रण करणारी आहे. एखादा मुरलेला राजकारणी उमेदवाराची निवड कशाप्रकारे करतो? त्याला उमेदवार फार हुशार, जाणकार नको असतो. तो निरुपद्रवी असावा, राजकारणातील कांही न समजणारा भोळाभाबडा असायला हवा तरच त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून या पुढाऱ्याला आपले राजकारणातील स्थान अबाधित राखता येते. गोरगरिबाला खोटी स्वप्ने दाखवून त्याच्या संसाराची राखरांगोळी झाली तरी या बड्या नेत्यांना त्याचं सोयरंसुतक नसतं. असंच झालं आरक्षण कथेतील बिरुचं. पुढाऱ्याच्या शब्दावर विश्वास ठेवून बिरूनं आपली शेरडं विकून टाकली. ज्याच्यावर त्याचा संसार अवलंबून होता, त्याची उपजिविका चालत होती. हुशार नेत्याला गोड बोलून आपल्याकडे वळविण्यात हे पुढारी वाकबगार असतात. असंच झालं या कथेतील धर्माच्या बाबतीत. पुढाऱ्यापेक्षा त्याचा पी. ए. हुशार असतो. तो मालकाला नेहमी लेवलमध्ये ठेवतो. त्याला आवरतो, सावरतो. पडद्यामागे काम करणारा हा पी. ए. सर्व डावपेच करत असतो हे कथेतील हंबीरने सिद्ध केले.


       सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याचं वर्णन करताना लेखक या कथेत म्हणतात, "आमचं आयुष्य शेरडीच्या शेपटागत असतं, धड लाज राखत नाही की माशी उठत नाय नुसत हाय म्हणायला आणि जगाला दाखवायला". हे वाक्य सामान्य माणसाच्या परिस्थितीचं विदारक चित्रण करतं. थोडक्यात या कथेत गरिबाला मोठी स्वप्नं दाखवायची व ऐनवेळी दुसऱ्यालाच उमेदवारी द्यायची हा राजकारणातील सर्रास चालणारा खेळ लेखकांनी आरक्षण कथेत मोठ्या खुबीने मांडला आहे.

        'लेखक' ही कथा लेखकाच्या आर्थिक परिस्थितीची व्यथा मांडणारी जबरदस्त कथा आहे. लेखकावर शब्दशारदेची नजर असते पण लक्ष्मी त्याच्यावर नेहमी कोपलेली असते. लेखक राबत असतो, तळमळीने लिहित असतो पण त्याला संसार चालवण्यापुरतेसुद्धा मानधन मिळत नाही. मान थोडाफार मिळतो पण धन त्याच्यापासून कोसो दूर पळालेले असते त्यामुळे त्याला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो.

       थोडक्यात काय तर लेखक गर्दीत एकटा असतो तर एकटा असताना मनात विचारांची गर्दी असते. एखादी साहित्यकृती जन्म घेण्यापूर्वी लेखकांना अनंत यातना सहन कराव्या लागतात. लेखकाची आर्थिक व कौटुंबिक परिस्थिती सांगताना लेखक म्हणतात, "माणसं लेखकाचं तोंड भरून कौतुक करायची पण या लखलखणाऱ्या दुनियेत त्याचं साहित्य प्रकाशित करायला कुणी तयार नव्हतं". लेखक कावळ्याला म्हणतात, "बाळा, शिळंपाकं रहायला रात्री जेवण सोगळं बनावं लागतं. चुकीचं घर निवडल राजा" लेखकाची बायको म्हणते, "पोराबाळाच्या पोटाला काय घालायचं? कौतुकानं आणि मानसन्मानानं पोट भरत नाय". हे वाक्य लेखकाच्या आर्थिक स्थिती चे वर्णन करते.

       'लेखक' कथेतील 'बाळानो, वाचनाशिवाय लिखाण म्हणजे पत्नीशिवाय संसार' हे वाक्य वाचनाचं महत्त्व सांगून  जाते. कथेच्या शेवटची वाक्ये ह्र्दयद्रावक आहेत. पोटच्या पोराला उघड्यावर टाकून, बायकोच्या आयुष्याची लक्तरे केल्यावर, जन्मदात्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केल्यावर आणि वेदनांचा समुद्र ओलांडल्यावर लेखकाला शब्दशारदा प्रसन्न होते.

         'बाजार' या कथेतील बाजाराचे लेखकांनी केलेले चित्रण त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचे दर्शन आहे. बाजारात सर्व प्रकारचे व्यापारी, शेतकरी व ग्राहक येतात. त्यांची व्यक्तीचित्रे लेखकानी हुबेहूब वाचकांसमोर मांडली आहेत. त्यामुळे कथा वाचतांना बाजारातच असल्याचा भास होतो. एका गरीब शेतकऱ्याची व्यथा या कथेत मांडली आहे. लाईट बील भरलं नाही म्हणून वीज कापली जाते. वीज कापल्यामुळे भाजीपाला वाळून जातो व भाजीपाला वाळल्यामुळे शेतकऱ्याचं कुटूंब उध्वस्त होतं. पोटापाण्याचे हाल होतात. पोटात पुरेसे अन्न नसल्याने शेतकरी आजारी पडतो. औषधपाण्याला पैसा नसतो. अशा असहाय्य परिस्थितीत अलकासारखी स्त्री बाजारात जाते. आपली व्यथा आक्कासारख्या अनुभवी व्यापारणीला सांगते. आक्का तिला मदत करण्याचा प्रयत्न करते पण या परिस्थितीचा फायदा घेणारी रंग्यासारखी व्यभिचारी, दुष्ट, नालायक माणसं घेतात. अशा वखवखलेल्या गिधाडांना धडा शिकविणारी अलका स्त्रीचं कणखर रुप दाखवते. कोणत्याही परिस्थितीत आपल्या चारित्र्याला डाग लागू देत नाही. स्त्रीचं हे दुर्गारूप मला खूप आवडले.

       बाजाराचं वर्णन करताना लेखक म्हणतात, "अब्रू माळव्याप्रमाणे उघड्यावर टाकणारी भांडणे, वादविवाद व्हायचे, सुरवातीची कुरबूर एकेरीवर यायची, आयाबहिणींचा उद्धार व्हायचा. नको त्याच्याबरोबर नांव जोडून अब्रू माळव्यासारखी उघड्यावर टाकली जायची". कथेच्या शेवटी अलका जेंव्हा रंग्याला धडा शिकवून घरी निघते तेंव्हा लेखक म्हणतात, "अंधारानं परिचयाचे रस्ते अनोळखी झाले असताना अलका मात्र काळोखातून प्रकाशाकडे नेणाऱ्या वाटेने आपलं घर जवळ करत होती". 'बाजार' ही कथा साहित्यविश्वातील सुंदर कलाकृती वाटते.


        'स्वप्न' ही कथा छोट्या गरीब अशा दोन भावंडांची आहे. गोरगरिबांची स्वप्नं छोटी असतात पण ती साकार होत नाहीत. स्वप्नं साकार न झाल्याचं दुःख पचवायची कला गरिबाला ईश्वराकडून मिळाली आहे. दिव्या आणि मोना ही दोन लहान भावंडं, त्या दोघांना सायकल फिरवायची खूप इच्छा असते पण जिची सायकल आहे तिला द्यायला त्यांच्याकडे कांही खाऊ नसायचा. ती सायकलवाली मुलगी खाऊ देणाऱ्यानाच सालकल फिरवू द्यायची. शेवटी दिव्या आपल्या छोट्या भावासाठी मोनासाठी सायकल देण्याची विनंती करते पण ती या दोघांची टिंगल करते व सायकल देत नाही. 


       बालमनाची छोटी स्वप्नं रेखाटण्याचा प्रयत्न लेखकांनी केला आहेच त्याचबरोबर शेतकऱ्यांची व्यथाही या कथेतून प्रभावीपणे मांडली आहे. अवकाळी पावसाने पिकांचं झालेलं नुकसान शेतकऱ्यांला मेटाकुटीला आणतं. यंदा पीक चांगलं वाढलय. उत्पन्न चांगलं मिळेल म्हणून शेतकरी दांपत्याने कांहीं स्वप्ने पाहिलेली असतात. ती स्वप्नं अवकाळी पावसाने धुळीला मिळतात. अशावेळी पावसाला तारक म्हणावं की मारक हेच समजत नाही. डोक्याला हात लावून निराशेच्या गर्तेत जाण्यांपलीकडे तो कांहीं करू शकत नाही. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. आपल्या लेकरांच्या मागण्या तो पूर्ण करू शकत नाही. पण जिवाचं रान करून, पोटाला चिमटा काढून तो लेकरांची स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोच हे सांगणारी ही सुंदर भावकथा आहे.

       'विहीर' ही कथा रहस्यमय वाटते. कथेचा उलगडा कथेच्या शेवटच्या २-३ वाक्यांनी होतो. विजय व ज्ञानदा यांचा प्रेमविवाह झालेला असतो. ती दोघं रानात आनंदाने व सुखाने रहात असतात. एके दिवशी विजय पटापट शेतातली व घरातली कामे आटोपतो. ज्ञानदाला त्याच्या या कामाचं कौतुक वाटतं. विजयला ज्ञानदाकडून एक परवानगी मागायची असते. आपल्या दिलीप नावाच्या मित्राबरोबर लावण्या बघायला परगांवी जायचं असतं. दिलीप एक नंबरचा बाहेरख्याली, उनाड अविवाहित तरुण असतो. विजयला लावणी बघण्यात गुंतवून तो मित्राचा विश्वासघात करणार असतो. या कथेत लेखकानी स्त्रिचं एक आगळंवेगळं समजूतदार, धाडशी, चतुर असं रूप दाखवलं आहे. आपल्या शीलाचं रक्षण करण्यास समर्थ असलेली ज्ञानदा हाती कुऱ्हाड घेऊन दिलीपचा सामना करते. दुष्ट हेतू ठेवून आलेल्या माणसाला जख्मी करण्यासही मागेपुढे पहात नाही. विशेष म्हणजे घडलेला प्रकार पतीला सांगत नाही कारण त्यामुळे त्यांच्या मैत्रीला बाधा येईल, अनर्थ घडेल. चुकीचं पाऊल टाकू पहाणाऱ्या मित्राला सुधारण्यासाठी संधी देऊ पहाते. ज्ञानदा म्हणते, "वाईट मित्र म्हणजे नासलेला आंबा नव्हे टाकून द्यायला. ज्ञानदाच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो".

         'गावगाडा' या कथेत गावच्या राजकारणाचे यथोचित वर्णन आले आहे. अल्पशिक्षित असलेले गावचे पुढारी, त्यांचे हेवेदावे, ईर्षा, द्वेष, मत्सर या सर्वांना जपून गावच्या विकासाकडे कसे दुर्लक्ष करतात याचे चित्रण आहे. सत्तेसाठी खून, मारामाऱ्या या गोष्टी सहज स्विकारल्या जातात. निवडणुका जवळ आल्यावर सर्वसामान्य जनता आपला स्वतःचा काय फायदा होतो का ते बघतात. निवडणुकीपूर्वीच आपला कार्यभाग साधून घेतात व पुढील पाच वर्षाचं खाबुगिरीचं लायसन पुढाऱ्याना देतात. हे गावचं राजकारण या कथेत प्रकट झाले आहे.

       ग्रामीण भाषाशैलीचा उत्कृष्ट नमुना "चहा नको मग कडुनिंबाचा काढा करायला सांगू का घशाला चांगला असतो". या कथेतील कुशाप्पा आत जावून वहिनीना नाश्ता करायला सांगतो व बाहेर येऊन सांगतो की वहिनी म्हणत्यात नाष्टा झाल्यावर मग चहा देते अशा गमतीदार वाक्यातून कथेला जिवंतपणा आलाय. लेखक म्हणतात, ''शहरातील अर्धा कप चहा गावच्या लोकांना चहा पिल्याचं समाधान देत नाही. त्यांना कपबशी भरून चहा लागतो. पोह्यात खोबरं भरपूर लागतं हिमालयावर बर्फ पडल्याप्रमाणे".

       'जाणती' ही अस्सल ग्रामीण कथा आहे. सदाचं लग्न झालं. बायको घरात आली. पण सदाला तिच्याशी बोलता येत नाही कारण त्याचं घर छोटं एका खोलीचं होतं. आईसोबत राहणारा सदा घुसमट होऊनही आईला कांहीं बोलू शकत नाही. तो मित्रांना म्हणतो, "आप्पा या जगात कुणाची तर आई लेकाच्या संसारात आडवी पडते का?" माझं लग्न व्हावं म्हणून तिनं पाहण्या पैचं उ़बरं झिजवलं. लग्न झाल्यावर मला हजारदा म्हणाली सदा मला गावात गमत नाय, मी रानात राहती पण हे न कळण्याइतका मी दुधखुळा नाय, हयात असलेली आई घरात नसेल तर घराला घरपण नाय "पुढे तो म्हणतो, "सगळ्या गोष्टीत विनोद करणं, सगळं हसण्यावारी नेणं, ज्याला रहायला दोन खोल्यांचं घर नाही त्याच्या वेदना तुम्हाला काय कळणार, जो बायकोशी दोन शब्द बोलू शकत नाय त्याच्या भावना तुम्हाला कशा समजणार? आपल्या आईला अनाथाश्रमात ठेवणाऱ्या मुलापेक्षा आपल्या आईसाठी देवळात झोपणाऱ्या सदाला स्वीकार". नाग्याचं पात्र या कथेत विनोदांची पेरणी करतं त्यामुळे कथा विनोदी, समाजप्रबोधन करणारी वाटते. कथेचा शेवट बहारदार आहे.

       'मंजुळा' ही कथा बालविवाह केल्यामुळे एखादी उमलू पहाणारी कळी अवेळीच कशी कुस्करली जाते हे सांगणारी आहे. व्यसनाधीन झालेला बाप, जिद्दीने अपार कष्ट करून संसाराचा गाडा चालविणारी आई, दीदीवर मायेचा वर्षाव करणारा अल्लड भाऊ लेखकांनी मोठ्या ताकतीने आबा, पार्वती, मंजुळा आणि सोन्या यांच्या रूपात वाचकांसमोर उभा केला आहे. मंजुळा अभ्यासात हुशार असते. कविता करण्याची तिला आवड असते. वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन ती नंबर काढत असते. जिल्ह्यात प्रथम क्रमांक काढून उत्तीर्ण होण्याची तिची क्षमता असते. अशी अष्टपैलू मंजुळा परिस्थितीमुळे, आईवडिलांच्या इच्छेखातर लग्नास मूकसंमती देते. गरीब गाय बनून लग्न करते व सासरी जाते. बरोबरीच्या मुली शाळेत व क्लासला जाताना पाहून मंजुळाच्या आईचं काळीज तिळतिळ तुटतं पण व्यसनी नवऱ्यापढे तिचे कांही चालत नाही. सासरी गेलेल्या मंजुळाला माहेरी आणण्यासाठी गेलेल्यांनी विनवणी करूनसुद्धा तिची सासू तिला माहेरी पाठवत नाही. त्या प्रसंगी सासूबद्दल म्हटले आहे 'ओल्या हातानं हात घातला तर वासरू नसलेल्या गायीलाही पान्हा फुटतो पण या बाईला पाझर फुटला नाही'. सोन्यानं दीदीला माहेरी येण्यासाठी केलेले संभाषण काळजाला भिडणारे आहे. मंजुळा आईला म्हणते, "आई, तू सांगितलस तर मी मरणाला बी माळ घालेन". अशा वाक्यानी कथेला साज चढला आहे.

       मंजुळा म्हणते, 'अपुऱ्या वयात आणि कमी शिक्षणात लग्न झालेली मुलगी म्हणजे फाटकी चिंधी असते. ती गरज नसताना कुठल्या कोपऱ्यात पडली आहे. याची जगाला फिकीर नसते. जगात कुठल्याही मुलीचं लग्न अपुऱ्या वयात आणि कमी शिक्षणात होवू नये.'

          'गावधोंड' ही कथा 'सावकारी पाश, करी कुटुंबाचा विनाश' हे स्पष्ट करणारी आहे. ग्रामीण भागात व काही प्रमाणात शहरी भागातसुद्धा गरीब लोक आपल्या गरजेसाठी सावकाराकडून कर्ज घेतात. दुर्दैवाने यातील बरेच लोक निरक्षर असतात. सावकार लोक या अडाणीपणाचा फायदा घेतात. दरवर्षी अव्वाच्या सव्वा व्याज वसूल करतात. मुद्दल कधीच फिटत नाही आणि शेवटी कर्जदाराची, जमीन, घर अशी स्थावर मालमत्ता जप्त करतात नव्हे तर बळकावून बसतात व त्या कुटुंबाला देशोधडीला लावतात.

       काही लोक इर्षेपोटी लग्न, बारसे, वाढदिवस इत्यादी समारंभ थाटामाटात करण्यासाठीही कर्ज काढतात व अनावश्यक खर्च करतात. कर्जबाजारी होतात. ग्रामीण भाषेत लोकांना रीन काढून सण करण्याची सवय असते. हौसेपोटी व इर्षेपोटी काढलेल्या कर्जाची आयुष्यभर फेड करत बसतात व मेटाकुटीला येतात. या विनोदी कथेत लेखकांनी शिक्षक समाजपरिवर्तन करु शकतो. शिक्षक विद्यार्थ्यांमार्फत उद्बोधन पालकापर्यंत पोहचवू शकतो. समाजातील व्यसनाधीनता घालवू शकतो हे विधान  पटवून दिले आहे.

       या कथेतील सर आनंदाने हात जोडून म्हणाले, "हे शिक्षकांचं कर्तव्य असतं पण इथून पुढे लक्षात ठेवा. ऐपत नसता मोठी लग्नं करु नका, नवस करून बोकड कापून खर्चात पडू नका, मोठमोठे वाढदिवस घालू नका, दारू पिऊ नका ते पैसे मुलांच्या शिक्षणासाठी ठेवा. देव कधी भक्ताला कर्जबाजारी हो म्हणत नाही. श्रद्धा व अंधश्रद्धा ह्यातील अंतर ओळखा". अशाप्रकारे लेखकांनी या कथेतून समाजपरिवर्तनाचा मार्ग दाखविला आहे.

        'तरणाई' या कथेतील तरूणाई भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ न मानता प्रेमाच्या गावी जाते. तिथेच त्यांची फसगत होते. तरूणाईला सबकुछ झूठ वाटते. स्वतःचे पोट भरण्याइतकेही स्वावलंबन नसताना, ऐपत नसताना, झेपत नसताना प्रेमात पडतात व स्वतःच्या ध्येयापासून शेकडो कोस दूर जातात. या कथेतील तरुणाईचे प्रतिनिधित्व करणारा महेश बारावीला केंद्रात प्रथम येतो. आईवडिलांच्या अपेक्षा उंचावतात व त्याला शिक्षणासाठी शहरात पाठवतात. महेश मित्रांच्या सहाय्याने शहरी जीवनात प्रवेश करतो. शहरी वातावरणात बावचळतो. एक मैत्रीण दोस्त म्हणून जवळ येते आणि महेश तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागतो. ती जेंव्हा त्याचे प्रेम नाकारते तेंव्हा तो बाण लागलेल्या पक्षाप्रमाणे घायाळ होतो. पुन्हा एकदा तिळगूळ देऊन मैत्री जोडण्याचा प्रयत्न करतो. ती त्याच्या पाया पडते आणि पाया पडण्याचा अर्थ महेशने काढला की तिने माझ्या प्रेमाचा स्वीकार केलाय, त्याला आनंद होतो तो मित्रांना पार्टीही देतो व नंतर कळतं की ती त्याच्या मित्रांच्याही पाया पडली आहे. महेशची घोर निराशा होते. या कथेत एक नवीन म्हण वाचायला मिळाली 'दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान, आपण विसरतो आपले भान.'

        'माधवी एक सत्यकथा' या कथेतील माधवी शहरी वातावरणात वाढलेली असते. लग्न झाल्यावर खेड्यात राहणाऱ्या वसंतच्या कुटूंबाचा तिला दोन दिवसातच वीट येतो. लग्न झाल्यावर पूजा होईपर्यंत राहण्याचा आग्रह सासरचे लोक करतात पण ती त्यांना न जुमानता शहरात निघून जाते. दोन खोल्यात संसार मांडते. कांही दिवसानी तिला एकटेपणाचा कंटाळा येतो. त्याचवेळी कोरोना महामारी सुरु होते. प्रथम माधवीच्या आईवडिलांवर कोरोनाचं संकट येतं. ती त्या प्रसंगात भावाला मदत करते पण जेंव्हा तिच्यावरच कोरोनाचं संकट येतं तेंव्हा भावाने त्याच्या घरी येण्यासाठी परवानगी दिली नाही. माधवीने सासरच्या लोकांना दुखवले होते पण अशा प्रसंगी सासू सासऱ्यानी तिच्या औषधोपचारासाठी सोनंनाणं विकलं, जनावरं विकली, आयुष्यभराची सारी कमाई दोन -तीन लाख खर्च केले आणि माधवीला वाचवले. तिच्या सासूसासऱ्याना जेंव्हा कोरोना झाला तेंव्हा त्यांच्या जवळ कांहीच नव्हते. औषधोपचाराविना ते मरण पावले. बिचारी कांचीही मरण पावली. काचीचं पात्र लेखकानी फार खुबीने मांडले आहे. ती वेडसर वाटते पण तिचं शहाणपण शहाण्याला विचार करायला लावतं. या कथेत खेड्यातील लोकांचा मोठेपणा आणि शहरातील लोकांचा कोतेपणा दिसून येतो.

         'बारा गावचं संचित' या कथासंग्रहातील सर्वच कथा रंजक व विनोदी शैलीत लिहिलेल्या. हे विनोद गरिबाच्या फाटलेल्या संसाराचं खरंखुरं चित्रण करणारे आहेत. शेतकऱ्यांच्या व्यथा वाचकांच्या डोळ्यात अश्रू जमा करणाऱ्या आहेत. कथेतील पात्रे वाचकांच्या ओळखीची
 
       वाचकांशी हितगूज करणारी आहेत. कठिणातील कठीण परिस्थितीतही समाधानानं संसार करणारी माणसं कथेत भेटतात. त्यांच्या जीवनावरील प्रेमाचं चिवट नातं वाचकांना मंत्रमुग्ध करतं. समाधानानं कसं जगावं याचा संदेश प्रत्येक पात्रातून मिळतो. आपल्या प्रामाणिक कष्टातून परिस्थितीला धीरानं तोंड देण्याचं सामर्थ्य सर्व कथावाचकांना मिळतं.कष्टाच्या जोरावर जग जिंकता येते असा ठाम विश्वास कथेत दिसून येतो. समाजातील वाईट लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. लेखकांनी कथातून सामाजिक विषमता, राजकारण यांच्यावर प्रकाश पाडला आहे. कथासंग्रहाच्या प्रत्येक पानावर लेखकाची समृद्ध प्रतिभा व अचूक निरीक्षणशक्ती दिसते.

       कथांची सुरुवात मनोरंजक व  उत्कंठावर्धक आहे उदा.'पूर्वेकडे नुकतंच तांबडं फुटण्याच्या मार्गावर होतं, गारठा मी म्हणत होता, थंडीनं अंग गोठून जातंय की काय, अशी प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण झालेली. भल्या पहाटे उठून बायका स्वयपाकाचं निमित्त करून चुलीजवळ जाऊन बसलेल्या, आराला भाकरी लावायची सोडून जाळाला पाय लावण्यात प्रत्येक बाईला धन्यता वाटत होती.

       कथांचा शेवटही वाचकांच्या काळजाला भिडणारा आहे. उदा. कोसळणारा पाऊस हळूहळू कमी झाला, अंगावर दैवार घेऊन झाड न् झाड तृप्त झालं, पाखरांनी अंग झाडलं, कोकरांनी ओंडक्यावर उड्या मारल्या ओलितं सपार त्या शिवारात अंग निथळत उभा होतं. भिजलं दार तिनं अदबीनं उघडलं आणि दवानं भिजलेल्या गुलाबाच्या फुलासारखी खाली मान घालून ती घराच्या दिशेने चालू लागली. तिच्या मनाचं हलकंफुलकं पीस झालं होतं. ती धन्य झाली होती. तिच्या पतीचं प्रेम तिला उमजलं होतं, एका कळीचं फूल झालं होतं, ओला वारा तिच्या अंगावरुन गेला आणि सुगंधित झाला. निसर्गाशी एकरूप होऊन ती सुखावली होती.'ही उपमा लाजवाब आहे.

लेखकांना पुढील लेखनकार्यास खूप खूप हार्दिक शुभेच्छा ।