बुधवार, ३० एप्रिल, २०२५

सुखाचा राजमार्ग-पुस्तक परिक्षण



सुखाचा राजमार्ग (कथासंग्रह) - पुस्तक परिक्षण

               ✍️ डॉ. सौ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी. 


     


पुस्तक परिक्षण

सुखाचा राजमार्ग (कथासंग्रह)

लेखिका-डॉ. सौ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी.

पुस्तक परिक्षण -श्री. बी. बी.गुरव

माजी मुख्याध्यापक जनतारा हायस्कूल व ज्युनिअर काँलेज, जयसिंगपूर.

       

       डॉ. सौ.ज्युबेदा मन्सूर तांबोळी यांनी लिहिलेले 'सुखाचा राजमार्ग 'हे कथासंग्रहाचे पुस्तक वाचनात आले.मजबूत बांधणीचे, उत्कृष्ट छपाई असलेले, आकर्षक मुखपृष्ठाने सजलेले हे पुस्तक पाहताक्षणीच माझ्या पसंतीस उतरले. मी हे पुस्तक वाचण्याच्या अक्षरशः प्रेमात पडलो.वाचन संपल्यानंतर सविस्तरपणे पुस्तक परिक्षण करण्याचा मोह मला आवरता आला नाही.

      

        'सुखाचा राजमार्ग 'हे या पुस्तकाचे शीर्षक सर्वांना खरोखरीच अंतर्मुख करतं.या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दोन-तीन शब्दांच्या चार ओळी लिहिल्या आहेत.


जीवनातील आपत्तीना

निर्धारपूर्वक तोंड देण्यात

लपला आहे.....

सुखाचा राजमार्ग.

      

      या चार ओळी किती सार्थ आहेत याचा प्रत्यय पुस्तकातील प्रत्येक कथा देत जाते. या कथासंग्रहात तब्बल साठ कथा समाविष्ट आहेत. दोनशे पृष्ठांचंहे आकर्षक पुस्तक साहित्य क्षेत्रातील एक दर्जेदार पुस्तक आहे यात तिळमात्र शंका नाही. कथासंग्रहाच्या मलपृष्ठावर लेखिकेने मांडल्या आहेत या अर्थपूर्ण व समर्पक ओळी....

मनाची श्रीमंती दाखवणं,

श्रमस़ंस्काराची शिदोरी जपणं,

मुलीची माया अनुभवणं,

उदात्त निर्णय घेणं

सदृढ मातृत्व अंगीकारणं

मायेची इस्टेट वाढवणं

देण्यातील आनंद साठवणं,

स्वच्छंदी जीवन जगणं!

       

       कथांच्या शीर्षकातून गुंफलेल्या या ओळीतून कथावाचकांना सुखाचा राजमार्ग नक्की गवसेल असा  संदेश लेखिकेने कल्पकतेने दिला आहे. सर्वच कथा छोटेखानी, घाटदार, कसदार व चटकदार आहेत. जीवनावर भाष्य करणाऱ्या आहेत.


       सुखाचा राजमार्ग या कथासंग्रहातील ' नकुशीचा आहेर' या पहिल्याच कथेत केवळ पैशालाच जगात किती महत्त्व दिले जाते. सख्खे भाऊ बहिणीही गरीब बहिणीचा कसा पाण उतारा करतात, हक्काच्या माहेरातही गरीब बहिणीला कसा अपमान सहन करावा लागतो याचे सुंदर चित्रण या कथेत वाचायला मिळते.

        

       नोटांच्या बंडलाची बँग परत करणारा योगेश  'श्रमसंस्काराची शिदोरी' या कथेत संस्काराचे महत्त्व सांगताना म्हणतो ' मला यातील रकमेपेक्षा माझ्या आईने दिदीला व तिच्या परिवारासाठी स्वतः तयार करून दिलेली शिदोरी लाख मोलाची आहे' एवढेच नव्हे तर बक्षिस म्हणून दिलेले एक हजार रूपये तो नम्रपणे नाकारतो.ही कथा खरोखरीच संस्कारक्षम व अनुकरणीय आहे. 

      

       अमर प्रेमाची समग्र कहाणी या कथेत लेखिकेने शारीरिक संबंध नसलेल्या पवित्र प्रेमाची सुंदर मांडणी केली आहे. संजीवनीवर निखळ प्रेम करणाऱ्या बाळासाहेब या वयस्क दानशूर व्यक्तीची ही समग्र कहाणी थेट ह्रदयाला भिडणारी आहे।

       

        'ताई तूच सुखी रहा' या कथेत लहान बहिणीच्या सासऱ्याशी विवाह करणाऱ्या कमलाताईच्या रुपानं समाजात घडणाऱ्या विचीत्र घटनांचा गोफ समोर येतो आणि शेवटी लहान बहिणीच्या सुमनच्या आत्महत्येनं वाचकाचं मन सुन्न होतं. या कथेत प्रेमाच्या आंधळ्या बहिऱ्या आणि मुकेपणाची साक्ष आणखी एकदा पटते.

       

        दारुड्या वडिलांना आपण जाणतो पण दारूड्या आईची जगावेगळी कथा 'आईचा घोट, मायेला गालबोट' या कथेत पहावयास मिळते. बाजारात आलेल्या दारुड्या आईच्या कमरेचे पैसे दारूडा बाप फळवितो.त्याची लहान मुलगी व मुलगा त्यामुळे अधिकच विमनस्क होऊन रडत बसलेले आहेत आणि खरोखरीच फाटलेलं आभाळ, दुभंगलेली धरणी समोर येते. अशावेळी आम्ही शिकायचं काय? आम्ही करायचं काय? या लेखिकेच्या दोन ओळी काळजाला घर पाडून जातात.       

       

          अपेक्षांचे ओझे' ही कथा मुलांकडून अवास्तव अपेक्षा बाळगणाऱ्या पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी कथा आहे. पालकांनी मुलांकडून अपेक्षा ठेवताना त्या मुलांना झेपतील, पेलतील अशाच ठेवाव्यात हा महत्त्वपूर्ण संदेश लेखिकेने या कथेतून दिला आहे.

       

           'पहा कर्माची गती किती न्यारी'  ही कथा कर्माची गती किती न्यारी' ,राजाचा बनला भिकारी' हे सिद्ध करणारी अफलातून कथा आहे. नोकरी लागण्यासाठी खोटा घटस्फोट घेणाऱ्या मनीषाला खरोखरीचा घटस्फोट घेण्याची वेळ येते. ही अशी लोक विलक्षण कथा वाचकांना स्वतः वाचूनच त्याचे मर्म जाणून घ्या. असा संदेश देते.

       

         सासर व माहेर हे स्त्रीचे दोन डोळे आहेत. धनाच्या लालसेने भावाच्या इस्टेटीत वाटणी मागून स्वतःचे जीवन दुःखी करून घेणाऱ्या बहिणीची व्यथा' मायेची इस्टेट' या कथेत मांडली आहे.

       

       ' मुलीची माया' या कथेत मुलापेक्षा मुलीचा वाढदिवस वडिलांनी थाटामाटात का केला याचं रहस्य वाचकांना कथा वाचल्यावरच कळेल, अशी सुंदर मांडणी लेखिकेने खुबीने केली आहे. आदर्श ज्येष्ठ नागरिकांच्या सोनेरी संसाराचे सुखाचे रहस्य आयुष्याची सोनेरी सायंकाळ या कथेत वाचावयास मिळते.

       

        अशा प्रकारे 'सुखाचा राजमार्ग' या कथासंग्रहातील प्रत्येक कथा काही ना काही महत्त्वाचा संदेश देणारी आहे. वाचकाला उत्कट आकर्षण निर्माण करणारे उत्कृष्ट कथाबीज तर प्रत्येक कथेत आहेच पण त्याचबरोबर प्रत्येक कथेचा शेवट व त्यातील संदेश 'सुखाचा राजमार्ग' दाखविणारा आहे याचा प्रत्यय पुस्तकाच्या पानोपानी येतो.

        'सुखाचा राजमार्ग' या पुस्तकाच्या समग्र वाचनानंतर ज्यावेळी सर्व कथांचे मनन केले त्यावेळी लक्षात आले की.....

       

         या कथा अतिशय आटोपशीर आहेत.या कथा आपल्या अवतीभवती घडलेल्या आहेत असे वाटते.या कथामध्ये आलेली पात्रे सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करतात.या कथा लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या आहेत.या कथांमधून निश्चितच एक जीवनमार्ग म्हणजेच सुखाचा राजमार्ग सापडतो.

       

           या कथासंग्रहात लेखिकेने मांडलेली भाषा साधी सोपी असून सहजशैलीत प्रकट झाली आहे. त्यामुळे वाचकांच्या मनाला एक प्रकारची प्रसन्नता मिळते.प्रत्येक कथा वाचकाला अंतर्मुख करते.प्रत्येक कथेचे बीज व पात्रे लक्षात ठेवल्यास कोणीही कोणालाही या कथा सहज सांगता येतील अशा आहेत.

      

    डॉ. सौ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी यांना शिक्षणशास्त्रातील पीएच्.डी.झालेली आदर्श प्राथमिक शिक्षिका या रूपात ओळखत होतो. त्यांनी वीस वर्षाच्या अथक परिश्रमानंतर संपादित केलेले 'हिंदी लोकसाहित्य का खजाना' हे पुस्तक मी वाचले होते. एक प्राथमिक शिक्षिका साहित्य क्षेत्रात इतकं महत्त्वपूर्ण भरीव कार्य करू शकतात. हे पाहून एक भगिनी म्हणून मला खूप अभिमान वाटतो.


बुधवार, २३ एप्रिल, २०२५

पुस्तक परीक्षण शब्दगंधाशी जडता नाते (काव्यसंग्रह )

 

                ✍️:डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी



             

पुस्तक परीक्षण    

शब्दगंधाशी जडता नाते (काव्यसंग्रह )

कवी -राजकुमार दामू चौगुले.

प्रकिशक -अक्षरदीप प्रकाशन ,

हरिओमनगर रंकाळा (पश्चिम )'कोल्हापूर.

प्रथमावृत्ती- २६/१/२५


पृष्ठे- १०४

मूल्य - रु.१५०-/

        'शब्दगंधाशी जडता नाते 'हा कवी राजकुमार चौगुले यांनी लिहिलेला कविता संग्रह पहिला वाचनात आला.सुंदर मुखपृष्ठ, मजबूत बांधणी, सुबक मांडणी यांनी परिपूर्ण असलेला हा काव्यसंग्रह वाचताना मनस्वी आनंद झाला. वाचकाच्या मनाची पकड घेण्यात हा काव्यसंग्रह यशस्वी झाला आहे.


         कवी राजकुमार चौगुले हे हाडाचे शिक्षक व शिस्तप्रिय मुख्याध्यापक आहेत. नोकरीच्या कालावधीत त्यांनी ' जीवनदीप - शारीरिक शिक्षण कार्यपुस्तिका व नोंदवही इयत्ता नववी व इयत्ता दहावी साठी अशी दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. यावरून त्यांची शारीरिक शिक्षणाबद्दलची अभिरुची दिसून येते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना असलेली तळमळ स्पष्ट होते. म्हणूनच 'ऐकशील का ' या कवितेत विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणतात "।पोपटपंची ज्ञानाने शाना कधी होशील का ?"कवी राजकुमार चौगुले यांनी विविध विषयांवर कविता लिहिलेल्या आहेत. त्यांच्या कवितांचे विषय आहेत निसर्ग, प्रवासवर्णन, शेतातील पिके, विद्यार्थी, समाजस्थिती, राजकारण, जीवनसाथी, नातवंडे, जीवनविषयक तत्त्वज्ञान इत्यादी.हे सर्व विषय पाहता असे दिसून येते की कवी एक आदर्श शिक्षक, कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक, कुटूंबवत्सल पिता, समजूतदार पती,कष्टाळू शेतकरी, संयमी नागरिक व प्रेमळ आजोबा आहेत. कवितांचे वाचन करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू उलगडतात.


          सेवानिवृत्तीनंतर मातीतून मोती पिकवत असताना त्यांच्या हाती शब्दांचे मोती आपसूकच हाती आलेले आहेत. त्या मोत्यांची सुरेख मांडणी करून त्यांनी 'शब्दगंधाशी जडता नाते' हे सुंदर शब्दशिल्प तयार केले आहे.

'आगमन मान्सूनचे ' या कवितेत ते म्हणतात,

रिमझिम बरसत

मान्सून आला

पाहूनिया मृगधारा

बळीराजा सुखावला


          या कविता संग्रहातील सर्वच कविता सहजपणे अंतर्मनातून सहज बाहेर पडल्या आहेत. त्यात कुठेही कृत्रिमता नाही कवीच्या मनीचे भाव प्रांजळपणे व्यक्त झाले आहेत.

          

        आजकाल सर्वच लोक पर्यटनाला जातात , निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना फोटो काढून स्टेटसला लावण्यातच धन्यता मानतात. सरांनी पर्यटनात निसर्गसौंदर्य डोळ्यानी टिपून ह्रदयात साठवून कवितेत मांडलय.

'सुंदर काश्मीर 'या कवितेत ते म्हणतात

सरीवर सर येते,

न्हाती धुती होते,

फूल फुलांच्या सुगंधाला.

भूल जीवाला पडते.

 

'स्वप्न पुस्तकाचे' या कवितेत कवी 

म्हणतात

पुस्तके येतात स्वप्नात

बोलतात माझ्या कानात 

सारखाच होतो हातात

 शब्दगंध असे मुखात

 

'शोध सुखाचा ' या कवितेत सरांनी समाजातील एक अलिखित सत्य मांडले आहे.

सुख शोधलं शोधलं

कधी नाही गवसलं 

वाटलं सापडलं सापडलं

पण हुलकावणीच दिलं

 सुख हे मृगजळ आहे, त्याचा मागे न धावता जीवनगाणे गातच राहिले पाहिजे हा कवींचा सकारात्मक दृष्टीकोन आहे.

'हूं म्हण 'या कवितेत ते म्हणतात

हूं म्हण लेका ,

कानी  सांगतो जन्माची

रात ध्याड, राबून मुला

शाणं कसं कसं झाल्याची.

       

        धर्माचे विडंबन न करता, मंदिरे बांधू नका , त्यापेक्षा ज्ञानमंदिरे बांधण्याचा सल्ला 'गरज 'या कवितेत कवीनी दिला आहे.

      

         'पैसा बोलतोय 'या कवितेत पैशांच्या खेळात जीव गुदमरतो हे सांगितले आहे.

        

         ' घराचे घरपण 'या कवितेत सौ.विषयी गोड तक्रार केली आहे. तिच्या सतत बोलण्याने घराचे घरपण जिवंत राहिल्याचे शेवटी त्यांनी कबूल केले आहे.


'मी जगाचा पोशिंदा 'या कवितेत शहरात राहणाऱ्या लोकांना उद्देशून म्हणतात

दररोजचे दूध तुला

गबाळ्याच्या गोठ्यातूनच येते

रोजची भाजी तुला

अडाण्याच्या शेतातूनच येते.


          या कवितासंग्रहातील कांहीं कवितेत कवींनी गेयता आणली आहे. गाजलेल्या मराठी गीतांवर आधारित रचना केलेली आहे.

उदा.सुंदर काश्मीर- काळया मातीत मातीत तिफन चालते.

राजकारण- कशी नशिबानं थट्टा कशी मांडली.

साज - गाडी चालली घुंगराची


        एकंदरीत हा काव्यसंग्रह उत्तम साहित्यकृती आहे.कवीचे मनापासून अभिनंदन व पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा।







बुधवार, १६ एप्रिल, २०२५

जागरण -पुस्तक परिक्षण


जागरण (आत्मकथन) - पुस्तक परीक्षण


✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


                     

पुस्तक - जागरण
लेखक - भारत सातपुते
 प्रकाशनगर , लातूर
पिन कोड - 413531
प्रकाशिका - सुषमा भारत सातपुते
मांजरा प्रकाशन, लातूर 
पृष्ठे - 302   
मूल्य - 600/-रू.
प्रथमावृत्ती - 09 एप्रिल 2024
ISBN: 11205471035



       
       'जागरण' हे लेखक भारत सातपुते यांचं आत्मकथन आहे. यामध्ये लेखकांनी बालपणापासूनचा गरिबीतील प्रवास ते नोकरीतील रिटायरमेंटपर्यंत चा संघर्षमय प्रवास प्रभावीपणे , दमदार शैलीत खुबीने मांडला आहे. 'बालपणाचा काळ सुखाचा'असे म्हणतात पण तो सर्वांनाच सुखाचा नसतो कारण गरिबी काहींच्या पाचवीलाच पूजलेली असते. तशी लेखकांच्याही पाचवीला पूजलेली होती. संबळ, तुणंतुणं घेऊन, झोळी खांद्यावर अडकवून जागरण करणाऱ्या, फिरस्ती कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अशाही परिस्थितीत आईवडिलांनी शिकविण्याचा प्रयत्न केला हेच कौतुकास्पद आहे. त्यांना दिवाळीत कधी फटाके मिळाले नाहीत. शेतीच्या कामात मदत करत शिक्षण घ्यावे लागले. आईवडिलांनी लेखकाना व त्यांच्या भावंडांना जागरणाला जाऊ दिले नाही. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी  मात्र आयुष्यभर जागरणे केली. त्यांच्या घरी साधी सांडशीसुद्धा नव्हती आई पदराने पातेली उचलायची. असे कमालीचे दारिद्रय वाटेला आलेले असतानाही त्यांनी आपल्या मुलांवर सुसंस्कार केले हे लेखकांनी अनेक उदाहरणे देऊन सांगितले आहे. 'रावण्या 'या श्रीमंत मित्राची ह्रदयद्रावक आठवणही लेखकांनी नमूद केली आहे. पायाला बसणारे चटके व दुखणारी कुरपे आठवून लेखकांनी लहानपणी एकदा दुसऱ्यांचे चप्पल उचलून आणले होते , ते वडिलांनी परत होते तिथे ठेवायला लावले. आईने एकदा पैशाच्या बदल्यात दुसऱ्यांचा तांब्या ठेवून घेतला असता वडील तिला रागावले. बालपणातील रेडिओ बद्दलचा व स्नेहसंमेलनातील धोतराबद्दलचा किस्सा मनोरंजक वाटला. लेखकांनी बालपणातील केलेले वर्णन माझ्याही बालपणातील परिस्थितीतीशी मिळते जुळते असल्याने मला अगदी मनापासून भावले पण हे वर्णन पान नंबर अडतीसवरच संपले आणि पान नंबर एकोणचाळीस पासून लेखकांच्या जीवनातील संघर्षमय पर्वाला सुरुवात झाली.
       
        श्री. सातपुते सरांना शिक्षक पदावर रुजू होताच समाजातील अस्पृश्यतेचा पगडा लक्षात येऊ लागला. स्त्री पुरुष यांची निखळ मैत्रीही समाजाला अमान्य आहे हे जाणवू लागले. काटकसरीचा मंत्र देणारे यादव गुरुजी त्यांना भेटले. प्रतिज्ञेचा अर्थ जाणून न घेता फक्त म्हटली जाते , त्याप्रमाणे आचरण होत नाही हे दिसून आले."हाँटेलच्या दोन माणसांच्या खर्चात दहा माणसे पोटभर खाऊ शकतात " हे सरांच्या आईचे वाक्य मला पटले. धूम्रपानास विरोध करताना माझ्या खिशातल्या पैशांनी खर्च करतोय, तुमचं काय जातय? असं ऐकून घ्यावं लागलं. शिक्षकांना वेळेवर शाळेत येण्याची सक्त सूचना अंगलट आली.शिक्षणाधिकाऱ्यानाही ' गुराख्यासारखे काय बोलायलाव 'असे म्हणून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचे साहस नोकरीत नवे असतानाही सरांच्या अंगी होते हे विशेष. ' बायकोने नवऱ्याच्या अन् कर्मचाऱ्यांने अधिकाऱ्याच्या विरोधात बोलू नये' असा अलिखित नियम सर्वजण पाळत असताना त्यांनी विरोध पत्करला यावरून त्यांचे धाडशी व्यक्तिमत्त्व लक्षात आले. सातपुते सरांनी  रागाने माहेरी निघालेल्या महिलेस परत सासरी नेऊन सोडण्याचे सत्कार्य केले.
    
        'नुसतंच थोबाड वर करून कविता लिहितोस कर्ज काय तुझ्या बापानं फेडायचं का'  या चेअरमनच्या बोलण्याने व्यथित होऊन त्यांनी स्वतःची जागा विकून कर्ज फेडले याला म्हणतात स्वाभिमान! 
        सातपुते सरांना नोकरीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना वर्गात थंडीत बसवून थंडीच्या दिवसांत जुने शैक्षणिक साहित्य जाळून शेकत बसलेले शिक्षक भेटले. रजामंजुरी, भविष्य निर्वाह निधी, कर्जाचे व मेडिकल बिलाचे प्रस्ताव इत्यादि कामात अडवणूक करत लाच खाणारे क्लार्क व अधिकारी भेटले. अधिकारी महाराष्ट्र दर्शनाच्या बिलासाठी टक्केवारी मागतात हे निदर्शनास आले.dirtrict primary education project म्हणजे d. P.e .p या प्रोजेक्ट बद्दल एक गटशिक्षणाधिकारी म्हणतात " डी. पी. इ. पी. म्हणजे देशी पी इंग्लिश पी. काय म्हणावे या अधिकाऱ्यांना? लेखकाप्रमाणे वाचकानाही चीड येईल नक्की. एका अधिकाऱ्याने तर केंद्रप्रमुखाना खेचर म्हटले.
       
        लाच घेणाऱ्यांची वेळेवर दखल घेऊन शिक्षा केली नाही तर लाचखोरीचे प्रकार वाढतात या सरांच्या मताशी मी 100% सहमत आहे. सोसायटीच्या निवडणुकीतील वात्रटपणा लेखकांनी खुल्या मनाने कबूल केला आहे. राजीव गांधी शाळा योजनेतील फोलपणा म्हणजे रोजगार हमी काम कमी , काम कमी अर्धै तुम्ही अर्धे आम्ही. ही योजना सरांनी बंद केली.
 उपचार वर्गातील 'त्या ' शिक्षिकेच्या आरोपामुळे सरांना राष्ट्रपती पुरस्कार मिळण्याची संधी गेली. या प्रसंगानंतर सरांचे हे स्वगत वास्तव व चिंतनीय वाटते. " माझे हे वागणे चुकलेच, आदर्श चारित्र्य, तत्वे, माणुसकी आदि या घटनेमुळे पायदळी तुडविली गेली. दुसऱ्याचा संसार सांभाळण्याच्या नादात
         
       स्वतः च या संसाराच्या इज्जतीचा पालापाचोळा केला त्याचे काय? सांडलेली प्रतिष्ठा, वाया घालवलेले क्षण हे सर्व आता परत येणार का?"
लेखकांच्या झुंजार वृत्तीची प्रतिमा लोकांच्या मनात होती त्यामुळे लोक म्हणायचे' "हे व्यवस्थापक माजी शिक्षणाधिकाऱ्याचे नातलग आहेत. ही कडू वाळकं तुम्हीच तोडू शकता" हा पाहुणचार आहे पण लोकांच्या खिशातून खाणे बरे नाही" ही सरांची भूमिका अनुकरणीय आहे. सरांच्या सडेतोड वागण्याबोलण्यामुळे अनेंकांची लबाडी उघड झाली. त्यामुळे त्यांची गाडी पंक्चर करणे, कुठे काचा फोडणे, कुठे अडवणूक चालायची पण सरांना या खाचखळग्यांची सवय झाली होती. शाळाभेटीच्या वेळी लेखकांना अनेक ठिकाणी हास्यास्पद विस्कळीतपणा दिसायचा. आठ आठ दिवस टाचण न काढणाऱ्या शिक्षिका दिसायच्या, नशापाणी करून धिंगाणा घालणारे शिक्षणाधिकारी दिसायचे कांही दिवसांनी तेच उपसंचालक पदावर हजर झालेले दिसायचे. अशावेळी' उध्दवा अजब तुझे सरकार' म्हणून आवाज उठवायची पाळी लेखकांवर यायची. मेवा दिल्याशिवाय सेवा न करणारे अधिकारी त्यांच्या निदर्शनास आले. शिक्षकांना नैतिकतेचे धडे देणाऱ्या डाएटचे लागोपाठ दोन प्राचार्य लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात सापडल्याचे लेखकांनी पाहिले. अधिकारी पळवाटांच्या पुढे नोटासाठी पायघड्या घालण्यात धन्यता मानतात. कुंपणानेच शेत खायचे ठरविले तर मालकाने काय करावे? ही शिक्षणव्यवस्थेची दुर्दशा पाहून मन व्यथित  होते. लेखक म्हणतात," भाषणात साने गुरुजी अन् वागण्यात नाणे गुरुजींचे पीक जोमात आहे. आदर्श मात्र कोमात आहे." लेखक पुढे म्हणतात" 
       
         यहाँ सब नकटोंका मेला है, जो भी नाकवाला है, वह भी मेरा चेला है।येथे चांगल्यांची कदर नाही. भ्रष्टाचार कमी व्हावा असे कोणाला वाटत नाही. प्रसादमाध्यमे सत्यासाठी चालू आहेत की सत्तेसाठी? हेच कळत नाही" जिल्हा परिषद प्रशाला निलंगा केंद्रापुढे लेखकांच्याबद्दल खोडसाळपणे लिहिले होते की, यह केंद्र मौत का कुआँ हे ,यहाँ भारत सातपुते केंद्रचालक है।हे वाक्य लेखकांच्या धारदार, शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्वाची साक्ष देते.
        सातपुते सरांना काँपी पुरविणारे शिक्षक दिसले. इमारतीवर संत नामदेव लिहिणारे संस्थाचालक दाम घेऊन काम करत असल्याचे दिसले. सतत लाचखोरीत वावरणाऱ्या प्रशासनाला तुकडा फेकून पुन्हा लाचार करणे अवघड नसते असे सरांचे मत आहे याबद्दल कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही.' पुण्यनगरी हितसंबंधामुळे पापनगरीला साथ देते 'या वाक्यावरुन सरांची लेखनातील कल्पकता व तळमळ दिसून येते. लेखकांनी पान नंबर १६९,१७० वर अप्रगत विद्यार्थ्यांची मांडणी शिक्षणाचे विदारक चित्र दर्शवते. 
     
         दहा हजार उत्पन्न कमी करून न आणता मुलीची फी भरणारे सरिंसारखे पालक दुर्मिळ आहेत. विद्यार्थ्यांचे शरीर मजबूत करण्यासाठी शाळेत पहाटे व्यायामाचे नियोजन म्हणजे  सर्वांगिण विकासाची गुरुकिल्ली आहे हे ओळखून झपाटून काम करणाऱ्या आदर्श शिक्षकाचे काम आहे हे सरांनी लीलया पार पाडले आहे. या आत्मकथनातील वैशिष्ट्य म्हणजे लेखकांनी मान सांगावा जना , अपमान सांगावा मना हे तत्व न वापरता जे व जसे घडले तसे लिहिले आहे. राष्ट्रगीत वैयक्तिक म्हणावयास सांगताना आत्मविश्वास ढळल्याने ते दडून बसल्याचे सांगितले आहे. चेक लिहिताना त्यांच्या हातून घडलेल्या चुका प्रांजळपणे कबूल केल्या आहेत.
      
        डी.लिट. पदवी साठी दीड लाख भरण्याचे टाळून लेखक म्हणाले," दीड लाखात तीन म्हशी येत्यात त्या सांभाळल्या तर महिन्याला दुधाचे लाखभर रुपये मिळतिल" हा त्यांचा त्याग वाखाणण्याजोगा आहे. पुरस्काराबाबत त्यांचे मत असे ' ना दाम, ना लिंगना वशिला, ना लाच,ना गटतट, ना जातधर्म वापरता केवळ गुणवत्तेवर, कार्यावर व निरपेक्ष भावनेने कोणी सत्कार केला तरच तो स्विकारावा" हे मत मला पटले.
वार्ताहर श्री. किशोरजी यांनी लेखकाविरूद्धची बातमी दिल्याने राजीनामा दिला. रागाने सहा सात महिने काम बंद केले ही लेखकांच्या सत्कार्याची पोचपावती आहे. त्यांच्या वरच्या खटल्याचा निकाल लागल्यावर लोक म्हणाले," सत्य  हे परेशान होते परंतु पराजित होत नाही. मँडमवर अब्रू नुकसानीचा दावा ठोका " पण सरांनी समंजसपणे ते टाळले.आजच्या समाजात गुलालापेक्षा दलालच श्रेष्ठ वाटतात. अशा समाजात लेखकांसारखे तत्वाला धरून वागणारे दहा हजार पेन्शन जास्त मिळाल्याचे पंचायत समितीच्या निदर्शनास आणून कमी करून घेतात. केवढा विरोधाभास आहे हा एकीकडे अंधार तर दुसरीकडे तेजस्वी लख्ख प्रकाश. 
     
    संपूर्ण आत्मचरित्रात आपल्या संसाराविषयी, मुलांबाळाविषयी फार कमी लिहिले आहे. मुलीच्या लग्नातील सूटकेस विसरल्याचा प्रसंग, सासूच्या पाठीवर त्यांनी मारलेला रट्टा इत्यादि गमतीदार प्रसंग वगळता सर्व प्रसंग शैक्षणिक दुरावस्था व त्याविषयीची लेखकांची चीड पानांपानावर दिसून येते. त्यांनी आई वडिलांविषयीचा आदर प्रसंगानुरूप व्यक्त केला आहे. वडिलांच्या चांगल्या शिकवणुकीचे व त्यांच्या शहाणपणाचे प्रसंग वाचकांसमोर उभे केले आहेत. 
आत्मचरित्रात लेखकांनी लिहिलेली बोलीभाषा ज्वलंत व वास्तव वाटते. त्यामुळे लेखनाला नवा साज चढलेला आहे. उदा. भुका लागल्यात, काढताल, म्हणायलात, रडाया लागलाबोलायलाव, मगा, घडतेल का?.

     लेखकांनी मांडलेला शिक्षणव्यवस्थेतील भ्रष्टाचार कमीअधिक प्रमाणात सगळी कडे दिसतो पण प्रत्येकजण कातडीबचाव धोरण स्विकारतो.लेखकांनी तसे न करता भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. हे बघून गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या एका वचनाची मला आठवण झाली ' अस्तमानाला जाणाऱ्या सूर्यास एकदा वाटले ,मी अस्तमानाला गेल्यावर इथं पूर्ण अंधार पसरणार,त्यावेळी कोण देईल इथं प्रकाश? कोणीही पुढे आले नाही. तेंव्हा एक छोटीशी पणती पुढे आली व म्हणाली मी देईन प्रकाश माझ्या परीने' सर या पणतीप्रमाणे तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात तुमचा कार्यरुपी प्रकाश दिला आहे. तुमच्या या अमूल्य कार्याला, धडपडीला अगदी मनापासून प्रणाम!
आत्मचरित्राच्या शेवटी लेखकांनी मांडलेले विचार जीवनाचा सार सांगून जातात. लेखक म्हणतात," चिखलावर दगड फेकला तर आपल्याच अंगावर चिखल येणार हे खरे असले तरीही चिखलाचा चिखल होण्याऐवजी सुगंधी फूल उगवावे असे वाटते." 
     
       सुषमाताईंचा लेखकांशी बोलणाऱ्या कवितांचा संग्रह ऊनसावली उशीरा का होईना प्रकाशित केला हे वाचून एक स्त्री या नात्याने मला खूप समाधान वाटले.
सर, आपले आत्मचरित्र वाचताना पुस्तकातील प्रत्येक पान आपल्या झुंजार वृत्तीची साक्ष देते व झुंज पिक्चमधील '    झुंजार माणसा झुंज दे,झुंज दे' या गाण्याची आठवण आली.
आपल्या पुढील लेखन कार्यास व समाज कार्यास हार्दिक शुभेच्छा!

शनिवार, १२ एप्रिल, २०२५

वर्गमित्र स्नेहमिलन

                वर्गमित्र स्नेहमिलन

        



      सन -1993-94 ची नवजीवन हायस्कूलची दहावी बँच् व 1990- 91 ची न.प.शाळा क्र.1 ची सातवीची बँच यांचं गेट टुगेदर 5 एप्रिल 2005 रोजी गेमोजी फूड माँल , जयसिंगपूर  येथे संपन्न झाले. त्या अपूर्व सोहळ्याविषयीचे माझे मनोगत.....

एक संसस्मणीय रम्य सोहळा ।

विद्यार्थी बाळानो,

       खरं तर 34 वर्षापूर्वी आम्ही शिक्षकांनी तुम्हाला ज्ञानदान केलं.एवढ्या वर्षानंतर तुम्ही सर्वांनी आमची आठवण ठेवली.आठवणीने प्रत्येकाच्या घरी जाऊन निमंत्रण दिलं .सर्वांना एकत्र बोलावून सर्व शिक्षकांचा यथोचित सन्मान केलात ,ही आमच्या साठी खूप सुखावह गोष्ट आहे. आयुष्याच्या संध्याकाळी तुमच्यासारख्या सद्गुणी , सुसंस्कारित विद्यार्थ्याकडून झालेला गौरव आम्हा शिक्षकांना हत्तीचं बळ देऊन गेला. आनंदाने ऊर भरून आला. योगश आणि मित्र परिवार ने आयोजित केलेला हा नयनरम्य सोहळा नितांतसुंदर, अप्रतिम ,अपूर्व असा झाला. तुम्ही सर्वांनी इतकं छान नियोजन केलं होतं की स्वागत झाल्यापासून सोहळा संपेपर्यंत एकामागून एक असे अनेक सुखद धक्के बसले .ज्यानी आम्हाला नवी एनर्जी मिळाली.आम्ही लावलेल्या छोट्याशा आम्रवृक्षाच्या रोपांचे फळांनी बहरलेल्या डेरेदार वृक्षात झालेले रुपांतर पाहून आपण आमराईत वावरत असल्याचा आनंद आम्ही उपभोगला.

         बाळानो तुम्ही सर्वजण स्वागताला थांबला होता. तुतारीचा कर्णमधुर स्वर आणि तुम्हा सर्वांचे उत्साही ,हसरे चेहरे, चेहऱ्यावर विनम्र भाव,आदराने केलेले नमस्कार हे सर्व पाहून आमच्या नकळत आमच्या अंतःकरणातून लाखो आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळालेत बाबानो!...

        स्टेजवर जाताना चे पार्टी पाँप्अप्स् ,चालताना तुम्ही धरलेला हात खरोखरीच अविस्मरणीय होता.सोहळ्याच्या सुरुवातीला जो परिपाठ सादर केलात ना त्यातील कल्पकता कोतुकास्पद आहे. इतक्या वर्षानंतर तुमच्या तोंडून नेहमी खरे बोलावे हा सुविचार ऐकताना मजा वाटली. बातम्या ऐकून बरे वाटले. स्वर्गीय शिक्षकांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांचाही सन्मान करण्याचा तुमचा मनोदय खूप आवडला.त्यानंतर उपस्थित सर्व शिक्षकांना स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन तुम्ही केलेला सन्मान राज्यस्तरीय पुरस्कापेक्षाही भारी वाटला .तुम्ही गळ्यात घातलेल्या माळा तुमच्या आमच्यातील जिव्हाळ्याच्या प्रतीक ठरल्या .

        प्रत्येक शिक्षकाबद्दल त्यांच्या खास वाक्यासह तयार केलेल्या चारोळ्या या सोहळ्यातील खास आकर्षण ठरल्या.तलहा,यास्मिन, योगिता व चारोळ्या तयार करणाऱ्या सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. चारोळ्या ऐकताना रणरणत्या उन्हात आल्हाददायक पावसाच्या सरी पडत असल्याचा सुखानुभव आला.

                         मार्मिक चारोळ्या

                         सरी पावसाच्या

                         आकर्षण ठरल्या

                         अपूर्व सोहळ्याच्या ।

        तुम्ही सर्वांच्यासाठी केलेली फेट्यांची व्यवस्था लाजवाब. स्वादिष्ट नाश्ता व रूचकर भोजन व्यवस्था करून सर्वांना तृप्त केलंत तम्ही .भोजन करतांना तुम्ही केलेल्या आग्रहाने मनही भरले.अभिजीत यातलं थोडं तरी घ्या म्हणत होता तर दुसरा जिलेबीचा घास मुखात भरवत होता.कित्ती कित्ती प्रेम दिलंत रे बाळानो मी बाळानोच म्हणेन तुम्हाला कारण तुम्ही फारच गुणी बाळे आहात.

        उर्वरित आयुष्य आनंदाने घालविण्यासाठी तुमचा हा आपुलकीचा , आदराचा, जिव्हाळ्याचा सोहळा आम्हाला सदैव टाँनिक देत राहील.

       शेवटी योगेशचे आभारप्रदर्शन म्हणजे आभारप्रदर्शनाचा उत्कृष्ट नमुना होता. स्वतः च्या चुकांची कबुली, आपण केलेल्या कामाचे प्रदर्शन न करता सर्व श्रेय मित्रांना देण्याची त्याची खिलाडूवृत्ती पाहून आम्ही तुम्हा सर्वांचे शिक्षक असल्याचा अभिमान वाटला.

                 धन्य झालो आम्ही सोहळा पाहून

                 अशीच मर्जी ठेवा मनापासून।

मनोगत प्रेषक,

डॉ. सौ.ज्युबेदा मन्सूर तांबोळी

शाहूनगर जयसिंपूर ।