दि. ३० जानेवारी हा महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीचा दिवस. हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त हा विशेष लेख.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची एकादश व्रते - विशेष लेख
साबरमती के संत तूने कर दिया कमाल ।
आँधी में भी जलती रहे गांधी तेरी मशाल ।
साबरमती के संत तूने कर दिया कमाल ।
किती सार्थ आहेत या ओळी! महात्मा गांधीजीनी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसा म्हणजे सत्याचा पाया आहे असे ते मानत. कुठल्याही गोष्टीत जास्त हाव धरू नका, शेजारधर्म पाळा, ईश्वरावर विश्वास ठेवा, भ्याडपणा सोडा, शूर बना ही त्यांची शिकवण होती. साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी हे गांधीजींचे तत्व! गांधीजी आंघोळीला साबणही वापरत नसत. ते दगडाने अंग घासायचे. गांधीजीना वेळ वाया घालवलेला अजिबात आवडत नसे. अशा प्रकारे व्रतस्थ जीवन जगणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी एकादश व्रते जीवनभर आचरणात आणली, ती पुढीलप्रमाणे....
अहिंसा, सत्य, अस्ते, ब्रम्हचर्य, असंग्रह,
शरीराश्रम, आस्वाद, सर्वत्र भयवर्जनम्,
सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी, स्पर्शभावना
ही एकादश सेवावी नम्रत्वे व्रतनिश्चये ।
एकादश व्रताची संकल्पना गांधींनी पुढीलप्रमाणे स्पष्ट केली आहे.
१. अहिंसा:
मानवी जीवनाचा आधार म्हणजे अहिंसा होय. दुसऱ्यासाठी त्याग, सहनशीलता, सेवा, आत्मक्लेश यांचा अहिंसेमध्ये समावेश होतो. हिंसेने हिंसा कधीच नाहीशी होऊ शकत नाही. अहिंसा हा शूरांचा धर्म आहे. 'अहिंसा परमोधर्मः' हे त्रिकालाबाधित सत्य आहे. दुसऱ्याच्या बाजूने विचार करणे, त्याचे हित जोपासणे यातून अहिंसेचा उदय होतो. दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळा वाटणे ही अहिंसेची प्राथमिक स्थिती होय. सत्यनिष्ठ मनुष्याच्या शुद्ध आणि न्यायी वृत्तीतून व्यापक अहिंसेचा जन्म होतो म्हणून गांधीजींनी सत्य आणि अहिंसा यांचा समन्वय साधला. त्यांच्या मते मानवा-मानवातील क्रिया-प्रतिक्रियांची प्रभावी पद्धती म्हणजे अहिंसा होय.
२. सत्य:
सत् चा अर्थ आहे अस्तित्व. सत्य म्हणजे जे अस्तित्वात आहे ते. गांधीजींचे जीवन म्हणजे सत्यनिष्ठेचे प्रयोग होय. सत्य चिरंतन शाश्वत असते. सत्य हाच परमोच्च धर्म आहे. सत्य हे वैचारिक व प्रात्यक्षिक आहे. ते सतत शुद्ध, सनातन आणि अपरिवर्तनीय आहे. त्यालाच गांधीजी ईश्वर असे मानत. सत्याला परमेश्वराइतके महत्त्व देत. वासना सोडून सेवाकार्यात रममाण होणे, सहिष्णू वृत्ती बाळगून परमेश्वराशी एकरुप होणे म्हणजे सत्याचरण करणे होय. सत्य हेच ईश्वरज्ञान. अज्ञानाचे पटल दूर झाले की सत्याचा प्रकाश दिसतो असे गांधीजी नेहमी म्हणत .
३. अस्तेय:
अस्तेय म्हणजे दुसऱ्याच्या वस्तूची चोरी न करणे एवढाच अर्थ नसून आपल्यावरील समाजऋण फेडणे असा आहे. गांधीजीना अस्तेय हे व्रतसुद्धा प्राणप्रिय होते. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे समाजामध्ये राहून समाजाच्या उपकारामुळे ज्या ज्या अनेक सोयी व्यक्तीला मिळतात त्यापैकी कांहीं भाग समाजाला न देता सर्वस्वी स्वतःच उपभोगणे म्हणजे चोरी होय. अशी चोरी आपल्या हातून होवू नये, असे गांधीजीना वाटे.
४. ब्रम्हचर्य:
ब्रम्ह म्हणजे वेद. त्यांचे अध्ययन सुरू करण्यासाठी उपनयन संस्कार करून तद्नुरुप जीवनसाधना सुरू करण्यासाठी जीवन जगण्याचे जे नियम घालून दिले जातात ते ब्रम्हचर्य होय. ब्रम्हचर्य म्हणजे इंद्रिय संयम करणे. ब्रम्हचर्यामध्ये शरीररक्षण, बुद्धिरक्षण आणि आत्म्याचे रक्षण आहे. फलाहार हाच खरा ब्रम्हचर्य व्रताचा आधार होय. ब्रम्हचर्य म्हणजे काया, वाचा, मने करून सर्व इंद्रियांचा संयम होय. यासाठी त्याग केला पाहिजे. ईश्वर प्राप्तीसाठी ब्रम्हचर्य व्रताचे पालन आवश्यक आहे अशी त्यांची श्रद्धा होती. जननेंद्रिय व स्वादेंद्रिय यांच्यावर विजय मिळविण्यासाठी ब्रम्हचर्य व्रताचे पालन गांधीजीनी जीवनभर केले. त्यातूनच त्यांनी आत्मशुद्धी करण्याचा प्रयत्न केला. आहार व उपवास यांचा ब्रम्हचर्याशी निकटचा संबंध असला तरी त्याचा मुख्य आधार मन हेच आहे. मलिन मन केवळ उपवासाने शुद्ध होत नाही. मनाचा मळ विचारांने, ईश्वर चिंतनाने आणि शेवटी ईश्वर प्रसादानेच स्वच्छ होतो यासाठी ब्रम्हचर्य व्रताचे पालन महत्त्वाचे आहे, असे ते म्हणत.
५. असंग्रह:
गरज नसताना कोणत्याही वस्तूंचा संग्रह करु नये, म्हणजे समाजातील प्रत्येकाला ती वस्तू सहज उपलब्ध होऊ शकेल. या व्रताचे पालन करून लोकशाही मूल्ये आचरणात आणणारा समाज गांधीजीना हवा होता. सर्वोदय समाज निर्माण करणे हे त्यांचे सामाजिक उद्दिष्ट होते. सामाजिक न्याय, आर्थिक समता आणि सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध होण्यासाठी असंग्रह या व्रताचे सर्वांनी पालन करावे असे ते म्हणत.
६. शरीरश्रम:
श्रम हा महत्वाचा मुख्य संस्कार. शिक्षण म्हणजे शरीर, मन व आत्मा यांचा विकास असे गांधीजी मानत. त्यामुळे श्रम या संस्कारासाठी स्वावलंबन या तत्वाचा जीवनात अंगीकार करा. ते स्वतः सूत कातून खादीचे कापड विणत. स्वतःचे कपडे स्वतः धूत असत. श्रमातून शरीराचा संपूर्ण विकास होतो असे ते मानत.
७. आस्वाद:
जिभेचे चोचले न पुरविता अन्न सेवन करणे म्हणजे आस्वाद. गांधीजींचे जेवण अतिशय साधे असे. अन्नासाठी शरीर नसून शरीर कार्यक्षम करण्यासाठी अन्न आहे असे ते म्हणत. गांधीजी या व्रताचे नियमित आचरण करीत. आफ्रिकेत असतानाही ते शाकाहारी भोजन करीत असत.
८. भयवर्जनम्:
भयवर्जनम् म्हणजे भीती नाहीशी करणे. व्यक्तीया आचरणात सत्य गोष्टींचा समावेश असेल तर कोणत्याही बाबींची भीती नाही. महात्मा गांधीजींचे जीवनच प्रयोगशील होते. त्यांनी अनेक प्रयोग केले. त्यासाठी कोणतीही भीती बाळगली नाही. ईश्वरावर त्यांची नितांत श्रद्धा होती. ज्यांना नवीन प्रयोग करावयाचे असतील त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, तसे झाल्यास सत्य लवकर प्रकट होते. असे प्रयोग करणाऱ्याला ईश्वर सांभाळून घेतो. धोक्यांचा विचार त्यांच्या मनाला कधीच शिवला नाही.
९. सर्वधर्मी समानत्व:
गांधीजींच्या मते धर्म म्हणजे सत्य व अहिंसा. सर्व धर्माबद्दल सारखीच आदराची व समानत्वाची भावना सर्वामध्ये रूजण्यासाठी धार्मिक व आध्यात्मिक शिक्षणाची गरज आहे असे ते मानत. भिन्न भिन्न जातीमध्ये ऐक्य निर्माण व्हावे, आपल्या धर्माबरोबरच अन्य धर्माची श्रेष्ठता जाणून त्याबद्दल पूज्य भाव वाढवावा, मैत्रीची भावना वाढवावी, या गोष्टींना जीवनात व शिक्षणात मोठे स्थान आहे. शिक्षणातून सर्व धर्म समानत्व प्रस्थापित करावे यासाठी विविध धर्माच्या सिद्धांताचा अध्यापनात समावेश करावा, सर्वामध्ये सर्वधर्म समभाव वाढीस लागावा, विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक श्रद्धा दृढ करावी असे गांधीजी म्हणत.
१०. स्वदेशी:
स्वदेशी म्हणजे यंत्रोद्योगी मालाच्या विरूद्ध हस्तोद्योगाचा पुरस्कार होय. यामागे श्रमसंस्कार आणि स्वयंरोजगार हा हेतू होता. आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू देशातच निर्माण होण्यासाठी गांधीजींनी स्वदेशीचा पुरस्कार केला. त्यानुसार जीवनभर हातमागावर खादीचे कापड विणून त्याचा वापर केला. देशाच्या विकासासाठी खेड्याकडे चला, आपल्या हक्काबद्दल जागरूक राहून स्वदेशीचा प्रसार करा हा स्वदेशीचा हेतू आहे असे ते मानत.
११. स्पर्शभावना:
व्यापक करूणा हा गांधीजींचा स्वभाव विशेष होता. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे. समाजाच्या उच्च थरामधून खालच्या थरापर्यंत शिक्षण झिरपत जावे हा मेकाँले यांचा विचार त्यांना मान्य नव्हता. शिक्षणाच्या बाबतीत धर्म, जात, पंथ, वर्ण, उच्चनीच हा भेदभाव नष्ट करून सर्वच समाजाला शिक्षण मिळावे असा त्यांचा आग्रह होता. आपल्या देशात प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व शाळा व महाविद्यालयांचे दरवाजे सर्वांसाठी सतत उघडे असले पाहिजेत अशी त्यांची उत्कट इच्छा होती. गांधीजीनी दक्षिण आफ्रिकेत काळे-गोरे भेद दूर करण्यासाठी दिलेला लढा स्पर्शभावनेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला.
ही होती महात्मा गांधीजींची एकादश व्रते आणि त्यांचे थोडक्यात विश्लेषण. या व्रतानुसार व्रतस्थ जीवन असणाऱ्या थोर महात्म्यांचे विचार आपण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करू या, हीच महात्मा गांधीजीना खरी श्रद्धांजली ठरेल.