रमजान संदेश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रमजान संदेश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १३ मे, २०२१

त्याग, बंधुभाव व संयम जोपासणारा 'पवित्र रमजान' - मराठी लेख


त्याग, बंधुभाव व संयम जोपासणारा 'पवित्र रमजान'

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       'इस्लाम' या शब्दाचा अर्थ अल्लाहवर (परमेश्वरावर) नितांत श्रद्धा. अल्लाहप्रती संपूर्ण शरणागती म्हणजेच इस्लाम आणि तोच अल्लाहचा खरा धर्म (कुराण ३ - १७) असे मानले जाते. 'रमजान' महिन्याला इस्लाममध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे. या महिन्यामध्ये अल्लाहने 'पवित्र कुराण' या धर्म ग्रंथाचे पृथ्वीवर अवतरण केले. इस्लाम धर्माच्या आध्यात्मिक स्त्रोताची माहिती इबादत (भक्ती) व जकात या माध्यमातून आपल्या संपत्तीचे रक्षण व शुद्धिकरण एवढेच नव्हे तर पवित्र रोजाच्या माध्यमातून अल्लाहवरील अगाढ श्रद्धा व प्रेम तसेच संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी कोणताही त्याग करण्याची शिकवण 'रमजान' आपल्याला देत असतो.


       हजरत ईस्माइल यांच्या वंशात इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्म पवित्र मक्का भूमीत झाला. त्यांनी पाच आचारनियमांचे पालन करण्याची आज्ञा इस्लाममध्ये केली आहे. या पाच नियमांना 'अरकाने दीन' म्हणतात. १) इमान २) नमाज ३) रोजा ४) जकात ५) हज. रमजान महिन्यात संपूर्ण महिनाभर (रोजे) उपवास केले जातात. या महिन्यात पवित्र वातावरणाने संपूर्ण मोहल्ला सुगंधित, उल्हसित व्हावा अशी इस्लाम धर्माची अपेक्षा आहे.


       रोजा करणे म्हणजे पहाटे सहेरी (नाष्टा) करून दिवसभर अन्न-पाण्यावाचून अल्लाहच्या नावावर उपाशी राहणे नव्हे. अशी मर्यादित अपेक्षा रोजाकडून नाही तर संपूर्ण शरीर व मन रोजामय व्हावे अशी आहे. शरीराच्या एकेका अवयवाचा रोजा असण्याची व्यापक अपेक्षा आहे. रमजानमध्ये हाताने कोणतेही दुष्कृत्य होऊ नये, डोळ्यांनी कोणत्याही अमंगल गोष्टी पाहू नये, कानांनी वाईट ऐकू नये, तोंडाने वाईट बोलू नये, हातांनी आपल्या घासातील घास गरजूंना द्यावा, अशी संपूर्ण इबादत (उपासना) म्हणजे 'रोजा' होय. भक्तीने भारलेल्या व भरलेल्या या रमजानमध्ये जे या आचारांचे पालन करतील त्यांना अल्लाह खुशी प्राप्त करून देतो. त्यांना इच्छिलेले फळ देतो, अशी दृढ श्रद्धा मनामनांत दिसून येते.


       रमजानमध्ये अगदी लहान लहान बालकेसुद्धा रोजा करतात. रोजामुळे अगदी लहान वयातच बालकांना संयमाचा आदर्श पाठ गिरविण्याची संधी मिळते. आपल्या अपत्याने प्रथमच रोजा केल्यावर आई-वडिलांना व सर्वच कुटुंबीयांना अतिशय आनंद होतो. त्या बालकाला  रोजाच्या दिवशी नवा ड्रेस आणतात, हार-तुरे घालून, छानशी भेटवस्तू देऊन त्याचे मनापासून कौतुक करतात. आपल्या मुलाबाळांसाठी, वृद्ध कुटुंबीयांसाठी भल्या पहाटे स्त्रिया उठून ताजा स्वयंपाक करून सेहरीसाठी वाढण्यात त्याचप्रमाणे रोजा सोडण्यासाठी लगबगीने स्वयंपाक करण्यात महिलावर्ग धन्यता मानतो. हीच त्यांच्या दृष्टीने सर्वोत्तम उपासना असते.  


       रमजान महिन्यातील रोजे सर्व धर्मातील लोक भक्ती भावाने करतात. आमच्या परिचयाचे कुलकर्णीकाका, शेजारचा सुरेश पाटील, गल्लीतील पवार दाम्पत्य, ओळखीच्या सुशीलाकाकूं हे सर्वजण रोजे करतात. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक रमजानमध्ये सर्वत्र दिसते. रोजा इफ्तारसाठी (रोजा सोडण्यासाठी) सर्व लहान थोर मंडळी मशिदीमध्ये जमा होतात. रोजा सोडण्यासाठी आपापल्या घरात तयार केलेला पदार्थ डब्यात घेऊन येतात. कोणी खजूर आणतो, केळी, सफरचंद, डाळिंब आदी फळे आणतो, तर कोणी शिरा, पुलाव, गुलगुले आणतो. सर्वांचे डबे एकत्र करून हा 'मिक्स मेवा' मोठ्या आवडीने खाऊन रोजा सोडतात व मगरीबची (सायंकाळची) नमाज पठण करतात. रात्री साडेआठनंतर पुन्हा ईशाच्या (रात्रीच्या) नमाजसाठी सर्वजण एकत्र येतात. या महिन्यात 'तरावीह' म्हणजेच (२० रकाअत) खास नमाज पठण केले जाते. रमजानमध्ये कुवतीनुसार गोरगरीब, अनाथ व विधवा स्त्रियांना दान दिले जाते. यामध्ये विशेषकरून रोख रक्कम, कपडे, गहू, आदींचा समावेश असतो. बंधुभाव, संयम, त्याग शिकविणारा रमजान संपूर्ण मानव जातीला मुबारक व्हावा हीच अल्लाहचरणी प्रार्थना !


बुधवार, १२ मे, २०२१

इस्लाम मधील स्वावलंबनाची शिकवण व बंधुभाव - मराठी लेख


इस्लाम मधील स्वावलंबनाची शिकवण व बंधुभाव

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


       मक्कावासीयांच्या द्वेष व अत्याचाराला कंटाळून जेव्हा प्रेषित हजरत मुहम्मद साहेबांनी स्वदेश त्याग केला आणि अंदाजे ४५० कि.मी. उत्तरेकडे प्रवास करून मदिना शहरी स्थायिक झाले, तेंव्हा त्यांचे अनेक नातलग, अनुयायी व सोबती देखील त्यांच्या पाठोपाठ हिज्जत (स्थलांतर) करून मदिनेत दाखल झाले. ते पूर्णत: लुटले गेले होते. शरीरावर असलेले वस्त्र, एवढीच त्यांची मालमत्ता होती. परंतु यापैकी एकालाही पैगंबरसाहेबांनी भीक मागू दिली नाही. त्यांनी मदिनेत मुआखतीची (बंधुसंघाची) स्थापना केली. कांहीनी तर आलेल्या दिवशीच कामासाठी बाजारपेठ गाठली, कांहीनी दुसऱ्या दिवशी जंगलाची वाट धरली, आणि जळाऊ लाकडे तोडून बाजारात विकायला लागले. कांहीनी मोलमजुरीची कामे पत्करली आणि पाहता पाहता मदिना शहर हे एक स्वावलंबी समाज असलेले शहर म्हणून परिसरात प्रसिध्द झाले.


       मदिनावासियांनी मक्केतून आलेल्यांना आश्रय दिला. पण दोघांनीही एकमेकांच्या हक्कांवर अतिक्रमण केले नाही. मक्कावासी नेहमी मदिनावासियांचे उपकार मानत राहिले, मदिनावासियांनी कधीही आपल्या उपकाराची जाहिरातबाजी केली नाही. पैगंबर साहेबांच्या शिक्षण आणि प्रबोधन कार्यामुळे एका आत्मनिर्भर आणि आदर्श समाजाची निर्मिती झाली. मदिनावासियांचे सर्वात मोठे संरक्षक त्यांचे शेजारी होते आणि हे शेजारी एकाच धर्माचे नसून विविध धर्मीय होते. पैगंबर साहेबांनी दाखविलेल्या स्वावलंबनाच्या वाटेवरील आपण वाटसरू बनू या.


मंगळवार, ११ मे, २०२१

स्त्री सन्मान आणि इस्लाम - मराठी लेख


स्त्री सन्मान आणि इस्लाम

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       बरीरह नावाची एक महिला हजरत मुहम्मद (स.) यांच्या धर्मपत्नी हजरत आएशा यांची सेविका होती. तिला हजरत आएशा यांनी मुक्त केले होते. त्या महिलेचा विवाह मुगीस नावाच्या व्यक्तीशी (ज्यांना त्या पसंत करत नव्हत्या) झाला. कांही दिवसांनी त्यांचा हा विवाह संपुष्टात आला. त्यांचे पती त्यांच्याबरोबर पुनर्विवाह करण्याचा आग्रह करत होते. त्यांच्यामागे अक्षरश: रडत फिरायचे. एकदा ते आपली मागणी घेऊन हजरत प्रेषितांजवळ गेले आणि बरीरहने त्यांच्याशी पुनर्विवाह करावा, अशी शिफारस करण्यास भाग पाडले. पैगंबर साहेबांनी बरीरह यांना त्यांच्या पतीची इच्छा सांगितली. बरीरहने विचारले, "या रसूलिल्लाह (स.) हा आपला सल्ला आहे की आदेश?" प्रेषितसाहेब म्हणाले, "हा आदेश नसून केवळ सल्ला आहे". याचा अर्थ असा की, हा जर आदेश असता तर आज्ञापालन करणे भाग पडले असते म्हणून प्रेषित साहेबांनी केवळ सल्ला दिला. बरीरह म्हणाल्या, "मग तर मी त्यांच्याशी विवाह करू इच्छित नाही"..


       पैगंबर साहेबांनी त्यांचा आदर राखला. तिला आग्रह केला नाही. एका महिलेच्या इच्छेला प्राधान्य दिले. आजही मुस्लिम समाजात जमाअतीने (समाजाने) मान्यता दिलेल्या रजिस्टरवर महिलेची सही घेतल्याशिवाय तिचा निकाह होत नाही. स्त्री व पुरुष दोघांच्या संमती दर्शक सह्या घेऊनच विवाहविधी पार पडतो.


सोमवार, १० मे, २०२१

इच्छापूर्ती करणारी रात्र: शबे कद्र - विशेष मराठी लेख


इच्छापूर्ती करणारी रात्र: शबे कद्र

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       अल्लाह आपल्या भक्तांवर अत्यंत दयाळू, कृपाळू आणि मेहेरबान असतो. अल्लाहने मानवी समाजाला रमजानच्या महिन्यात एक पवित्र भेट म्हणून एक रात्र दिली आहे. रमजानमधील २६ व्या रोजाच्या दिवशी ही रात्र असते. या रात्रीला शबे कद्र म्हणतात. या रात्री केलेली प्रार्थना आणि उपासना एक हजार महिन्यांपेक्षा जास्त पुण्य मिळवून देणारी आहे. या पवित्र रात्रीचा उल्लेख पवित्र कुरआनच्या तिसऱ्या खंडात सूरह (अध्याय) अल्कद्रमध्ये आहे. ज्यात म्हटले जात आहे की, तुम्हाला काय माहित की लैलतुल कद्र काय आहे? लैलतुल कद्र हजार महिन्यांपेक्षा बेहतर रात्र आहे.


       या रात्री शांतपणे जागरण करून केल्या जाणाऱ्या सर्व प्रार्थना, नमाज, दुआ, जप (जिक्र तसवी) कुरआन पठन आणि याच प्रकारच्या सर्व उपासनांचा मोबदला हजार पटीने देण्यात येतो.


       या रात्री इशाची (रात्रीची) नमाज व तरावीह (रमजान महिन्यातील विशेष प्रार्थना) झाल्यानंतर सर्व मुस्लिम बांधव कुरआन पठण करतात. अल्लाहजवळ दुआ मागतात. या रात्री खास हाफिजींना निमंत्रित करून बयानचे (प्रवचनाचे) आयोजन केले जाते. स्त्रियाही एकत्र येवून नमाजपठण व कुरआन पठन करतात. आपल्या परिवारासाठी अल्लाहकडे दुआ मागतात.  शबे कद्र ची रात्र आपणा सर्वांना फलदायी ठरो.


शनिवार, ८ मे, २०२१

खलिफा हजरत उमर यांचा योग्य न्याय - विशेष मराठी लेख


खलिफा हजरत उमर यांचा योग्य न्याय

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       आदर्श खलिफा हजरत उमरच्या शासनकाळात एका व्यक्तीने आपली जमीन दुसऱ्याला घर बांधण्याकरीता विकली. पाया खणत असताना जमीन विकत घेणाऱ्याला तेथे सोन्याच्या नाण्याने भरलेले एक भांडे सापडले. तो जमीन मालकाकडे आला आणि म्हणाला, "ही तुमची संपत्ती आहे, याचा स्विकार करा. जमीन मालक म्हणाला, "मी जमीन तुम्हाला विकली आहे. त्याच्या पाताळापासून आकाशापर्यंत जे कांही आहे आता तुमचे". ग्राहक गृहस्थ त्यांना म्हणाले, "मी तुमच्याकडून फक्त जमीन खरेदी केली, त्यातील सोनं नाही". दोघांमधील वाद वाढला आणि निवाड्याकरीता दोघेही खलिफाकडे गेले. त्या दोघांची बाजू ऐकून खलिफा म्हणाले, "तुम्ही दोघेही बरोबर आहात... मला एक सांगा, तुम्हाला मुलंबाळ वगैरे आहेत कां ?" एक म्हणाला, "मला एक कन्या आहे" दुसरा म्हणाला, "मला एक पुत्र आहे". खलीफानी आदेश दिला की, दोघांचे एकमेकांशी लग्न करून टाका आणि सापडलेली संपत्ती दोघांत वाटून टाका.


       धन्य तो जमीनदार आणि त्याची जमीन घेणारा तो गृहस्थ. आज जिथे-तिथे लुबाडणूक सुरू आहे. माझे ते माझेच, दुसऱ्याचेही माझेच असे सर्वसाधारण चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मला संपत्ती नको म्हणणारे ते महनीय गृहस्थ निःस्वार्थी होते. त्यांच्यातील थोडीतरी निस्पृहता आपल्यात आणण्याचा प्रयत्न करू या.


शुक्रवार, ७ मे, २०२१

पवित्र कुरआन: मानवाचे प्रेरणास्थान - विशेष मराठी लेख


पवित्र कुरआन : मानवाचे प्रेरणास्थान

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

        कुरआन मानवांना पुरेपूर मार्गदर्शन करणारा, सत्य व असत्य वेगवेगळे करून दाखविणारा ग्रंथ आहे. (अल्कबरा-२:१८५) कुरआन हा ग्रंथ संबंध जगवासीयांसाठी सार्वत्रिक आदेश आहे. (अलअनआम ६:९०) जे लोक सत्याच्या शोधासाठी आणि मानसिक व आत्मिक शांतीसाठी सतत हैराण होत असतात, पवित्र कुरआन त्यांच्या शोध प्रवासाचे अंतिम चरण आहे. वाचकांने विश्वास व श्रध्दाभावाने त्याचे अध्ययन केले पाहिजे, कारण कुरआन ही अल्लाहची पवित्र वाणी आहे. अत्यंत कल्याणकारी व समृध्दी प्रदान करणारा ग्रंथ आहे. तसेच पूर्वीच्या ईशग्रंथातील सत्यताही प्रमाणित करणारा ग्रंथ आहे (अल्अनआम ६:९२)


       मानवाला अनेक रोगांचा संसर्ग होणे शक्य आहे. शारिरीक रोगांपेक्षा मानसिक, नैतिक आणि आत्मिक आजार अधिक धोकादायक असतात. मनःस्थिती तसेच मन:शांती व मन:शक्तीचे पवित्र कुरआन प्रेरणास्थान आहे. 'कुरआन मनाला बळकटी देणारा, सत्यज्ञान प्रदान करणारा आणि श्रध्दावंतासाठी उपदेश देणारा ग्रंथ आहे' (हूद ११-१२०) या संदर्भातच म्हटले जात आहे. 'श्रध्दावंतासाठी रोगनिवारक आणि कृपा आहे. (बनीइस्त्राईल १७:८२) कुरआन अरबी भाषेत उतरला आहे. त्यात लोकांना वक्र चालीपासून दूर ठेवण्यासाठी व त्यांना शुध्दीवर आणण्यासाठी विविध प्रकारे आदेश देण्यात आले आहेत.


बुधवार, ५ मे, २०२१

'पवित्र कुरआन' चे अवतरण - विशेष मराठी लेख


'पवित्र कुरआन' चे अवतरण

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       रमजान महिन्याला कुरआनचा महिनाही म्हणतात, कारण या महिन्यातच कुरआनचे आकाशातून  पृथ्वीतलावर अवतरण झाले. या महिन्यातच पैगंबरसाहेब जास्तीत जास्त या ग्रंथाचे पठण करायचे आणि तसे करण्याचे आदेशही आपल्या सिहबींना (सोबत्यांना) द्यायचे. रमजानच्या महिन्यातच ईश्वराचे सर्वात प्रतिष्ठित दूत हजरत जिब्राईल अलैहिस्सलाम प्रेषित साहेबांच्या सेवेत येऊन त्यांनी मुखोद्गत केलेला कुरआन ऐकून घ्यायचे. प्रेषित साहेबांच्या जीवनातील अंतिम रमजानच्या महिन्यात याच ईशदूताने त्यांच्याकडून दोनदा कुरआन ऐकून घेतले. तसेच पैगंबर साहेबांनी आपल्या सर्व सोबतियांकडून त्यांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथाची सुनावणी करवून घेतली. त्यामुळे सर्व मसुदे आणि लोकांकडे उपलब्ध प्रती दोषमुक्त झाल्या. त्याच मसुद्यावरून इस्लामचे तिसरे सन्मार्गी खलिफा हजरत उस्मान (र.) यांनी सात प्रती एक तज्ज्ञ मंडळ नेमून त्यांच्या देखरेखीखाली तयार करून घेतल्या. आजही त्यापैकी पाच प्रती जगातील पाच मुस्लिमेतर राष्ट्रामधून उपलब्ध आहेत.


       रमजानच्या महिन्यात प्रत्येक मशिदीतून रात्रीच्या ईशाच्या नमाजनंतर एक ते दीड तास 'तरावीह' ची जादा नमाज पढली जाते. त्या नमाजमध्ये पवित्र कुरआनचे तीस खंड सत्तावीस दिवसात संपूर्णपणे नमाजी ऐकतात.


मंगळवार, ४ मे, २०२१

इस्लाम मधील औदार्य व सहिष्णुता - विशेष मराठी लेख


इस्लाम मधील औदार्य व सहिष्णुता

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       इसवी सन ६३० मध्ये मुहम्मद पैगंबर यांनी मक्का शहरावर विजय मिळविला. मक्केवर सत्ता म्हणजे सर्व अरब प्रदेशावर सत्ता काबीज करण्यासारखे होते.


       त्यापूर्वी मक्कावासीयांनी पैगंबर हजरत मुहम्मद (स.) यांना व त्यांच्या अनुयायांना खूप छळले होते. अनेकांची विनाकारण हत्या केली होती. ज्यावेळी प्रेषित साहेबांनी मक्केत प्रवेश केला, तेव्हा सर्वप्रथम घोषणा केली की, जे कोणी पवित्र काबागृहात प्रवेश करेल तो सुरक्षित आहे. पुढे अशी घोषणा केली की, इस्लामचे कट्टर विरोधी अबू सुफियान यांच्या घरात जो कोणी प्रवेश करेल तोसुध्दा सुरक्षित आहे. त्या ठिकाणी पैगंबर साहेबांनी 'आम मुआफी' म्हणजे सर्वांना क्षमा प्रदान करण्याची घोषणा केली. कुणाचाही सूड घेतला नाही. सार्वत्रिक माफीची घोषणा ऐकताच लोक अक्षरशः रडू लागले आणि कांही क्षणातच मक्केचा कायापालट झाला, कुठेही शिरच्छेदाचा ठोकळा अथवा फाशीचे स्तंभ लावले गेले नाहीत. अबू सुफियान सारख्या विरोधी सरदारानेही प्रेषित साहेबांच्याशी 'बैअत' (वचनबध्द) राहण्याची शपथ घेतली.


       प्रेषित साहेबांच्या या कर्तृत्वामुळे जगाच्या इतिहासात एका नवीन अध्यायाचा प्रारंभ झाला. इस्लामी औदार्याचे हे उदाहरण प्रलयापर्यंत संपूर्ण मानवजातीला एक मार्गदर्शक पर्वाच्या रूपाने अभ्यासण्यासारखे आहे. मुहम्मद पैगंबरांनी शत्रूवरही प्रेम करायला शिकवलं आहे. मुस्लिम समाजात औदार्य व सहिष्णुता निर्माण होण्याची अशी अनेक उगमस्थाने आहेत.


सोमवार, ३ मे, २०२१

इस्लाम' मधील शूचिर्भूतता - विशेष मराठी लेख


'इस्लाम' मधील शूचिर्भूतता

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       इस्लामी धर्मशास्त्राप्रमाणे जेंव्हा स्नान (गुस्ल) आणि वजूह म्हणजेच धर्मशास्त्राप्रमाणे तोंड-हात-पाय धुण्याची गरज असते, तेंव्हा माणसाने टाळाटाळ करू नये. शूचिर्भूत झाल्याने माणसात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो व त्या व्यक्तिस ईश्वर संरक्षणाचे कवच लाभते.


       इस्लामी शरीअतप्रमाणे अस्वच्छ कपडे परिधान करून कुठलीही इबादत (प्रार्थना) आपण करू शकत नाही आणि केल्याने अल्लाहच्या दरबारात त्यांना स्वीकृती लाभणार नाही. इस्लाम धर्मात शारिरीक पवित्रतेला खूप महत्व आहे. शरीर शुध्द असेल तर मनही शुध्द राहते, आत्मा शुध्द राहतो. शरीर शुध्द नसल्याने कांही विकार होणे अगदी नैसर्गिक आहे. त्या शारिरीक विकारांचा मनावर परिणाम होतो. मनाचे आरोग्य बिघडले की, आत्मा विचलित होतो. आत्मा बैचेन झाला की माणसाला झपाटल्यासारखे वाटते आणि तो नको त्या उपायांच्या शोधात हिंडत राहतो. म्हणून सफाई आणि पावित्र्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सफाई केवळ शरीराला शुध्द करू शकते; परंतु पवित्रता मात्र आत्म्याच्या आरोग्याचा एक अत्यावश्यक असा गुण आहे, ज्याला पर्याय नाही. पावित्र्य एक अदृश्य शक्ती आहे. त्यामुळे माणसाला ईश्वराचे सामीप्य प्राप्त होते. पवित्रता माणसाच्या शारिरीक, मानसिक व आत्मिक शक्तीच्या संरक्षणासाठी सदैव तयार असते. अपवित्र मनुष्य ईश्वरी देणग्यांच्या निकट जावू शकत नाही.


रविवार, २ मे, २०२१

रोजा इफ्तार: सामुदायिक भोजनाचा सोहळा - विशेष मराठी लेख

 

रोजा इफ्तार: सामुदायिक भोजनाचा सोहळा

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       माळवाडी ता. मिरज जि. सांगली माझं माहेर. या छोट्याशा गावात रमजान महिन्यात रोजा इफ्तारच्या सामुदायिक भोजनाचा एक वेगळा आनंददायी सोहळा अनुभवायला मिळतो.


       या गावामध्ये मुस्लिम समाजाची २० कुटूंबे राहतात. रमजान सुरु झाला की प्रत्येक दिवशी यापैकी एका कुटूंबाच्या घरी रोजा इफ्तारसाठी सामुदायिक भोजनाचा कार्यक्रम असतो. साधारणपणे १०० लोकांचा स्वयंपाक करायचा असतो पण हा स्वयंपाक करण्यासाठी कुणी आचारी वगैरे नसतो. मोहल्ल्यातील सर्व महिला दुपारपासून एकत्र येऊन स्वयंपाकाची तयारी करतात. बोलत-बोलत, हसत-खेळत स्वयंपाक करतात. कोण भाजी निवडते, कोण कांदा-टोमॅटो चिरते तर कोण मसाला बारीक करते. इकडे एक ग्रुप धान्य निवडत असतो, तर कोण चूल पेटवून फोडणी देण्याचे काम करत असतात. सर्वजणी सहभागी झाल्यामुळे कुणालाच जादा कामाचा ताण नसतो.


       मगरीबची नमाज झाल्यानंतर पहिल्यांदा बच्चे कंपनीची पंगत बसते, त्यानंतर रोजा असलेल्या सर्व महिला व पुरुषांची पंगत बसते. शेवटी उर्वरित सर्वांची पंगत बसते. मोहल्ल्यातील वृद्ध मंडळीना त्यांच्या जागेवर ताट पोहोचविले जाते. स्वयंपाक सुरु असतानाच महिला पुढच्या भोजनाचा बेत कुणाच्या घरी करायचा, मेनू कोणता ठेवायचा याविषयी चर्चा करून ठरवतात. भोजन करताना कुणी बनवलेला पदार्थ आज छान झालाय याची चर्चा होते, सुगरणींचे कौतुक होते. सध्याच्या धावपळीच्या, धक्काधक्कीच्या जमान्यात लोप पावत चाललेला बंधुभाव जतन करण्याचे कार्य करणारा हा सोहळा निश्चितच अनुकरणीय आहे.

 

असे सोहळे गावागावात, मोहल्ल्यात सुरु असतात. प्रातिनिधिक स्वरुपात माझ्या माहेरच्या सोहळ्याबद्दल लिहिले आहे.


बुधवार, २८ एप्रिल, २०२१

'दाते' होऊन पुण्य प्राप्त करा - विशेष मराठी लेख


‘दाते' होऊन पुण्य प्राप्त करा

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       पवित्र कुरआनमध्ये अनेक ठिकाणी गरिबांना जेवण देण्यासाठी लोकांना उद्युक्त करण्यात आले आहे. मुस्लिम समाजातील गरीब लोकांच्या गरजा भागविण्यासाठी आणि त्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा पुरविण्यासाठी श्रीमंत लोकांना उत्तेजित करण्यात आले आहे.


       विविध उपासनांच्या दरम्यान माणसाच्या हातून कांही चुका घडतात. उदाहरणार्थ, रमजानच्या महिन्यात कुणी जाणूनबुजून वेळेच्या आधी उपवास सोडला किंवा उपवास राखलाच नाही अशा व्यक्तीला शिक्षा म्हणून सतत ६० दिवसांचे उपवास राखण्याचे आदेश आहेत. असे करतांना एकही खाडा झाला तर पुन्हा एकपासून साठपर्यंत उपवास करावेत. एखाद्या व्यक्तिला आरोग्याच्या दृष्टीने असे करणे जमत नसेल तर अशा व्यक्ति साठ गरिबांना दोन वेळचे पोटभर जेवण द्यावे. यालाच 'कफ्फारा' म्हणजेच परतफेड असे म्हणतात.


       तात्पर्य असे की, कुठल्या ना कुठल्या पध्दतीने लोक देणारे बनावेत. फक्त घेणारी माणसे समाजाला घातक ठरतात आणि त्यांच्यामुळेच केवळ समाजाच नव्हे तर संपूर्ण देश आणि संपूर्ण संस्कृतीचा अस्त होतो. या दृष्टीकोनातून आपल्या समाजाचे विश्लेषण केले तर दिसून येईल की घेणारे हात अधिक आहेत, देणारे कमी आहेत. म्हणूनच या पवित्र रमजान महिन्यात गोरगरिबांना सढळ हाताने मदत करा व सवाब (फळ) मिळवा.


मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

रमजान: मुलांवर संस्कार करण्याची संधी - विशेष मराठी लेख


रमजान: मुलांवर संस्कार करण्याची संधी

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       मुस्लिम कुटूंबव्यवस्थेवर इस्लामी शरिअतची पकड मजबूत आहे. मुलांनी केलेल्या लहान-मोठ्या गुन्हांबद्दल आईवडिलांना शिक्षा दिली जात नाही. मात्र त्यांना जबाबदार मानण्यात येते. कारण त्यांनी मुले लहान असताना त्यांच्यावर चांगले संस्कार केले नाहीत. मुस्लिम कुटूंबात एकमेकांना खूप आदराने वागणूक देण्याची प्रथा आहे. मुलांसमोर आई-वडिलांनी कसे वागावे व मुलांकडून कशा वागणुकीची अपेक्षा करावी याची अनेक उदाहरणे प्रेषितसाहेबांच्या व त्यांच्या सोबत्यांच्या जीवनातून पहावयास मिळतात. मुलाने वडीलधाऱ्यासमोर असभ्य वर्तन केले तर त्याला शिक्षा द्यावी. आई-वडिलांनीसुध्दा मुलांसमोर असभ्य वर्तन करु नये. पती-पत्नीचे भांडण मुलांच्या मानसिकतेवर खूप वाईट परिणाम करते. आपल्या नातेवाईकाबद्दल आपल्या मुलांसमोर नेहमी चांगले उद्गार काढावेत. जेणेकरून मुलांना आपल्या परिवाराबद्दल आदर वाटेल. मुलांना उत्तम संस्कार देणे ही सुध्दा एक उपासना आहे.


       इस्लामी आचार संहितेनुसार मुलांनी आईवडिलांसमोर मोठ्या आवाजात बोलण्यास देखील मनाई आहे. ज्या पालकांनी आपल्या अपत्यांचे आणि विशेषतः मुलींचे उत्तमरित्या पालनपोषण केले, त्याला मरणोत्तर स्वर्गप्राप्ती निश्चित आहे. आयुष्यात आपल्या मुलांना चांगले प्रशिक्षण देण्याच्या अनेक संधी येतात. त्यात रमजान महिनादेखील आहे. या महिन्यात प्रशिक्षणाचे काम सत्तर पटीने सोपे जाते. याचा लाभ पालकांनी जरूर घ्यावा.


सोमवार, २६ एप्रिल, २०२१

पैगंबरसाहेबांचा वचनपालनाचा आदेश - विशेष मराठी लेख


पैगंबरसाहेबांचा वचनपालनाचा आदेश

डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       मुहम्मद पैगंबर प्रेषितत्वप्राप्ती आधीपासूनच वचनपालन व सत्यपालन करत होते. अफ्रिकेतील अव्हेसिनियाच्या बादशहाने त्यांची ख्याती ऐकून त्यांचे कडवे विरोधक अबूसुफियानला विचारले की "काय मुहम्मद (स.) वचन आणि कराराचा भंग करतात?" अबूसुफियान म्हणाले "नाही". यावरुन असे दिसून येते की पैगंबरसाहेबांचे विरोधकही त्यांची वचनबध्दता मान्य करत होते.


       याबाबतचे एक उदाहरण देता येईल. बद्रची लढाई अत्यंत कठीण परिस्थितीतून लढली गेली होती. पैगंबर साहेबांच्या जवळ मनुष्यबळ अत्यंत कमी, एकूण ३१३ माणसे होती. समोर १००० बलशाली सैन्य होते. साधनसामग्रीही अत्यंत कमी होती. या लढाईत भाग घेण्याकरिता हुजैफा बिन यम्मान आपले स्नेही अबूहसील यांच्याबरोबर मदिनेहून निघाले, परंतु गनिमांच्या तावडीत सापडले. विचारणा केल्यावर ते म्हणाले, "आम्ही मदिन्याला निघालो होतो, वाट चुकलो" गनिमांनी त्यांना एका शर्तीवर सोडले, की मदिनेला जा, युद्धात सामील होऊ नका. ते लपत छपत मुहम्मद (स.) पर्यंत पोचले आणि जे घडले ते सांगितले. पैगंबर साहेबांनी त्यांना मदिनेला परत जाण्याचे आदेश दिले व म्हणाले की, "तुम्ही काफिरांबरोबर केलेले वचन पाळा आणि त्यांच्याबरोबर मुकाबला करण्याची शक्ती अल्लाहकडे मागतो". (मुस्लिमशरीफ) यावरुन मुहम्मद पैगंबर प्रतिकूल परिस्थितीतही वचन पाळा हाच संदेश देत होते हे सिध्द होते.


रविवार, २५ एप्रिल, २०२१

सिहाबींची 'नमाज' मधील एकाग्रता - विशेष मराठी लेख

सिहाबींची 'नमाज' मधील एकाग्रता

डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       पैगंबर साहेबांच्या असलेल्या सोबतींची संख्या एक लाख चोवीस हजारांच्या आसपास होती. जी व्यक्ती ईमानच्या स्थितीत म्हणजे इस्लाम धर्म स्विकारून पैगंबराच्या सहवासात राहिली किंवा त्यांचे दर्शन जरी घेतले, अशा व्यक्तींना 'सिहाबी' म्हणजे पैगंबरसाहेबांचे सोबती म्हणतात.


       हे सिहाबी रणांगणात शत्रूवर तुटून पडायचे; परंतु तोच शत्रू जेव्हा जेरबंद व्हायचा तेव्हा त्याच्याबरोबर आपल्या बंधुप्रमाणे प्रेम करायचे. स्वतः उपाशी राहून त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायचे. युध्द मैदानात उत्तम सेनानी, कुटूंबात ते प्रेमळ पिता, पती, बंधू आणि नातेवाईक असायचे. अल्लाहजवळ प्रार्थनेच्या वेळी दुवा मागताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटायचा. पैगंबर साहेबांचे प्रवचन व आदेश ऐकताना ते स्तब्ध व शांतचित्त असायचे. नमाजमध्ये त्यांची एकाग्रता कमालीची होती.


       खैबरच्या युध्दात हजरत अली नावाच्या एका सिहाबीच्या गुडघ्यात बाण रूतला. बाण निघेना, वेदना अनावर झाल्या. हजरत अली म्हणाले, "थांबा नमाजकरिता उभा राहतो, तेव्हा बाण काढा". सैनिकांनी तसेच केले. बाण केव्हा काढला गेला, समजलेसुध्दा नाही. नमाजमध्ये ते अल्लाहच्या सान्निध्यात विलीन व्हायचे. आज आपल्यापाशी इस्लामचा जो कांही ज्ञान, वारसा, संपूर्ण शरीअत, पवित्र कुरआन, हदीस, संस्कृती, शिष्टाचार, रीतीरिवाज, परंपरा, उपासना आणि प्रार्थनापध्दती आहे ते सर्व कांही आपणापर्यंत सिहाबींच्या मार्फतच पोहोचले आहे.


असे होते सिहाबींचे अस्तित्व..!


शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

नमाजमध्ये पूर्णपणे समरस व्हा! - विशेष मराठी लेख


नमाजमध्ये पूर्णपणे समरस व्हा!

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       एक इसम काबागृहाच्या आवरणाला मिठी मारून धाय मोकलून रडत होता आणि स्वत:च्या मोक्षप्राप्तीची याचना करीत होता. त्याच्या रडण्याचे लोक मनातून कौतुक करीत होते, ईश्वराच्या दरबारी असे रडण्याचे आम्हालाही भाग्य लाभो असे मनात म्हणत होते. त्याच ठिकाणी एक अंतर्यामी सूफीदेखील हे दृश्य पाहत होते. तेसुध्दा याच्या रडण्याने प्रभावित झाले. अचानकपणे त्यांच्या मनात आले की या भाविकाच्या अंतर्मनाची चाचणी घ्यावी. चाचणी घेताच कळले की, अंतिम मोक्ष मागणाऱ्याचे मन हमशरीफच्या आवारात नव्हतेच ते तर बाजारपेठेत हिंडत होते. अशी प्रार्थना काय कामाची?


       प्रार्थना (नमाज) कुठलीही असो, त्यात संसारमोहाला त्यागावे लागते. मग ती रमजान महिन्यातील असो किंवा एरवी करण्यात येणारी प्रार्थना असो. ईश्वराची समीपता व एकात्मता निर्माण करण्याकरिता आपल्या भोवतालच्या आपल्या सुखाला आणि विश्रांतीला एवढेच नव्हे तर आपल्या अस्तित्वालाही विसरावेच लागते.


       पीरानेपीर हजरत अब्दुल कादिर जिलानी आपल्या शिष्याला नेहमी ताकीद करायचे की, प्रार्थनेच्या वेळी पूर्णपणे त्यात समरस व्हा जणू कांही तुम्हाला अल्लाहचे दर्शन घडत आहे. संसारिक जीवन व्यतीतताना त्यात पूर्णपणे समरस व्हा, नमाज पढताना मनावर संसारिक जीवनाची एक छटासुध्दा राहता कामा नये. हाच खरा संसार व हाच खरा संसारत्याग..!


गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

हजरत मुहम्मद यांची रमजान पूर्वतयारी - विशेष मराठी लेख


हजरत मुहम्मद यांची रमजान पूर्वतयारी

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद (स.) रमजान महिन्याच्या आगमनाचे स्वागत दोन महिन्याच्या आधीपासून करायचे. रजब आणि शअबान हे ते दोन महिने होत. रमजानचा महिना आला की पैगंबरसाहेब उपवास करायला सुरुवात करायचे. जास्तीत जास्त कुरआन पठण, जप, अधिक नमाज पढ़ायचे. पैगंबर साहेबांचे अनुकरण त्यांचे सोबती (सिहाबी) हमखास करायचे. यामुळे रमजानच्या आगमनाचे आणि त्याच्या स्वागताचे एक उत्साही व आनंदी वातावरण तयार व्हायचे.


       पैगंबर साहेब अत्यंत दयाळू होते. मानवहितामुळे ते या दोन महिन्यात अधूनमधून उपवास करण्याचे टाळायचे कारण त्यांचे कथन आणि कृत्यच नंतर शरीअतमध्ये म्हणजेच मुस्लिम कायद्यामध्ये परिवर्तित होणार होते. लोकांना असे वाटू नये की रजब आणि शअबानचे दोन महिने सुद्धा उपवासाचे महिने आहेत. पैगंबरांचे हे कार्य तंतोतंत पाळणारी माणसे आजही मुस्लिम समाजात आहेत. ईश्वरांचे त्यांना सतत तीन महिने उपवास राखण्याची क्षमता प्रदान केली आहे. हे लोक केवळ उपवासच नव्हे तर बाकीच्या सर्व उपासना अत्यंत उत्साहात करतात. त्यांची ही श्रद्धा, उपासना, दृढविश्वास फक्त त्यांच्याकरिताच नव्हे तर संपूर्ण मानवजाती व सृष्टीकरिता एक उपहार आहे, एक अनमोल भेट आहे.


बुधवार, २१ एप्रिल, २०२१

इस्लाम मधील वचनबध्दता - विशेष मराठी लेख


इस्लाम मधील वचनबध्दता

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       इस्लामी शरीअतमध्ये वचन आणि करार या बाबींना खूप महत्व आहे. पवित्र कुरआनमध्ये कराराचे पालन आणि वचनबध्दतेच्या संदर्भात अनेक आदेश अवतरविण्यात आले आहेत. वचन काय आहे व ते कसे राखावे हे पैगंबर साहेबांनी आपल्या दैनंदिन जीवनातून सिध्द करून दाखविले आहे. प्रेषित पैगंबरसाहेब वचन, तह आणि करार यांचा कधीही भंग करत नसत. ते इतरांनाही वचनबध्द राहण्याचे धडे देत होते.


       पैगंबर साहेबांना प्रेषितत्व प्राप्तीपूर्वी एकदा असे घडले की, अब्दुल्लाह बिन अबिलहसमाने हजरत मुहम्मद (स.) कडून एक वस्तू खरेदी केली; परंतु त्यांच्यापाशी वस्तूच्या किमतीएवढी रक्कम नव्हती. उरलेल्या रकमेबद्दल अब्दुल्लाह म्हणाले की, "आपण येथेच थांबा, मी घरी जाऊन उरलेली रक्कम घेऊन येतो". घरी जाऊन त्यांना विसर पडला आणि तीन दिवसानंतर त्यांना त्या गोष्टीची आठवण झाली. ते प्रेषित साहेबांना शोधत बाहेर आले. त्यांनी पाहिले की, प्रेषितसाहेब होते त्याच ठिकाणी त्यांची वाट पहात बसले आहेत. कारण त्यांनी अब्दुल्लाहला वचन दिले होते की मी वाट पहातो तू येईपर्यंत. त्यांना पाहून प्रेषितसाहेब म्हणाले, 'हे युवा! तू मला फार मोठ्या परिश्रमात गुतविलेस! मी येथे तीन दिवसापासून तुझी वाट पाहतोय' 


          यावरून आपणास कल्पना येईल की वचनबध्दता कशी असते.


मंगळवार, २० एप्रिल, २०२१

रोजा इफ्तार: बंधुभावाचा सोहळा - विशेष लेख


रोजा इफ्तार: बंधुभावाचा सोहळा

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


रमजान महिन्यातील रोजा इफ्तारची वेळ हा बंधुभावाचा आगळावेगळा सोहळा असतो.


       सायंकाळी पाच वाजता 'असर' ची नमाज (प्रार्थना) झाली की महिलांची स्वयंपाकाची लगबग सुरू होते, कारण रोजा इफ्तारच्या वेळेपुर्वीच स्वयंपाक तयार करावा लागतो. घरातील पुरुष मंडळी रोजा सोडण्यासाठी व तिन्हीसांजेच्या (मगरीबच्या) प्रार्थनेसाठी मशिदीत जाणार असतात. त्यांच्यासाठी दररोज वेगवेगळे पदार्थ करून देण्यासाठी महिला सज्ज असतात.


       रोजा सोडण्यासाठी आपापले डबे घेऊन पुरूष मंडळी-मुले मशिदीत जमा होतात. आपल्या डब्यातील पदार्थ रोजा सोडण्यासाठी जमलेल्या सर्वांना वाटतात. त्यामुळे रोजा सोडताना विविध प्रकारचे रुचकर व पौष्टिक पदार्थ सर्वांना खायला मिळतात. कुणाच्या डब्यात गुलगुले, शिरा, उप्पीट, पोहे असतात, कुणाच्या डब्यात केळी, सफरचंद, चिक्कू, डाळिंब, पेरू या फळांच्या फोडी व फणसाचे गरेसुध्दा असतात. कुणाच्या डब्यात मसालेभात, पोळी-भाजी, खिचडी असते. तर कुणी भडंग, चिवडा, फरसाणा, भजी, वडे व समोसे आणलेले असतात. जमलेले सर्वजण हे पदार्थ मिळून-मिसळून आनंदाने खातात. आपल्याला आवडलेले पदार्थ दुसऱ्याच्या डब्यातून हक्काने घेतात. हे पदार्थ केवळ शरीराची भूक भागवतात असे नाही तर मनाचीही भूक भागवतात. एकमेकात बंधुभाव निर्माण करतात.


       या सर्व पदार्थांचा आस्वाद घेऊन तिन्हीसांजेची (मगरीबची) नमाज पढून सर्व बांधव आपापल्या घरी परततात.


सोमवार, १९ एप्रिल, २०२१

पवित्र रमजान मधील सेहरी - विशेष लेख


पवित्र रमजान मधील सेहरी

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       रमजान महिन्यात श्रध्दा, भक्ती व उपासना यांना भरती आलेली असते. सर्वांची मने भक्तिभावाने ओलीचिंब झालेली असतात. एरवी आळस करणाऱ्या सर्वांच्या मनाची पहाटे 'सेहरी' करण्यासाठी गाढ झोपेतून उठण्याची तयारी पक्की झालेली असते. घरातील महिलांना सेहरीचा स्वयंपाक करण्यासाठी पहाटे ३ ते ३.३० च्या दरम्यान उठावे लागते. पण हे काम महिला स्वयंस्फुर्तीने व आनंदाने करतात. अंगावर पिणारे लहान बाळ असलेल्या व गर्भवती महिला रोजे (उपवास) करू शकत नाहीत, पण घरातील रोजे करणाऱ्या सर्वांना सेहरीसाठी ताजा स्वयंपाक करून देतात. त्यामुळे अशा महिला अल्लाह मेहरबानीच्या कृपाप्रसादातील वाटेकरी होतात, त्यांनाही रोजांचे सवाब (फळ) मिळतात.


       रोजे (उपवास) करण्यासाठी ४-५ वर्षापासूनची मुले-मुली उत्सुक असतात. रात्री झोपतानाच आईजवळ मला उठव म्हणून हट्ट धरतात. आईने उठवले नाही तरी घरातील हालचाल ऐकून जागे होतात व रोजा धरतात. साडे चौदा तास पाण्याचा थेंबही प्राशन करायचा नसल्यामुळे सायंकाळी कांही वेळ व्याकुळ होतात पण लहानपणापासून त्यांना संयम राखण्याची सवय लागते. अल्लाहची उपासना करण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी होते. रोजा केलेल्या आपल्या बालकाचे आई-वडील कौतुक करतात. पहिल्यांदा रोजा केलेल्या बालकांला नवीन कपडे आणतात. हारतुरे घालून त्यांचे अभिनंदन करतात. एकंदरीत रमजान हा महिना सर्व महिन्यांचा 'सरताज' आहे. भक्तिरसात पूर्णपणे तल्लीन होण्याची संधी या महिन्यात मिळते.


रविवार, १८ एप्रिल, २०२१

'नमाज' - विशेष लेख


'नमाज' मुळे जीवनाला नवी दिशा मिळते

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       नमाज दिवसातून पाच वेळा पडावी लागते. ही प्रार्थना प्रत्येक मुस्लिम बांधवावर सक्तीची आहे. पहाटे सूर्योदयापूर्वी - तुवह की नमाज, दुपारी दीडच्या सुमारास - जोहर की नमाज, सायंकाळी पाचच्या आसपास - असर की समाज, सायंकाळी सूर्यास्तानंतर - मगरीब की नमाज, रात्री नऊच्या सुमारास - ईशा की नमाज पडावी लागते. जो या पाचही नमाज पडत असेल त्याच्याजवळ फावला वेळच उरत नाही. नमाज पडायला प्रत्यक्ष १०-१५ मिनिटे लागतात, परंतु नमाज पडण्यासाठी मानसिक व शारिरीक तयारी करण्याकरीता बराच वेळ लागतो. नमाज पडल्यानंतर त्याचा परिणाम दुसऱ्या नमाजपर्यंत मनावर टिकून राहतो.


       नमाजसाठी मशिदीचे वातावरण इतके शांत, खुले-खुले आणि प्राणवर्धक व तेजस्वी असते की त्यामुळे आत्मिक शांती प्राप्त होते. त्यामुळे विचारसरणीत बदल घडून येतो. नमाजी ईश्वराच्या जवळ जातो. त्याला संसारिक जीवन व त्यासाठी सतत झटणे दुय्यम दर्जाचे वाटू लागते. अल्लाहच्या आशिर्वादामुळे भाविकांना नवनवीन कल्पना सुचतात. त्याचे काम सोपे होते. कामातील कठीणपणा नाहीसा होतो. कुकर्म सतत झाल्यामुळे पुण्याई वाढते. नमाजमुळे अबालवृध्दांना एक दिशादर्शी जीवन जगण्यास मदत होते.