मंगळवार, ३० जून, २०२०

नका म्हणू डस्टबिन (मराठी कविता)


एकदा दोन मैत्रिणींचा संवाद ऐकला.

पहिली: अगं काल तुझ्यासाठी एक स्थळ येणार होतं, कसं आहे?

दुसरी: स्थळ चांगलं आहे, नोकरी पगार चांगलं आहे, दिसायलाही छान आहे. जमेल असं वाटतंय.

पहिली: अगं डस्टबीन किती आहेत, एक का दोन?

दुसरी: दोन आहेत पण ते गावीच राहणार आहेत.

पहिली: बरं झालं बाई नाहीतर आमच्या ताईकडे तीन डस्टबीन आहेत. सासू-सासरे आणि सासऱ्याची विधवा बहीण.

खरंच आजकाल ज्येष्ठ नागरिकांचे कुटुंबातील स्थान नकोशी व्यक्ती असेच झाले आहे. आम्ही दोघं राज-राणी, घरात नको तिसरे कोणी असे मुलामुलींना वाटत आहे. ज्या दिवशी डस्टबिन हा शब्द ऐकला त्याच दिवशी ह्या कवितेचा जन्म झाला. तर अशी ही कविता

"नका म्हणू डस्टबिन"

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

कुणीतरी ज्येष्ठांना डस्टबिन म्हणाले
ऐकून मन फारच उदास झाले |

राब राब राबून तुम्हा वाढवले
पोटाला चिमटा काढून तुम्हा भरवले ।

आमचे शिक्षण झाले कमी
म्हणून तव शिक्षणाची घेतली हमी ।

पै पै साठवून बांधलाय बंगला
तो वाटतो ना आरामात चांगला ।

जिवाच रान करून घेतले शेत
तेच विकायचा तुम्ही केलाय बेत ।

मोठे झाल्यावर फुटलेत पंख
डस्टबिन म्हणून का मारता डंख

नका म्हणू ज्येष्ठांना डस्टबिन
अशानं ऊसवेल नात्यांची वीण।

ज्येष्ठांचा राखा मानसन्मान
तरच वाढेल तुमची शान।


सोमवार, २९ जून, २०२०

तूच सांग देवा...... - मराठी कविता


तूच सांग देवा....

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी





तू तर देवा कुलूपात, मुक्त कधी होणार
भक्त बसले घरात, गाऱ्हाणी कधी ऐकणार?

कोरोनाव्हायरस ची ऐकताच वाणी
कामगार निघाले स्वगृही अनवाणी
गरिबांची दशा झाली केविलवाणी
सगळ्यांच्या डोळ्यात दुःखाचे पाणी
तूच सांग देवा सरकार अशावेळी काय काय करणार ||१||

डॉक्टर नर्सेस ना चोवीस तास कामाला लावलेस
बायका पोरं सोडून पोलिसांना रस्त्यावर डांबलेस
दानशूरांना दान करण्यास प्रवृत्त केलंस
समाजसेवकांना सेवा देण्याचे काम लावलंस
तूच सांग देवा या आस्मानी संकटाला कोण कसे पुरणार ||२||

लाखोने पगार घेणाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम केले
सफाई वाले भाजीवाले मात्र रस्त्यावर फिरू लागले
सुट्टीचा आनंद लहान थोर घेऊ लागले
गृहिणींचे काम मात्र दररोज वाढू लागले
तूच सांग देवा हे भयंकर संकट कधी टळणार ||३||

चीनच्या कुरापतीनी जवान शहीद झाले
चक्रीवादळाने संसार उध्वस्त झाले
पेट्रोल डिझेल चे भाव आकाशाला भिडले
महागाईने आता डोके वर काढले
तूच सांग देवा सामान्य माणसं आता कशी जगणार ||४||



रविवार, २८ जून, २०२०

का करतोस आत्महत्या वेड्या मुला - मराठी कविता



       रोजचे वर्तमानपत्र उघडावं तर कोरोनाच्या वाढत्या प्रमाणाच्या छातीत धस्स करणाऱ्या बातम्या व त्याबरोबरच प्रत्यक्ष आत्महत्येच्या बातम्या विचार करायला लावणाऱ्या आहेत. सुशांतसिंह राजपूत या बॉलिवूड अभिनेत्त्याने आत्महत्या केली म्हणून एका युवतीनेही आत्महत्या केल्याचे ऐकले. कोरोना लॉकडाउन मुळे ऑनलाइन लेक्चर साठी मोबाईल फोन दिला नाही म्हणून आत्महत्या, अशा रोजच्या वर्तमानपत्रात किमान सहा सात बातम्या आत्महत्येच्या असतातच. तर अशा प्रसंगी आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी विचार करायला लावणारी सुचलेली ही छानशी कविता

"का करतोस आत्महत्या वेड्या मुला?"

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी




का करतोस आत्महत्या वेड्या मुला
देवाने दिलय किती सुंदर जीवन तुला

अनंत कळा सोसून जन्म दिला मातेने
अपार कष्टाने वाढवले तुला पित्याने
त्यांचे ऋण जराही न फेडताच
मरण्याचा अधिकार तुला कुणी दिला ?||१||

भावाने केले खूप लाड तुझे
बहिणीने राखीने सजवले मनगट तुझे
त्यांचे रक्षण जराही न करताच
मरण्याचा अधिकार तुला कुणी दिला ?||२||

भरपूर शिक, पदवी मिळवून साहेब हो
गाडी घे, बंगला बांध, श्रीमंत हो
पण त्याचा जराही उपभोग न घेता
मरण्याचा अधिकार तुला कुणी दिला ?||३||

पुष्कळ से जिवाभावाचे मित्र ठेव राखून
त्यांच्याशी खुशाल मनातले टाक बोलून
मनातले दुःख मनातच साठवून
मरण्याचा अधिकार तुला कुणी दिला ?||४||

जीवनात यश-अपयश येतच राहणार
यशाने हुरळू नका, अपयशाने खचू नका
जिद्दीच्या जोरावर यश मिळवायचे सोडून
मरण्याचा अधिकार तुला कुणी दिला ?||५||


वरील कविता युट्युबवर पाहण्यासाठी लिंक 👆