शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

पती बनले प्रेरणास्थान

 पती बनले प्रेरणास्थान




             माझ्याप्रमाणेच पती मन्सूर रमजान तांबोळी यांनी प्रतिकूल परिस्थितीत डी. एड. पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं. होस्टेलवर राहणाऱ्या मित्रांचे डबे पोहचवत आपलं शिक्षण घेतलं होतं. डी. एड. झाल्यावर पाच वर्षे नोकरी मिळाली नाही. त्यावेळी भाजीपाला फळे डोक्यावर बुट्टी घेऊन घरोघरी विकून आई-वडील, भाऊ-बहीण, भाचा यांच्या संगोपनाची जबाबदारी पार पाडली. प्रसंगी शेतमजुरीही केली. १९७७ च्या संपकाळात काम केल्याने त्यांना सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये क्लार्क पदावर नोकरी लागली.


       २५ मे १९८० साली आम्ही विवाह बंधनात गुंतलो. त्यावेळी मीही शिक्षिका म्हणून कार्यरत होते. मी फक्त एफ. वाय. बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. लग्नानंतर पुढे शिकण्याचा मनोदय व्यक्त करताच त्यांनी कसलीही आडकाठी न घालता परवानगी दिली पण एक सूचना दिली की, तुझ्या शिक्षणाचा नोकरीमध्ये, अध्यापनामध्ये कसलीही कुचराई होता कामा नये. आपल्याला जीवनात स्थैर्य देणारी नोकरी प्रामाणिकपणे पार पाडण्यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यांची सूचना शंभर टक्के पाळून मी प्रथम श्रेणीत हिंदी शिष्यवृत्ती मिळवून बी.ए झाले.

      

       लग्नाच्या वेळी मी खूपच अशक्त व सडपातळ होते. कॉलेजमध्ये 'वाऱ्यापासून सावधान', 'ग्राईप वॉटरचा अभाव' असे 'फिशपाँड' मला मिळाले होते. मला पाहिल्यावर माझ्यादेखत पतींना लोक म्हणायचे, 'काय बायको पसंत केलीस मर्दा! नुसती नोकरी पाहिलीस वाटतं. अंगात ताकद आहे का तिच्यात नोकरी करायची तरी?' लोकांचे हे बोलणे यांनी चांगलंच मनावर घेतलं व माझं आरोग्य सुधाण्यासाठी पूर्ण लक्ष दिलं. फळं-भाजीपाला यांच्या बरोबरच रात्री भिजवलेली हरभऱ्याची डाळ व शेंगदाणे मला सक्तीने खायला लावले. ओळखीच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचे औषधोपचार सुरू केले. डॉक्टरांनीही काही गोळ्यांचा कोर्स दिला. त्या महागड्या होत्या. नव्या संसाराची उभारणी चालू होती, लग्नासाठी झालेले कर्ज फेडायचे होते. मी गोळ्यांना नको म्हटले तरी पतीराजांनी माझं काही एक न ऐकता तो गोळ्यांचा कोर्स पूर्ण करायला लावला. चार वर्षात नावे ठेवणाऱ्या लोकांची बोलती बंद केली. मला आरोग्याचं सुंदर लेणं मिळवून देणाऱ्या पतीराजांच्या ऋणात मी आयुष्यभर राहीन. 


         बीए झाल्यानंतर पुढची आठ-दहा वर्षे संसार नेटका करण्यात, नोकरीत, मुलांच्या संगोपनात व स्वतःचे घर बांधण्यात वाऱ्याच्या वेगाने निघून गेली. मग मी बहिःस्थ विद्यार्थिनी म्हणून एम.ए.साठी एडमिशन घेतले. त्यानंतर सुट्टीतील बी. एड. चा कोर्स सोलापूर येथे जाऊन पूर्ण केला. त्यावेळी पतींसह सर्व नातेवाईकांनी मुलांची जबाबदारी स्वीकारली. अशा प्रकारे मी एम.ए. बी एड. झाले. माझा मुलगा मोहसीन बीकॉमचा अभ्यास करत होता. कन्या अरमान डी. एड.चा कोर्स पूर्ण करत होती व छोटी कन्या यास्मीन बी. ई (इलेक्ट्रॉनिक्स) चा अभ्यास करत होती. मी पी.एच. डी. होण्याची मनीषा व्यक्त करताच मुलांसह पतीराजांनी आनंदाने प्रोत्साहन दिले. त्यांच्या सक्रिय, भक्कम पाठिंब्यावरच मी उच्चतम शिक्षण घेऊ शकले. पी.एचडी झाले. आज माझ्या हातून जे लेखन कार्य होत आहे त्याचं सर्व श्रेय माझ्या पतींना व कुटुंबियांना देते. अशा प्रेमळ, समंजस पतीसाठी मी परमेश्वराजवळ उदंड आयुष्य मागते.

 





शनिवार, १० जानेवारी, २०२६

लघकथा संग्रह क्र.१४ थीम - लग्न जमता जमेना मुलाचं

 लघकथा संग्रह क्र.१४
थीम - लग्न जमता जमेना मुलाचं




                         फोटो:साभार गूगल 


(१) हरीभाऊना दोन मुले. मोठा मुलगा ग्रज्युएट झाला. नोकरीवाल्या मुलाला मागणी जास्त आहे म्हणून घरच्या शेतीचं काम करायला लावायचं सोडून त्याला नोकरीला लावलं. पण नोकरी खाजगी आहे, कमी पगाराची आहे म्हणून नकार येऊ लागले. कुणाला शेत जास्त पाहिजे होते, कुणाला घर स्लपचं पाहिजे होतं. अशीच तीन वर्षे लोटली.  धाकट्या मुलाच लग्नाचं वय झालं. तो आईवडिलांना म्हणाला," दादानं ट्राफिक जाम करून टाकलय पण मी काही थांबणार नाही. माझ्या लग्नाचं बघा नाहीतर मला दुचाकी घेऊन मार्ग काढत पुढं जाव लागेल. "आता काय करावं हरीभाऊनी !

 शीर्षक- ट्राफिक जाम


(२) निदान पोहेतरी......

दोन मित्र वधूशोध मोहिमेत सहभागी होते. पहिला म्हणाला, "दोन वर्षे झाली मुली बघतोय. पंचवीस मुली बघून झाल्या अजून एकीन पण होकार दिला नाही. " यावर दुसरा म्हणाला," तुझं अजून बरं चाललय बाबा, बायोडाटा बघून मुलगी बघायला या म्हणतात. तू अजून मुलगी बघून, पोहे तरी खाऊन येतोस मर्दा ! माझं बघ मी मुली बघायला सुरुवात करून पाच वर्षे झाली. मुलगी बघायला या असा फोन येणं ही बंद झालय! काय करू सांग?



(3)मोठेपणा नडला

नारायणरावानी आपला रूबाब दाखविण्यासाठी आपल्या उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या मेहुण्याचा व पुतण्याचा बायोडाटा मध्ये उल्लेख केला होता. एका सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याची मुलगी नारायणरावांच्या मुलाने पसंत केली. त्याना हुंडा, मानपान कांहीच नको होते. त्यांनी मुलीच्या वडिलांना मुलगी पसंत असल्याचे कळविले पण मुलीकडून स्पष्ट नकार आला का तर मुलगी म्हणाली, "आत्तापासूनच तुम्ही मेहुण्या पाहुण्यांचा उल्लेख करून रूबाब दाखवत आहात. आमच्या सारख्या गरीबांना हा रूबाब पेलणार नाही. " परोपरीने समजाऊन सांगितले तरी मुलगी लग्नास तयार झाली नाही.


(४)मुलाचं लग्न महत्त्वाचं की दौलत?

शामराव एक सामान्य शेतकरी होते. शेतीत कष्ट करून कुटूंबाचा उदर्निवाह चालवित होते. त्यांचा मुलगा खाजगी शाळेत शिक्षक पदावर कार्यरत होता. त्याला पगार कमी होता. पण या एकुलत्या एक असलेल्या सुनिलचं लग्न  कांही केल्या ठरेना. शेवटी त्यांनी दुसऱ्या राज्यातील एक मुलगी एजंटमार्फत पसंत केली. त्या पाहुण्यांनी दोन लाखाची मागणी केली. ही रक्कम लग्नापूर्वीच द्यावी लागणार होती. शामरावांना ही रक्कम भरणे अवघड झाल्याने ते गप्पच बसले. सुनील ने एजंटला फोन केल्यानंतर त्याला ही गोष्ट समजली. सुनील वडिलांना म्हणाला, " तुम्हाला दोन लाख महत्त्वाचे की मुलाचे लग्न? शेत गहाण टाका आणि माझ्या लग्नाचं बघा" हे ऐकून शामरावांना चक्करच आली.


(५) लग्न झालं एकदाचं पण....

रामभाऊना मुलाच्या लग्नाची फार चिंता लागली होती. पाच सहा वर्षे अशीच टेंशनमध्ये निघून गेली. त्यांची आर्थिक परिस्थिती बरी होती म्हणून त्यांनी चार लाख रुपये रोख व पाच तोळे सोने घालण्याची पाहुण्यांनी अट घातली. त्यांची अट मान्य केल्यानंतर विवाह सोहळा पार पडला. पूजाअर्चा झाली. त्या दोघांना त्यांनी  हनीमूनला पाठवले. आणि घडलं भलतंच! नवरदेवाला रेल्वे स्टेशनवर बसवून मी स्वच्छतागृहाला जावून येते असं सांगून नवरीबाई गेली पळून! नवरदेव एकटेच घरी परतले. सांगा काय करायचं?