अमेरिकेतील गौरीची कराडमध्ये स्नेहभेट
चि. गौरी, अविनाश व बिल्लूस,
अनेक शुभ आशीर्वाद ।
गौरी, साताऱ्यातील सबस्क्रायबर भेटीनंतर कराड भेटीची चाहूल लागली आणि तुझ्या परिवाराला भेटण्याचे मनसुबे सुरू झाले. आमच्या साहेबांच्या मित्राच्या मुलीचे लग्न त्याच दिवशी होते, त्या लग्नाला हजर राहणे अपरिहार्य असल्याने ते माझ्याबरोबर येऊ शकत नव्हते. सूनबाई व छोटी नातवंडे मामाच्या गावी सुट्टीला गेल्याने ती येऊ शकत नव्हती. राहिला एकमेव आधार असलेला, माझ्या मनातील भावना अचूक ओळखणारा माझा लाडका चिरंजीव मोहसीन. त्याला मी या भेटीबद्दल बोलले. त्याने अनुकूल प्रतिसाद दिला आणि पुढील योग जुळून आला. त्याच दिवशी वाठारच्या एका लग्नकार्यालयामध्ये पाहुण्यांच्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण आले होते. मोहसीन म्हणाला, "शक्य आहे". दुसऱ्या दिवशी माझी कराडस्थित कन्या यास्मीन हिच्या सासरेबुवांची तबेत्त बरी नसल्याचे समजले. मोहसीन म्हणाला "शक्य आहे". उन्हाळा जबरदस्त सुरु असल्याने चारचाकीने जायचे ठरले. नेमकी त्याच दिवशी चारचाकी नादुरुस्त झाली. ताबडतोब दुरूस्त होण्याची शक्यता नसल्याचे कळाले. मोहसीनने दुचाकी काढली, मातृदिन असल्याने आईची इच्छा पूर्ण करण्याचा त्याने चंगच बांधला होता जणू! त्याच दिवशी आमच्या शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीचे मतदान होते. मतदान करून ठीक वेळेत लग्न कार्यालयात पोहोचलो. लग्न समारंभ व भोजन आटोपून आम्ही कराडला निघालो. अडथळ्यांची शर्यत अजून संपलेली नव्हती. कराडजवळ पुलाचे काम सुरु असल्याने ट्राफिक जाम, वरून उन्हाचा तडाखा पण याचे कांहीच वाटत नव्हते कारण दोन मुलींना व त्यांच्या परिवाराला भेटण्याची अनिवार ओढ लागली होती. शेवटी साडेचार वाजता यास्मीनच्या घरी पोहचलो. मन भरून लेकीला भेटल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन व्याह्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. सहा वाजले होते. आता अलंकार हॉटेलमध्ये गौरीला भेटण्यासाठी उत्सुक झालो होतो. कधी एकदा भेटतोय असं झालं होतं.
आणि तो क्षण आला. दारातच अ अमेरिकेचा बोर्ड पाहिला आणि जीवात जीव आला. गौरीची आई आस्थापूर्वक सर्वांचे स्वागत करत होत्या, त्यांचे डोळे सांगत होते, या माझ्या लेकीचं कौतुक बघा. स्टेजवर तुम्ही तिघे उभे होता, लयी भारी दिसत होता. चेहऱ्यावरील हास्य खूप बोलत होतं. तिथं हजर असलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या जीवाभावाची, जिव्हाळ्याची असल्याचे जाणवत होते. सर्वांच्या मनात आपुलकी होती.
गौरी, तुझ्या परिवाराला भेटून खूप आनंद वाटला. एक सर्व श्रुत चारोळी आठवली.
शब्दानांही कोडं पडावं,
अशी गोड माणसं असतात ।
केवढं आपलं भाग्य असतं,
की ती आपल्या जवळची असतात,
आणि ती अमेरिकेत राहतात.
तुझ्या चॅनलच्या स्नेहात गुरफटल्यापासून अमेरिकेत आपलं कोणी नाही असं वाटत नाही. तुमच्या परिवारातील साधेपणा, सच्चेपणा सर्वांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करतो. तुम्हा दोघांच्या स्वभावातील विशेष म्हणजे तुमचा सकारात्मक दृष्टीकोन. भल्या बुऱ्या प्रसंगाना हसत सामोरे जाण्याची तयारी. 'ठेवू नये नावं, चांगलं तेवढं घ्यावं' हा भाव मनात ठेवून तुम्ही वागत असल्याचे मला दिसून आले, ही अनुकरणीय बाब आहे. आपल्या मोठेपणाचं प्रदर्शन न मांडता तुम्ही त्याचं श्रेय इतरांना देता किती मोठेपणा आहे हा मनाचा!
सातासमुद्रापार एक सामान्य कुटुंबातील मुलगी जाते, तिथल्या संस्कृतीशी जुळवून घेत घेत 'अ अमेरिकेचा' हे चॅनल सुरू करते, सव्वा लाख सबक्रायबर्स मिळवते ही गोष्ट वाटते इतकी सोपी नक्कीच नाही. भारतात आल्यावर फक्त आपल्याच परिवारात न गुरफटता, सर्वांना भेटण्याचं नियोजन करते माझ्या सारख्या अनेकांना बोलण्याची संधी देते, सगळंच कित्ती छान व सुंदर!
अ अमेरिकेचा म्हणताना भ भारताचा न विसरलेल्या गौरी परिवारासाठी शेवटी एवढंच म्हणेन की,
उगता हुआ सूरज रोशनी दे आपको,
खिलता हुआ गुलाब खूशबू दे आपको,
हम तो सिर्फ दुवा देनेके काबिल हैं,
देनेवाला दस लाख सबक्रायबर्स दे आपको ।
एका दिवसात २२० कि. मी. प्रवास दुचाकीवरून करूनही अजिबात त्रास झाला नाही कारण लाडक्या गौरी परिवाराला भेटल्याचा आनंद विलक्षण समाधनकारक होता.
आपकी शुभचिंतक ,
डॉ. सौ. ज्युबेदा तांबोळी
जयसिंगपूर .