सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

लघुकथा संच क्रमांक: ८

 

मराठी लघुकथा संच - ८

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी




लघुकथा क्रमांक - ३६


एका घरामध्ये गावाकडे राहणारे आजोबा वरचेवर मुलाच्या नोकरीच्या गांवी येत असतात. आजोबा आले की, त्यांचा नातू ज्या ठिकाणी अभ्यासाला बसायचा त्या ठिकाणी आरामात बसायचे. सहावीत शिकणाऱ्या त्यांच्या नातवाला आजोबांचा फार राग यायचा. तो आपल्या आईच्या मागे भुनभुन लावायचा, तू आजोबांना सांग दुसऱ्या ठिकाणी बसा म्हणून. आजोबा फार रागीट होते. त्यांना इथून उठून तिथे बसा म्हणून सांगायची सोय नव्हती. त्यामुळे आई त्याला समजावत म्हणाली, "बाळ, तूच दुसरीकडे बसून अभ्यास कर, असं करायचं नाही आजोबा आल्यावर. तू उद्या मोठा झालास की आम्ही तुझ्या नोकरीच्या गांवी येणार त्यावेळी आमच्यावर असंच रागावणार का?" मुलगा म्हणाला, "त्यावेळी मी नाही रागावणार, माझी मुलं रागावतील".


लघुकथा क्रमांक: ३७


एक गवंडी एका शिक्षिकेच्या घरातील किरकोळ बांधकाम दुरूस्तीसाठी आला व म्हणाला, "मॅडम मला ओळखलंत का"? मी धर्मा. मॅडम म्हणाल्या, "अरे धर्मा किती मोठा झालास रे कशी ओळखणार मी". मी तुला बघितलं तेंव्हा एवढासा बिटका होतास." धर्मा म्हणाला, "मॅडम तुम्हाला एक विचारु का?" मॅडम म्हणाल्या, "विचार ना." धर्मा म्हणाला, "आम्ही तुमच्या हाताखाली शिकून लहानाचे मोठे झालो. तुमच्यापेक्षा वयस्क दिसू लागलो पण मी बघतोय मला त्यावेळी शिकविणारे तुमच्यासह सर्व शिक्षक आमच्या मानाने तरूण व ताजेतवाने कसे काय दिसतात?" मॅडम म्हणाल्या," तुझं निरीक्षण अगदी बरोबर आहे. आम्ही शिक्षक टवटवीत, गोजिरवाण्या, सजीवफुलांच्या बागेत काम करतो, म्हणून त्यांच्याप्रमाणेच आम्ही टवटवीत राहतो. तुम्ही लोक काम करता निर्जीव दगड, विटा आणि मातीसोबत". धर्मा म्हणाला, "खरं आहे मॅडम."


लघुकथा क्रमांक: ३८


एका पतीपत्नीची मुलाखत सुरु होती. पती पोलिस होते. ते खिलाडू वृत्तीचे होते कारण ते कब्बडीपटू होते. मुलाखतकारानी एक सूचक प्रश्न विचारला. ते म्हणाले, "तुमच्या पत्नी कधीच रागवत नाहीत याचं रहस्य काय?" यावर गोड हसत पती म्हणाले, "खूप रागावते. फारच चिडते."

मुलाखतकार म्हणतात, "मग त्या राग कसा व्यक्त करतात?"

पती म्हणतात, "अस्सखलितपणे तोंडाचा पट्टा चालूच ठेवते."

मुलाखतकार म्हणतात, "कब्बडी खेळताना, शत्रू पक्षावर चाल करून परत येईपर्यंत तुमचा दम टिकतो, कब्बडी कब्बडी म्हणताना. तुमच्या पत्नीचा बोलत राहण्याचा दम किती वेळ टिकतो?"

पती हसत हसत म्हणतात, "साधारण सात सात मिनिटांंचे चार डाव संपेपर्यंत."

तिघेही मोठमोठ्याने हसू लागतात.


लघुकथा क्रमांक: ३९


एक आजोबा शेतातील गव्हाचे छोटे पोते घेऊन लेकीच्या घरी निघालेले असतात. एस् .टी. स्टँडवर रिक्षावाल्याला विचारतात, "अमक्या ठिकाणी जायला किती भाडं घेणार?" तो म्हणतो, "ऐंशी रूपये घेईन."

आजोबा विचार करतात एवढ्याशा पोत्यासाठी याला ऐंशी रूपये कशाला द्यायचे? त्यांना पोतं डोक्यावर घेऊन चालत जाणं सहज शक्य होतं पण लेक जावई रागावतील पोतं डोक्यावर घेऊन गेलो तर शिवाय त्यांचं प्रेस्टीज कमी होईल म्हणून बरंच अंतर चालत गेल्यानंतर एका रिक्षावाल्याला भाडं विचारलं. रिक्षावाला म्हणाला, "शंभर रुपये."

भाडं ऐकून आजोबांना फार राग येतो. ते रिक्षावाल्याला अस्सल गावरानी भाषेत म्हणतात, "तुला रिक्षाचं भाडं इचारतोय, रिक्षा इकत मागत न्हाय."

रिक्षावाला हात जोडून नमस्कार करून म्हणतो, "इथंच भेटलात बरं झालं, वर भेटू नका म्हणजे झालं"


लघुकथा क्रमांक: ४०

ऑनलाइन शिक्षणाचा इयत्ता पाचवीचा वर्ग सुरु असतो. मॅडम एक लेसन् शिकवितात व होमवर्क देतात की तुमचं एक आवडतं वाक्य चाररेघी वहीत सुंदर अक्षरात लिहा व माझ्या नंबरवर सेंड करा. एका विद्यार्थ्यांने आय् लव्ह यू लिहिले व सेंड केले. मॅडमना फार राग आला. रागाच्या भरात त्या विद्यार्थ्याला क्लासमधून डिसमिस केले. तो रडत रडत त्याच्या पप्पाकडे जातो. पप्पा फोनवर मॅडमना विचारतात, "माझ्या मुलाला तुम्ही का डिसमिस केले?"

मॅडम म्हणाल्या, "विचारा तुमच्या मुलालाच काय केलं त्यानं ते".

पप्पानी मुलाला विचारल्यावर मुलगा म्हणतो, "पप्पा मॅडमनी आवडतं वाक्य लिहायला सांगितलं होतं मी आय् लव्ह यू लिहिलं. मॅडमनीच परवा सांगितलं होतं की सर्वावर प्रेम करा म्हणून. मी तसं लिहिलं यात माझा काय  दोष?"

बापानं डोक्याला हात लावला.


बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

ग्राहका तुझ्याचसाठी - विशेष मराठी लेख

 

राष्ट्रीय ग्राहक दिन अर्थात
ग्राहका तुझ्याचसाठी......


लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

        २४ डिसेंबर हा दिवस 'राष्ट्रीय ग्राहक दिन' म्हणून संपूर्ण भारतभर साजरा होतो. दिनांक २४ डिसेंबर १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहक पंचायतीचे संस्थापक आदरणीय बिंदू माधव जोशी यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झाला. हा कायदा म्हणजे देशाच्या सामाजिक व आर्थिक कायद्यांच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करणे, तसेच त्यांच्या तक्रारींचे सुलभतेने, विनाविलंब आणि अत्यल्प खर्चात निवारण करणे, यासाठी यंत्रणा निर्माण करणे, हा ग्राहक संरक्षण कायद्याचा मूळ उद्देश आहे. आपला समाज संघटित नाही म्हणून ग्राहक चळवळीचे सूत्र आहे ग्राहक संघटन.


        आपल्या देशात एक चमत्कारिक चित्र उभे ठाकल्याचे दिसत आहे. एका बाजूला धान्य टंचाई, महागाई, भडकलेल्या किंमती, अपुरी साधने, लाचखोरी, भ्रष्टाचार, अन्न, वस्त्र, निवारा यांचे मोठ्ठे प्रश्नचिन्ह या प्रश्नचिन्हांची सोडवणूक करण्यासाठी, हे विद्रूप चित्र बदलण्यासाठी ग्राहकांचे संघटन होणे आवश्यक आहे. सामाजिक भेदभाव, आर्थिक विषमता, अभाव आणि अन्याय याविरुद्ध उभे राहायचे असेल तर केवळ शब्दांचे फुलोरे निर्माल्यवत् आहेत. घोषणांच्या गर्जनांनी आकाश कोंदून टाकता येईल, पण या भूमीच्या पुत्रांचा कोंडमारा मोकळा होणार नाही.


        यातून मार्ग कसा काढता येईल? सामाजिक भेदभाव, आर्थिक विषमता याविरुद्ध उभे रहायचे असेल, अभाव आणि अन्यायाचा मुकाबला करायचा असेल तर रचनात्मक कामाचे नवे दुर्ग आपण उभे करायला हवेत. स्वातंत्र्याच्या चळवळीनंतर सुराज्याची, समृद्धीची चळवळ आपण उभी केली पाहिजे. समृद्धी, संपन्नता पिकल्या जांभळाप्रमाणे झाडावरून खाली पडत नाही. ती हजारो माणसांच्या कष्टातून, श्रमातून, बुद्धीतून, ज्ञानातून, संघटनेतून आणि समर्पणातून निर्माण होते. अशा विविध मार्गातील एक मार्ग म्हणजे ग्राहक चळवळ आहे. ग्राहक चळवळ हा स्वयंप्रेरित आर्थिक परिवर्तनाचा एक प्रकल्प आहे. हा ग्राहक चळवळीचा मूलभूत  उद्देश आहे.


       ग्राहक हाच व्यापार व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. सर्व उद्योग उभारले जातात ते प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे ग्राहकांसाठीच. सर्व आर्थिक व्यवहारात, उलाढालीत ग्राहक हाच पाया आहे. हा ग्राहक म्हणजे कोण, तर तुम्ही आम्ही सर्वच ग्राहक आहोत. कोणतीही वस्तू किंवा सेवा विकत घेणारी वा अशी वस्तू किंवा सेवा वापरणारी व्यक्ती या कायद्याने ग्राहक म्हणून ओळखली जाते. वस्तू वा सेवा खरेदी करणारी व्यक्ती स्वतः उपभोक्ता असेल तर, ती व्यक्ती ग्राहक या संज्ञेस पात्र ठरते. सर्व व्यवहाराचा आत्मा ग्राहकच आहे. पण आज तो नगण्य आहे, कारण ग्राहक हा विखुरलेला समाजघटक आहे. त्यांच्यात संघटना नाही. म्हणून शक्तीही नाही, आवाज नाही. त्याच्या हिताची कोणी जपणूक करीत नाही. यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे ग्राहकांचे संघठन, त्यासाठी हवे ग्राहकांचे प्रबोधन. आपले हक्कच आपल्याला माहित नसतात. आज कुणीही उठावे, आपल्याला फसवून टोपी घालावी. स्वस्ताचे गाजर दाखवून आपली हातोहात फसवणूक करावी. एकावर एक फ्री, अमक्या मालावरही स्कीम, सोने खरेदीवर लकी ड्रॉ, जुनी वस्तू द्या व नवी वस्तू घेवून जा, अशा प्रकारच्या प्रलोभनांना भलेभलेही भुलतात, तर मग अशिक्षतांचे काय? प्रलोभने माणसाला भुरळ पाडतात. जरूरी नसतानाही मग व्यक्ती गोड भुलथापांना किंवा विक्रेत्याच्या गोड बोलण्याला फशी पडते. खरे पहायला गेले तर दुकानदार कोणतीही वस्तू फुकट देत नसतो किंवा आपला तोटा करून घेत नसतो. त्याच्या भूलथापांना आपण बळी पडतो. हा आपला अज्ञानीपणा आणि त्याचा बनेलपणा असतो. एकतर अशा मालाची पावती तो देत नाही. त्यामुळे फसवणूक झाली तर तुम्ही तक्रार कुठेही करू शकत नाही. कारण पावतीशिवाय व्यवहार झाल्यामुळे खरेदीचा पुरावा जवळ नसल्यामुळे तुम्ही काहीच बोलू शकत नाही. न्याय मागू शकत नाही. म्हणून जागरूक ग्राहकांनी अशा मोहजालात न अडकता वस्तू खरेदीची योग्य पावती घ्यावी. आमच्यावर विश्वास नाही का? या दुकानदाराच्या बोलण्यावर बसू नये. पावतीचा आग्रह जरूर करावा. वीस रूपयांवरील मालावर पावती मागण्याचा हक्क ग्राहकाला असतो.


       शेवटी राष्ट्रीय ग्राहक दिनी एवढेच सांगावेसे वाटते ग्राहक हा राजा आहे. अशी नुसती घोषणा उपयोगाची नाही. ग्राहक तेंव्हा राजा होईल जेंव्हा त्याची हुकूमत वस्तूमूल्य, वस्तूची गुणवत्ता आणि वस्तू वितरण यावर राहील.


       ग्राहक बंधू भगिनींनो, पूर्ण जागे रहा, जागरूकपणे खरेदी करा, डोळे उघडे ठेवून व्यवहार करा, कारण काळ मोठा बिकट आहे.


राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने सर्व ग्राहक बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा ।



शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२०

एक निष्काम कर्मयोगी: संत गाडगेबाबा - विशेष लेख

 

संत गाडगेबाबा यांचा दि. २० डिसेंबर हा स्मृतीदिन त्यानिमित्त ही शब्दरुपी भावांजली.......


एक निष्काम कर्मयोगी: संत गाडगेबाबा - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       या महामानवाचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यात शेडगावच्या झिंगराजी व सखुबाई या परीट दांपत्याच्या पोटी झाला. त्यांंचे नांव डेबूजी ठेवण्यात आले. छोटा डेबूजी आपल्या आईसोबत मूर्तीजापूर तालुक्यातील दापूर या लहानशा गांवी आजोळी आला. येथे त्याला निर्भयपणाचे बाळकडू मिळाले. गुराखी, शेतीकाम करीत मामांच्या हाताखाली कामाला लागला. एकदा मामांनी सावकारी पाशामुळे हातपाय गाळून अंथरूण धरले, पण डेबूजी घाबरला नाही. त्या सावकाराला त्याने धडा शिकविला. ८/१० गुंड मारेकऱ्यांना शेतातून हाकलून लावले तेंव्हापासून डेबूजीचा देवसिंग झाला.


       १८९२ साली डेबूजीचे लग्न कमलापूर येथील धनाजी परटाची मुलगी कुंताबाईशी झाले. डेबूजीला पहिली मुलगी झाली. बारशाला  मांसाहारी जेवण व पेय द्यावे लागे. या जुन्या रुढीला सुरुंग लावत त्यांनी बारशाला गोड जेवणाचा बेत केला व समाजाला ठणकावून सांगितले, गुमान जेवा गोड जेवण. तेंव्हा कांही जण म्हणाले जात कुळीला बट्टा लावला तुम्ही. तेंव्हा या विरोधाला न जुमानता त्यांनी जुन्या परंपरा मोडून काढल्या. पहिली मुलगी अलका, दुसरी कलावती व मुलगा मुदगल अशी तीन अपत्ये झाली पण मुलगा थोड्याच दिवसात मरण पावला.


       एक विभूती सन १९०५ साली दायूरेगावी आली. त्याने डेबूजीचा देवीदास केला व त्यांच्या जीवनाचा कायापालट झाला. १ फेब्रुवारी १९०५ रोजी गाडगेबाबा दापुरचे घर व संसार सोडून गेले. बारा वर्षे भ्रमंती करून षड्रिपूंचे दमन व अचाट निर्भयता कमावली व अखेर ऋणमोचन यात्रेला येऊन घरच्यांच्या संपर्कात आले पण घरी आले नाहीत. यावेळी त्यांचा वेष अंगावर फाटके कपडे, हातात गाडगे व काठी असा होता. तेंव्हा पासून लोक त्यांना गाडगेबाबा म्हणून ओळखू  लागले.


        समाजसेवा हीच ईश्वर सेवा असे मानून समाज प्रबोधन करण्यासाठी साधन म्हणून त्यांनी कीर्तनाचे माध्यम निवडले. १९२०-२२ सालापासून कीर्तने करण्यास सुरूवात केली. काळजाला जाऊन भिडणारी वाणी, प्रेम, कारूण्य व सेवाभाव यामुळे त्यांच्या कीर्तनाचा लोकांवर प्रभाव पडत असे.


       तुकाराम महाराज व महात्मा गांधीजीना त्यांनी पूज्य मानले होते. त्यांची कीर्तने प्रश्न उत्तरे स्वरूपात असत. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे आवडीचे भजन ते नेहमी गात असत. अंधश्रद्धा, व्यसन, अस्पृश्यता कीर्तनाद्वारे नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्त्रियांना भजन करावयास लावले. पूर्वी स्त्रिया भजन करीत नसत. देव दगडात नसतो माणसात असतो त्याची सेवा करा. गरजूंना अन्न, वस्त्र, निवारा द्या ही त्यांनी शिकवण दिली. वेड लागले जगाला देव म्हणती धोंड्याला असे बाबा म्हणत. बाबांना व्यक्तीपूजा, अवतार वगैरे आवडत नसे.


बहिराव खंडेराव रोटी सूर्यासाठी देव

वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे ।

रंडीचंडी शक्ती मध मासांते भक्षती।

शेंदरी हेंदरीद दैवते कोणतीपूजी भूते खेते ।


       अशा अभंगातून बाबांनी खऱ्या धर्माविषयीची लोकांना ओळख करून दिली. पंढरीचा विठ्ठल, बाबांचा आवडता होता. बहू देवता वादाचे खंडन करून ते एकेश्वरवादाचा प्रचार करीत. मुक्या प्राण्यांना अभय, लग्नात हुंड्याला विरोध, व्यसनमुक्ती असे विषय कीर्तनात असत. ओबडधोबड व सरळ शब्दांनी माणसांची मने ते जिंकून घेत.


       भारतीय समाज सुधारणा कशी करावी याचा नेमका विचार गाडगेबाबांना सापडला होता. ते एका अर्थाने थोर समाजशिक्षक, जाणते संत, दीनाचा दीपस्तंभ होते. तळागाळातील मुले शिकली तर त्यांना चांगल्या पद्धतीने जगता येईल. शिकलेला मनुष्य सहसा अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांच्या आहारी न जाता तो कोणताही निर्णय घेतांना बुद्धीचा उपयोग करील म्हणून शिक्षणाद्वारे समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी बाबांनी भगीरथ प्रयत्न केले. ते बुद्धी वादी संत होते. त्यांना चराचरात देव दिसत असे. चमत्कार व सिद्धी यांच्या अस्तित्वाला त्यांनी नेहमी विरोध केला. गोशाळेतील गाय, कुष्ठधामातील रोगी, झोपडीतील  अर्धपोटी गरीब, रस्त्यावरचा उपाशी भिकारी यात बाबांना ईश्वर दिसला. केरकचऱ्याने भरलेल्या देवळात घंटा वाजविणे ही जशी भक्ती होत नाही त्याप्रमाणेच सगळ्या समाजाचे जीवन गांजलेले असताना देशभक्तीचा रंग फासणे शहाणपणाचे नाही  असे बाबांना वाटे.


       बाबांच्या कीर्तनामुळे हिंसाबंदी झाली. ते महान कर्मयोगी होते, ज्यांनी आपल्या आयुष्यातील क्षण न  क्षण समाजासाठी वेचला. अंधश्रध्दा आणि देवभोळेपणाच्या कचाट्यातील लोकांना प्रबोधन, समाजजागरण करून देव माणसांत पाहिला. आज आपणाला जर नवीन विचारांचा नवसमाज घडवायचा असेल तर जननायक गाडगेबाबांची शिकवण घरोघरी  पोहोचली पाहिजे. आजच्या युवकांसमोर बाबांचे आदर्श निस्वार्थी जीवन प्रेरणा म्हणून पुढे आले पाहिजे.


       गरीबांसाठी ज्यांचे ह्रदय द्रवते तो महात्मा होय, असे स्वामी विवेकानंद म्हणत असत. त्यांच्या या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने गाडगेबाबा महात्मा होते. बाबांना पारदर्शक ह्रदय होते. ते केवळ बोलघेवडे समाजसुधारक नव्हते. धर्माच्या नावावर शोषणाला बाबांचा कट्टर विरोध होता. सामाजिक सुधारणा व्हाव्यात, शिक्षण प्रसार व्हावा, उच्चनीच भेदभाव नाहीसे व्हावेत यासाठी बाबांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.


       ८ नोव्हेंबर १९५६ ला मुंबई येथे बाबांनी शेवटचे कीर्तन केले. अमरावतीला जात असताना दिनांक २० डिसेंबर १९५६ रोजी या क्रियाशील सत्पुरुषाचे महानिर्वाण झाले. तेंव्हा ग. दि. माडगूळकर म्हणाले, 


विठ्ठलाच्या पायी थरारली वीट

राऊळाची घंटा निनादली।

संत माळेतील मणी शेवटला ।

आज ओघळला एकाएकी।।


अशा या थोर लोकोत्तर महापुरुषाला त्रिवार अभिवादन, कोटी कोटी प्रणाम ।


मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

भिन्न जाती, जिव्हाळ्याची नाती - मराठी कथा


भिन्न जाती, जिव्हाळ्याची नाती - मराठी कथा

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी





फोटो साभार: गूगल


       एप्रिल महिना सुरू होता. उन्हाचा तडाखा प्रकर्षाने जाणवत होता. अंगाची लाही लाही होत होती. अशावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये कांही कामासाठी जावे लागले. ते काम अपेक्षेपेक्षा लवकर झाले आणि आम्ही दोघांनी कुलकर्णी काकांना भेटण्यासाठी दिंडेनगरला जायचे ठरविले. दिंडेनगर तिथून तसे खूप लांब होते. त्यात ऊन मी म्हणत होते. शिवाय त्यांचे नवीन घर नेमके कुठे आहे हे पण आठवत नव्हते. कारण दोन वर्षांपूर्वी वास्तुशांतीच्या निमित्ताने त्यांच्याच गाडीतून जाऊन बघितले होते. बस स्टॉपपासून घर सापडणे कठीण होते, त्यामुळे रिक्षाने जाण्याचा निर्णय झाला. अर्धा तास थांबून लगेच परत येता येईल असा विचार करून एका रिक्षावाल्याला पत्ता सांगून भाडे विचारले. तो म्हणाला, "तीनशे रूपये लागतील. रिक्षाभाडे २५० रुपये व वेटिंग चार्ज ५० रू आणि हो अर्ध्या तासाच्या वर एक मिनिटही जास्त थांबणार नाही". दुसऱ्या रिक्षावाल्याला विचारले तर तो ३५० रूपये म्हणाला, म्हणून पहिल्या रिक्षावाल्याला २५० रू. घे आणि चल म्हणालो. पण तो तयार झाला नाही. शेवटी असू दे बाबा म्हणून रिक्षात बसलो.


       रिक्षा कांही अंतर पार करत असतानाच आकाशात ढगांनी गर्दी केली. ढगांच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या. पाऊस येणार की काय म्हणत असतानाच पाऊस जोरात पडू लागला. गारा रिक्षावर जोराने आदळू लागल्या. वळवाचा पाऊस असाच असतो. रिक्षा कशीबशी दिंडेनगर बोर्डजवळ उभी राहिली. तो म्हणाला, "सांगा आता कुणीकडे जायचं?" आम्हाला कांहीच समजेना. म्हणून काकांना फोन केला. त्यांनी रिक्षावाल्याला नेमका पत्ता सांगितला पण धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे रिक्षा चालवणेही कठीण झाले. थोडा वेळ थांबलो इतक्यात काकांचा फोन आला, अजून कसे नाही आलात? कांही वेळाने रिक्षा कशीबशी काकांच्या गेटजवळ थांबली. पहातो तर काय काकी छत्री धरून हातात दोन तीन छत्र्या घेऊन उभ्या होत्या. ड्रायव्हरसह आम्हा दोघांसाठी छत्र्या दिल्या हेतू हा की गेटपासून घरात येईपर्यंत आम्ही भिजायला नको. बाथरूममधून बाहेर  काकी  टॉवेल घेऊन उभ्या होत्या. पाच मिनिटाच्या आतच फक्कड असा गरमागरम चहा दिला. घरातील सर्वासर्वांची आस्थेने चौकशी केली. त्यांच्या मते चौकशीत कमालीची माया, आपुलकी होती. थोड्याच वेळात मस्त पैकी ओलं खोबरं व कोथिंबीरीने सजलेली पोह्यंची प्लेट आमच्यासमोर हजर झाली.


       अर्धा तास झाल्याबरोबर रिक्षावाल्याला आम्ही म्हणालो, "चला, अर्धा तास संपला". तो म्हणाला, "थांबा अजून थोडा वेळ. पाऊस कमी झाल्यावर निघू या". पुन्हा गप्पा रंगल्या. काकीनी मुलांना खाऊचे पॅकिंग दिले. माझी खणानारळाने ओटी भरली. ड्रायव्हरला व यांना नॅपकिन, पानसुपारी दिली. पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहून आम्हीच उठलो. काका काकीना निरोप देऊन रिक्षात बसलो. रिक्षावाल्याला यांनी शंभराच्या तीन नोटा दिल्या. त्याने त्यातली शंभराची नोट परत दिली. प्रश्नार्थक नजरेने पाहिल्यावर तो म्हणाला, "तुमच्या दोन कुटुंबातील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी बघून मी थक्कच झालो. तुमचा धर्म वेगळा त्यांचा वेगळा पण मनाने तुम्ही एकमेकांच्या किती जवळ आहात हे मी जवळून बघितल. खूष झालोय मी, नाहीतर हल्ली कुठं बघायला मिळतं असं चित्र?"


       ड्रायव्हरप्रमाणेच सर्वांना थक्क करून सोडणारं आमच्या दोन कुटुंबातील हे नातं जातीधर्माच्या पलीकडचे आहे. कुलकर्णी काका मिल्ट्रीमन पंधरा वर्षाच्या सेवेनंतर कलेक्टर ऑफिसमध्ये क्लार्क आणि आमचे हे रजिस्टार ऑफिसमध्ये क्लार्क. दोघांची अगदी घट्ट मैत्री होती. काकांची गावाकडे शेती, घर होते. नोकरी संपल्यानंतर गावाकडे किंवा कोल्हापूरात त्यांना स्थायिक व्हायचं होतं. तिथून गावाकडच्या शेतीकडे लक्ष देता येईल, म्हणून ते जयसिंगपूरात भाड्याच्या घरी रहात होते. त्याचवेळी आम्ही बँकेचे कर्ज घेऊन सहा खोल्यांचे घर बांधले व तीन खोल्या भाड्याने द्यायचे ठरविले. अशाप्रकारे काकांची फॅमिली आमच्या घरात रहायला आली. मैत्री होतीच त्यात इतक्या जवळ रहायला आले त्यामुळे दुधात साखर पडली. दोघेजण ऑफिसला एका गाडीवरून जाऊ लागले. एकत्र खरेदी होऊ लागली. माझ्या सासूबाई व काकी एकत्र गप्पा मारत भाजी निवडू लागल्या. काकांच्या मुलीने स्मिताने आमच्या लेकीना अरमान व यास्मिन ला इतका लळा लावला की स्मिता परगांवी गेली की या दोघींना तिचा जोसरा काढून ताप येऊ लागला. काकांचा मुलगा स्वप्निल, पुतणे सचिन व सुयोग आमच्या मुलापेक्षा मोहसीनपेक्षा थोडे मोठे असल्याने आमच्या मुलांना  सायकलवरून शाळेत नेऊ आणू लागले. काकांना पाच बहिणी आहेत. त्या इकडे आल्या की आम्हाला भेटू लागल्या. त्यांच्याशीही आमची घट्ट मैत्री झाली. आमची दोन कुटुंबे एकरूप होऊन गेली.


       स्वातीकाकी पत्रद्वारा दासबोध अभ्यास करत होत्या. मी त्यांच्याकडे चौकशी केली व मलाही अभ्यास करता येईल का असे विचारले. काकी म्हणाल्या, "का नाही?, उलट तुमचं विशेष कौतुक होईल." त्यांच्यामुळे मी तीन वर्षाचा पत्रद्वारा दासबोध अभ्यास पूर्ण केला. भारतीय संस्कृती दर्शनाच्या काकींसमवेत परीक्षा दिल्या. काका आम्हा दोघींना चेष्टेने म्हणायचे, "तुम्ही दासबोध अभ्यास करून आम्हा दोघांना सज्जनगडावर पाठवू नका म्हणजे झाले."


       २००६ साली अयोध्येत बाबरी मशीद प्रकरण सुरु होते. नेमक्या त्याच वेळी बेंगलोरच्या आत्या व त्यांच्या मुली काकांकडे आल्या होत्या आणि दोन्ही कुटूंबाचे आमच्या अंगणात चांदणी भोजन सुरु होते. रस्त्याने जाणारे लोक म्हणत होते, "थोडा आदर्श घ्यावा या दोन्ही कुटुंबाचा आणि संपवून टाकावा तो वाद."


       रमजानमध्ये काका सत्ताविसावा रोजा करायचे. दिल्लीच्या जामा मशिदीत नमाज पडून आल्याचे अभिमानाने सांगायचे. काकी मोहरममध्ये पीराला नैवद्य व वस्त्र अर्पण करायच्या. काकांच्या तुळशीच्या लग्नाला आम्ही सहकुटुंब सहपरिवार आहेर घेऊन हजर असायचो. मंगळागौर, ऋषीपंचमी, चैत्रागौर या सर्व कार्यक्रमांना आमची हजेरी ठरलेली असायची. दोन्ही कुटुंबातील पै पाहुण्यांच्या घरातील मुंजीपासून लग्नापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांना आम्ही आवर्जून हजर रहायचो. अशा प्रकारे आमचं अनुभवविश्व समृद्ध व संपन्न  झालं.


       असे हे आमचे कुलकर्णी काका एकदा खूप आजारी पडले. ते आजारी असल्याचा फोन येताच आम्ही दोघे ताबडतोब दवाखान्यात हजर झालो. काकांंची तब्येत खूपच गंभीर होती. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते पण प्रतिसाद नव्हता. त्यांच्या किडनीचा प्रॉब्लेम होता. डॉक्टरांनी आशा सोडली होती. नातेवाईकांना बोलवून घ्या असं सांगितल्यानं त्यांच्या बहिणी, भाऊ, मेहुणे, भाचे, पुतणे सगळे सगळे हजर होते. जेवणाचे डबे असूनही दोन वाजून गेले तरी कुणी अन्नाचा कणही घेतला नव्हता. त्यांची अवस्था बघून दोघीतिघी नातेवाईक स्त्रिया पुढच्या म्हणजेच अंतिम तयारीसाठी घरी गेल्या. काकी पूर्ण खचून गेल्या होत्या. आम्हाला पाहिल्यावर त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्या गळ्यात पडून खूप रडल्या. त्यांना रडतांना बघून सर्वांनाच गलबलून येत होते. पेशंट बघायला आत कुणालाही जायला परवानगी नव्हती. त्यांचा डॉक्टर भाचा निरंजन फक्त त्यांच्याजवळ होता. आम्ही डॉक्टरांना खूप विनवलं व दोनच मिनिटासाठी आत जावून काकांना बघून आलो. विमनस्क मनःस्थितीत सगळेजण देवाचा धावा करत होते. असाच अर्धा तास निघून गेला. आणि काय आश्चर्य निरंजन हसतच बाहेर आला आणि म्हणाला, "मामा प्रतिसाद देताहेत. त्यांनी डोळे उघडले आहेत. ते पूर्ण शुद्धी वर आलेत. डॉक्टरांच्या संपलेल्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत."


       सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची बरसात झाली. आम्ही तिथे थांबलो व सर्वांना जेवण करण्यासाठी बाहेर पाठवलं. कदाचित आम्ही तिथे जाणं आणि काका बरं होणं हा निव्वळ योग असावा. डॉक्टरांच्या प्रयत्नाचं फळ असावं किंवा बोला फुलाला गाठ पडली असावी, ईश्वर अल्लाहची कृपा असावी. पण काकी म्हणाल्या, "मोहरम सुरू आहे. पीरबाबांसाठी आमच्यातर्फे वस्त्र घेऊन जा".


       असा हा जिव्हाळा अंतःकरणात रूजलेला मनात साठवून ठेवलेला.


शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ज्ञानलालसा


६ डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन त्यानिमित्त हा विशेष लेख

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ज्ञानलालसा

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       हजारो वर्षांपासून ज्यांचे न्याय हक्क दडपले जात होते, इतकेच काय पण त्यांना कुत्र्यामांजराएवढीही किंमत नव्हती, विद्याअध्ययनाचा हक्क नाकारल्याने जो समाज हजारो वर्षांपासून दारिद्र्याच्या विळख्यात सापडला होता, अशा अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजात डॉ बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञासूर्य उगवला.

       अस्पृश्य समाजाला वेदाभ्यास, विद्यार्जनापासून वंचित केल्याने काय खरे, काय खोटे, काय हितकारक, काय अहितकारक यातील भेद ओळखण्याची क्षमताच संपुष्टात आली होती. काही लोकांनी हजारो वर्षांपासून हिंदू धर्मग्रंथातील शास्त्रांचा आधार घेऊन अस्पृश्यांंना अज्ञानाच्या खाईत लोटले होते. पण दुसऱ्या बाजूला ते ग्रंथ अस्पृश्यांना वाचताच येऊ नये, याचीही खबरदारी त्यांनी नेहमी घेतली होती. अस्पृश्यांच्या अवनतीला दुसरे कांही नसून फक्त अज्ञानच जबाबदार आहे, त्यामुळेच त्यांच्या वाट्याला नरकतुल्य जीवन आले, हे बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखले होते. त्यासाठीच त्यांंनी आयुष्यभर शिक्षणाचा ध्यास घेतला. शिक्षण घेताना त्यांनी डोंगराएवढे कष्ट  उपसले.

       जेथे बसून मार्क्स, लेनिन, मँझिनी या लोकोत्तर पुरुषांनी संशोधनाचे कार्य केले, त्या लंडन म्युझियममध्ये बसून बाबासाहेब आंबेडकर अर्धपोटी राहून विद्याभ्यास करत असत. पैसे नसल्याने ते ग्रंथ मिळविण्यासाठी मैलोनमैल पायपीट करत. सर्वात आधी वाचनालयात प्रवेश केलेले आंबेडकर सर्वात शेवटी जेंव्हा बाहेर पडत तेंव्हा श्रमाने त्यांचे शरीर थकलेले असे, पण लिखाणाने टिपणवह्या भरलेल्या असत. रात्री दहा वाजल्यापासून पहाटेपर्यंत अभ्यास करण्याची त्यांना सवय होती. त्यांच्या खोलीत अस्नाडेकर नावाचे एक गृहस्थ राहात असत. ते कधी कधी रात्री जागे होत, तेंव्हा आंबेडकर अभ्यासात गढलेले असत. अशाच एका रात्री ते जागे झाले असता ते आंबेडकरांना म्हणाले, "अहो बाबासाहेब रात्र फार झाली. किती जागता दररोज? आता विश्रांती घ्या, झोपा." बाबासाहेब आंबेडकरांनी वळून म्हटले, "अन्नाला पैसा व झोपायला वेळ मजपाशी नाही. मला माझा अभ्यासक्रम शक्यतेवढा लवकर पूर्ण करायचा आहे, मग काय करणार." आंबेडकरांचा ज्ञान लालसेचा आग्रह किती जबरदस्त होता, याची आपल्याला कल्पना येते.

डॉ. आंबेडकर यांच्या जीवनात वेळेचे महत्त्व:
       माणसाच्या जीवनात वेळेला किती महत्त्व असते, याचा उत्तम पायंडा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिला आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात जेंव्हा संधीची लाट येते, तेंव्हा त्या संधीचा योग्य प्रकारे उपयोग त्याने केला, तर त्या मनुष्याला वैभव प्राप्त होते. या शेक्सपिअरच्या वचनाचा त्यांनी आपल्या जीवनात काटेकोरपणे उपयोग केला. त्यांच्याकडे सावधानता आणि संधीचा सदुपयोग करून घेण्याची वृत्ती होती.

       डॉ. आंबेडकर यांनी विचार कृतीत आणण्यासाठी, आपल्या अंगभूत गुणांचा आणि वृत्तीचा आपण उत्कर्ष केला पाहिजे, त्यासाठी अविश्रांत उद्योग करणे क्रमप्राप्त आहे, हे त्यांनी जाणले होते. म्हणून आपली सर्व शक्ती एकवटून अध्ययन करण्याचा निश्चय केला. मुख्य म्हणजे सुखविलासात रमणे हा त्यांचा स्थायीभाव नव्हता आणि तसे करूनही चालणार नव्हते. सामान्यतः प्रत्येक विश्वविद्यालयीन तरुण विद्यार्थ्याचा अशा सुखचैनीत, ऐदी जीवनात रमण्याचा कल अधिक असतो परंतु ध्येयनिष्ठ आंबेडकरांचे मन तशा जीवनास अनुकूल नव्हते. शिवाय पैसा तर जवळ नव्हताच. चित्रपट पाहावयास जाणे, नयनमनोहर सौंदर्यस्थळे पाहणे, उद्यानात बागडणे, यासारखे विचार त्यांच्या मनालासुदध्दा शिवले नाहीत. त्यांना सपाटून भूक लागे परंतु ती एक कप कॉफी, दोन केक यावरच शमवावी लागे. त्या जेवणाचा खर्च एक डॉलर दहा सेंटस् येई. शिष्यवृत्तीच्या पैशातून पत्नीला घरखर्चासाठी काही रक्कम पाठवावी लागे. यास्तव खर्च हात आखडून करावा लागे. ही परिस्थिती ज्या सहाध्यायीनी पाहिली, त्यांनी पुढे मोठ्या अभिमानाने सांगितले की आय मिळालेल्या संधीचा भरपूर लाभ घेण्यासाठी आंबेडकरांनी प्रत्येक क्षण सोन्याचा कण मानून अभ्यासासाठी व्यतीत केला. धनाचा प्रत्येक कण योग्य ठिकाणी लावला.

       आंबेडकरांचे ध्येय अमेरिकेतील मोठ्यात मोठी विश्वविद्यालयीन पदवी मिळविणे हेच केवळ नव्हते तर अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र आणि मानववंशशास्त्र इत्यादि विषयात पारंगत होण्याची प्रबळ महत्वाकांक्षा त्यांनी बाळगली होती.

       आंबेडकरांच्या मनावर तेथील एका प्राध्यापकाच्या व्यक्तत्वाची चांगलीच पकड बसली होती. त्यांचे नांव एडविन आर्. सेलिग्मन. त्या काळी अमेरिकेत असलेल्या लाला लजपतरायांचे ते स्नेही होते. लाला लजपतरायांची सेलिग्मनशी ओळख ब्रिटनमधील समाजवादी विचारवंत सिडने वेब यांच्या मुळे झाली होती. बदक जसे पाण्यापासून दूर राहात नाही, तसे आंबेडकर सेलिग्मनपासून दूर राहात नसत. ते त्यांच्या अनुमतीने प्रत्येक वर्गात ज्ञानकण वेचण्यासाठी धावत असत. संशोधनाची कोणती पद्धत आपण अनुसरावी, असे आंबेडकरांनी त्यांना एकदा विचारले. त्यावर सेलिग्मन यांनी त्यांना हितोपदेश केला की, तुम्ही आपले काम कळकळीने करत जा म्हणजे त्यातून तुमची स्वतःची पद्धत आपोआप निर्माण होईल. याचा जबरदस्त परिणाम आंबेडकरांच्या अंतर्मनावर झाला. तेंव्हापासून ते दररोज अठरा अठरा तास याप्रमाणे अनेक महिने अभ्यास करत होते. यावरून त्यांच्या ध्येयाचा ज्ञानकुंड कसा धगधगत होता याची प्रचिती येते. त्यांची प्रचंड मेहनत साऱ्या गरिबीवर नांगर फिरवणारी गोष्ट ठरली.

       भारतातील अस्पृश्यांसाठी आंबेडकरांनी काय केले, ते सांगण्याची गरज नसावी. बाबासाहेब आपल्या कोट्यावधी देशबांधवांच्या आयुष्यात नव्या युगाची सुरुवात करू शकले, कारण  अज्ञानाचा अंधकार नाहीसा करण्यासाठी त्यांच्या सारख्या तेजस्वी सूर्याची गरज होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला कोटी कोटी प्रणाम।

मंगळवार, १ डिसेंबर, २०२०

एड्स: एक जीवघेणा आजार - विशेष लेख


१ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन आहे, त्यानिमित्ताने विशेष लेख 👇


एड्स: एक जीवघेणा आजार - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       १९६० च्या दशकात आफ्रिकेत चिपांझीत एचआयव्ही एक आणि माकडात एचआयव्ही दोन विषाणू प्रथम आढळला आणि कांही दशकातच या महाभयंकर आजाराने सर्व जगालाच ग्रासून टाकले. लैंगिक शिक्षणाचा अभाव, चुकीची माहिती आणि गैरसमज यामुळेच एड्स वेगाने फोफावला असून केवळ जनसंपर्क, योग्य ते मार्गदर्शन, जागरूकता यातूनच एड्सवर नियंत्रण शक्य आहे. एड्सवर अजूनही प्रभावी औषध, लस निर्माण झाली नाही. त्यामुळे प्रामुख्याने विकसनशील देशापुढे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे एड्सची लागण झालेल्यांंमध्ये तरूणांची संख्या सर्वाधिक आहे. एका अनुमानानुसार भारतात दरवर्षी १९ ते २५ या वयोगटातील सुमारे तीन लाख तरुणांना एचआयव्ही ची लागण होत आहे आणि एका पिढीतून दुसऱ्या पिढीत याचे झपाट्याने संक्रमण होत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारी नुसार जगात २५ लाख लहान बालकांना जन्म घेतानाच या असाध्य रोगाचे शिकार व्हावे लागले आहे.


       अभ्यासकांनी व्यक्त केलेल्या मतानुसार भारतासारख्या विकसनशील देशात अज्ञान, दारिद्र्य, अशिक्षितपणा, अस्वच्छता या समस्येमुळे एचआयव्हीचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. हा रोग केवळ शहरापुरताच मर्यादित राहिलेला नसून खेड्यापाड्यापर्यंत सुद्धा पोहोचला आहे. तो केवळ धोकादायक वर्तणूक असलेल्या लोकांचाच प्रश्न राहिलेला नसून कितीतरी सुशिक्षित समुदायातील लोकांमध्ये पण एचआयव्ही चा संसर्ग झाल्याचे आढळून येत आहे. एड्स ही संपूर्ण जगाला भेडसावणारी केवळ आरोग्यविषयक समस्या नसून सामाजिक, आर्थिक व मानसिक समस्या बनली आहे. ज्या वेगाने एचआयव्ही चा प्रसार होतो, त्यामानाने प्रचार कमी पडत आहे. शासकीय स्तरावर एड्स प्रतिबंधासाठी चालू असलेल्या प्रयत्नांना जनतेचा पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही. या रोगाविषयी लोकांची मानसिकता व वैचारिक स्तर अभ्यासला असता सुशिक्षित लोक हे प्रतिष्ठेच्या चुकीच्या कल्पनेमुळे तर अशिक्षित लोक हे अज्ञानामुळे या रोगाच्या गांभीर्यापासून दूर रहात असल्याचे चित्र दिसत आहे. एड्स विषयी समाजाने स्विकारलेली भूमिका ही अर्धवट ज्ञानावर आधारित असल्याने व याविषयी मोकळेपणाने बोलण्याची तयारी नसल्याने एड्स समस्या कठीण बनली आहे.


       जगभरातील संशोधनातून स्पष्ट झाले आहे की, इतर कोणत्याही रोगापेक्षा कित्येक पट जास्त सामाजिक धिक्कार एड्स च्या रूग्णांच्या वाट्याला येतो. हा रोग केवळ लैंगिक संबधातून पसरत नसून इंजेक्शनद्वारे, ब्लडद्वारेही होऊ शकतो. हे लोकांच्या लक्षात येत नाही. लक्षात येते ते कारण म्हणजे चुकीच्या लैंगिक वर्तणुकीचे. त्यामुळे इतर रोगांपेक्षा जास्त नैराश्य, वैफल्य, घृणा, द्वेष, चिंता, ताण एड्समुळे निर्माण होतो. विशेष म्हणजे रूग्णांंबरोबर इतरांनाही अवहेलनेला सामोरे जावे लागते. एड्सपीडित कुटुंबाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोनच बदलतो. प्रत्येक घरातून अशा व्यक्तीला अस्पृश्यतेची वागणूक मिळते. एड्सने मरण पावलेल्या तरूण व्यक्तीच्या पश्चात कुटुंबाची अवस्था दयनीय होते. वृद्ध आईवडील केवळ दैवावर भरवसा ठेवून आलेला दिवस पुढे ढकलतात. एड्स पीडितांच्या विधवांना उर्वरित आयुष्य कसे जगायचे याचा मार्गच सापडत नाही. या दांपत्याच्या पोटी जन्म घेणाऱ्या बालकांना जन्म घेतानाच असाध्य अशा या रोगाला बळी पडावे लागते. मुले लहान असतानाच त्यांचे आईवडील दगावतात. या अनाथ मुलांना बालसुधारगृहातही थारा मिळत नाही. इतर नातेवाईक ढुंकूनही पहात नाहीत. संपूर्ण मानवजातीलाच मान खाली लावणारी ही गोष्ट आहे.


       एड्सची साथ ही मानवी वर्तनाशी निगडीत आहे म्हणूनच साथ आटोक्यात आणणेही सर्वस्वी माणसाच्या इच्छाशक्तीवर व प्रयत्नांवर अवलंबून आहे. लैंगिक संबंध सुरक्षित कसे राहतील यावर लक्ष केंद्रित केले तर ते जास्त यशस्वी ठरेल, असे अनेक तज्ञांचे मत आहे. या रोगाकडे शरीर वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघायला हवे. तरूण वर्ग हा देशाचा आधारस्तंभ मानला जातो. त्यांना  या रोगांपासून अगोदरच सावध करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्याकरीता संस्कार शिबीरे आयोजित करायला हवीत. या शिबीरांच्या माध्यमातून लैंगिक शिक्षण व एड्स या दोहोंचीही माहिती देण्यात यावी. एड्सवर औषध जरी नसले तरी समाजाने, कुटुंबाने अशा रूग्णांना मानसिक आधार देण्याची गरज आहे. केवळ मायेचा आधारच अशा रुग्णांना जगण्याची उभारी देवू शकतो आणि यातूनच कुटुंब व्यवस्थेला बसलेल्या धक्क्यातून थोड्याफार प्रमाणात मार्ग निघण्यास मदत होणार आहे. तेंव्हा प्रत्येकाने एड्स विरुध्दचा लढा हे आपले आद्य कर्तव्य समजून त्याला सर्वाधिक प्राधान्य द्यावे. प्रसारमाध्यमांनी यासाठी दररोज खास वेळ जनजागरणांसाठी राखून ठेवावा. एड्स बाबतच्या स्थानिक व जागतिक बातम्यांना ठळक स्वरूपात स्थान द्यावे. असे प्रयत्न झाले तरच एड्स निर्मूलन शक्य आहे.