शनिवार, ३० एप्रिल, २०२२

श्रीमंत म्हणावे त्याला - मराठी कविता


 श्रीमंत म्हणावे त्याला - मराठी कविता

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


जीवन ही संधी वाटे ज्याला

श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।


घरी खातो भाजी, पालेभाजी

फळेही खातो ताजी ताजी

दूध, दही, ताक रोज मिळे ज्याला।

श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।


ज्याच्या अंगणी झाडे डुलती

वेलीवरती नित्य फुले उमलती

ऑक्सिजन पुरेसा मिळे ज्याला ।

श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।


पाहुणे रावळे येती दारी

तृप्त होऊनी जाती माघारी

यामुळे आनंद मिळे ज्याला ।

श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।


ज्याची सकला होते आठवण

करी जो मायेची साठवण

परोपकारे मिळते सुख ज्याला ।

श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।


प्रातःकाळी जो लवकर उठतो

योगा नि प्राणायाम करतो

निरोगी जीवन लाभते ज्याला ।

श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।


घरी ज्याच्या लडिवाळ

तान्हत्याच्यासवे जगावे वाटे पुन्हा

त्याच्याशी खेळायला जमते ज्याला ।

श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।


स्वतः जो दिलखुलास हसतो

आणि दुसऱ्यालाही हसवतो

सदा समाधानी रहाणे जमते ज्याला।

श्रीमंत आहे म्हणावे त्याला ।