शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

मराठी लघुकथा संच - ४

 

मराठी लघुकथा संच - ४


लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



लघुकथा क्रमांक - १६


    जयश्री आणि विमल दोघी डी.एड्. कॉलेजच्या मैत्रिणी. एकाच शिक्षण मंडळात नोकरीस लागल्या. विमल मॅडमना जी शाळा मिळाली, ती सुशिक्षित लोक असलेल्या वस्तीतील होती. पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती चांगली होती. याउलट जयश्री मॅडमना जी शाळा मिळाली ती झोपडपट्टी वस्तीतील. विद्यार्थी नियमित शाळेत येत नव्हते. एक दिवस शाळा तपासणी अधिकारी जयश्री मॅमच्या वर्गात आले व म्हणाले, "काय हे मॅडम, त्या अमक्या शाळेत एक नविन मॅडम आल्या आहेत, त्यांचा वर्ग बघा, त्यांच्यापासून कांहीतरी शिका जरा." जयश्री मॅमना फार दुःख झाले. कारण त्या खूप प्रयत्न करत होत्या. पुढच्या वर्षी विमल मॅमची बदली जयश्री मॅमच्या शाळेत झाली. विमल मॅम आजारी रजेवर असताना ते साहेब विमल मॅमच्या वर्गाची तपासणी घेऊ लागले व म्हणाले, "हा कुणाचा वर्ग आहे? एवढा कच्चा. जयश्री मॅम म्हणाल्या, "तुम्ही गेल्यावर्षी माझ्यासमोर फार कौतुक केलंत ना त्या विमल मॅमचा!" साहेब गप्पच बसले.


लघुकथा क्रमांक - १७


     कोविड  सेंटरमधील कोरोनाबाधित रूग्णांना फोन करून चौकशी करायची जबाबदारी कांही उत्साही शिक्षकांवर सोपविण्यात आली होती. शिक्षकांनी पेशंटला फोनवर विचारले, "कसे आहात तुम्ही, जेवणखाण चांगले मिळते का, वेळेवर मिळते का, सर्व सुविधा आहेत का तिथे?" पेशंट  म्हणाला, "सर्व सुखसोयी आहेत इथे, जेवण वेळेवर व चांगले मिळत आहे, हे चौदा दिवस कधीच संपू नये असं वाटतय. तुम्हाला सांगतो, घरात दररोज हे आणा, ते आणा ही कटकट असते. खिशात पैसे नसतानाही या 'आणा' च्या कटकटीने जीव मेटाकुटीला आला आहे. इथं आपलं बरं आहे. कांहीही आणून न देता निवांत खायला मिळतय. मी कोरोनाचे आभार मानतो."


लघुकथा क्रमांक - १८


   अरूणराव व त्यांच्या पत्नी अनघा दोन महिन्यांंसाठी लेकीकडे स्कॉटलंडला गेले. ते परत येणार होते, तोपर्यंत कोरोनाचा कहर सुरु झाला. लॉकडाऊनमुळे विमान सेवा बंद झाली. त्यांना मायदेशी येण्याची, घरच्या लोकांना भेटण्याची तीव्र इच्छा होती पण त्यांचा नाईलाज झाला. शेवटी दोन महिन्यांनंतर ते परत आले. त्यांना होम क्वारंटाइन केले. त्यांनी येण्यापूर्वीच मुलाला फॅमिलीसह गांवी निघून जायला सांगितले. पण आईवडिलांना भेटण्यासाठी तो घरी राहिला. अरूणरावांची गाडी दारात आली, त्यांनी मुलांना पाहिले व भावना बाजूला ठेवून सांगितले, "तू बाहेर पडल्याशिवाय आम्ही आत येणार नाही." मुलाच्या आणि सुनेच्या डोळ्यातून अश्रूधारा ओघळत होत्या, नातवंडांनी आजोबा आजी म्हणत जोरात टाहो फोडला  होता. पण त्यांनी मोह टाळला. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हेच खरे!


लघुकथा क्रमांक - १९


    अंजलीचे शिक्षण पूर्ण होताच नोकरी लागली. अभ्यासामुळे घरातील संपूर्ण स्वयंपाक करण्याची जबाबदारी तिच्यावर कधी पडली नाही. तशी ती आई आजीला स्वयंपाकात अधूनमधून मदत करायची, पण पूर्ण स्वयंपाक येत नव्हता. तिच्या लग्नाचा योगही लवकर जुळून आला. त्यामुळे ती पूर्ण स्वयंपाक करताना गोंधळून जायची. तिच्या नोकरीच्या गांवी तिचे मिस्टर दोन दिवस सुट्टी असल्याने गेले. त्यावेळी दोघांच्या पूर्ण स्वयंपाकाची जबाबदारी तिच्यावर पडली. जावई परत येताना वाटेवरच असलेल्या सासुरवाडीत आले. सासूबाई नी त्यांना विचारले, "अंजलीने स्वयंपाक केला का व्यवस्थित?" जावई म्हणाले, "खाण्यालायक केला होता, चवीचं नंतर बघू."


लघुकथा क्रमांक - २०


    गीताच्या घरी तिला पहाण्यासाठी पाहुणे आले. मुलाबरोबर त्याचे आई वडील, काका काकूही असतात. नवरदेव मोबाईलवर गेम खेळण्यात गुंग झालेले  असतात. गीता पोह्यांच्या डीशचा ट्रे घेऊन आली. तिने डीश टीपॉयवर  ठेवली व आत निघून गेली. काकांनी नवरदेवाला हळूच विचारले, "काय कशी वाटली मुलगी पसंत आहे का?" नवरदेव म्हणाले, "अजून मुलगी बघण्याचा कार्यक्रम कुठे झालाय?" काका म्हणाले, "अरे मघाशी मुलगी पोहे घेऊन आली होती." नंतर त्या दोघांना एकमेकांशी बोलण्यासाठी वेळ दिला गेला. गीता म्हणाली, "प्रथम मोबाईल बंद करून ठेवा आणि ऐका मी काय म्हणते. लग्नानंतर मोबाईलवर गेम खेळणार नसाल तर माझ्याकडून होकार आहे." 


२ टिप्पण्या: