शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

आजचे शिक्षण व आजच्या समस्या - विशेष मराठी लेख

 

आजचे शिक्षण व आजच्या समस्या

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: pixabay.com

     शिक्षण हे विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचे महत्वाचे साधन आहे. या संस्कारामुळेच राष्ट्र उभारणीसाठी आदर्श नागरिकांची जडण-घडण होऊ शकते. महात्मा गांधी शिक्षणाचा उल्लेख क्रांतीचे मूळ साधन असा करीत. शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन अनेक महान समाजसुधारकांनी घराच्या चुलीपर्यंत शिक्षण पोहचवलं ही अत्यंत चांगली गोष्ट. पण शिक्षणाने जगण्याचे धैर्य निर्माण होण्यापेक्षा जगणे दुभंगणे सुरू झाले आहे ही प्रक्रिया इतकी प्रखर आहे की पुढची पिढीच्या पिढीच दुभंगलेली, संस्कारहीन दिसत आहे. त्यामुळे जगण्यातील आनंदाला आपण पारखे झालो आहोत शिक्षणाविषयीनी अनास्था विकोपाला जात आहे. आज 

'थोडे शिकलेला काम सोडतो

अधिक शिकलेला गाव सोडतो

त्याहून अधिक शिकलेला देश सोडतो.'


हीच आजच्या शिक्षणाची समस्या नव्हे शोकांतिका आहे.


     विनाअनुदान संस्कृती गाजरगवता सारखी पसरत चाललीय. ५-१० लाखांची देणगी देऊन येथील लक्ष्मीपुत्र पदवीधर होऊन सुखाने नांदतात. या नव्या वाटेवर नवे-नवे शिक्षणसम्राट स्वार झाले आहेत. शिक्षणक्षेत्रात श्रीमंतीचा डोळे दिपवणारा झगमगाट दिसत आहे. गुंतवणूक करा आणि पीक घ्या हेच सूत्र शिक्षण संस्थात दिसत आहे. 


     भरतीसाठी ५० हजार मोजणारा फौजदार, लाखो रुपये देऊन पदवी घेतलेला डॉक्टर किंवा इंजिनिअर. अशा डॉक्टरचे पेशंट सुखाने चिरनिद्रा घेतात व अशा इंजिनिअरने बांधलेले पुल उद्घाटनाआधीच कोसळतात.


शाळा उदंड पण ज्ञान?

       पूर्वी शाळांना मंजुरी मिळविण्यासाठी खूप कष्ट करावे लागत असत. कारण मंजुरीनंतर शाळांना अनुदान देण्याची जबाबदारी शासनावर असे. आता आर्थिक जबाबदारीतून शासन मुक्त झाले आहे. शिक्षणाचा प्रसार वाढावा, शंभर टक्के साक्षर होऊन राज्याचा विकास व्हावा हे शासनाचे स्वप्न रास्त आहे. शाळांची संख्या वाढविणे चांगले असले तरी या शाळा कशा चालतील? त्यांचा दर्जा कसा असेल? तेथे ज्ञान कितपत मिळेल? याचा विचार करणेही क्रमप्राप्त आहे.


       शहरात दरवर्षी शाळा प्रवेशाचा प्रश्न गंभीर होतो आहे. देणग्यांचे गाठोडे डोक्यावर घेऊन फिरले तरी प्रवेश मिळत नाही. शाळा प्रवेशासाठी गर्दी होते हे वास्तव आहे पण कोणत्या शाळासाठी गर्दी होते? खासगी शाळामध्ये प्रवेशासाठी रांगा लागतात. तर विद्यार्थ्यांअभावी नगरपालिकांच्या चार दोन शाळा बंद पडतात. हे कशाचे द्योतक आहे? गेल्या कांही वर्षात शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात व्यावसायिकरण होऊ लागले आहे. नगदी पीक घ्यावे, एखादा ताजा पैसा देणारा उद्योगधंदा सुरू करावा त्याप्रमाणे शाळा सुरू करण्यास अनेकजण पुढे सरसावत आहेत. विनाअनुदान तत्वावरील शाळेतील कर्मचाऱ्यांची स्थिती मजुरापेक्षा, वेठबिगारीपेक्षा वाईट आहे. वेतनाची हमी नाही. सेवेची हमी नाही. तर शिक्षणाची गुणवत्ता वाढणार कशी?


शिक्षणाचा जीवनाशी, व्यवहाराशी संबंध हवा:

       २० व्या व २१व्या शतकात ज्ञानाचा विस्फोट झाला. विज्ञान-तंत्रज्ञानाने गरूडझेप घेतली. आपले स्वयंपाक घरसुद्धा आधुनिक झाले. मिक्सर, ग्राइंडर, फ्रीज या वस्तू आल्या. फार कशाला घरामध्ये २०-२५ प्रकारचे चमचे आले. पण जोड्या जुळवा व गाळलेले शब्द भरा या प्रश्नांचे स्वरुप बदलले नाही.


       'आई' कवितेचा अभ्यास करून विद्यार्थी ५ पैकी ५ मार्कस् मिळवितात. 'माझी आई' निबंध लिहून निबंधाचे मार्कस् मिळवितात. पण प्रत्यक्ष जीवनात आईवर प्रेम करतातच असे नाही. एका विद्यार्थ्याने (डी. एड.) च्या आपल्या मार्गदर्शकाना विचारले, 'सर ही कविता कोणत्या पद्धतीने शिकवू' सर म्हणाले, 'तू कोणत्याही पद्धतीने शिकव पण ही कविता शिकल्यावर तुमच्या विद्यार्थ्याने आईला शिव्या देता कामा नये.' या उत्तरात प्रत्यक्ष जीवन व शिक्षण यांचा संबंध दिसतो.


     परिक्षेत नापास झालेली व्यक्ती जीवनात आपल्या कार्याने अमर होते. विद्यार्थ्यांचे मार्कलिस्ट खिशात असते. पण शिक्षणाने विकसित झालेले त्याचे व्यक्तिमत्व जीवन यशस्वी करते.


       इतिहास हा विषय घेऊन पी. एच. डी. झालेल्या विद्यार्थ्यांना रात्रीच्या काळोखात घराबाहेर पडण्याची भीती वाटते. गणित विषय घेऊन बी. एस्सी. झालेला विद्यार्थी दुधाचे मासिक बिल कॅल्क्युलेटर शिवाय करू शकत नाही. कृषी महाविद्यालयातून पदवीधर एका शेतात जाऊन म्हणतो, मिरचीचे पीक चांगले आहे पण तुम्ही लाल मिरचीचे पीक घ्यायला हवे होते. मिरची पिकल्यावर लाल होते हे त्याला माहीत नसते. 'हीच आजच्या शिक्षणाची समस्या.'


जीवनमूल्यांचा ऱ्हास - एक शिक्षण समस्या:

       आजच्या विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य परीक्षा पद्धतीने बिघडले आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर परीक्षेचे ओझे लादले जाते. त्याच्या मानसिक, भावनिक गरजांचा विचार केला जात नाही. म्हणूनच १० वी १२ वी चा निकाल जाहीर झाल्यावर किंवा जाहीर होण्यापूर्वीच कित्येक विद्यार्थी आत्महत्या करतात. 

       

       खरे पाहता आठव्या वर्षी डोळ्यांची पूर्ण वाढ व विकास होतो. आपण त्याला ४ थ्या वर्षापासून अक्षरे गिरवायला लावतो आहोत. त्यामुळे चष्मा लावलेली, बालपणीच आंधळी झालेली पिढी तयार करण्याचे महान सत्कार्य आपण करत आहोत.


       गुणवत्ता यादीत आलेली मुले मोठ्या पगाराच्या मागे लागून परदेशात रममाण होतात. पण ३५ टक्के गुण मिळविणारे कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षणाची गंगोत्री गोरगरिबांच्यापर्यंत नेऊन सोडतात. चौथी पास असलेले वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होऊन महाराष्ट्राचा विकास करतात. ही उदाहरणे कशाची द्योतक आहेत?


      एक गाढवीन मरून पडल्यावर तिचे पिलू ४ दिवस आईभोवती अन्न-पाणी न घेता घोटाळत राहते. प्राण्याजवळ ममता आहे. पण उच्चशिक्षित माणसाला आईला अग्नी देण्यासही हजर राहता येत नाही. त्याची तार येते; कार्य उरकून घ्या मला रजा मिळाल्यावर येत आहे. आई-वडिलांना वृध्दाश्रमात पाठवण्यात धन्यता मानणारे आपण पहातो. तेंव्हा वाटते 'हेच फळ काय आजच्या शिक्षणाला? असे का होते?' सहा-सहा महिने मुलाला न भेटणारे बाप, स्वत:चे सौंदर्य कमी होते म्हणून मुलाला अंगावर न पाजणारी आई, मुलाकडून काय अपेक्षा ठेवणार?


इंग्रजी - एक आव्हान

     महाराष्ट्र शासनाने चालू वर्षी ६५० नव्या शाळांना परवानगी दिली असून त्यापैकी ३५० नव्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. ही स्थिती प्रादेशिक भाषा विकासाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. इंग्रजी हवी पण प्रादेशिक भाषेचा बळी देऊन नको.


    महाराष्ट्र शासनाने ६५,००० शाळांत पहिलीपासून इंग्रजी सुरू करून नवे धाडस केले आहे. इंग्रजीची ही घोडदौड व अनिवार्यता विचार करण्यासारखी आहे. सर्व भारतभर भाषाविषयक धोरण व प्रत्येक भाषेचे प्रांतशः महत्व यांचा विचार करून कांही निर्णय घेणे गरजेचे आहे. प्रत्येक भाषेचे भावविश्व भिन्न असते. कोणत्या भाषेच्या भावविश्वात उगवत्या पिढीला घडवावयाचे ते आता पालकांनी व चालकानी ठरविले पाहिजे. कारण मातृभाषा हेच माध्यम शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त असते. त्या भाषेतून मिळालेले शिक्षण, श्रवण, लेखन, वाचन व संभाषण तसेच आकलन व अविष्कार शक्ती वाढविण्यास नैसर्गिकरित्या उपयोगी ठरते.

'मातृभाषेण शिक्षितम्,

मातृहस्तेन् भोजनम्।'

       हेच तत्व खरे आहे. गेली १५० वर्षे आपल्या शिक्षणावर इंग्रजीचा प्रभाव आहे. तो ब्रिटीशांच्या मेकॉले शिक्षण पद्धतीमुळेच होय. ही अनिवार्यता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत राष्ट्रीय अस्मिता व भाषा विकास अशक्य आहे. १४ वर्षे इंग्रजीचा अभ्यास करूनही विद्यार्थी धड इंग्रजी वाचू शकत नाही की लिहू शकत नाही. संभाषण करणे दूरच.


पहिलीपासून इंग्रजी-प्रयोग व समस्या:

       आज पहिली ते चौथी इंग्रजी हा प्रयोग अंतीम टप्प्यात आला आहे. ६५,००० शाळांतील २ लाख शिक्षक प्रशिक्षित झाले आहेत. सर्वसामान्यपणे गरीब विद्यार्थ्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळा परवडत नाहीत म्हणून तो ओघ प्राथमिक शाळांकडे वळविण्याचा शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. परंतु त्यातील त्रुटी ३ वर्षात शिक्षक व पालक यांना जाणवू लागल्या आहेत. अपुरा व तज्ज्ञ शिक्षकवर्ग हे शाळांचे मुख्य दुखणे आहे. १२ वी नंतर डी. एड्. झालेला शिक्षक प्राथमिक शाळात इंग्रजी शिकवितो. २० ते २५ वर्षे १ ते ४ या इयत्तांवर इंग्रजी सोडून बाकीचे विषय शिकविणारा शिक्षक ६ दिवसांचे प्रशिक्षण घेऊन इंग्रजी अध्यापनास सक्षम होऊ शकेल का?


     याबाबतीत एक उदाहरण सांगावेसे वाटते. जुजबी इंग्रजी शिकून पहिलीच्या मुलाना इंग्रजी शिकविण्यास एक शिक्षक तयार झाला. त्याने मुलाला ऑर्डर दिली 'हँंडस् अप्' मुलांनी हात वर केले. नंतर ऑर्डर दिली 'स्टँड अप' मुले हात वर करूनच उभी राहिली. शिक्षकानी पुन्हा 'सीट डाऊन्' अशी ऑर्डर दिली. मुले हात वर करूनच खाली बसली व म्हणाली, 'गुरुजी हात खाली घ्यायला सांगा की.' इंग्रजीत गुरुजींना 'हँड डाऊन' ही ऑर्डर आठवली नाही. ते म्हणाले, 'घ्या रे हात खाली.'


     जोपर्यंत शाळेच्या भौतिक सुविधा, शाळेला पुरेशी इमारत, प्रसन्न इमारत, तज्ज्ञ शिक्षक पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत तोपर्यंत प्राथमिक मराठी शाळातील इंग्रजी सुधारणार नाही. सर्व शिक्षा अभियान, निरंतर साक्षरता योजना यावर प्रचंड खर्च होत आहे. पण शाळांच्या किमान भौतिक सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे.


सदोष शिक्षण पद्धती:

       आजची शिक्षण पद्धती सदोष आहे. कारण शाळा-कॉलेजमधून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षणातून कोणतीही प्रेरणा मिळत नाही. कोणत्याही प्रकारे वर्षाचा पोर्शन पूर्ण करणे हेच शिक्षकाचे ध्येय असते. मुलांमधील सर्जनशीलता जाणून घेण्याची, तिला प्रोत्साहन देण्याची त्यांची तयारीही नसते. किंबहुना ते करायला त्यांच्यापाशी तितका वेळही नसतो. सहाजिकच विद्यार्थ्यांना शिक्षणात रस वाटत नाही. त्यांच्यासाठी शिक्षण हा प्रकारच कंटाळवाणा बनतो. परीक्षा या प्रकाराने तर सर्वच विद्यार्थी गर्भगळीत होतात. परीक्षा जणू जीवनाची सत्वपरीक्षा आहे अशा थाटात विद्यार्थी व त्यांचे पालक परीक्षेचे दडपण घेऊन वागत असतात. परीक्षेतील गुण हीच सर्वांची चिंता असते. परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नाहीत तर आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. वर्षभर ग्रहण केलेले ज्ञान तीन तासामध्ये प्रगट करणे. पोपटपंची करून अधिक गुण मिळवावेत हेच शिक्षणाचे ध्येय झाले आहे.


     शिक्षणातून सुजाण व सुसंस्कारीत नागरीक निर्माण व्हावेत असे महात्मा गांधी यांंनी म्हटले आहे. पण आजची सामाजिक परिस्थिती पाहता शिक्षणातून काय निर्माण होत आहे? बाँब हल्ले, जातिय दंगे-धोपे, मारामाऱ्या, खून-दरोडे, भ्रष्टाचार आणि व्यसनाने ग्रासलेला नागरिक! हीच आजच्या शिक्षणाची महत्वपूर्ण समस्या आहे.


अती महत्वाकांक्षी पालक:

       बऱ्याचदा पालक स्वत:च्या अपेक्षा मुलांवर लादतात. अतिमहत्वाकांक्षी पालक ही आजच्या मुलांची खरी चिंता आहे. शाळांमध्ये मुक्तपणे वावरू न देणाऱ्या या पालकांचे दडपण मुलांवर सतत असते. आपल्या मुलाची बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता जाणून घेऊन त्याला त्यामध्ये मदत करा.


       सर्वांनी डॉक्टर व इंजिनिअर होऊन समाजाच्या गरजाही पूर्ण होणार नाहीत. आज नोकरी मागत फिरणाऱ्या पदवीधरांंपेक्षा नोकऱ्या निर्माण करणाऱ्या उद्योजकांची निर्मिती होणे ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने आजच्या विद्यार्थ्यांना नुसते डोक्याला चालना देणारे शिक्षण देऊन चालणार नाही तर त्या डोक्याबरोबर पोटाचाही विचार होणे आवश्यक आहे.


       याकरिता उदाहरण द्यायचे झाले तर आजचा बी. ई. मेकॅनिकल झालेला विद्यार्थी घरातील स्टोव्ह करू शकत नाही. इलेक्ट्रिक इंजिनिअर घरात लाईटची फ्युज गेली तर जोडू शकत नाही हा 'पुस्तकी शिक्षण' पद्धतीचा दोष आहे.


       विद्यार्थ्यांना क्रियाशील, सृजनशील बनविणारे शिक्षण आपल्याकडे दिले जात नाहीत. जपानमध्ये कार्यानुभवाच्या तासाला प्राथमिक शाळेतील मुले इलेक्ट्रॉनिक्स घड्याळे तयार करतात. आपल्या देशात आजही कागदापासून होड्या, आकाशदिवा व चटया तयार करण्यापलिकडे कार्यानुभव नसतो. शिक्षणाचा व कार्यानुभवाचा संबंध आला पाहिजे. केवळ पुस्तकी शिक्षण ही शिक्षणाची समस्या आहे.


महत्वाच्या समस्या - (शिक्षणातील):

दारिद्र्य : कितीतरी बुद्धिमान विद्यार्थ्यांना दारिद्र्यामुळे शिक्षण घेता येत नाही. भाकरीच्या शोधात भटकणारे पालक आपल्या मुलाला इच्छा असूनही शिक्षण देवू शकत नाहीत.


बेकारी : पदव्यांचे भेंडोळे घेवून नोकरीच्या शोधात फिरणारे सुशिक्षित बेकार पाहिल्यावर इतरांना वाटते शिकून तरी काय उपयोग? शिकून नोकरी नाही, व्यवसायाला भांडवल नाही, जीवनात अनुभूती नाही अशी स्थिती झाल्यामुळे शिक्षणापासून आजची पिढी दूर जात आहे. 


अज्ञान व अंधश्रद्धा : आजही आपला समाज अज्ञान व अंधश्रद्धेने ग्रासला आहे. परवाच संथाल जमातीतील एका मुलीचे कुत्र्याशी लग्न लावण्यात आले. एकीकडे प्रगतीच्या दिशेने जाणारा समाज तर दुसरीकडे कमालीचे अज्ञान व अंधश्रद्धा.


स्त्री पुरुष भेदभाव : कांही ठिकाणी अजूनही मुलींना शिक्षण देण्यास पालक नाखूष असतात. मुलगी म्हणजे परक्याचे धन असे समजून तिच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते.


पुस्तकी शिक्षण : आजच्या अभ्यासक्रमातून मुलांची फक्त बौद्धिक क्षमता, स्मरणशक्ती इ. ची परीक्षा होते. सर्वच क्षेत्रात टक्केवारीला महत्व दिले जात आहेत. कृतिशीलता, सृजनशीलता या गुणांचा विकास होण्यासाठी जे शिक्षण मिळते त्या शिक्षणाचा जीवनात उपयोग होतो. केवळ पुस्तकी शिक्षण, सदोष परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थी निराश, क्रीयाहीन होत आहे. बालवाडीला प्रवेश घेतानाच तो डोनेशन देतो. म्हणजे शिक्षणाचा पायाच वशिल्याने भरला जात आहे.


शिक्षकांना अशैक्षणिक कामे : आज जर आपण पाहिले तर शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे लावली जातात. त्यामुळे शिक्षकांचा बराच वेळ यामध्ये खर्च होतो. जनगणना, निवडणूक, सर्वेक्षण इ. कामांमुळे शिक्षकांना वर्गात शिकवण्यासाठी वेळच मिळत नाही.


समारोप : आजचे शिक्षण व समस्या या व्यापक विषयावर खूप लिहावे लागेल. कारण आज शिक्षण देणारा शिक्षक भाकरी आणि प्रतिष्ठा या दोन्ही प्रश्नात अडकतो आहे. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी खाजगी क्लासेस घेण्यापासून ते प्रश्नपत्रिका फोडण्यापर्यंत बरेच काही करू लागला आहे. भरमसाठ देणग्या देवून शिक्षकी पेशाचे शिक्षण घेणाऱ्या व नोकरी लागणाऱ्या शिक्षकांस नोकरी मिळाली आहे. नोकरीमुळे अशा शिक्षकांस चेहरा लागला आहे. पण त्याचा आत्मा हरवला आहे.


सारांश: जीवनाला कसलीच दिशा व गती न देणारे शिक्षण आता मिळत आहे. विद्यार्थी मार्कस् व टक्केवारीच्या मागे तर पालक मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनविण्याच्या चक्रात फिरत आहेत. शिक्षणाचे व्यापारीकरण झाले आहे.

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते

संस्थाचालक मोठे झाले

शिक्षणप्रेमी सुस्तावले

शिक्षणाच्या राज्यात

ज्ञान मात्र कंगाल झाले

शिक्षणानं पदवी मिळाली

पण संस्काराची कळी सुकून गेली.


साप्ताहिक शिक्षक समाचार मध्ये प्रकाशित लेख


सूज्ञ वाचकांच्या प्रतिक्रिया



सर्वोदय शिक्षक शैक्षणिक संस्था गगनबावडा जिल्हा कोल्हापूर आयोजित जिल्हास्तरीय शिक्षकांच्या निबंध स्पर्धेत सदर निबंधास प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे त्याची ट्रॉफी.


४ टिप्पण्या:

  1. आजच्या परिस्थितीत बदल झालेल्या सामाजिक सांस्कृतिक स्थितीवर प्रकाश टाकणारा लेख.......

    उत्तर द्याहटवा
  2. आपला हा लेख खूप छान होता , आवडला ...
    कृपया मला या लेख ची सॉफ्ट कॉपी मिळेल काय ?

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय सुंदर लेख.सत्य परीस्थीतीवर प्रकाश टाकणारा.

    उत्तर द्याहटवा