आत्मकथन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आत्मकथन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३

नवस विशाळगडचा - आत्मकथन भाग ७

 

नवस विशाळगडचा - आत्मकथन भाग ७

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गुगल


       माझ्या भाबड्या, श्रध्दाळू व सदाचरणी आजीने व आईने माझ्यासाठी व भैय्यासाठी विशाळगडच्या मलिक रेहानबाबा पीरांना नवस केला होता. त्या पीरांना बोलल्या होत्या की या दोघांना नोकरी लागू दे तुझ्या दरबारात या दोघांना पाठवीन. भैय्याला डी. एड्. होऊन दोन वर्षे होऊन गेली होती. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने तो मिळेल ती शेताची कामे करत होता. डी. एड्. झाल्यावर सहा महिन्यानंतर मला जयसिंगपूर शिक्षण मंडळात नोकरी लागली. पण असून खोळंबा नसून घोटाळा अशी स्थिती झाली होती. नोकरी पूर्णपणे हंगामी असल्याने वारंवार ब्रेक मिळत होता. दिवाळीची सुट्टी संपून शाळा सुरू झाल्यानंतर ऑर्डर मिळायची. तीस एप्रिलला ब्रेक मिळायचा. मे महिन्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाली की ३१ जुलैचा पट पाहून १५ ऑगस्टला ऑर्डर मिळायची तेही पट सुरेसा असेल तर! त्यामुळे माझी ससेहोलपट सुरू होती. भैय्या चांगली मजुरी व वैरणही मिळते म्हणून ऊस तोडायला जात होता.


       या बिकट परिस्थितीत आजीबाईला वाटायचे नातवाला नोकरी नाही, नातीलाही कायम नोकरी लागेनाशी झाली आहे नवस फेडला नाही म्हणून हा त्रास होत आहे. मला तात्पुरती नोकरी लागली म्हणून नवस फेडायचा असा विचार सुरू झाला, पण गाडी खर्चासाठी पैशाची जुळणी होणे अवघड होते. त्याचवेळी भैय्याचा ऊस तोडणीचा पगार मिळाला. गाडी खर्चासाठी किती रूपये लागतील याचा अंदाज घेतला व मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विशाळगडला जाण्याचा बेत निश्चित झाला. गाडी खर्च वाचविण्यासाठी खोचीपर्यंत चालत जाऊन एस. टी. बस धरण्याचे ठरले. हे अंतर सुमारे आठ किलोमीटर आहे. ठरल्याप्रमाणे पहाटे लवकर उठून शिदोरीसह खोची या गावापर्यंत चालत गेलो. कोल्हापूरला जाणारी बस मिळाली. वडगाव स्टँडवर बस थांबली. भैय्याने ३० पैशाला मिळणारा सत्यवादी पेपर विकत घेतला. पेपर वाचायला मिळणे ही त्यावेळी मोठी संधी वाटायची. ड्रायव्हर केबिनच्या समोरच्या सीटवर आम्ही बसलो होतो. पांढराशुभ्र सदरा-धोतर त्यावर काळा कोट व टोपी असा पोशाख केलेले वयस्क सुशिक्षित गृहस्थ बसमध्ये चढले व आमच्या समोरच्या सीटवर बसले. त्यांनी खिडकीतून बाहेर डोकावून पेपरवाल्याला बोलवले. तो खिडकीजवळ आला व बस चालू झाली. त्यांना पेपर घेता आला नाही हे लक्षात येताच मी आमच्याजवळचा पेपर त्यांना दिला त्यांनी न मागता. माझ्या या छोट्याशा कृतीने ते खूपच प्रभावित झाले. त्यांनी आस्थापूर्वक आमची चौकशी केली. माझा डावा हात बघून भैय्याला म्हणाले, 'खूप हुशार आहे तुमची बहीण. हिच्या लग्नाची घाई करू नका. तिच्यासाठी अनुरूप वर शोधा. हिचा संसार खूपच सुखाचा व वैभवाचा होईल'. मला हसू आले त्यांच्या बोलण्याचं. अजून कशात काय अन् फाटक्यात पाय नसतानां हे कसं शक्य होईल असे वाटले. कोल्हापुरात त्या देवमाणसाने आम्हाला चहा दिला व आपल्या कामासाठी निघून गेले. आता वाटतं त्यांना ज्योतीषशास्त्र अवगत असावं कारण त्याचं भविष्य खरं ठरलं आहे ना!


       कोल्हापुरातून मलकापूर गाडी मिळाली व साधारणपणे २ वाजता आम्ही मलकापूरात पोहचलो. सोबत आणलेली शिदोरी खाल्ली व विशाळगडला जाणाऱ्या बसची वाट पाहू लागलो. साडेतीन झाले तरी बस आली नाही. चौकशीअंती कळले की रोहिणी नक्षत्रात झालेल्या पावसामुळे विशाळगडला जाणाऱ्या गाड्या बंद झाल्या आहेत. गाड्या फक्त आंबा घाटापर्यंतच जातात. कारण त्यावेळी रस्ते आजच्याइतके चांगले व पक्के डांबरी रस्ते नव्हते. थोडा जरी पाऊस झाला तरी बस बंद व्हायच्या. विशाळगडला जाणारे दुसरे प्रवाशीही होते. ते म्हणाले, आंबा घाटापर्यंत तरी जावू या. तिथून काय सोय होते का ते पाहू या. आम्ही ही त्यांच्याबरोबर बसमध्ये बसलो. आंबा घाटावर उतरलो. इकडे तिकडे चौकशी केल्यावर समजले की कोणतेही वाहन जावू शकत नाही. त्यावेळी पावणेपाच वाजले होते. आमच्या बरोबर निपाणीजवळच्या मांगूर गावचे दोन मामा-भाचे होते. मलकापुरात त्यांच्याशी ओळख झाली होती. ते म्हणाले, "एवढ्या लांबून आलोय देवाच्या वाटेवर इथून परत जायचे नाही, आम्ही तरी पायी जाणार आहोत. तुम्ही काय करता बघा?". हे अंतर साधारण वीस-पंचवीस किलोमीटर आहे. रस्ता घाटातून जाणारा आहे. जंगल झाडीतून जाणारा रात्रीचा प्रवास आहे. भैय्या चालत जायला सर्वार्थानं समर्थ होता. पंचायत आली माझी मी अगदीच अशक्त होते. सकाळी आठ-दहा किलोमीटर चालले होते. भैय्याने मला विचारले, "काय करू या". मी विचार केला माझ्या भैय्याने उन्हातान्हात ऊस तोडून आणलेल्या पैशातून इथपर्यंत आलोय. इथे राहण्याची सोय नाही आणि विशाळगडला न जाता परत गेलो तर आजी-आईने केलेला नवस फिटणार नाही. असा विचार करून मनाचा निर्धार केला व भैय्याला म्हणाले, "जाऊ या चालत यांच्याबरोबर". आम्ही चालू लागलो रस्ता निसरडा व चढीचा होता. अंधार पडू लागला. २-३ किलोमीटर अंतर चालत गेल्यावर माझी दमछाक सुरू झाली. पाय अतिशय दुखायला लागले. पुढे चालवेना, मी मटकन खाली बसले. बाकीचे प्रवाशी पुढे निघून गेले. पण मांगूरवाले ते मामा थांबले व म्हणाले, "थोडं थांबा ताई, आपण सावकाश जाऊ. घाबरू नका आम्ही आहोत तुमच्याबरोबर" त्यांनी थोडीशी खडीसाखर मला दिली. देवाचं नांव घेऊन खा म्हणाले. त्यांच्या बोलण्याने आम्हांला धीर आला. मी डोळे मिटून अल्लाहचा, पीरसाहेबांचा धावा केला, मी ठरवलय तुझ्या दारी यायचं मला बळ दे.  उठून चालायला लागले. भैय्या व ते देवदूत माझ्याकडे पूर्ण लक्ष देवू लागले. इकडून या ताई, तिकडे नका जाऊ असे वारंवार म्हणू लागले. घाटावरची वळणा-वळणाची निसरडी वाट, दोन्ही बाजूला घनदाट झाडी, रातकिड्यांचा किर्र आवाज, पानांची सळसळ व सोबत गडद अंधार, आम्ही बोलत बोलत चालत होतो. त्या मामांजवळ दोन बॅटऱ्या होत्या. ते दरवर्षी इकडे येत असत. त्यामुळे त्यांच्या पूर्वानुभवाचा आम्हांस फायदा होत होता.


       मनात पीरसाहेबांचा धावा करीत रात्री साडेअकरा वाजता गडावर पोहोचलो. दर्ग्यामध्ये गर्दी अजिबात नव्हती. सर्वजण दर्शन, जेवण आटोपून विसावले होते. त्यामुळे आम्हाला निवांतपणे दर्शन घेता आले. मनोमन पीरसाहेबांशी सुसंवाद साधता आला. कष्टाचे चीज झाले असे वाटले. दुसऱ्या दिवशी लवकर उठून स्नान उरकून पुन्हा एकदा दर्ग्यात जाऊन प्रणाम केला व गड उतरून खाली आलो. वाट चालू लागलो. रात्री वीस किलोमीटर पायी प्रवास केला होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा वीस किलोमीटर पायी प्रवास करून आंबाघाट गाठला. नवस पूर्ण केल्याच्या आत्मिक समाधानाने मन काठोकाठ भरल्याने पायाचे दुखणे गौण वाटत होते.


       नवस पूर्ण केल्यानंतर सहा महिन्यांनी भैय्याला रयत शिक्षण संस्थेत नोकरी लागली व एक वर्षानंतर माझी नोकरी कायम झाली. देव नवसाला पावतो पण भाव चांगले हवेत, त्या दृष्टीने प्रयत्नही करायला हवेत. मनी नाही भाव, देवा मला पाव, देव आशेनं देव पावायचा नाही रं. देव परड्यातला भाजीपाला न्हाई रं' या भक्ति गीताची प्रचिती मला आली. अशा प्रकारे आई-आजीचा नवस पूर्ण झाला. आज वाटते कसे चाललो आपण इतके अंतर? कुठून आले हे बळ?


शुक्रवार, ३१ मार्च, २०२३

खेळ नशिबाचा नोकरी लागण्याचा - आत्मकथन भाग ६


खेळ नशिबाचा नोकरी लागण्याचा - आत्मकथन भाग ६

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी




दैव जाणिले कुणी होऽऽ दैव जाणिले कुणी |

लवांकुशाचा हलवी पाळणा वनी वाल्मिकी मुनी ।


      या गाण्याच्या ओळींची प्रचिती आपल्या जीवनात वारंवार येते. यश हे प्रयत्नानेच मिळते हे ९९% बरोबर आहे; पण एक टक्का नशिबाचा असतो आणि तो इतका प्रबळ असतो की, तो या ९९% चेही कांहीच चालू देत नाही. आता आमचेच पहा ना! माझा भैय्या १९७४ साली डी. एड्. झाला. १९७२ च्या दुष्काळात शिक्षक भरती अधिक झाल्याने पुन्हा भरती झाली नसल्याने त्याला नोकरी लागली नव्हती. आर्थिक टंचाईमुळे त्याला दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करावी लागत होती. एका हायब्रिड ज्वारीच्या पोत्यासाठी महिनाभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत चिमण्यांना हाकलून ज्वारीची राखण करण्याचे काम तो करत होता. प्रसंगी ऊस तोडणी कामगाराचे कामही तो करत होता. कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी वाट्टेल ते कष्ट आम्ही भावंडे करत होतो.


        १९७६ साली मी डी. एड्. झाले. माझे आदरणीय काका शिक्षक पदावर नांद्रे जि. सांगली येथे कार्यरत होते. ते भैय्याला नोकरी लागावी यासाठी प्रयत्नशील होते. त्यांच्या मित्राचे बंधूराज जयसिंगपूर शिक्षण मंडळाकडे प्रशासन अधिकारी होते. काकांनी आमच्या कौटुंबिक परिस्थितीबद्दल सांगून भैय्याला नोकरी लावण्याची त्यांच्याकडे विनंती केली. त्यांनी कोल्हापूर एम्प्लायमेंट ऑफिसकडे नांव नोंदविण्यास सांगितले व जयसिंगपूरचा पत्ता देण्यास सांगितले. काकांनी तसा निरोप आम्हाला दिला. आता जातोच आहेस तर ज्युबेदालाही बरोबर ने नाव नोंदवायला असे सांगितले, पण तिच्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत असे  ठरले. चांगले स्थळ बघून लग्न करू असा त्यांनी विचार केला.


       कोल्हापूरला नांव नोंदविण्यास जाण्यासाठी प्रवास खर्चाची तरतूद आमच्याकडे नसल्याने चार दिवस दोघांनी शेतमजुरी केली. एका दिवसाची मजुरी होती फक्त २ रूपये. ४ रूपये उचल घेऊन २० रूपये जमले. त्यात येण्याजाण्याचा खर्च भागतोय का याची खात्री केली. त्यावेळी आमच्या गावाहून कोल्हापूरला जायला एस. टी. नव्हती. खोचीहून कोल्हापूरला डायरेक्ट कमी खर्चात जाता येत असल्यामुळे सकाळी ७ वाजता फडक्यात भाकरी बांधून चालत खोचीपर्यंत आलो. माळवाडी ते खोची अंतर १० कि. मी. आहे. कोल्हापूरात साधारणपणे ११ वाजता पोहोचलो. यापूर्वी आम्ही कोल्हापूरला गेलेलो नव्हतो. सोबत एम्प्लायमेंट ऑफिसचा पत्ता होता. त्यावेळी आजच्यासारख्या रिक्षा उपलब्ध नव्हत्या, आणि असल्यातरी आम्हाला ते परवडणारे नव्हते. एस. टी. भाड्यापुरते पैसे आमच्याकडे होते. विचारत विचारत पुढे चालत राहिलो. प्रत्येकजण म्हणत होता या रस्त्याने पुढे जा, डावीकडे वळा, डावीकडे वळून गेल्यावर पुढे जाऊन उजवीकडे वळण्याचा सल्ला मिळत होता कारण कांही वेळा पुढे जाऊन आम्ही वळत होतो तर कधी अलिकडच्या रस्त्याने वळत होतो. चालून चालून थकलो होतो पण इलाज नव्हता. नांव नोंदवून भैय्याला नोकरी मिळवायची होती ना! शेवटी २ वाजता ऑफिस सापडले. जीवात जीव आला पण पाहतोय तर काय! ऑफिसमध्ये गर्दी फुल्ल होती. जेन्टस् विभागाकडे नांव नोंदणीसाठी भली मोठी रांग होती. लेडिज विभागाकडे त्यामानाने गर्दी कमी होती. भैय्याने माझी कागदपत्रे काढून दिली व मी लेडीज विभागाकडे नांव नोंदणीसाठी गेले. चार वाजता माझा नंबर आला. नांव नोंदणी झाली. भैय्याचा नंबर अजून आला नव्हता. तो एवढंस तोंड करून रांगेत उभा होता. माझीही अवस्था त्याच्यापेक्षा वेगळी नव्हती. भैय्याची नोंदणी झाल्यावर पदरातली भाकरी आम्ही खाणार होतो. दहा बारा उमेदवारानंतर भैय्याचा नंबर होता. तोपर्यंत पाच वाजले, नोंदणी थांबली. आम्ही खूप चिंतेत पडलो. आता काय करायचे? मुक्काम करावा तर जवळचे कोणीही नातेवाईक नव्हते. जवळची रक्कमही जेमतेम होती. अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो. कळकळीची विनंती केली. नोंदणी करण्यास नकार दिला त्यांनी पण एक मार्ग सांगितला. गांवी गेल्यानंतर तुमच्या सर्टिफिकेटस् व मार्कलिस्टच्या मूळप्रती व खऱ्या नक्कल पोष्टाने पाठवा. सोबत तुमचा पत्ता लिहिलेला एक लिफाफा पोष्टेजसह पाठवा. आम्ही नोंदणी करून तुमच्या मूळ प्रती व नोंदणी कार्ड पाठवून देतो. चार-पाच दिवसात तुमची नोंद होईल. "साहेब, नक्की नोंद होईल ना चार-पाच दिवसात?" असे विचारल्यावर ते ... म्हणाले, 'बिनधास्त जा, तुमच काम होईल', त्यांच्या बोलण्यावर आमचा विश्वास बसला. बसणं भागच होतं. कारण दुसरा उपायही नव्हता आमच्याकडे.


        संध्याकाळी सहा वाजता स्टॅण्डच्या बाकड्यावर बसून आणलेली भाकरी खाल्ली. पोटभर पाणी पिऊन खोचीला, जाणाऱ्या एस. टी. त बसलो. खोचीत आलो त्यावेळी रात्रीचें साडेआठ वाजले असावेत. काळोखी रात्र होती. लाईटची आजच्याइतकी सोय नव्हती. हातात बॅटरी नव्हती. एकमेकाच्या आधाराने चालत चालत रात्री दहा वाजता घरी परतलो. घरची मंडळी काळजी करत वाट पहात होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मजूरी करून दुपारी भैय्याने दुधगांवला पोष्टात जाऊन अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्तता केली व नोंदणी होऊन परत येणाऱ्या लिफाफ्याची वाट पहात बसलो. 

       

       दरम्यान काकांनी ओळखीच्या व्यक्तिकडून जयसिंगपूर शिक्षणमंडळाकडे नांव पाठविण्यासाठी व्यवस्था केली होती. साहेबांनी यादीत तांबोळी नांव आल्याचेही काकांना सांगितले. पण ते नांव भैय्याचे नव्हते माझे होते. पोष्टाद्वारे भैय्याच्या नावाची नोंदणी होण्यापूर्वीच इकडे यादी आली होती. माझे नांव चुकून आले, सर्वांनीच कपाळाला हात लावला. मी माझ्या कुटूंबियाना एवढेच सांगितले की, भैय्याला नोकरी लागेपर्यंत भैय्या बनून कुटूंबाची जबाबादारी घेईन, लग्नाचा विचारही करणार नाही. आणि घडलेही तसेच पुढे २ वर्षांनी त्याला रयत शिक्षण संस्थेत नोकरी लागली. ३२ वर्षाच्या यशस्वी सेवेनंतर भैय्या निवृत्त झाला. केवळ दैवयोगानेच जयसिंगपूर शिक्षण मंडळात ३८ वर्षे ४ महिने विद्यादान करण्याची संधी मला मिळाली. खेळ आगळा नशिबाचा! दुसरं काय?


रविवार, २९ जानेवारी, २०२३

मॅट्रिकची परीक्षा - आत्मकथन भाग ५


'मॅट्रिकची परीक्षा' - आत्मकथन भाग ५

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


       मॅट्रिकचे म्हणजे जुन्या अकरावीचे वर्ष जीवनाला वेगळे वळण देणारे वर्ष. जीवनातील एक टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या सन १९७३-७४ या शैक्षणिक वर्षात मी कन्या विद्या मंदिर, दुधगांव येथे शिक्षण घेत होते. आमच्या माळवाडीपासून हायस्कूलपर्यंतचे अंतर चार किलोमीटर आहे. पावसाळ्यात चिखलाने व उन्हाळ्यात-हिवाळ्यात धुळीने काठोकाठ भरलेला कच्चा रस्ता तुडवीत पायीच जावे लागायचे तेही अनवाणी. रस्त्यांची ही दशा असल्यामुळे बसची सोय नव्हती आणि सोय असती तरी त्यावेळी आर्थिक परिस्थितीमुळे परवडणारी नव्हती.


       भाऊसाहेब कुदळे विद्यालयातून विभक्त होऊन स्वतंत्र कन्या विद्या मंदीर स्थापन झाल्यावर पहिली बॅच आमची होती. त्यामुळे निकाल १००% लावण्यासाठी शिक्षकांचे आटोकाट प्रयत्न सुरु होते. सकाळी आठ ते दहा या वेळेत अभ्यासिका सुरू होती. मला अभ्यासिकेत जाणे शक्य नव्हते कारण एवढ्या लवकर स्वयंपाकासाठी सामग्री उपलब्ध नसायची. घरच्या जिराईत शेतातील धान्य पहिले सहा महिनेच पुरायचे. त्यात मागच्याच वर्षांत दुष्काळ येऊन गेलेला. सकाळी उठून माळवाडीपासून दीड किलोमीटर वर असलेल्या सावळवाडी या गांवातून धान्य दळून आणावे लागायचे. सावळवाडीत जाऊन रेशनच्या रांगेत उभे राहून धान्य घ्यावे लागायचे, त्यानंतर माझी मोठी मावसबहीण जिल्याबू सावळडीत रहायची तिच्या घरी जाऊन धान्य निवडावे लागायचे व मग  पिठाच्या गिरणीत दळण्यासाठी जायचे. तिथेही खूप गर्दी असायची. हे सर्व सोपस्कार आवरून डोक्यावर दळणाची बुट्टी घेऊन परतत असताना वाटेत मैत्रिणी हायस्कूलला निघालेल्या असताना भेटायच्या. "आज शाळेला येणार नाहीस का?" हे मैत्रिणींचे शब्द काळजात बाणाप्रमाणे शिरायचे. तिकडे दुर्लक्ष करून मी घर गाठत होते. पीठ आल्याबरोबर आजी, आई किंवा बहीण ताबडतोब भाकरी करायच्या. मग जेवण करुन आमची स्वारी शाळेला निघायची. घड्याळात किती वाजले बघायचा प्रश्नच नव्हता कारण आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे घड्याळ नव्हते. मी वर्गात पोहोचायची. कम् इन् म्हटल्यावर वर्गात जाऊन शेवटच्या बेंचवर बसायची. मैत्रिणीला हळूच विचारायची "अगं आज पहिला तास मराठीचा होता ना मग आता सायन्सचा तास कसा सुरू आहे?" मैत्रिण म्हणायची "अगं हा दुसरा तास सुरू आहे खुळे". मग डोक्यात लख्ख प्रकाश पडायचा.


       मी हे काम करत असताना माझ्या भावंडांना अनेक कामं असायची. विहिरीतून रहाटाने ओढून पाणी भरावे लागायचे, शेतातून वैरण आणावी लागायची,  आईवडिलांना शेतीच्या कामात मदत करायला जावे लागायचे. आमची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व शिक्षकांनी मला अभ्यासिकेत हजर राहण्याची सक्ती केली नाही. मुख्याध्यापिका पवार मॅडम्, मिसाळ मॅडम्, लहुटे मॅडम्, जाधव सर, आमणे सर या सर्वांनी आपल्याजवळचे गाईडस्, प्रश्नसंच मला परीक्षेच्या आधी कांही दिवस दिले होते. वर्ग अध्यापनाच्या वेळी सर्व शिक्षक माझ्याकडे विशेष लक्ष द्यायचे कारण त्यांच्या दृष्टीने मी त्यावेळी  हुशार होते. वासरात लंगडी गाय शहाणी म्हणतात ना तसं झालं होतं.


       जून ते जानेवारी अखेर मला अभ्यासिकेत जाणे जमले नव्हते. फेब्रुवारी मध्ये माझ्यावर अल्लाहची कृपाच झाली म्हणायची. नेमका त्याचवेळी रमजान महिना सुरु झाला. माझी आजी दादी महिनाभर रोजे करायची. मी विचारपूर्वक ठरवलं की यावर्षी आपणही महिनाभर रोजे करावेत म्हणजे दादीबरोबर पहाटे थोडेसे जेवण केले की सूर्यास्तापर्यंत जेवणाचा प्रश्नच येणार नाही. महिनाभर अभ्यासिकेत जाता येईल. आईच्या परवानगीने व भावंडाच्या संमतीने मी महिनाभर अभ्यासिकेत हजर राहू शकले. या कालावधीत खूप त्रास व्हायचा, अशक्तपणा जाणवायचा पण तिकडे दुर्लक्ष करून मी अगदी मनापासून अभ्यास केला. हायस्कूलमध्ये गेस्ट लेक्चर्स सुरू होते संध्याकाळी निघायला उशीर व्हायचा. रोजा सोडायची वेळ रस्त्यातच व्हायची. शेतात पाणी पाजण्यासाठी चेंबर सुरू असायचे. ओंजळभर पाणी पिऊन रोजा सोडायची.


       अशा प्रकारे प्राप्त परिस्थितीशी टक्कर देत देत वर्ष संपत आलं. वार्षिक परीक्षेची चाहूल लागली. परीक्षेसाठी आष्टा या गांवी जावे लागायचे. खोली घेऊन आठ-दहा दिवस तेथे रहावे लागायचे. पाच-सात मैत्रिणींचा ग्रुप व्हायचा. आमचाही सहा मैत्रिणींचा ग्रुप तयार झाला. माझ्या मैत्रिणीची मंगल भोसलेची आत्या आष्टा येथे शिक्षिका होती. तिच्या ओळखीने तिच्या खोली जवळचीच एक मोठी खोली भाड्याने घेतली. आठ दिवसांसाठी काय काय साहित्य घ्यायचे याची लिस्ट मैत्रिणी करू लागल्या. बाकीच्या पाचही मैत्रिणी सधन होत्या. त्यांची लांबलचक लिस्ट पाहून मला धडकीच भरली. तसं पाहिलं तर मला अभ्यासाची काळजी कमी आणि कपड्यांची काळजीच जास्त होती. कारण माझ्याजवळ परगांवी नेण्यासारखी एकुलती एक 'ती लकी गुलाबी साडी' होती व एकच घरी वापरण्यासारखा परकर ब्लाउज होता. ऐनवेळी कपडे विकत घेऊन शिवायची ऐपत नव्हती. सोबत न्यायचा खाऊ, खोलीभाडे, जाण्यायेण्याचे गाडीभाडे, जेवणाचा डबा पोहचविणाऱ्या डबेवाल्याची फी, शिवाय किरकोळ खर्चासाठी कांही पैसे लागणार होते. एवढे सगळे पैसे आणायचे कुठून? हा प्रश्न माझ्या समोर आ वासून उभा होता. कपड्यांचं नांव काढणंही गैर होतं. त्यामुळे मी मनात विचार करत होते. माझी दोन नंबरची सख्खी मावसबहीण जैत्याबू आमच्या शेजारीच रहायची. इकडच्या नात्याने ती माझी चुलती होती. तिच्याकडे हिरव्या रंगाची, नाजूक सोनेरी काठाची एक नवीन छान साडी होती. हायस्कूलमध्ये निरोप समारंभाला गृप फोटोसाठी साडी नेसून यायचे ठरल्यावर, एका दिवसासाठी साडी नेसायला मागितल्यावर, तिने मला ती साडी दिली होती. आता परीक्षेसाठी मागितल्यावरही ती साडी देईल अशी आशा मनी बाळगून मी आईला कपड्यांच्या बाबतीत कांहीच बोलले नव्हते.


       परीक्षेला जायचा दिवस उजाडला. दुपारी आष्ट्याला निघणार होतो. भैय्या त्यावेळी आष्टा येथे डी. एड्. चे शिक्षण घेत होता. घरातील एकुलती एक चांगली ट्रंक त्याच्याकडे होती. मला नेण्यासाठी ती ट्रंक घेऊन भैय्या सायकलने माळवाडीला आला. महत् प्रयासाने रवा, तूप, साखर यांची जुळणी करून रव्याचे लाडू बनवले होते. लाडूचा डबा ट्रंकेत ठेवला, पुस्तके-वह्या भरल्या व मी बहिणीकडे साडी मागून आणण्यासाठी गेले. साडी मागितल्यावर ती म्हणाली, "हे बघ ज्युबेदा, तू आठ दिवस तिकडे राहणार, माझी साडी पाक बोळा करून आणशील वापरून. पंधरा दिवसांनी माझ्या भाचीच लग्न आहे. मला त्या लग्नात नेसायला ही एकच साडी आहे चांगली दुसरी असती तर दिली असती तुला". दुखावलेलं मन आणि डबडबलेले डोळे घेऊन मी घरात आले. घरात येताच माझ्या अश्रूंचा बांध फुटला, मी हुंदके देत रडू लागले. आई माझ्यावर चिडली व म्हणाली, "पेपर लिहायला जातांना नेसायला एक साडी आहे, घरात घालायला परकर ब्लाउज आहे. साडी मळली तर संध्याकाळी धुवून टाकायची. एवढं रडायला काय झालं?" तिने मला समजवायचा प्रयत्न केला. पण माझं रडू थांबेना हे पाहून तिच्या रागाचा पारा चढला. रागाच्या भरात तिने माझ्या पाठीत चार दणके दिले ठेवून. मग काय रडण्याचा आवाज आणखी वाढला. नेमक्या त्याच वेळी माझे चुलत काका आब्बासचाचा घरी आले. त्यांनी आमचा संवाद ऐकला. जिब्बू रडू नकोस म्हणत ते पटकन घरी गेले. त्यांची पत्नी सांगलीत रहायची. त्यांची भावजय म्हणजे माझ्या न्यामतचाचीची तपकिरी रंगाची, निळ्या काठाच्या साडीची घडी घेऊन ते आले व म्हणाले ही साडी घेऊन जा रडू नकोस. मी डोळे पुसत उठले. रडून रडून डोळे सुजले होते पण मन मोकळे झाले होते. झाले मोकळे आकाश असे वाटत होते. माझ्या आईचा मार म्हणजे फुलांचा हार होता याचा प्रत्यय मी यापूर्वी बऱ्याच वेळा घेतला होता. त्यामुळे फुलांचा हार घालूनच मी मैत्रिणी समवेत आष्ट्यात हजर झाले.


       मॅट्रिकच्या परीक्षेला जातानाचा तो प्रसंग आजही आठवला तर डोळे भरून येतात. त्या प्रसंगात दोष कुणाचाच नव्हता, दोष होता परिस्थितीचा! जैत्याबूकडे नवी एकच साडी होती, तिचे बोलणे त्यावेळी योग्यच होते. आईचे रागावणे क्रमप्राप्त होते. माझे रडणेही स्वाभाविक होते. आज मला कौतुक वाटते आब्बासचाचाचे व त्यांच्या विनंतीला मान देऊन आढेवेढे न घेता साडी देणाऱ्या माझ्या लाडक्या न्यामतचाचीचे, कारण न्यामतचाचीला माझे खूप कौतुक वाटायचे व मला तिच्याबद्दल जिव्हाळा. माझ्या त्या लकी गुलाबी साडीमुळे सात दिवस मैत्रिणींच्या नवनव्या साड्या नेसायला मिळाल्या हा भाग वेगळा. थँक्यू आब्बासचाचा व न्यामतचाची.


       मी १९७४ साली अकरावी मॅट्रिकची परीक्षा फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झाले. पाच विषयात डिस्टिंक्शन मिळाले. कन्या विद्या मंदिर, दुधगांव या विद्यालयात 'प्रथम' क्रमांक आला. खूप कौतुक वाटलं सर्व शिक्षकांना व माझ्या कुटूंबियाना, कौतुकाच्या वर्षावाने मी भिजून चिंब झाले. शाळेच्या बोर्डवर माझे नांव झळकले. हायस्कूलमध्ये  शेजारी राहणाऱ्या दादाच्या लग्नासाठी माझे पिताश्री गेले होते. बोर्डवरचे माझे नांव वाचून इतके खूष झाले ते!त्यांच्या चेहऱ्यावरील त्यावेळचा तो आनंद मला जीवनात नवी उमेद देऊन गेला.


शनिवार, ३१ डिसेंबर, २०२२

मेरी माँ तुझे सलाम - आत्मकथन भाग ४


मेरी माँ तुझे सलाम - आत्मकथन भाग ४

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी 



       १९७२ सालचा दुष्काळ भयानक होता. मुलाबाळांना, गुरावासरांना जगवायचे कसे? हा प्रश्न आवासून उभा होता. कुठे रस्त्याचे, पाझर तलावाचे काम सुरू होते. ज्यांनी आयुष्यात रोजगार केला नाही अशी कुटूंबेच्या कुटूंबे दुष्काळी कामावर हातापायाला चिंध्या बांधून रखरखत्या उन्हात राबत होती. मिलोच्या भाकरी, सडक्या गव्हाच्या काळवंडलेल्या गव्हाच्या चपात्या, सातूच्या वातड फुलक्या, लाल मक्याच्या कण्या मिरचीच्या कोरड्या भुग्याबरोबर पाण्याच्या घोटाच्या आधाराने लोक गिळत होते. आला दिवस ढकल होते.


       आमच्या कुटूंबाच्या दृष्टीने हा दुष्काळ खरोखरच कसोटीचा ठरला कारण माझे वडील म्हणजेच आदरणीय बापूजी मिशन हॉस्पिटल मिरज मध्ये मणक्याच्या दुर्धर आजाराशी झुंज देत आठ महिने ऍडमिट होते. दादी त्यांची सेवा करत होती व माझे काका त्यांचे औषधोपचार करण्यात गुंतले होते. इकडे माझी आई आपली पाच चिमणीपाखरं व मोठ्या मुलीची दोन मुलं यांना घास भरविण्यासाठी परिस्थितीशी झुंजत होती. दुष्काळी कामावर दिवसभर उन्हातान्हात राबत होती व रात्रभर विचार करत होती की उद्याचा दिवस कसा काढायचा? कुणाकडे उधार मागायचे, कुणाकडून थोडफार धान्य मिळेल उसने, कुणाकडून व्याजाने थोडीफार रक्कम मिळेल. विचारपूर्वक दोन दिवसाची बेगमी करायची पण साला, तिसरा दिवस उगवायचाच आणि आईची चिंता सतत चालूच रहायची. सकाळी सकाळी आई उठायची व तिच्या मायेच्या विशाल पदरात अर्धा किलो तांदूळ आणायची. अर्ध्या किलोत आम्ही सातजण पोटभरून भात खायचो. मोठ्या बहिणीची डिलेव्हरी त्याच वेळी झालेली. तिचं छोटं बाळ दुष्काळाची जाणीव झाल्यामुळेच का कोण जाणे शांतपणे झोपायचे. आईने आणलेला मुठपसा बहीण आम्हाला शिजवून घालायची. त्यावेळी आईची ओढाताण पाहून मला वाटायचे परमेश्वराने माणसाला 'पोट' नावाचा अवयव व भूक नावाची प्रवृत्ती का दिली आहे ? 

       

       दुष्काळात शेतातील पिके वाळून गेली. कुरणातील गवतानेही हिरव्या रंगाचा त्याग केला होता. दावणीची जनावरेही आमच्याप्रमाणेच येणारा घास समाधानाने चघळत होती. भारतीय संस्कृतीने आयोजिलेल्या सणांचे आगमन मात्र दरवर्षीप्रमाणेच सुरू होते. गौरी-गणपतीचा सण नुकताच पार पडला होता. दुष्काळातही गणरायांचे स्वागत लोकांनी आपल्या परीने केले होते. पुढच्यावर्षी भरपूर पाऊस घेऊन येण्याची प्रार्थनाही गणरायांकडे केली होती. दिवस जात-येत होते. दसरा सणानेही आपण येत असल्याचे कळविले होते. दसऱ्यापुर्वी खंडेनवमी उद्यावर येऊन ठेपली होती. खंडेनवमीला पुरणपोळ्यांचा बेत असतो. आमच्या घरासमोरच गुरलिंग आंबोळ्यांचे किराणा दुकान होते ज्यांची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी होती. त्यांची दुकानातून गहू, डाळ, गूळ, तांदूळ, तेल यांची खरेदी चाललेली होती. माझी आई मात्र मनातून खूप अस्वस्थ होती. मी आईला विचारलं, "माँ कसला विचार करतेस गं?". आई म्हणाली, "तुझ्या वडिलांची तबेत्त कधी बरी होणार याचा विचार करते". मला मात्र कळायचे की माझी आई नक्की उद्याच्या सणाचा विचार करत आहे.


       खंडेनवमीच्या दिवशी आई लवकर उठली. भाकरी करायला बसली तर डब्यात सकाळची न्याहरी भागण्यापुरतेही पीठ नव्हते. कण्या शिजवून जेमतेम पिठात न्याहरी कशीबशी पार पडली. पण आई कालच्यापेक्षा आज जरा खुषीत दिसली. आष्ट्याला जाऊन येते म्हणून पिशवी घेऊन निघाली. आई घासभर खाऊन जा म्हणून आम्ही आग्रह केल्यावर दोन घास खाऊन निघाली. त्यावेळी वेळेवर एस. टी. ची सोय नव्हती. त्यामुळे तिला चालतच जावे लागणार होते. आम्ही भावंडे एकमेकांकडे पाहू लागलो. आई आज अचानक आष्ट्याला कशासाठी निघाली असेल? आजूबाजूच्या घरातून पुरणपोळीचा व आमटीचा खमंग वास येत होता. आम्ही भावंडे मात्र नेमून दिलेली कामे करत होतो. मोठी बहीण स्वयंपाक-भांडीकुंडी बघायची. मी व माझा भाऊ लांबच्या विहिरीवरून रहाटाने ओढून पाणी भरायचो, एकजण म्हैशीला चरायला व पाणी पाजवायला घेऊन जायचा. दिवस वरवर येत होता. दुपार टळत होती. सूर्य माथ्यावरून पश्चिमेकडे निघाला होता. दुपारचे चार वाजले होते. माझ्या बहिणीचा मुलगा असलम त्यावेळी ३ वर्षाचा होता. त्याला भूक  लागली होती. त्याला मूठभर चुरमुरे देऊन बसवले होते. आम्हालाही भूक लागली होती. पण आम्ही पाणी पिवून शांत बसलो होतो. एवढ्यात माझी आई डोकीवर दोन पिशव्या एकत्र बांधलेलं गाठोड घेऊन आली. तेही प्रसन्न चेहऱ्याने, आम्ही भावंडे आश्चर्यचकित झालो. आईजवळ जाताना एक पैसाही नव्हता आणि तिनं गाठोड्यात एवढं काय आणलं असेल? आई जराही दमलेली नव्हती. बहिणीला चूल पेटवून चहाला व डाळीला आधण ठेवायला सांगून तिने सुपात डाळ निवडायला घेतली.


       पिशवीतून बटर काढले. सर्वांना स्वयंपाक होईपर्यंत चहा बटर खायला दिला व ती पीठ मळू लागली. तासाभरात दोघींनी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक आवरला. या बाळांनो जेवायला अशी हाक आली, की जिची आम्ही  वाटचं पहात होतो. आईने आग्रह करून जेवायला वाढले, वाढताना तिच्या चेहऱ्यावरील आत्मिक आनंद मला आजही आठवतोय व त्या दिवशी आम्ही भावंडांनी दिलेली तृप्तीची ढेकर, आज पंचतारांकित हॉटेलमधल्या चमचमीत डिशनेही मिळत नसावी असे मला वाटते.


       आम्हां भावंडाना या अपूर्व जेवणाबद्दल कुतूहल वाटत होते. हा सणाचा बाजार आईने कुणाकडून आणला असेल बरे? समाधानाने विसावलेल्या आईला छोट्या मनूने विचारलेच, "आई, कुणाकडून आणलेस पैसे हा बाजार करायला?". आईने या प्रश्नाचे उत्तर देण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही तिच्या मागेच लागलो. आईने सांगितले, "बाळ, माझ्या पायातील जोडवी व मासोळ्या विकून हा बाजार आणला". तिचे उत्तर ऐकून आमच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. आम्ही आईला म्हणालो, "आई तू महान देवता आहेस, आम्हाला गोडधोड खाऊ घालण्यासाठी तू तुझा सौभाग्य अलंकार विकलास". आई म्हणाली, "अरे, परमेश्वराने मला पाच मोठे अलंकार दिलेत त्यांच्यापुढे या निर्जीव दागिन्यांची काय किंमत?" निरक्षर असलेल्या माझ्या आईचे ते शब्द मी आजही माझ्या हृदयात जपून ठेवले आहेत. पुढे मला नोकरी लागल्यावर आईसाठी जोडवी घेऊन गेले. आनंदाने भारावून गेली त्यावेळी माझी आई!


       सावित्रीबाई फुले व लक्ष्मीबाई पाटील यांचा वारसा चालविणाऱ्या कित्येक सावित्री आणि लक्ष्मीबाई आपल्या समाजात आजही दिसतात, की ज्यांनी आपल्या मुलांबाळाना घास भरविण्यासाठी सौभाग्यलंकारांचा त्याग केला आहे, हाताला घट्टे पडेपर्यंत दुसऱ्यांच्या शेतात भांगलण केली आहे, हात-पाय किरवाजेपर्यंत लोकांची धुणी-भांडी घासली आहेत, आतडीला पीळ पडेपर्यंत ओझी वाहिली आहेत, कमरेला बाक येईपर्यंत कष्ट उपसले आहेत, आपल्या पोटाला चिमटा लावून आपल्या पिलांना पोटभर खाऊ घातलं आहे. धन्य त्या माता!

दर खंडेनवमीला माझ्या आईची आठवण येते व मी मनात म्हणते, 'मेरी माँ तुझे सलाम!'


गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

ती लकी गुलाबी साडी! - आत्मकथन भाग ३


ती लकी गुलाबी साडी! - आत्मकथन भाग ३

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी 



फोटोत डावीकडे रझिया व उजवीकडे मी



        'सुगी' हा शब्द बळीराजाच्या दृष्टीने खूपच जिव्हाळ्याचा आहे कारण पावसाच्या धारा, उन्हाळाच्या झळा व थंडीची बंडी अंगावर झेलत त्याने धरणीमातेकडे 'दान' मागितलेले असते. तिच्या पदरी पसाभर बियाणं देवून तिच्याकडून खंडीने घेण्याचे हेच ते दिवस असतात. याच काळात कष्टाला आलेली गोड फळे चाखायला मिळतात. मी किसानकन्या असल्याने भुईमुगाच्या शेंगाची सुगी मला फार आवडायची. ही सुगी हमखास दिवाळीच्या सुट्टीत यायची. आमच्या स्वतःच्या थोड्याश्या शेतातील शेंगा तोडायला आम्ही सर्व भावंडे जायचोच व उरलेल्या दिवसात दुसऱ्याच्या शेतातही शेंगा तोडायला हजेरी लावायचो. संध्याकाळी तोडलेल्या शेंगांची वाटणी व्हायची. तोडलेल्या शेंगांचा पंचविसावा किंवा विसावा भाग मिळायचा. वाटणीला आलेल्या शेंगा घेऊन घरी येताना फार आनंद व्हायचा. सकाळी थंडी, दुपारचे ऊन, केलेले कष्ट विसरुन जायचो. त्याकाळी दुकानात किंवा व्यापाऱ्यांकडून या ओल्या शेंगा विकत घेतल्या जायच्या. त्याबदल्यात चार पैसे मिळायचे. ते पैसे साठवून कवठेपिरानच्या यात्रेत केसांना रिबिनी, कानात डूल, गळ्यात मोतीहार घेण्याची संधी मिळायची आणि ती आमच्या दृष्टीने पर्वणी असायची.


        सन १९७१ साली मी जिल्हा परिषदेच्या मराठी मुलींच्या शाळेतून सातवी पासून कन्या विद्यालय दुधगांव या हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात दाखल झाले होते. हायस्कूलला जाताना दररोज युनिफॉर्म असायचा पण दर गुरुवारी विदाऊट युनिफॉर्मचा असायचा. बुधवारी सायंकाळी पी. टी. चे शिक्षक जेंव्हा सांगायचे 'कल आप सब विदाऊट युनिफॉर्म आ सकते हो' तेंव्हा माझ्या सर्व मैत्रिणींना फार आनंद व्हायचा. त्या टाळ्या वाजवायच्या. पण मला तो गुरुवारचा विदाऊटचा दिवस अजिबात आवडायचा नाही. तो दिवस येवूच नये असे वाटायचे याचे कारण असे की त्या दिवशी सर्व मैत्रिणी नटूनथटून, नवनवे कपडे घालून यायच्या. त्यांनी घातलेले छान छान ड्रेस, नेसलेल्या सुंदर किंमती साड्या पाहून लाजल्यासारखे व्हायचे. युनिफॉर्म सोडून माझ्याकडे एखादाच जुना झालेला ड्रेस असायचा. प्रत्येक गुरुवारी तोच ड्रेस किंवा युनिफॉर्मच घालणे भाग पडायचे. माझी मोठी बहीण माहेरी आली की मला खूप आनंद व्हायचा. तिच्याकडे असलेली एकुलती एक नवी साडी एखाद्या दिवशी नेसायला मिळायची.

        त्यावर्षी दिवाळीची सुट्टी लागली. वडिलांनी घरात पुरतील एवढ्याच शेंगा शेतात केल्या असल्याने त्या दोनच दिवसात तोडून झाल्या. अजून २० दिवस सुट्टी शिल्लक होती. मनात विचारचक्र सुरु होते सुट्टीत दररोज शेंगा तोडायला जावू या. शेंगा विकून आलेल्या पैशातून एखादा चांगला ड्रेस किंवा छानशी साडी घेवू. मी आईला घाबरतच माझा विचार सांगितला आणि विशेष म्हणजे तिला तो पटला. ती म्हणाली, "तुझ्या शेंगा वेगळ्या वाळवून पोतं भरुन मार्केट यार्डला पाठवू". मग तर काय माझ्या विचारांना पंखच फुटले. मी त्यावेळी बारा वर्षांची व माझी धाकटी बहीण होती सहा वर्षांची. आईने माझ्या बहिणीला रझियाला माझ्यासोबत शेंगा तोडायला जात जा तुला पण एक छान फ्रॉक घेता येईल असे सांगितले. रझिया पण हरखून गेली, माझ्या सोबत यायला एका पायावर तयार झाली. अशा प्रकारे आम्हा दोघी बहिणींची मोहीम दुसऱ्या दिवसापासून सुरु झाली.

        दोघीही भल्या पहाटे उठायचो. आईला घरकामात मदत करायचो, पाणी भरायचो व आवरुन सर्वात आधी शेतात पोहचायचो. थंडीने कुडकुडत एवढ्या लवकर या मुली शेतात आल्याचे पाहून शेतकऱ्यांना कौतुक वाटायचे. शेंगा जलदगतीने तोडायला सुरवात करायचो. मी मोठी असल्याने माझी बुट्टी मोठी होती, राझियाची बुट्टी अगदी छोटी होती. शेंगा तोडताना तिचे लक्ष माझ्या बुट्टीकडे वारंवार जायचे. तिला वाटायचे दीदीची बुट्टी भरत आली माझी पण भरली पाहिजे. मध्येच भूक लागायची पण तेवढ्यापुरत्या दोन शेंगा तोंडात घालून भूक भागवायचो. थंडीचा जोर कमी होताच उन्हाचा तडाखा सुरु व्हायचा पण आम्हाला त्याची परवा नसायची. इतर स्त्रिया म्हणायच्या, "अगं पोरींनो डोक्याला कापड तरी बांधा ग" पण वेळ वाया जाऊ नये म्हणून शेंगा तोडत रहायचो, घामाने भिजलेला चेहराही पुसत नव्हतो, कारण हात माती चिखलाने भरलेले असायचे. इतर बायका जेवायला उठायच्या, रमतगमत जेवायच्या पण आम्ही दोघी चटकन जेवण उरकून पटकन शेंगा तोडायला सुरुवात करायचो. शेतकरी म्हणायचे या पोरी बघा कशा भरभर खाली न पडता व्यवस्थित शेंगा तोडतात. संध्याकाळ पर्यंत आम्ही सव्वा पोते शेंगा तोडायचो. त्यातील एक मोठी बुट्टी भरून शेंगा आमच्या वाटणीला यायच्या. त्या शेंगा उन्हात वाळवायला टाकून दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मालकाच्या शेतात हजर व्हायचो. या वीस दिवसात आमचा चेहरा काळवंडून गेला होता. थंडीत उठल्यामुळे अंग फुटले होते, हात दुखत होते, बोटांना घट्टे पडले होते, टाचांना भेगा पडल्या होत्या पण आमचे तिकडे लक्ष नव्हते. अंथरुणावर पडताच झोप लागायची. स्वप्नात छान छान ड्रेस, सुंदर साडी व नक्षीदार फ्रॉक यायचा. सगळे श्रम विसरुन जायचो आम्ही. आमच्या वाळलेल्या शेंगाचे पोते फुल्ल भरले एकदाचे आणि आम्ही मार्केट यार्डला ते पाठविले.

        एके दिवशी माझे वडिल ज्यांना आम्ही बापूजी म्हणायचो ते म्हणाले, "उद्या आपण सांगलीला जायचे आहे साडी व फ्रॉक आणायला. शेंगाच्या पोत्याचे ५३ रुपये बिल आले. बापूजी गणपती पेठेतील सहकार वस्त्र निकेतन मध्ये आम्हाला घेवून गेले कारण त्या दुकानात आमचे शेजारी विलास जाधव काका नोकरीला होते. त्यांनी अगदी नवीन आलेल्या ब्रासो साड्या दाखविल्या. त्यातील गुलाबी रंगाची, गुलाबाच्या फुलांची नक्षी असलेली ब्रासो साडी मला आवडली पण लेबल पाहते तर काय त्या साडीची किमत ४५ रुपये होती. त्यावेळी एवढ्या किमतीची महाग साडी आवाक्याबाहेरची वाटली म्हणून मी नको म्हणाले. उरलेल्या पैशांतून राझियाला तिच्या मनासारखा फ्रॉक मिळेल का हा प्रश्न होता. एवढ्याश्या जीवाने, इवल्या हातांनी मला शेंगा तोडायला मदत केली होती. तिला तिचा हिस्सा मिळायलाच हवा असे मला वाटत होते. विलासकाका म्हणाले, "हीच साडी घे ज्युबेदा, फार चांगली व टिकाऊ आहे". ती साडी बाजूला ठेवून राझियासाठी फ्रॉक बघितले. तिने आकाशी रंगाचा सुंदर फ्रॉक पसंत केला. फ्रॉकची किंमत होती ८ रुपये. हिशोब तंतोतंत झाला म्हणून बापूजी माझ्याकडे पाहून हसले.

        वीस दिवस थंडीवाऱ्याची, उन्हाची पर्वा न करता खरेदी केलेल्या त्या दोन वस्तूंची किंमत आमच्या दृष्ठीने लाख मोलाची होती आणि झालेला तो आनंद अविस्मरणीय होता. आठवी ते अकरावी पर्यंत मी ती साडी दर गुरुवारी नेसून जायची पण मला एकदाही लाजल्यासारखे झाले नाही कारण ती साडी होतीच तशी उठावदार, प्रत्येक धुण्याला जास्तच फ्रेश दिसणारी.

        अकरावी नंतर डी. एड. होऊन नोकरीला लागेपर्यंत प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी ती माझ्या अंगावर असायची. मॅट्रिकच्या म्हणजे अकरावीच्या पहिल्या मराठीच्या पेपरला जाताना ती साडी मी नेसली नि मला मराठीचा पेपर एकदम सोपा गेला. माझ्या मैत्रिणींना वाटलं हिची साडी लकी आहे. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मैत्रिणीने ती साडी गणिताच्या पेपरला नेसली आणि योगायोगाने तिला ही पेपर सोपा गेला. त्यामुळे उरलेल्या दिवशी नंबर लावून ती साडी मैत्रिणींच्या अंगावर विराजमान झाली आणि ती लकी ठरली. पुढे डी. एड. ला गेल्यावर तो किस्सा सांगताच प्रत्येक पाठाच्या वेळी तिला मागणी असायची. त्या साडीमुळे मला मैत्रिणींच्या छान छान साड्या नेसायला मिळायच्या. मला माझ्या कष्टाने घेतलेल्या त्या गुलाबी साडीचा सार्थ अभिमान वाटायचा.

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२

'अनोखे बंधूप्रेम' - आत्मकथन भाग २


'अनोखे बंधूप्रेम' - आत्मकथन भाग  

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटोत डावीकडे भैय्या व उजवीकडे मनू


         १९७२ च्या दुष्काळाचे पडसाद १९७३ साली सुध्दा दिसत होते. माझा भैय्या 'शौकत' आष्टा येथे डी. एड्. चे शिक्षण घेत होता. कांही दिवस अभ्यासासाठी आष्ट्यातच मित्रांच्या रूमवर राहिला होता. त्याला दररोज माळवाडीहून डबा पाठवला जायचा. आमच्या वेळी परगांवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे डबे पोहचविणारे डबेवाले असत. माळवाडी अगदी छोटेसे खेडेगांव असल्याने एकट्याचा डबा नेण्यासाठी दुधगांवचा डबेवाला माळवाडीस यायला तयार नव्हता व जास्त पैसे देवून इकडे डबा नेण्यासाठी ये असे म्हणण्यासारखी आमची परिस्थिती नव्हती. त्यामुळे माझा छोटा भाऊ मनू सकाळी डबा घेऊन दुधगांवला पायी जायचा व डबेवाल्याकडे भैय्याचा डबा सुपूर्द करायचा, माळवाडी ते दुधगांव हे अंतर सुमारे तीन किलोमीटर आहे. मनू त्यावेळी बारा वर्षांचा होता.


       एके दिवशी मनू डबा घेऊन दुधगावला गेला. तर डबेवाला आष्ट्याला निघून गेला होता. मनूने विचार केला,  "आता आपला भैय्या काय खाणार"? माळवाडीला परत जाण्यापेक्षा आष्ट्याला चालत निघाला. दुधगांव ते आष्टा हे अंतर सात कि. मी. आहे. पायात चप्पल नव्हते, डोक्यावर टोपी नव्हती, पाय भाजत होते, उन्हाचा चटका अंगाचे पाणी करत होता. तरी मनू चालत राहिला. मायेने भरलेला डबा भैय्याला पोहचविण्याचा त्याचा निर्धार पक्का होता. त्यामुळेच त्याने उन्हाची  पर्वाच केली नाही. आष्ट्यात पोहोचला. भैय्याची रूम त्याला माहित नव्हती पण एकदा त्याने कॉलेज पाहिले होते. तो कॉलेजच्या गेटजवळ गेला भैय्याची रूम कोठे आहे ते विचारून रूमवर पोहोचला.


       तुमचा डबा माळवाडीहून आला नाही असे सांगून डबेवाला निघून गेला होता. सर्व मित्रांचे डबे त्यांच्या गावावरून आले होते. ते जेवायला बसले होते. भैय्याला जेवायला बसण्यासाठी आग्रह करत होते, पण भैय्या टाळाटाळ करत होता. एवढ्यात डब्याची पिशवी घेवून मनू हजर झाला. मनूला पाहून भैय्याला आश्चर्य वाटले. मनू तू कसा आलास रे म्हणत भैय्याने त्याच्या हातातील डबा घेतला. घामाने भिजलेल्या मनूला मिठीच मारली. मनू मित्रादेखत म्हणाला, "मी दुधगांवपासून एस. टी. बसने आलोय". भैय्याने विचार केला, आता यावेळी एस. टी. बसही नाही, तसेच तिकीट काढायला पैसे कुठून आले याच्याजवळ?" भैय्याने माझ्याबरोबर जेव असा खूप आग्रह केला पण मनू जेवायला उठला नाही. त्याने विचार केला, "मी आता याच्याबरोबर जेवलो तर भैय्या संध्याकाळी काय खाणार?" मनू म्हणाला, 'भैय्या मी न्याहरी करूनच निघालोय. न्याहरी करत बसल्यामुळेच मला उशीर झाला व डबेवाला मी येण्यापूर्वी निघून गेला. तू  जेव मी गोष्टींचे पुस्तक वाचतो" असे म्हणून तो वाचनात दंग झाला. जेवण झाल्यावर भैय्या मनूला पोहचविण्यासाठी एस. टी. स्टँडवर आला. त्याच्या खिशात फक्त ६० पैसे होते. एस. टी. चे तिकीट होते पन्नास पैसे. भैय्या मनात म्हणाला छोट्या भावाला खाऊ घेवून देण्याइतकेही पैसे माझ्याजवळ नाहीत. १० पैशाचे फुटाणे घेवून दिले व ५० पैशाचे तिकीट काढून मनूला एस. टी. त बसवून भैय्या रूमकडे गेला. मनू फुटाणे खात खात दुधगावात पोहोचला व तिथून चालत  माळवाडीला आला.


       घरात मनू डबा देवून परत का आला नाही म्हणून सर्वजण काळजीत पडले होते. एवढ्या-तेवढ्या कारणासाठी फोन करण्याची सोय त्यावेळी नव्हती. डबा द्यायला हा आष्ट्याला गेला की काय असे आई म्हणत असतानाच मनू परतला, 'एवढा का रे बाळ उशीर', असे आईने विचारताच मनू म्हणाला, "डबेवाला मी जाण्याआधीच निघून गेला होता. माझा भैय्या उपाशी राहणार म्हणून मी चालत चालत आष्ट्याला गेलो व डबा देवून एस. टी. ने परत आलो. भैय्या जेव-जेव म्हणून खूप आग्रह करत होता. पण मी जेवलो नाही, मी जेवलो तर भैय्या संध्याकाळी उपाशी राहणार म्हणून त्याला मी खोटेच सांगितले की मी न्याहरी करून निघालो आहे."


       खरं तर त्या दिवशी मनू चहासुध्दा न पिता डबा पोहोचवायला गेला होता. ८-१० दिवसांनी भैय्या घरी आल्यावर त्याला समजले की मनू चहासुध्दा न पिता डबा पोहोचवायला आला होता. एस. टी. ने आलोय असे खोटेच सांगितले होते. मोठ्या भावासाठी उन्हा-तान्हात १३ कि. मी. अंतर पायी प्रवास करणाऱ्या छोट्या भावाचा भैय्याला अभिमान वाटला. मी न्याहरी करून आलोय असे सांगून भैय्यांच्या संध्याकाळच्या जेवणाची काळजी करणारा मनू बंधूप्रेमाचा उत्कृष्ट आदर्शच म्हणावा लागेल. किती दूरदर्शी विचार होते मनूचे एवढ्या लहान वयात !


      टीचभर जागेसाठी कोर्टात जाणाऱ्या, प्रसंगी जीवावर उठणाऱ्या भावांची कित्येक उदाहरणे आपण नित्य पाहतो, ऐकतो. या पार्श्वभूमीवर बंधूप्रेमाचा हा प्रसंग अप्रतिम वाटतो.


       भैय्या डी. एड. चे शिक्षण घेतल्यानंतर (इंग्लिश विषयासह) रयत शिक्षण संस्थेत नोकरीस लागला. ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्तीचे, सुखासमाधानाचे दिवस जीवन व्यतीत करत आहे. मनू उच्च पदवीधर होऊन कारखान्यात नोकरी करत आहे. दोघांचाही संसार सुखाने चालला आहे. आजही बंधूप्रेम टिकून आहे. एकाला टोचले तर, दुसऱ्याला वेदना होतात. बंधूप्रेमाने चिंब झालेले माझे भाऊ बहिणींच्यावरही प्रेमाचा वर्षाव करतात. आम्ही एकत्र आल्यावर म्हणतो, "गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी!"


मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२

"दो बदन" - आत्मकथन भाग १


"दो बदन" - आत्मकथन भाग १

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


       साधारण आठ-नऊ वर्षाची असेन मी त्यावेळी! आमच्या घराजवळच असलेल्या गुरलिंग आंबोळे यांच्या दुकानात एक नवीनच चीज विक्रीसाठी आली होती. कागदी बोर्डवर वेगवेगळ्या आकर्षक रंगात लावलेली ही चीज चमचम चमकत होती. मी दुकानात दुसरा माल घेण्यासाठी गेले होते; पण माझे लक्ष त्या चीजकडेच लागले होते. न राहवून मी त्या काकांना विचारले, "हे हो काय काका नवीनच विकायला आणलयं?" ते म्हणाले, "यांना दो बदन म्हणतात हे वेणीला लावायचे असतात." मी निरखून त्यांच्याकडे पाहिले त्यात खरोखरच दोन मोठे रंगीत चमकणारे मणी दिसत होते. वेणीला फक्त रिबन लावतात हे माहित असलेल्या मला त्या दो बदनचं फारच कौतुक वाटलं, हे वेणीला लावल्यावर कित्ती छान दिसतील वेण्या अशी कल्पना करत दो बदन.... दो बदन असे वारंवार म्हणतच घरी परतले. हे नाव माझ्या दृष्टीने अगदी नवे होते पाठ व्हायला पाहिजे ना!

     

      दुसऱ्या दिवशी दुसरा माल आणण्यासाठी दुकानात गेले. दो बदनकडे पाहिले व काकांना विचारले, "काका, दो बदन केवढ्याला एक मिळते हो?" ते म्हणाले, "तीस पैशाला एक." किंमत ऐकून माझा चेहरा शॉक बसल्यासारखा झाला. तीस पैसे म्हणजे त्यावेळी माझ्या दृष्टीने मोठी रक्कम होती. त्यात मी दोन वेण्या घालायची म्हणजे साठ पैसे हवेत. कोठून आणायचे साठ पैसे? खूप विचार केला. आई-वडिलांकडून ६० पैसे मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. आम्हाला पोटभर अन्न, अंगभर कपडा-लत्ता व शाळेचा खर्च भागवताना त्यांची किती दमछाक होते हे आम्ही पहात होतो, अनुभवत होतो. दो बदन घेण्याची अनिवार इच्छा होती; पण करायचे काय? विचारचक्र सुरूच होते.


       त्यावेळी डिसेंबर-जानेवारी महिना सुरू होता. भुईमुगाच्या शेंगाची सुगी संपलेली होती. शेंगाची तोडणी, वेचणी व उकरणीही झाली होती. दिवाळीच्या सुट्टीत आमचे हे काम दिवसभर सुरू होते. शाळेला दांडी मारूनही ही कामे आम्हाला करावीच लागायची. कारण चार पैसे मिळविण्याची संधी या सुगीत मिळायची. सुगी संपली होती. वरील सर्व कामे संपली तरी एक काम बाकी होते. शेंगाच्या वेल जेव्हा जमिनीतून वर काढला जातो त्यावेळी बऱ्याचशा शेंगा जमिनीवर पडतात. वेलाला असणाऱ्या शेंगांची तोडणी झाली की पडलेल्या शेंगांची वेचणी केली जाते. त्यानंतर सुरू होते उकरणी. छोटा दांडा असलेल्या खोऱ्याने जिथून वेल काढला आहे तिथून वेल उपटताना जमिनीत एखादी-दुसरी शेंग मिळाली तर काढून घेण्याचे काम करण्याचे मी ठरविले. माझा हा मनोदय माझ्या मैत्रिणीला सुमनला सांगितला. या रविवारी आपण दोघी अशा शेंगा उकरायला जावू या. शेंगा विकून दो बदन विकत घेऊ या. तिलाही हा बेत आवडला. रविवारी सकाळी लवकर उठून आईने सोपवलेली नित्याची कामे उरकून, बुट्टी, खोरे जेवणाचा डबा घेवून मी व सुमन या दो बदन खरेदी करण्याच्या मोहिमेवर निघालो. एका शेतात शेंगा उकरण्यास सुरूवात केली. मोठ्या मुश्किलीने एक-एक शेंग मिळत होती. एक-दोन शेंगासाठी बुट्टीभर माती ओढावी लागत होती. पण आम्ही प्रयत्न सोडला नव्हता. दो बदन वेणीला लावायचे होते ना!


       सूर्य डोक्यावर आला. उन्हाचा चटका जाणवू लागला. पण ६० पैसे मिळतील एवढ्या शेंगा बुट्टीत जमल्या नव्हत्या. दोघीनी बांधावरच्या झाडाखाली बसून डब्यातील भाकरी खाल्ली व पुन्हा शेंगा उकरण्यास सुरूवात केली. हात खूपच दुखू लागले होते. मध्येच हातातील खोरे खाली टाकून तळहात पाहिला तर हात लालेलाल झाला होता. व त्यावर चार फोड उठले होते. ते पाहून मनात म्हटले, "दो बदन घालायचे आहेत म्हटल्यावर एवढा त्रास सोसावाच लागेल." हातात कापड घेऊन खोरे घेतले त्यामुळे तळहात दुखायचा थांबला काहीसा! सूर्य मावळतीकडे झुकला होता. साधारण चार वाजून गेले असावेत. आम्ही दोघी खूप दमलो होतो. घरी जाण्याचा निर्णय घेतला. वाटेतच दुकान होते. शेंगा विकून माल घ्यायची सोय होती. दुकानदाराने शेंगा मापात घालून बघितल्या. माप भरण्यास थोड्या कमी होत्या. त्यामुळे मुलांना त्यांनी पन्नास पैसे होतात असे सांगितले. आम्ही दोघी काकुळतीला येऊन म्हणालो, "पुन्हा कधी तरी थोड्या जास्त शेंगा आणून देऊ आता आम्हाला हे दोन बदन द्या." त्यांनी दोघींनाही दोन-दोन दो बदन दिले. मला आजही आठवतात कष्टाने मिळविलेले ते दो बदन. त्यांचा रंग मेहंदी होता. किती अप्रुप वाटलं ते दो बदन वेणीला घालताना. दुसऱ्या दिवशी वेण्या पुढे घेऊन शाळेतील मैत्रिणींना दाखवताना किती सुखावून गेले मी! हाताला आलेले फोड कांही दिवसांनी बरे झाले पण ते दो बदन मी २-३ वर्षे सणावाराला, कार्यक्रमाला वापरले!


       परवा ईदच्या आधी झाडून काढताना माझ्या मुलींचे, सुनेचे, नातीचे बो, क्लिपा, खेकडा, क्लचर, आकडे, बिटस, बांगड्या, हार, कुड्या, डूल, झुबे एकत्र केले तर प्रत्येकीची एक मोठी प्रवासी बॅग भरेल एवढ्या वस्तू होत्या. त्या पाहून मला त्या 'दो बदन' ची आठवण झाली व त्यांना ही हकीकत सांगितली. कष्टातून शिक्षण घेऊन मुलांना सर्व सुखसोयी मिळवून देणाऱ्या माझ्या सर्व वाचक बंधू भगिनींना एक विनंती करते, आपल्या मुलांना अशा कष्टाची, कष्टातून मिळणाऱ्या आनंदाची अनुभूती कशी मिळणार? निदान त्यांना आपण भोगलेल्या कष्टाच्या हकीकती सांगून तरी अशी अनुभूती देण्याचा प्रयत्न करू या...!


बुधवार, २९ जून, २०२२

आठवणीच्या हिंंदोळ्यावर अर्थात माझे आत्मकथन


आठवणींच्या हिंंदोळ्यावर: अर्थात माझे आत्मकथन

                    ✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


प्रस्तावना:

       आत्मचरित्र लिहिण्याइतकी महान व्यक्ती मी नक्कीच नाही. मी एक सर्वसामान्य प्राथमिक शिक्षिका. प्रामाणिकपणे ३८ वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्याची संधी ईश्वराने मला दिली. सेवा बजावत असतानाच शिक्षण घेण्यासाठी धडपडणारी व लिहिण्याचा थोडाफार प्रयत्न करणारी शिक्षिका.


       माझ्या लेखनाला जिव्हाळ्याने प्रतिसाद देणाऱ्या रसिक वाचकांपुढे माझ्या जीवनप्रवासातील कांही संस्मरणीय प्रसंग सांगण्याचा मोह मला आवरता आला नाही हेच खरे. माझ्या जीवनात आलेले प्रसंग, सोसलेल्या व्यथा कदाचित् तुम्हा सर्वांच्याही जीवनात आल्या असतील याची मला पूर्ण जाणीव आहे. निवृतीचा उंबरठा ओलांडून जीवन उपभोगताना मागे वळून पाहिले असता मनात साठवलेले, सहज आठवलेले प्रसंग लिहिण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न......वाचकांना निश्चित आवडेल. वाचक कांही क्षण मंत्रमुग्ध होतील असा विश्वास वाटतो.


       हे सर्व लेख दैनिक युवकांचा नवा महाराष्ट्र या  वृत्तपत्रातून रविवार विशेष पुरवणीत प्रसिद्ध झाले आहेत. कांही लेख दैनिक पुढारीच्या कस्तुरी पुरवणीतून व कांहीं लेख दैनिक सकाळच्या मधुरा पुरवणीतून प्रकाशित झाले आहेत. या सर्व लेखांना रसिक वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. ब्लॉग वाचकांकडून सुध्दा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे....