उत्कृष्ट प्राध्यापक, मुत्सद्दी प्रशासक, आदर्श तत्त्वज्ञ, विद्वान, बुद्धिवंतांचा मुकूटमणी आणि सामान्य प्राध्यापकापासून भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारे गुरुंचे गुरू डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर, भारत सरकारतर्फे 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त हा विशेष लेख....
गुरूंचे गुरू भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - विशेष लेख
✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी
अल्प परिचय:
आंध्रप्रदेश जिल्हा चित्तूरमधील तिरूपती बालाजी या तीर्थक्षेत्राजवळच तिरुत्ताणी गांवात ५ सप्टेंबर १८८८ साली त्यांचा जन्म एका पंडितांच्या घरी झाला. त्यांची परिस्थिती बेताची होती पण ते विद्वान होते. घरात सुसंस्काराचे, ईश्वरभक्तीचे वातावरण होते. त्यांना चार भाऊ व एक बहीण होती. लहानपणीच ते पूजापाठ, मंत्रघोष याचे अनुकरण करायचे. सदाचार व सुविचार यांचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण तिरूपतीतील शाळेत झाले. लहानपणीच ते वाचन, मनन, लेखन यात मग्न असायचे. तीव्र बुद्धिमत्ता, चांगली स्मरणशक्ती व संवेदनशील मन यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व उत्तरोत्तर संपन्न होत गेले. माध्यमिक शिक्षणासाठी ते लूथरन या मिशनरी शाळेत गेले. त्या शाळेतून ख्रिस्ती धर्माचा प्रसार अधिक केला जायचा. या वातावरणामुळे त्यांच्या मनात आध्यात्मिक जीवनाविषयी ओढ वाटू लागली. हिंदू धर्माविषयी, परंपरेविषयी, तत्वज्ञानाविषयी त्यांनी जे ऐकले त्यामुळे त्यांच्या श्रद्धेला हादरे बसले आणि हिंदू धर्म, परंपरा आणि तत्वज्ञान यांचा चिकित्सक अभ्यास करणे त्यांना आवश्यक वाटले. हिंदू धर्मातील कांही रुढी, परंपरा, जातीयता, भेदभाव, अंधश्रद्धा मानवतेसाठी दूर झाल्या पाहिजेत हे त्यांना पटले. वयाच्या पंधराव्या वर्षी ते मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पदवी परीक्षेसाठी इतिहास व गणित विषयाची गोडी असूनही त्यांनी तत्वज्ञान विषय निवडला. त्यांचा पिंडच तत्वज्ञानाचा होता. बी. ए. च्या परीक्षेत ते प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. एम्. ए. ला त्यांनी प्रबंधासाठी "वेदांतातील नीतिशास्त्र" हा विषय निवडला व सखोल अभ्यास करून त्यांनी तो प्रबंध सादर केला. त्या प्रबंधास प्रथम श्रेणी मिळाली.
ज्ञानार्जनाकडून ज्ञानदानाकडे:
१९०९ मध्ये ते मद्रास प्रेसिडेन्सी काॅलेजमध्ये प्राध्यापक झाले. तेंव्हापासून चाळीस वर्षे त्यांनी प्राध्यापक, कुलगुरु आदि पदावर कामगिरी बजावली. ज्ञानार्जनाकडून ज्ञानदानाकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. ते विद्यार्थ्यांना अंधारातून उजेडाकडे नेणारे दीपस्तंभ बनले. त्यांची राहणी साधी पण नीटनेटकी असे. त्यांची वाणी मधुर होती. इंग्रजी व संस्कृत बोलण्याची त्यांची शैली आकर्षक होती. त्यांची अध्यापनाची हातोटी वेगळी होती. त्यामुळे ते विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक झाले नसते तरच नवल! त्यांची ख्याती ऐकून म्हैसूर येथील नवीन विद्यापीठात तत्वज्ञानाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
अग्रणी भारतीय विचारवंत:
आर्यांच्या सनातन धर्मापासून ते शंकराचार्यांच्या हिंदू धर्मापर्यंत त्यांनी चिंतन, मनन केले. वेद, वेदांग, उपनिषदे गीता यांचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता. हिंदू धर्माचे सर्वसमावेशक स्वरूप बहुजन सुखाय बहुजन हिताय ही शिकवण रूजविण्यासाठी त्यांनी अनेक लेख लिहिले. त्यांचे सुंदर शैलीतील ग्रंथ, रसाळ व्याख्याने आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमधील प्रभावी सहभाग यामुळे एक अग्रणी भारतीय विचारवंत म्हणून जगात त्यांची कीर्ती पसरली. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर आणि लोकमान्य टिळक यांनी त्यांचा गौरव केला. त्यांच्या अथांग विद्वत्तेपुढे पाश्चिमात्य विद्वान धर्मपंडीतही नतमस्तक झाले होते. त्यांनी राधाकृष्णन यांना अर्वाचीन महर्षि ही पदवी दिली. डॉ. राधाकृष्णन यांचा 'रेन ऑफ रिलीजन इन् काॅन्टेम्पररी फिलाॅसाफी' या ग्रंथातून भारतीय वेदांताची आध्यात्मवादी तत्कालीन परिभाषेतील मांडणी जगासमोर आली. म्हैसूर मध्ये कार्यरत असताना कोलकत्ता विद्यापीठाकडून की जे ज्ञानोपासनेचे एक सर्वश्रेष्ठ केंद्र होते त्यांच्याकडून आमंत्रण आले, त्यांनी ते स्विकारले. ते घोड्याच्या बग्गीतून रेल्वे स्टेशनकडे निघाले. त्यांना निरोप देण्यासाठी व्यथित अंतःकरणाने जमलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या बग्गीचे घोडे सोडले आणि बग्गी स्टेशनपर्यंत ओढत नेली. ते प्रेम, तो आदर पाहून राधाकृष्णन भारावून गेले.
ज्ञानगंगेत पोहणारा तत्वज्ञानी:
जून १९२६ मध्ये इंग्लंडमध्ये विद्यापीठ परिषदेसाठी कोलकता विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित होते. १९२६ मध्येच अमेरिकेतील हाॅवर्ड विद्यापीठात सहावी आंतरराष्ट्रीय तत्वज्ञान परिषद झाली. त्या परिषदेत त्यांनी 'माया सिद्धांतः काही समस्या आणि तत्वज्ञानाचे संस्कृतीमधील कार्य' या विषयावर व्याख्यान देऊन श्रोत्यांवर विलक्षण पकड घेतली. भौतिक प्रगतीला जर आध्यात्मिकतेची जोड दिली नाही तर मानवाला खरी सुखशांती लाभणार नाही हे शाश्वत तत्व त्यांनी बिंबवले. श्रोत्यांच्या मनात भारतीय तत्त्वज्ञानाविषयी आस्था व आदर निर्माण झाला. १९२३ मध्ये त्यांचा इंडियन फिलाॅसाफी खंड पहिला व १९२७ मध्ये खंड दुसरा प्रसिद्ध झाला.
राधाकृष्णन यांना अनेक मानसन्मान मिळाले. आंध्र विद्यापीठ, मद्रास विद्यापीठ यांनी त्यांना 'डॉक्टरेट' ही पदवी दिली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनेस्को संघटनेने त्यांना कार्यकारी सदस्य केले. कांही काळ ते युनेस्कोचे अध्यक्ष झाले. पंडीत मालवीय यांच्या निधनानंतर १९४८ साली ते बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलपती झाले. त्याच वर्षी भारत सरकारच्या युनव्हर्सिटी कमिशनचे ते अध्यक्ष झाले. १९४९ ते ५२ या कालावधीत ते भारताचे रशियात राजदूत होते. त्यावेळी रशियाचा सर्वाधिकारी असलेल्या स्टॅलिनसारख्या कडक पोलादी पुरुषावरदेखील डॉ. राधाकृष्णन यांचा प्रभाव पडला. तो म्हणाला, "चोवीस तास ज्ञानगंगेत पोहणारा तत्वज्ञानी महापुरूष या जगात जर कोणी असेल तर तो फक्त डाॅक्टर राधाकृष्णन!"
प्राध्यापक ते राष्ट्रपती:
डॉ. राधाकृष्णन यांची सन १९५२ मध्ये भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. या पदावर असताना त्यांनी रशिया, अमेरिका, जर्मनी, पोलंड, बल्जेरिया, झेकोस्लोवाकिया, हंगेरी, आफ्रिका आदि देशाचे दौरे केले. देशादेशातील संघर्ष मिटावेत, वर्णभेद दूर व्हावेत, आर्थिक शोषण थांबवावे आणि आखिल मानव जातीचे कल्याण व्हावे या भारताच्या भूमिकेचा हिरिरीने प्रचार व प्रसार केला. १९५८ साली त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब प्रदान करण्यात आला. १२ में १९६२ रोजी भारताचे राष्ट्रपती म्हणून डॉ. राधाकृष्णन यांची निवड झाली. १९६७ साली ते राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाले.
राधाकृष्णन यांचे महान कार्य:
डॉ. राधाकृष्णन शांततेचे पुरस्कर्ते होते. आपल्या भाषणातून व लेखनातून त्यांनी सतत शांततेचा पुरस्कार केला. जगाला शांततेची गरज आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी जवळजवळ पस्तीस पुस्तके लिहिली. त्यात वेद, उपनिषदे, भारतीय तत्त्वज्ञान, रामायण, टागोरांचे तत्वज्ञान, महाभारत, भारत आणि चीन, गौतम बुद्ध, पूर्व आणि पश्चिम, महात्मा गांधी, हिंदू धर्म आदि पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे जीवन ऋषीतुल्य होते. निगर्वीपणा, साधेपणा हा त्यांच्या स्वभावाचा मोठा गुण होता. ते आदर्श शिक्षक होते. सर्व शिक्षकांबद्दल त्यांना आदर वाटायचा. शिक्षकाला समाजात मानाचे स्थान असले पाहिजे असे ते म्हणायचे. शिक्षकांनी सदैव आपले ज्ञान वाढविले पाहिजे, आपल्या पवित्र आचरणाने समाजापुढे, विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण केला पाहिजे, निर्भय बनून समाजाला सुयोग्य मार्गदर्शन केले पाहिजे, विद्यार्थ्यांवर संस्कार घडविले पाहिजेत, सुसंस्कारित, सुखी, समृद्ध जीवन हेच शिक्षणाचं खरं ध्येय आहे, असे शिक्षण देणाऱ्या आदर्श शिक्षकांचा समाजाने सत्कार केला पाहिजे, शिक्षकाला गुरू ही संज्ञा आहे, गुरू ला देव मानण्याची भारताची थोर परंपरा आहे असे ते म्हणत. पाश्चिमात्य राष्ट्रानी जगाला विज्ञान दिले तर डॉ. राधाकृष्णन यांनी जगाला तत्त्वज्ञान दिले. बालवयातील तेजस्वी बुद्धी पाहून त्यांचे वडील म्हणाले, "उच्च शिक्षणाकरिता तुला मी परदेशात पाठवेन" तेंव्हा त्यांनी हजरजबाबी प्रत्युत्तर दिले, "बाबा, शिकण्याकरिता नाही तर मी शिकविण्याकरिता परदेशी जाईन" हे बोल त्यांनी खरे करून दाखविले. परदेशात तत्त्वज्ञानासारख्या कठीण विषयाचे आंतरराष्ट्रीय कीर्तिचे प्राध्यापक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवून भारताचे मोठेपण जगात सिद्ध केले.
अशा या थोर ऋषीतुल्य थोर शिक्षकाची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी भारतभर आपण पाच सप्टेंबर हा डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आपण देखील डॉ. राधाकृष्णन यांचा आदर्श समोर ठेवून नेहमी विद्यार्जनासाठी निष्ठेने कष्ट करून, आपल्या गुरूजनांविषयी आदराची भावना ठेवून ज्ञान दीप हातात घेऊन अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करु या.
डॉ. राधाकृष्णन यांचे १९७५ रोजी दुःखद निधन झाले.
अशा या महान तत्वज्ञानी थोर विभूतीस कोटी कोटी प्रणाम !