शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

साप: शेतकऱ्यांचा खराखुरा मित्र - विशेष लेख


साप: शेतकऱ्यांचा खराखुरा मित्र - विशेष लेख

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल

       नागपंचमीच्या सणादिवशी नागोबाची पूजा केली जाते. इतर अनेक पाळीव प्राण्याप्रमाणेच सापाची आपण मोठ्या भक्तिभावाने पूजा करतो. पण ही पूजा अंधश्रध्देतून केली जाते. कारण माणसाला सापाची खरी ओळख झालीच नाही. पर्यावरण संतुलनात सापाचं विशेष महत्त्व आहे.


सापांबाबत गैरसमजुती वा अंधश्रद्धा:

       साप हा पूर्णपणे मांसाहारी आहे. तो लाह्या खात नाही. तहानलेल्या सापापुढे दूध ठेवले तर ते पाणी समजून दूध पितो परंतु पाणी नाही हे समजल्यावर आपोआप तोंड बाजूला करतो. दूध पिल्यामुळे त्याला न्यूमोनिया होण्याची दाट शक्यता असते.


       साप पुंगीच्या तालावर नाचतो हाही एक गैरसमज आहे. खरं तर तो पुंगीच्या हालचालीप्रमाणे आपल्या फण्याची हालचाल करतो. आपल्याला वाटते तो डुलत आहे.


       सापाच्या डोक्यावर कोणताही मणी नसतो. सापाचं गुप्त धनाशी कांही देणंघेणं नसतं. साप डूख धरतात या समजुतीला कांहीही शास्त्रीय आधार नाही. साप विशीष्ट कालावधीनंतर कात टाकतो. सापाची कात नीटपणे निघून गेली नाही तर ती सापाच्या शरीरावर असतांना पांढऱ्या केसांसारखी दिसते.


       नागपंचमीची पूजा ही सापांच्या हालाची पर्वणी असते. गारूडी हाल हाल करून त्यांना पकडून ठेवतात. त्यामुळे त्यांना कित्येक दिवस उपाशी रहावे लागते. त्यांना नाईलाजाने दूध पिल्यामुळे आजारी पडावे लागते. फोटो काढण्यासाठीही सापांचा उपयोग केला जातो. दुसऱ्या दिवशी बिचारे साप मरून पडतात.


सापांविषयी अधिक माहिती:

       स्वतःच्याच धुंदीत तुरूतुरु सरपटणारा हा प्राणी कधी कधी धडकी भरवतो. केवळ स्पर्शज्ञान असलेल्या सापाला कुणाशीही देणंघेणं नसतं. केवळ स्वसंरक्षणासाठी तो चावतो. चुकून त्याच्यावर पाय पडला किंवा त्याला स्पर्श झाला तरच तो चावतो. तो निघतो सावज शोधण्यासाठी दुर्दैवाने वस्तीत येतो आणि त्याचं आयुष्य संपून जातं.


       भारतात समुद्रसर्प आणि जमिनीवरील चार साप सोडले तर बाकी साप बिनविषारी आहेत. नाग, मण्यार, फुरसं आणि घोणस हे ते चार विषारी साप आहेत. सापाच्या एकूण २३८ जाती आहेत. याचा अर्थ असा की केवळ दोन टक्के साप विषारी आहेत.


साप शेतकऱ्यांचा मित्र कसा ?

       शेतात पिकविल्या जाणाऱ्या अन्नधान्यातील सुमारे १६ टक्के धान्य उंदीर खाऊन फस्त करतात, तर साठवणीतील सुमारे १० टक्के अन्न उंदीर खाऊन टाकतात व सशक्त बनतात आणि पिलावळीचं लटांबर निर्माण करतात. उंदीर हे सापाचं नैसर्गिक खाद्य आहे. धामण नावाचा साप शेतकऱ्यांचा खराखुरा मित्र आहे कारण हा साप केवळ उंदीरच खातो. विशेष म्हणजे हा साप बिनविषारी आहे. एक धामण आठवड्याला किमान सहा उंदीर खाते. अशा प्रकारे एक धामण आपल्या संपूर्ण जीवनात सुमारे सत्तर हजार उंदीर खाते. एवढी महत्त्वाची भूमिका धामण साप पार पाडत असताना केवळ अंधश्रद्धेपायी आणि भीतीपोटी दिसला साप की मारून टाकतो. हे बरे नव्हे.


सर्पविष  अनमोल कसे? 

       साप चावल्यानंतर त्याचं विष चढू नये म्हणून खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. सरकारी दवाखान्यात विषविरोधी इंजेक्शन घेणं केंव्हाही फायद्याचे आहे. हे इंजेक्शन सर्पविषापासून तयार केलं जातं. त्यामुळे विषारी साप मारून टाकण्याऐवजी ते पकडून हाफकिन संस्थेला पाठवून द्यावेत. सर्पाच्या विषामध्ये कितीतरी प्रकारची वितंचकं (enzymes) असतात. त्यांचा वापर प्रतिविषासारखी औषधे तयार करण्यासाठी होतो. अनेक प्रकारच्या कठीण अशा रासायनिक व जीवरासायनिक प्रक्रियाना गती देण्याचं कार्य करता येतं.


ढोलगरवाडीची शास्त्रीय नागपंचमी:

       कोल्हापूर जिल्ह्यातील ढोलगरवाडी या छोट्या गांवी सर्पमित्र बाबूराव टक्केकरव त्यांचे शिष्यगण सर्पप्रदर्शन भरवतात. सर्पांचे चित्तथरारक खेळ सादर करतात. त्याचप्रमाणे सर्पाविषयी शास्त्रीय माहिती देतात. त्यांच्या सर्पालयात तीनशेहून अधिक सर्पांच्या जाती आहेत. विषारी, बिनविषारी वेगवेगळ्या रंगांचे अनेक प्रकारचे सर्प येथे पहावयास मिळतात. ढोलगरवाडीची ही शास्त्रीय नागपंचमी देशाला मार्गदर्शन करणारी आहे.


सारांश:

       पर्यावरण संतुलनात सर्पांचे विशेष महत्त्व आहे. अन्नसाखळीतील तो एक महत्त्वाचा दुवा आहे. साप जगवणं म्हणजे पर्यावरण संतुलनासाठी सापांची मदत घेणं होय. १९७२ च्या कायद्यान्वये सापांना पूर्ण संरक्षण दिले आहे. या कायद्याप्रमाणे साप पकडणे, बाळगणे किंवा मारणे हा गुन्हा आहे. अशाप्रकारे येणारी नागपंचमी सापांचे संवर्धन, संरक्षण करण्यास उपयुक्त ठरावी.


सर्व वाचक बंधू भगिनींना नागपंचमी निमित्त हार्दिक शुभेच्छा ।


शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

आईचे दूध अमृततुल्य - विशेष लेख


दि.१ ते ७ ऑगस्ट हा स्तनपान सप्ताह म्हणून पाळला जातो त्यानिमित्त आईच्या दुधाचे महत्त्व सांगणारा हा खास लेख....


आईचे दूध अमृततुल्य - विशेष लेख

डॉ. ज्युबेदा तांबोळी  


फोटो साभार: गूगल


       मातेच्या दुधाची तुलना जगातील कुठल्याही पेयांशी अथवा कोणत्याही पदार्थाशी होवू शकत नाही, म्हणून मातेचे दूध बाळासाठी अमृततुल्य आहे.


आईच्या दुधाचे महत्त्व सांगणारे एक वास्तव व बोलके उदाहरण....

       राजधानी दिल्लीतील एका रूग्णालयात दाखल नवजात बाळासाठी दररोज १००० कि. मी. अंतरावरील लडाखमधून त्याच्या आईचे दूध येत असल्याचे सांगितले तर सहजासहजी विश्वास बसणार नाही पण ही सत्यघटना माझ्या वाचनात आली आहे.

       लेहमधील सोनम नुरबू मेमोरियल रूग्णालयात १६ जून २०२० रोजी तीस वर्षिय दोर्जे पाल्मो या महिलेने सिझेरियन पद्धतीने बाळाला जन्म दिला पण बाळाची श्वसननलिका अन्ननलिका एकत्र जोडलेले असल्याने त्याला दूध पिता येत नव्हते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाला तातडीने दिल्लीतील रूग्णालयात दाखल करण्यात आले परंतु सिझेरीनमुळे त्याच्या आईला दिल्लीला जाता आले नाही. सुरूवातीला बाळाला पावडरचे दूध पाजले जात होते पण बाळ ते दूध पीत नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर बाळाचे वडील जिकमेंट वांगडू यांनी दररोज मालवाहू विमानाने थेट लडाखमधून आईचे दूध आणण्याची व्यवस्था केली. त्यांचे कांही मित्र लडाख विमानतळाहून दररोज विस्तारा एअरलाईन्सच्या विमानाने दिल्ली विमानतळावर दूध पाठवून देतात. यानंतर बाळाचे बाबा किंवा मामा तेथून दूध रूग्णालयात घेऊन जातात. बाळावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून बाळाची तब्बेत आईच्या दुधामुळे एकदम सुधारली. विशेष म्हणजे विमान कंपनीने दुधाची सेवा निःशुल्क उपलब्ध करून दिली. सदर विमान प्रवासासाठी सुमारे एक तास पंधरा मिनिटे लागतात. सांगायचं तात्पर्य आईचे दूध बाळासाठी अमृतासमान आहे.

संदर्भ: दै. पुण्यनगरी २२ जुलै २०२०


आईच्या दुधाचे महत्त्व: पौष्टिकता

       आईच्या दुधात उच्च दर्जाची प्रथिने, ओमेगा ३ फॅटी ऍसिड व बाळाला शक्ती येण्यासाठी लॅक्टोज ही नैसर्गिक साखर असते, तसेच पिष्टमय पदार्थ, स्निग्धता, खनिज द्रव्य, अ जीवनसत्त्व व पाणीदेखील आईच्या दुधात संतुलित आणि आवश्यक त्या प्रमाणात असते. महत्त्वाचे म्हणजे आईच्या दुधात पांढऱ्या पेशी भरपूर असतात. त्या रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. थोडक्यात आईचे दूध बाळासाठी परिपूर्ण आहार असून, आरोग्य आणि बुद्धीवर्धक आहे. शिवाय ते निर्जंतुक असते. आईचे दूध योग्यवेळी व आवश्यकतेनुसार कोठेही बाळाला देता येते. आईचे दूध पचण्यास अगदी हलके असते. त्यामुळे अतिसार, ताप, खोकला, न्युमोनिया अशा आजारांपासून बाळाचे संरक्षण होते. दोन वर्षापर्यंत बाळाच्या मेंदूची वाढ झपाट्याने होत असते. मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असणारे ऍरोकिडाॅनिक ऍसिड आईच्या दुधात योग्य प्रमाणात असते. आईच्या दुधात टाॅरिन हे अमायनो ऍसिड असते. ते मुलाच्या नेत्रपटलांच्या गुंफणीला आवश्यक असते.


कोलेस्ट्रम अर्थात जीवनरस:

       बाळाच्या जन्मानंतर आईच्या स्तनातून चिकासारखा एक घट्ट द्रवपदार्थ पाझरतो, त्याला कोलेस्ट्रम म्हणतात. बाळाच्या जन्मानंतर लवकरात लवकर बाळाला स्तनपान द्यावे, म्हणजे महत्त्वाचे घटक आईच्या दुधातून पेशीद्वारे बाळाच्या रक्तात मिसळतात व रक्ताभिसरणाद्वारे बाळाच्या पेशीत कार्यरत होतात. तेथे त्यांची वाढ व विस्तार होतो व बाळाची प्रतिकारशक्ती कायम रहाते. महत्त्वाचे म्हणजे जंतुसंसर्ग होण्याची भीती रहात नाही. एवढेच नव्हे तर कोणत्याही ऍलर्जीपासून बाळाचे रक्षण होते.


बाळाला कोलेस्ट्रम कसे द्यावे? 

       बाळंतपण होताच बाळ रडल्याची खात्री करून घ्यावी व बाळाचे शरीर स्वच्छ सुती कपड्याने पुसून घ्यावे. तळहात व तळपाय मात्र न पुसताच बाळाला आईच्या दोन्ही स्तनांच्या आत पालथे झोपवावे म्हणजे बाळ आईला घट्ट चिकटते व आईला पान्हा फुटून स्तनात दुग्धनिर्मितीचे हार्मोन्स स्त्रवू लागतात. कारण आईच्या स्तनाग्राचा गंध व बाळाच्या हातापायाचा गंध सारखाच असतो. त्यामुळे आईच्या स्तनाला बाळाच्या हातापायाचा स्पर्श होताच बाळाला स्तनाकडे जाण्याचा मार्ग सापडतो. बाळ स्तनाचा स्पर्श स्वतःहून शोधून काढतो आणि स्तनपान घेण्यास सुरुवात करतो. पूर्वी बाळंतपण घरीच होत असे, तेंव्हा अशीच प्रथा होती. आई जन्मानंतर थोड्याच वेळात स्तनपान देत असे. त्यामुळे बाळाला आजीवन प्रतिकारशक्ती असलेला द्रव आईच्या दुधातून मिळत असे. बाळंतिणीची तब्येत बरी नसल्यास किंवा सीझर झालेले असल्यास नर्स अथवा घरच्या नातेवाईकांनी बाळाला आईच्या दोन्ही स्तनांच्या आत धरून पालथे झोपवावे आणि स्तनपान देण्यास सुरुवात करावी.


स्तनपान आईसाठी लाभदायक:

       स्तनपानाद्वारे बाळाची आईबरोबर भावनिक, मानसिक शक्ती वाढते व झोप चांगली लागते. म्हणून आईने दिवसभरात तीन ते चार वेळा संतुलित आहार घ्यावा व आपल्या बाळास स्तनपान द्यावे त्यामुळे मातेच्या आरोग्याचे धोके कमी होतात. आईचे गर्भाशय लवकर आकुंचन पावण्यास मदत होते. प्रसूतीनंतर होणारा रक्तस्त्राव कमी होतो. स्तनपान दिल्यास स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार जगभरात दरवर्षी आठ लाख बालकांचा तर वीस हजार महिलांचा कर्करोगाने मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी बाळाच्या जन्मानंतर लवकरात लवकर आणि किमान दीड ते दोन वर्षापर्यंत मातेने बाळाला स्तनपान दिले पाहिजे. स्तनपान दिल्यास गर्भारपणात वाढलेले वजन सहज कमी होते. दररोज ५०० कॅलरीज कमी होतात. त्यामुळे स्त्रियांना वजन कमी करण्यासाठी कुठलाही खटाटोप करण्याची गरज नसते. आजकाल आपले सौंदर्य कमी होईल म्हणून स्तनपान न देण्याची पद्धत वापरली जाते. भावी काळात अशा मुलाने म्हणजे आईचे दूध मिळाले नसलेल्या मुलाने आईला घराबाहेर काढले किंवा दुर्लक्ष केले तर नवल वाटायला नको.


       म्हणून सांगावेसे वाटते की बाळाच्या आरोग्याचा विचार करून मनसोक्त स्तनपान द्यावे. बाळाला स्तनपान देणे बाळ दिसामिसांनी वाढतांना बघणे हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. तो आनंद घेऊन आपल्या बाळाचे भावी आयुष्य निरोगी करावे. उज्ज्वल करावे हीच सर्व मातांना कळकळीची विनंती ।


शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

संत नामदेव महाराज - विशेष लेख


संत नामदेव महाराज यांची ६ ऑगस्ट रोजी पुण्यतिथी आहे त्यानिमित्त हा विशेष लेख.


संत नामदेव महाराज - विशेष लेख

डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: twitter.com


       आपल्या देशात संतांचे एक वेगळे योगदान आहे, वेगळे अधिष्ठान आहे.  संतांनी लोकांना दया, परोपकार, त्याग, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखे आहेत. सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहेत अशी समतेची शिकवण संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली.


अल्पपरिचयः

       संत नामदेव शिंपी समाजातील होते. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली व जनतेत जागृती निर्माण केली. संत ज्ञानेश्वरांबरोबर ते महाराष्ट्रभर फिरले. लोकांना गाढ भक्तीची शिकवण दिली. धर्मरक्षणाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला. महाराष्ट्रात त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात.


संत नामदेव महाराज यांचे योगदान:

       संत नामदेव महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नाहीत तर संपूर्ण भारताचे आराध्य संत आहेत. पांडुरंगाच्या सर्वश्रेष्ठ भक्तराजांत त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या किर्तनात स्वतः विठूमाऊली डुलत असत, अशी आख्यायिका आहे. आपल्या संतपरंपरेने भागवत संप्रदायाचा पाया भक्कम केला. या संप्रदायाच्या यादीतून विठ्ठलाच्या लाडक्या भक्ताला म्हणजेच संत नामदेवांना दूर ठेवणं, हा आपले आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाचाही अपमान ठरेल. मराठी साहित्य भारतभर नेण्याचं काम संत शिरोमणी नामदेव महाराजांनी केले. भागवत धर्माची पताका हातात धरणं ही अभिमानाची गोष्ट आहे, हे जातीधर्माच्या पलीकडे जाऊन सांगितले. नामदेव महाराजांनी महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या विकासाची पताका भारतभर फडकवली. तसेच वारकरी संप्रदायाचा पाया भक्कमपणे भरण्यात खूप मोठं योगदान दिलं. संत ज्ञानेश्वरांना समकालीन असलेल्या संत नामदेवांनी माऊलीनंतर पन्नास भक्तीचा महिमा सांगितला.


       संत नामदेव महाराज यांचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे ते मानवतावादी संत आहेत. भारतभर पोहोचलेले ते पहिले सहिष्णुवादी संत आहेत. 


संत नामदेव यांच्या कार्याचे वेगळेपणः

       त्यांनी पंजाबपर्यंत जाऊन घुमानमध्ये स्वतःला सिद्ध केलं. गुरूग्रंथसाहिबामध्ये त्यांना सन्मानाचं स्थान मिळालं. सरहद्द संस्थेच्या संजय नहार यांच्या पुढाकारातून पंजाबमधील घुमानमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन त्यांनी केलं होतं. त्यावेळी पंजाबी व मराठी भाषाभगिनी एकत्र आल्या होत्या.

संत तुकाराम महाराजांच्या श्रेष्ठ शिष्या बहिणाबाईंच्या काव्य ओळी आठवतात.

"संत कृपा झाली। इमारत फळा आली।

ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया।

नामा तयाचा कंकर। तेणे केला हा विस्तार।

जनार्दन एकनाथ। खांब दिला भागवत।

तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।"

महाराष्ट्र भागवत धर्माची ही इमारत किती भक्कम आहे हे बहिणाबाईनी इतक्या समर्थ शैलीत नोंदविली आहे.


नामदेव महाराज एका अभंगात म्हणतात....

अहंकाराचा वारा न लागो राजसा।

माझिया विष्णूदासा भाविकांशी।।

आज हेच तत्त्वज्ञान आपण आचरणात आणणं गरजेचं आहे. जिथं अहंकार आला तिथं उध्वस्त होणं, नष्ट होणं आलं. भलीभली साम्राज्ये येतात जातात. नंतर त्यांच्या अस्तित्व खुणा दिसणंही दुरापास्त होतं. 


संत नामदेव आणि अभंगछंद:

       नामदेव महाराजासारख्या द्रष्ट्या युगपुरूषाचे सुरवातीच्या काळातील नेतृत्व हेच वारकरी संप्रदायाच्या अफाट लोकप्रियतेचे गमक आहे. केवळ वारकरी संप्रदायाच नाही तर कबीरपंथ, दादूपंथ, शिख यासारख्या अनेक धर्म पंथांचं प्रेरणास्थान संत नामदेव आहेत. नामदेवरायांचा आणि पर्यायाने वारकरी संप्रदायाचा प्रभाव इतकी शतकं टिकून राहिला याचं एक कारण म्हणजे नामदेवरायांनी साहित्य व्यवहारात प्रस्थापित केलेला लोकाभिमुख असा अभंगछंद. त्यांच्या पूर्वीही अभंग असेल पण नामदेवरायांनी अभंग छंदाला लोकप्रिय केलं आणि ईश्वरी पावित्र्यही मिळवू दिलं. अभंग कसा लिहावा याची मांडणीही नामदेवरायांनीच केली. त्यांच्याच प्रेरणेतून अनेक संतांनी अभंगरचना केल्या. अगदी सतराव्या शतकातील तुकोबारायांनांही स्वप्नातून जागे करत अभंग लिहायला नामदेवरायांनी प्रवृत्त केलं.


       मध्ययुगीन मराठी साहित्यात सर्व स्तरातल्या जातीधर्माच्या स्त्री पुरूषांनी ज्या छंदात रचना केली असा अभंग हा एकमेव छंद असावा. त्यामुळेच अभंगसाहित्य हा मध्ययुगीन मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह ठरतो. त्र्यं. व. शेजवलकर म्हणतात, त्याप्रमाणे अभंग हा ओवी वृत्तापेक्षा पाठ करायला सोपा असणारा छंद आहे. त्यामुळे वारकरी संतांचे अभंग सहजपणे सर्वसामान्य लोक पाठ करू शकत. विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात त्याप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या प्रसारात अभंग गाथेचाच अधिक वाटा आहे. हे अभंग सर्वसामान्य माणसाच्या तोंडी असल्यानेच पिढ्यानपिढ्या मौखिक रूपात संक्रमित होत राहिले.


       संत नामदेव महाराज ज्ञानेश्वरांनंतर भारतभर फिरले. पंजाबात गेले. तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला. हिंदी भाषेत पदे लिहिली. त्यांची कांहीं पदे आजही शीख लोकांच्या धर्मग्रंथात पहावयास मिळतात. महाराष्ट्रात तर त्यांचे अभग घराघरांतून भक्तीने गायले जातात.

अशा थोर संत महात्म्यास कोटी कोटी नमस्कार.......।