मेरी माँ तुझे सलाम - आत्मकथन भाग ४
✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी
१९७२ सालचा दुष्काळ भयानक होता. मुलाबाळांना, गुरावासरांना जगवायचे कसे? हा प्रश्न आवासून उभा होता. कुठे रस्त्याचे, पाझर तलावाचे काम सुरू होते. ज्यांनी आयुष्यात रोजगार केला नाही अशी कुटूंबेच्या कुटूंबे दुष्काळी कामावर हातापायाला चिंध्या बांधून रखरखत्या उन्हात राबत होती. मिलोच्या भाकरी, सडक्या गव्हाच्या काळवंडलेल्या गव्हाच्या चपात्या, सातूच्या वातड फुलक्या, लाल मक्याच्या कण्या मिरचीच्या कोरड्या भुग्याबरोबर पाण्याच्या घोटाच्या आधाराने लोक गिळत होते. आला दिवस ढकल होते.
आमच्या कुटूंबाच्या दृष्टीने हा दुष्काळ खरोखरच कसोटीचा ठरला कारण माझे वडील म्हणजेच आदरणीय बापूजी मिशन हॉस्पिटल मिरज मध्ये मणक्याच्या दुर्धर आजाराशी झुंज देत आठ महिने ऍडमिट होते. दादी त्यांची सेवा करत होती व माझे काका त्यांचे औषधोपचार करण्यात गुंतले होते. इकडे माझी आई आपली पाच चिमणीपाखरं व मोठ्या मुलीची दोन मुलं यांना घास भरविण्यासाठी परिस्थितीशी झुंजत होती. दुष्काळी कामावर दिवसभर उन्हातान्हात राबत होती व रात्रभर विचार करत होती की उद्याचा दिवस कसा काढायचा? कुणाकडे उधार मागायचे, कुणाकडून थोडफार धान्य मिळेल उसने, कुणाकडून व्याजाने थोडीफार रक्कम मिळेल. विचारपूर्वक दोन दिवसाची बेगमी करायची पण साला, तिसरा दिवस उगवायचाच आणि आईची चिंता सतत चालूच रहायची. सकाळी सकाळी आई उठायची व तिच्या मायेच्या विशाल पदरात अर्धा किलो तांदूळ आणायची. अर्ध्या किलोत आम्ही सातजण पोटभरून भात खायचो. मोठ्या बहिणीची डिलेव्हरी त्याच वेळी झालेली. तिचं छोटं बाळ दुष्काळाची जाणीव झाल्यामुळेच का कोण जाणे शांतपणे झोपायचे. आईने आणलेला मुठपसा बहीण आम्हाला शिजवून घालायची. त्यावेळी आईची ओढाताण पाहून मला वाटायचे परमेश्वराने माणसाला 'पोट' नावाचा अवयव व भूक नावाची प्रवृत्ती का दिली आहे ?
दुष्काळात शेतातील पिके वाळून गेली. कुरणातील गवतानेही हिरव्या रंगाचा त्याग केला होता. दावणीची जनावरेही आमच्याप्रमाणेच येणारा घास समाधानाने चघळत होती. भारतीय संस्कृतीने आयोजिलेल्या सणांचे आगमन मात्र दरवर्षीप्रमाणेच सुरू होते. गौरी-गणपतीचा सण नुकताच पार पडला होता. दुष्काळातही गणरायांचे स्वागत लोकांनी आपल्या परीने केले होते. पुढच्यावर्षी भरपूर पाऊस घेऊन येण्याची प्रार्थनाही गणरायांकडे केली होती. दिवस जात-येत होते. दसरा सणानेही आपण येत असल्याचे कळविले होते. दसऱ्यापुर्वी खंडेनवमी उद्यावर येऊन ठेपली होती. खंडेनवमीला पुरणपोळ्यांचा बेत असतो. आमच्या घरासमोरच गुरलिंग आंबोळ्यांचे किराणा दुकान होते ज्यांची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी होती. त्यांची दुकानातून गहू, डाळ, गूळ, तांदूळ, तेल यांची खरेदी चाललेली होती. माझी आई मात्र मनातून खूप अस्वस्थ होती. मी आईला विचारलं, "माँ कसला विचार करतेस गं?". आई म्हणाली, "तुझ्या वडिलांची तबेत्त कधी बरी होणार याचा विचार करते". मला मात्र कळायचे की माझी आई नक्की उद्याच्या सणाचा विचार करत आहे.
खंडेनवमीच्या दिवशी आई लवकर उठली. भाकरी करायला बसली तर डब्यात सकाळची न्याहरी भागण्यापुरतेही पीठ नव्हते. कण्या शिजवून जेमतेम पिठात न्याहरी कशीबशी पार पडली. पण आई कालच्यापेक्षा आज जरा खुषीत दिसली. आष्ट्याला जाऊन येते म्हणून पिशवी घेऊन निघाली. आई घासभर खाऊन जा म्हणून आम्ही आग्रह केल्यावर दोन घास खाऊन निघाली. त्यावेळी वेळेवर एस. टी. ची सोय नव्हती. त्यामुळे तिला चालतच जावे लागणार होते. आम्ही भावंडे एकमेकांकडे पाहू लागलो. आई आज अचानक आष्ट्याला कशासाठी निघाली असेल? आजूबाजूच्या घरातून पुरणपोळीचा व आमटीचा खमंग वास येत होता. आम्ही भावंडे मात्र नेमून दिलेली कामे करत होतो. मोठी बहीण स्वयंपाक-भांडीकुंडी बघायची. मी व माझा भाऊ लांबच्या विहिरीवरून रहाटाने ओढून पाणी भरायचो, एकजण म्हैशीला चरायला व पाणी पाजवायला घेऊन जायचा. दिवस वरवर येत होता. दुपार टळत होती. सूर्य माथ्यावरून पश्चिमेकडे निघाला होता. दुपारचे चार वाजले होते. माझ्या बहिणीचा मुलगा असलम त्यावेळी ३ वर्षाचा होता. त्याला भूक लागली होती. त्याला मूठभर चुरमुरे देऊन बसवले होते. आम्हालाही भूक लागली होती. पण आम्ही पाणी पिवून शांत बसलो होतो. एवढ्यात माझी आई डोकीवर दोन पिशव्या एकत्र बांधलेलं गाठोड घेऊन आली. तेही प्रसन्न चेहऱ्याने, आम्ही भावंडे आश्चर्यचकित झालो. आईजवळ जाताना एक पैसाही नव्हता आणि तिनं गाठोड्यात एवढं काय आणलं असेल? आई जराही दमलेली नव्हती. बहिणीला चूल पेटवून चहाला व डाळीला आधण ठेवायला सांगून तिने सुपात डाळ निवडायला घेतली.
पिशवीतून बटर काढले. सर्वांना स्वयंपाक होईपर्यंत चहा बटर खायला दिला व ती पीठ मळू लागली. तासाभरात दोघींनी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक आवरला. या बाळांनो जेवायला अशी हाक आली, की जिची आम्ही वाटचं पहात होतो. आईने आग्रह करून जेवायला वाढले, वाढताना तिच्या चेहऱ्यावरील आत्मिक आनंद मला आजही आठवतोय व त्या दिवशी आम्ही भावंडांनी दिलेली तृप्तीची ढेकर, आज पंचतारांकित हॉटेलमधल्या चमचमीत डिशनेही मिळत नसावी असे मला वाटते.
आम्हां भावंडाना या अपूर्व जेवणाबद्दल कुतूहल वाटत होते. हा सणाचा बाजार आईने कुणाकडून आणला असेल बरे? समाधानाने विसावलेल्या आईला छोट्या मनूने विचारलेच, "आई, कुणाकडून आणलेस पैसे हा बाजार करायला?". आईने या प्रश्नाचे उत्तर देण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही तिच्या मागेच लागलो. आईने सांगितले, "बाळ, माझ्या पायातील जोडवी व मासोळ्या विकून हा बाजार आणला". तिचे उत्तर ऐकून आमच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. आम्ही आईला म्हणालो, "आई तू महान देवता आहेस, आम्हाला गोडधोड खाऊ घालण्यासाठी तू तुझा सौभाग्य अलंकार विकलास". आई म्हणाली, "अरे, परमेश्वराने मला पाच मोठे अलंकार दिलेत त्यांच्यापुढे या निर्जीव दागिन्यांची काय किंमत?" निरक्षर असलेल्या माझ्या आईचे ते शब्द मी आजही माझ्या हृदयात जपून ठेवले आहेत. पुढे मला नोकरी लागल्यावर आईसाठी जोडवी घेऊन गेले. आनंदाने भारावून गेली त्यावेळी माझी आई!
सावित्रीबाई फुले व लक्ष्मीबाई पाटील यांचा वारसा चालविणाऱ्या कित्येक सावित्री आणि लक्ष्मीबाई आपल्या समाजात आजही दिसतात, की ज्यांनी आपल्या मुलांबाळाना घास भरविण्यासाठी सौभाग्यलंकारांचा त्याग केला आहे, हाताला घट्टे पडेपर्यंत दुसऱ्यांच्या शेतात भांगलण केली आहे, हात-पाय किरवाजेपर्यंत लोकांची धुणी-भांडी घासली आहेत, आतडीला पीळ पडेपर्यंत ओझी वाहिली आहेत, कमरेला बाक येईपर्यंत कष्ट उपसले आहेत, आपल्या पोटाला चिमटा लावून आपल्या पिलांना पोटभर खाऊ घातलं आहे. धन्य त्या माता!
दर खंडेनवमीला माझ्या आईची आठवण येते व मी मनात म्हणते, 'मेरी माँ तुझे सलाम!'
नानी तुझे सलाम
उत्तर द्याहटवाChan
उत्तर द्याहटवा👍👍
उत्तर द्याहटवा