सोमवार, २७ जुलै, २०२०

कुणी सून देता का सून - मराठी कथा.


" कुणी सून देता का सून? "

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

        सुशीलाताई धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांचे उपास-तापास, देवधर्म, व्रतवैकल्ये, नवस सुरू होते. पण का कोण जाणे, कुठलीच देव-देवता प्रसन्न होत नव्हती. त्या दोघांची नाराजी वाढतच चालली होती. प्रकाश आईबाबांची धडपड पहात होता पण काही करू शकत नव्हता. येणारा प्रत्येक दिवस कामात व्यस्त राहून कसातरी ढकलत होता. मुलींच्याकडून येणारे नकार पचविण्याची सवय लावून घेत होता.

        सुशीलाताई एके दिवशी नित्याची भरमसाठ कामे संपविल्यावर क्षणभर डोळे मिटून पहुडल्या. त्यांच्यासमोर त्यांचा जीवनपट चलतचित्रपटाप्रमाणे सरकू लागला. वयाची अठरा वर्षे संपायला कांही महिने कमी असतानाच त्यांनी या घराचे माप ओलांडले होते. पंचवीस तीस सदस्यांच्या एकत्र कुटुंब पद्धतीत असलेल्या या शेतकरी कुटुंबात आल्या. त्यांच्या तिघी जावानां दोन तीन मुलेबाळे होती पण लग्न होवून सात वर्षे झाली तरी त्यांच्या संसारवेलीवर फूल फुलत नव्हते. या दरम्यान त्यांनी कितीतरी वेळा अपमान सहन केला. वांझोटी म्हणून बोलणी खावी लागली. नशिबाचा भोग म्हणून सर्व सहन केले. परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवली. त्याचे फळ म्हणून की काय प्रकाशच्या रूपात एकुलता एक पुत्र परमेश्वराने दिला. त्या दोघांचे जीवन खऱ्या अर्थाने प्रकाशमान झाले. गोऱ्या गोमट्या गुटगुटीत प्रकाशने सर्वांची बोलतीच बंद करून टाकली.

        प्रकाश दिसामासाने मोठा होत गेला. त्याच्या शांत व सुस्वभावाने सर्वांची मने जिंकली. आईबाबाना शेतीकामात मदत करत करत शिक्षण घेऊ लागला. अभ्यासात फारसा हुशार नव्हता तरी सत्तर टक्केच्या आसपास मार्कस् मिळवून उत्तीर्ण होत गेला. शेतीच्या कामात मात्र बापसे बेटा सवाई होता. बी.ए. झाल्यावर त्याने आधुनिक शेती करण्याचे ठरविले होते. शेतीत नवनवे प्रयोग करून उत्पन्न वाढवू लागला. त्यामुळे जो तो त्याची तारीफ करू लागला. प्रकाशने पंचविशी कधी ओलांडली कळलेच नाही. त्याच्या बरोबरीच्या मुलांच्या लग्नाचे बार उडू लागले. प्रकाशचे लग्न थाटामाटात करायचा मनसुबा रचून एका शुभमुहूर्तावर मुली पहाण्यास सुरूवात केली पण आजतागायत तो मुहूर्त शुभ आहे असे वाटत नाही. पहिल्या वर्षी दहा बारा मुली पाहिल्या. काही मुली त्यांना पसंत पडल्या नाहीत, तर काहीना शेती करणारा प्रकाश पसंत पडला नाही. पहिलं वर्ष असंच गेलं, वाटलं ठीक आहे. पुढच्या वर्षी योग जुळून येईल, पण दुर्दैव आमचे प्रत्येक वर्ष असेच  जात आहे.

         थोडीशी सावळी असू दे, कमी उंचीची किंवा जास्त उंचीची असू दे, खर्च मानपान न करणारी असू दे या निष्कर्षापर्यंत ते आलेत पण नकार कांही संपत नाही. मुलाचं लग्न जुळावे म्हणून कित्येक एजंटाना भेटून झाले. अर्थपूर्ण व्यवहारही झाले पण दोन तीन मुली दाखविण्यापलीकडे त्यांनी काहीच केले नाही. अनेक वधू वर सूचक मंडळाच्या मेळाव्याला भाऊसाहेब हजर राहिले. त्यांच्यासारखेच समदुःखी मित्र त्यांना भेटले. त्यांच्याकडून हल्लीच्या मुलींच्या व त्यांच्या पालकांच्या उंचावलेल्या अपेक्षा ऐकून मन सुन्न झाले.

        कुणालाच शेती करणाराई नवरा, किंवा जावई नको आहे. प्रत्येकाला इंजिनिअर, उच्चपदस्थ अधिकारी, जम बसलेला, स्थिर-स्थावर झालेला डॉक्टर जावई हवा. पगार पॅकेज भरमसाठ असावे. किमान पन्नास साठ हजार दरमहा मिळविणारा हवा. मुलाला नोकरी शक्यतो मुंबई पुण्यातच हवी, निमशहरी गावात नको. त्याचा स्वतःचा अलिशान व चांगल्या वस्तीत पुण्यात, मुंबईत  फ्लॅट हवा. मुलाचे आईबाबा फ्लॅटमध्ये फक्त विशिष्ट ठिकाणीच फोटोत चालतील. ते गावाकडेच राहणारे असावेत. इतक्या अपेक्षा पूर्ण झाल्यावर तरी अपेक्षासत्र थांबेल असे वाटते, परंतु तसे होत नाही. मुलाला गावाकडे सर्व सुविधानीयुक्त घर हवे. कमीत कमी चार ते पाच एकर बागायती शेती हवी. नुसती आहे शेती याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाहीत, सातबारा पाहिला जातो. उतारा फार पूर्वीचा नको दोन चार दिवसापूर्वीच काढलेला हवा. काय म्हणावे या मुलींच्या पालकांच्या अपेक्षांंना?

        वधू वर मेळाव्यात मुलांच्या बाबांची चर्चा झाली. एवढ्या सगळ्या अपेक्षांची पूर्ती करून कन्यादान  करून दिलेल्या मुलीने जीवनात पुढे काय करायचे? त्या दोघांच्या कार्यकर्तृत्वाला संधी देणार आहेत की नाहीत हे लोक? पैशापेक्षा, इस्टेटीपेक्षा, माणुसकीला, सुस्वभावाला किंमत देणार आहेत की नाही हे लोक? या चर्चेमध्ये चुकून सामील झालेला एक मुलीचा बाप म्हणाला, "आम्ही मुलीला शिकवतो खर्च करून लग्न करून देतो. उद्या हिच्या नवऱ्याचं काही बरंवाईट झालं तर मुलीनी करायचं काय? म्हणून आम्ही आधीच सर्व बघून सवरून निर्णय घेतो." भाऊसाहेबांंना या सर्व चर्चा ऐकून वाटले, मुलींना समजावून सांगावे पालकांनी, अगं पोरी, मातीतून मोती  पिकवणाऱ्या सोन्यासारख्या पोरांना नाकारू नका.  धडधाकट, उमदा, स्वकर्तुत्वावर जगणारा, सुस्वभावी, स्वावलंबी, स्वाभिमानी मुलाला पसंत करा व सुखाने संसार करा.

माझ्यासारख्या आर्त सासऱ्याची सून बनून घराला घरपण द्या. मग काय म्हणता वाचकहो। मी तुम्हाला विचारतेय, 

कुणी सून देता का सून?

६ टिप्पण्या: