जादू शब्दांची
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
रुपाताई आदर्श शिक्षिका म्हणून नावाजलेल्या होत्या. शाळेचे गॅदरिंग, वेगवेगळ्या स्पर्धा, परीक्षा, शैक्षणिक उपक्रम, सहली या सर्वात त्यांचा सहभाग वाखाणण्यासारखा होता. त्यांच्या अध्यापनाच्या विशिष्ट पद्धतीमुळे त्या विद्यार्थ्यांच्या लाडक्या शिक्षिका होत्या. मितभाषी व लाघवी बोलण्यामुळे त्या सर्व सहकारी शिक्षकांच्याही आवडत्या शिक्षिका होत्या. त्यांचे पती जवळच्याच गावात शिक्षक होते. अरूण व अनिता ही दोन अपत्ये होती. दृष्ट लागण्यासारखा त्यांचा संसार होता. पण नियतीला हे मंजूर नव्हते.
अरूण आठवीत
आणि अनिता सहावीच्या वर्गात शिकत होते. दोन्ही
मुलांच्या उज्ज्वल भविष्याची सुंदर स्वप्ने पहात असतानाच रूपाताईंच्या पतीना हार्ट अटॅक आला आणि ते देवाघरी निघून गेले. संसाराचा डाव अर्ध्यावरच
मोडून पडला. दुःखाचा डोंगर कोसळला. मुलांची जबाबदारी एकटीवरच येऊन पडली. दुःख
बाजूला ठेवून त्यांनी ही जबाबदारी पेलण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सासर माहेरचा
विशेष पाठिंबा नसतानाही आपल्या मुलांना कांही कमी पडू दिले नाही. स्वतःच्या इच्छा
आकांक्षा दाबून ठेवत त्यांनी मुलांना सर्व गोष्टी अगदी वेळेवर पुरवल्या.
अरुण सायन्स
साईडने बारावी पास झाला. चांगल्या क्लासमध्ये घालूनही जेमतेम मार्कस् मिळाले.
इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणे कठीण झाले. त्याने प्रायव्हेट कॉलेजला डोनेशन भरून प्रवेश घेण्याचा हट्ट केला. डोनेशन देण्यासाठी रूपाताईंकडे रक्कम नव्हती. मुलाच्या
भविष्यासाठी त्यांनी स्वतःचे दागिने विकून प्रवेश घेतला. अरूण पहिल्या सेमिस्टरला
सर्व विषयात नापास झाला. दुसऱ्या सेमिस्टरला एकाच विषयात पास झाला. मला हे जमणार
नाही म्हणून नाद सोडून दिला? पुढे एक वर्ष
असेच गेले. नंतर त्याने मी हॉटेल मॅनेजमेंटला प्रवेश घेण्याचा हट्ट केला. फी भरुन
प्रवेश घेतला व कांही महिन्यानंतर कोर्स अर्धवट सोडून दिला. अशा प्रकारे प्रत्येक वेळी नवीन
कुठल्यातरी कोर्सला प्रवेश घेतो व मध्येच सोडून देतो. अलीकडे तर सर्वच सोडून दिले
आहे. दिवसभर मित्रांसोबत बाहेर हिंडतो. रात्री अपरात्री केंव्हातरी घरी येतो.
स्मोकिंग, ड्रिंक्स करून येतो. रोज आईकडे पैसे मागतो.
पैसे न मिळाल्यास खूप संतापतो. आईच्या अंगावर धावून येतो म्हणून आई नाईलाजास्तव
त्याला पैसे पुरवते. परवाच त्याचा पंचविसावा वाढदिवस झाला. आईकडून पैसे घेऊन
त्याने मित्रांना मोठ्ठी पार्टी दिली. अरूणच्या अशा वागण्याने आई हैराण झाली.
अनिता
अरुणच्या मानाने शिक्षणात ठीक आहे. तिने बी. कॉम. होऊन एम्. बी. ए. पूर्ण केले व
एका कंपनीत नोकरीला लागली. अनिताची तऱ्हा कांही वेगळीच होती. अनिता आत्मकेंद्री
झाली होती. घरातील कुठल्याच गोष्टीशी तिचा कांहीच संबंध नव्हता. घरातील कुठल्याही
कामाला ती हात लावायची नाही. आईला घरकामात थोडीही मदत करायची नाही. उलट स्वतःची
सर्व कामे आईकडून करून घ्यायची. तिची सर्व कामे आईने केलीच पाहिजेत, ते तिचे
कर्तव्यच आहे, असे तिला वाटायचे. शिवाय मी इतकं शिकलेय त्या
मानाने आपली आई निव्वळ अडाणी असे तिला वाटायचे. आई तुला काय कळतय? असं वारंवार
म्हणायची, स्वतःला फार हुशार समजत होती ती. दिवसभर जॉब, सुट्टीच्या
दिवशी मित्र मैत्रिणी बरोबर फिरणे, पिकनिक, मौजमजा यातच
गुंग असायची. ती बी. कॉम झाल्यापासून स्थळे येत होती पण तिला एकही मुलगा पसंत
पडत नाही. आत्ता तर तिने आईला चक्क सांगून टाकलय, माझ्या
लग्नाचा विषय तू अजिबात काढायचा नाहीस. मी माझं बघून घेईन तू या भानगडीत पडू नकोस.
काय करावं
रुपाताईनी अशावेळी! हळूहळू त्या डिप्रेशनमध्ये जायला लागल्या. मुलांच्या
वागण्यामुळे सतत हिणवण्यामुळे आत्मविश्वास गमावू लागल्या, निरूत्साही
बनू लागल्या, अबोल बनू लागल्या. ही गोष्ट त्यांच्या एका खास
मैत्रिणीच्या लक्षात आली. निवांत क्षणी तिने रूपाताईना बोलते केले. रूपाताईनी खरी
हकीकत अश्रूभरल्या डोळयानी सांगितली. मैत्रीण वैशाली हुशार होती. तिने रूपाताईंना या
प्रसंगातून बाहेर काढण्याचा निश्चय केला. वैशालीची मावसबहिण समुपदेशक होती.
त्यांची मदत घ्यायची असे ठरविले. मुलांना तिकडे घेऊन जाणे शक्य नव्हते त्यामुळे
वैशाली ने आपल्या घरी एक छोटी पार्टी ठेवून अरूण, अनिता व
रूपाताईना आमंत्रण दिले. आपल्या मावसबहिणीला रत्नालाही पूर्व कल्पना देऊन बोलवून
घेतले.
बोलता बोलता
समुपदेशक रत्ना म्हणाल्या, "काय हो रूपाताई, काय करतो
तुमचा मुलगा?" अरूणला वाटले, आई आता आपले
सारे पाढे वाचणार. तो पटकन म्हणाला, "आईला काय विचारताय तिला काय कळतंय यातलं? आई निव्वळ
अडाणी आहे." हे ऐकल्यावर रत्नाला फार राग आला. त्या संतापाने म्हणाल्या,
"अरुण लाज नाही
वाटत तुला आईला अडाणी म्हणायला. स्वतःला फार शहाणा समजतोस काय? आईने इतक्या कठीण
परिस्थितीत लाखो रूपये खर्च करून तुला इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊन दिला तेंव्हा ती
अडाणीच होती का? इंजिनिअरिंग सोडून तू पुन्हा हॉटेल मॅनेजमेंटला
प्रवेश घेतलास तेही तुला पूर्ण करता आले नाही, आत्ता तर तू
सर्व सोडून बसला आहेस." अरुण म्हणाला, "मला इथे रहायचेच नाही आई मला जराही फ्रीडम देत
नाही. फॉरेनमध्ये बघा कसं स्वातंत्र्य मिळतं मुलांना. रात्री थोडा जरी उशीर झाला
तरी ही लगेच फोन करते, कुठे आहेस बाळा? हिचं हे मला
अजिबात आवडत नाही." त्यावर रत्ना म्हणाल्या, "अच्छा म्हणजे तुला फॉरेन कल्चर आवडते?" अरुण म्हणाला,
"हो आवडते, तिथे
प्रत्येकाला स्वतःची स्पेस असते." रत्ना म्हणाल्या,
"अरे तुला हे
माहित नाही का की तिथे मुलं बारा वर्षाची झाल्यावर स्वतः कमावतात व खर्च करतात.
तिथे अर्न अँड लर्न ही सिस्टीम आहे वयाची पंचविशी ओलांडली तरी
घरी बसलेल्या तुझ्यासारख्या मुलाला फक्त भारतातील आईच खायला घालू शकते रोज आईकडे
पैसे मागताना जराही लाज वाटत नाही तुला? तुझी काळजी
वाटते म्हणून ती फोन करते. आईच्या मायेला तू अडाणी म्हणतोस. तिच्या चांगुलपणाचा
फायदा घेऊन तिलाच अडाणी म्हणतोस?"
थोडा तरी
विचार कर आईच्या मनाचा, तिने तुमच्या साठी केलेल्या त्यागाचा आणि
कष्टाचा असे म्हणत रत्नाने मोर्चा वळवला अनिताकडे. त्या तिला म्हणाल्या,
"काय ग अनिता
फेल न होता ग्रॅज्युएट झालीस म्हणून असे कोणते मोठे दिवे लावलेस? आई तुझ्या
लग्नासाठी स्थळं बघते आणि तू ते नाकारतेस. आत्ता तर तू लग्नच करायचे नाही म्हणतेस.
तिला कधी तुझा विचार काय आहे हे समजावून सांगितलसं? घरात तरुण
मुलगी असल्यावर आईला काळजी वाटणारच. तुझी आई शिक्षित आहे. त्या काळातील ग्रॅज्युएट
आहे हे विसरलीस वाटतं. तुझ्या आईने सर्व्हिस करायची, तुमची
जबाबदारी घ्यायची, घरातील सर्व कामे करायची आणि वर ऐकून घ्यायचे
तिला काय कळतय, अडाणी आहे. तू तिला घरकामात काहीच मदत करत नाहीस. तू स्वार्थी आहेस. अनिता एच्.
आर्. मध्ये एम्. बी. ए. केलंस वा! काय दुर्दैव बघ घरातील दोन व्यक्तींंशी आई
भावाशी कसे वागावे हे तुला कळत नाही. मग काय उपयोग तुझ्या पुस्तकी
शिक्षणाचा."
रूपाताई शांतपणे रत्नाचे व आपल्या मुलांचे
चेहरे न्याहाळत होत्या. मनातल्या मनात घाबरल्या होत्या. घरात गेल्यावर आपली कांही
खैर नाही हे त्यांनी गृहीत धरले होते. रत्नाने दोघानाही आत्मचिंतन करण्याचा सल्ला
दिला व त्या निघून गेल्या.
एका महिन्याने
रुपाताईनी रत्नाला फोन केला. खूपच आनंदात होत्या. त्या म्हणाल्या, रत्नाताई,
"तुमच्या
शब्दानी जादू केली माझ्या मुलांवर. तिथून आल्यापासून दोघेही खूप बदललेत. अरुण एका
टेलिफोन ऑफिस मध्ये नोकरी करत आहे. संंध्याकाळी सातच्या आत घरात येतो. आणि हो
त्याने माझ्याकडे अजिबात पैसे मागितले नाहीत, मीच त्याला
पगार होईपर्यंत पाचशे रूपये घे म्हणून दिले. पगार झाल्यावर त्याने मला पाचशे रुपये
तर दिलेच, शिवाय तीन हजार घे तुला खर्चाला म्हणून दिले.
अनिता तर सकाळी लवकर उठते. मला स्वयंपाकात मदत करते. संध्याकाळी मला चहा करून
देते. नशीब उघडले माझे. तुमच्या तोंडात साखर पडो रत्नाताई. मी तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही."
आजची युवा
पिढी भरकटली आहे. गोंधळलेली आहे. त्यांना वेळीच योग्य मार्गदर्शन, समुपदेशन करून मार्गावर
आणावे लागेल हेच खरे.
छान कथा
उत्तर द्याहटवा