बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

सुखी हैदर - मराठी कथा


'सुखी हैदर'

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
       


        कृष्णा नदीच्या काठावर वसलेले पुणदी ता. पलूस जि. सांगली हे माझ्या सासरचं समृद्ध गाव. आमचं घर एकदम नदीच्या कडेला आहे. अंगणातून कृष्णामाईचे दर्शन होते. २००५च्या पुरात कृष्णामाई आमच्या घरात येऊन खेळून गेली. ३१ मे २०१५ रोजी माझ्या नातीचं आयेशाचं म्हणजे माझ्या पुतण्याच्या मुलीचं लग्न झालं. दुसऱ्या पिढीतील हे पाहिलंच लग्न असल्याने आमच्या फॅमिलीचा मुक्काम १०-१२ दिवस तिकडेच होता. दागिने, कपडे यांची खरेदी, रुखवताची तयारी सुरु होती. लग्न तीन दिवसावर येऊन ठेपले आणि हळद लावणे, मेहंदी काढणे, मुहूर्तमेढ रोवणे, सवाष्ण जेवण इत्यादी लग्नापूर्वीचे विधी सुरु झाले. या विधीमध्ये सर्व नातेवाईक स्त्रिया, भाऊबंदातील सदस्य, शेजारच्या व ओळखीच्या सर्व स्त्रिया उपस्थित होत्या. विशीष्ट विधीत पुरुषही सामील होते. बच्चेकंपनीचा धमाल दंगा व तरुणाईचा मस्त गोंधळ सुरु होता. रात्री निद्राप्रिय मंडळी झोपी गेल्यावर अंताक्षरी, रेकॉर्ड डान्स यांचबरोबर टी. व्ही. वरचे गेम्स चालू होते. कधी कधी उखाणा घ्यायची टूम निघायची, त्यामुळे सर्वांचे मस्त मनोरंजन सुरु होते. या कालावधीत घराच्या शेजारी राहणारे हैदरमामू रसिकतेने सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचे. अशाच एका रात्री पासष्टी ओलांडलेल्या हैदरमामूला आमचे दीर म्हणाले, "हैदर तुमचं एक गाणं होऊन जाऊ दे की आज".

        हैदर एका पायावर गाणं म्हणायला तयार झाला. जणू काही कुणाच्या तरी उठवण्याचीच वाट बघत होता. त्याने 'प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजुळ गाणी' हे गाणं म्हणायला सुरवात केली आणि मंडपातील गोंधळ एकदम शांत झाला. सर्वजण कान टवकारून त्याचं गाणं ऐकू लागले. एवढ्यात त्याने हे द्वंद्वगीत असल्याने स्त्रीच्या आवाजात 'साजणा मी तुझी कामिनी' म्हणायला सुरवात केली आणि सर्वांनी उत्स्फुर्तपणे टाळ्या वाजवल्या. हैदरला आणखी एक गाणं म्हणायचा मुलांनी आग्रह केला तेंव्हा आपल्या गोड आवाजात त्याने 'परदेशी परदेशी जाना नही, मुझे छोडके मुझे छोडके' ही कव्वाली म्हटली. काव्वालीला सर्वांनी कोरस दिला आणि त्या रात्रीचा हैदर 'हिरो' झाला. सर्वांना आपले गाणे आवडल्याचे पाहून हैदरही हरखून गेला व त्याने स्वरचित गाणे म्हणायला सुरवात केली. 'शिट्टी वाजली, म्हैस सुटली, दावा तोडूनं रानी पळाली' या आधुनिक गाण्याचा स्वर ऐकून मुला-मुलींनी नृत्याला सुरवात केली. हैदरही गाता गाता नाचू लागले. त्याची बायको हमीदा व लग्नासाठी आलेल्या त्याच्या दोन मुली, जावई, नातवंडे पोट धरून हसू लागली. तर असा हा हैदर कोण? प्रश्न पडला असेल ना. सांगते.

        हैदर अख्या पुणदी गावाला परिचित असलेला पासष्टी ओलांडलेला, मध्यम उंचीचा, मध्यम अंगकाठी असलेला साधा माणूस. सुरवातीला पांढरी असलेली पण नंतर काहीशी काळी पडलेली विजार, तसलाच ओपन शर्ट, खांद्यावर मळकट रंगाचा टॉवेल हाच त्याचा कधी न बदलणारा पोषाख. तोंडात पानाचा तोबरा चघळत चघळत नेहमी हसतमुख चेहऱ्याने समोरच्याला हसवत असतो. लहान मुलांना चिडवणं, खेळवणं, मोठ्या माणसांना विनोद सांगून हसवणं हा त्याचा दोन कलमी कार्यक्रम सुरु असतो. गावात कुणाची वरात निघाली की हैदर तिथे हजर. गॅसबत्ती धरायला, कृत्रिम घोडा कमरेला बांधून नाचायला, पडेल ते काम करायला, गावातील कुणाचेही कष्टाचे काम असो सर्वांना हैदरचीच आठवण होते. शेतातील पेरणी असो, भांगलण असो, ऊसाचा पाला काढायचा असो, मळणी असो, पोती उचलायची असो हैदर कधीही मागे सरकत नाही. त्याच्या या विविधांगी गुणदर्शनामुळे तो सर्वांचा लाडका बनला आहे. अंगठा बहाद्दर असलेली एक व्यक्ती सर्वांना आपलसं कसं काय करू शकते? रात्रंदिवस शेतात राबूनही इतक्या खेळकरपणे आपले छंद - कला कशा काय जोपासू शकते? सर्वांबरोबर मलाही पडलेले हे प्रश्न.

        तर असा हा हैदर पंचावन्न वर्षापूर्वी या गावात आला. आई वडिलाविना पोरकं असलेलं हे पोर. कुण्या दूरच्या नातेवाईकांनी एका श्रीमंत शेतकऱ्याकडे चाकरीसाठी आणून सोडले. त्यावेळी त्याचे वय साधारण १२-१३ वर्षांचे असावे. नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगून टाकले की, "दादा, तुम्हीच आता त्याचे मायबाप, आमची गरीब परिस्थिती असतानाही याला पाच वर्षे आम्ही सांभाळलं. आता आमच्या संसाराचा गाडा चालवताना नाकी नऊ आले आहे. त्यात याचं कसं बघणार?" त्या दिवसांपासून हैदर त्यांच्या शेतावर राहू लागला. सांगेल ते काम करुन, देतील ते अन्न खाऊन मोठा होऊ लागला. काळाचा रथ आपल्या वेगाने पुढे जाऊ लागला. तो ज्याच्याकडे काम करत होता त्यांना शेती विकायची पाळी आली. येथील सर्व मालमत्ता विकून त्यांनी शहरात बिझनेस करायचा प्लॅन केला होता. हैदारलाही बरोबर घेऊन जायला ते तयार होते. पण काळ्या मातीशी नातं निर्माण झालेला हैदर शहरात जायला तयार नव्हता. हैदरचे मालक व आमचे आजे सासरे यांची मैत्री होती. त्यांनी सासऱ्याना हैदरबाबत सांगितले. हैदर त्यावेळी १८-१९ वर्षाचा झाला होता. आपल्या समाजातील एक अनाथ मुलगा आपल्या मोहल्ल्यात ठेवून घ्यायला ते तयार झाले. आमच्या शेजारीच त्याच्यासाठी त्यांनी एक छप्पर घालून दिले व अशा प्रकारे हैदर आमच्या घराजवळ राहू लागला. आमच्या सासऱ्यासह एकूण आठ सख्खे-चुलत भाऊ होते. या आठ घरातील कोणतेही काम असो हैदर तेथे हमखास हजर असायचा. पडेल ते काम आनंदाने करायचा. थोडक्यात काय तर या आठ कुटुंबातील तो एक अविभाज्य सदस्य बनला होता. गावातील सर्वांच्या परिचयाचा तर होताच, पण या आठ कुटुंबाच्या पै-पाहुण्यांच्याही अगदी जवळचा 'नातलग' बनला होता. दिवसभर शेतात कामाला जायचा व रात्री त्या छपरात विसावा घ्यायचा. छपरात चूल होती. कधी कधी स्वयंपाक करुन खायचा! पण नावालाच. तो दिसला की आठ घरांपैकी कुणीही हैदरला ये जेवायला म्हणून बोलवायचे, घासातील घास द्यायचे. सणावाराला तर त्याची चैनीच असायची. प्रत्येकाला वाटायचे बिचारा हैदर काय खाईल? सणावाराला म्हणून प्रत्येकजण आळीपाळीने सकाळ संध्याकाळ ठरवून त्याला जेवू घालायचे. हैदरही कुणाच्या कुठल्याच कामाला नाही म्हणायचा नाही. लहान मुलांना घेऊन फिरायचा. वृद्धांना आधार द्यायचा. त्यामुळे हैदर लाडका झाला होता सर्वांचा!

       बघता बघता हैदरचे लग्नाचे वय झाले. आमच्याच एका नातेवाईकाने त्याच्यासाठी एक मुलगी पाहिली. गरीबाघरची, वडील, भाऊ नसलेली. तिच्या आईला आमच्या लोकांनी स्पष्ट कल्पना दिली आणि गोऱ्या रंगाची, शांत स्वभावाची हमीदा, साध्या भोळ्या हैदरच्या जीवनात पत्नी म्हणून आणायचे ठरले. सर्वांनी मनावर घेतल्याने लग्न थाटामाटात करायचे ठरले. हैदर नवऱ्याच्या रुपात मंडपातील स्टेजवर दाखल झाला. लग्नविधीस सुरुवात झाली. कुराणातील वचनांचे वाचन झाले. प्रार्थना झाली आणि काझीनी हैदरला विचारायला सुरवात केली, "ऐ हैदरमिया" हैदरला मित्रांनी सांगितले होते, 'मित्रा घाबरू नकोस, काझी काय म्हणेल त्याच्यामागून म्हणायचे.' मित्रांनी सांगितल्याप्रमाणे हैदरने कलमा दुवा म्हटले होते. त्याला वाटले आताही तसेच म्हणायचे आहे. हैदरने स्वतःच म्हटले "ऐ हैदरमिया" आणि मंडपात हास्याचे फवारे उडाले. या छोट्याशा छपरातच हैदरचा सुखी संसार सुरू झाला. बायकोही कष्टाळू होती.  दोघे मिळून शेतात कामाला जायचे. पोटापुरते मिळवायचे. कुठे धांदल नाही, गडबड नाही. दोघे मजेत राहू लागले. निसर्गाने आपले काम केले आणि त्यांच्या संसार वेलीवर शहिदा, वहिदा नावाच्या देखण्या कळ्या जन्माला आल्या. हमिदाची डिलिव्हरी त्या छपरातच व्हायची कारण तिची आई ही देवाघरी निघून गेली होती. आमच्या सासवा ४-८ दिवस पाणी घालायच्या. दोन महिने कसेबसे निघून जायचे आणि हमीदा बाळासह शेतात मजुरीला जायची. दिवस असेच जात होते. हमीदाला तिसरी मुलगी झाली नादिरा आणि हैदरचं डोकं सणकलं. चौथ्यांदा मुलगा होईल अशी त्या दोघांना आशा होती. आजूबाजूच्या बायका म्हणायच्या, " ह्या वेळेला मुलगाच होईल, तीन मुलींवर बऱ्याच जणींना मुलगा होतो आणि सर्व लक्षणे मुलाचीच दिसत." त्यांचं बोलणं ऐकून हैदर व हमीदा खूश व्हायचे. पण झालं भलतंच! चौथ्यांदाही मुलगी झाली. तिचे नाव जुबेदा ठेवण्यात आले. हैदर अलीकडे गप्प गप्प असायचा. त्याला लोक म्हणायचे, "हैदर ऑपरेशन करुन टाक, आता चार मुली झाल्या. या सगळ्यांच्या कसा पेलवणार? तुला कुठं इस्टेट बोंबलाय लागलीय." त्यावर हैदर म्हणायचा, "ज्यानं तोंड दिलय, तो घासही देईल, बाचं नाव सांगायला नको का? या पोरी काय निघून जातील आपापल्या घरला." समोरचा गप्पचं बसायचा. काय बोलणार त्याच्यासमोर?

        याच क्रमाने रुबेदा, रुकैय्या व सुलतानाचा जन्म झाला. हैदर हमीदा सात मुलींचे पालक झाले. प्रत्येक डिलिव्हरीत वरच्या दोघी आईची सेवा करायच्या. स्वयंपाक, धुणीभांडी करायच्या. दोघी वडिलांबरोबर मजुरीला जायच्या. या आठ घरातील छोटी छोटी कामे करायच्या. मूठ पसा आणून छोट्यांना घालायच्या. लहान तिच्यापेक्षा लहानगीचा सांभाळ करायची. आंधळ्याच्या गाई देव राखतो म्हणतात ते काही खोटे नाही. सातही मुली एकापेक्षा एक देखण्या. तीन नंबरची नादिराच नाकात जराशी सुमार होती. नाहीतर आईचा गोरा रंग, वडिलांच्या लांब नाकाची ठेवण आणि दोघांचीही कष्टाळू वृत्ती मुलींनी उचलली होती. त्या छपरातच या नऊ जणांचा संसार आरामात सुरु होता. मुली घरकामात, स्वयंपाकात, शिक्षणात एकदम तल्लख होत्या कारण आजूबाजूच्या प्रत्येक घरात मदतीला जायच्या त्यामुळे त्यांच्यात बहुश्रुतता आली होती. आपल्यापेक्षा लहान सहा बहिणींना सांभाळत शहिदा फस्ट क्लास मध्ये बारावी पास झाली. मुंबईत राहणाऱ्या एका नातेवाईकांकडून तिला मागणी आली आणि हमीदाने ठरवलं, आता एकेक कर्तव्यातून मुक्त व्हायचं. त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून ते नातेवाईक मुलगी नारळ स्वीकारायला तयार झाले. तरीपण आम्ही सर्वांनी तिचं लग्न दारातच करुन दिलं. तिला मणीमंगळसूत्र व भांडी घेऊन दिली. शहिदा सासरी निघून गेली जड अंतःकरणाने!

        इकडे अजूनही हैदरला मुलाची आशा होतीच. पण सातव्या वेळी हमीदाला डॉक्टरांच्याकडे न्यायची वेळ आली आणि त्यांनी सांगितले की आता यापुढे तिला मूल होवू दिले तर हिच्या जीवाला धोका आहे. हिचं ऑपरेशन आत्ताच करावं लागेल. त्यामुळे हैदर थोडा नरमला व ऑपरेशनला परवानगी दिली. मोठया शाहिदाप्रमाणेच वहिदा, नादिरा, जुबेदा, रुबेदा, रुकैय्या व सुलताना यांची लग्ने झाली. पाहायला येणारा मनात म्हणायचा, या सात जणीत मला काहीही मिळणार नाही. हातावरचं पोट असलेले सासू-सासरे मला काय देणार? हे गृहीत धरूनच मुली पसंत करायचा. जोडलेल्या लोकांकडून थोडाफार मानपान व्हायचा. त्यातच समाधान मानून जावई खुश व्हायचे. मुली माहेरी येतानाच नवऱ्याकडून काही बाही घेवून येतात. आई वडिलांना खाऊ घालतात. आनंदाने मुलाबाळांसह चार दिवस राहून जातात. सहाजणींना दोन दोन मुलं झाली आहेत. मुली डिलिव्हरीला आईकडे येतात पण लागणारा सर्व खर्च नवऱ्याकडून घेवून येतात. हमीदा प्रत्येकीची मनापासून सेवा करते. आईच्या मदतीला दुसरी बहीण हजर असते. सगळ्या बहिणी एकाच वेळी न येता दोघी दोघी ठरवून सणाच्या, यात्रेच्या, लग्न कार्याच्या निमित्ताने आईकडे येतात. आईवडिलांना एकटं वाटू नये म्हणून खूप काळजी घेतात. एकमेकींच्या अडीअडचणीला धावून जातात. त्या सात जावयांमध्येही एकी आहे. एकमेकांत मायेचा ओलावा व जिव्हाळाही आहे. मोठ्या मुलीची मुलगी व मुलगा लग्नाला आली आहेत. अशा प्रकारे हे मुलींचं गोकुळ आनंदाने नांदत आहे. 

        आमच्या नातीच्या लग्नाला या सातीजणींना निमंत्रण पाठवलं होतं. मुलांना सुट्टी असल्याने शहिदा आपल्या पतीसह लग्नाअगोदर चार दिवस आली होती. लग्नाच्या प्रत्येक विधीत उत्साहाने सहभाग घेत होती. मुंबईत राहून या ग्रामीण जीवनाशी फारकत झालेली शहिदा हे कार्यक्रम बघून हरखून गेली होती. अगदी लहानपणापासून तिची व माझी गट्टी असल्याने, खूप दिवसांनी तिची माझी भेट झाल्याने माझ्याशी भरभरून बोलत होती. मुंबईत ती लहान मुलांचे क्लासेस घेते. छोटे पाळणाघर चालवते. पतीच्या धंद्यात हातभार लावते. स्वतःचा फ्लॅट खरेदी केल्याचेही तिने सांगितले. स्वतःसाठी, मुलीसाठी दागदागिने घेतल्याचेही तिने सांगितले व बोलता बोलता अश्रूभरल्या डोळ्यांनी एक प्रसंग सांगितला. तो तुम्हाला सांगितल्याशिवाय पूर्ण होणार नाही.

        शहिदा म्हणाली, "चाची, पिछले साल रमजान में रातको मैने माँ को फोन किया था. मेरी माँ रमजान के पूरे रोजे रखती है, यह मेरे को मालूम था, इसलिए मैने माँ से पूछा, माँ तूने रोजा  क्या खाकर खोला?" शहिदा त्या दिवशी खूप रडली. मनात म्हणाली, "मी इथे खजूर, फळे, मिठाई खात आहे व माझी आई तिथे मीठाचा खडा खाऊन रोजा सोडत आहे. 

         शहिदाने लगेच मनीऑर्डर करुन पैसे पाठविले व आईला सांगितले, "फळे, खजूर, मिठाई आणून खा." आईने या वस्तू आणून खाल्ल्याचे सांगितल्यावरच शहिदाने या वस्तू ग्रहण केल्या. शहिदा म्हणाली, "चाची, ये साल मैने माँ के लिए चार किलो खजूर आते वक़्त लाया है." शहिदाची आईवरील ही माया पाहून वाटले की लोक हट्ट करतात मुलगाच होण्याचा? स्त्रीभृणहत्या करुन का होतात पारखे या मायेपासून?

        हैदर-हमीदाची कहाणी सांगताना महत्वाचा भाग सांगायचा राहूनच गेला की! ते दोघे त्याच चंद्रमौळी छप्परात सुखा समाधानात रहात आहेत. त्या दोघांकडे पाहतांना कुणालाही वाटेल माझ्याप्रमाणेच! किती सुखी आहेत हे दोघे! दिवसभरात जमेल तेवढं काम करतात, चार पैसे मिळवतात. मिळालेल्या पैशात चैनीत राहतात. चार पैसे साठवतात. मुली आल्या की चोळी, काकण सध्याच्या भाषेत ब्लाऊज बांगड्या करतात. नातवंडाना खाऊसाठी जमतील तेवढे पैसे देतात. आपल्या परीने एखादा चांगला पदार्थ करुन देतात. हे सगळं घडतं त्या छोट्याशा छप्परात. माझ्या लग्नाला ३५ वर्षे पूर्ण झाली तेंव्हापासून ते छप्पर त्याच जागेवर तसेच उभे आहे. कुडाच्या भींती मातीने लिंपून लिंपून गुळगुळीत झाल्या आहेत. जमीन शेणाने सारवून सारवून घट्ट झाली आहे. फरक इतकाच झाला, २००५ साली मोठा पूर आला.

        त्या छप्परात पाणी येऊन चार दिवस राहून गेले. पण छप्पर आहे तसेच राहिले. भींती दोघांनी पुन्हा लाल मातीने सारवल्या. छप्पराचा पाला काढून कुणाचं तरी घर बांधताना निघालेली कौले घातली व एक मजबूत दार व छप्परात एक न्हाणी बांधून घेतली. त्या दोघांना कोणतीही मोठी अपेक्षा नाही. मोठं घर असावं, घरात फरशा असाव्यात, भिंतीना गिलावा असावा, स्वयंपाकाला बर्शन-कट्टा असावा, स्वतःच शौचालय असावं, सरकारकडून मदत मिळावी, भरपूर बँक बॅलन्स असावा, स्वतःसाठी गाडी असावी, घराला माडी असावी, किमती साडी असावी अशी कोणतीच मोठी स्वप्ने पहाणे त्या दोघांच्या गांवीही नाही. सकाळी लवकर उठायचे, स्वयंपाक पाणी करायचे, पाळलेल्या शेळ्यांची उसाबर करायची, त्यांना पोटभर चारा घालून , न्याहारी आवरुन शेतात जायचे. सहकाऱ्यांसोबत बोलत चालत, चेष्टा मस्करी करत काम करायचे. जेवण झाल्यावर आमच्या किंवा आमच्या शेजारच्या घरात थोडा वेळ टी. व्ही. पहायचा. त्यांचे काही काम असल्यास करायचे व निवांत झोप घ्यायची.

        त्यांच्या जीवनशैलीकडे पाहून माझी मलाच कीव येते. भाड्याच्या घरातून स्वतःच्या कौलारू घरात गेलो. चांगल्या वस्तीत प्लॉट घेतला. त्यावर स्लॅबचे घर बांधण्याचा चंग बांधला. त्यातही नुसते स्लॅबचे लोड बेअरिंगचे नको. आर. सी. सी. चे घर बांधले, स्वतःपुरते नको सोबत हवी या नावाखाली भाड्याने देण्यासाठीही तीन खोल्या बांधल्या. काही वर्षांनी ते घरही जुन्या पद्धतीचे वाटू लागले म्हणून त्या घरावर पुन्हा आधुनिक पध्दतीने बंगला बांधला. आजही यांच्याकडे कुरकुर असते, घराचे गेट जुने झाले आहे, नवीन बसवा. दारातल्या सध्याच्या साध्या फरशा काढून पेव्हिंग ब्लॉक्स बसवा, म्हणजे आमच्या महत्त्वाकांक्षा थांबायचं नावच घेत नाहीत. ओव्हन घ्या, वॉशिंग मशीन घ्या, एल .ई.डी. टी. व्ही. घ्या, हे घ्या ते घ्या, अखंड घ्या चा जप चालूच आहे.

        तुम्ही म्हणाल, सतत काहीतरी घ्यायलाच हवं, त्याशिवाय आमच्या राहणीमानाचा दर्जा कसा उंचावणार? आपली प्रगती कशी होणार? मलाही पटतंय तुमचं म्हणणं, पण आहे त्यात समाधान मानून आपण सुखात केंव्हा राहणार आहोत? हैदर हमीदाप्रमाणे सुखी स्वछंदी जीवन कधी जगणार आहोत? भौतिक सुविधांच्या मागे लागून खरे सुख कशात आहे हे पाहणार आहोत की नाही आपण? का सतत सुखाच्या मृगजळामागे असेच धावत रहाणार आहोत? 

        मध्यंतरी हैदरच्या जावयांनी मुलींनी आहे ते छप्पर पाडून घर बांधून देण्याचा विचार केला पण या दोघांनी नकार दिला. ग्रामपंचायतीनेही त्याला घरासाठी जागा व इंदिरा आवास योजनेतून घर बांधून देण्याचे ठरविले पण त्यालाही या दोघांनी नकार दिला. या मोहल्ल्यात आमचा जन्म गेला, मुली वाढल्या, हे घर सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. देवाघरी जाताना ही तुमची जागा तुम्हाला देऊन जाऊ. कुठं शिकले हे शहाणपण? हे दोघे म्हणतात, "ते राजास जी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या."

        सुखी माणसाचा सदरा कोणी शोधावयास आलं की सांगा त्यांना आमच्या हैदरचा मळलेला शर्ट खुशाल घेऊन जा. शर्ट नेल्यावरही हैदर मस्त मजेत गाणं म्हणत बसेल, गाण्याच्या तालावर मनसोक्त नाचेल व ते पाहून हमीदा पोटभरून हसेल! 

        

1 टिप्पणी: