रविवार, ४ जुलै, २०२१

हराकी (कादंबरी) - पुस्तक परीक्षण

 

हराकी (कादंबरी) - पुस्तक परीक्षण

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी 






लेखक - मनोहर भोसले

प्रकाशक - तेजश्री प्रकाशन, कबनूर.

ISBN: 978-81-950181-2-3


       एका सुप्रसिद्ध, प्रतिभासंपन्न, चिंतनशील लेखकच्या धारदार लेखनीतून साकारलेली एक नितांतसुंदर कादंबरी वाचनात आली. ही कादंबरी वाचण्यापूर्वी 'हराकी' या शब्दाचा अर्थही माहित नसलेली मी कादंबरी वाचताना अक्षरशः भारावून गेले. स्मशानभूमीतून सुरु झालेली ही उत्कंठावर्धक कादंबरी स्मशानभूमीतच संपते, पण एकदा वाचायला सुरुवात झाली की वाचकाची अवस्था झपाटल्यासारखी होते. पुस्तक खाली ठेवावेसे वाटत नाही, हेच या लेखकांचे यश आहे. ग्रामीण बाज असलेली चटकदार भाषाशैली, सुंदर मांडणी, हुबेहूब प्रसंगवर्णने यामुळे एक उत्कृष्ट साहित्यकृती साकारण्यात लेखक शंभर टक्के यशस्वी झाले आहेत. या कादंबरीने जीवनाचे एक विदारक सत्य वाचकांसमोर उभे केले आहे. मानवी जीवनाची विफलता स्पष्ट करतांना लेखक म्हणतात....

'सरणावर ठेवल्यानंतर कमरेचा करदोडासुद्धा तोडून काढला जातो.'

यावरून आयुष्यभर माझं माझं म्हणून धन जोडणारे निश्चितच बोध घेतील. बहुजन समाजाच्या पाचवीला पूजलेल्या गरिबीचं वर्णन या श्रीमंत लेखकाने फारच सुरेख रेखाटलं आहे.


       स्मशानभूमीतून चिता पेटवून उरलेल्या राॅकेलचं कॅन घेऊन घरी आलेल्या नवऱ्याला बघून सखूला आनंद झाला. बऱ्याच दिवसानंतर आज दिव्याला तेल मिळालं असं तिला वाटलं.


       मनुष्यानं कुठल्या जातीत जन्माला यावं हे त्याच्या हाती नसतं पण जीवनात येऊन कसं वागावं? कसं जगावं? हे साध्याभोळ्या यमनाप्पाच्या जीवनातून शिकण्यासारखं आहे.


       या कादंबरीत समाजातील चालीरीती, अंधश्रद्धा यावर प्रकाश टाकून त्यामागील वैज्ञानिक, सामाजिक कारण सांगण्याचा अभ्यासपूर्ण  प्रयत्न केला आहे. जुने ते सोने आणि नवे ते हवे या कात्रीत सापडलेल्या लोकांना यामुळे निश्चित दिशा मिळेल असे वाटते कारण नैवेद्य शिवणारा कावळा निसर्गाचा समतोल राखणारा पक्षी कसा हे पटवून दिले आहे. हराळी दाहनाशक वनस्पती आहे असे सांगितले आहे. हराकी ची प्रथा सामाजिक ऐक्य टिकविण्यासाठी सुरु  झाली असावी. प्रेताच्या डोक्यावर दही का घालतात? प्रेताला कढत पाण्याची आंघोळ का घालतात? डोळ्यात सोन्याचा मणी का घालतात? निधन झाल्यावर घराची साफसफाई करून गोमूत्र का शिंपडले जाते? शिंकाळे कशासाठी असते? चितेभोवती पाणी का शिंपडले जाते? या सर्व प्रश्नांची उत्तरे या कादंबरीत मोठ्या खुबीने दिली आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी रसिक वाचकहो ही कादंबरी तुम्ही अवश्य वाचावी.


       या कादंबरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील एखाद्या प्रसंगाचे वर्णन करताना प्रसंगाला जिवंतपणा आणण्यासाठी जी वाद्ये वाजविली जातात त्यांच्या आवाजाला दिलेले शब्दरूप. ते वाचताना ती वाद्ये वाजत असल्याचा भास होतो...

ढिप्पांग टिप्पांग

ढगाडांग टकाडांग टांग टांग

टकाटकाटकाटका 

काटकूट काटकूट फुटांग फुटांग.


       या कादंबरीत जातीभेदातून माणसा-माणसात पडलेली दरी दिसते. दरी  मिटविण्यासाठी प्रयत्न करणारे कॅप्टन कुटूंबिय  भेटतात. वेगळं व्हायचंय मला म्हणणारी युवा पिढी पुढे येते. कोळी गुरुजींचे देशप्रेम, पैलवान आण्णांचे मित्रप्रेम, एस्. टी. चालकाची माणुसकी, आत्मारामच्या भावाचे शहाणपण या सर्वासर्वांचा प्रत्यय कादंबरी वाचतांना येतो.


       कादंबरीत ह्दय पिळवटून टाकणारे अनेक प्रसंग  वाचकांना मंत्रमुग्ध करून सोडतात. सखूच्या शेळी विक्रीचा प्रसंग, खुळ्या आत्मारामच्या मृत्यूचा प्रसंग, पैलवान आण्णांच्या निधनाचा प्रसंग अंगावर शहारे आणतात.


       थोडक्यात हराकी ही ग्रामीण साहित्यातील एक अनमोल रत्न आहे. पानां-पानावर लेखकाच्या अचूक निरिक्षण क्षमतेचा, शब्दसंपत्ती वरील प्रभुत्वाचा, चिंतनशील लेखनाचा प्रत्यय येतो.


       या कादंबरीचे नेमके परीक्षण करण्यासाठी मला वाटते दुसरी कादंबरीच लिहावी लागेल आणि ते मला जमेल असे वाटत नाही.


शेवटी एवढंच म्हणेन....

शब्दानांही कोडं पडावं 

असे थोर लेखक असतात ।

केवढं आपलं भाग्य असतं

की ते आपल्या जवळचे असतात.


शब्दांकन

डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी 

जयसिंगपूर.



1 टिप्पणी: