शुक्रवार, २८ मार्च, २०२५

अल्लाहवरील श्रध्दा व विश्वासाचे फळ

                       डॉ. ज्युबेदा मन्सुर तांबोळी


फोटो :साभार गुगल


         एक इमाम होते. कामानिमित्त शहरात आले होते. काम पूर्ण होण्यास वेळ झाला. ईशाच्या नमाजची वेळ झाली. त्यांनी विचार केला आजची रात्र मस्जिदमध्ये मुक्काम करू व उद्या सकाळी सुबहची नमाज झाल्यानंतर आपल्या गावाकडे जावू. ते मस्जिदमध्ये आले. वुजू करून त्यांनी नमाजपठण केले व तिथेच बसले. सोबत रात्रीपुरती शिदोरी होती. येथेच आराम करण्याच्या विचारात होते, इतक्यात मस्जिदमधील वॉचमन आला व त्याने इमामना येथे थांबता येणार नाही सांगितले. त्यांनी वॉचमनला विनंती केली पण तो ऐकायला तयार नव्हता. त्यांने इमामना अक्षरशः हाकलून दिले. त्याला काहीही न बोलता ते बाहेर आले व दरवाजाच्या बाहेरच्या कट्ट्यावर येवून बसले. मस्जिद बंद करून वॉचमन बाहेर आला. त्याला इमाम कट्ट्यावर बसलेले दिसले. त्याच्या रागाचा पारा आणखीन वाढला. तो रागाने म्हणाला, तुम्हाला बोललेले समजत नाही वाटतं. जा इथून, अजिबात थांबू नका, निघा लवकर.


        समोरच असलेल्या बेकरीचा मालक हे सर्व पहात होता. इमाम उठून चालू लागल्यावर बेकरीवाल्याने त्यांना बोलवले व म्हणाले, माझ्या घरी खुशाल थांबा, काही अडचण नाही, त्याचे आभार मानून इमाम त्याच्या घरात गेले. आल्यापासून इमाम पहात होते बेकरीवाला हाताने आपले काम करत होता आणि मुखाने तस्बीह (नामजप) करत होता. सुबाहनल्लाहू, अल्हम्दूलिल्लाहू, अल्ला-हो-अकबर हा मंत्रजप तो म्हणत होता. इमामनी न राहवून त्याला विचारले, तु सतत तस्बीह पठण करतोस का, तो म्हणाला, हो मी पाच वेळचे नमाज पठण करतो व काम करताना अल्लाहचे नामस्मरण करतो. इमाम म्हणाले, तुला काय मिळाले आहे सतत नामस्मरण करून. बेकरीवाला म्हणाला, भाईसाब अल्लाहच्या कृपेने मला सर्व काही मिळाले आहे. माझ्या सर्व इच्छा - आकांक्षा पूर्ण झाल्या आहेत. एकच इच्छा बाकी आहे. अल्लाह ती पण इच्छा पूर्ण करेल असा माझा ठाम विश्वास आहे. इमाम म्हणाले, तुझी कोणती इच्छा अपूर्ण आहे. बेकरीवाला म्हणाला, मला विद्वान असलेल्या इमाम अहमंद इब्न हंबल यांना भेटायचे आहे. त्यांच्या विद्वत्तेबद्दल मी खूप ऐकलयं. त्यांच्याकडून मला अल्लाहची उपासना समजून घ्यायची आहे. त्यांचे उपासनेबद्दलचे मार्गदर्शन घ्यायचे आहे.


        इमाम म्हणाले, धन्य आहेस मित्रा. तुझ्या या उपासनेने खूप प्रभावित झालो. मीच आहे इमाम अहमंद इब्न हबल. असे मिळते अल्लाहवरील गाढ श्रध्दा उपासनेचे फळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा