"२१ सप्टेंबर हा दिवस अंधश्रद्धा निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त हा विशेष लेख"
अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज
✍️ ज्युबेदा तांबोळी
प्रत्येकाची कशावर तरी, कोणावर तरी श्रध्दा असतेच कारण श्रध्दा ही मानवाच्या रुक्ष जीवनातील हिरवळ आहे. श्रध्दाळू असणे तर गैर नाही. कारण कोणतेही काम श्रध्दापूर्वक केले तर ते सफल होण्याची, यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. मग ती श्रद्धा परमेश्वरावरील असो, माता-पिता व वडीलधाऱ्या मंडळीवरील असो वा गुरू-साधू संत यांच्यावरील असो, श्रद्धा तुम्हाला शक्ती देत असते, तुमचे सामर्थ्य बनत असते. श्रध्देमुळे आत्मविश्वास वाढतो व या आत्मविश्वासामुळे काम करण्यासाठी दुप्पट बळ मिळते. नि त्यामुळेच कार्य यशस्वी होवू शकते.
पण हीच श्रद्धा जेंव्हा अंधश्रद्धेकडे झुकते तेंव्हा विनाशाकडे वाटचाल सुरू होते. कारण अंधश्रद्धा ही श्रद्धेच्या निखाऱ्यावरील राख आहे. ही राख झाडत असताना हाताला चटका बसण्याची दाट शक्यता असते किंवा निखारा विझण्याचीही शक्यता असते कोणतीही गोष्ट सबळ पुराव्याशिवाय स्विकारणे म्हणजेच अंधश्रद्धा होय. अंधश्रध्देमुळे सगळी कामे ईश्वरकृपेने व्हावीत, आपोआप व्हावीत असे वाटू लागते व त्यातूनच तथाकथित बाबा-बुवा यांच्यात समाजाचे शोषण करण्याची प्रवृत्ती निर्माण होते.
१९९५ साली सप्टेंबर महिन्यात अंधश्रध्देला पूर आला होता. मुंबईत माहिमच्या समुद्राचं पाणी गोड झाल्याची बातमी पसरली. माहिमच्या खाडीकिनारी एकच गर्दी झाली होती. लोक अक्षरशः वेड्यासारखे समुद्रातील पाणी घराघरात पीत होते, लहान मुलांना पाजत होते हा बाबा मगदूम शहांचाच चमत्कार असल्याचे एकमेकांना सहर्ष सांगत होते. माहिमच काय पण मुंबईतील संपूर्ण किनारा अस्वच्छतेचे माहेरघर बनलेला असताना अंधश्रध्देचे बारे अंगात संचारलेले मुंंबईकर बाटल्या भरभरून ते घाण पाणी मोठ्या श्रद्धेने पीत होते. महापालिका प्रशासन हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे सांगत असताना सुध्दा अंंधश्रध्देची पट्टी बांधलेल्या लोकांना ते कसे ऐकू येणार?
२१ सप्टेंबर १९९५ या दिवशी गणपती दूध पितो या अफवेत आपले महाराष्ट्र राज्य बुडाले होते. तेंव्हा तासाभरातच देशभर नव्हे तर साऱ्या जगभर गणपतीच्या मूर्ती दूध पीत असल्याचा बातम्या येत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्र्यानीही आपल्या गणपतीने दूध प्यायल्याचे मोठ्या श्रध्देने सांगितले होते. त्यामुळे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, स्वातंञ्यवीर सावरकरांंची विज्ञाननिष्ठ परंपरा असलेल्या आपल्या महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागली होती. भूपृष्ठीय तणाव व केशाकर्षण यामुळे असे घडू शकते हे त्यामागचे वैज्ञानिक सत्य आहे. माहिमचे गोड पाणी पर्यावरण आणि प्रदुषण नियंत्रण खात्याने परीक्षण करण्यासाठी पाठविले असता मिठी नदीचे पाणी समुद्राच्या पाण्यात मिसळल्याने पाणी गोडे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष निघाला.
पार्वती माँ च्या कृपेने पुत्रप्राप्ती होते ही मोठी अंधश्रध्दा काही वर्षांपूर्वी पसरली होती. शेकडो किलोमिटरचे अंतरावरून लोक पुत्रप्राप्तीसाठी स्पेशल गाड्या करून पार्वती माँ कडे जात होते. शेकडो वर्षापूर्वीचे संतवचन आहे की "नवसे-सायास पुत्र होती, तर मग का करावे लागे पती?" विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगातील लोकांना जे कळत नाही ते पूर्वीच्या संत महात्म्यांना कळत होते असेच नाईलाजाने म्हणावे लागेल. कुशिऱ्याच्या औषधाने डोळे बरे होतात, ताईत-गंडा दोऱ्याने आजार बरा होतो, निर्जीव ग्रहांची कृपा-अवकृपा मानवावर होते, बालकाचा बळी देऊन धनप्राप्ती होते. उंबराच्या झाडाला फूल आले म्हणून पंचगंगेवर गर्दी होते, काही ठिकाणी आजही साप चावला तर मंत्रिकाकडे नेले जाते, ताप आला तर लिंबू गंडे दोरे उतरवून टाकले जातात. अशा कितीतरी अशास्त्रीय गोष्टीवर आपला सहज विश्वास बसतो. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभावच याठिकाणी दिसून येतो. त्यामुळेच प्रगत समाज बऱ्याच वेळा अप्रगत दिसत आहे.
आमच्या जवळच्या नानेवाईकांच एक उदाहरण या ठिकाणी सांगते. लहान मुलांच्या डोळ्यात काजळ घातल्याने मुलाचे डोळे मोठे होतात ही अंधश्रद्धा. त्यांनी घरीच काजळ तयार केले व व्हीक्सच्या डबीत भरून बाळाच्या डोळ्यात घातले. त्या बाळाच्या डोळ्यात कायमचा दृष्टीदोष निर्माण झाला.
आपल्या देशामध्ये अजूनही लोक अज्ञानी व निरक्षर आहेत. स्त्रिया देवभोळ्या व धर्मभोळ्या आहेत. त्यांचा फायदा विशीष्ट लोक घेत आहेत सर्वच धर्म हे विज्ञानाच्या उदयापूर्वीचे आहेत. त्यामुळे धर्मात सांगितलेली बरीच सत्ये विज्ञानाच्या कसोटीला उतरतीलच असे नाही. युरोप खंडात धर्म आणि विज्ञान यांच्यात फार मोठा संघर्ष होवून त्यात विज्ञानाचा विजय झाला. परिणामी समाजाने विज्ञानाचा स्विकार केला. भारतात मात्र धर्म व विज्ञान यांचा संघर्ष न होताच विज्ञानाच्या सुविधा आल्या त्यामुळे आपल्या समाजात विज्ञानाची सृष्टी आली पण दृष्टी आली नाही. ती दृष्टी आणण्याचा या दिनी आपण प्रयत्न करूया.
Thanks for this blog
उत्तर द्याहटवाअगदी वस्तुस्थिती आहे ही
उत्तर द्याहटवाWHY SO BIG YAAR......ITS OF NO USE, STRICTLY OK FOR IDEA.
उत्तर द्याहटवा