शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

नमाजमध्ये पूर्णपणे समरस व्हा! - विशेष मराठी लेख


नमाजमध्ये पूर्णपणे समरस व्हा!

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       एक इसम काबागृहाच्या आवरणाला मिठी मारून धाय मोकलून रडत होता आणि स्वत:च्या मोक्षप्राप्तीची याचना करीत होता. त्याच्या रडण्याचे लोक मनातून कौतुक करीत होते, ईश्वराच्या दरबारी असे रडण्याचे आम्हालाही भाग्य लाभो असे मनात म्हणत होते. त्याच ठिकाणी एक अंतर्यामी सूफीदेखील हे दृश्य पाहत होते. तेसुध्दा याच्या रडण्याने प्रभावित झाले. अचानकपणे त्यांच्या मनात आले की या भाविकाच्या अंतर्मनाची चाचणी घ्यावी. चाचणी घेताच कळले की, अंतिम मोक्ष मागणाऱ्याचे मन हमशरीफच्या आवारात नव्हतेच ते तर बाजारपेठेत हिंडत होते. अशी प्रार्थना काय कामाची?


       प्रार्थना (नमाज) कुठलीही असो, त्यात संसारमोहाला त्यागावे लागते. मग ती रमजान महिन्यातील असो किंवा एरवी करण्यात येणारी प्रार्थना असो. ईश्वराची समीपता व एकात्मता निर्माण करण्याकरिता आपल्या भोवतालच्या आपल्या सुखाला आणि विश्रांतीला एवढेच नव्हे तर आपल्या अस्तित्वालाही विसरावेच लागते.


       पीरानेपीर हजरत अब्दुल कादिर जिलानी आपल्या शिष्याला नेहमी ताकीद करायचे की, प्रार्थनेच्या वेळी पूर्णपणे त्यात समरस व्हा जणू कांही तुम्हाला अल्लाहचे दर्शन घडत आहे. संसारिक जीवन व्यतीतताना त्यात पूर्णपणे समरस व्हा, नमाज पढताना मनावर संसारिक जीवनाची एक छटासुध्दा राहता कामा नये. हाच खरा संसार व हाच खरा संसारत्याग..!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा